Persephone :
Daughter of Demeter and Zeus. She is Greek Goddess of Spring and also the Queen of the Underworld. Her story is one of abduction, love, grief, and celebration.
===
ओसाड रस्ते, रिकामे मॉल, ग्राफिटी केलेल्या भिंती, तुरळक कुठेतरी दिसणारी, वारा घेत बसलेली एखाददुसरी व्यक्ती. अशा सुनसान गावातुन दोन लहान मुली स्केटिंग करत चालल्या आहेत. एक टॉमबॉईश आहे हॉटपॅन्ट-टीशर्ट, छोटेछोटे केस. दुसरी अगदी तिच्या उलट, नाजूक फुलासारखी, फिकट रंगाचा फ्रॉक, दोन बो वगैरे. ती विचारते "आपण घराबाहेर हुंदडत फिरतोय हे आईच्या लक्षात नाही ना येणार?". पहिली बेफिकरीने म्हणते "Better hope not".
लपतछपत हळूच दार उघडून त्या घरात येतात. आई स्वैपाकघरात मग्न आहे. वडील काहीतरी वाचतायत. आवाज न करता जिना चढून त्या एका खोलीत जातात. बाकीच्या व्हिक्टोरियन वाटेल अशा खोल्यांपेक्षा ही खोली वेगळी आहे.सामान अस्तव्यस्त पसरलं आहे, भिंतीवर ओबामाचे चित्र आहे, बाथरुमदेखील मॉडर्न वाटतेय. पलीकडे बेडरूममध्ये एक बाई गाढ झोपलीय. टॉमबॉय मुलगी खिशातून पेपरक्लिप काढते आणि त्या बाईच्या हाताला जोरात टोचवते. आणि कमिल प्रिकर खडबडून जागी होते. ते स्वप्न होतं कि बालपणीची आठवण? कि भविष्याची चाहूल??
कमिल (Amy Adams) ही सेंट लुईस शहरात क्रोनिकलमधे गुन्हेवार्ताहर म्हणून काम करणारी, ३३ वर्षांची अविवाहित स्त्री आहे. ऑफिसात पोचल्यावर लगेच तिचा संपादक तिला बोलावून घेतो आणि जन्मगाव विंडगॅपबद्दल माहिती विचारतो. सहज गुगलून मिळेल अशी माहिती ती सांगते. गेल्यावर्षीच तिथे ऍन नॅश या १३ वर्षाच्या मुलीचा खून झाला आहे आणि आता काही दिवसांपूर्वी दुसरीएक त्याच वयाची मुलगी नताली किन हरवली आहे. कमिलला याबद्दल काहीही माहिती नाही. सीरिअल गुन्हे असतील, इतर कोणतेही वर्तमानपत्र ही बातमी कव्हर करत नाहीय, कमील काहीतरी स्थानिक-वैयक्तिक रंग देऊन लिहू शकेल असे वाटल्याने बॉस तिला विंडगॅपला जायला सांगतो. ती फार अनुत्सुक आहे जायला पण मग दुसरा पर्याय काय?
जवळपास आठ वर्षांनी कमिल जन्मगावी जातेय. विंडगॅपमधे पोहोचल्यावर ती सर्वप्रथम मुख्य पोलीस अधिकारी व्हिकरीला भेटते. त्याला खात्री आहे कि ऍन आणि नताली दोन्ही केसमधला गुन्हेगार गावाबाहेरचा, पुरुष आहे. विंडगॅपला लागून असलेल्या जंगलात नताली शोधमोहीम चालू आहे तिकडे कमिल जाते. तिथे तिला तीन हॉट टीनेजर मुली भेटतात. ऍनचा खुनी शोधण्यास मदत करायला कॅन्सस सिटीहून आलेला FBI अधिकारी भेटतो. आईची बालपणापासूनची मैत्रीण भेटते. इतर ओळखींचे लोक भेटत राहतात. कमिलदेखील शोधकार्यात सामील होते. बऱ्यापैकी रात्र झाल्यानंतर ती घरी जायचे ठरवते.
कमिलची आई अडोरा (Patricia Clarkson) ही गावातली पोर्क मुघल आहे. विंडगॅपमधील गरिबांकडे कामाचे दोनच पर्याय आहेत. मूठभर श्रीमंताकडे घरकाम करायचे किंवा अडोराच्या पिगफॅक्टरीत हॉग बुचरिन्ग. अडोरा म्हणजे विसंगतीचा, विरोधाभासाचा मूर्तीमंत नमुना. दिसायला, वागायला, बोलायला एकदम खानदानी, नाजूक वगैरे. पण कमिलशी/बद्दल बोलताना मात्र तिला काय होत कळत नाही. दोघींचे नाते फार तणावग्रस्त आहे. कमिलचे सावत्र वडील ऍलन हे गाणी ऐकणे आणि बायकोला उगीउगी करणे याखेरीज काही करत नाहीत. त्यांची १३ वर्षांची मुलगी, कमिलची सावत्र बहीण ऍमादेखील घरात आहे पण सुरवातीला तिचे फक्त अस्तित्व कमिलला जाणवत राहते.
२ दिवसांनी पोलिसस्टेशनच्या मागच्या गल्लीतच नतालीचा मृतदेह सापडतो. कमिल तेव्हा तिथे जवळपासच्या भागातच असते. ऍनसारखेच नतालीचेदेखील सगळे दात काढून घेतलेले असतात.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी अडोराच्या घरात असताना नाजूक फुलासारखी, फिकट रंगाचा फ्रॉक घातलेली ऍमा (Eliza Scanlen) कमिलला दिसते आणि तिला आश्चर्याचा धक्का बसतो.
• त्यामागे काय कारण आहे?
• अडोरा कमिलचा एवढा तिरस्कार का करते?
• पहिल्या सिनमधे स्केटिंग करत जाणाऱ्या मुली कोण होत्या?
• ऍन आणि नतालीचा खून कोणी केला?
आणि सगळ्यात महत्वाचे
• कमिल हि अशी बेवडी, दुखावलेली, जगाचे ओझे खांद्यावर असल्यासारखे चालणारी/वागणारी का आहे?
या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर Sharp Objects बघा.
===
जिलियन फ्लिन ही एक अतिशय खत्रुड लेखिका आहे. तिचे लेखन कुरुप असते, हिडीस असते. आपल्या कथेतील स्त्रीव्यक्तीरेखांचा वाचकाने तिरस्कार करावा, त्यांना घृणा वाटावी, बाब्बो असली कुठे बाई असते का असे म्हणत त्यांनी तोंडात बोटं घालावीत असे तिला वाटते. गॉन गर्ल वाचलेल्या/बघितलेल्या लोकांना माहित असेल फ्लिनच्या नायिका सोनेरी केसांच्या, निळ्या डोळ्यांच्या, श्रीमंत घरातल्या, सभ्य, सुसंस्कृत वगैर असतात. बाहेरून. आतून बघितल्यास त्या फिरल्या डोक्याच्या, नैतिकतेच्या-तर्काच्या ट्विस्टेड कल्पना असलेल्या, गुंतागुंतीचे व्यक्तिमत्व असलेल्या असतात. या असल्या लेखिकेचे शार्प ऑब्जेक्टस् हे पहिले पुस्तक. २००६ साली प्रकाशित झाले. त्यातले काही संवाद बघा:
• I am trash, from old money.
• My demons are not remotely tackled. They are mostly mildly concussed.
• You loooove dead girls.
• You survive.
• She paid for the sins of a mother she never met.
• If I say yes, you will think less of me or feel sorry?
• She is delicate, a rose but not without thorns.
• Good tree, bad apple.
• I never loved you.
• I thought you liked it rough.
या अशा पुस्तकावर तब्बल १२ वर्षांनी ही आठ भागांची मालिका आलीय. आणि माझ्या देवा! प्रतीक्षा खरंच worthwhile होती!!
जीन-मार्क व्हॅलीने अक्षरशः सोनं केलं आहे कथेचं. फ्लिनने स्वतः काही भाग लिहीले आहेत. मार्टी नॉक्सऑनने इतर भाग तेवढ्याच ताकदीने लिहीले आहेत. एडिटिंग स्वतः व्हॅलीने काही सहाय्यक वापरून केलं आहे. सगळ्यांचा अभिनय अतिशय उत्तम झाला आहे. एमी ऍडम्सबद्दलतर कितीही बोललं तरी कमीच पडेल.
कमीतकमी एकतरी कणखर स्त्री व्यक्तीरेखा असणारे, स्त्रियांची दुःखं, त्यांचा धुमसणारा राग, स्त्रीवाद वगैरेबद्दल भाष्य करणारे बरेच चित्रपट, मालिका आजकाल बनत असतात. They try to make some grand statement about woman and womanhood. शार्प ऑब्जेक्टसमधे तसं काहीही नाही. अडोरा, कमिल आणि ऍमा या तीन ठराविक बायका, त्यांची स्वतःची मानसिकता, जडणघडण, त्यांची एकमेकांसोबतची ट्विस्टेड नाती याबद्दलच भाष्य आहे.
वाचलेल्या अनेक लेखांपैकी एकातला समर्पक परिच्छेद देऊन थांबते.
Sharp Objects is outwardly realistic in every aspect, from its lived-in performances and atmospheric location shooting to its prismatic sound design and its nonlinear editing, which strives to replicate how the brain remembers and suppresses trauma
. But in its heart, it’s a tragedy, a doom spiral about a damaged person slowly coming to terms with her damage, immersing herself in hell one last time and emerging, if not stronger, then alive, at least.
प्रतिक्रिया
1 Oct 2018 - 3:54 pm | तुषार काळभोर
HBO वर असल्याने सध्यातरी बघणं होणार नाही.
तूर्तास आवडत्या फॉरमॅटमध्ये ऑर्डर केलंय... पुस्तक.
2 Oct 2018 - 1:14 am | एमी
एकमेव प्रतिसादासाठी धन्यवाद पैलवान :D
पुस्तक वाचून झाले कि सांगा आवडलं कि नाही ते.
7 Oct 2018 - 8:59 am | तुषार काळभोर
"निराशा" हे पुस्तकाविषयी लिहिलेलं नाही.
आता पुस्तकाविषयी- काल हातात मिळालं आणि वाचायला सुरुवात केली. वर लेखात कथावस्तू आलीच आहे. ती कदाचित दृश्य माध्यमात बदलली असेल. असो, तर पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावर एकोणिसाव्या पानावर मला सांस्कृतिक धक्का बसला. अमेरिकेतील एका छोट्याशा गावातील एक कुटुंब. पहिलं मूल जन्माला येतं, मुलगी. मुलगा व्हावा ही अपेक्षा असताना मुलगी झाली म्हणून किंचित निराशा. पण तरी 'नाही तरी आम्हाला एक मुलगा एक मुलगी असं चौकोनी कुटुंब हवंच आहे' अशी स्वतःची व इतरांची समजूत. तिचं नाव Ashleigh असं भारदस्त. मग दुसऱ्या वर्षी दुसरं मूल...मुलगी. किंचित निराशा. थोडं कमी उत्साहाने बाळाचं स्वागत. नाव सामान्य असं Tiffanie. तिसऱ्या वर्षी अजून एक मुलगी. पूर्ण निराशा. नाव अतिसामान्य. जन्म झालाच आहे म्हणून काही तरी नाव द्यायला हवं. Ann. अगदी शेवटी एक e टाकायचीसुद्धा तसदी नाही. मग दोन तीन वर्षे जातात. मुलगा हवाय. अजून एकदा ... यावेळी मुलगा होतो. कौतुकानं बाळाच्या आजोबांचं नाव बाळाला दिलं जातं. Bobby. आणि मग आधीच्या तिघींना जाणीव होते की त्या किती 'अतिरिक्त' आहेत.
हा परिच्छेद पुस्तकात आहे. हा परिच्छेद वाचताना मला खरोखर सांस्कृतिक धक्का बसला! मुलगा हवा, वंशाचा दिवा वगैरे कल्पना, त्या मुळे मुलगा होईपर्यंत बाळंतपणं होऊ देणं, आणि मुलगा होईपर्यंत झालेल्या प्रत्येक मुलीमुळे होणारी वाढती निराशा. हे सगळं कित्येक पिढ्या इथे अनुभवलंय आपण. पण असे विचार पश्चिमेकडे, त्यातही अमेरिकेत!! तो परिच्छेद मला दोनदा वाचवा लागला, माझं वाचताना काही चुकलं नाहीये ना ,हे पाहायला. असे विचार मला भारतीय समाजाचं सामाजिक/सांस्कृतिक मागासलेपण वाटायचं. पण तिकडे सुद्धा असे विचार असू शकतात, हे अविश्वसनीय होते.
8 Oct 2018 - 6:33 am | एमी
'निराशा' नाव ऐकलं नाही पण 'नकुशी' ऐकलंय.
https://www.dnaindia.com/health/report-nakushi-a-popular-name-for-unwant...
===
अमेरिका बऱ्यापैकी मागासलेली आणि धार्मिक आहे, खासकरून दक्षिण भाग. कथानक मिसुरी बुटहीलमधल्या छोट्याश्या गावात घडत.
8 Oct 2018 - 3:39 pm | Ganesh Dwarkana...
"मोकळा श्वास" या मराठी सिनेमाची आठवण झाली
2 Oct 2018 - 8:39 am | लई भारी
आपलं लेखन आणि मालिका आवडली.
आम्हाला 'हॉटस्टार' वर सहज सापडली; मी १-२ भाग बघितले आणि आवडले. बायको एकदम फ्यान झालीय आणि प्रत्येक भागाची आतुरतेने वाट बघत होती.
'गॉन गर्ल' चित्रपट पण भन्नाट आवडला होता. आता दोन्ही पुस्तके वाचायच्या लिस्ट मध्ये टाकतो. विंग्रजी वाचनाचा तसा आनंद आहे, बघू :)
हे विशेष आवडलं :
2 Oct 2018 - 4:30 pm | एमी
धन्यवाद लई भारी :-)
तुम्ही आणि बायको दोघांनी लगेच मालिका बघायला चालू केली आणि दोघांना ती खूप आवडली हे ऐकून आनंद जाहला _/\_
2 Oct 2018 - 3:40 pm | मुक्त विहारि
https://www.hotstar.com/tv/sharp-objects/s-1543/vanish/1770017504
हीच मालिका आहे का?
2 Oct 2018 - 4:32 pm | एमी
हो हीच ती :-)
बघा आणि कशी वाटली सांगा.
8 Oct 2018 - 3:47 pm | Ganesh Dwarkana...
प्रीमियम आहे की फ्री आहे हि मालिका हॉटस्टार वर
8 Oct 2018 - 4:43 pm | एमी
मालिका "हॉटस्टार प्रीमियम" वर आहे.
आणि स्टार वर्ल्ड प्रीमियरवर आठवड्यातून एकदा, शनिवारी रात्री ११ ला आहे. पण इथे तीन की चार भाग होऊन गेले आहेत.
===
मोकळा श्वासबद्दल काही माहित नाही.
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
2 Oct 2018 - 5:16 pm | पद्मावति
उत्तम ओळख. मालीका बघणार नक्की.
3 Oct 2018 - 6:19 am | एमी
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद पद्मावती.
नक्की बघ मालिका आणि कशी वाटली सांग.
3 Oct 2018 - 1:21 pm | अथांग आकाश
बघावी लागेल!
3 Oct 2018 - 2:48 pm | एमी
धन्यवाद अथांग आकाश :-)
12 Oct 2018 - 11:53 am | आदूबाळ
पुस्तक वाचायच्या यादीत कधीपासून पडून आहे. मालिका त्याआधी बघावीशी वाटणार नाही.
परीक्षणासाठी धन्यवाद, अॅमी!
12 Oct 2018 - 8:17 pm | एमी
यावर्षीचे सगळे एमी या मालिकेलाच मिळणार अशी हवा आहे. त्यामुळे बक्षीससमारंभ ऋतूच्या आधी बघ शक्यतो :-)
15 Oct 2018 - 12:19 pm | बबलु
आली तेव्हाच पाहिली . अप्रतिम मालिका.
एमी ऍडम्स ने सहीच काम केलंय .
ष्टोरी छानच . धक्कादायक.
"Munchausen syndrome by proxy" चा खूप छान उपयोग केलाय.
15 Oct 2018 - 3:29 pm | एमी
अर्रे असं भांडाफोड करायची नाही. स्पॉइलर अलर्ट टाकुन घ्या बरं सम्पादकांकडून तुमच्या दोन्ही प्रतिसादांसाठी :D
बाकी सहा सहा प्रतिसाद एकगठ्ठा दिल्याबद्दल आभार _/\_
18 Oct 2018 - 12:03 am | बबलु
अॅमी,
"Munchausen syndrome by proxy" कुणालाही माहिती नसावा. त्यामुळे काळजी नाही. :) :)
-- बबलु.
15 Oct 2018 - 12:19 pm | बबलु
https://en.wikipedia.org/wiki/Factitious_disorder_imposed_on_another
15 Oct 2018 - 12:22 pm | बबलु
15 Oct 2018 - 12:23 pm | बबलु
15 Oct 2018 - 12:24 pm | बबलु
15 Oct 2018 - 12:25 pm | बबलु