मेजर मार्टिनचे युद्ध

अरविंद कोल्हटकर's picture
अरविंद कोल्हटकर in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

मेजर मार्टिनचे युद्ध

मार्च १९४३च्या पुढेमागे युरोपामधले दुसरे महायुद्ध ऐन भरामध्ये होते आणि अजूनही दोन्ही पक्ष समबल आहेत असे वाटत होते. जर्मनीची सोविएत संघाच्या प्रदेशात मुसंडी ओसरू लागल्याची कोणतीच खूण दिसू लागली नव्हती. त्या फेब्रुवारीमध्ये स्तालिनग्रादच्या लढाईत जर्मन सैन्याला पराभवाला तोंड द्यावे लागले होते, पण मार्चमध्ये तिसर्‍या खार्कोवच्या लढाईमध्ये रेड आर्मीला खार्कोव शहर गमवावे लागले होते. इजिप्तपासून अल्जिअर्सपर्यंत उत्तर आफ्रिकेचा संपूर्ण किनारा आता दोस्त सैन्यांच्या ताब्यामध्ये होता. दोस्त सैन्यांचे ह्यापुढील पाऊल म्हणजे विन्स्टन चर्चिलने ज्याचे the soft underbelly of Europe असे वर्णन केले होते, अशा युरोपच्या दक्षिण भागामध्ये प्रवेश करणे हे उघड होते, पण कोठे? इटली, बाल्कन प्रदेश आणि फ्रान्सचा दक्षिण किनारा ह्या सर्व शक्यता दिसत होत्या. पण ह्यापैकी कोठेही चाल केली, तर जर्मन बाजूकडून तीव्र प्रतिकाराची खातरी होती आणि म्हणून चाल कोठे होणार ह्याचा अंदाज शत्रुपक्षाला लागून न देणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट होती.
३० एप्रिलच्या सकाळी स्पेनच्या दक्षिण-पश्चिम प्रदेशातील वेल्वा (Huelva) शहर आणि त्याच नावाच्या नदीच्या परिसरातील समुद्रामध्ये काही स्पॅनिश मच्छीमार मासेमारी करीत होते. त्यांना समुद्रामध्ये एक मृतदेह तरंगताना दिसला. जवळच्याच एका मोटरबोटीने त्या शवाला पाण्यातून बाहेर काढले. मृतदेह एका तरुण ब्रिटिश अधिकार्‍याचा होता. आपल्या ट्रेंचकोटावर त्याने एक पूर्णपणे हवा भरलेले Mae West म्हणतात ते लाइफ जॅकेट घातले होते. त्याच्या एका हातात काळ्या रंगाची कातड्याची एक ब्रीफकेस होती आणि ती लाइफ जॅकेटच्या पट्ट्याला बांधलेली होती. मृतदेहाच्या जवळच, हवा भरून फुगविलेली एक होडी उलट्या अवस्थेत तरंगत होती. युद्धकाळामध्ये अनेक विमानांमध्ये सुरक्षिततेच्या साधनसामग्रीचा भाग म्हणून अशा बोटी बरोबर ठेवल्या जात असत.
मृतदेह किनार्‍यावर आणला गेला आणि जवळच कवायत करत असलेल्या सैन्यतुकडीच्या एका अधिकार्‍याच्या ताब्यात देण्यात आला. त्या अधिकार्‍याने स्पॅनिश नौदलाच्या कायदा विभागात काम करणार्‍या अन्य एका अधिकार्‍याकडे मृतदेह आणि त्याच्याबरोबर मिळालेल्या गोष्टी सुपुर्द केल्या. तेथून मृतदेह जवळच्याच वेल्वा शहरामध्ये शवागाराकडे पाठविण्यात आला. त्याची रीतसर वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर डॉक्टरने असा निष्कर्ष जाहीर केला की मृत व्यक्ती जिवंत असतानाच समुद्रामध्ये पडली आणि पाण्यामध्ये बुडाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. देह पाण्यामध्ये ५ ते ८ दिवस तरंगत असावा आणि ज्या विमानातून तो प्रवास करीत होता ते विमान अपघाताने समुद्रात कोसळले असावे. मृत व्यक्तीने विमानातून बाहेर पडून लाइफ जॅकेट आणि बोट हवेने फुगवून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला असावा, पण तो यशस्वी न झाल्याने अखेरीस त्याला मृत्यू आला असावा.
मृतदेहाबरोबर मिळालेल्या कागदपत्रावरून आणि त्याच्या आयडेंटिटी कार्डावरून त्याची ओळखही पटली. ब्रिटिश रॉयल मरीन्सचा मेजर विल्यम मार्टिन असे त्याचे नाव होते. लहान चणीच्या आणि स्वच्छ दाढी केलेल्या मेजर मार्टिनचे वय ३६ वर्षे होते. त्याच्याबरोबरच्या कागदातील एका पासवरून असे दिसले की व्हाइस अ‍ॅडमिरल लॉर्ड लुई माउंटबॅटन ह्यांच्या नेतृत्वाखाली अलीकडेच निर्माण करण्यात आलेल्या Combined Operations Headquartersमध्ये मेजर मार्टिन हा स्टाफ ऑफिसर म्हणून कार्यरत होता. त्याच्या खिशामध्ये मिळालेल्या अन्य कागदांची आणि चिठोर्‍यांची तपासणी केली असता - आणि स्पॅनिश अधिकार्‍यांनी असे न करण्याची हयगय निश्चित केली नसणार - मृताबद्दल आणखी बरीच माहिती मिळविता येणे शक्य होते. तो पिकॅडिलीमधील Naval and Military Clubचा तात्पुरता (Temporary) सदस्य होता. लॉइड्स बँकेमध्ये त्याचे खाते होते आणि खात्यामध्ये 75£ 19s 2d इतका ओव्हरड्राफ्ट होता. विल्टशरमध्ये राहणार्‍या पॅम नावाच्या तरुण मुलीबरोबर त्याचे प्रेमसंबंध होते. तिच्या पत्रांवरून असे दिसत होते की ती त्याच्या पूर्णपणे प्रेमात पडलेली होती. खिशातल्याच तिच्या फोटोवरून असे दिसत होते की ती दिसायला सुंदर होती. लंडन सोडण्यापूर्वी थोडेच दिवस बाँड स्ट्रीटवरील Messers S.J.Phillips ह्या दुकानातून त्याने 53£ 0s 6d इतक्या किमतीला तिच्यासाठी एक हिर्‍याची अंगठी खरीदली होती.
मेजर मार्टिनने हातामध्ये धरलेल्या आणि सोनेरी सील असलेल्या काळ्या कातड्याच्या ब्रीफकेसमधले कागद आणखीनच लक्षवेधी होते. त्या कागदांमध्ये एक कागद होता अ‍ॅडमिरल माउंटबॅटन ह्यांनी अ‍ॅडमिरल कनिंगहम ह्यांना लिहिलेले एक वैयक्तिक पत्र. अ‍ॅडमिरल कनिंगहम हे भूमध्य समुद्रामधील नौदलाच्या कारवायांचे प्रमुख होते आणि हे सांगण्याचा पत्राचा हेतू होता की माउंटबॅटन ह्यांच्याकडून कनिंगहम ह्यांना मेजर मार्टिन ह्यांची सेवा उसनी दिली जात आहे, अशासाठी की मेजर मार्टिन हे शत्रूकडून प्रतिकार होत असताना सैनिक किनार्‍यावर उतरविण्यासाठी वापरात आणायच्या बोटींविषयक खास तज्ज्ञ आहेत. ’मला ते परत हवेत’ - अ‍ॅडमिरल माउंटबॅटन लिहितात आणि गमतीने असेही वाक्य त्याला जोडतात की ’परत येताना ते Sardines घेऊन येतील अशी आशा आहे, इथे Sardines पॉइंट्सवरच मिळतात.’ युद्धकाळात प्रत्येक चीज रेशनवरच मिळत असे, हा संदर्भ येथे आहे.
ह्या पत्रामध्ये आणखीही एक विनंती होती. अ‍ॅडमिरल माउंटबॅटन लिहितात - ’I promised VCIGS that Major Martin would arrange with you for the onward transmission of a letter he has with him for General Alexander. It is very urgent and very 'hot' and as there are some remarks in it that could not be seen by others in the War Office, it could not go by signal. I feel sure that you will see that it goes on safely and without delay.'
उल्लेखिलेले हे पत्र जनरल आर्ची नाय (Archie Nye, Vice Chief of the Imperial General Staff) ह्यांनी जनरल सर हॅरॉल्ड अलेक्झँडर ह्यांना लिहिलेले होते. जनरल अलेक्झँडर हे ह्या वेळेस 18th Army Group, North Africaचे प्रमुख होते. पत्र असे होते -
Telephone: Whitehall 9400 War Office
Chief of the Imperial Whitehall
General Staff London SW 1
23 April 1943
PERSONAL AND MOST SECRET
My dear Alex,
I am taking advantage of sending you a personal letter by hand of one of Mountbatten's officers to give you the inside history of our recent exchange of cables about Mediterranean operations and their attendant cover plans. You may have felt our decisions were somewhat arbitrary, but I can assure you in fact that the COS Committee gave the most careful consideration both to your recommendation and to Jumbo's.
We have had recent information that the Boche have been reinforcing and strengthening their defences in Greece and Crete and CIGS felt that our forces for the assault were insufficient. It was agreed by the Chiefs of Staff that the 5th division should be reinforced by one Brigade Group for the assault on the beach south of Cape Araxos and that a similar reinforcement should be made for the 56th Division at Kalamata. We are earmarking the necessary forces and shipping.
Jumbo Wilson had proposed to select Sicily as cover target for 'Husky' ; but we have already chosen it as cover for operation 'Brimstone'. The COS Committee went into the whole question exhaustively again and came to the conclusion that in view of the preparations in Algeria, the amphibious training which will be taking place on the Tunisian coast and the heavy air bombardment which will be put down to neutralize the Sicilian airfields, we should stick to our plan of making over for 'Brimstone' — indeed, we stand a very good chance of making him think we will go for Sicily — it is an obvious objective and one about which he must be nervous. On the other hand, they felt there wasn't much hope of persueding the Boche that the extensive preparations in the Eastern Mediterranean were also directed at Sicily. For this reason they have told Wilson his cover plan should be something nearer the spot, e.g. the Dodecanese. Since our relations with Turkey are now so obviously closer the Italians must be pretty apprehensive about these islands.
I imagine you will agree with these arguments. I know you will have your hands more than full at the moment and you haven't much chance of discussing future operations with Eisenhower. But if by any chance you do want to support Wilson's proposal, I hope you will let us know soon, because we can't delay much longer.
I am very sorry we weren't able to meet your wishes about the new commander of the Guards Brigade. Your own nominee was down with a bad attack of 'flu and not likely to be really fit for another few weeks. No doubt, however, you know Foster personally; he has done extremely well in command of a brigade at home, and is, I think, the best fellow available.
You must be about as fed up as we are with the whole question of war medals and 'Purple Hearts'. We all agree with you that we don't want to offend our American friends, but there is a good deal more to it than that. If our troops who happen to be serving in one particular theatre are to get extra decorations merely because the Americans happen to be serving there too, we will be faced with a good deal of discontent among those troops fighting elsewhere perhaps just as bitterly — or more so. My own feeling is that we should thank the Americans for their kind offer, but say firmly it would cause too many anomalies and we are sorry we can't accept. But it is on the agenda for the next Military Members
meeting and I hope you will have a decision very soon.
Best of luck,
Yours ever,
Archie Nye
General the Hon. Sir Harold R. L. G. Alexander,
CGB, CSI, DSO, MC
Headquarters,
18th Army Group
भूमध्य समुद्र

हे पत्र खरोखरच वर्णिल्याप्रमाणे very hot म्हणता येईल असेच होते. ग्रीसच्या दक्षिण-पश्चिमेकडील पेलोपोनीज (Peloponnese) भागावर उत्तर आफ्रिकेतून करायच्या हल्ल्यांचा, तसेच कॉर्सिका/सार्डीनिया बेटांवर करण्याच्या हल्ल्यांचा - Operation Brimstone - येथे स्पष्ट उल्लेख होता आणि सिसिलीवरील हल्ला हा Operation Brimstoneवरून शत्रूचे लक्ष वळविण्यासाठी वापरला जाईल अशीही सूचना होती. पेलोपोनीज हा ग्रीसचा भाग इटलीच्या पूर्वेस आहे आणि कॉर्सिका/सार्डीनिया बेटे इटलीच्या पश्चिमेस आहेत. सिसिली हा इटलीचा सर्वात दक्षिणेस असलेला भाग आहे.
मृत व्यक्ती मेजर मार्टिन आहे आणि तो ब्रिटिश आहे असे दिसल्यावर स्पॅनिश अधिकार्‍यांकडून मृतदेह वेल्वा शहरातील ब्रिटिश व्हाइस-कॉन्सलकडे सुपुर्द करण्यात आला आणि त्यानंतरच्या दिवशी स्पॅनिश प्रतिनिधींच्या साक्षीने लष्करी सन्मानाने त्याचे दफन करण्यात आले. मेजर मार्टिन हा रॉयल मरीन्सचा अधिकरी असल्याने माद्रिदमधील ब्रिटिश वकिलातीमधील नौदलाच्या प्रतिनिधीकडे त्याच्याबाबतचा रिपोर्ट पाठविण्यात आला आणि त्याच्याकडून तो लंडनला रवाना झाला.
ह्या रिपोर्टांमध्ये मेजर मार्टिन घेऊन जात असलेल्या महत्त्वाच्या पत्रांबद्दल काहीच खुलासा नव्हता. लंडनकडून ब्रिटिश व्हाइस-कॉन्सलला सूचना आली की असे काही महत्त्वाचे कागद ब्रीफकेसमध्ये होते आणि स्पॅनिश अधिकार्‍यांना त्यातील मजकुराचा कसलाही अंदाज लागू न देता व्हाइस-कॉन्सलने ते परत मिळवावेत. कालानुक्रमाने १३ मे ह्या दिवशी मेजर मार्टिनबरोबरची ब्रीफकेस आतील कागदांसह स्पॅनिश अधिकार्‍यांकडून ब्रिटिश वकिलातीमधील नौदलाच्या प्रतिनिधीकडे येऊन पोहोचली. १५ मेच्या दिवशी ब्रीफकेस लंडनला येऊन पोहोचली. तिच्यावरील सील शाबूत होते, पण काळजीपूर्वक परीक्षणानंतर असे स्पष्ट झाले की ती उघडून आतील पत्रे वाचण्यात आली होती आणि ब्रीफकेस पुन: सील करण्यात आली होती.
स्पॅनिश हुकूमशहा जनरल फ्रँको जर्मनीच्या दबावापुढे न झुकता युद्धाबाहेर तटस्थ राहिला होता. पण जर्मनीला आणि इटलीला हेरगिरीसाठी स्पेनचा उपयोग करून देणे, जर्मनीच्या आणि इटलीच्या मदतीसाठी स्पॅनिश स्वयंसेवक पाठविणे अशा कृत्यांमधून त्याचा कल कोणत्या बाजूला होता हे स्पष्ट झाले होते. स्पॅनिश अधिकार्‍यांनी मेजर मार्टिनजवळची पत्रे वाचल्यानंतर त्यांतील मजकूर जर्मनांकडे जाऊन पोहोचणार, हे उघड होते. वेल्वा शहरामध्ये अतिशय चाणाक्ष असा एक जर्मन हेर आहे, हे ब्रिटिशांना माहीत होते. मेजर मार्टिनचे शव सापडल्याची बातमी अपेक्षेप्रमाणे त्याच्यापर्यंत लगेचच पोहोचली आणि आपल्या स्पॅनिश दोस्तांच्या मदतीने मेजर मार्टिनजवळचे कागद वाचण्यात त्याला यश आले. जर्मन हेरखात्याचा प्रमुख ग्रँड अ‍ॅडमिरल डोनिट्झ, अन्य उच्च जर्मन अधिकारी आणि हिटलर यांच्यापर्यंत त्यातील hot बातमी विनाविलंब पोहोचली.
युद्ध संपल्यानंतर जर्मन हेरखात्याची जी कागदपत्रे विजेत्यांच्या हाती पडली, त्यांमध्ये मेजर मार्टिन घटनेचेही कागद होते. त्यावरून असे दिसले की १) हे कागद विश्वासार्ह आहेत की आपली दिशाभूल करण्यासाठी आपल्या हातामध्ये पाडण्यात आले आहेत अशी जर्मनांना शंका आलेली होती, पण चर्चेअंती कागद विश्वासार्ह आहेत असा निष्कर्ष काढण्यात आला होता. २) त्यांना शंका इतकीच आलेली होती की सिसिलीवरील हल्ला हा सार्डीनिया/कॉर्सिका आणि पेलोपोनीज ह्या दोन्ही विभागातील हल्ले झाकण्यासाठी असेल का एकाच हल्ल्यासाठी. सार्डीनियावर हल्ला होणार असे जर्मनांना निश्चितीने वाटण्यामागे माउंटबॅटनच्या पत्रातील सार्डिन्सवरचा विनोद कारणीभूत ठरला होता. जर्मन हेरखाते मेजर मार्टिनच्या कागदांची चर्चा करण्यात गुंतले होते, ह्यालाही अप्रत्यक्ष दुजोरा मिळाला, कारण जर्मन गुप्त संदेशांच्या देवाणघेवाणीमध्ये लक्षणीय वाढ जाणवली.
सार्डीनिया/कॉर्सिका आणि पेलोपोनीज ह्या दोन्ही विभागातील अपेक्षित हल्ल्यांना तोंड देण्यासाठी जर्मनांनी सिसिली भागातून मोठ्या प्रमाणात सैन्य आणि अन्य साधनसामग्री ह्या दोन विभागांकडे पाठविली. प्रत्यक्षात दोस्त सैन्यांनी ९-१० जुलैला सिसिली बेटावर हल्ला करून ६ आठवड्यांमध्ये ऑगस्ट १७पर्यंत सिसिली मोहीम पूर्ण केली. अशा रितीने दोस्त सैन्याचा इटलीमध्ये प्रवेश होऊन त्यातून मुसोलिनीचे पतन झाले आणि जर्मन सैन्याचा एक महत्त्वाचा भागीदार नष्ट झाला. ह्या मोहिमेमुळे दोस्त नौसेनांना आता भूमध्य समुद्रामध्ये पश्चिम-पूर्व समुद्री मार्ग मोकळे झाले. दुसर्‍या महायुद्धाच्या अखेरीचा हा प्रारम्भ होता - the beginning of the end - असे म्हणता येईल.
ज्या झाडाला हे फळ लागले, त्याचे बी ह्यापूर्वी सुमारे सहा महिने रुजविले गेले होते. ब्रिटिश नौदलाच्या हेर विभागामधील एक अधिकारी ले.कमांडर ईवन मॉंटेग्यू ह्यांच्या कामाचा एक भाग शत्रूच्या मनामध्ये खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती बिंबविणे असा होता. १९४२च्या अखेरीस असे दिसू लागले होते की दोस्त सैन्याला आता इटलीमध्ये घुसावे लागणार आणि ते काम सिसिलीमधून करावे लागणार. हल्ला सिसिलीमध्येच होईल हे धरूनच शत्रूही तेथेच आपली ताकद एकवटणार. हे करण्यापासून शत्रूला परावृत्त कसे करायचे आणि हूल देऊन त्याचे लक्ष दुसरीकडे कसे वळवायचे, हा प्रश्न होता. माँटेग्यू आणि सहकारी ह्या प्रश्नावर अडकले असता ’मेजर मार्टिन’ ह्या कपोलकल्पित व्यक्तिमत्त्वाने माँटेग्यूच्या मनात मूळ धरले. मृत्यूनंतर फार दिवस न झालेल्या तरुण व्यक्तीचे प्रेत मिळवायचे, त्या प्रेताला मेजर मार्टिनचे नाव द्यायचे, दिशाभूल करणारी माहिती त्याच्याबरोबर द्यायची आणि ती माहिती जर्मनांपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था करायची आणि हे सर्व करताना ते अशा प्रकारे करायचे की शत्रूला ह्या दिशाभूलीची शंका येऊ नये. डॉ. बर्नार्ड स्पिल्सबरी ह्या प्रख्यात पॅथॉलॉजिस्टचा सल्ला घेऊन असे ठरले की बुडून मेलेल्या अथवा नैसर्गिक कारणांनी मृत्यू पावलेल्या तरुणाचे प्रेत ह्या कामी वापरता येईल.
ग्लिन्डोर मायकेल किंवा मेजर मायकेल मार्टिन

थोडी शोधाशोध केल्यावर असे एक प्रेत मिळाले. Glyndwr Michael - ग्लिन्डोर मायकेल नावाच्या एका वेल्श तरुणाचे ते प्रेत होते. सुमारे ३३ वर्षांचा हा तरुण कामधंद्याशिवाय भटकत होता आणि न्यूमोनियामुळे त्याचा मृत्यू झाला होता. न्यूमोनियामुळे त्याच्या छातीत पाणी भरले होते. त्याच्या नातेवाइकांनी ह्या कामासाठी मृतदेह कमांडर माँटेग्यूच्या ताब्यात द्यायला संमती दिली आणि मृतदेह कोल्ड स्टोअरेजकडे पाठविण्यात आला. ह्यानंतर मृतदेहाला एक जिवंत भूतकाळ देण्याच्या कामाला सुरुवात झाली. तत्पूर्वी वरिष्ठ अधिकार्‍यांशी सल्लामसलत करून त्यांच्याचकडून हवी तशी पत्रे तयार करून घेण्यात आली.
मेजर मार्टिनचे ओळखपत्र

रॉयल मरीन्स अधिकार्‍यांच्या यादीत ३३-३४च्या आसपास वय असलेले बरेच ’मार्टिन’ होते. कोणी खोलात जायचे ठरविलेच, तर त्याला गोंधळात टाकण्यासाठी हे नाव उत्तम होते आणि म्हणून विल्यम मार्टिन निर्माण झाला. आता त्याला I-card द्यायला हवे. पण प्रेताचा चेहरा ह्या कामासाठी अजिबात चालला नसता. चांगल्या नशिबाचा भाग असल्यासारखा मृताच्या चेहर्‍याशी बरेच साम्य असलेला एक माणूस कमांडर माँटेग्यूंना एका जागी दिसला आणि त्याला त्याचा फोटो देण्यासाठी तयार केले गेले. मेजर मार्टिन थोडासा विसराळू आणि ढिला आहे असे सूचित करण्यासाठी त्याचे I-card हे मूळ कार्ड हरविल्यामुळे त्याला पुन: देण्यात आले, असा शेरा कार्डावर लिहिण्यात आला. महत्त्वाच्या पत्रांची ब्रीफकेस त्याच्या हाताला बांधून का ठेवण्यात आली ह्याचेही उत्तर आपोआपच मिळाले. पॅमसाठी त्याने विकत घेतलेल्या अंगठीची खरेदी पावती, क्लबच्या सदस्यत्वाचे कागद, बँकेचे ओव्हरड्राफ्टचे पत्र असे सटरफटर कागदपत्र मेजर मार्टिनला भरीवपणा देण्यासाठी तयार करण्यात आले आणि ते पुन:पुन: हाताळून आवश्यक तो जुनेपणा त्यांना देण्यात आला.
मेजर मार्टिनचे व्यक्तिमत्त्व असे तयार होत असतानाच त्याला त्याच्या पूर्वनियोजित ’मोहिमे’वर कसे पाठवायचे, ह्याचीही चर्चा चालू होती. स्कॉटलंडच्या पश्चिम किनार्‍यावरील फर्थ ऑफ क्लाइडच्या परिसरातील होली लॉक ह्या बंदरात उभी असलेली पाणबुडी नौका ’सेराफ’ हिच्यावर मेजर मार्टिनच्या अखेरच्या प्रवासाची जबाबदारी देण्याचे निश्चित झाले. मेजर मार्टिनला एका लांब पिंपात घालून आणि त्याच्या आसपास ड्राय आइस भरून मॉंटेग्यू आणि त्याचे दोन सहकारी लंडनहून ह्या प्रवासाला निघाले आणि रात्रभर प्रवास करून १८ एप्रिलच्या दिवशी मेजर मार्टिनला त्यांनी ’सेराफ’च्या हवाली केले. ती पाणबुडी १९ एप्रिलला बंदरातून निघाली आणि पूर्वयोजनेनुसार ३० एप्रिलच्या पहाटेच्या अंधारात वेल्वा नदीच्या मुखापासून मैलभर अंतरावर ती पाणबुडी पाण्यातून वर आली. तिच्या कप्तानाने आणि अन्य दोन जणांनी मेजर मार्टिन आणि त्याची छोटी बोट ह्यांना लांब पिंपातून बाहेर काढले आणि एका छोट्या प्रार्थनेनंतर मेजर मार्टिन आपल्या नियोजित कार्यासाठी पाण्यावर उतरला. त्याच्या मागोमाग त्याची बोटही पाण्यामध्ये उलटी उतरली. हे अखेरचे कार्य करणार्‍या तीन जणांपैकी एकाच्या शब्दात - ’A gentle push and the unknown warrior was drifting inshore with the tide on his last momentous journey. Major Martin had gone to war.'
कालांतराने ९ एप्रिलला दोस्त सैन्य सिसिलीमध्ये उतरले. जर्मन/इटालियन पक्षाकडून विशेष प्रतिकार झाला नाही आणि मेजर मार्टिनने आपले काम चोख बजावले होते, असा जुलैच्या दुसर्‍या आठवड्यातअंदाज येऊ लागला. किती चोख हे कळायला युद्धाचा शेवट यावा लागला. जर्मन नौदलाची कागदपत्रे विजेत्या सैन्याच्या ताब्यात आली आणि तेव्हा त्यांना अंदाज लागला की जर्मन नौदलाचे उच्च अधिकारी आणि स्वत: हिटलर हे मेजर मार्टिनने वर्तविलेल्या भविष्य़ावर किती विसंबून होते!
(आधार: 'Nine Lives - True Spy Stories' by Fitzroy Maclean)

H

दिवाळी अंक २०१८

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

6 Nov 2018 - 9:38 am | प्रचेतस

उत्कृष्ट लेख.
मेजर मार्टिनबद्दल अजिबातच माहिती नव्हती.

तुषार काळभोर's picture

6 Nov 2018 - 2:04 pm | तुषार काळभोर

हाडामाणसाच्या शूरवीरांनी शौर्य गाजवल्याची, सैन्यासाठी बलिदान केल्याची अगणित उदाहरणे सापडतील.
अस्तित्वात नसलेल्या मृत मेजर मार्टिनचं कर्तृत्व आगळंच!

प्राची अश्विनी's picture

12 Nov 2018 - 11:03 am | प्राची अश्विनी

+१११

सुधीर कांदळकर's picture

6 Nov 2018 - 6:29 pm | सुधीर कांदळकर

हे पटले. मस्त. आवडले, धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

6 Nov 2018 - 11:28 pm | मुक्त विहारि

आवडला...

यशोधरा's picture

7 Nov 2018 - 9:23 am | यशोधरा

हे काहीच माहिती नव्हते. प्रथमच वाचले!
रंजक लिखाण.

मार्गी's picture

7 Nov 2018 - 10:23 am | मार्गी

वा! मनोरंजक माहिती!

टर्मीनेटर's picture

7 Nov 2018 - 11:46 am | टर्मीनेटर

लेख आवडला.

सुरेख माहिती . Identity theft वाचले होते. ऐथे तर नसलेली identity वापरली .

भटक्य आणि उनाड's picture

11 Nov 2018 - 11:35 pm | भटक्य आणि उनाड

if anyone is interested in reading complete details of this case, its in the book Operation Mincemeat by Ben Macintyre. Awesome Read..

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Nov 2018 - 10:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

रोचक माहिती !

चांदणे संदीप's picture

13 Nov 2018 - 2:05 pm | चांदणे संदीप

ह्या वर्षीचा मिपाचा दिवाळी अंक म्हणजे खरंच मेजवानी आहे!

Sandy

रंगासेठ's picture

13 Nov 2018 - 3:58 pm | रंगासेठ

ही माहिती पहिल्यांदाच वाचली. एक उत्तम चित्रपट पण बनू शकतो यावर.

पद्मावति's picture

13 Nov 2018 - 7:06 pm | पद्मावति

अत्यंत रोचक माहीती.

मन१'s picture

14 Nov 2018 - 9:14 am | मन१

मस्त माहिती.
काहिसे ह्याच धर्तीवर दुसर्‍या माहायुद्धातल्या एका इरसाल इसमाबद्दल मिपावर हे धागे आहेत --
https://www.misalpav.com/node/25241
.
https://www.misalpav.com/node/25242
.
अर्थात ते जरासे घाई गडबडित, पुरेसं संकलन -संपादन न करताच लिहिले होते, पण ह्या धाग्यावरुन ते आठवले.

श्रीरंग_जोशी's picture

14 Nov 2018 - 10:06 am | श्रीरंग_जोशी

मेजर मार्टिनचा किस्सा एकदमच रंजक. लेखनशैली खूप आवडली.

तसेच लेख वाचताना मनोबांचे जोन पुजोल गार्शिया बाबतचे लेखन आठवले :-) . प्रतिक्रिया देण्यास जरा विलंब झाला.

दुर्गविहारी's picture

14 Nov 2018 - 3:45 pm | दुर्गविहारी

कथा यापूर्वी वाचलेली होती. त्याच्या प्रेयसीचा फोटोही असाच पैदा केला गेला आणि प्रेमपत्र लिहून ते विल्यमने पुन्हा पुन्हा वाचले यासाठी त्या पत्राची वारंवार घडी केली गेली. ईतक्या बारीकसारीक गोष्टींची काळजी घेतल्यानेच जर्मन्स फसले. बाकी "युध्दस्य कथा रम्या" हेच खरे.
तुमच्या धाग्यामुळे उजळणी झाली, धन्यवाद..

जुइ's picture

24 Nov 2018 - 12:52 am | जुइ

या मेजर मार्टिन बद्दल प्रथमच ऐकले. ही युद्ध कथा खूप विलक्षण आहे.