काल दुपारी 'तुंबाड' पाहिला. नीलायमला दुपारी साडे बाराचा खेळ होता. पावणे बारा वाजता चिरंजीव गाढ झोपी गेले. म्हणजे १-२ तास निवांत होतो. बायकोला सांगीतले आणि ताबडतोब नीलायमला पोहोचलो. दिवाळीमुळे आणि या चित्रपटाच्या कथेमुळे फारशी गर्दी नव्हती. बरोबर साडे-बारा वाजता चित्रपट सुरु झाला. १९१८ चा काळ. कोकणातले तुंबाड गाव. तुफान पाऊस कोसळतोय; संध्याकाळ की रात्र अशा कात्रीत दिवस सापडला आहे. आभाळ गच्च भरलेलं आहे. एका जुन्या वाड्याच्या चौकात एक गरीब, तरुण विधवा भर पावसात कुडकुडत उभी आहे. समोर वाड्याच्या पडवीत एका खुर्चीत वाड्याचा जख्ख म्हातारा मालक त्या तरुण विधवेकडे एकटक बघतो आहे. त्याच्या डोळ्यांमधली लालसा लख्ख दिसते आहे. दुसर्या प्रसंगात ती विधवा त्या म्हातार्याचे हस्तमैथून करून देत आहे. ती अगतिक विधवा त्या म्हातार्याला सोन्याच्या मुद्रा मागते. म्हातारा कण्हत तिची मागणी धुडकावून लावतो. एका टेकडीवर एक पडके झोपडीवजा घर आहे. पाऊस वेड्यासारखा कोसळतोच आहे. दोन लहान मुलं आईची वाट बघतायेत. तिच विधवा घाई-घाईने येते आणि पटकन जेवणाचे एक ताट वाढून एका भयानक अंधार्या खोलीत घाबरत घाबरत जाते. तिथे राहत असते त्या म्हातार्याची शापित आई. कित्येक वर्षे मुक्तीची वाट बघत असलेली ही म्हातारी भयंकर झालीये. अतिशय विद्रूप, किळसवाणी, आणि राक्षसासारखी! तिला साखळदंडांनी बांधून ठेवलं आहे. काही दिवसांनी त्या विधवेच्या दोन मुलांपैकी एक मुलगा झाडावरून खाली पडतो आणि त्याचं डोकं मोठ्या दगडावर आदळतं. त्याला वैद्यांकडे घेऊन गेल्यानंतर त्या भयानक अशा म्हातारीला खाऊ घालण्याची जबाबदारी दुसर्या मुलावर येते. भूकेने कासावीस आणि राक्षसी झालेल्या त्या म्हातारीला शांत करण्याचा एक उपाय असतो. एक अगदी नेमके वाक्य! तो मुलगा त्या वाक्यातला एक मुख्य शब्द विसरतो आणि ती म्हातारी त्याचाच घास गिळायला बघते. अगदी शेवटच्या क्षणी त्याला तो शब्द आठवतो आणि ती म्हातारी निद्राधीन होते. प्रचंड घाबरलेला मुलगा वाचतो. इकडे अपघात झालेला मुलगा मरतो. एका अशाच खिन्न दिवशी म्हातारा देखील मरतो. ती तरुण विधवा आपल्या मुलाला घेऊन पुण्याला जायचं ठरवते. तिच्या मुलाला मात्र वाड्यातल्या खजिन्याची आस असते. वाड्यातल्या म्हातार्याची लोभी औलाद म्हणून ती विधवा आपल्या मुलाची निर्भत्सना करते. त्याच्यावर भयंकर चिडते. त्याला खूप मारते आणि पुन्हा तुंबाडमध्ये पाय टाकणार नाही असं वचन त्याच्याकडून घेते. एका भयाण रात्री दोघे तुंबाड सोडून पुण्यात येतात. नियतीच्या मनात मात्र वेगळंच असतं. काय असतं हे खजिन्याचं रहस्य? त्या भयानक दिसणार्या म्हातार्या बाईचं काय होतं? तुंबाडमध्ये सतत मुसळधार पाऊस का पडत असतो?
जेमतेम दोन तासात 'तुंबाड'मध्ये मानवी स्वभावाचा, लोभीपणाचा, आणि लालसेचा जो अचाट खेळ दाखवला आहे तो डोकं सुन्न करणारा आहे. संपूर्ण चित्रपटाला एक अतिशय दुष्ट, नीच, किळसवाणी अशी किनार आहे. चित्रपटाच्या हॉरर एलिमेंटपेक्षा आपल्या हृदयाला टोचणारा दुष्टपणा अधिक भयावह आणि अस्वस्थ करून सोडणारा आहे. अर्थात, 'तुंबाड'मध्ये दाखवलेल्या अमंगल शक्तीदेखील तितक्याच भयावह आणि अंगावर काटा आणणार्या आहेत यात मुळीच शंका नाही. अगदी सुरुवातीपासून 'तुंबाड' मनाची पकड घेतो. आपल्या अंगावर काहीतरी गिळगिळीत सरपटते आहे असा भास कित्येकदा हा चित्रपट बघतांना येतो. प्रेक्षकांना प्रचंड घाबरवूनदेखील त्यांना जखडून ठेवण्याची किमया हा चित्रपट लीलया साधतो.
दिग्दर्शक राही अनिल बर्वे आहेत. मला 'थ्यँक्यू मिस्टर ग्लाड'चे लेखक अनिल बर्वे होते हे ठाऊक आहे. दिग्दर्शकाचं आणि त्यांचं काही नातं आहे का हे मला ठाऊक नाही. अजय-अतुल आणि बाफ्टा-विजेते जेस्पर कीड यांनी कमालीचे संगीत दिले आहे. मुख्य भूमिकेत सोहम शाह यांनी अभिनयात उत्तुंग बाजी मारली आहे. अनिता दातेदेखील अगदी चोख! बाकी सगळ्याच अभिनेत्यांनी लाजवाब कामे केली आहेत. लेखन सकस आणि मनाला भिडणारे आहे. कलादिग्दर्शन अप्रतिम आहे. १९१८ पासून १९४७ पर्यंतचा काळ सुरेख दाखवला आहे. पटकथा आणि दिग्दर्शन जबरदस्त आहे. संपूर्ण चित्रपटात एक प्रकारचा अमंगल मूड नेमका पकडला आहे. व्हिजुअली चित्रपट काळजाचा थरकाप उडवणारा आहे. नारायण धारप यांच्या कथांवर आधारलेल्या या हिंदी चित्रपटाला श्री ना पेंडसेंच्या 'तुंबाडचे खोत' या कादंबरीची देखील थोडी पार्श्वभूमी आहे.
हा चित्रपट लहान मुलांसाठी नाही. ज्यांना भुता-खेतांचे चित्रपट आवडत नाहीत त्यांच्यासाठीदेखील हा चित्रपट नाही. ज्यांना धक्कातंत्राने फुलवलेल्या हॉरर चित्रपटांचा शौक आहे त्यांच्यासाठी हा चित्रपट एक मोठाच धक्का ठरेल. ज्यांना हा जॉनर आवडतो त्यांच्यासाठी मात्र हा चित्रपट एक पर्वणीच आहे. मी हा चित्रपट मनापासून एंजॉय केला. एक अगदी वेगळा विषय अतिशय रंजक पद्धतीने सादर करण्यात हा चित्रपट कमालीचा यशस्वी झाला आहे.
दिवाळीच्या सुटीत एखादा रात्रीचा शो टाका, मझा आ जायेगा...
प्रतिक्रिया
5 Nov 2018 - 5:05 pm | प्रसाद_१९८२
दिवाळीत पाहायचा आहे हा सिनेमा.
5 Nov 2018 - 5:19 pm | उगा काहितरीच
पाहीलाय ... आवडलाय... एकच गोष्ट खूप खटकत होती ती म्हणजे मराठी वातावरण , कॕरेक्टर्स च्या तोंडी असणारी हिंदी भाषा. मराठीत हवा होता हा चित्रपट अजूनच मजा आली असती.
6 Nov 2018 - 4:38 pm | समीरसूर
हिंदीमध्ये असल्याने खूप जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचली असेल ही गोष्ट!
आणि तसंही आजकाल मराठी लोकांच्या तोंडी हिंदी (ते ही पुण्यात) असणं फारसं झोंबत नाही. माझ्या कार्यालयात दोन कुळकर्णी एकमेकांशी हिंदी किंवा इंग्रजीत बोलतात. गुमास्ते वगैरे आडनावाची माणसं हिंदीत बोलतात...दोन अनोळखी मराठी माणसं इंग्रजी किंवा हिंदीत बोलतात. काय सांगायचं आता...जाऊ द्या...
5 Nov 2018 - 5:23 pm | कुमार१
अनिल बर्वे यांचे चिरंजीव.
6 Nov 2018 - 4:38 pm | समीरसूर
वाटलंच. पण मला राही हे नाव मुलीचं वाटलं होतं...
5 Nov 2018 - 5:28 pm | मुक्त विहारि
हा सिनेमा बघण्याची शक्यता कमी ....(आम्ही आपले "जेम्स बाँड" किंवा "एक्स मॅन" किंवा "अॅव्हेंजर्स" वाले ... सुखांत असलेले सिनेमेच बघायला जास्त आवडतात ...)
पण सिनेमा नक्कीच उत्तम असणार, कारण मुलांनी बघीतला आणि मुलांना आवडला.
5 Nov 2018 - 6:09 pm | तुषार काळभोर
वाचून गानू आजींची गोष्ट आठवली.
बाकी हॉरर हा जॉनर अपल्यासाठी नाही.
5 Nov 2018 - 7:20 pm | वन
मराठीत हवा होता हा चित्रपट अजूनच मजा आली असती. >>> +१
5 Nov 2018 - 7:49 pm | शुभां म.
भयंकर आवडला सिनेमा आणि तुमचा लेख पण.......
6 Nov 2018 - 4:39 pm | समीरसूर
धन्यवाद!
5 Nov 2018 - 8:08 pm | अनुप ढेरे
दिग्दर्शक अनिल बर्वेंचा मुलगा आहे.
5 Nov 2018 - 8:09 pm | अनुप ढेरे
ग्लाड चे लेखक अनिल बर्वे यांचा मुलगा आहे म्हणायचं होतं. :)
6 Nov 2018 - 3:20 am | सोन्या बागलाणकर
दुर्दैवाने भारताबाहेर हा चित्रपट प्रदर्शित होत नसल्याने online stream शोधणे भाग आहे.
नक्की बघणार!
6 Nov 2018 - 10:43 am | विनिता००२
तुंबाड पाहिला एकदाचा. प्रचंड आवडला.
बरेच दिवसांनी एखादा चित्रपट संपल्यावरही मनात दबा धरून बसला होता. अंगावरचा काटा अजून पण जाणवतोय
बरेच दिवसांनी रात्री डोळे मिटायची भिती वाटली :हाहा:
पटकन डोळे उघडून भिंती पाहिल्या. मग पांघरुण घेवून कटाक्षाने तुंबाडचा विचार न करण्याचा प्रयत्न करत झोपले. :)
खूप छान सिनेमा, परत बघणार
6 Nov 2018 - 4:40 pm | समीरसूर
माझं जेवण व्हायचं होतं. हा चित्रपट बघून आल्यानंतर जेवण्याची इच्छाच गेली...पण पिक्चर बनवलाय भारी! एकदम मास्टरपीस.
6 Nov 2018 - 6:45 pm | मिलिंद
तीन-चार दिवसांपूर्वी पाहिला. अतिशय चांगले छायाचित्रण.
परंतू निर्मात्यांनी हा चित्रपट त्रिमिती(3D)त न करुन चांगली संधी घालवली याचे वाईट वाटले. खरंतर त्रिमिती(3D) करीता चांगले कथानक असतानाही असा (बाजारु) विचार चित्रपट निर्मात्यांच्या डोक्यात न यावा याचे आश्चर्य वाटले.
7 Nov 2018 - 11:17 pm | palambar
साॅलिडच आहे सिनेमा , परफेक्ट आहे सगळं !
8 Nov 2018 - 12:13 pm | बोलघेवडा
अप्रतिम चित्रपट. गूढता, हॉरर आणि हव्यास यांचा उत्कृष्ट मिश्रण. चित्रपट बघून दोन आठवडे झाले पण अजूनही रात्री छताकडे बघायची भीती वाटते.
8 Jan 2020 - 12:52 pm | लई भारी
मला साधारण आठवत होत की यावर कुणीतरी लिहिलंय म्हणून शोधून बघितलं आधी :-)अर्थातच प्रचंड आवडला चित्रपट आणि मला जे म्हणायचं होत ते नेमकं मांडलं आहेच तुम्ही. _/\_
गेले कित्येक दिवस(वर्ष?) बघायचा राहून गेला होता. थेटरात लवकर उतरवला गेला बहुधा आणि प्राईम वर आला पण मला घरी योग्य वेळ मिळत नव्हती. भयपट असल्याने मुलं घरी असताना बघणं शक्य नव्हतं आणि हेडफोन लावून किंवा तुकड्याने बघण्याचा सिनेमा नाही हा. थेटरातच बघायला हवा होता त्यामुळे म्युजिक सिस्टिम वर हा न बघणं म्हणजे पाप होत :-) शेवटी एकदाचा मागच्या आठवड्यात योग आला! (३१ डिसेंबर पेशल!)
मी Quora वर वाचल होत की या चित्रपटासाठी किती मेहनत घेतलीय टीमने आणि ती दिसतेय प्रत्येक फ्रेम मध्ये.
पावसाच्या धीरगंभीर वातावरणाची छाया पूर्ण चित्रपटभर आहे आणि त्यात म्हटल्याप्रमाणे तो शापाचाच भाग आहे. मला शक्यतो भूतपट आवडत नाहीत पण हा तसा नाही आहे. हा भयपट आहे. वरती लिहिलेल्या सगळ्या गोष्टी उत्तम आहेतच, मला सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजे कॅमेरा आणि बॅकग्राऊंड स्कोर! एकेक कॅमेरा शॉट असले जबरी घेतलेत की एकच उत्तम आहे असं सांगणं मुश्किल. आपण स्वतः त्या सगळ्याचा भाग होऊन जातोच आणि अंगावर येत ते. पार्श्वसंगीत तर जगात भारी आहे. म्हणजे आता मी त्याचा साउंडट्रॅक शोधतोय, एवढी पकड घेणारं आहे. चित्रपटाचा एकंदरीत टोन सेट करायला खूप मदत होते. आधीच्या काळच वातावरण दाखवणारे सेट आणि एकंदरीत पात्रांची वेशभूषा वगैरे पण चांगलं आहे.
मध्ये थोडासा संथ झाल्यासारखा आणि सगळं सुरळीत(?) चालू आहे असं वाटत असतानाच आलेला ट्विस्ट म्हणजे तर कहर आहे. सगळं चित्रच बदलून जात.
१-२ गोष्टी खटकल्या पण अगदीच किरकोळ.सावकाराची पणजी जी शापामुळे अडकलेली असते तिला इतकी वर्षे कुणीच मुक्ती का देत नाही हे कळलं नाही. बाहुली मोट्ठी का बनवत नाही वगैरे.
बघितला नसल्यास अवश्य बघावा!
8 Jan 2020 - 3:09 pm | हस्तर
थेटरा मधे ६ आठवडे होता
8 Jan 2020 - 3:10 pm | हस्तर
सावकाराची पणजी जी शापामुळे अडकलेली असते तिला इतकी वर्षे कुणीच मुक्ती का देत नाही हे
दरवाज्याला कुलुप असते जे फक्त विनायक कडे चावि अस्ते
बाहुली मोट्ठी का बनवत नाही वगैरे.
हस्तार पण मोठा झाला असता आनि झोळी पण
9 Jan 2020 - 2:35 am | दादा कोंडके
भयपट कसा असावा त्याचा एक बेंचमार्क करून ठेवलाय तुंबाडनं.
अजून एक म्हणजे, तो ब्रिटिश अधिकारी आणि सावकार यांचं संभाषण कळालं नाही मला.
12 Jan 2020 - 3:18 pm | शा वि कु
ब्रिटिश अधिकारी बदली होऊन चालला असतो, तर त्या सावकाराला ओपियम परमिट हवं असत, जे तो अधिकारी लाच घेतल्याशिवाय परमिट देणार नसतो. इतके पैसे सावकाराकडे नसतात, मग पैसे मिळवण्याच्या नादात तो तुम्बाड च्या वाड्याकडे जातो...
12 Jan 2020 - 5:45 pm | दादा कोंडके
धन्यवाद!
12 Jan 2020 - 11:37 pm | मराठी कथालेखक
मला तरी फार बेकार, किळसवाणा , बीभत्स वाटला