काही दिवसांपूर्वी 'सर्चिंग' हा इंग्रजी सिनेमा पाहिला. बर्याच दिवसांनी एक चांगला, उत्कंठावर्धक रहस्यपट पाहिल्याचं समाधान मिळालं. अतिशय संयत हाताळणीमुळे 'सर्चिंग' एकाच मुख्य कथासूत्राभोवती प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो. मला या चित्रपटाबद्दल आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे कुठलाच इतर फापटपसारा या चित्रपटात नव्हता. समांतर असणारी उपकथानके नाहीत; विनाकारण वाढवून ठेवलेली गुंतागुंत नाही; प्रेक्षकांना भुलवण्यासाठी रचलेले फसवे भूलभुलैय्या नाहीत. एकच प्रश्न आणि त्याभोवती फिरणारे, खरे वाटणारे नाट्य! एका माणसाची एक टीनेज्ड मुलगी एक दिवशी अचानक गायब होते. अतिशय लाघवी, बोलकी, खूप मोठा मित्रपरिवार असणारी, मित्र-मैत्रीणींमध्ये लोकप्रिय असणारी, निरनिराळ्या गोष्टी करणारी एकुलती एक मुलगी गायब झाल्यानंतर तिच्या बापाच्या जीवाची घालमेल सुरू होते. बाप त्याच्या असंख्य व्यापांतून एका निवांत क्षणी आपल्या कुठल्याशा क्लासला गेलेल्या मुलीला मेसेज टाकतो. एरवी त्याच्या मेसेजेसला भराभर उत्तर देणारी त्याची मुलगी उत्तर देत नाही. बापाला हळूहळू टेंशन यायला लागतं. मुलीचा फोनदेखील बंद येतो. घाबरून तो सगळीकडे चौकशी करतो. तिचे फेसबुक वगैरे अकाऊंट्स कसेबसे उघडून तो तिच्या अॅक्टिव्हिटीज चेक करतो. सरतेशेवटी त्याला पोलिसांची मदत घ्यावी लागते. या सगळ्या पाठपुराव्यादरम्यान अनेक धक्कादायक बाबी उघड होतात. बाप हताश होतो. आपल्या मुलीला आपण कधी ओळखतच नव्हतो ही टोचणी त्याच्या मनाला लागून राहते. चित्रपट हळूहळू पुढे सरकतो आणि आपली उत्कंठा शिगेला पोहोचते. रहस्य उलगडल्यानंतर आपल्याला जबरदस्त धक्क बसतो आणि चित्रपट संपतो.
आजकाल प्रेक्षकांना थ्रिल किंवा बरं वाटावं म्हणून बरीच उपकथानके अशा रहस्यपटात घुसडण्यात येतात. प्रेम, नाचगाणी, संशयाचा परिघ वाढवण्यासाठी पेरलेली गुंतागुंत वगैरे. नुकत्याच येऊन गेलेल्या 'अंधाधून'मध्ये दुसर्या भागात अकारण गुंतागुंत वाढवून ठेवल्यासारखी वाटते. कथा कशी वळण घेईल याचा अंदाज न आल्याने मध्यांतरानंतरच्या भागात किडनी, दुबईचा शेख वगैरे खूपच अतार्किक उपकथानके ठिगळ लावल्यासारखी घुसडण्यात आली आणि त्यामुळे पहिल्या भागात जी मजा येते तशी मजा दुसर्या भागात येत नाही. 'अंधाधून' याचमुळे दुसर्या भागात जरा फसतो. 'सर्चिंग'मध्ये मात्र हा मोह कटाक्षाने टाळण्यात आलेला आहे. एकच कथासूत्र आणि त्याभोवती घट्ट विणलेली संशयाची आणि उत्सुकतेची जाळी, बस! अगदी हेच तंत्र 'तुंबाड'मध्ये देखील वापरण्यात आले आणि चित्रपट कमालीचा प्रभावी ठरला.
'सर्चिंग'ची अजून एक खासियत म्हणजे हा चित्रपट संपूर्णपणे निरनिराळ्या स्क्रीन विंडोजमध्ये घडतो. मेसेंजर विंडो, वेबसाईटचे पान, मोबाईलची व्हिडिओ स्क्रीन अशा स्क्रीन्समध्ये हा चित्रपट घडतो. या चित्रपटात कुठेही थेट कथानकातले प्रसंग घडतांना दाखवलेले नाहीत आणि तरीही हा चित्रपट उत्सुकता ताणून ठेवतो. मी तर असे म्हणेन की गोष्ट दाखवण्याच्या या अनोख्या पद्धतीमुळे चित्रपटाचा परिणाम अधिकच गहिरा होतो. सुरुवातीची कित्येक मिनिटे या चित्रपटात संवाद नाहीतच. चॅट विंडोमधून आपल्याला संभाषण दाखवले जाते आणि चित्रपट हळूहळू उलगडत जातो. एकदा नक्कीच बघावा असा सुंदर चित्रपट!
दोन-तीन दिवसांपूर्वी "...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" पाहिला. घाणेकर १९८६ मध्ये गेले. मी त्यावेळेस जेमतेम १० वर्षांचा होतो. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल फारसं माहित नव्हतं. 'हा खेळ सावल्यांचा', 'मराठा तितुका मेळवावा' वगैरे चित्रपट माहित होते. ते कसलेले नट होते हे ही माहित होतं. आणि हो...अतिशय लफडेबाज नट म्हणून त्यांची ख्याती (?) होती असे ऐकून होतो. 'काशिनाथ' बघण्याचा माझा तसा काही खास प्लॅन नव्हता पण दोन वर्षांनी पहिल्यांदा मी बायकोला चित्रपट पहायला पाठवलं आणि मी घरी आमच्या बाळाला सांभाळत बसलो. मी तिला 'ठग्ज ऑफ हिंन्दोस्तान'ला पाठवलं. मी ठरवलं होतं की नंतर आपण (नेहमीप्रमाणे) एकट्याने हा चित्रपट बघायचा. संध्याकाळी पावणे-सात वाजता बायको तणफणतच घरी आली. तिचा अंदाज एकंदरित "मढं बशिवलं त्या मेल्या ठग्जचं" वगैरे असा होता. मी चक्रावलो. ये क्या हो गया भई? आमिर खानचा चित्रपट! एक क्षण वाटलं की ट्रॅफिकला वैतागून बायको चिडली असेल. पहिल्यांदाच बाळाला असं घरी इतका वेळ ठेवून ती पिक्चरला गेली होती. मला वाटलं एकूण चार तास लागले म्हणून चिडली असेल. पण नाही. मी विचारलं तर ठग्जला शिव्या घालण्यासाठी तिला शिव्या सापडत नव्हत्या इतकी ती नि:शब्द, हतबुद्ध, विद्ध वगैरे झाली होती. आपसूकच माझा प्लॅन बारगळला आणि म्हणून मी 'काशिनाथ'ला जायचं ठरवलं. पिक्चर तो देखनाईच पडता ना!
आमच्या नेहमीच्या यशस्वी नीलायमला गेलो तर बाल्कनी फुल्ल! एरवी मी बुकमायशोवर तिकिट काढल्याशिवाय अजिबात जात नाही पण त्यादिवशी टॉकिज मोकळं दिसलं म्हणून तडक गेलो तर पोहोचेपर्यंत बाल्कनी फुल झाली होती. असो. 'काशिनाथ' मला आवडला. एकच प्रॉब्लेम! चित्रपटाची लांबी! अगदी आरामात २० मिनिटे कमी करता आला असता. पण बाकी चित्रपट चांगला वाटला. सुबोध भावेने घाणेकरांचं बेअरिंग उत्तम पकडलं आहे. फक्त त्याचं पोट जरा रसभंग करत होतं. प्रसाद ओकने पणशीकर चांगले उभे केले आहेत. आनंद इंगळेचा वसंत कानेटकर मिश्कील आणि मस्त! कांचन झालेल्या वैदेही परशुरामीने छान काम केलं आहे. तिचं ते घाणेकरांवर भाळणं, मनातल्या मनात त्यांच्यावर प्रेम करणं, डोळ्यांमधून त्यांच्याविषयीचे प्रेम व्यक्त करणं वगैरे वैदेहीने छान दाखवले आहे. सोनाली कुळकर्णी (सुलोचना), मोहन जोशी (भालजी पेंढारकर), अमृता खानविलकर (संध्या), सुमित राघवन (डॉ. लागू) वगैरे छान! अमृता खानविलकर ३-४ मिनिटांच्या रोलमध्ये कमालीची सुंदर दिसली आहे. संध्याच्या तोंडाच्या आणि शरिराच्या विचित्र हालचाली तिने अप्रतिम दाखवल्या आहेत. ही एक गुणी अभिनेत्री आहे. 'कट्यार काळजात घुसली' आणि 'राजी' मध्ये हिचं काम छानच होतं. दुर्दैवाने मराठी चित्रपटात अभिनयाचं सोनं व्हावं अशा खूप कमी भूमिका असतात. कित्येक वर्षांत सचिनला एखादा 'कट्यार' मिळतो किंवा सुबोध भावेला 'बालगंधर्व' मिळतो. बाकी सगळा आनंदीआनंदच! कित्येक वर्षे तर मराठी चित्रपटसृष्टी 'धुमाकूळ', 'बंडलबाज', 'येडा का खुळा', 'गोंद्या मारतंय तंगडं' वगैरे नावांच्या रद्दड चित्रपटांच्या ओझ्याने वाकली होती. असो.
बाकी घाणेकरांचे प्रताप बघून त्यांच्याविषयी काही फार बरी प्रतिमा होत नाही. मला हा चित्रपट पाहतांना राहून-राहून 'संजू' आठवत होता. बेजबाबदारपणा, बेदरकार वृत्ती, लोकांची अजिबातच कदर नसणं, व्यसनाधीनता, चारित्र्यावर संशय घ्यावा असं वागणं, कुठलाही विधिनिषेध न बाळगणं, इतरांचा द्वेष करणं, स्वतःला सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्तम समजणं, इतरांना अत्यंत हीन लेखणं, जिकडे तिकडे फक्त आणि फक्त स्वतःच्या सुखासाठी धडपडणं, काहीतरी वेगळं करण्याच्या नादात लोकांना त्रास होईल असं वागणं वगैरे सगळे कॉमन धागे दोन्ही चित्रपटात होते. डॉ. लागूंना घाणेकर अतिशय तुच्छ समजत असतात. या दोघांमध्ये इतकं वैर होतं हे मला माहित नव्हतं. मी लागूंना नेहमीच वृद्ध समजत आलो आणि घाणेकरांना तरुण! दोघांमध्ये खरं म्हणजे फक्त तीन वर्षांचं अंतर होतं. दोघांनाही पुरेपूर संधी देण्याची क्षमता मराठी रंगभूमीमध्ये खचितच होती पण दोघांचेही अहंगंड मराठी रंगभूमीच्या व्याप्तीपेक्षा बरेच मोठे होते असंच म्हणावं लागेल.
घाणेकर नट म्हणून श्रेष्ठ होते की नाही हे मला माहिती नाही पण एक माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून त्यांच्याविषयी आदर वाटत नाही हे खरे. त्यांच्या प्रथम पत्नीने जे सहन केले ते बघून मला खरं म्हणजे घाणेकरांची चिडच येत होती. १९८६ मध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने हा कलावंत आपले अहंगंड, आपले डॉ. लागूंसोबतचे शतृत्व, आणि आपला विक्षिप्तपणा मागे सोडून वयाच्या फक्त छप्पन्नाव्या वर्षी खूप पुढच्या प्रवासाला निघून गेला. तोपर्यंत त्यांची नट म्हणून कारकीर्द संपलेली होती. त्यांची व्यसनाधीनता आणि बेजबाबदार वृत्ती त्यांच्या कारकीर्दीचा घास घेऊन गेली. चित्रपट संपल्यानंतर एक हूरहूर मात्र मनात राहून जाते. एका गुणी कलावंताची अशी अखेर व्हावी हे खूपच दुर्दैवी आहे.
आयुष्यात कसे असू नये, कसे वागू नये, आणि कसे दिसू नये हे बघायचे आणि जाणायचे असेल तर 'संजू' आणि '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' अवश्य पहावेत!
प्रतिक्रिया
13 Nov 2018 - 7:13 pm | पद्मावति
दोन्ही चित्रपटांची ओळख आवडली.
13 Nov 2018 - 7:34 pm | उगा काहितरीच
सर्चिंग बघण्याची इच्छा आहे. काशिनाथ बघितला आणि खूप आवडला. बाकी तुमचा लेख पण आवडला छान ओळख करून दिलीत दोन्ही चित्रपटांची.
13 Nov 2018 - 7:57 pm | धर्मराजमुटके
'सर्चिंग' कुठे पाहिला ?
13 Nov 2018 - 9:19 pm | समीरसूर
'सर्चिंग' प्रदर्शित झाला तेव्हाच सिटी प्राईड, कोथरुडला पाहिला. सकाळचा ८:४५ चा शो. शनिवार. आणि हा अफलातून पिक्चर. मजा आ गया! हा चित्रपट तसा थोडा हळूहळू प्रसिद्ध झाला. तरी ३-४ आठवडे चालला होता पुण्यात.
13 Nov 2018 - 8:48 pm | चौथा कोनाडा
'सर्चिंग' ची भन्नाट ओळख आवडली. पहायलाच पाहिजे हा सिनेमा.
अगदी परफेक्ट लिहिलंय ! त्या उपकथानकात्मक प्रसंगामुळे अंधाधून प्रेडिक्टेबल झाला शेवटी, शेवटी... आता काहीबाही प्रसंग घडणारच आहे असं समजूनच पाहिला गेला सिनेमा !
'सर्चिंग' डॉ घाणेकर आणि संजू या तिघांचा तुलनात्मक ग्राफ काढणारा हा लेख मस्तच जमलाय !
वॉव, समीरसूर !
14 Nov 2018 - 2:43 pm | समीरसूर
धन्यवाद!
'सर्चिंग' मस्तच जमून आला आहे. कुणीतरी भारतीय वंशाचाच आहे दिग्दर्शक. 'अंधाधून'पेक्षा मला 'जॉनी गद्दार' जास्त आवडला होता. पण 'अंधाधून'चा फर्स्ट हाफ मस्तच होता.
13 Nov 2018 - 8:55 pm | यशोधरा
डॉ. घाणेकर बेदरकार होतेच पण म्हणून डायरेक्ट घरभेद्या संजय दत्त बरोबर त्यांची तुलना नको हो! अगदी राजा भोज नसले (तुमच्या मते) तरी गंगू तेली नव्हते डॉ. दोघांची तुलना होणार नाही.
13 Nov 2018 - 9:28 pm | समीरसूर
तुलना नाही केली मी; 'घाणेकर' बघतांना मला 'संजू' हा चित्रपट आठवला फक्त. बाकी दोघांमध्ये तुलना होणं शक्यच नाही. पण बेजबाबदारपणा, व्यसनाधीनता, पाय घसरणे, वगैरे सगळं दाखवलंच आहे 'घाणेकर'मध्ये. अर्थात, हा चित्रपट 'नाथ हा माझा' (कांचन घाणेकर - घाणेकरांची दुसरी बायको) या पुस्तकावर अधिकृतपणे आधारित असल्याने जे दाखवले आहे ते खरेच असावे. मी आधीच म्हटल्याप्रमाणे मला स्वतःला काही विशेष माहिती नव्हती घाणेकरांबद्दल. पण जर ते प्रत्यक्षात तसेच असतील जसे चित्रपटात दाखवले आहेत तर मग त्यांच्याविषयी एक माणूस म्हणून आदर वाटण्यासारखं फार काही दिसत नाही. आणि प्रतिभाशाली नट होते म्हणून बाकी सगळ्या दोषांकडे दुर्लक्ष नाही ना करता येत. पं. भीमसेन जोशींच्या पहिल्या पत्नीच्या (त्यांनी खुशाल सोडून दिलेल्या) मोठ्या मुलाचं एक पुस्तक वाचलं होतं. भीषण होतं ते. तो ही असलाच प्रकार! नाही म्हटलं तरी थोडा आदर कमी होतोच हो!
13 Nov 2018 - 10:53 pm | यशोधरा
तुम्ही आम्ही जे वाचतो, बघतो - पुस्तके, मीडिया इत्यादि हे पूर्ण चित्र असेलच असे नाही इतके लक्षात ठेवले तरी पुरे. त्यावरून मते बनवायची झाली तर ती तितकीशी योग्य ठरतीलच असे नाही.
14 Nov 2018 - 10:23 am | समीरसूर
आपण संजय दत्तला 'घरभेदी' म्हणता; तुमचे ते ही मत तुम्ही बातम्या वाचून, टीव्हीवरील खमंग बातम्या बघूनच बनवले असेल ना? म्हणजे तुमचे हे मतदेखील योग्य असेलच असे नव्हे. कदाचित त्याला या सगळ्या प्रकारात गोवले गेले असेल? कोर्टाने शिक्षा ठरवली असली तरी ती बंदूक बाळगल्याबद्दल होती; तो टेररिस्ट नव्हता हे कोर्टाने मान्य केले होते आणि त्या खटल्यातून त्याची निर्दोष मुक्ततादेखील झाली होती. अर्थात, मला वैयक्तिकरीत्या संजय दत्त त्याच्या इमेजमुळे फारस आवडत नाही हा मुद्दा अलाहिदा. शेवटी एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीविषयीची मते अशीच बनतात. आपण ते रोखू शकत नाही. तोच जगाचा नियम आहे.
अशी मते बरोबर असतीलच असे नाही हे खरे. "घाणेकर" हा चित्रपट घाणेकरांच्या द्वितीय पत्नीने स्वतः लिहिलेल्या पुस्तकावर आधारित असल्याने त्यात सत्यांश असण्याची शक्यता खूप जास्त आहे इतकेच. चित्रपटात एका रात्री घाणेकरांच्या बेडरूमच्या एका कपाटात त्यांनी एका बाईला लपवून ठेवलेलं दाखवलं आहे. त्यांची पहिली पत्नी बेडरूममध्ये येते तेव्हा घाणेकर तर्र अवस्थेत अस्ताव्यस्त असे पलंगावर पहुडलेले दाखवलेले आहेत. काही क्षणांनंतर ती बाई कपाटातून धाडकन खाली पडते. घाणेकरांची पत्नी काय समजायचे ते समजून जाते आणि त्या बाईला शुद्धीत आणते. लाज वाटून ती बाई तिथून ताबडतोब पळ काढते. यानंतर त्यांची गायनॉकॉलॉजिस्ट असलेली पत्नी घटस्फोटाचा निर्णय घेते. अजून तरी या चित्रपटावर कुणी आक्षेप घेतलेला नाही. खुद्द कांचन घाणेकरांनीही नाही. अगदी सरसकट मते नाही बनवायची ठरवली तरी अशा प्रकारच्या घटना जर एखाद्याच्या आयुष्यात घडत असतील तर प्रतिकूल मते बनणारच ना?
असो.
14 Nov 2018 - 10:46 am | सुबोध खरे
तो टेररिस्ट नव्हता हे कोर्टाने मान्य केले होते आणि त्या खटल्यातून त्याची निर्दोष मुक्ततादेखील झाली होती.
काय सांगताय? केंव्हा निर्दोष मुक्तता झाली होती.
संजय दत्त चे बोलूच नका.
१) तथाकथित भीती असली तरी तूम्हाला घरात ए के ४७ आणि ए एक ५६ स्वयंचलित बंदूक मिळवणे आणि घरात ठेवणे शक्य आहे का? त्याचा दहशतवाद्यांशी संबंध होता हे सिद्ध झालेले आहे तेंव्हा त्याला घरचा भेदी म्हणायचे कि नाही हा छिद्रान्वेशी प्रकार आहे.
२) त्यांना सुरुवातीला टाडा लावला होता. व्यवस्थित ठिकाणी मलिदा पोहोचल्यावर ते कलम काढून घेतले गेले आणि त्याला जामीन मिळायचा मार्ग सुकर झाला. (कारण बॉलिवूडचे आणि गुन्हेगारी जगताचे कोट्यवधी रुपये अडकले होते.)
३) १९९३ ची केस २००७ मध्ये बोर्डावर आली आणि त्याला ६ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. हि शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने "कमी" करून ५ वर्षे केली.
४) हे महाराज त्यानंतर निवडणूक लढवायला निघाले होते पण सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली हो. केवढा अन्याय?
५) त्याला पॅरोल कसा दिला गेला, फर्लो रजा कशी दिली गेली याची अनेक सुरस आणि चमत्कारिक कहाण्या वृत्तपत्रात चघळल्या जात होत्या.
६) यांच्या पॅरोल प्रकरणामुळे उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला पॅरोलचे नियम बदलण्या स भाग पाडले
एवढा सगळं रामायण झालं आणि आपण म्हणता कि तुमचे ते ही मत तुम्ही बातम्या वाचून, टीव्हीवरील खमंग बातम्या बघूनच बनवले असेल ना
बढिया है.
बाकी संजय दत्तचे अमली पदार्थ सेवन आणि त्याची बायकांबरोबरची लफडी इ बद्दल आपण बोलतच नाही आहोत.
इतकी वर्षे बापाच्या नावावर( आणि पैशावर) सिनेमे मिळत गेले. त्याबद्दल न बोलणेच श्रेयस्कर आहे.
एकंदर बॉलिवूड हि गटारगंगाच आहे जितके खणाल तितकी घाणच निघते.
14 Nov 2018 - 11:24 am | समीरसूर
त्याचा बॉम्बस्फोटांमध्ये हात होता हे सिद्ध झाले नाही असे मला म्हणायचे होते. त्या खटल्यातून त्याची सुटका झाली होती. खटल्याची इत्यंभूत माहिती जनतेला असणे शक्य नाही; म्हणजे ८०% लोकांची मते ही बातम्यांवरच बनलेली असणार.
<<त्यांना सुरुवातीला टाडा लावला होता. व्यवस्थित ठिकाणी मलिदा पोहोचल्यावर ते कलम काढून घेतले गेले आणि त्याला जामीन मिळायचा मार्ग सुकर झाला. (कारण बॉलिवूडचे आणि गुन्हेगारी जगताचे कोट्यवधी रुपये अडकले होते.)>>
<<त्याला पॅरोल कसा दिला गेला, फर्लो रजा कशी दिली गेली याची अनेक सुरस आणि चमत्कारिक कहाण्या वृत्तपत्रात चघळल्या जात होत्या.>>
वरील माहितीदेखील तशी ऐकीवच. आपण हे खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. म्हणजे हे देखील एक प्रकारचे मत बनवणेच झाले.
मुद्दा संजय दत्त कसा होता हा नाही; घाणेकर कसे होते हा आहे. मला फक्त 'संजू' आठवला इतकेच. काही समान धागे होते म्हणून आठवला. तुलना मी केलीच नाही आणि त्यांची तुलना होऊ शकत नाही हे मी म्हणतो आहेच. मते कशी बनतात आणि त्याला काय आधार असतात हा आत्ताच्या चर्चेचा मुद्दा होता. घाणेकरांना मराठी नाट्यसृष्टीने बहिष्कृत केले होते यातच सारे आले. तिथूनच त्यांची स्टारडम धरून ठेवण्याची केविलवाणी धडपड सुरू झाली. मला वाटते त्यांच्या विषयीच्या मतांबद्दल यापेक्षा सज्जड पुरावा दुसरा कुठला असू शकत नाही. हे सगळे चित्रपटात दाखवलेले आहेच.
14 Nov 2018 - 11:26 am | समीरसूर
अरेच्चा, हे छापले गेलेच नाही:
वरील माहिती म्हणजे डॉसाहेबांच्या प्रतिसादातील ही वाक्ये:
त्यांना सुरुवातीला टाडा लावला होता. व्यवस्थित ठिकाणी मलिदा पोहोचल्यावर ते कलम काढून घेतले गेले आणि त्याला जामीन मिळायचा मार्ग सुकर झाला. (कारण बॉलिवूडचे आणि गुन्हेगारी जगताचे कोट्यवधी रुपये अडकले होते.)
३) १९९३ ची केस २००७ मध्ये बोर्डावर आली आणि त्याला ६ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. हि शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने "कमी" करून ५ वर्षे केली.
५) त्याला पॅरोल कसा दिला गेला, फर्लो रजा कशी दिली गेली याची अनेक सुरस आणि चमत्कारिक कहाण्या वृत्तपत्रात चघळल्या जात होत्या.
ही माहितीदेखील ऐकीवच. हे आपण खात्रीशीर्रीत्या सांगू शकत नाही.
14 Nov 2018 - 12:10 pm | सुबोध खरे
ही माहितीदेखील ऐकीवच.
संजय दत्तच्या खटल्याची इत्यंभूत माहिती आपल्याला न्यायालयाच्या वेबसाईट वर लिहिलेली मिळेल.चक्षुर्वैसत्यं पाहून घ्या.
बाकी तो तुरुंगात गेला होता हे तरी मेनी कराल का तेही ऐकिवच म्हणायचं
( आपल्याला रस असेल तर अन्यथा आपली मते / पूर्वग्रह आपल्याला लखलाभ होवोत)
14 Nov 2018 - 1:35 pm | समीरसूर
( आपल्याला रस असेल तर अन्यथा आपली मते / पूर्वग्रह आपल्याला लखलाभ होवोत)
जाऊ द्या हो डॉक्टरसाहेब. कुठल्यातरी क्षुल्लक वादावरून आपल्यात कशाला भांडण हवंय? संजय दत्त काय किंवा घाणेकर काय...ते कसेही असले तरी आपल्याला काय फरक पडतोय? एवढं प्रचंड चिडून आणि वैयक्तिक होऊन भांडण्यात काय हशील? आपण म्हणता म्हणजे ते खरंच असेल. आपल्यावर माझा विश्वास आहे. सोडून द्या. माझं म्हणणं साफ चुकीचं होतं हे मी मान्य करतो. आपण इथे भांडण करून काय फरक पडणार आहे? जाने दो...
14 Nov 2018 - 10:16 am | सुबोध खरे
डॉ काशिनाथ घाणेकर हे कलंदर, बेदरकार आणि बेफिकीर असेच होते.( यामुळेच त्यांचे त्या काळात तरुण मनावर जबरदस्त गारुड होते). परंतु अभिनयाच्या बाबतीत अस्सल होते. त्यामुळेच मराठी रंगभूमीवर एकाच दिवशी तीन तीन प्रयोग ते सुद्धा हाऊसफुल्ल जात असत हि वस्तुस्थिती. असे नंतर कोना नटाच्या बाबतीत झाले का हे माहिती नाही.
छत्रपती संभाजी राजे याना मराठी मनात "जागा" देण्याचे आणि त्यांच्यावर इतिहासकारांनी केलेला अन्याय दूर करण्याचे बऱ्यापैकी श्रेय त्यांनी केलेल्या "रायगडाला जेंव्हा जाग येते" आणि "इथे ओशाळला मृत्यू" या नाटकांना जाईल. यात श्री वसंत कानेटकर यांच्या सशक्त लेखणी चा भाग किती आणि डॉक्टरांच्या जिवंत अभिनयाचा भाग किती हा एक वादाचा मुद्दा होऊ शकतो. "रायगडाला जेंव्हा जाग येते" या नाटकातील तरुण संभाजीच्या भुमिकेत असणारे आतड्याला पीळ पडणारे संवाद पाहताना घळाघळा रडल्याचे मला स्पष्टपणे आठवते. आजहि त्यातील अनेक संवाद मला पाठ आहेत.
माणूस म्हणून ते मोठ्या मनाचे होते दिलदारही होते. बी डी एस (दंतवैद्यकाचा अभ्यासक्र करताना सुद्धा त्यांचा जीव नाट्कातच होता त्यामुळे महाविद्यालयात सुद्धा ते नाटकताच रमलेले असत हे त्यांच्या वडिलांना अजिबात पसंत नव्हते. त्यावर वडिलांनी 'तुमच्याच्याने काहीही होणार नाही मुसळाला कधी अंकुर फुटतो का?' असे टोचून बोलल्यावर डॉक्टरांनी वडिलांना पहिल्या वर्गात पहिला आलो नाही तर तुमचे नाव लावणार नाही असा निश्चय बोलुन दाखवला आणि त्याप्रमाणे ते पहिल्या वर्गात पहिले आलेही.
बाकी आपण मिठाई खावी कारखाना पाहण्याच्या फंदात पडू नये हे व्यंकटेश माडगूळकरांचे वाक्य येथे चपखल बसते.
चेन स्मोकर,भरपूर दारू पिणे आणि अनेक बायकांची लफडी हे त्यांचे "दुर्गुण" कशानेही झाकले जाणार नाहीतच. पण त्यांनी कोणत्याही बाईला "फसवले" असे कधी ऐकिवात आले नाही. बायका त्यांच्या "नादाला" का लागत असत हे कोडे त्यांना प्रत्यक्ष पाहिलेल्या माणसांनाच कळू शकेल.
चित्रपट अगदी यथातथ्य दाखवला आहे आणि डॉक्टरांचा उदो उदो कुठेही केलेला नाही. चित्रपटाची सर्वच अंगे सुबोध भावे यांनी उत्तम हाताळली आहेत( त्यांचा स्वतःचा सशक्त अभिनय सुद्धा).
14 Nov 2018 - 10:56 am | समीरसूर
नट म्हणून ते चांगले असतीलही. अर्थात, यातही वाद होऊ शकतो. आपल्याकडे अभिनयाची प्रत एखादा अभिनेता/अभिनेत्री किती "लाऊड" अभिनय करू शकतो/ते यावर ठरायची. अमिताभचे कितीतरी सिनेमे आता बघवत नाहीत. '१०२ नॉट ऑउट' मध्ये अमिताभ खूप हॅम करतो. अशी कित्येक उदाहरणे आहेत. पूर्वीच्या चित्रपटातला अभिनय आता तितकासा सुसह्य वाटत नाही. नाना पाटेकरचे 'यशवंत', 'कोहराम', 'गुलाम-ए-मुस्तफा' आता बघवत नाहीत. 'यशवंत'मध्ये नाना पाटेकरने जो आक्रस्ताळेपणा केला आहे त्याला अभिनय म्हणताच येणार नाही. याच कारणांमुळे आशुतोष राणा, मनोज वाजपायी, राजपाल यादव ही आक्रस्ताळी मंडळी फारशी चालली नाही. मनोज वाजपायी तर एनएसडीचा आहे. बेंबीच्या देठापासून ओरडून पल्लेदार संवाद म्हणणं केवळ हाच काही चांगल्या अभिनयचा निकष ठरू शकत नाही. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी ते आवडायचं हे मात्र खरं.
नट म्हणून ते चांगले असले तरी त्यांच्या इतर प्रतापांमुळे त्यांची गुणवत्ता झाकोळली गेली हे खरे. इन फॅक्ट, त्यांची कारकीर्द अकालीच संपलीदेखील. अजून त्यांच्या प्रतिमेविषयीचा दुसरा पुरावा कुठला असू शकेल?
मी 'हा खेळ सावल्यांचा' पाहिला होता. घाणेकर त्यात कुठल्याही सामान्य अभिनेत्यासारखेच वाटले होते. करीअर उतरणीला लागल्यामुळे त्यांना हे काम करावे लागले होते असा उललेख सिनेमात आहे. असो.
14 Nov 2018 - 10:58 am | वरुण मोहिते
प्रतिसाद. जियो
14 Nov 2018 - 11:00 am | वरुण मोहिते
बाकी संजू काय आणि घाणेकर काय हा वाद आणि तुलना अयोग्य आहे. कलाकृती म्हणून मला दोन्ही सिनेमे आवडले.
14 Nov 2018 - 11:28 am | समीरसूर
सिनेमे दोन्ही चांगलेच होते. मला आवडले. फक्त "घाणेकर" अजून २० मिनिटे कमी करता आला असता...बाकी सगळे मस्त!
15 Nov 2018 - 4:31 pm | mrcoolguynice
खरं सांगायचं तर, डॉकाघा टीव्हीवर आल्यावरच पाहायचं , असं ठरवलं होतं.
पण समीरसूर यांनी दिलेल्या सुरेख कॉन्टेक्स्टमुळे, आता लागलीच सवड मिळाल्यावर थेटरात जाऊन पाहीन ....
15 Nov 2018 - 10:23 pm | राही
"दोघांनाही पुरेपूर संधी देण्याची क्षमता मराठी रंगभूमीमध्ये खचितच होती पण दोघांचेही अहंगंड मराठी रंगभूमीच्या व्याप्तीपेक्षा बरेच मोठे होते असंच म्हणावं लागेल."
किंचित असहमत. दोघांनाही पुरेपूर संधी मिळाली. घाणेकरांचा वारू चौखूर उधळला आणि ते " तरुणाईचे लाडके" बनतात न बनतात तोच घसरलाही. लागूंनी मात्र सातत्य राखून अनेकानेक उत्तम भूमिका दिल्या. अगदी सुरुवातीच्या वेड्याचे घर उन्हात पासून नटसम्राट,गिधाडे, काचेचा चंद्र, हिमालयाची सावली, दुभंग इत्यादि पंधरावीस नाटकांतून अभिनयाचे एकाहून एक उंचीचे मानदंड निर्माण केले. अभिनयाच्या कायिक, वाचिक आणि मौखिक या तीन अंगांवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. मराठी चित्रपटविश्वातही त्यांच्या काही भूमिका माईलस्टोन ठरल्या आहेत. चित्रपट हे नाटकापेक्षा वेगळ्या अभिनयाची मागणी करणारे माध्यम आहे हे ओळखून आपल्या सूक्ष्म अभिनयाद्वारे त्यांनी सिंहासन, पिंजरा, सामना इत्यादि चित्रपट एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. ते खऱ्या अर्थाने नटसम्राट होते. नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांतून त्यांनी उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले आहे.
15 Nov 2018 - 10:23 pm | राही
"दोघांनाही पुरेपूर संधी देण्याची क्षमता मराठी रंगभूमीमध्ये खचितच होती पण दोघांचेही अहंगंड मराठी रंगभूमीच्या व्याप्तीपेक्षा बरेच मोठे होते असंच म्हणावं लागेल."
किंचित असहमत. दोघांनाही पुरेपूर संधी मिळाली. घाणेकरांचा वारू चौखूर उधळला आणि ते " तरुणाईचे लाडके" बनतात न बनतात तोच घसरलाही. लागूंनी मात्र सातत्य राखून अनेकानेक उत्तम भूमिका दिल्या. अगदी सुरुवातीच्या वेड्याचे घर उन्हात पासून नटसम्राट,गिधाडे, काचेचा चंद्र, हिमालयाची सावली, दुभंग इत्यादि पंधरावीस नाटकांतून अभिनयाचे एकाहून एक उंचीचे मानदंड निर्माण केले. अभिनयाच्या कायिक, वाचिक आणि मौखिक या तीन अंगांवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. मराठी चित्रपटविश्वातही त्यांच्या काही भूमिका माईलस्टोन ठरल्या आहेत. चित्रपट हे नाटकापेक्षा वेगळ्या अभिनयाची मागणी करणारे माध्यम आहे हे ओळखून आपल्या सूक्ष्म अभिनयाद्वारे त्यांनी सिंहासन, पिंजरा, सामना इत्यादि चित्रपट एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. ते खऱ्या अर्थाने नटसम्राट होते. नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांतून त्यांनी उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले आहे.
16 Nov 2018 - 5:09 pm | समीरसूर
अगदी पटले. हाच फरक दोघांमध्ये होता.
19 Nov 2018 - 10:57 am | ज्ञानोबाचे पैजार
कालच निलायमला आणि डॉ. काशिनाथ घाणेकर पाहिला. सुबोधचे काम बेहद्द आवडले. मस्त बेरींग पकडले आहे सुबोधने घाणेकरांचे.
मी घाणेकरंना रंगमंचावर जरी पाहिले नसले तरी "रायगडाला जेव्हा जाग येते", "गारंबीचा बापू", "अश्रुंची झाली फुले", "तुझे आहे तुज पाशी" इत्यादी नाटके बघितली आहेत, त्या मुळे का काय कोण जाणे चित्रपट अधिकच आवडला. इतर सर्व कलाकारांची कामे मस्त झाली आहेत पण विषेश उल्लेख करावा असे काम सुमित ने केले आहे. डॉ लागुंची भुमीका त्याने उत्तम वठवली आहे.
माझ्या बाबांनी घाणेकरांना प्रत्यक्ष पाहिले होते. ते मुंबईत जेव्हा दवाखाना चालवत तेव्हा बाबा त्यांच्या कडे नेहमी जायचे . त्यानंतरही घाणेकर कुठे भेटले तर बाबांशी आवर्जुन बोलायला थांबायचे. त्यांनी घाणेकरांची सगळी नाटके देखिल पाहिली आहेत.
काल तेही चित्रपट बघायला आले होते. पण त्यांना मात्र हा चित्रपट अजिबात आवडला नाही. त्यांच्या मते घाणेकरांचे चित्रीकरण अतिशय भडक झाले आहे. म्हणजे ते चित्रपटात दाखवले तसे उद्दाम बेताल नव्हते असे नाही. पण चित्रपटात जरा जास्तच मीठ मसाला घातला आहे.
त्यांच्या मते काशिनाथ घाणेकर चांगला माणुस होता व त्या नंतर तो एक चांगला नट होता. घाणेकरंच्या व्यक्तीगत गोष्टी चित्रपटात उघडपणे दाखवलेले तर माझ्या बाबांना अजिबात आवडले नाही.
पैजारबुवा,
26 Nov 2018 - 8:31 pm | सुचेता
खुप दिव्सानी खरे तर आयुश्यात पहिल्यादा पहिला दिवस पहिला शो पाहिला. माझ्या मत्ताने ते ते किति चान्गले कलाकार होते हे कुथठेतरी ३ तासात दिसाय्ला कमी पड्ले.
म्हण्जे त्याना न पाहिलेल्या लोकाना लगेचच त्यान्ची अधोगती दिसली असे वाटर्ले .
19 Nov 2018 - 11:34 am | मुक्त विहारि
असे मुलगा म्हणाला...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, हा सिनेमा पण मस्त आहे, असे बायको म्हणाली...सध्या महिलांच्या टी-२० वर्ल्ड कप मुळे, हे दोन्ही सिनेमे नंतर बघीन...
एका वया नंतर, मुलांचे ऐकणे, हेच योग्य...
19 Nov 2018 - 1:16 pm | चिगो
बरेच दिवसांनी समीरसूर ह्यांचा चित्रपट विषयक लेख वाचला.. आवडला.
आता हे दोन्ही चित्रपट ‘अमेझाॅन प्राईम‘ किंवा ‘नेटफ्लिक्स’ वर आल्यास बघेन.
जाता जाता : समीरसूर ह्यांनी ‘ठग्ज आॅफ हिंदोस्तान‘ बघावा व मग त्याची चिरफाड करणारा लेख मिपावर टाकावा, ही विनंती..
23 Nov 2018 - 9:41 am | समीरसूर
धन्यवाद, चिगो!
"ठग्ज ऑफ हिन्दोस्थान" - सध्या तरी हिंमत नाही इतकं काहीबाही ऐकलंय या चित्रपटाविषयी; पण कधी टीव्हीवर पाहिला तर नक्की प्रयत्न करेल. :-)
20 Nov 2018 - 6:46 pm | मराठी कथालेखक
काही दिवसांपुर्वी व्हॉट्स अॅपवरुन एक सचित्र विनोद मिळाला, "डॉ काशिनाथ" चित्रपटातला ..'शोभा देते का तुम्हाला ?" असं घाणेकरांची पत्नी त्यांना म्हणते. खरंच असं काही दृष्य आहे का चित्रपटात ? असल्यास थिएटरमध्ये काय कल्ला होतो याची उत्सुकता आहे.
20 Nov 2018 - 6:56 pm | mrcoolguynice
मुंबईमधले एक नावाजलेले डेंटिस्ट असून तुम्ही नाटकात अशी प्रॉम्पटिंगची कामं करता, शोभतं का तुम्हाला हे ?
21 Nov 2018 - 9:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी यातला फक्त अंधाधुन पाहिला. आवडला नाही.
सुरुवात बरी वाटते आणि नंतर कथानक कुठल्या कुठे गेले.
बाकी, घाणेकर पाहून पुन्हा येईन धाग्यावर.
-दिलीप बिरुटे
-
24 Nov 2018 - 4:05 pm | नाखु
काशीनाथ घाणेकर सिनेमा पाहिला नाही,पण जवळच्या मित्राने पाहीला आहे आणि संजू सारखा उद्दात्तीकरण, प्रतिमा सफेदी केला नाही हे आवर्जून सांगितले.
मी संजू पाहिला नाही.
वाचकांचीही पत्रेवाला नाखु