मुद्रणपूर्व साहित्यकाल

अलकनंदा's picture
अलकनंदा in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

मुद्रणपूर्व साहित्यकाल

मुद्रणकलेचा इतिहास बघायचा झाला, तर बहुतेक दोनएकशे वर्षांइतका मर्यादित असावा. तरीही, काळाची गती आणि गरज ह्यांच्याशी जुळवून घेत मुद्रणाची कला जन्म पावून पुढे चांगलीच विकसत आणि आधुनिक होत गेली. आता तर डिजिटल लिखाणाचा जमाना आहे, म्हणजे कागदावरील मुद्रणही मागे पडल्यात जमा होत आहे.

मग मुद्रणपूर्व काळात साहित्याचा आणि ज्ञानाचा प्रसार, निर्मिती होतच नव्हती का? मुद्रणाच्या आधीही भाषा, लिपी हे सारे अस्तित्वात होतेच की. अगदी पूर्वीचा विचार करावयाचा, तर उत्क्रांत होताना मनुष्याला संवादाची, भाषेची गरज जाणवली असणार आणि चिन्हे, खुणा, प्रतीके आणि लिपी ह्या माध्यमांतून त्याने ती निर्मिली, जोपासली आणि वाढवली असणार. उदाहरणार्थ, ध्वनी आणि चिन्ह आणि चित्र रूपातली भाषा. खाणाखुणा. कधीतरी चित्रांची, चिन्हांची अक्षरांशी आणि शब्दांशी सांगड घातली गेली असावी आणि नियमबद्ध लिपी निर्माण झाली असावी.

जसजशी मनुष्याची प्रगती होत गेली आणि माणूस साहित्य निर्माण करू लागला, तेव्हा हे निर्माण झालेले साहित्य मुख्यत्वे मौखिक परंपरेने जपले जाई. ग्रंथ, त्यांचे अध्ययन, गुरुकुलात राहून शिक्षण घेणे हे बराच काळ एका ठरावीक वर्गापुरतेच मर्यादित असल्याने, सर्वसामान्य लेखना-वाचण्यापासून दूरच होते, अशा काळात गोंधळी, कीर्तनकार, वासुदेव, वाघ्या-मुरळी, बहुरूपी, प्रवचनकार इत्यादी लोककलाकार आपापल्या कार्यक्रमांतून लोकांचे मनोरंजन काही प्रमाणात बोधन करीत असत. ज्ञानाच्या कक्षादेखील व्यवहार व धर्माचे ज्ञान ह्यापुरत्या मर्यादित होत्या. पुढे संतांनी लोकभाषेत ज्ञान वाटण्यास सुरुवात करून लोकशिक्षणाच्या वाटा सुगम केल्या व लिखित शिक्षण सर्व जनसामान्यांना उपलब्ध होऊ लागण्यास सुरुवात झाली. तरीही ह्याची सुरुवात होईपर्यंत लिखितापेक्षा मौखिक पद्धतीने ज्ञानदान होण्याची टक्केवारी अधिक होती. पूर्वी गुरुकुल पद्धतीने मिळणाऱ्या मौखिक शिक्षणाच्या जोडीला लोकसंस्कृतीची जपणूक करणाऱ्या आणि तिला पुढे नेणाऱ्या कलावंतांचा लोकरंजन आणि लोकशिक्षण करण्यात महत्त्वाचा सहभाग आहे, हे म्हणणे चुकीचे ठरू नये.

FB-IMG-1540882530187-1

सर्वसाधारणतः ह्या काळात लेखन करण्यासाठी लेखन माध्यम म्हणून भूर्जपत्र वा ताडपत्र वापरले जाई. सुटी ताडपत्रे मध्ये छिद्र पाडून, त्यात दोरी ओवून एकत्र केली जात - 'ग्रथित' केली जात - म्हणून ते 'ग्रंथ'. ग्रंथांचे लेखन कष्टाचे काम होते. कित्येक हजार ओव्या असलेले ग्रंथ मान पाठ मोडेपर्यंत, चुका न करता लिहून काढणे आणि त्याच्या खूप प्रती तयार करणे हे अशक्य नसले तरी अतिकष्टसाध्य होत असे, हे ग्रंथाच्या अनेक प्रती उपलब्ध नसण्याचे वा त्या सहजरीत्या जनसामान्यांना उपलब्ध नसण्याचे एक कारण असू शकते. असे कष्टाने सिद्ध केलेले ग्रंथ जपणे हे महत्त्वाचे मानले जाई. ग्रंथाचा कर्ता व लेखक 'कष्टेन लिखितं ग्रंथं यत्नेन परिपालयेत्|' अशी विनंती करीत. ग्रंथांचे संरक्षण कसे करीत हे रा.चिं. ढेरे ह्यांच्या शोध टिपणामध्ये नोंदवले आहे -

'ग्रंथांच्या सुट्या पानांना धक्का पोहोचू नये म्हणून त्यांच्या खाली-वर फळ्या असत. वाचनाच्या वेळेनंतर ग्रंथ जाड रुमालात बांधून ठेवीत असत. दर वर्षी ग्रंथांना उन्हे देत असत आणि कृमीकीटकांपासून त्यांचे रक्षण करण्यासाठी 'सदर्प भस्म' वापरीत असत.'

FB-IMG-1540882671359

FB-IMG-1540882744857

इतकेच नव्हे तर, ग्रंथपूजनाच्या विधीमुळे ग्रंथहानी होऊ नये, ह्याचेही भान प्राचीन काळी बाळगलेले आढळते. पूजनासाठी कृमीकीटक ज्यांत नसतील व ज्यात पाण्याचा अंश नसेल, अशी फुले व सदर्प भस्म वापरावे अशा सूचना आहेत. वाचावयास ग्रंथ नेल्यास तो परत करताना नव्या रुमालात बांधून द्यायची पद्धत होती. ग्रंथ सहजगत्या उपलब्ध नसल्याने, पुन्हा ते सिद्ध करणे आणि त्याची जपणूक करणे कष्टसाध्य असल्याने, ते इतरांना देण्याबाबत कृपणपणा दाखवला जाई, ह्यात नवल ते काय! न जाणो, कोणी ग्रंथ खराब केला तर व परत दिलाच नाही तर, ही भीती ह्यामागे असे आणि ती पूर्णपणे अनाठायी होती, असेही म्हणता यायचे नाही. ग्रंथ सुरक्षित ठेवण्यासाठी जे पेटारे बनवीत, त्यांच्या आतून बुरुडी काम करत आणि बाहेरून ते कातड्याने मढवीत. अशा पेटार्‍यांची लांबी साधारण ५ फूट, रुंदी ३ फूट आणि उंची २.५ फूट असे. स्कंद पुराणात अशा पेटार्‍यांना 'संपुटक' अशी संज्ञा वापरलेली आहे.

जपणुकीसाठी ग्रंथ बांधण्यासाठी रुमाल, रुमालावरून गुंडाळण्यासाठी गोफ, ठेवण्यासाठी पेटारा, खालीवर घालण्यासाठी घोटीव फळ्या, पेटाऱ्याला झाकण हा सारा जामानिमा करण्यात येत असे.

स्वामी समर्थांनी दासबोधात ग्रंथ रक्षणासंदर्भात म्हटले आहे -

नाना गोप नाना बासने | मेणकापडे सिंदुरवर्णे |
पेट्या कुलुपे जपणे | पुस्तकाकारणे ||

(दासबोध १९.१.२)

थोडे अवांतर सांगायचे झाले, तर इतकी काळजी घेऊनही कोणाला ग्रंथचोरीची इच्छा वा बुद्धी झालीच, तर भावनात्मक पातळीवरही ग्रंथरक्षणाच्या उद्देशाने ग्रंथलेखकांनी वंशक्षयासारख्या शापवाण्या आणि चांद्रायनासारखी प्रायश्चित्ते नोंदवून ठेवली आहेत!

ग्रंथलेखन करण्यासाठी ज्ञानेश्वर काळापासून महाराष्ट्रात कागदाचा वापर सुरू झाला असावा, असे मत रा.चिं.‌ ढेरे नोंदवतात. तरीही कागदाची निर्मिती विपुल प्रमाणात होत नसे. पोथ्यांसाठी ठरावीक आकारात कागद वापरून झाल्यावर उरलेल्या तुकड्यांवर स्फुटे लिहून ठेवल्याची उदाहरणे आहेत. स्वतः ढेरे ह्यांच्या संग्रही असे एक बाड असल्याचे त्यांनी आपल्या टिपणात नोंदवले आहे.

कागदावर लिखाणासाठी हिरडे जाळून किंवा दिव्यावरील काजळापासून बनवलेली शाई आणि बोरू वापरत. दासबोधात कूट भाषेत ह्या लेखन साहित्याचा उल्लेख केला आहे.

पीतापासून कृष्ण जाले | भूमंडळी विस्तारले |
तेणेविण उमजले | हे तो घडेना ||
आहे तरी स्वल्प लक्षण | सर्वत्रांची सांठवण |
अद्धम आणि उत्तम गुण | तेथेचिं असती ||
महीसुत सरसाविला | सरसाऊन द्विधा केला |
उभयेता मिळोन चालिला | कार्येभाग ||
स्वेतास्वेतास गांठी पडता | मधे कृष्ण मिश्रित होता ||
इहलोकसार्थकता | होत आहे ||

( दासबोध १५.६.१-४)

पीतापासून कृष्ण जाले = दिव्याच्या ज्योतीपासून काजळ झाले/ पिवळ्या रंगाच्या हिरड्यांच्या कोळशापासून शाई झाली.
महीसुत = बोरू.
सरसाऊन द्विधा केला = बोरूचे तासून दोन भाग केले व तोंडापाशी छेद दिला.
स्वेतास्वेतास गांठी पडता = बोरू व कागद यांची गाठ पडली.
मधे कृष्ण मिश्रित होता = काळ्या शाईचा उल्लेख आहे. शाईने (मुळे) बोरू व कागदाचा संबंध जडतो.

बरे, हे सारे लिहिताना दक्षतेने लिहावे, सुवाच्य आणि शुद्ध लिहावे आणि लेखन देखणे असावे ह्याचेही भान बाळगलेले आढळते. सुबक, ठसठशीत व सुस्पष्ट अक्षर, दोन ओळींतील पुरेसे अंतर, अंतरातील सारखेपणा, शब्द अर्धवट न तोडणे इत्यादी उत्तम लेखनाची वैशिष्ट्ये रामदासस्वामींनी दासबोधात नोंदवली आहेत (दासबोध, १९.१.१-१२). सुवाच्य लेखनाबरोबरच पानांची सजावट, चित्रे, शीर्षकांची आकर्षक मांडणी ह्यांकडेही लक्ष पुरवून ग्रंथकार आपल्या ग्रंथांची सजावट करीत असत.

FB-IMG-1540882692859

FB-IMG-1540882854064

कागदांवर लिहिलेले ग्रंथ सूत्रबद्ध नसत, तर सुट्या पानांचे असत. स्फुटे, ज्योतिष, वैद्यक ह्यांची टिपणे, आख्यानांची वा शाहिरी कवने ह्यांची बाडे मात्र जाड दोर्‍याने वा बारीक सुती दोरीने शिवलेली असावयाची. कागदावर कापड चिकटवून ते वेष्टण म्हणून शिवायचे वा कातड्याचे वेष्टण वापरावयाचे. खूप लांब वही असेल, तर तिची मध्ये घडी करावयाची. वेष्टणाच्या एका टोकाला बंद शिवलेला असे, तो संपूर्ण बाडाला गुंडाळत.

FB-IMG-1540882632747

हे ग्रंथ लिहून काढणाराला विशेष महत्त्व होते व त्यांना लेखक म्हणत. अर्थात, हा शब्द ग्रंथांची हस्तलिखिते लिहून काढणारा वा नक्कल करणारा ह्या अर्थी वापरत. ग्रंथांच्या नकलांखेरीज लेखक ग्रंथांचे प्रथम लेखनही करीत. ह्या न्यायाने गणपतीस आद्य लेखक म्हणावयास हरकत नसावी! ज्ञानोबा माउलींच्या ज्ञानेश्वरीचे 'सच्चिदानंद बाबा आदरे लेखकु जाहला', दासबोधाचे लेखक कल्याणस्वामी ही काही ठळक उदाहरणे. बरेचदा ग्रंथ सांगणार्‍याच्या आदरापोटी लेखक मानद म्हणून काम करीत असे. आत्मपठनार्थं परोपकारार्थं च लिखितम्, ह्या प्रेरणेने हे लिखाण होई. त्याचप्रमाणे व्यावसायिक लेखकांचा वर्गही नांदत होता व तत्कालीन धनिकांसाठी हा वर्ग काम करीत असावा.

ग्रंथलेखन व्यवसायाबद्दलच्या नोंदी पेशव्यांच्या दप्तरांत, रोजनिशी आणि तत्कालीन इतर कागदपत्रांत आढळलेल्या आहेत, हे डॉ. ढेरे ह्यांनी नोंदवले आहे. ग्रंथलेखनाची लिहिणावळ दर हजार ग्रंथसंख्येवर आधारली जात असे. ग्रंथ म्हणजे श्लोक, ओवी व कडवे अशां रचनांचा अंश. अशा एक हजार ग्रंथांमागे, १|||/- ते रुपये ४/- मोबदला दिल्याच्या नोंदी आहेत.

FB-IMG-1540882584432

ह्या हस्तलिखितांचा प्रसार करण्यात तत्कालीन वैदिक घराणी, पुराणिक, कीर्तनकार, राजपाठक, लेखक ह्यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच संतवर्ग व मुख्यत्वे त्यांचे अनुयायी ह्यांचाही मोठा वाटा आहे. तीर्थयात्रेला जाताना समवेत ग्रंथ घेऊन जायचे, मुक्कामी नवीन ग्रंथ पाहावयास मिळाले की ते नकलून घ्यायचे, ह्यामुळेही साहित्याचा प्रसार होण्यास हातभार लागत असे. ग्रंथांची देवाणघेवाण होत असे.

FB-IMG-1540882872235

मुद्रणपूर्व साहित्यकालाचे आणि ग्रंथव्यवहाराचे स्थूल स्वरूप हे असे होते. भूर्जपत्रे, ताडपत्रे ह्याखेरीज ताम्रपट, शिला, लाकूड, वस्त्रपट इत्यादी साधनांचासुद्धा लिखाणासाठी वापर केला गेला आहे. त्याविषयी पुन्हा कधीतरी.

संदर्भ - डॉ. रा.चिं. ढेरे ह्यांची प्रकाशित शोध टिपणे - गंगाजळी, आंतरजाल.
सर्व प्रकाशचित्रे आंतरजालावरून साभार.

H

दिवाळी अंक २०१८

प्रतिक्रिया

प्रसाद_१९८२'s picture

6 Nov 2018 - 1:08 pm | प्रसाद_१९८२

महितीपूर्ण लेख .

सुधीर कांदळकर's picture

6 Nov 2018 - 6:16 pm | सुधीर कांदळकर

लिहिलेला रोचक, माहितीपूर्ण लेख. आवडला, धन्यवाद.

माहितगार's picture

6 Nov 2018 - 6:39 pm | माहितगार

माहितीपूर्ण आणि रोचक लेख

बरेचदा ग्रंथ सांगणार्‍याच्या आदरापोटी लेखक मानद म्हणून काम करीत असे. आत्मपठनार्थं परोपकारार्थं च लिखितम्, ह्या प्रेरणेने हे लिखाण होई. ....त्याचप्रमाणे व्यावसायिक लेखकांचा वर्गही नांदत होता व तत्कालीन धनिकांसाठी हा वर्ग काम करीत असावा.... ह्या हस्तलिखितांचा प्रसार करण्यात तत्कालीन वैदिक घराणी, पुराणिक, कीर्तनकार, राजपाठक, लेखक ह्यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच संतवर्ग व मुख्यत्वे त्यांचे अनुयायी ह्यांचाही मोठा वाटा आहे. तीर्थयात्रेला जाताना समवेत ग्रंथ घेऊन जायचे, मुक्कामी नवीन ग्रंथ पाहावयास मिळाले की ते नकलून घ्यायचे, ह्यामुळेही साहित्याचा प्रसार होण्यास हातभार लागत असे. ग्रंथांची देवाणघेवाण होत असे.

आताच्याही काळात लेखक कविचे सादरीकरण / भाषण / मुलाखत इत्यादी नंतर पुस्तकाचा सेल चांगला होतो, तिच स्थिती भ्रमंतीवर असलेल्या पुराणिक, कीर्तनकार, इत्यादींची असावी, चांगले सादरीकरण झाले कि श्रीमंतांकडून अल्प ग्रंथ खरेदी सोबत किर्तनादी मधून मिळणारी दक्षिणा असे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मानधन मिळत असणार. कमी साक्षरतेचे प्रमाण, गावातील श्रीमंतांची मर्यादीत संख्या असल्यामुळे प्रत्येक गावातून खूप ग्रंथ विकले असे होत नसणार, त्यामुळे सहाजिक अधिक गावांची भ्रमंती या पुराणिकांना करावी लागत असेल सोबतच दळणवळणाच्या साधनांची मर्यादा असल्यामुळे प्रवासही मजल दरमजल अधिकतम गावे कव्हर करत असणार असे वाटते.

पुराणिक आणि किर्तनकारांचा गावो गावी ज्या प्रमाणात प्रवास झाला असेल त्या प्रमाणात पुरातन प्रवासवर्णने का आढळत नाहीत याचे नवल वाटते. खासकरुन पुराणिक आणि किर्तनकारांच्या काही बाडांकडे दुर्लक्ष झाले असण्याची शक्यता असू शकेल का ?

पुराणिक आणि किर्तनकारांचा गावो गावी ज्या प्रमाणात प्रवास झाला असेल त्या प्रमाणात पुरातन प्रवासवर्णने का आढळत नाहीत याचे नवल वाटते. खासकरुन पुराणिक आणि किर्तनकारांच्या काही बाडांकडे दुर्लक्ष झाले असण्याची शक्यता असू शकेल का ?

शक्यता नाकारता येणार नाही, परंतु प्रत्येकाने प्रवासवर्णन वगैरे लिहिले असेल असेही नाही. अगोदर कोणीतरी लिहिलेले सांगणे, त्यात सांगण्याची, सादर करण्याची कला आहेच - ती अंगी असणे हा एक भाग झाला पण निरुपणाची कला अंगीं असलेल्या प्रत्येकाला लिखाणाची कला अवगत असेलच असे नसावे, हा एक भाग झाला. दुसरे म्हणजे लिहिण्याची इच्छा असणे आणि लेखनासाठी सामग्री सहजगत्या उपलब्ध असणे.

पण तुम्ही वर्तवलेली शक्यता खरेच रोचक आहे, त्या अनुषंगाने काही मिळाले तर नक्की शोधायचा प्रयत्न करते आणि मिळाले तर कळवेन. धन्यवाद.

टर्मीनेटर's picture

6 Nov 2018 - 7:40 pm | टर्मीनेटर

माहितीपूर्ण लेख.

मीअपर्णा's picture

6 Nov 2018 - 9:41 pm | मीअपर्णा

ओघवत्या भाषेत लिहिल्यामुळे जास्त आवडला.

मुक्त विहारि's picture

6 Nov 2018 - 10:32 pm | मुक्त विहारि

आवडला...

तुषार काळभोर's picture

6 Nov 2018 - 10:59 pm | तुषार काळभोर

छान लेख

यशोधरा's picture

7 Nov 2018 - 9:21 am | यशोधरा

वेगळ्या विषयावरचा लेख.

कुमार१'s picture

7 Nov 2018 - 9:34 am | कुमार१

माहितीपूर्ण आणि रोचक लेख

अलकनंदा's picture

7 Nov 2018 - 2:25 pm | अलकनंदा

सर्व वाचक आणि प्रतिसाद देणाऱ्यांचे मनापासून अनेक आभार.
आपणां सर्वांना दीपावलीच्या अनेक शुभेच्छा!

सुर्ये आधिष्ठीली प्राची |जगा जाणिव दे प्रकाशाची ||
तैसी श्रोतया ज्ञानाची |दिवाळी करी ||
-संत ज्ञानेश्वर

प्रचेतस's picture

7 Nov 2018 - 7:37 pm | प्रचेतस

अतिशय माहितीपूर्ण लेख.

मुकुंदराजाने १११० साली रचलेल्या विवेकसिंधूत ग्रंथरचनेचा उल्लेख आलेला आहे.

नृसिंहाचा बल्लाळ | तेयाचा कुमारु जयंतपाळ | तेणे करविला हा रोळ | ग्रंथरचनेचा ||

तत्कालीन लेखनाबाबत महाराष्ट्र सारस्वतात वि. ल. भावे म्हणतात

ताडपत्र आणि भूर्जपत्रांवर एकटाकी लिहिणे अशक्यच असे. कारण त्यांवर अक्षरांच्या रेघा कोराव्या लागत त्यामुळे पानांच्या शिरा असतील त्यामानाने लिहिणे भाग होते. दोहोतील अक्षरांना ओळ सारखी काढत जाणे निर्भय नसे. संबंध अक्षरे एका ओळीच्या दांडीवर टांगून देणे हे विशेषच धोक्याचे असे. कारण एखादे वेळी ह्या ओळी ताडाच्या, भूर्जाच्या किंवा दुसर्‍या एखाद्या पानाच्या समांतर शिरांवर सारख्या आल्या तर पानाच्या त्या जागी चिरफळ्या होऊन लेख फाटण्याचा संभव फार असे.

अशा वेळी हेमाद्रीपंडीताने मोडी लिपीचा शोध लावून एकटाकी लिहिण्याची पद्धती अंमलात आणली व त्याने ताड/भूर्जपत्रांवरील लेख्न अधिक सुलभ झाले.

वि. ल भावे पुढे म्हणतात

दौलताबाद किंवा देवगिरी हे चांगले कागद करण्याचे ठिकाण प्रसिद्ध आहे. येथलें कागद साताठशे वर्षे महाराष्ट्रात फार प्रचारांत असत. यावर मषीच्या काळ्या शाईने लिहिलेला लेख वज्रलेप होतो. या प्रकारें लिहिलेले चारशेपाचशे वर्षांवरचे लेख आजहि स्पष्ट दिसतात. त्यांवरची शाई बिलकुल उडालेली नाही किंवा कागदांवरही तिचा परिणाम लवमात्र झालेला नाही. या शाईत दुसरा विशेष असा की तिने लेखणी गंजत नाही की खराब होत नाही की कागद फाटत नाही.

अलकनंदा's picture

8 Nov 2018 - 7:17 pm | अलकनंदा

प्रतिसाद आवडला, धन्यवाद.

पद्मावति's picture

9 Nov 2018 - 10:10 pm | पद्मावति

उत्तम लेख.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Nov 2018 - 6:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

माहितीपूर्ण लेख.

मित्रहो's picture

13 Nov 2018 - 8:04 pm | मित्रहो

खूप माहितीपूर्ण लेख. नवीन माहीती.
मागे एका भाषणात ऐकले होते कि भारतीय भाषांची लिखाणाची पद्धत ही पद्य होती गद्य नाही कारण बोलले ते लिहून ठेवणे ते जपण कठीण होते. पद्य असले तर ते लक्षात राहायला सोपे जाते. ते टिपण जरी एका व्यक्तीकडे असले तरी इतर ते पाठ करु शकत होते. हे पाठांतराच्या सुरासाठी वृत्त वगैरे संकल्पना होत्या. वृत्तातल्या ठरवून दिलेल्या मात्रांमुळे पाठांतर सोपे होत होते. गद्य आण त्यासोबतची विरामचिन्हे हे मुद्रण संकल्पना विकसित (अर्थातच इंग्रज भारतात आल्यावर) झाल्यावरच सुरु झाली असावी असे त्याव्यक्तीचे मत होते.

दुर्गविहारी's picture

14 Nov 2018 - 3:03 pm | दुर्गविहारी

खुपच उत्तम माहिती. प्राचीन काळी लिखाण अवघड होते याची कल्पना होती, पण ते किती अवघड होते, हे या धाग्यामुळे समजले. धन्यवाद.

खूप उत्तम, रोचक, माहितीपूर्ण.

बाय द वे, हजार ग्रंथ लिहिण्याचा मोबदला फक्त एक ते चार रुपये हा त्या काळच्या मानानेही फार कमी वाटतो.

डँबिस००७'s picture

16 Dec 2018 - 8:17 pm | डँबिस००७

माहितीपूर्ण आणि रोचक लेख !!
हल्लीच फिनोमिनल ट्रॅव्हल्स नावाच्या युट्युबवरचा ह्याच विषयावरची फिल्म बघण्यात आली. त्यात ताडपत्रावर लिहीण्याची पद्धत. त्यासाठी एका खास प्रकारचा ताड वापरला जातो. त्याची पा ने एका विशिष्ठ पद्धतीने प्रोसेसिंग केला जातो. त्यावर अ क्षर कोरली जातात व त्यासाठी विशिष्ठ कोरण्यांचा वापर केला जातो. पानावर कोरल्यामुळे तयार केलेला मजकुर कोणी पुसु शकत नाही वा त्यात बदल करु शकत नाही असही कळाल.

स्त्रोतः https://www.youtube.com/watch?v=S6-yp-t-5H0