कोणत्याही व्यवसायात आणि नोकरीत यशस्वी होण्यासाठी त्यासंबंधीच्या विषयाचे ज्ञान असायला हवे हे सांगायला नकोच. मात्र, त्या ज्ञानाबरोबरच, आंतरजालाचा उपयोग करण्याचे ज्ञानही असले तर तर यशाचा मार्ग जास्त सुकर होतो, याबद्दलही संभ्रम नसावा.
पारंपरिक पद्धतीने शिक्षण देणार्या शिक्षणसंस्था आहेतच. पण, संगणकशास्राच्या प्रगतीच्या वेगाच्या तुलनेने त्यांच्यामध्ये असलेले संगणकीय अभ्यासक्रमांत होणारे बदल खूपच कमी वेगाने होतात. त्यामुळे, त्यांच्यातून बाहेर पडणार्या पदवी/पदविकाधारकांना बर्याचदा, उत्पादक घटक बनण्यासाठी, व्यावहारिक उपयोगासाठी लागणारे संगणकीय शिक्षण स्वतः प्रयत्न करून मिळवावे लागते. अर्थातच, त्यामुळे, गेल्या काही दशकांत अनेक अपारंपरिक खाजगी (कोणत्याही विद्यापीठाशी संलग्न नसलेल्या) शिक्षणसंस्था निर्माण झालेल्या आहेत. या संस्थांचा रोख, "केवळ पुस्तकी शिक्षणापेक्षा" जास्त "जरूरीपुरते पुस्तकी शिक्षण आणि व्यवसाय/नोकरीत उत्पादक घटक होण्यासाठी जरूर असलेल्या शिक्षणावर" असतो. अश्या काही संस्थांनी कधी स्वतःचे अभ्यासक्रम निर्माण केलेले आहेत तर काही जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त असलेले अभ्यासक्रम (बहुदा फ्रँच्यायझीच्या नात्याने) शिकवतात. यानंतरच्या पायरीवर, जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त असलेले अभ्यासक्रम पुस्तकरूपाने आणि/किंवा जालावरही उपलब्ध झालेले आहेत आणि त्यांच्या परीक्षा जालावर उपलब्ध झालेल्या आहेत.
अर्थातच, या सगळ्या अपारंपरिक शिक्षणसंस्था आणि परीक्षापद्धती एका व्यावहारिक गरजेची पूर्तता नक्कीच करत आहेत आणि त्यांच्या सेवेचे उत्तम मूल्यही आकारत आहेत. उत्तम नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना हे शिक्षण आणि त्यासाठीचा खर्च आवश्यक व योग्य वाटतो आणि म्हणूनच तो शिक्षणव्यवसाय चांगला चालला आहे.
या क्षेत्रात काही अनपेक्षित नवीन खेळाडू disruptive technology चा उपयोग केलेली शिक्षणपद्धती घेऊन उतरत आहेत. त्यातला, मुख्य disruptive भाग असा की हे जालशिक्षण नोकरी-व्यवसायातील यशवर्धन करणारे आणि पूर्णतः मोफत आहे. सद्या तुलनेने प्राथमिक स्तरावर असले तरी हे शिक्षण दर दिवसामागे अधिकाधिक वरच्या पायरीवर जात आहे.
या लेखात मी गूगलवर उपलब्ध असलेल्या अश्या काही निवडक मोफत अभ्यासक्रमांची माहिती देऊन सुरुवात करत आहे. मिपाकरांनी त्या माहितीत भर टाकून हा धागा सर्व मिपाकरांसाठी माहितीपूर्ण व अर्थपूर्ण बनवावा अशी अपेक्षा आहे.
*********************************
१. Get Your Startup Started (by Google) :
लक्ष्य व्यक्ती :
नवीन कंपनी (startup) सुरू करणार्या किंवा चालू कंपनीला जालावर नेऊ इच्छिणारे व्यावसायिक.
मुख्य अभ्यासक्रम :
* व्यवसायाला मार्गदर्शक व आवश्यक असलेल्या गोष्टी ठरवणे. उदा : मिशन, व्हिजन, तिमाही व वार्षिक कामाचा आणि कामगिरीचा आराखडा, इ.
* व्यवसायाला पूरक माहिती व मदत करणार्या व्यक्तींचा (mentors and team members) शोध करणे.
* कंपनीच्या बोर्डासाठी किंवा सल्लागार मंडळासाठी योग्य असलेल्या तज्ज्ञ व्यक्तींचा शोध घेणे.
* कंपनीची वेबसाइट तयार करणे.
* वित्तसंस्था आणि व्यक्तिगत गुंतवणूकदाराकडून (VC) व्यावसायिक भांडवल मिळविण्यासाठी प्रस्तुती (presentation किंवा pitch) तयार करणे.
कालावधी :
साधारणपणे ३ आठवडे.
***
२. App marketing (by Google via Udacity) :
लक्ष्य व्यक्ती :
* संगणक उपप्रणाली (app) बनविण्याची व प्रसिद्ध करण्याची इच्छा असणारे.
* जालविपणन (online marketing) करू इच्छिणारे... म्हणजे, व्यवसाय-धंदा करणारे बहुतेक सर्व.
मुख्य अभ्यासक्रम :
* ग्राहकांचे शास्त्रीय व जास्त चांगले आकलन करून घेणे.
* जालविपणाची योग्य रणनीती (research, planning, execution) बनविणे.
* ग्राहकसंख्या वाढवणे (growing user base).
* व्यावसायिक तथ्ये व आकड्यांवरून (facts and figures) रणनीतीची दिशा ठरवणे/बदलणे.
कालावधी :
साधारणपणे २ आठवडे.
***
३. App monetization (by Udacity) :
लक्ष्य व्यक्ती :
जालावर 'वापरकर्त्यासाठी मोफत' उपप्रणाली (free apps or free online content) उपलब्ध करून तिच्यापासून उत्पन्न मिळवू इच्छिणारे.
मुख्य अभ्यासक्रम :
* जालावरील अर्थार्जनाचे प्रकार आणि त्यातला योग्य पर्याय कसा निवडावा.
* "अर्थार्जनासाठी आंतरजालाचा उपयोग" हा उद्येश समोर ठेवून जालप्रणालीचा आराखडा तयार करणे, प्रणाली बनवणे आणि तिच्यापासून अर्थार्जन करणे.
* आराखडा व्यवहारात उतरविण्यासाठी व त्याच्या कामाचे पर्यवेक्षण करण्यासाठी रणनीती (KPIs) आखणे.
* ग्राहक मिळविण्याची आणि त्यांना आपल्याशी बांधून ठेवण्याची रणनीती.
* अर्थार्जनाचे विविध पर्याय व त्यासाठीच्या रणनीती.
* व्यवहारात यशस्वी झालेले उदाहरण.
कालावधी :
साधारणपणे ३ आठवडे.
***
४. Product design (by Google via Udacity) :
लक्ष्य व्यक्ती :
आपल्याला सुचलेले उत्पादन व्यवहारात आणण्यापूर्वी (वेळ व पैशांचा मोठा खर्च करण्यापूर्वी) त्याच्या यशाची खात्री करू इच्छिणारे.
(पक्षी : आपली कल्पना व्यवहारात यशस्वी होईल की नाही याचा आडाखा मांडणे. )
मुख्य अभ्यासक्रम :
* कल्पना मांडणे व तिचे प्रमाणीकरण करणे (Ideation & Validation). कल्पना व्यवहारात कितपत टिकेल याचा अभ्यास.
* उत्तम कार्यक्षमता आणि वापरकर्त्यासाठी सुखकारक अनुभव असलेल्या आंतरजाल प्रणालीचा आराखडा बनवणे.
* आंतरजाल प्रणालींच्या वापराचे आणि उपयोगितेचे मूल्यमापन करणे.
कालावधी :
व्यक्तिगत वेगावर अवलंबून.
***
५. Strengthen your LinkedIn network and brand (by Udacity) :
लक्ष्य व्यक्ती :
उत्कर्ष साधू इच्छिणारे सर्व उद्योजक, व्यावसायिक आणि नोकरदार.
मुख्य अभ्यासक्रम :
* व्यावसायिक संबंध (नेटवर्किंग) वाढविण्याची कौशल्ये व रणनीती.
* भरतीअधिकार्यांशी (recruiter) संपर्क कसा करावा.
* प्रतिक्रिया येण्याची खात्री करणारा संपर्क (उदा : ईमेल, इ) कसा करावा.
* व्यावसायिक प्रोफाइल (बायोडेटा / सिव्ही) कशी लिहावी.
कालावधी :
एक आठवडा.
प्रतिक्रिया
11 Aug 2018 - 12:36 am | अमित खोजे
माहिती बद्दल धन्यवाद! udemy वर बरेच कोर्सेस घेतले आहेत. गूगल वरील सुद्धा बघतो आता.
11 Aug 2018 - 1:02 am | टर्मीनेटर
डॉक्टर साहेब, ज्या पद्धतीने हे सगळ्यांसमोर आणले जात आहे तेवढं ते सोपं नाहीये. मोदी साहेबांच्या फोटो सकट २४ तासात नोंदणी अशी जरी जाहिरात केली जात असली तरी तेवढं सोपं काम नाहीये ते हा प्रत्यक्ष अनुभव आहे. बाबू शाही किती रुजली आहे ह्या देशामध्ये ह्याचा अनुभव येतो नवीन कंपनी रजिस्टर करताना .जाहिरातीत २४ तासात स्टार्ट अप रजिस्टर करा वगैरे म्हणत असतील तरी प्रत्यक्षात खूप अडचणी उभे करतात mca वाले. अर्धे लोकं त्यांच्या जाचाला कंटाळून एकतर मार्ग सोडून देतात किंवा झगडत राहतात. थोडक्यात स्टार्टअप इंडिया हे केवळ स्वप्नच आहे.
11 Aug 2018 - 1:26 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
सरकार, सरकारी योजना किंवा पंतप्रधान मोदी यांच्याशी जरासाही संबंध आहे असा एक तरी शब्द या धाग्यातील मजकूरात आहे काय ???!!!
शीर्षकात स्पष्ट केल्याप्रमाणेच, हा धागा केवळ, आणि केवळ, व्यवसायात (व काही प्रमाणात नोकरीत) यशस्वी होण्यासाठी मदत करणार्या आंतरजालावरील मोफत अभ्यासक्रमांच्या माहितीसंबंधी आहे. कोणता विशिष्ट व्यवसाय अथवा नोकरी करावी की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे व त्याबद्दल या धाग्यात दूरान्वयानेही काहीच मजकूर नाही.
मात्र, व्यवसाय/नोकरीचा व्यक्तिगत निर्णय घेतल्यानंतर, आंतरजालावर त्यात उत्कर्ष साधण्यासाठीचे मोफत शिक्षण कसे घेता येते, याबद्दलची माहिती इथे सांगून मिपाकरांनी एकमेकाला मित्रत्वाची मदत करावी, इतकाच स्पष्ट व मर्यादित हेतू या लेखाचा आहे.
कोणत्याही सरकारी योजना अथवा संस्थासंबंधी मजकूर धाग्यात नाही आणि प्रतिसादांत त्यांची चर्चाही अपेक्षित नाही... कारण तसे करणे धाग्याच्या विषयाचा विपर्यास होईल.
हुश्श्य ! कठीण दिवस आले आहेत !! ;) :)
11 Aug 2018 - 6:05 pm | माहितगार
=))
11 Aug 2018 - 2:24 am | दिपस्तंभ
उदासिटी
11 Aug 2018 - 8:37 am | आनन्दा
आय्ला.. उदेसिटी वर असे कोर्स देखील असतील असे वाटले नव्हते..
मी अश्या कोर्सेसच्या शोधातच होतो. आता बघतो.
धन्यवाद.
11 Aug 2018 - 6:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
आय्ला.. उदेसिटी वर असे कोर्स देखील असतील असे वाटले नव्हते..
आपल्याबाजूला पडून असलेली पण आपल्या डोळ्यासमोर न आलेली अशी माहिती, सगळ्यांसाठी उघड करणे, हाच तर या धाग्याचा मुख्य उद्येश आहे. तुम्ही केलेल्या शोधात नजरेस आलेले इतर पर्याय इथे मांडून तुम्ही, "एकमेका सहाय्य करू..."ला हातभार लावू शकता.
11 Aug 2018 - 8:56 am | नाखु
आणि सकारात्मक विचार
धन्यवाद
11 Aug 2018 - 8:56 am | माहितगार
रोचक, उपयुक्त विषयावर चर्चा सुरु करण्यासाठी अनेक आभार.
11 Aug 2018 - 9:18 am | कुमार१
आणि चर्चा. धन्यवाद !
11 Aug 2018 - 12:23 pm | रागो
धन्यवाद
11 Aug 2018 - 1:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
मिपाकरहो, प्रतिसादांसाठी धन्यवाद !
पण फक्त वाचून आणि प्रतिसाद देवून थांबू नका. तुमच्याकडे या विषयासंबंधी माहिती असली तर, ती मिपाकरांबरोबर वाटून घ्या... आणि धाग्यातल्या एका अभ्यासक्रमात असलेल्या "नेटवर्किंग" या अतिशय महत्वाच्या विषयाचा सराव सुरू करा !
11 Aug 2018 - 1:46 pm | दुर्गविहारी
चांगली माहिती दिली आहे. मी यु-ट्युबचा उपयोग करुन बरीच नवीन सॉफ्टवेअर शिकून घेतली आहेत.
11 Aug 2018 - 6:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
तुमच्या नजरेतले संबंधीत धागे इथे टाकून तुम्हीही धाग्याच्या उद्येशाला हातभार लावावा.
11 Aug 2018 - 2:57 pm | सतिश गावडे
सध्याचे शिक्षण चाकोरीबद्ध आणि केवळ आणि केवळ नोकरी हे ध्येय समोर ठेवून दिले जात असताना असे वेगळ्या वाटा दाखवणाऱ्या शिक्षणाची ओळख तुम्ही करुन देत आहात.
11 Aug 2018 - 9:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
या गटात मुख्यतः व्यावसायिक अभ्यासक्रम असले तरी त्यातले काही नोकरी व व्यवसाय अश्या दुहेरी उपयोगाचे आहेत. उदा : LinkedIn चा उपयोग कसा करावा हा अभ्यासक्रम.
11 Aug 2018 - 3:22 pm | अभ्या..
हो, चांगले कोर्स आहेत.
माझा प्रोडक्ट डिझायनिंगचा चालु आहे.
11 Aug 2018 - 8:41 pm | वरुण मोहिते
माहिती.