विश्वस्तवृत्तीकडे वाटचाल

arunjoshi123's picture
arunjoshi123 in जनातलं, मनातलं
11 Nov 2018 - 12:43 pm

या जगाकडे पाहण्याचे दोन दृष्टीकोण आहेत- एक असा की हे विश्व निराधार नि निरीश्वर आहे. दुसरा असा की ते साधार नि ईश्वरप्रणित आहे. निराधार विश्व आपसूकच निरर्थक ठरतं. कारण शेवटी अशा विश्वातली प्रत्येक गोष्ट ही केवळ भौतिक स्वरुपाची असते. आणि स्वतःचे अस्तित्व असल्याचे भान असलेल्या, स्वतःस मुक्तेच्छा आहे असे मानत असलेल्या, बुद्धिमान, विवेकी, विचारी मनुष्यजातीस आपण केवळ करकच्च नियमांनी बांधलेले एक भौतिक पदार्थ आहोत असं सांगणं म्हणजे त्याच्या स्वतःसकट सगळं काही निरर्थक आहे असं सांगीतल्याजोगं आहे. जे काही आहे ते नक्की कितपत निरर्थक आहे हे ठरवण्याचा प्रत्येकाचा आपला अधिकार सन्मान्य आहे, म्हणून सध्यापुरतं नास्तिकांस बाजूला ठेऊ.

आता दुसरीकडे भौतिकतेच्या पलिकडे, म्हणजे न बदलणार्‍या मूलभूत भौतिक नियमांच्या जगापलिकडे, दिव्य असं काही आहे असं मानलं आणि विश्वात जे काही चाललं आहे ते न तोडता येणार्‍या भौतिकशास्त्राच्या नियमांनीच नव्हे तर सोबतीला त्या ईश्वरीय शक्तीच्या इच्छेनं, अनुमतीनं देखील चाललं आहे असं मानलं तर सारं जग अर्थमय होऊन जातं. आपणांस ईश्वरामुळे व ईश्वरास आपणांमुळे एक परस्परसाक्षीभाव येतो नि आपण केवळ मृतमृत्तिकेतून बनलेल्या व्यामिश्र रासायनिक संयुगांपेक्षा काहीतरी श्रेष्ठ, अर्थपूर्ण आहोत, मनुष्य आहोत, ईश्वर नसलो तरी ईश्वरसदृष्य आहोत असा एक आल्हादप्रल्हादभाव निर्माण होतो. विश्वाचं चलन वा आपलं व्यक्तिगत जीवन हे मृत भौतिक पदार्थांच्या गुणधर्मांची परिणीती नसून आपल्यालाही आपलं, इतरांचं आणि बर्‍याच प्रमाणात विश्वाचं भविष्य ठरविण्याचा अधिकार आहे, आपल्यात तशी क्षमता आहे, इच्छा आहे, आपल्याकडे त्याचं स्वातंत्र्य आहे, तसे करण्यासाठी योग्य असे आपण एक सज्जन पात्र आहोत हे अशा मनुष्याच्या नेणीवेत पक्कं बसलेलं असतं, भले ही त्यानं ते जाणीवेतून प्रकट न करो! नि इथेच स्वामित्वाच्या, मालकीच्या सुंदर संकल्पनेची उत्पत्ती होते!! नि एका अर्थपूर्ण, आत्माभिमानी जीवनाकरिता ती अत्यंत आवश्यक देखील आहे.

स्वामित्वाच्या या संकल्पनेची कालपरत्वे प्रचंड उत्क्रांती झाली आहे. या उत्क्रांतीचं पहिलं चरण अतिशय आदिम स्वरुपात होतं. अत्यंत कमी मानवसंख्या, प्रचंड स्रोत आणि ऐहिक लोलुपतेचा अभाव यांच्यामुळे सर्वप्रथम कल्याणकारी स्वामित्वाचा उद्गम झाला. जे माझ्या आजूबाजूला आहे त्याचं संरक्षण करणं, त्याचं भलं पाहणं, त्याचं नुकसान होऊ न देणं, त्याच्या व्यय सर्व स्वकीयांत न्याय्य पद्धतीनं होईल याची काळजी घेणं हे इतर सर्वांच्या अगोदर माझं कर्तव्य आहे असं ते स्वामित्वाचं आदिस्वरुप होतं. ही उत्क्रांती आदिम काळातली असली तरी तिचं सौंदर्य कमी नव्हतं.

स्वामित्वाच्या उत्क्रांतीची जी दुसरी लाट आली तिच्यात विश्वाच्या संपत्तीत ईश्वराचा काय संबंध आहे याचा एक क्लिष्ट आणि दुष्ट हिशोब केला गेला. तत्पूर्वी ईश्वर दृश्य नसला तरी अत्यंत श्रेष्ठ आहे, दयाघन आहे असं सरळ गणित होतं. पण नंतर त्यानं जी सृष्टी प्रजविली आहे ती मुळात त्याच्या अस्तित्वाचा कोणास बोध होईल, त्याच्याच स्वतःच्या अस्तित्वास अर्थ प्राप्त होईल या आशांतून प्रजविली आहे असं मानणं चालू झालं. ईश्वरदेखील त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाच्या पोचपावतीचा गरजवंत ठरवला गेला. (म्हणूनच तर अध्यात्मात भक्तीमार्गाला इतकं श्रेष्ठ स्थान असावं!). एकदा का मनुष्यासारखे सजग जीव निर्मिले की पुढे त्यांच्यापुढे आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करणं आपल्या डाव्या हाताचा मळ आहे या ईश्वराच्या प्राथमिक गृहितकाला आव्हान दिलं गेलं. नि इथे समांतर धर्मोत्कर्ष होत असल्यानं विश्वकर्ता, विश्वरचयिता, विश्वनियंता म्हणून त्याची कितीही स्तुती होऊ लागली तरी व्यवहारात मात्र मनुष्याने जे जे आपल्या आजूबाजूला आहे, नियंत्रणात आहे त्याच्यावर आपलं ऐकांतिक, केवल, संपूर्ण आणि निरंतर स्वामित्व घोषित केलं. ईश्वरही धन्य आहे; ज्येष्ठ अधिकार्‍याच्या कक्षामधून बाहेर पडल्यावरच एक सुटकेचा अनुभव येतो, चाहे तो अधिकारी कितीही विनम्र नि सज्जन असो हे जाणून ईश्वर कधीही मनुष्याच्या समोर स्वतः दाखल झाला नाही वा कधी अशी विचित्र जादू केली नाही जेणेकरून मनुष्याची बुद्धी भ्रमित व्हावी. ईश्वरानं मनुष्याच्या एकांतिक स्वामित्वाच्या घोषणेकडं दुर्लक्ष केलं नि मनुष्याची तशी पात्रताही तेव्हा होती.

हा सर्वात कठीण टप्पा पार पाडल्यानंतर स्वामित्वाच्या उत्क्रांतीच्या नंतरच्या प्रत्येक लाटेत या तत्त्वांना प्रत्यक्षात लागू करण्याचे प्रयत्न झाले. भाषांमध्ये षष्ठी विभक्तीचा जन्म झाला. भूमीची वाटणी होऊ लागली. अन्नाची वाटणी होऊ लागली. निरंतरता टिकवण्यासाठी कुटुंबांत वारश्याशी संबंधित संकल्पनांचा जन्म झाला. सहज क्षय पावत नाही, सहज नावे करता येते या कारणांनी बर्‍यापै़की निरुपयुक्त असलेल्या सोन्यासारख्या धातूंना मूल्यवान मानलं जाऊ लागलं. राज्यांच्या सीमांचा काटेकोरपणा वाढला. घरांना, शेतांना कुंपणे पडली. हळूहळू सख्ख्या भावांत संपत्तीचा विभागणी करण्यासाठी गणिताचा उपयोग ही सामान्य बाब झाली. जी जी गोष्ट त्यामानानं सहज हातात पकडता येते त्या त्या प्रत्येक गोष्टीला एका एका मनुष्याच्या रुपात एकेक मालक मिळायला चालू झाला. कोण्याही व्यक्तिच्या मालकीच्या नाहीत अशा गोष्टींची संख्या हळूहळू कमी व्हायला लागली. आर्थिक व्यवहारांची संख्या वाढली. शुल्कचर्चा वाढली. शुल्ककलह वाढले. संपत्तीची सुरक्षा महत्त्वाची बाब झाली. काही मानुष्यिक मूल्यं स्वामित्वाच्या लोभापायी हळूहळू खाली खाली ढकलली जाऊ लागली. लोकांची दानत दिवसेंदिवस घटू लागली. व्यवस्थात्मक क्रौयाला क्रौर्य मानणं कमी होऊ लागलं. इतःपरही सर्व ठीक होतं. व्यवस्था आल्या म्हणजे त्यांच्यातल्या उणीवा आल्याच! त्यात काय ते एवढं? मनुष्यजात आपल्या सर्जनशीलतेच्या जोरावर निर्मिलेल्या या व्यवस्थांचे फायदे अधिक घेत होती नि त्यांचे नुकसान कमी होते.

पण यानंतरची जी स्वामित्वाच्या उत्क्रांतीची लाट आलीय, जी विद्यमान आहे, जिच्यामध्ये आपण आता गटांगळ्या खात आहोत, ती विलक्षण वैचित्र्यपूर्ण आणि बेफाम आहे. या लाटेनंतर जी व्यवस्था बनली आहे ती अतीच कृत्रिम आणि अमानुष आहे. तिची चौकट आपण तपासून पाहून - पहिलं म्हणजे व्यवहार करण्यासाठी व्यवहारकर्त्यांची मालकी असणे, त्यांचे स्वामित्व असणे ही मूलभूत अट आहे नि मूळात मालकी ही संकल्पनाच नैसर्गिक नाही हे कोणीही सांगेल. दुसरं, व्यवहारमध्ये ज्या दोन वा अधिक गोष्टींचं आदानप्रदान होतं त्यांतही नैसर्गिक, शास्त्रीय साधर्म्य नसतं. ते असल्याचा कृत्रिम आरोप केला जातो. तिसरं, व्यवहारामध्ये ज्या उत्पादांचा वा सेवांचा विनिमय केला जातो त्यांना निसर्गाभिप्रेत मूल्य नसते. मूल्य ही देखील एक कृत्रिम संकल्पना आहे. चौथं, हे मूल्य ज्या चलनामधून हस्तांतरित होते ते चलन देखील एक अनैसर्गिक उपपत्ती आहे. पाचवं, व्यवहार सुरळीत व्हावेत म्हणून जे कायदे प्रचलित केले जातात उनकी तो क्या कहने! निसर्गात तर केवळ विज्ञानाचे नियम असतात, हे कायदे तर पूर्णत: मनुष्यकृत आहेत. उदा. बौद्धिक संपदेला निसर्गतः अनावृत्त व संरक्षित दोन्ही ठेवता येत नाही, पण चतुरजनांसाठी तसे कायदे आहेत. ईश्वरीय रचनेचं सौंदर्य असं आहे की इतक्या सगळ्या कृत्रिमतांत देखील जग व्यवस्थित चालू शकतं. सहावं, हे कमी म्हणून की काय या रचनांच्या सदुद्देशांना तडा देत अनेक मनुष्य अनीतीचा मार्ग अवलंबतात! म्हणजे आजघडीला मनुष्याची स्वामित्वाची चौकट ही मालकी, साधर्म्य, मूल्य, चलन, विधी,आणि अनीती अशा षड्क्रौत्रिम्यांखाली दडपलेली आहे! सहा काय किंवा दहा काय, जास्त अर्थहीनता एकत्र मांडल्या म्हणजे गोष्टीला अर्थपूर्णता येते काय? म्हणूनच जागतिक अर्थव्यवस्था इतक्या अस्थिर, अननुमाननीय असतात. कारण त्यांना मूलाधारच नाही!!

कोणे एके काळी यश हे मानवाच्या जीवनाच्या एकूणतेचे असेच एक सर्वसाधारण परिमाण होते. आज यश हेच जीवनाची परिपूर्णता आहे. आणि यश असो वा अन्य काही असो, प्रत्येक बाबीच्या मूल्यमापनाचं एकक पैसा झालं आहे. कशाचा व्यवहार करावा, कशाचा नाही, काय बाजारात आणावं, काय नाही, कोणासोबत व्यवहार करावेत, कोणासोबत नाहीत, व्यवहार किती काटेकोर असावा, किती नसावा याला काही ताळतंत्र उरलेलं नाही. भावाभावांत, पितापुत्रांत, पतीपत्नींत अगदी दशांशाच्या शक्य तितक्या स्थानापर्यंत हिशेब करणार्‍या संस्कृतीच्या उंबरठ्यावर आपण येऊन बसलो आहोत. प्रत्येकजण स्वतःस, एक मनुष्य कमी आणि एक अर्थव्यस्थेचे यंत्र अधिक, मानत आहे. जीवनविषयक कौशल्ये इतकी क्षीण झाली आहेत की नोकरी गेली तर आपण कोणत्याच कामाचे नाहीत नि आपण उदरनिर्वाहच करू शकणार ही भिती प्रत्येकात भक्कम झाली आहे. दुसरीकडे भौतिक सुखाची कोणतीही अवस्था समाधान करण्यात अपुरी वाटत आहे. जे काही आहे ते कमीच आहे अशी धारण सुसंपन्न लोकांत बळ धरू लागली आहे. समृद्धी नि सौख्यभावनेत समप्रमाण उरलं नाही. स्वार्थ नि बुद्धिमत्ता यांच्या प्रेरणांनी एकत्रित आलेले लोक, समूह, समाज, कंपन्या नि देश मिळून निष्पाप नि स्थूलबुद्धी पापभीरु लोकांना नि देशांना कायद्यांच्या चौकटीतच लुटत आहेत. याच जन्मात सगळं काही भोगून काढायचं, शक्य तितक्या सत्वर भोगून काढायचं, शक्य तितकं जास्त भोगून काढायचं, पुढच्या पिढ्यांसाठीचे लाखो वर्षांपासून बनलेले स्रोत आताच संपवून टाकायचे, आपल्या उपभोगांपोटी पुढच्या पिढ्यांना किमान हवा आणि पाणी तरी व्यवस्थित मिळेल काय याचाही विचार करायचा नाही, नि इतकेच काय स्वार्थाच्या इतक्या टोकाला जायचं की पुढच्या पिढ्यांचं अस्तित्वच कायमचं नष्ट होईल अशा युद्धव्यवस्था बनवताना काहीही तमा बाळगायची नाही हीच समाजाची मानसिकता झाली आहे. हेच सगळं सामान्य आहे, मनुष्य असाच प्राणी आहे अशी बुद्धिप्रामाण्यवाद्यांची धारणा झाली आहे. मानवाच्या मनातला स्नेहाचा निर्झर बांधिलकीच्या अभावानं शुष्क करून टाकला आहे. अभिज्ञ लोकांना कोणी बोट दाखवू शकू नये इतकाच कायदा पाळायचा आहे, आणि जिथे कायद्याचा संबंध येत नाही तिथे आत्मप्रयोजनभावाशिवाय दुसरं काही पाहायचं नाहीय. आणि अर्थातच प्रत्येकच व्यक्ति अशी झाल्यामुळे प्रत्येकच अन्य व्यक्तीला अशा स्वभावप्रकृतीचा त्रास होऊ लागला आहे. समाज स्वतःस सज्जन, सुयोग्य मानणार्‍या व इतरांसाठी त्रासदायक, संभवतः धोकादायक, रिस्की वाटू लागलेल्या लोकांचा एक विचित्र समूह बनला आहे. अपोहनामध्ये मनुष्याच्या सन्निध बसून ईश्वरानं स्वतःचं, मनुष्याचं नि विश्वाचं जे एक आल्हादकारक सागरतटाचं चित्र रेखाटलं होतं ते त्यातच विसर्जित झालेलं आहे आणि ईश्वराला न जुमानता सर्व मानवजातीनं तिथून एक प्रलयांकारी, भयकारी, रुक्ष, अननुमाननीय वादळ निर्माण केलं आहे. अजूनही ते वादळ शमवायचा कोणी विचार करत नाहीय नि प्रत्येक जण त्या गर्त्यात फक्त स्वत:साठी, स्वकीयांसाठी अल्पस्वल्प सुरक्षित जागा शोधायचा प्रयत्न करतो आहे. प्रलयांकारी वादळाच्या केंद्रस्थानी सुरक्षिततेची आश्वस्तता येणं शक्य आहे का? म्हणून नेहमी प्रत्येक गोष्टीची प्रचंड धाकधुक आहे. आरोग्य, मनःस्वास्थ्य, समाजस्वास्थ्य, अध्यात्मिक भान सगळं काही बाधित झालं आहे. एकूण काय तर अर्थकारणानं धर्मादेश झुगारून लावलेला आहे नि पुरुषार्थाच्या चार ध्येयांमध्ये मोक्षाची अंतिमध्येय म्हणून असलेली जागा अर्थाने घेतली आहे. अर्थपुरुष पुरुषार्थी मानला जाऊ लागला आहे आणि पुरुषार्थ अर्थहिन झाला आहे. ईश्वर थेट समोर बसून आदेश देत नसला तरी हृदयात संदेश प्रेषित करायची व्यवस्था त्यानं करून ठेवली आहे. प्रत्येक मनुष्याला पदोपदी कितीही नाकारलं तरी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे याचा विवेकभाव नेहमी स्पर्श करत असतो. काही शेकडो वर्षांनी, आपल्या काही शेकडो वर्षांपूर्वीच्या पूर्वजांना मागास मानणार्‍या आपल्या पिढीची सर्वकष चिकित्सा, आपले वंशज करणार आहेत. त्यावेळी आपण सजीव रुपात नसू म्हणून ती कमी महत्त्वाची ठरत नाही. स्वतःस प्रगत, बुद्धिमान, आधुनिक, नितीमान मानणार्‍या आपल्या पिढीचं जे निरपेक्ष मूल्यांकन ते करतील तेव्हा आपलं एकूण आर्थिक वर्तन आणि आर्थिक मूल्ये पाहून त्यांच्या मनात आपल्याबद्दल घृणा उत्पन्न होण्याची संभावना नाकारता येत नाही. स्वार्थाच्या परिसीमेला व्यवस्थेच्या नियमांचा गोंडस दंभाचा मुलामा दिलेला त्यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटणार नाही.

मग पुढे काय? तर जर प्रत्येकच जण वैश्य बनू लागला आहे तर वैश्य धर्माच्या मूलभूत तत्त्वांची चिकित्सा, चर्चा होणं आवश्यक आहे. वैश्य धर्म काय असतो? जगातल्या सर्व संपत्तीचं संघनन स्वतःकडे करणं म्हणजे वैश्यधर्म का? खरा वैश्य कोण? स्वामित्वाची त्याची भूक केवढी असावी? का? निसर्गामध्ये मूल्यनिर्मितीची अपार क्षमता आहे. जगातल्या सगळ्या देशांचा जीडीपी येती लाखो वर्षे काही ना काही असणारच आहे ना? हे सगळं पोटेंशियल आजच पाहता येतं. ही क्षमता कशी वापरायची, कोणत्या कालदरानं वापरायची, कोणत्या क्षेत्रात वापरायची नि अशी कशी वापरायची, संस्कृतीचा उत्कर्ष कसा होईल की जेणेकरून समाजाच्या सर्व गरजा नीट प्रकारे पूर्ण होतील, मानवी मूल्ये टिकून राहतील, मनुष्याची श्वापदशीलता उफाळून येणार नाही, उद्यमांचं नि गरजांचं संतुलन राहील, निष्पाप नागरिकांच्या अधिकारांचं संरक्षण होईल इत्यादि गोष्टी जाणणारा आणि त्या दिशेने कर्म करणारा तो खरा वैश्य. आपल्या धर्माची अंतर्बाह्य ओळख असलेले आज किती उद्योजक असावेत? नौकेत उगाच कोणत्यातरी एका ठिकाणी यदृच्छया बसून स्वैर वल्ही हाकणे म्हणजे वैश्य धर्म नव्हे. ईश्वरप्रणित वैश्यधर्माच्या तत्त्वांना बाजूला ठेऊन केलेला स्वार्थप्रेरित व्यापार हा व्यापार नसतो. उदरभरणात नि अन्नसेवनाच्या यज्ञकर्मात जे अंतर आहे तेच अंतर अशा आपमतलबी व्यापारात आणि धर्मार्थकारणामध्ये असतं.

खरा वैश्य आपल्या सहचरणीस भारंभार सोन्यानं मढवत नाही; शेकडोनी भरजरी साड्या घेत नाही; त्याचं घर हे टोलेजंग राजप्रासादासारखं दिसत नाही; त्याच्या व्यक्तिगत साधनांचा ताफा सुपरलक्झरी वाहनांनी भरलेला नसतो; अगदी व्यक्तिगत खर्चांच्या बाबतीत देखील तो कृपण असतो. का? कारण त्याला आपल्या विधीदत्त स्वामित्वाची मर्यादा आकलित झालेली असते. पुरुषोत्तम परमात्म्याच्या प्रकृतीतून प्रसूत झालेल्या या विश्वातील भरमसाठ संपत्तीचे आपण अनाक्षेप्य, असीम स्वामी नसून अल्पकालीन विश्वस्त आहोत, ट्रस्टी आहोत अशी भावना त्याचा अंतःकरणात दृढ झालेली असते. या आपल्या विश्वस्तवृत्तीची त्याला पूर्णतया, पूर्णांगीण जाणीव असते. ईश्वराला या जगाला एक दिशा द्यायची आहे, त्याला या विश्वाचं एक प्रारुप अभिप्रेत आहे, ती दिशा जाणून सार्‍या आर्थिक, सांपत्तिक व्यवस्था तिकडे वळवणे हे त्याचे ध्येय असते. आपण सर्व मनुष्य, सर्व सजीव एकाच ईश्वरापासून उद्भवलेले सहोदर आहोत तेव्हा हिशेबात कुठे किती काटेकोरपणा ठेवायचा, कुठे किती ढिलाई करायची, कुठे दानशीलता दाखवायची याची अचूक गणितं त्याला ठावी असतात. जीवनात तो जसजसा पुढे जातो, परिपक्व होऊ लागतो, तसतसा तो या सकल, समग्र, सुंदर विश्वस्तवृत्तीकडे हळूहळू मार्गस्थ होऊ लागतो आणि ईश्वरीय सुखाची प्रचिती घेतो. हीच स्वामित्वाच्या उत्क्रांतीची सर्वोच्च अवस्था होय.
(अन्यत्र प्रकाशित)

अर्थकारणअनुभव

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

11 Nov 2018 - 9:41 pm | यशोधरा

लेख वाचल्याची पोच.
प्रत्येक जण वैश्य बनू लागला आहे इथवर, लेख पोचला, पण त्या वैश्य परिच्छेदापासून काहीतरी लिंक सुटली.

arunjoshi123's picture

12 Nov 2018 - 9:58 pm | arunjoshi123

धन्यवाद.
--------
नक्की काय तुटलं?

नक्की नाही सांगता येणार मला. एकदम गाडी वेगळ्या मार्गावरून धावायला लागली, असं वाटलं. काहीतरी विषय बदलला गेला, असं.

मेबी पुन्हा वाचून मग लिहू शकेन.

शाम भागवत's picture

12 Nov 2018 - 8:13 pm | शाम भागवत

जिवसृष्टीला झालेला कॅन्सर म्हणजे माणूस असही कुठेतरी वाचलय.