गुलाब पाक
दिवाळी पहाट असावी, वातावरणात गुलाबी थंडी असावी. अभ्यंगस्नानाची लगबग चालू आहे. सुगंधी तेल, उटणे आणि साबण यांचा वास घरात दरवळत आहे. जोडीला खास असे अत्तरही आहे. या सर्व सुगंधांबरोबरच काही गोड खायला मिळाले तर काय बहार येईल नाही? तर मग जाऊ या थोडे लांब... तिकडे कच्छ गुजरातमध्ये. अं... गोंधळलात? कच्छमध्ये काय आहे? प्रसिद्ध असे विशाल कच्छचे रण आहे, मिठागरे आहेत, सुबक सुंदर अशी जैन मंदिरे आहेत आणि हो, विसरून कसे चालेल? चटकदार अशी कच्छी दाबेली आहे.
आपण मात्र कच्छ येथील एक वेगळा प्रकार या दिवाळीत खाऊन बघू. नाव आहे 'गुलाब पाक'. मग लागा तर तयारीला. काय काय घ्याल?
- दीड लीटर म्हशीचे दूध (होल मिल्क)
- पाऊण वाटी साखर
- १ वाटी गुलाबाच्या पाकळ्या
- खायचा पिवळा रंग चिमूटभर
- ३-४ थेंब गुलाब इसेन्स
- सजावटीसाठी बदाम-पिस्त्यांचे बारीक काप.
तयारी तर झाली, तर मग आता लागा कामाला. प्रथम एका मोठी कढईत दूध घालून ते आटवायला गॅसवर ठेवा. दूध आटवायला ठेवून मग अधूनमधून ते हलवत राहा, नाहीतर इतर कामांच्या धांदलीत ते खाली कढईला लागायचे ;-) .
दूध आटून अर्धे झाले की मग त्यात साखर, रंग, गुलाबाच्या पाकळ्या आणि इसेन्स घाला. सर्व नीट हलवून दूध आणखी आटू द्या.
आता दूध जसे जसे आटू लागेल, तसे घरभर गुलाबाचा सुगंध दरवळू लागेल. ओह, फक्त सुगंधानेच भूक चाळवली वाटते!! पण म्हणतात ना - 'सब्र का फल मीठा होता है.' त्यामुळे धीर धरा आणि दूध अगदी घट्ट होऊ द्या. दूध आटून गोळा (खवा) होऊ लागेल.
आता गॅस बंद करून एका ताटलीला तुपाचा हात लावून घ्या. त्यावर खव्याचा गोळा हाताला तूप लावून लगेच थापून घ्या. वर सजावटीचे पिस्ते-बदाम पेरून घ्या. हे काम करताना उगीच हातचे राखू नये ;-). अहो, मग खाताना आतून बर्फी मुलायम तर लागावीच, शिवाय थोडा क्रंचही हवाच, नाही का:-) .
आता साधारण २५-३० मिनिटे बर्फी सेट होऊ द्या. फ्रीजमध्येही ठेवायला हरकत नाही. सेट झाल्यावर आपल्याला हव्या तशा कापून घ्या.
आता वाट कसली बघताय? या दिवाळीत आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रपरिवारासह सुवासिक आणि मुलायम गुलाब पाकाचा आस्वाद घ्या.
ता. क. वेळ अन श्रम वाचवायला दुधाऐवजी थेट खवा वापरावा :-).
सर्व मिपाकरांना आणि वाचकांना दिवाळीच्या सुगंधित शुभेच्छा!!!!!!!!!!
प्रतिक्रिया
6 Nov 2018 - 11:50 am | यशोधरा
वा! भारी!
6 Nov 2018 - 12:51 pm | तुषार काळभोर
एकदम झक्कास!
6 Nov 2018 - 6:11 pm | पलाश
नवीन आणि मस्त पाककृती. नावपण आवडलं.
6 Nov 2018 - 6:51 pm | सविता००१
गुलाबाच्या पाकळ्यांचा रंग तर अफाट सुरेख आहे.
गुलाब पाक नक्की मस्तच लागत असणार.
करून पाहणार
7 Nov 2018 - 10:05 am | नूतन सावंत
मस्त,मस्त.वेगळाच प्रकार समजला.नक्की करून पाहीन.
7 Nov 2018 - 1:40 pm | स्वाती दिनेश
छानच दिसत आहे बर्फी..
गुलाबपाक हे नाव पण खूप आवडलं.. एकदम फेस्टिव नाव आहे,:)
स्वाती
7 Nov 2018 - 1:48 pm | चित्रगुप्त
मस्त दिसते आहे. करून बघूच आता.
7 Nov 2018 - 4:56 pm | टर्मीनेटर
छान रेसीपी.
हि सूचना आमच्या सौभाग्यवतींना फार रुचली आहे.
7 Nov 2018 - 9:37 pm | कंजूस
झकास.
7 Nov 2018 - 9:39 pm | कंजूस
आम्ही कुलफी करतो त्यात गुाबपाकळ्या टाकून बघु.
24 Nov 2018 - 1:01 am | जुइ
हा बदलही रुचकर लागेल!
8 Nov 2018 - 2:03 am | रुपी
सुरेख! फोटो मस्तच आलेत.
या पाकृसाठी गावठी गुलाब लागतो, की इकडचा बिनवासाचाही चालेल?
8 Nov 2018 - 2:24 am | जुइ
धन्यवाद रुपी.
हो, या पाकृसाठी गावठी गुलाब लागतो.
तो इथे मिळत नसल्यानेच गुलाबाचा इसेन्स वापरला आहे.
9 Nov 2018 - 1:48 pm | चांदणे संदीप
कहर!
Sandy
9 Nov 2018 - 2:23 pm | अभ्या..
शाही कारभार झालाय बघा वैनी.
दिलखुश रेसिपी एकदम.
फोटो पण एकदम टेम्प्टिंग आलेत. शेवटून दुसरा फोटो तर पार एक्पर्ट फूड फोटोग्राफरांच्या स्टैलीत. मस्तच मस्त.
10 Nov 2018 - 10:44 pm | लौंगी मिरची
आहा , फारच सुंदर दिसतय हे .
नक्कि करुन पाहिन जुइ :)
10 Nov 2018 - 10:58 pm | मुक्त विहारि
मस्त..
11 Nov 2018 - 3:15 am | पद्मावति
आह्हा!! खुप सुरेख. करुन पाहीन गं नक्की.
11 Nov 2018 - 5:26 pm | नंदन
छान दिसतोय हा पदार्थ, फोटोही खासच.
(गेल्या वर्षीच्या अंकात, तुम्ही 'दौलत की चाट' ह्या अनोख्या पदार्थाची माहिती दिली होती. दूध/मलई/खवा यांच्यावर आधारित, निरनिराळ्या प्रांतांतल्या पाककृती ह्या निमित्ताने माहीत होत आहेत.)
14 Nov 2018 - 4:12 am | निशाचर
सुरेख! फोटोही आवडले.
14 Nov 2018 - 2:56 pm | पद्मावति
गेल्या वर्षीच्या अंकात, तुम्ही 'दौलत की चाट' ह्या अनोख्या पदार्थाची माहिती दिली होती. दूध/मलई/खवा यांच्यावर आधारित, निरनिराळ्या प्रांतांतल्या पाककृती ह्या निमित्ताने माहीत होत आहेत.
खरंय अगदी. काय अल्टिमेट पाककृती होती ती सुद्धा. जियो जुइ!15 Nov 2018 - 2:23 pm | अनिंद्य
हेच म्हणायचे होते.
दोन्ही वर्षी जुइ यांनी दिलेल्या पाककृती राजस सुकुमार !
गुलाब पाक सारखीच देशी गुलाबांच्या पाकळ्या असलेली तिळाची वडी राजस्थानच्या दौऱ्यात खायला मिळाली आहे.
अवांतर - लेख मे कच्छी दाबेली की याद क्यों दिलायी जालिम :-))
16 Nov 2018 - 8:54 pm | मदनबाण
जबराट... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Akh Lad Jaave... :- Loveyatri
24 Nov 2018 - 12:59 am | जुइ
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे मनःपूर्वक धन्यवाद! तसेच साहित्य संपादकांनी या पाककृतीला मिपा दिवाळी अंका मध्ये समाविष्ट केल्याबद्दल त्यांचेही आभार.