मी सूतक हि कथा प्रकाशित केल्यावर त्यावरून बरीच चर्चा झाली. खरतर आस्तिकता, मूर्तिपूजा एवढंच काय तर नास्तिकता हा सुध्दा आपल्यातला "श्रद्धेचा" विभाग. त्या ससंदर्भातच माझ्याच घरी झालेला या वेळच्या गणपती उत्सवातील एक प्रसंग:
या गणपती उत्सवातली गोष्ट, माझा मुलगा वेदांत हा सात वर्षाचा आहे., मागल्या वर्षी पर्यंत तो कधी गणपती उत्सव किंवा बाकीच्या इतर सणांमध्ये एवढा भाग घेत नसे कारण त्याच सगळं लक्ष खेळण्यांमध्ये किंवा खाऊमध्ये असायचं पण या वर्षी पासून मात्र मी त्याला न चुकता मूर्ती कशी निवडायची, आरास कशी करायची या सगळ्यात भाग घ्यायला लावला. या वर्षी गणपतीच्या मूर्तीपासून ते आरास करण्यासाठी लागणारं सामान आणि मोदकासाठी लागणाऱ्या तांदळाच्या पिठी साठी गिरणीत जाण्यापासून घराची स्वच्छता या आणि अश्या बऱ्याच गोष्टीसाठी त्याला मुद्दामहुन घेऊन गेले. हळूहळू त्यालाही या सगळ्यात इंटरेस्ट वाटू लागला. गणपती उत्सवाआधी एक दिवस मूर्ती घरी घेऊन आलो. त्यावेळी झालेला संवाद.
तो: मम्मा , हा गणपतीचा फक्त statue आहे ना?
मी: अरे मूर्ती म्हणावं...
तो: मग ह्या मूर्तीत देव आहे का?
मी: हो.
तो: मग त्या मूर्ती विकणाऱ्याकडं एवढे सगळे देव कसे काय आले?
मी: (यावेळी उत्तर देताना अगदी विचार करत) अरे म्हणजे, आता जी आणली ना ती गणपती बाप्पाची मूर्तीच आहे, उद्या सकाळी आपण त्या मूर्तीची पूजा करून बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करणार.
तो: म्हणजे?
मी: म्हणजे देवबाप्पाला सांगणार कि तुम्ही ह्या मूर्तीत या, म्हणजे आम्ही पाच दिवस तुमची सेवा करू शकू.
तो: मग देवबाप्पा येणार का आपण सांगितलं म्हणून?
मी: हो येणार कि.
तो: कुठून येणार?
मी: (आता कपाळावरचा घाम पुसत) त्याच्या मम्मा पपा कड राहतो ना तो, तिकडून येणार.
तो: (थोडा वेळ विचार करत) बर मम्मा , मला उद्या लवकर उठव, मला देव बाप्पा मूर्तीत आलेला बघायचंय.
मी: (बापुडी होत) बर , झोप आता.
दुसऱ्या दिवशी हा लवकर उठून, अजिबात त्रास न देता आवरून पूजेला येऊन बसला. सगळी पूजा होईपर्यंत ह्याची अविरत गडबड आणि बडबड सुरु होती, काही लागलं तर सगळ्या आधी स्वतः पळत जाऊन घेऊन येणे, भटजींनी फुले वाहिली कि आपण पण वाहणे आणि प्रत्येक दहा मिनिटांनी मला किचन मध्ये येऊन विचारणे "मम्मा , आला का गं देवबाप्पा?"
शेवटी सगळी पूजा झाल्यावर देवबाप्पाला ह्यानंच नैवेद्य दाखवला. आणि पळत माझ्याकडं आला.
"मम्मा , आता पूजा झालीय ना सगळी?
मी: हो झाली कि, आता माझ्या छोट्या भटजीला दक्षिणा आणि मोदक द्यायचे.
तो: (माझ्या विषयांतराकडं अजिबात अक्ष न देता) म्हणजे गणपती बाप्पा आला ना मूर्तीत.
मी: हो आला.
त्यानंतर प्रत्येक पाच मिनिटांनी हा मूर्तीसमोर बसायचा, काहीतरी करायचा आणि परत यायचा. असं दोन तीन वेळा झाल्यावर मी हळूच बघितलं कि नक्की काय उद्योग चाललेत, तर साहेब नैवेद्याचे मोदक मोजतायत.
मी: अरे मोदक कशाला मोजतोयस?
तो: मम्मा , अग गणपती बाप्पा आलाच नाहीये आपल्या statue मध्ये (परत मूर्ती वरून हा statue वर आला)
मी: कशावरून?
तो: अगं तू थर्टी मोदक ठेवलेलेस ना, ते अजून पण तेवढेच आहेत. गणपती बाप्पानं काहीच खाल्लं नाही, म्हणजे बाप्पा आलाच नाही.
काल पासून अति उत्साही दिसणारं माझं पिल्लू आता खूप बावरल्यासारखं दिसत होतं. त्त्या जीवाला देवाचं अमूर्त्य आणि निर्गुण स्वरूप कसं सांगावं हेच मला कळेना. त्याला आधी जवळ घेतलं आणि म्हटलं कि "अरे बाप्पा आपल्या घरी येतो, पाच दिवस आपल्यात राहतो पण तो दिसत नसतो कुणाला आणि तो असं आपल्यासारखं काही खात नसतो. देव बाप्पा आपल्याकडं येतो हि आपली "श्रद्धा" आहे."
तो: ते सगळं मला सांगू नकोस , देव बाप्पा आलाय कि नाही ते सांग. आलाय तर तो का खात नाहीये आणि नाही आला म्हणजे तू खोटं बोलत होतीस. उगीच माझ्याकडून सगळं काम करून घेतलंस.
मी: हे बघ, जर तुझ्या मनात श्रद्धा आहे, तर देवबाप्पा आलाय
तो: आणि नसेल तर?
मी: जर श्रद्धा नाही तर मग नाही आला आणि हा फक्त statue च आहे.
त्या दिवसापासून त्यानं एकूणच पूजेतील सहभाग कमी केला, जर थोडं रागावून त्याला बोलावलं तर म्हणायचा "उगाच त्रास नको देऊ मला, देव बाप्पा आलेलाच नाहीये, उगीच सगळे statue ची पूजा करताय." पण घरात इकडं तिकडं खेळताना मात्र अधून मधून हा चोरून मूर्तीकडे टक लावून बघायचा.
शेवटी विसर्जनाचा दिवस आला. आज एवढी वर्षे झाली तरी पण गणपती उत्सवातील पाचवा दिवस मला आवडत नाही. सकाळपासून मूर्तीकडे माझं जास्तच लक्ष जातं, रोजच्यापेक्षा थोडं जास्तच वेळ मी तिथं रेंगाळते, चार दिवसात करत नाही तेवढ्यांदा मनातून नमस्कार करते.
तर घरी विसर्जनाची तयारी आणि चर्चा सुरु असताना वेदांत सगळं कान देऊन ऐकत होता. नंतर हळूच माझ्या मागं येऊन म्हणाला, "मम्मा , गणपतीला पाण्यात नको टाकुयात"
मी काहीच बोलले नाही, संध्याकाळी ऑफिसातून लवकर घरी गेले तर काय, पिल्लू गाल फुगवून बसलेलं आणि सारखं म्हणत होतं कि गणपती बाप्पा राहूंदेत आपल्याकडंच.
शेवटची आरती झाली, कितीही समजावलं तर हा काही येईना. गाडीतून आम्ही सगळे विसर्जनाच्या ठिकाणी पोचलो तर गाडीत पण हा रुसलेलाच होता. हैद्राबादला इथं जवळ नदी नसल्यानं एका तलावाजवळ विसर्जनासाठी तयारी करतात, cranes वगैरे अरेंज करतात. मी तर दर वर्षी गणपतीचं विसर्जनाच्या वेळी मनसोक्त रडते बुवा आणि माझी हि सवय माहित असल्यानं नवऱ्यानं एक हात माझ्या खांद्यावर आधीपासून ठेवलेला. आमच्या गणपतीबाप्पाला crane वर ठेवल्यावर मला काही पुढचं दिसेना, दृष्टी अंधुक झाली आणि डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागलं. वेदांत कुठं आहे म्हणून बघावं म्हणून थोडं आजूबाजूला बघितलं तर नवऱ्यानं दुसरा हात त्याच्या खांद्यावर ठेवलेला आणि माझं पिल्लू पण माझ्यासारखंच रडत होतं . घरी जाईपर्यंत आम्ही दोघेही शांत होतो, अगदी माझ्यासारखंच न जेवता माझं पिल्लू मला घट्ट पकडून झोपलं होतं.
या गणपती विसर्जनाला मी गणपती बाप्पा जातोय म्हणून रडले कि माझ्या पिल्लुच्या डोळ्यातून एकसारखं येणारं पाणी अन त्यालाही न कळणाऱ्या पण मनातून जाणवणाऱ्या "श्रद्धेची" उकल झाली म्हणून रडले हे मला आजतागायत कळलं नाही.
प्रतिक्रिया
3 Nov 2018 - 3:19 pm | मुक्त विहारि
लेख वाचला.
3 Nov 2018 - 4:20 pm | एकविरा
छान अनुभव
3 Nov 2018 - 4:20 pm | एकविरा
3 Nov 2018 - 5:26 pm | उगा काहितरीच
छान लिहीलंत ! शेवटी काय हो ? आपल्या मानन्यावर आहे सगळं .
3 Nov 2018 - 5:32 pm | कलम
धन्यवाद
4 Nov 2018 - 10:04 am | माहितगार
खरचं महत्वाचा प्रश्न आहे आणि नविन काळात पटेल असे आणि तेही लहानग्यांना समजेल असे उत्तर शोधण्याची गरजही. अर्थात प्रश्नाचे स्वरुप अधिक व्यापक म्हणजे सगुण साकार, निर्गुण निराकार आणि श्रद्धा डोळस कशी राहील यासाठी कसे सांगणार असे असावे असे वाटते.
'देव बाप्पा आपल्याकडं येतो हि आपली "श्रद्धा" आहे....हे बघ, जर तुझ्या मनात श्रद्धा आहे, तर देवबाप्पा आलाय....जर श्रद्धा नाही तर मग नाही आला आणि हा फक्त statue च आहे.' हे उत्तर श्रद्धा डोळस ठेवण्यास मदत करणारे आणि पुरेसे आहे असे वाटते. यातील पुढील पायरीचे नास्तिक आणि आस्तिक अवस्थांनी एकमेकांचा आदर करण्याचा संस्कार हे ही एक मोठे आव्हान असावे.
मोदक मोजले जाणे आणि ते कमी होत नाहीत हे समजून त्या बद्दल मनात रास्त शंका येणे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि त्याचे कौतुक झाले पाहीजे. श्रद्धा तपासून श्रद्धेच्या मर्यादा लक्षात घेऊन स्विकारली जाणे श्रद्धेच्या डोळसपणाच्या दृष्टीने महत्वाचे असावे.
इतिहासकालीन काही सत्पुरुषांची वये पाहीली असता सगुण साकार, निर्गुण निराकार ते अध्यात्म विषयक परिचय लहानवयात होणे अशक्यही अथवा अत्यंत अवघडही नसावे. आधीच्या पिढ्यांमध्ये लहान मुलांना गोष्टी सांगण्याचे काम किर्तन निरुपणात सहभागी होऊन आलेल्या आजी आजोबांकडून आधीच झालेले असायचे. मुर्तींचे समोर येणे ऐकलेल्या कथेने मनात आधीच तयार झालेल्या प्रतिमेस केव्ळ साकार रुपात पहाणे असे. त्यामुळे सगुण साकार रुप अधिक सहज स्विकारले जात असेल.
कोणत्याही मुल्यप्रधान कथेतील नायक अथवा नायिका यांचे आणि अभिप्रेत मुल्याचे, कोणत्याही कलेतून अविष्कार आणि अभिव्यक्तीस बंधन घातले जात नाही तो पर्यंत, प्रेरणा सगुण साकार स्वरुपात व्यक्त होत रहातात.
एखादा विषय समजण्यास सोपा जावा, रुची निर्माण व्हावी म्हणून सचित्र प्रतिमा ते इतर कलात्मक सादरीकरण ऊपयूक्त असते. सायन्स जर्नल्स मध्ये एका बाजूला केलेला प्रयोग लिहिला तर दुसर्या बाजूस चित्र काढून दाखवावे लागते. आताच्या काळात गोष्टी सांगणार्या आजी आजोबांची जागा दृकश्राव्य माध्यमातील कार्टून्स ते चित्रपट आणि दूरचित्रवाणी धारावाहीकांनी घेतली असावी. कथेची जोड न दिलेली कार्टून मधील चित्रे, कथेची जोड दिली जात नाही तो पर्यंत चित्रेच असतात; त्यांना कथेची / आख्यायिकेची जोड दिल्या नंतर जिवंतपणा प्राप्त होतो.
4 Nov 2018 - 11:22 am | माहितगार
* श्रद्धेचे प्रयोजन आणि उपयोजन
* मुर्तीपुजेचे स्वॉट अॅनालिसीस
* संत एकनाथांचा प्रतिमा आणि मुर्ती पुजन विषयक दृष्टीकोण
5 Nov 2018 - 5:53 pm | मंदार कात्रे
खूप छान लिहिता तुम्ही कलम जी !
6 Nov 2018 - 4:57 pm | समीरसूर
सुंदर लेख!
मला लहानपणी जी गणेशोत्सवाची मजा यायची ती आता येत नाही. लहानपणी आम्ही मुलं आमचा स्वतंत्र गणपती बसवायचो. झोकात मिरवणूक काढायचो. लेझीम खेळायचो. गेल्या कित्येक वर्षांपासून ही मजा येणं कमी झालंय. मला मखर वगैरे करण्यात कधीच रस नव्हता. आताही नाही. विसर्जन झाल्यानंतर घरी ज्या जागी गणपती असतो ती जागा मोकळी बघून हूरहूर वाटते खरी पण तीदेखील काही क्षणच...नंतर पुन्हा रोजच्या धबडग्यात गणेशोत्सवाची आठवण लगेच धूसर होऊन जाते. आयुष्याच्या एवढ्या वेगाची सवय होणं हे ही एका दृष्टीनं आपलं अपयशच!
6 Nov 2018 - 6:04 pm | सिरुसेरि
हैदराबादच्या टँक बंड परिसरातला गणेश विसर्जनाचा सोहळा पाहण्यासारखा असतो .