तो माझा सांगाती..
हिमालय. त्याचं वेड लागतं.
प्रत्येक ऋतूगणिक लोभस ते रौद्र अशी वेगवेगळी रूपं धारण करणारं, ते एक वेगळं आणि सुंदर असं जग आहे. ज्ञात-अज्ञात शिखरं, वळत वळत, स्वत:भोवती गिरक्या घेत जाणारे रस्ते, घनदाट जंगलं, आपल्या मस्तीत वाहणारे जलप्रवाह, हिरव्यापिवळ्याकरड्या शेतपायर्या, बर्फ, पठारं, गुरफटून टाकणारे ढग आणि धुकं, मनात येईल तिथे उगवणारी फुलं, दूर दूर उगवलेली, आजूबाजूच्या निसर्गाशी एकरूप झालेली एकांडी घरं. नक्षत्रलोकाशी इथे आपसूक आणि सहज नाळ जुळते.
काही काही योग नशिबात असावे लागतात, आणि जेव्हा ते पदरात पडतात, तेव्हा येणारी अनुभूती शब्दांत मांडणं खरं तर अशक्य. मला वाटतं, हिमालयात एकदा पाऊल पडलं की ती पावलं हिमालयाचीच होऊन जातात. मग सुटका नाही, हेच खरं. हिमालय आणि त्याच्या परिसराविषयी मी एकूणच भारावूनच विचार करते हे मला बर्याचदा जाणवतं, पण तो एकूणच परिसर, हिमालयाचे भव्य करकरीत कडे, खोल उतरत जाणार्या दर्या, वनसंपदा, हिरवी पठारं, निळ्या हिरव्या नद्या, जलप्रपात, पहाडांच्या अंगाखांद्यांवर विसावलेलं आभाळ असं सारं पाहताना, अनुभवताना नेहमीच भरून, उचंबळून येतं. वेडेपणा आहे, पण असू द्या. आपणही काही काळासाठी ह्याचाच एक भाग झालेलो आहोत, ही जाणीव दर वेळीच मोठी सुखावणारी आणि मन पिसासारखं हलकं करणारी ठरते.
काही दिवसांसाठी हिमालयात भटकताना, मनात येईल तेव्हा आणि तसं, अगदीच स्वान्तसुखाय असं, आपण इथे दिवस घालवू शकत नाही, ह्याची काहीशी खंतही वाटते कधीकधी मनात. पहाडांमधलं सर्वसामान्यांचं आयुष्य वाटतं तितकं सोपं नाही, ही जाणीव असतेच, तरीही इथे येऊन बसेरा करण्याचा मोह होत राहतो. जमेल का, ही एक भीती वाकुल्या दाखवत राहते म्हणा. तर ते एक असो. आपल्या आयुष्याच्या मांडलेल्या पसार्यालाही कारण आपणच असतो न काय! म्हणता म्हणता आयुष्याचे पसारे वाढतात, एकातून दुसरा असे उलगडतात, कधी कधी आवरले जातात. आपणच मांडलेला खेळ असतो, तेव्हा ह्या सार्याची जबाबदारी झुगारणार तरी कशी आणि कुठे? आणि झुगारायची तरी कशासाठी? पहाड नाही का युगानुयुगे ठामपणे उभे राहतात आपल्या जागी? पाऊस, वारा, वादळं ह्या सार्यांत आपली जागा सोडत नाहीत, तसंच काहीसं आपलं.
प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या प्रवासाची चाकोरी कदाचित आखूनच मिळते जन्माबरोबरच. कोणाची वाट कधी मळलेली, तर कोणाची जरा अधिक रुळलेली, तरी प्रवास हा ठरलेला. तो कोणी चुकवू शकत नाही. कोणी ठरलेल्या इच्छित गंतव्याला सुखेनैव पोहोचणारा आणि कोणाच्या प्राक्तनात गंतव्यच काय, रस्ताही अनभिज्ञ. अशा प्रवासाचीही स्वतःची खुमारी असणारच. प्रत्येक प्रवास, त्याच्या वाटा, त्यातले खाचखळगे, प्रवासाची लांबी-रुंदी सारं काही प्रत्येकासाठी वेगळं. आपल्याला झेपेल, पेलेल अशा बेताने मार्गक्रमण करावं. आपण फक्त मार्गक्रमणाचे धनी, इतर व्याप आपल्याला तरी कशाला? घडणारा प्रवास जाणिवा समृद्ध करत जातो. अनुभवांत भर घालत जाणारे, कधी सुखावणारे तर कधी दुखावणारे, कधी सुन्न करणारे तर कधी समाधानाने ओसंडून वाहणारे क्षण. आणि अशाच लहान-मोठ्या अनुभवांतून शिकणारं, अनुभवांची खूणगाठ पक्की करत आयुष्याशी जुळवून घेत जगायचा धडा गिरवणारं मन, हेच तर ह्या प्रवासाचं फलित. एखाद्या वळणावर उलीकशीच विश्रांती घेत, अशा अंतर्बाह्य प्रवासाचा अधूनमधून धांडोळा घेत पुढल्या प्रवासाला त्याच आत्मीयतेने सिद्ध असणं, शुद्ध तितकं मनात जपत आणि हीण असेल ते विसरून जात, पुढे पुढे चालायचं. भविष्याच्या प्रतीक्षेत फार न गुंतता, आत्ता समोर उभ्या ठाकलेल्या क्षणाशी समरसून जगायला शिकलो की प्रवास सफल होतो आहे म्हणायला हरकत नसावी.
प्रचंड अशा हिमालयातून दर्याखोर्या, पहाड पालथे घालताना़ हे सारं नकळत आस्ते आस्ते आत उतरत, झिरपत राहतं. कोणी मुद्दाम म्हणून शिकवायची, सांगायची गरजही पडत नाही. हाच बहुधा 'सत्यं, शिवं, सुंदरा'चा साक्षात्कार. सुंदर, आणि कल्याणदायक, हितकारक सत्य. नैसर्गिक. जराही अशुद्धाचा मागमूस नसलेला आणि चिरकाल टिकून राहील, असा.
हिमालय म्हणजे अक्षय, अखंड आनंदाचा स्रोत आहे. पहाडांच्या उतारांवर उभी असणारी आणि मैलोनमैल पसरलेली, हिरव्या रंगातील अनेक छटांची उधळण करणारी जंगलं अनुभवणं आणि त्या जंगलांमधून वाट काढत ट्रेकचा रस्ता पार करणं, हा दर वेळीच एक विलक्षण अनुभव असतो. त्यांच्या आठवणी आनंदाने आणि सुखाने मनात जपायच्या. व्हॅलीमधला मखमाली शेवाळाने नखशिखांत मढलेला, नावालाही लाकडाची एखादी वाळकी काडीसुद्धा न दिसणारा, शेवाळाबरोबरच अंगाखांद्यावर दाट पर्णराजी बाळगून असलेला आणि सकाळच्या मृदू सोनसळी किरणांनी न्हाऊन निघालेला वृक्षराज. काश्मिरातल्या गगनगीरातलं सणसणीत उंचीवरचं आणि पहाडांच्या तीव्र उतारांवरलं घनदाट काळपट हिरवं जंगल, दुगलबिट्टातून तुंगनाथाकडे जाताना ठायीठायी भेटलेले, अस्ताव्यस्त पसरलेले, कवेतही न येणारे अवाढव्य वृक्ष. बागी नावाच्या खेड्यातून पराशर मुनींच्या स्थानापाशी पोहोचण्यासाठी केलेला दाट जंगलातून केलेला उभ्या चढणीचा प्रवास.. चुन्नी गावातून निघून देवरिया ताल ह्या ठिकाणी पोहोचताना केलेला जंगलातला प्रवास.. कितीतरी आठवणी .. हिमालयातल्या जंगलांनी आपल्या गर्द आठवणींचं छ्त्र माझ्या माथ्यावर, मनावर कायमसाठी धरलेलं आहे.
झाडा-वृक्षांचं स्वतःचं एक जग असतं, म्हणे. हर्मन हेसं म्हणतो, Trees are sanctuaries. खरंच आहे. हिंदी भाषेत sanctuariesना 'शरणस्थान' हा एक चपखल शब्दप्रयोग आहे. हिमालयात अमाप हिरवी माया ल्यालेले वृक्ष पाहताना आणि वाटा चालताना थकून ह्या वृक्षांच्या सावलीत टेकताना त्यांना शरणस्थान का म्हणायचं ते उमजतं. चालून चालून पायांचे तुकडे पडलेले असतात. पाठीवर कितीही कमी ओझं असलं तरी ते एका क्षणी खूप वाटायला लागलेलं असतं आणि अचानक चालताना एखाद्या वळणापाशी किंवा समोरच रस्त्यावर एखादा एकांडा वृक्ष किंवा एखादं जंगल किंवा छोटीशी वनराई सामोरी येते. थकव्याने जळशीळ झालेलं मन क्षणार्धात हलकं होतं. हिरव्या रंगाच्या पोपटी सोनेरी बाळछ्टेपासून सावळ्या हिरव्या रंगाच्या परिपक्व छटा आस्ते आस्ते पांथस्थाला अंतर्बाह्य शांतवतात. अजस्र बुंध्याचा खडबडीत स्पर्श टोचणारा नसतो, मायेने जवळ घेणारा, आश्वासक असतो. घरच्या म्हातार्या लोकांच्या खरखरीत पण मायाळू हातांची आठवण होते. वृक्ष जणू त्याच्या न दिसत्या हातांनी पण ऐसपैस पसरलेल्या अस्तित्वाने कवेत घेतो. वृक्षाच्या बुंध्याशी शरीर सैलावतं, मन विसावतं. 'झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया' ही ओळ मनातून उमटते.
जंगलांमधून फिरताना पावलोपावली सौंदर्य उलगडतं. अलगद खाली उतरणारे सूर्यकिरण, एखाद्या पक्ष्याची 'मी आहे सोबतीला' सांगणारी शीळ, वृक्षांवर उमटलेली मखमाली शेवाळी, त्याच्या बुंध्या-पायथ्याशी उमललेली रानफुलं. एखाद्या पहाडावरून स्तब्ध उभी असलेली वृक्षराजी पाहताना मला उगाच भरून येतं. कशासाठी युगानुयुगं ते वृक्ष असे उभे असतील, असं वाटतं. जिथे मनात येतं तिथे थांबून हळूच जाऊन एखाद्या वृक्षाला, त्याच्या खोडाबुंध्याला कव घालत मी माझ्या दुबळ्या मिठीत घ्यायचा प्रयत्न करते. जमत नाही, पण वृक्षराज माझ्या रागलोभांसकट मला स्वीकारतो आहे, असं वाटत राहतं. त्याच्या रंध्रारंध्रात भरलेली आश्वासक ऊर्जा आणि शांतता माझ्यात झिरपत राहते. थोड्या वेळाने माझ्या पुढच्या मार्गावर चालण्यासाठी मला शक्ती मिळते. सोबतीला वृक्ष आणि पाण्याचे स्रोत असतील, तर कितीही लांब वाटचाल आनंददायी आठवण ठरते.
ह्या सार्याबरोबरच हिमालयातच काय, जगात कुठेही फारसा ताण न घेता वावरण्यासाठी, कोणत्याही प्रसंगात डोकं शांत ठेवत, त्यातून मार्ग काढण्यासाठी एक मंत्र जपायला शिकायचा. एकदम सोपा मंत्र आणि तो म्हणजे "कोई दिक्कत नहीं!" हिमालयात राहणार्या, जे आहे त्यात समाधानी असणार्या, सतत हसतमुखाने वावरणार्या आणि आजूबाजूच्या निसर्गाइतकीच निर्मळ मनं असलेल्या हिमालयातल्या प्रत्येक व्यक्तीकडून ह्या मंत्राची दीक्षा मला मिळालेली आहे. ह्या साध्यासुध्या पण प्रभावी मंत्राचं महत्त्व अगदी शंभर काय, दोनशे टक्के मला कळलंय, वळवायचे प्रयत्न मात्र अथक आणि सतत करावे लागत आहेत! इतकी वर्षं अंगी भिनलेल्या माझ्या शहरी जाणिवा कदाचित इतक्या लवचीक नसाव्यात. इथल्या स्थानिकांचा मात्र हा अजपाजप!
समजा, बस वेळेवर आली नाही, तर त्याला पहिलं उत्तर असतं - कोई दिक्कत नहीं, आ जायेगी| मग वाट बघायची किंवा रस्ता चालू लागायचा अथवा शक्य असल्यास दुसरं वाहन बघायचं, पण चिडचिड करायची नाही. कुठे भूस्खलन झालं, उत्तर? कोई दिक्कत नहीं, साफ हो जायेगा| बीआरओवालेही त्यांचं काम इमानेइतबारे करतात, कधी कधी वेळ लागतो. तोवर काय करायचं? तोवर शांतपणे त्या निसर्गाचाच भाग बनून एखाद्या ठिकाणी ठिय्या द्यायचा, बिडीकाडी करायची, शिळोप्याच्या गप्पा मारायच्या. रस्ता बंद आहे, पूल खचला आहे, एखादी व्यक्ती कुठे पोहोचायचं तिथे पोहोचू शकली नाही, कोणासाठी काही मदत येणार होती, ती वेळेत पोहोचली नाही आणि अशा कित्येक आणि प्रत्येक समस्येला पहिलं उत्तर काय, तर ते आहे 'कोई दिक्कत नहीं!' साक्षात झेनची परमावधी. समस्येचा मुकाबला कसा करायचा, तो पुढील विचार, पण त्याही आधी कोणत्याही समस्येला कोई दिक्कत नहीं हे तीन शब्द सोपे बनवून टाकतात. समस्या एकदम आवाक्यातली वाटायला लागते. उत्तर सापडेल अशी आशासुद्धा वाटायला लागते!
सुंदर पण लहरी निसर्गाशी जु़ळवून घेत आनंदाने जगायचं असेल, आयुष्य सुसह्य, सोपं बनवायचं असेल तर ताण घेऊन कसं चालेल? थोडंसं जुळवून घेत, दोन पावलं पुढे जात, गरज असल्यास एक पाऊल मागे घेत, पुन्हा संधी मिळते तसं पुढे चालायचं. तेच तर करत असतात इथले स्थानिक. ही माणसं रोजच्या आयुष्यातही जगण्यासाठी करत असलेले कष्ट, त्यांचे लहानसहान ते मोठे संघर्ष, त्यातूनही सतत पुढे जायची वृत्ती पाहिली की हटकून 'तेथे लव्हाळी वाचती' उक्तीची आठवण येते. पुन्हा सतत हसतमुख! अगत्यशील, आतिथ्यशील आणि सौम्य प्रवृत्तीच्या इथल्या स्थानिकांविषयी आपलेपणा वाटायला वेळ लागत नाही. कित्येकदा - नव्हे नेहमीच, ट्रेक करतानाचा अनुभव आहे की सामोरी येणारी व्यक्ती हटकून हसतमुखाने नमस्ते म्हणणार, अतिशय आत्मीयतेने २-४ शब्द बोलणार. एखादी गृहिणी चहा घेतेस का, पानी पिओगी? म्हणून थांबवणार. एखादी आजी चटचट पाय उचलायचा प्रेमळ सल्ला देणार. "बस, चलते रहना, जरूर पहूंच जाओगे", "बस, थोडाही आगे हैं अब" असं उत्साह आणि धीर वाढवणारं काही बोलणार. इथल्या स्थानिकांच्या निखळ प्रेमाचं दर्शन मला फार आश्वस्त करून जातं. त्यांचा अंगभूत प्रामाणिकपणा आणि नि:स्वार्थी स्वभाव नेहमीच चकित करतो. कधीकधी वाटतं, आ़जूबा़जूच्या वातावरणाचा माणसाच्या स्वभावावर काही प्रमाणात प्रभाव पडत असला पाहिजे. भव्य हिमालयाच्या सान्निध्यात येथील सर्वसामान्य स्थानिकांची मनंही मोठी होत असली पाहिजेत. ह्याच कारणासाठी पूर्वीच्या काळी ऋषिमुनी येथील वातावरणात येऊन राहत असतील का? सतत शुद्धाच्या सहवासात राहून माणसाच्या मनावरील राग, लोभ, लोभ, मोह अशांसारख्या भावना, लालसा, वासना यांची पुटं गळून पडत असावीत का? आयुष्य अधिक सोपं होत असावं का आणि आपुला संवाद आपणासी होण्याची सुरुवात होत असावी?
हिमालयात वा त्याच्या आवतीभोवती वावरताना हे असं सारं चिंतन मनातल्या मनात घडत राहतं. नेहमीच्या चिंता, त्रास, त्याबद्दलचे विचार जरा मागेच पडतात. अंतर्मुख व्हायला होतं. प्रगाढ शांतता अनुभवताना, अंतर्मनाशी संवाद साधताना, आपण इतर वेळी शब्द, साधनं, सोयी ह्यांची उधळपट्टी करण्यात कळत-नकळत किती हातभार लावतो, ह्याची जाणीव क्षणागणिक अधिकच बोचरी होत राहते. प्रत्येक वास्तव्यात खूप सारे आनंददायी आणि काही बोचरे क्षण पदरात टाकत माझ्यातलं माणूसपण टिकवायला, ते अधिक पक्कं करायला हिमालय मला त्याच्या सर्व साधनांनिशी मदत करत राहतो, त्याच्या पहाडांदर्यांनद्यांफुलांपानांजंगलांवाटांसकट आणि त्याच्या माणसांसकट. दर वेळी, अधिक उत्साहाने, अधिक आत्मीयतेने.
हिमालयाकडे पुन्हा पुन्हा परतून जाण्यासाठी मला इतकं कारण पुरेसं ठरतं. हिमालयातला एक मुक्काम सरत आला की पुढल्या मुक्कामासाठी कुठे जायचं, किती दिवसांसाठी जायचं ह्याचे आराखडे, अंदाज मनातल्या मनात जुळायला लागतात. हिमालयातून परतणार्या पावलांना, पुन्हा एकदा हिमालयातल्या जंगलातल्या, दर्याखोर्यांतल्या, पहाडांतल्या वाटांवरून चालण्याची स्वप्नं पडायला सुरुवातही झालेली असते.
हिमालयात पुन्हा पुन्हा परतून जाण्यातलं सुख मला कधीचं गवसलेलं आहे.
***
प्रकाशचित्रे ऋणनिर्देश : दीपतेश घोष, मोहित बहल आणि पुनित तिवारी.
प्रतिक्रिया
6 Nov 2018 - 4:55 pm | नंदन
लेख. हिमालय हा स्वतः अनुभवण्याचाच प्रकार आहे - पण असोशीने, उत्कटपणे तो अनुभव वाचकापर्यंत पोचवणं; हे उत्तम लेखनाचं मर्म. ते ह्या लेखात साधलं गेलं आहे.
अगदी, अगदी. दिव्यत्वाची जेथ प्रचीती!
6 Nov 2018 - 5:04 pm | यशोधरा
लिखाण पोचल्याचा खूप मनापासून आनंद आहे!
हॅप्पी दिवाळी म्हणे. :)
6 Nov 2018 - 8:49 pm | पद्मावति
सहज सुरेख, ओघवती लेखनशैली. अप्रतिम लेख.
फोटोज तर थक्क करणारे आहेत. अफाट सुंदर.
6 Nov 2018 - 9:08 pm | अनिंद्य
@ यशोधरा
हिमालयाचं रौद्रभीषण सौंदर्य शब्दात मावणे कठीण, पण तुमचे हे शब्दचित्र फारच सुंदर जुळून आले आहे. शब्द आणि चित्रांचा मणिकांचन योग जणू !
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया'....... वृक्ष हे मानवाचं शरणस्थान हा दाखला मला विशेष भावला.
7 Nov 2018 - 9:01 am | यशोधरा
हो, वृक्ष वल्ली आम्हां सोयरी सारखं. :)
6 Nov 2018 - 9:44 pm | तुषार काळभोर
खरंय! फोटो इतके भारी आहेत, प्रत्यक्ष हिमालयाची भेट वेड लावणारी असणार यात शंका नाही!
6 Nov 2018 - 11:59 pm | नाखु
अंतर्नाद दाखवत केलेलं लिखाण.
मैय्या आपण कधी रक्ततपासणी केली तर लालपेशी,पांढर्या पेशी या चक्क हिमपेशी असतील याची ज्याम खात्री आहे.
हिमालय वाचणं, अनुभवून तो पचवणं तरीही मी रिताच आहे हेही विनम्र पणे लक्षात ठेवणं निव्वळ ध्यासदर्दी व्यक्ती चे काम
पर्वती पायरी पाशीच थबकलेला नाखु पांढरपेशा
7 Nov 2018 - 12:29 am | अभ्या..
लाडक्याचे वर्णन, तेही तितकेच लाडाने केलेले. मग काय बोलायाचे.
जियो.
7 Nov 2018 - 9:00 am | यशोधरा
सर्व वाचक आणि प्रतिसादकर्त्यांचे खूप आभार!
सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा!
7 Nov 2018 - 10:01 am | टर्मीनेटर
अप्रतिम लेख आणि त्याला सुंदर फोटोंची जोड.
हे फार आवडलं...
लाडक्याच्या सौंदर्याची आणखीन एक झलक.
7 Nov 2018 - 10:37 am | वरुण मोहिते
फोटो तर छान आहेतच पण लिखाण त्याहून छान आहे. हिमालयाबद्दल च्या सगळ्या भावना उतरल्या आहेत लेखातून. सुंदर.
7 Nov 2018 - 1:53 pm | सस्नेह
स्वर्गतुल्य फोटो आणि हृदयाचा वेध घेणारे शब्द.
यशो भाग्यवंत ! इतका महान सांगाती लाभला..!!
7 Nov 2018 - 4:29 pm | अनन्त्_यात्री
शब्दचित्र!
7 Nov 2018 - 6:23 pm | प्रचेतस
तुम्ही आणि हिमालय. दोघांचं अतूट नातं आहे.
लिहित राहा.
7 Nov 2018 - 10:22 pm | मुक्त विहारि
नशीबवान आहात.
आमच्या नशीबात काही काही गोष्टी नाहीत, त्यात हिमालय पण आलाच...
7 Nov 2018 - 10:22 pm | मुक्त विहारि
लेख आवडला..
7 Nov 2018 - 10:23 pm | प्रचेतस
अगदी हेच.
8 Nov 2018 - 9:26 am | यशोधरा
असे का बरं? तुम्ही व्यवस्थित आखणी करून जाऊच शकता हिमालयात. तिथे जायचे म्हणजे शिखरे पादाक्रांत करायची वा ट्रेक करायचे असे नाही. अशा कित्येक जागा आहेत की जिथे तुम्ही आराम करू शकता, आसपास निरुद्देश भटकू शकता... निवांत राहू शकता.
कधी जाता सांगा..
8 Nov 2018 - 2:41 am | पिवळा डांबिस
सुंदर लिखाण, आवडलं.
8 Nov 2018 - 6:25 am | सुधीर कांदळकर
चित्रे, विलोभनीय विचार आणि मोहक मांडणी. लाजबाब.
कोई दिक्कत नही, निसर्गाचाच भाग बनून ठिय्या द्यायचा - ग्रेट, वाचून माझ्याकडची देखील संपदा वाढली.
धन्यवाद.
8 Nov 2018 - 6:56 am | प्राची अश्विनी
शुभ्र काही जीवघेणे.. लिहिलंयस!
माझ्या नशिबात कधी योग आहे तोच जाणे.
8 Nov 2018 - 8:33 am | नूतन सावंत
यशो, किती भाग्यवान तू आणि तितकेच भाग्यवाण आम्हीही.तुझ्या डोळ्यांनी पाहिलेला हिमालय आम्हाला दिसला, तुझ्या हृदयाच्या तळापर्यंत झिरपलेला हिमालय आमच्याही हृदयाच्या गाभ्यात झिरपून एक आगळेच सुख देऊन गेला.तुझं आतल्या आवाजासह केलेलं हे कथन आणि सोनेपे सुहागा म्हणवणारी प्रकाशचित्रे खिळवून ठेवतात.
या सर्व निखळ आनंदासाठी तुला धन्यवाद देऊ इच्छित नाही.
8 Nov 2018 - 9:29 am | यशोधरा
आपल्या आपल्यात धन्यवाद वगैरेची गरजच नाही :) तुला आवडले, ह्याचाच मला आनंद आहे!
प्रकाशचित्रकारांपर्यंत तुझी आणि सर्वांचीच दाद पोहोचवेन नक्की!
8 Nov 2018 - 6:41 pm | स्वाती दिनेश
हिमालय. त्याचं वेड लागतं.
ह्या वाक्यातच सगळं सार आहे.:)
तुझा लेख मनाच्या आतपर्यंत पोहोचला. खूप सुंदर!
स्वाती
9 Nov 2018 - 10:44 am | सविता००१
लेख आणि फोटो दोन्हीही जबरदस्त.
कधी पाहीन कोण जाणे.
आतपर्यन्त पाझरत गेला ग हिमालय
9 Nov 2018 - 11:48 pm | शैलेन्द्र
वा, सुरेख
10 Nov 2018 - 5:27 pm | सोंड्या
७ आणि ९ क्रमांकाचे फोटो निव्वळ अप्रतिम
10 Nov 2018 - 9:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
शब्दाशब्दातून हिमालयाबद्दलचं प्रेम झिरपत आहे ! हिमालयाच्या प्रेमात न पडणारी व्यक्ती विरळा... त्याहून विरळा असं ते शब्दबद्ध करणे !
फोटो तर सरळ शब्दांच्या स्वप्निल जगात घेऊन जाणारे... डोळे थंड झाले !
वरून ६व्या चित्रातली खोल दरी आणि तिच्या पायथ्यातून वाहणारी नितळ निळ्या ताशीव संगमरवराची नदी अलगद जुन्या आठवणींत घेऊन गेली.
अजून काय लिहायचे ?!
10 Nov 2018 - 9:30 pm | यशोधरा
ती जडगंगा आहे काका. गंगोत्रीला पोहोचायच्या आधी हरसिल पाशी वाहणारी गंगा.
11 Nov 2018 - 10:11 pm | डॉ सुहास म्हात्रे
हिमालयाच्या पश्चिमेकडील भागात हिमाचलच्या पुढे जायचा योग अजून आला नाही. तो फोटो पाहून, पूर्वेकडील, न्यू जलपायागुडी ते गंगटोक रस्त्याच्या बाजून वाहणार्या तीस्ता नदीची आठवण आली... अगदी तश्याच खोल दरीतून वाहणारी तीस्ता, तिच्या काठावर असलेल्या रस्त्यावरून प्रवास करताना खूप वेळ साथ देते.
11 Nov 2018 - 6:08 am | फारएन्ड
फोटो आणि वर्णन, दोन्ही आवडले!
12 Nov 2018 - 11:33 am | दुर्गविहारी
अप्रतिम मुक्तक! खुपच आवडला धागा. फोटो बघून ईनोच जहाज मागवत आहे. :-)
13 Nov 2018 - 7:50 pm | मित्रहो
हिमालयाविषयीच्या भावना खूप छान शब्दात व्यक्त केल्या आहेत. खूप सुंदर.
खूप छान फोटो.
17 Nov 2018 - 10:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हिमालय. त्याचं वेड लागतं.
खरंय....! लेखातील छायाचित्रे खूप सुंदर आणि वर्णनही एक वाचक म्हणून मोहवून टाकणारे आहे, पुन्हा कोई दिक्कत नही वाला माणसांचा अॅटीट्युड तर खूपच आवडला. बाकी, आपलं हिमालय प्रेम जगजाहीर आहे, दर दहा वाक्यानंतर सहज गप्पात तुमचं हिमालय प्रेम उचंबळून येतं, हेही अनेकांना माहिती आहे, त्यामुळे त्याच्याशी होत असलेल्या गुजगोष्टी, मनकी बाते, मुक्तक, आणि तहेदिलसे त्यावर असलेलं प्रेम आणि त्याबद्दलचं मनोगत खूप आवडलं. लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
17 Nov 2018 - 2:32 pm | ज्ञानोबाचे पैजार
महाराष्ट्रात जसा सह्याद्री वेड लावतो तसा उत्तरेकडचा हिमालयही लावतो.
मनापासून लिहिलेले असल्याने लेख आवडलाच पण त्याहूनही जास्त प्रकाशचित्रे आवडली. नजरच हटत नव्हती पुढचा लेख वाचण्यासाठी.
पैजारबुवा,
17 Nov 2018 - 3:04 pm | यशोधरा
प्रकाशचित्रकारांपर्यंत आपलं कौतुक जरूर पोहोचवेन.
19 Nov 2018 - 12:31 am | जुइ
हे मी सुद्धा अनुभवले आहे. ऐकूनच या लोकांचा लाघवी स्वभाव भावतो आणि त्यांचे हिंदीही कानाला तितकीच गोड वाटते! फोटो आवडले हे वेगळे सांगायला नको.
1 Dec 2018 - 12:45 pm | राघव
वाह.. त्याचं दर्शनच आल्हाददायक! आपण आपोआपच नतमस्तक होतो त्याच्यासमोर.
ते दर्शन परत घडवल्याबद्दल धन्यू!!
अवांतर:
तो तुझा कॅमेरा बदललास की काय?
अतीअवांतरः
चला.. ईनो घेऊन यायला पाहिजे राघवा.. काय समजलास? ;-)
1 Dec 2018 - 2:07 pm | यशोधरा
प्रकाशचित्रे माझी नाहीयेत राघवा. लिहिले आहे तसे. :)
1 Dec 2018 - 1:59 pm | चित्रगुप्त
विलक्षण सुंदर, उत्कट लेखन. लिहीण्याची प्रबळ ऊर्मी आल्यावर ती झिंग ओसरत नाही तोवरच लिहून काढले तरच असे लिहीणे जमते, असे मला वाटते. तुमचा काय अनुभव आहे ?
1 Dec 2018 - 2:12 pm | यशोधरा
धन्यवाद. मला सहसा एकटाकी लिहायची सवय आहे, सुचते तसे लिहित जाते. क्वचित किरकोळ बदल करते. हे हिमालयाबद्दलचे विचार सतत घोळत असतातच डोक्यात. हे खरं तर लिहायचा बरेच दिवस कंटाळा केला होता.... :)
26 Jan 2019 - 4:39 pm | नजदीककुमार जवळकर
अप्रतिम !!
26 Jan 2019 - 10:08 pm | स्वलिखित
वर्णन आवडल्या गेले आहे