भारत-पाक हॉकी सामन्याचा थरार
हॉकीविषयी शेवटची आपुलकी चक दे इंडियाच्या वेळीच वाटली होती बहुधा!!!! त्या वेळी थोडे हॉकीला जरा फॉलो करणे सुरू केले होते, पण कालौघात पुन्हा ये रे माझ्या मागल्या... सॉरी, क्रिकेटला फॉलो करणे चालू झाले होते. मध्येच कधीतरी ऑलिम्पिक किंवा आशियाई स्पर्धांच्या वेळी थोडे अपडेट्स घेतले जायचे, पण एकदा का संघ बाहेर स्पर्धेतून बाहेर पडला की पुन्हा हॉकी बॅकसीटला!! त्यामुळे मस्कतला आशियाई हॉकी चॅम्पिअन्स स्पर्धेची घोषणा झाल्यावरही फारशी दाखल घेतली गेली नाहीच. पण स्पर्धा जसजशी जवळ यायला लागली तसतशी मस्कतमध्ये स्पर्धेविषयीची कुजबुज आणि स्टेडियममध्ये जाऊन सामना बघण्याची उत्सुकता वाढू लागली. हो/नाही करता करता बहुतेक सर्वांनी शेवटी भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे काढली. बहुतेकांचे तर त्यामध्ये हॉकी प्रेमापेक्षा मिरवणेच जास्त होते आणि आमच्यासारख्या क्रीडाप्रेमींच्या दृष्टीकोनातून भारत-पाकिस्तान खेळाच्या मैदानातली rivalry प्रत्यक्ष अनुभवता येणार होती. थोडक्यात, दुधाची तहान ताकावर भागवायचा प्रकार होता. भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच स्टेडियमवर कधी बघता येईल की नाही हे सांगता यायचे नाही, पण किमान हॉकी तरी बघू. दुसरा एक विचार म्हणजे मस्कतमध्ये फार इव्हेंट्स होत नाहीत. मग जे काही थोडे इव्हेंट होतात, ते तरी बघून घ्यायचे. क्रिकेटच्या सामन्याआधी हॉकीचा सामना स्टेडियमला जाऊन बघेन हा विचार स्वप्नातही केला नव्हता. पण आता ते घडत होते. (नुकत्याच संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना बघायचा विचार होता, पण गणित जरा महाग होते वेळेच्या आणि आर्थिक दृष्टीकोनातूनही).
भारत-पाकिस्तान सामना शनिवारी होता. गुरुवारी यजमानांविरुद्धच्या सामन्याने स्पर्धेला सुरुवात झाली. म्हटले, कोण खेळाडू आहेत, कसे खेळतात बघू या, म्हणून मॅच लावली, पण अतिशय निराशा झाली. सामना अत्यंत एकतर्फी. प्रत्येक ५व्या मिनिटाला गोल होत होता. यजमानांपेक्षा आपले राज्यांचे संघ बरे खेळत असावेत. म्हणून एक सत्र बघून पुढचा सामना बघणे सोडून दिले. त्यामुळे सामन्याच्या दिवशीपर्यंत आम्ही बऱ्यापैकी भारतीय खेळाडूंविषयी अनभिज्ञच होतो. शनिवारी सामना बघायला थोडे लवकरच गेलो मोक्याची जागा पकडण्यासाठी, तेव्हा नुकतेच भारतीय खेळाडू स्टेडियममध्ये येत होते, तेव्हा त्यांना अगदी जवळून बघितले. एकही चेहरा ओळखीचा नव्हता श्रीजेश (गोल कीपर) सोडला तर आणि नेहमीप्रमाणे बहुतांशी उत्तरेकडचे - सिंग!!!!!!
आम्ही गेलो, तेव्हा कोरिया आणि जपान यांचा सामना चालू होता आणि नंतरचा भारत-पाकिस्तान. कोरियन आणि जपानी खेळाडूंचा वेग बघून अचंबित व्हायला झाले. पण तिथपर्यंत आपल्या संघाचीही बऱ्यापैकी माहिती काढली होती. नुकत्याच झालेल्या आशियाई खेळांच्या स्पर्धेत साखळी सामन्यानंतर आपण पहिल्या क्रमांकावर होतो आणि उपांत्य सामन्यात मलेशियाकडून आपण थोडक्यात हरलो होतो, तेही पेनल्टी शूट आऊटमध्ये आणि हक्काच्या सुवर्णपदकाऐवजी कास्यपदकावर समाधान मानावे लागलेले. जागतिक क्रमवारीतही आपण ५व्या क्रमांकावर आणि बाकीचे स्पर्धक देश १३, १४ क्रमांकावर वगैरे, त्यामुळे आपल्या विजयाची खातरी होती. आपले खेळाडूही फोकस्ड होते. बसमधून उतरताना बऱ्याच लोकांनी त्यांना सेल्फीसाठी विनंती केली, पण ते "सामन्यानंतर" एवढेच बोलून त्यांना परत पाठवत होते. जपान-कोरिया सामन्यानंतर भारत व पाकिस्तान दोन्ही संघांचे खेळाडू वॉर्म-अपसाठी मैदानात उतरले, तेव्हाच दोन्ही संघांमधील तफावतीचा अंदाज आला. पाकिस्तानी हॉकीमधली आर्थिक चणचण स्पष्ट जाणवत होती. परदेशी कोच, फिजिओ, वॉर्म-अपच्या आधुनिक पद्धती, त्यामुळे आपल्या खेळाडूंची बॉडी लँग्वेजही खूप आश्वासक वाटत होती. त्या मानाने ह्यातील काहीच नसलेल्या पाकिस्तानी संघाच्या वॉर्म-अपमध्येही उत्साहापेक्षा पाट्या टाकण्याची मानसिकता जाणवत होती. तरीही एक प्रकारचे दडपण होतेच, कारण असे मोठे सामने हाताळताना मानसिक कणखरताही महत्त्वाची असते आणि आपला इतिहास कच खाण्याचा, तर त्यांचा जिगरी खेळ खेळून लढायचा. आताशा - म्हणजे गेल्या दशकभरात परिस्थिती बदललीय म्हणा, तरी इतिहासातली ही जखम कधीतरी डोके वर काढतेच.
सामन्याची वेळ झाली, तसे स्टेडियम माणसांनी भरून गेले होते. ओमानमध्ये फुटबॉल सोडून दुसऱ्या खेळाला प्रथमच एवढी गर्दी होत असावी. निर्विवादपणे भारतीय प्रेक्षक पाकिस्तान्यांपेक्षा जास्त होते, कारण एकतर भारतापेक्षा पाकिस्तानी संख्येने कमी आणि आहेत ते बहुतांशी कामगार वर्गातले. ते कशाला पैसे खर्च करून स्टेडियममध्ये येतील? त्या तुलनेत भारतीय पांढरपेशा वर्गही ओमानमध्ये मोठ्या संख्येत - किंबहुना पांढरपेशा वर्गात भारतीयच जास्त आहेत. राष्ट्रगीताच्या वेळी तर स्टेडियम दणाणून गेलेलं. अशात सामन्याला सुरुवात झाली आणि अगदी पहिल्याच पासमध्ये त्यांनी पेनल्टी मिळवली, तेव्हाच आम्हा समर्थकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्या पेनल्टीचे रूपांतर गोलमध्ये करून त्यांनी ४५व्या सेकंदाला आघाडी घेतली, तेव्हा भारतीय प्रेक्षकांमध्ये अगदी स्मशानशांतता पसरली.
सगळ्याच उत्साहावर पहिल्या मिनिटाला पाणी फिरले. कोणी ही कहाणी बोलायला तयार नाही. मग आजूबाजूच्यांना 'अजून तब्बल ५९ मिनिटे बाकी आहेत' ह्याची जाणीव करून दिल्यावर भारतीय प्रेक्षक हळूहळू पूर्वपदावर यायला लागले. हादरलेल्या भारतीय खेळाडूंनीही त्यांचे कंपोजर पुन्हा मिळवले आणि आक्रमणे रचायला सुरुवात केली. पण पाकिस्तानी खेळाडूंनी आता त्यांचा बचाव भक्कम केला होता. ते Dमध्ये भारतीय खेळाडूंना येऊच देत नव्हते. आपण एखाददोन पेनल्टीही मिळवल्या, पण त्यांचे काही गोलमध्ये रूपांतर नाही करू शकलो आणि पहिल्या १५ मिनिटांचे सत्र पाकिस्तानच्या आघाडीने संपले. मघाच्या जपान-कोरिया आणि पाकिस्तान-भारत सामन्यातील फरक स्पष्ट जाणवत होता. जपान-कोरिया सामन्यात फक्त वेगावर आणि लाँग पासेस वर भर होता, तर भारत-पाकिस्तान सामन्यात ड्रिब्लिंगचे कौशल्य, छोटे पासेस करत चाली रचणे, डमी करणे वगैरे अशा ट्रिक्स बघायला मिळत होत्या.
दुसऱ्या सत्रातही आपण घेतलेला आक्रमकतेचा वसा काही टाकला नाही. सलग आक्रमणे रचत पाकिस्तानच्या दबावफळीवर दबाव कायम ठेवला. मध्येच पाकिस्तानी खेळाडू प्रतिआक्रमणे रचत भारतावरची आघाडी वाढवण्याचा प्रयत्न करत होते. त्यात त्यांनी पेनल्टी कॉर्नरही मिळवले, पण ह्या वेळी त्याचे रूपांतर त्यांना गोलमध्ये करता नाही आले. त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला की भारतीय प्रेक्षकांचा आवाज हरपत होता. जर चुकून दुसराही गोल झाला असता, तर कदाचित सामना तिथेच संपला असता. अशातच दुसऱ्या सत्राच्या १०व्या मिनिटाला भारतीय कर्णधार मनप्रीत सिंगने ३ पाकिस्तानी बचावपटूंना चकवत अप्रतिम मैदानी गोल मारला आणि भारतीय स्टेडियम प्रेक्षकांनी दणाणून सोडले. आता भारतीय खेळाडूंना आणि प्रेक्षकांना आपापली लय सापडली होती. भारतीय खेळाडूंनी अजूनही आक्रमक चाली रचत पाकिस्तान्यांना मोकळा श्वास घेऊ दिला नाही, पण फार काही हाती लागले नाही आणि दुसऱ्या सत्रांनंतर १-१ अशा बरोबरीत मध्यंतर झाले.
तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच मनप्रीत सिंगने एक अप्रतिम गोल करत भारताला आघाडीवर नेले. गोलपोस्टकडे पाठ असूनही त्याने पाकिस्तानी गोलकीपरला चकवत केलेला गोल म्हणजे फुटबॉलमधील बायसिकल किकच्या तोडीचा म्हणायला हवा. ह्या गोलने आम्हा भारतीय समर्थकांचा आवाज आणि आत्मविश्वास आभाळाएवढा झाला, तर पाकिस्तानी खेळाडूंचे खच्चीकरण झाले. ह्या गोलनंतरही आपण पाकिस्तानी गोलक्षेत्रावर दबाव कायम ठेवला. आता ४० मिनिटांनंतर फिटनेसमधला फरक जाणवायला लागलेला. सततच्या दबावामुळे पाकिस्तानी खेळाडू थकत चालले होते, तर भारतीय खेळाडूंच्या हालचालीत थकलेपणाची जाणीव कुठेच नव्हती. मध्येच त्यांनाही पेनल्टी कॉर्नर मिळत होते, पण भारतीय बचावफळी अगदी सहजगत्या चेंडू त्यांच्याकडून काढून घेत होती.
वाढत्या भारतीय आक्रमणांना थोपवणे पाकिस्तानी खेळाडूंना शक्य नाही झाले आणि दिलप्रीत सिंगने तिसरा गोल मारत भारताची आघाडी २ गोलने वाढवली. आता पाकिस्तानने सामना सोडून दिल्यात जमा होता आणि फक्त अजून गोल ना होऊ देण्यासाठी ते शिकस्त करत होते. अशातच तिसरे सत्र संपले. चौथ्या सत्रातही परिस्थिती फार काही वेगळी नव्हती. भारतीय आक्रमणानाची वाढती धार पाकिस्तान्यांना थोपवणे कठीण जात होते. पण भारतालाही काही गोल वाढवता आले नाहीत. पण पूर्ण चौथ्या सत्रात बहुतांश वेळ पाकिस्तानी हाफमध्ये खेळला गेला, अक्षरशः 'वन-वे ट्रॅफिक' म्हणतात तशी परिस्थिती होती. गोलसंख्या वाढली असती, तर आणखी मजा आली असती. पण हेही नसे थोडके. पहिल्याच मिनिटाच्या पिछाडीवरून सामन्यात पुनरागमन करत विजय मिळवणे सोप्पे नाही, तेही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध, भारतीय खेळाडूंनाही एवढ्या संख्येत समर्थकांची अपेक्षा नसेल, त्यामुळे सामना संपल्यावर त्यांनीही 'लॅप ऑफ व्हिक्टरी' करत प्रेक्षकांचे आभार मानले.
पुढचे २-३ दिवस सगळीकडे भारताच्या विजयाची चर्चा होती आणि पुनश्च एकदा हॉकीला लागणारे स्किल्स, स्टॅमिना, फिटनेस ह्याविषयी भरभरून बोलत होते. एवढेच नाही, तर पुढच्या भारताच्या सामन्यांना बर्यापैकी उपस्थिती होती. आता अंतिम सामन्यात आपण पोहोचू हा विश्वास आहेच आणि तोही स्टेडियमला जाऊन बघायचा, ह्यासाठी तिकिटांची चौकशी केली जात आहे. आत्तापर्यंत मलेशिया वगळता बाकी सगळ्या संघांविरुद्ध दमदार कामगिरी करत आशियात तरी आपणच 'किंग' असल्याचे सगळ्या सिंगनी दाखवलेय. उपांत्य सामना जपानशी होईल आणि आपण जिंकूच ह्यात काही शंकेस जागा राहिली नाही. अंतिम सामना पुनश्च पाकिस्तानशी झाल्यास दुग्धशर्करा योगच. नाहीतर मलेशियाशी झाल्यास आशियाई स्पर्धेतल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतील ही अपेक्षा आणि विश्वासही. तोपर्यंत चक दे इंडिया !!!!!!
प्रतिक्रिया
6 Nov 2018 - 12:23 pm | यशोधरा
भन्नाट लिहिले आहे, फक्त फोटो दिसत नैत.
6 Nov 2018 - 12:34 pm | प्रसाद_१९८२
लेख मात्र प्रचंड आवडला.
6 Nov 2018 - 3:38 pm | सुधीर कांदळकर
लेखन आवडले. जसदेवजींच्या हिंदी समालोचनाची आठवण व्हावी असे. धन्यवाद.
फोटो मात्र ऑलिंपिक हॉकी मधल्या भारतीय पदकांसारखे गायब झालेत.
6 Nov 2018 - 8:12 pm | तुषार काळभोर
ऑलिम्पिकमे पदक और लेखमें फोटोभी आयेंगे
7 Nov 2018 - 4:29 pm | टर्मीनेटर
छान लेख, पण फोटो नाही दिसत आहेत अजून.
7 Nov 2018 - 6:32 pm | रुस्तुम
धन्यवाद मंडळी लेख आवडल्याबद्दल!!!!
फोटो साठी प्रयत्न करून झाले पण का नाही दिसत सांगू शकत नाही....असो अल्बमची लिंक देत आहे. तिथून पहा.
7 Nov 2018 - 6:34 pm | रुस्तुम
https://photos.app.goo.gl/DNvifmyTfsMARxmq6
7 Nov 2018 - 9:53 pm | मुक्त विहारि
समालोचन आवडले...
9 Nov 2018 - 4:15 pm | मित्रहो
आणि जबरदस्त वेगवाण लेखन. मजा आली वाचताना. सामान्याचा थरार उभा झाला.
दुर्भाग्याने पावसामुळे भारत ती स्पर्धी एकटा जिंकू शकला नाही आणि भारत व पाकिस्तान हे संघ संयुक्त विजेते ठरले.
14 Nov 2018 - 12:28 am | रुस्तुम
हो. दुर्दैवाने.
9 Nov 2018 - 8:56 pm | पद्मावति
सुंदर लेख.
12 Nov 2018 - 11:26 am | दुर्गविहारी
मस्तच लिहिले आहे. हॉकी सामन्याचे समालोचन मि.पा.वर बहुधा पहिल्यांदा वाचले. फक्त पेनल्टी स्ट्रोक कि कॉर्नर ते स्पष्ट लिहायला हवे होते. असो. पण मजा आली..
14 Nov 2018 - 12:27 am | रुस्तुम
पेनल्टी कॉर्नर!!!!!
धन्यवाद लेख आवडल्याबद्दल.
12 Nov 2018 - 6:50 pm | वन
आवडला. पु ले शु
20 Nov 2018 - 1:42 am | जुइ
हॉकीच्या सामान्याच्या बरोबरीने अतिशय वेगवान शैलीत केलेले समालोचन आवडले!
23 Nov 2018 - 11:11 pm | रुस्तुम
धन्यवाद