प्रस्तुत लिखाण झी मराठीवर रोज रात्री साडे आठ वाजता दाखवण्यात येणाऱ्या "तुला पाहते रे" ह्या मालिकेवर आधारित आहे. ही मालिका न बघणाऱ्यांना कदाचित लिखाणाचा संदर्भ लागणार नाही.
ऐकलंत का ?
ईशा निमकरच्या मावशीला हव्या असलेल्या एका विशिष्ट साडीसाठी विक्रांत सरंजामेंनी दोन मिनिटात आणि तेही एका फोनवर ती साडीची अख्खी कंपनी विकत घेतली...
झालं काय की, ईशाच्या मावशीला एका साडीचा रंग, दुसऱ्या साडीचं डिझाईन, तिसऱ्या साडीचा पदर, चौथ्या साडीचा पोत आणि पाचव्या साडीचं ब्लाउज पीस आवडलं. आता तिला हे सगळं एकत्र करून एका साडीत हवं होतं.एवढी साधी सरळ मागणी हो तिची. तर तो मुजोर सेल्समन चक्क नाही म्हणाला तिला. हे ऐकून विक्रांत सरंजामे चिडले. त्यांनी लगेच त्या साडीच्या कंपनीच्या मालकाला फोन करून,"आजपासून तुझी कंपनी माझी" असं सांगून टाकलं.
आता तो जुना मालक स्वत: साडी विणायला बसला असून १३ जानेवारी संध्याकाळी सातच्या आधी हेलिकॉप्टरने साडीची डिलिव्हरी निमकरांच्या घरी येऊन करणार आहे. निमकरांच्या चाळीसमोर हेलिकॉप्टर उतरवायला जागा नसल्याने सरंजामेंनी आसपासच्या आठ-दहा चाळी विकत घेऊन टाकल्या. आता तिथे हेलिपॅड बनवणं सुरु आहे. त्या आठ- दहा चाळीतल्या रहिवास्यांना मोबदला म्हणून लोखंडवालात एकेक फ्लॅट आणि कुटुंबातील एका सदस्याला राजनंदिनी साडीला किमतीचे स्टिकर चिपकवायची नोकरी देण्यात आली आहे.
खरी गंमत तर पुढे आहे,
लग्नाच्या जेवणातला गोड पदार्थ म्हणून ईशाच्या मावशीने गुलाबजामची चव, पुरण पोळीचा आकार, मूग हलव्यासारखा रंग, केशर भातासारखा नरम, बासुंदीसारखा वाटीत घेऊन चमच्याने खाता येणारा आणि शुगर फ्री असलेला पदार्थ मागितला आहे.
आता झेंडे सर, मायरा मॅडम आणि स्वत: विक्रांत सरंजामे गल्लोगल्ली असा पदार्थ शोधत फिरतायेत म्हणे.
हे ऐकून हॉटेल ताज, चितळे, काका हलवाई आणि हल्दीरामच्या आचाऱ्यांनी अनिश्चितकालीन संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
आता हे ही कमी होतं म्हणून की काय, ईशाच्या आईने विक्रांत सरांकडे एक नवीन पण छोटीशी मागणी केली.
आई म्हणाल्या, "आता ईशाचं तुमच्याशी लग्न झाल्यावर तिच्या महरेच्या चकरा नेहमी हेलिकॉप्टरनेच होतील. मग त्यात काही नावीन्य राहणार नाही. म्हणून उद्या ईशाची बिदाई राफेल विमानातून व्हावी अशी माझी इच्छा आहे."
त्यावर झेंडेनी,"अहो आई, राफेल प्रकरण सध्या वादग्रस्त आणि न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे विमान उद्या उपलब्ध होऊ शकणार नाही" असे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण विक्रांत सरांनी नजरेनेच झेंडेना,"आय डोन्ट केयर झेंडे. मला राफेल विमान उद्या इथे पाहिजे" असं सांगितलं. झेंडे लगेच कामाला लागले.
मायरा मॅडम आणि झेंडेनी तडकाफडकी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, Dassault Aviation कंपनीचे मालक, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आणि विक्रांत सरंजामे ह्यांच्यात कॉन्फरन्स कॉल अरेंज केला. त्यात विक्रांत सरंजामेंनी आपण Dassault Aviation ही कंपनी विकत घेत असल्याचे जाहीर केले. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी आपण स्वत: राफेल विमानात बसून नवदाम्पत्याला आशीर्वाद द्यायला येऊ असे जाहीर आश्वासन दिले. एवढेच नव्हे, तर ईशा ही मला मुलीसारखी असल्याने तिचे कन्यादान मी आणि निमकर असे दोघेही मिळून करू असेही फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले.
ही गोष्ट विरोधी पक्षाला कळताच, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा मोठ्ठा घोटाळा असल्याचा आरोप केला.
लगेचच विक्रांत सरंजामे ह्यांनी राहुल गांधींना फोन करून लग्नाचे आमंत्रण आणि स्वत:चा लहान भाऊ जयदीप ह्याच्याशी खुल्या चर्चेचे आवाहन दिले. हे ऐकून राहुल गांधींनी सगळे आरोप बिनशर्त मागे घेतले.
आता सगळ्यांचे हट्ट ऐकून ईशासुद्धा पेटून उठली. तिनेही एक हट्ट केला. ती विक्रांत सरांना म्हणाली, "विक्रांत सर तुमचं जर माझ्यावर खरंच प्रेम असेल तर मला हनिमूनला माझ्या आवडत्या ठिकाणी घेऊन जा."
विक्रांत सर म्हणाले, "ईशा तू म्हणशील तिथे मी तुला घेऊन जाईल. सांग तुला कुठं जायचंय?"
"सर..अंटार्टिका"
हे ऐकून विक्रांत सर, मायरा मॅडम आणि झेंडे जागच्या जागीच बर्फासारखे थिजून गेले.
विक्रांत सर म्हणाले," अगं ईशा, अंटार्टिका हे हनिमून डेस्टिनेशन नव्हे. दक्षिण ध्रुवावर आहे ते. तिथं तर राहायला हॉटेल्सही नाहीयेत. बर्फ आहे नुसता"
"मग बांधा"
"अगं पण अंटार्टिकावर कोणत्याही देशाची सत्ता नाहीये. तिथं जायला संयुक्त राष्ट्रसंघाची परवानगी लागते."
"मग घ्या परवानगी"
लगेच विक्रांत सरांनी झेंडे आणि मायराकडे बघितले.
पण एव्हाना,झेंडे सर आणि मायरा मॅडम नोकरीचा राजीनामा देऊन उत्तर ध्रुवावर पोहोचल्याचे कळले.
समाप्त
प्रतिक्रिया
10 Jan 2019 - 5:56 pm | विजुभाऊ
कंटाळा आला ह्या अशा पोष्टचा.
किती काळ चालणार आहे ते तुला पाहते रे पुराण कोण जाणे.
व्हॉट्सअॅप वर काल त्या दोघांच्या लग्नाच्या फोटोंचा पूर आला होता.
लोकांच्या मूर्खपणाची कमाल वाटते.
विनंती करतो की बास करा आता ह्या सरंजामेंच्या पोष्टी
10 Jan 2019 - 6:28 pm | टवाळ कार्टा
राजकारणाच्या गटारापेक्षा चांगले आहे की
11 Jan 2019 - 12:02 pm | नाखु
पक्षीय साठमारीत वैयक्तिक होण्यापेक्षा हलकं फुलकं घेण्याला पाठिंबा आहे.
कुठेही कुणासाठी न पाहणारे प्रत्यक्षात सगळीकडेच पहात असतात हे लक्षात असलेला प्रेक्षक वाचकांची पत्रेवाला नाखु
10 Jan 2019 - 7:43 pm | mrcoolguynice
चांगला लेख
10 Jan 2019 - 7:56 pm | mayu4u
... मिपा ला मायबोलीच्या अति खालच्या पातळीवर आणणं टाळूया.
11 Jan 2019 - 2:52 am | वीणा३
छान लेख. मिसळपाव वर बहुतेक हा पहिलाच धागा आहे त्या सिरीयल वरचा, पण लोक बाकी ठिकाणी वाचून (आणि कदाचित ती सिरीयल पाहून ) एवढे वैतागलेत कि हा एक धागा पण नकोस वाटतोय :P . बिचारे धागालेखक !!!
11 Jan 2019 - 3:04 am | सोन्या बागलाणकर
लय भारी चिनारभाऊ!
नशीब ईशाने अंटार्क्टिका निवडले मला वाटले आता हि काय मंगळावर हनिमून हवा म्हणते काय?
म्हणजे सरंजामे एलोन मस्कला कॉल करून रॉकेट बूक करतो कि काय ... =))
11 Jan 2019 - 10:44 am | श्वेता२४
मालिकाच इतकी भिकार आहे की सगळे वैतागलेत.
11 Jan 2019 - 10:53 am | कविता१९७८
हा लेख तुम्हीच लिहीलाय अशी आशा करते कारण कुणीतरी एका क्लोज्ड गृपमधे व्हाॅटस् अॅप वरुन काॅपी पेस्ट असे लिहुन पोस्ट केलाय
11 Jan 2019 - 11:06 am | चिनार
ताई हे लिखाण माझंच आहे. परवा ह्यातला सुरवातीचा भाग मी फेसबुक वर पोस्ट केला. तो सध्या सगळीकडे माझ्या नावाशिवाय फिरतोय. माझ्या काही मित्रांनी मला वेगवेगळ्या फेबु ग्रुपवर तो पोस्ट झाल्याचे सांगितले आहे.
काल त्या लिखाणात जरा भर घालून मी मिपावर पोस्ट केलं
11 Jan 2019 - 11:08 am | कविता१९७८
ओके , मी सांगितलय तिथे लेखाच्या शेवटी तुमचे नाव लिहायला
11 Jan 2019 - 10:55 am | mrcoolguynice
मस्त लेख.
सीरियल मधले व्यंग चांगलेच पकडले आहे धागा लेखकाने... विनोदि सादरिकरन छान...
ज्याप्रमाणे रिमोटने कूठल्या चँनेलवर आपण थांबु शकतो की नाही, हे जसे लोकांच्या हातात असते,
त्याचप्रमाणे एखादाँ धागा वाचावाँ किंवा सोडुन द्यावा, हे लोकांच्या हातात राहु दया, ही आपेक्षा ...
11 Jan 2019 - 11:26 am | mrcoolguynice
म्हणजेच
धागा व लेखक यांना लगेचच , घालून पाडून प्रतिक्रिया टाळल्या जाव्यात .... हीच अपेक्षा ...