कर्ण आणि कृष्ण

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H
कर्ण आणि कृष्ण

कर्ण व्हावे की कृष्ण व्हावे?
कृष्ण व्हावे की कर्ण व्हावे?
जे आपले असते तेच द्यावे
की द्यावे तेही आपले रहावे?

रक्तगर्भी वारसा जखमेचा
सांभाळून ठेवावा उरात की,
स्वतःच्या आशेचेच कवच
स्वतःच्या जिवाला शिवावे?

परशुरामाचे शाप आळवत
खेचावी प्रत्यंच्या रागावून,
की कमलकरांनी जग जिंकून
पुन्हा कुणाचे रथ हाकावे?

तेजाळल्या दुखऱ्या व्यथांचा
कुणी सुयोधन बाजार मांडेल
की त्याची वाट पाहण्यापेक्षा
आपले पार्थ आपण शोधावे?

अनाहूत स्वयंवराचा अपमान
आयुष्याशी जुगारात तोलावा,
की कडूजहर विष पचवूनही
कालियाच्या फण्यावर नाचावे?

नियतीच्या सारिपाटावर दान
कधी असे पडेल कधी तसे,
मस्तकी डोंब पाजळत फिरावे
की राख होऊन पुन्हा हसावे?

कर्ण व्हावे की कृष्ण व्हावे?
कृष्ण व्हावे, हो, कृष्णच व्हावे
कधी कुणाचे कवच व्हावे,
कधी कुणाचे कुंडल व्हावे!!

H

दिवाळी अंक २०१८

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

6 Nov 2018 - 11:58 am | यशोधरा

सुंदर!

पद्मावति's picture

6 Nov 2018 - 4:44 pm | पद्मावति

आहा...सुरेख. खुप आवडली कविता.

चौकटराजा's picture

6 Nov 2018 - 7:59 pm | चौकटराजा

उत्तम रचना आणि आशयही !

प्राची अश्विनी's picture

7 Nov 2018 - 8:44 am | प्राची अश्विनी

फारच सुरेख अर्थगर्भी.

मुक्त विहारि's picture

7 Nov 2018 - 3:57 pm | मुक्त विहारि

मस्त..

टर्मीनेटर's picture

7 Nov 2018 - 4:17 pm | टर्मीनेटर

कर्ण व्हावे की कृष्ण व्हावे?
कृष्ण व्हावे, हो, कृष्णच व्हावे
कधी कुणाचे कवच व्हावे,
कधी कुणाचे कुंडल व्हावे!!

छान.

प्रचेतस's picture

7 Nov 2018 - 7:55 pm | प्रचेतस

व्वा..!
सुरेख रचना.

मित्रहो's picture

7 Nov 2018 - 10:47 pm | मित्रहो

आशयपूर्ण रचना

sagarpdy's picture

9 Nov 2018 - 11:51 am | sagarpdy

वाहवा. मस्तच.

चित्रगुप्त's picture

9 Nov 2018 - 12:28 pm | चित्रगुप्त

कविता आवडली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Nov 2018 - 1:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

कर्ण किंवा कृष्ण... आपल्या मनसिकतेला झेपेल असे कोणीही व्हावे. दोन्ही पचवायला तितकेच कठीण !

अभ्या..'s picture

9 Nov 2018 - 2:37 pm | अभ्या..

मला तर वाटते संजय व्हावे,
डीटीएचचे बिलहि न भरता
ईलईडी टीव्हीचा हप्ता नसता
निवांत घरी बसून युध्द पाहावे
एखाद्या अंधाला स्टोरी सांगण्याचे पुण्य कमवावे.
.
विनोदाचा भाग अपार्ट, कविता आवडली. सुरेख

प्रशांत's picture

7 Jan 2019 - 1:22 pm | प्रशांत

कविता आवडली.

अर्धवटराव's picture

7 Jan 2019 - 6:28 pm | अर्धवटराव

काय सुंदर पोत जमलाय. मस्त.

धागाकर्ता आणि आपला अभ्या दोघेही सुस्साट न अफ्फाट

ज्योति अळवणी's picture

17 Feb 2019 - 8:05 pm | ज्योति अळवणी

खूप आवडली कविता

प्रमोद देर्देकर's picture

17 Feb 2019 - 8:32 pm | प्रमोद देर्देकर

अरेच्या ही कविता कशी काय नजरेतून सुटली .
अप्रतिम रचना !

चौथा कोनाडा's picture

28 Mar 2019 - 5:30 pm | चौथा कोनाडा

सुरेख कविता, आशय सुंदर आहे.
आवडली.