लेक मागच्या दोन वर्षापूर्वी दहावीला होती . मैत्रिणी इतकंच सख्ख्य असल्यामुळे बऱ्याच हृदयातल्या गोष्टी ती शेअर करते . अगदी मैत्रिणीसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा सल्ला मागते .तिला माहित आहे काहीही सांगितले तरी चालते, ओरडा मिळत नाही मग बरीच देवाण घेवाण होते . ती आणि तिचे मित्र मैत्रिणीविषयी अपार माया आहेच पण काय होणार ह्या अडनिड्या मुलांचे याची चिंता सतत सतावत असते . म्हणून हा थोडासा प्रयत्न .
मॉम यु नो , ऑल गर्ल्स क्रेझी अबाउट ..... , ऑल ह्याव क्रश ऑन हिम ,. क्लास बंक करून मुली त्याला बघायला जातात . मी अवाक . पण न जाणवून देता ... एवढं काय आहे ग त्याच्यात? सर्व जणी एवढ्या वेड्या झाल्यात त्या ? माझा भाबडा प्रश्न. ही इज स्पोर्टस कॅप्टन मॉम .खूप हार्ड वर्क लागतं तेंव्हाच स्कुल चा स्पोर्टस कॅप्टन होता येत . माझ्या ज्ञानात लेकीची भर . पण मला आठवले ते ब ,क तुकड्यातले आडदांड . खेळण्यात खूप हुशार असून पण कोण कुत्रं विचारायचा नाही त्यांना . अभ्यास करून कितींनी झेंडे लावले हा एक रीसर्च पेपर होईल पण असो भूतकाळात जास्त रमू नये ..
आज कॉलेजचा पहिला दिवस .ओरिएन्टेशन होतं , लेकीला सोडवायला गेले होते . तिथे मित्र मैत्रिणी भेटल्यावर लेक कुठे गायब तेच समजत नव्हते . एकमेकांना मिठ्या काय ,पूर्ण बत्तीशी दाखवून स्माईल काय .. प्रत्येकाच्या हातात ४-५ इंची मोबाईल काय ... ५०%पेक्षा जास्त मुलं सेल्फी काढण्यात मग्न ... सर्वांत महत्वाचे म्हणजे रंगलेले केस ... काहींनी निळे ,काहींनी जांभळे ,तपकिरी,लाल ,पिवळे , गुलाबी , ऑर्गण्डी ... बापरे ... जांभळे केस मात्र खूप सुंदर दिसत होते एकीचे . लेकीचे कमरे पर्यंत वाढलेले केस कापून असे रंगवून काढावे वाटले ... टॅटूज ... हिरवेगार हात ,मान ,पाठ ..
आता थोडं ह्या मुलांचे काय होणार ह्या चिंतेविषयी ...
एक मुलगा सतत खेळात रमायचा ,सतत माकडउड्या ,सतत काहीतरी विचित्र प्रकार . नववीत तो पळून गेला ,खूप शोधला त्याला . बंगलोरच्या रेल्वेस्टेशन वर कोण्या एका नातेवाइकायला सापडला ,तिकडून आणला .मग अर्थात कॉन्सेलिंग . घरी आई वडिलांची सतत भांडणे ... अभ्यासाचे दडपण ... म्हणून तो पळून गेल्याचं ऐकून आहे .खूप जपायला ,काळजी घ्यायला सांगितली होती . शाळा पण खूप काळजीपूर्वक त्याचे समुपदेशन करायची .. दहावीत तो मुलगा पुन्हा पळून गेला ... नक्की काय झाले असेल ?कोठे असेल ? काय खात असेल ? कसा जगत असेल ? काय हाल अपेष्टा भोगत असेल ... ? दहावीच्या निरोप समारंभात मुलांना त्याच्या आठवणीने व्याकुळ व्हायला झाले ... जिथे असशील तिथे सुखी रहा अँड वुई ऑल आर मिसिंग यू असे बोलून प्रत्येकाने डोळ्यातून पाणी काढले ....
दुसरा एक मुलगा गडगंज श्रीमंत बापाचा मुलगा. अगदी ऑडी तुन शाळेला यायचा पण किती दिवस आला शाळेला तर फक्त वर्षातून १० दिवस , त्यात पण वर्गाच्या बाहेर बसून त्याला जुन्या टेस्ट पूर्ण करायला लागायच्या . तो आला कि मुलं त्याची बाकं वाजवून स्वागत करायचे ... तो प्रत्येक वेळी येण्यासाठी टिचरलाच घरी फोनकरावा लागायचा ... का येत नसेल तो शाळेला ? ज्या मित्रांशी मैत्री करायचा त्यांना शाळेत पोहचवायला यायचा ,मॅक डी वैगेरे त जायचा पण शाळेत नाही . मोठी नायकिची पाच सहा हजाराची बॅग घेऊन ,नायकीचे शूज घालून शाळेत यायचा ... शाळेचे शूज कधीच घातले नाहीत ... परीक्षाही दिली नाही .. काय करायचे ह्या मुलाच्या आई वडिलांनी ?
तिसरा एक मुलगा अतिशय खेळण्याची सवय , निम्मा वेळ खिडकीतून ग्राउंड कडे बघत बसायचा .क्लास सुरु असला तरी टिचरला सांगून खेळायला जाणार . शर्ट भिजेपर्यंत खेळणार . शूज ,शर्ट,पॅन्ट सर्व मातीने अतिशय घाण होईस्तोवर आणि मग तसाच घामेजलेला पुढच्या क्लास ला येऊन बसणार ... कदाचित त्याच्या स्पोर्ट्स च्या आवडीवर कोणी मेहनत घेतली असती तर ऑलम्पिक मेडल नक्की मिळवले असते ...
चौथा अतिशय ढ होता ,एका मुलीवर त्याला क्रश झाले , पण ती मुलगी खूप हुशार .पटवण्याचा खूप प्रयत्न केला पण शक्यच नव्हते . पण त्याने तिच्यासाठी खूप अभ्यास पण केला आणि बऱ्या मार्कानी पास पण झाला . तिला बड्डेला चॉकलेटचा बुके त्याने स्वतः करून आणलेला .त्या मुलीमुळे तो इतर सर्व मुलींचा रिस्पेक्ट करायला पण शिकला . स्वतःचे भवितव्य पण सुधारून घेतले . तिच्या बापाच्या मोबाईलवर वर त्याने हाय पाठवले म्हणून त्याने त्या मुलीच्या खूप शिव्याही खाल्ल्या पण सुधारलाही नक्कीच ... पण अशी उदाहरणे विरळाच ..
पाचवा अजून एक ,तो हि खूप ढ होता , पण बापाने आय फोन आणि बाईकचे स्वप्न दाखवले , १० सीजीपीए मिळाला कि हे सर्व मिळेल असे सांगितले ... बापाला वाटले असेल पोरग्याला हे कधीच शक्य नाही मग काय देऊन बसला बाप वचन . पोरगा हळूहळू अभ्यासात गढला . अक्षर तर इतके कुत्र्या मांजराचे पाय होते , त्यावर पण खूप मेहनत घेतली आणि हळूहळू गाडी रुळावर आली ... आणि फायनली ही गॉट १० सीजीपीए...
अजून असाच उदाहरण माझ्या बहिणीच्या मुलाचे , त्यालाही ८०% च्या वर मार्क मिळाले की तुला बुलेट असे बापाने सांगून ठेवले होते , रिझल्ट लागायच्या आदी १५
मिनिट सुद्धा तो पप्पाना गाडी बघून यायला सांग म्हणून फोन कर अशी आईला धमकी देत होता . भावोजी सतत पोरगं गुण उधळणार ह्यावर ठाम म्हणून बहीण धास्तावलेली . तर त्याला ६६% गुण मिळाले तर प्रत्येक जण त्याला शिव्या घालत होता . मला डिप्लोमालाच ऍडमीशन घ्यायचीय म्हणून त्याचा हट्ट एकीकडे आणि पोरगा तिकडे जाऊन नापास होईल म्हणून बापाचे पूर्ण दुर्लक्ष ... सायन्स ला नाही तू आर्ट्स लाच जा म्हणजे बारावी निदान पास होशील अशी वडिलांची भूमिका . दोघांच्या मध्ये बहिणीचे मरण ... अजून एक त्याचा पराक्रम म्हणजे आजी नेट साठी पैसे देत नाही म्हणून त्याने उसावर मारायचे औषध चूळ भरले . फक्त घाबरवण्यासाठी .लगेच पाण्याने चूळ वैगेरे भरली ... दहा बारा दिवस तोंड उकलून आले होते ... काहीही खाता येत नव्हते ... मध्ये एका मुलीने लिहिलेली चिट्ठी सापडली होती ... बहीण हे सर्व पाहून मला मुलं झालीच नसती तर बरं झालं असतं म्हणून रडत होती ...
टिपः मागे हेच दोन लेख मी ऐसी अक्षरे वर टाकले होते, ह्याचे पुढचे भाग लिहायचे मनात आहे म्हणून पुन्हा हा खटाटोप .
प्रतिक्रिया
17 Dec 2018 - 6:16 am | कंजूस
मुलांची आवड आणि पालकांची अपेक्षा यांत फरक पडतोय फार. आपले पालक अडनिडे आहेत अशी मुलांची ठाम समजूत झालेली आहे.
17 Dec 2018 - 12:05 pm | जेडी
नुसत्या करीअर साठी नाहिए , सर्वच बाजुनी लिहायचा प्यत्न करतीए.
19 Dec 2018 - 12:15 am | सुचिता१
चांगला आ हे प्रयत्न ! अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे.