क्रॅश लँडिंग

सौन्दर्य's picture
सौन्दर्य in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

क्रॅश लँडिंग

त्याचं असं झालं की काही दिवसांपूर्वी हिच्याबरोबर ह्युस्टनच्या एका मॉलमध्ये शॉपिंगला गेलो होतो. हिला काहीच घ्यायचं नव्हतं, निदान घरून निघताना तरी तसं ती म्हणाली होती. मला एखाद दोन शर्ट्स, मिळाल्यास जीन्स वगैरे घ्यायची इच्छा होती. हिला जरी काहीही घ्यायचं नव्हतं, तरी स्त्रियांच्या कपड्यांच्या एका दुकानातून दुसऱ्या दुकानात, दुसऱ्यातून तिसऱ्यात भर दुपारच्या उन्हात हिचं फिरणं चाललं होतं आणि माझी फरपट. भर दुपारच्या उन्हात अशासाठी म्हटलं कारण हा मॉल मोठ्या इमारतीत नसून एखाद्या मोठ्या बाजारासारखा होता. एका दुकानातून बाहेर पडल्यावर दुसऱ्या दुकानात शिरताना दुपारच्या कडक उन्हाचा सामना करावा लागत होता. बरं, हिला काहीही घ्यायचं नव्हतं तरी स्त्रियांच्या दुकानात आपण का जात आहोत? हे विचारायची सोय नव्हती - नव्हे, कोणत्याही पुरुषाला तशी ती नसतेच म्हणा. अगदी ‘भीक नको पण कुत्रा आवर' अशी माझी स्थिती झाली होती, पण ते असो.

अशीच मजल दरमजल करता करता शेवटी एकदाचं अपेक्षित दुकान आम्हाला दिसलं. मोठ्या उत्साहाने आम्ही आत प्रवेश केला. आतल्या थंड वातावरणाने हायसं वाटलं. नवीन कोऱ्या करकरीत कपड्यांचा वास, त्यात हवेत फवारलेले सुगंधी सेंट्स, आत आधीच असलेल्या स्त्री-पुरुषांनी शरीरावर धारण केलेली विविध परफ्यूम्स ह्यांचा एक संमिश्र आणि हवाहवासा दरवळ सर्वत्र पसरला होता.

“हाय, आय अॅम अँजेलिना, हाऊ मे आय हेल्प यू?” आत शिरताशिरताच एक सुंदर, तरुण सेल्सगर्ल पुढे आली, सुहास्य वदनाने आमचं स्वागत करून विचारती झाली.

“हाय अँजेलिना, आय अॅम संजय, वाँट टू बाय कपल ऑफ शर्ट्स” मी वेळ न दवडता सांगून टाकलं. त्यावर ती आम्हाला पुरुषांच्या सेक्शनमध्ये घेऊन गेली व विविध रंगाचे, डिझाइन्सचे शर्ट्स दाखवायला लागली. बाजूलाच स्त्रियांचं सेक्शन होतं, ते दिसताच एखादा चकवा लागल्यासारखे हिचे पाय आपोआपच त्या दिशेला वळले, आणि मी मनातल्या मनात देवाचे आभार मानले.

मला जे काही विकत घ्यायचं असतं, त्याची पूर्ण रूपरेखा माझ्या डोक्यात पक्की असते. त्यामुळे त्यात कोणाचीही - अगदी हिचीदेखील ढवळाढवळ मला पसंत नसते. ही स्त्रियांच्या सेक्शनमध्ये निघून गेल्यामुळे आता मी माझ्या आवडीप्रमाणे कपडे घ्यायला मोकळा होतो, त्यात ही सुंदरी मला मदत करणार होती, त्यामुळे ‘सोने पे सुहागा' अशी माझी स्थिती झाली होती. अँजेलिना चांगली उंच, शिडशिडीत बांधा असलेली गोरीपान तरुणी होती. वय तिशीच्या आसपास असावं. निळी जीन्स, पांढरा टॉप व त्यावर घेतलेल्या लाल स्कार्फमुळे ती अगदी एखादी मॉडेल दिसत होती. पिंगट कुरळे केस, निळसर घारे डोळे तिचं व्यक्तिमत्त्व अधिकच खुलवत होते. वागण्या-बोलण्यातला आपलेपणा अगदी लोभसवाणा होता.

“संजे, हॅव आय प्रोनाउन्स्ड युअर नेम करेक्टली?” अँजेलिनाने अगदी मधाळ स्वरात विचारलं.

“ओह, या, परफेक्ट, रादर यू आर द फर्स्ट पर्सन टू प्रोनाउन्स इट करेक्टली.” बिचारी माझं नाव उच्चारायचा प्रयत्न करत होती, हेच खूप होतं आणि त्यात मला कोणाचाही हिरमोड करणं आवडत नाही.

“वेल संजे, दॅट्स फंटॅस्टिक, थँक्यू, व्हॉट्स द साइझ यू आर लुकिंग फॉर?”

“यू नो अँजेलिना, आय अॅम नॉट शुअर, बट इट इज 42 ऑर सो”

“नॉट अ प्रॉब्लेम, लेट मी चेक युअर साइझ” म्हणत तिने टेप काढून माझ्या गळ्याभोवती गुंडाळली.

“या, इट्स 42, लेट मी मेझर युअर आर्म्स." "ओह, दे आर 25 इंच लाँग, लाँगर देन द नॉर्मल”

“हो आहेतच माझे हात लांब, अजानुबाहू, त्या महाभारतातल्या अर्जुनासारखे” हे मात्र मनातल्या मनात म्हटलं आणि दुसरं म्हणजे आता हिला अर्जुन, महाभारत वगैरे समजावायला घेतलं असतं, तर घरी गेल्यावर रामायण घडलं असतं हे नक्की. बायको कितीही दूर असली, तरी तिचा एक डोळा नेहेमी नवर्‍यावर असतो, हे मी आत्तापर्यंतच्या अनुभवावरून समजून चुकलो होतो, आणि ही तर ह्याच दुकानात होती. पण ते काहीही असलं, तरी आमचं विमान आता टेक ऑफ घ्यायच्या तयारीत होतम.

“मे आय नो कलर यू प्रिफर, संजे”

“ओह, आय लाइक ब्लू, एनी शेड्स ऑफ ब्ल्यू”

“हाऊ वंडरफुल संजे, माय फेव्हरेट कलर इज अल्सो ब्ल्यू” - तिचं प्रत्येक ‘संजे’ म्हणणं अंगावर रोमांच फुलवीत होतं. त्यात तिचा आणि माझा आवडता रंग एकच निघाल्यामुळे नाही म्हणायला आणखी थोडी जवळीक निर्माण झाली होती. विमानाने आता धावपट्टीवर वेग घेतला होता.

“हाऊ अबाउट धिस ब्ल्यू? ऑर धिस? धिस वूड गो व्हेरी वेल विथ युअर ब्युटिफुल ब्ल्यू आइज” असं म्हणत तिने पटापट तीन-चार शर्ट्स उचलून मला दाखवले. त्यातला एक तर माझ्या पाठीला शोल्डर टू शोल्डर लावूनदेखील दाखवला. माझे ब्युटिफुल ब्ल्यू आईज तिच्या नजरेत भरले होते व तिचम रूप मला भारावून टाकत होतं. तिच्या त्या पुसटशा स्पर्शाने पुन्हा एकदा अंगावर रोमांच आणि छातीत धडधड. छातीत धडधड अशासाठी की हिने जर पाहिलं, तर छातीची धडधड कायमची थांबेल ह्याची खातरी होती, म्हणून.

खरं सांगू? एवढ्या प्रेमाने तर हिनेही कधी माझ्यासाठी कपडे खरेदी केले नव्हते. नवरा जितका गबाळा व ‘आउट ऑफ डेट’ दिसेल तितक्या बायका खूश असतात, हे मला आतापर्यंतच्या माझ्या व मित्रांच्या अनुभवावरून कळून चुकलं होतम. खूश अशासाठी की आता ह्या ध्यानाकडे कोणतीही डोळस स्त्री बघणार नाही ह्याची त्यांना खातरी असते. तर ते असो. पाठीला लावलेला शर्ट मला काही दिसत नव्हता, तरी अँजेलिनाच्या उत्साहावर विरजण घालणं माझ्या जिवावर आलम होतं, त्यामुळे तो शर्ट बाय डिफॉल्ट घ्यायचा असं मी ठरवलं. विमान धावपट्टी सोडून आता हवेत विहरायला लागलं होतं. उगाचच, 'आज कल पाँव जमीं पर नहीं पड़ते मेरे' गाणं कानात गुणगुणायला लागलं.

“संजे, वूड यू लाइक टू गो फॉर धिस शर्ट टू? इट वूड गो व्हेरी वेल विथ यू" आणखी एका शर्टाची घडी मोडत अँजेलिनाने विचारलं. आता त्या शर्टाचा रंग मनात भरला की अंजूचं ते आर्जवाने विचारणं, ते विचारू नका. थोडक्यात तो शर्टदेखील बाय डिफॉल्ट सदरात जमा झाला.

“ओह, हाऊ नाइस ऑफ यू संजे, यू हॅव रिअली अ वंडरफुल सिलेक्शन. कॅन आय शो यू समथिंग डिफरंट?” तोच मधाळ स्वर आणि विमान गिरक्या घेऊ लागलं.

“ओह, शुअर, व्हाय नॉट..” बोलून तर गेलो खरा, पण माझे दोन शर्ट्स विकत घेऊन झाले होते. आता ते कसे दिसत होते? मला शोभत होते का? साइझ बरोबर होती का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची किंमत काय होती? काही म्हणजे काही लक्षात नव्हतं. स्वर्गीय सौंदर्य बरोबर असताना असले प्रापंचिक हिशोब एखादा अरसिकच ठेवू शकतो, हो की नाही?

“हे, हाऊ अबाउट अ टाय, अॅम शुअर यू विल नीड वन” असं म्हणत तिने एक टाय उचलला. आता आली का पंचाईत? आयुष्यात टाय पहिल्यांदा लग्नात घातला होता, जो एका मित्राने बांधून दिला होता. नंतरच्या आयुष्यात दोन-तीन टाय नेहमीसाठी बांधून ठेवले होते, जे एखाद्या हारासारखे गळ्यात घालत असे. आता हिच्यासमोर फजिती होणार हे निश्चित होतं. माझ्या होकार-नकाराची वाट न पाहता तिने एक टाय उचलला, बॉक्समधून काढून एखाद्या सराइतासारखी माझ्या गळ्याभोवती टाकून जवळ येऊन टाय बांधू लागली. आता मात्र मला घाम फुटला. ह्या क्षणी हिने जर मला पाहिलं, तर तोच टाय माझ्या गळ्याभोवतीचा फास बनणार हे नक्की होतं. मी चोरून ही आसपास कुठे दिसते का ते पटकन पाहून घेतलं. नशिबाने ती तिच्या दुनियेत बिझी होती. निश्चिंत होऊन मी टाय बांधून घेऊ लागलो. तिचं ते निकट येणं, तिच्या नाजूक बोटांचा तो मुलायम स्पर्श, तो मधाळ स्वर, अंगावर काळ्या मुंग्या हुळहुळायला लागल्या होत्या. विमान आता उंच ढगांवर पोहोचलं होतं.

“हे संजे, विथ धिस टाय, यू लुक एक्झॅक्टली लाइक माय डॅड! ही इज ऑफ सेम हाइट अॅज यू अँड हॅज सेम ब्ल्यू आइज, संजे, यू रिमाइंडेड मी ऑफ माय डॅड.”

……………….
……………………
…………………………….
…………………………………….

पुढच्याच क्षणी आमचं विमान क्रॅश लँडेड.

H

दिवाळी अंक २०१८

प्रतिक्रिया

एकविरा's picture

6 Nov 2018 - 4:13 pm | एकविरा

धत्त

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Nov 2018 - 4:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =))

मुक्त विहारि's picture

6 Nov 2018 - 4:28 pm | मुक्त विहारि

एकदम खूसखूशीत लेख...

तुषार काळभोर's picture

6 Nov 2018 - 5:37 pm | तुषार काळभोर

ओ काका!!

q

सिरुसेरि's picture

6 Nov 2018 - 5:58 pm | सिरुसेरि

हा हा हा . मजेशीर लेख .

Nitin Palkar's picture

6 Nov 2018 - 6:44 pm | Nitin Palkar

मजेशीर...

टर्मीनेटर's picture

7 Nov 2018 - 2:23 pm | टर्मीनेटर

गमतीशीर.

“संजे, हॅव आय प्रोनाउन्स्ड युअर नेम करेक्टली?”

असा अनुभव तर कित्येकदा घेतलाय, माझं संजय हे नाव आज पर्यंत एकाही गौरवर्णीयाने व्यवस्थित उच्चारलं नाहीये :)

यशोधरा's picture

7 Nov 2018 - 2:34 pm | यशोधरा

हा हा हा !! =)))

मित्रहो's picture

7 Nov 2018 - 9:16 pm | मित्रहो

विमान उडता उडता टेक ऑफ व्हायच्या आधीच क्रॅश लँडींग.

मस्त मजेशीर लेख

माझीही शॅम्पेन's picture

8 Nov 2018 - 1:04 pm | माझीही शॅम्पेन

एकदम खुसखूषीत लेख , प्रचंड आवडला , असे पोपट जर वारंवार होत असतील तर काकागिरी कडे वाटचाल झाली असं समजायचं बरका :)

Jayant Naik's picture

8 Nov 2018 - 2:08 pm | Jayant Naik

साधा प्रसंग सुद्धा छान रंगवला आहे.

गामा पैलवान's picture

8 Nov 2018 - 6:41 pm | गामा पैलवान

अहो सौंदर्य,

कथा मस्तंय. पण शेवटचं वाक्य वाचून कपाळावर हात मारून घेतला.

अहो, हे काय क्रॅश लँडिंग आहे का? साधारणत: मुली बापाच्या नजरेतनं परपुरुषाकडे बघतात. तुम्हांस तिनं ड्याड म्हंटलं तो क्षण पकडून रॉकेटची दुसरी स्टेज फायर सहज करता अली असती. संपलेली स्टेज जाउद्या लँडिंगच्या वाटेने! :-D

आ.न.,
-गा.पै.

टाय नको पण कॉम्प्लिमेंट आवर असे झाले असणार 'संजे' ला :-) :-)

सविता००१'s picture

9 Nov 2018 - 10:38 am | सविता००१

केवळ उच्च ..
मस्त मज्जा आली वाचताना

कानडाऊ योगेशु's picture

9 Nov 2018 - 3:30 pm | कानडाऊ योगेशु

टाय टाय फिस्स.... अनुभव अगदी खुशखुशीत शैलीत लिहिला आहे.

हा हा मस्त !
पुढच्या वेळी क्रश च्या क्रॅश लँडिंग ऐवजी बेली लँडिंग साठी शुभेच्छा :)

मंजूताई's picture

10 Nov 2018 - 6:26 am | मंजूताई

:)

नमकिन's picture

10 Nov 2018 - 2:45 pm | नमकिन

खरं म्हणजे इथे एक गिरकी घेत अलगद हात धरलास तरी वारू विहारत तरंगत गेले असते लांब संध्याकाळी इंधन भरायला.
निदान सासरे असतील तर जरा पहा आणि शिका चार गोष्टी म्हणजे बायकोला इतकं टरकून रहावे लागणार नाही.

जुइ's picture

11 Nov 2018 - 12:29 am | जुइ

खुमासदार आणि अगदी खुसखुशीत लेख!

फ्रेनी's picture

11 Nov 2018 - 9:49 am | फ्रेनी

हा हा
मजेशीर =))

दुर्गविहारी's picture

11 Nov 2018 - 9:47 pm | दुर्गविहारी

मस्तच डँडी. ;-)

सौन्दर्य's picture

12 Nov 2018 - 8:37 am | सौन्दर्य

लेख आवडल्याचे कळविल्याबद्दल सर्वच प्रतिसादकर्त्यांचे आभार. काकागिरीकडे वाटचाल सुरु झालीच आहे पण अजून मुक्कामाला पोहोचलो नाही त्यामुळे असं क्रॅश लँडिंग झालं. पुढच्या वेळेसाठी (जर तशी वेळ आलीच तर) तुमच्या खास सूचना ध्यानात ठेवीन. पुन्हा एकदा सर्वांचे आभार.

प्राची अश्विनी's picture

12 Nov 2018 - 10:32 am | प्राची अश्विनी

:) आवडला लेख.

सौन्दर्य's picture

18 Nov 2018 - 7:27 am | सौन्दर्य

लेख आवडल्याचे कळविल्याबद्दल आभार.

एमी's picture

18 Nov 2018 - 3:50 pm | एमी

लॉल :D