अलकनंदेचा पर्जन्यरात्रीचा प्रवास

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in जनातलं, मनातलं
29 Jun 2018 - 4:32 pm

सांजवेळ झाली तसे अलकनंदाने आपले थकलेले दोन्ही डोळे तळव्यांनी दाबले. कार्यालयातले सर्व सहकर्मी कधीच निघून गेले होते. अलकनंदाने तिच्या वहनयोग्य लघुसंगणकाच्या पडद्याकडे एक शेवटची नजर टाकली. काही नवीन ऋणपरमाणु प्रपत्र वरिष्ठांकडून आलेली नव्हती. क्षेत्रीय कार्यालये आणि केंद्रीय कार्यालय यांच्यातल्या संपर्कांबाबत अलकनंदाचे काम नेहमीच अंतिम मुदतरेषेवर चालत असे. प्रपत्रांच्या प्रतिसादास किंचित जरी उशीर झाला तरी साप्ताहिक पुनरावलोकनात त्याचा उल्लेख होत असे.

बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. आगगाडीने ख्रिस्तीमंदिरद्वार ते अलपिष्टन मार्ग स्थानकापर्यंत जाताना लघुसंगणकाची पिशवी भिजली असती. म्हणून विचाराअंती शेवटी तिने वहनयोग्य लघुसंगणक घडी करून मेजाच्या खणात ठेवला. खण बंद करून तिने त्याला टाळा लावला. एकदा पटकन प्रसाधगृहात जाऊन आली, आणि धाडकन कार्यालयातून बाहेर पडली. उद्वाहकाने खाली येतायेता तिने मनात कामांच्या जंत्रीची पुन्हा एकदा उजळणी केली. तिला आठवलं की वाटेत अतिशहर किंवा कमालशहर यापैकी एका भव्यदुकानातुन गोठवलेला मटार आणि पनीर घ्यायचं होतं.

रात्रीभोजनात मटार पनीर बनवण्याची तिच्या दोन्ही मुलांची आणि पतीची तिला खूप दिवसांपासूनची आग्रही सूचना होती.

मुळात अलकनंदा गोंय राज्यातली. . किरिस्ताव घरातली. तिचा प्रेमविवाह शुद्ध तुपातल्या प्रयाग अळवणी बरोबर झाला होता. मात्र घर आणि कार्यायलातील कार्यबाहुल्यामुळे तीचे आयुष्य अगदीच अळणी होऊन गेले होते. ती गोंय क्षेत्रीय कार्यालयात वाटप विभागात असताना प्रयागच्या संपर्कात आली. प्रयाग तसा उदार मनाचा असला तरी त्याचे वडील मराठीअण्णा (हे त्यांना मिळालेलं लाडकं टोपणनाव) अतिशय कर्मठ होते.

मराठीवर त्यांचे नितांत प्रेम. मटिमवा (मराठी टिकावा मराठी वाढवा) मंडळाचे ते संस्थापक आणि माजी अध्यक्ष. मंडळ मराठी असल्याने वादांमुळे ते अध्यक्षपदावरून तीनच महिन्यांत पायउतार झाले होते म्हणून माजी. नंतर फुटून सात साठ मंडळे आणि उपमंडळे स्थापन झाली. त्यातली एकूणसाठ आम्रविकेत आणि एक दिल्लीत अशी विभागणी झाली. तेव्हा महाराष्ट्रात यांच्या एका तरी शाखेने मूळ धरावं या इच्छेने एक शिखर संघटना बनवण्यात आली. वयज्येष्ठतेनुसार मराठीअण्णा त्या शिखर संस्थेचे अध्यक्ष झाले. नूतन मराठी शब्दकोश रोजच्यारोज अद्ययावत करण्याचं काम ते मुंबईत बसून आंतरजालाद्वारे निष्ठेने विनामानधन करत असत.

सुनेचं सँडी हे नाव मराठीअण्णांना सहन होणं शक्य नव्हतं. तेही घरात रोज उच्चार होणार असल्यावर खूपच खुपलं असतं. आपल्याकडची संध्या आम्रविकेत गेल्यावर तिचे नाव सँडी होते. सँडी चं संध्या करणं अण्णांना सहज शक्य होतं. पण मग ते फक्त भाषांतर झालं असतं. अण्णांना ते नको होतं.त्यांना त्यात भावार्थ ही हवा होता. मग आंतरजालावर खोदकाम करताना त्यांना सँडी म्हणजे अॅलेक्झांड्रा हे नाव सापडले. अॅनलेक्झांड्रा चे अलकनंदा असे नामांतर केल्यावर अण्णांना समाधान वाटले.

तर.. अलकनंदा कार्यालयासमोर पथावर उतरली. अंगावर हलकासा पर्जन्य अंगरखा चढवला. तो अगदीच पातळ होता आणि पावसापासून संरक्षणासाठी त्याचा शून्य उपयोग होता. रस्त्यात पाणी भरलं होतं. मात्र शुन्य उपयोग असला तरी ॠण उपयोग तर नाही ना असा आशावादी विचार तीने मनात आणला आणि ती पुढे निघाली.

आता अलपिष्टन स्थानकापर्यंत पोचायचे कसे ? पुढेही आगगाडीचा लोहमार्ग पाण्याखाली असण्याची आणि शीर्षस्थ पंचालेख तुटण्याची घटना घडलेली असणं याचीही शक्यता होतीच. तेव्हा आगगाडीचा नाद सोडून थेट अलपिष्टन स्थानकापर्यंत भाड्याची चारचाकी घ्यावी असा तिने विचार केला.

बटव्यात हात घालताच तिच्या लक्षात आलं की रोख रक्कम संपली होती. पतपत्र किंवा खर्चखातीपत्र यांचा चारचाकीचे देयक देण्यासाथी उपयोग नव्हता.

तिच्या जागी दुसरी कोणीही असती तर फकारी शब्दात आपली भावना व्यक्त केली असती. मात्र तिच्या घरी अति सुशिक्षित वातावरण नसल्यामुळे उठता बसता फकार मंत्र जपण्याची तिला सवय लागली नव्हती. तिच्या कार्यालयातील सहकारी दिवसातून १०८ वेळा फकार मंत्राचा जप करीत असत. तो जप ऐकुन आपणही हा मंत्र अधेमधे वापरण्यास हरकत नसावी असा विचार तिच्या मनात विद्युलतेप्रमाणे चमकून गेला.

जवळपास कुठे चलनअदायक यंत्रही नव्हतं. पाण्यातून रपारप चालत तिथपर्यंत पोचावं तर त्यामध्येही अशा अतिपावसात रोख रकमेऐवजी चूकसंदेश येण्याची शक्यता दाट होती. पुन्हा पुन्हा बटवा धुंडाळून पाहिल्यावर तळाशी पाचशे रुपयांच्या दोन चलनपत्रिका आर्द्र अवस्थेत एकमेकींना बिलगलेल्या आढळल्या.

एक काळेपिवळे वाहन पाण्यातून पथ कापत येताना दिसले. अलकनंदाने जोरात ओरडून चारचाकी, चारचाकी असा पुकारा केला. एरवी तो वाहनचालक निघूनच जावयाचा, पण ते शब्द ऐकून त्याने जोराने अवरोधक मारून तिच्यासमोर वाहन थांबवले. तो उत्तर प्रदेशातील बंधु प्रकारचा निघाला. त्याने परकीय उत्तरीय भाषेत "मला चर्चा करण्यात काही रस नाही" अशा आशयाचे उद्गार अलकनंदेला उद्देशून काढले.

त्याचा गैरसमज दूर करून अलकनंदा आत बसली आणि त्याने गतिवर्धकावर पाय दाबला. काही अंतरानंतर अलकनंदा त्याला उद्देशून म्हटले "भावा, आपण देय्यमापक खाली करण्यास विसरलेले दिसता. असे चालणार नाही. स्त्री पाहून आपण फसवू शकत नाही."

शेवटी हो ना करता करता ठराविक भाडे घेण्याचे मान्य करून भाऊ तंबाखू खाऊ लागला. अलकनंदा काहीशी सैलावून पार्श्वबैठकीवर रेलून बसली आणि पुढे मार्गात कोठेही मुंबईची तुंबई झाली नसावी अशी प्रार्थना करू लागली. आज काहिही झाले तरी पाणी आणि वाहतुक तुंबलीच नसल्याचा दावा आणि धावा आपण मनात सतत करत राहायचा. मात्र भुतकाळात वावरणार्‍या राजकीय पक्षाच्या प्रथम नागरीकाची शिकवणी लावल्याशिवाय हे शक्य होणार नाही हे ही तिला कळून चुकले.

भाड्याच्या चारचाकीत कंपन आपरीवर्तीत तंत्रज्ञानावर आधारीत आकाशवाणी संच चालू होता. आकाशवाणीस्थानकरोहक वटवसत्यवानाचे व्रत घेतल्याप्रमाणे अखंड वटवट करत होता. वटवट करुन घसा सुकला की मग मधल्या काळात समकालीन तप्त आणि लोकप्रिय गाण्यांचा कार्यक्रम व्हायचा. मधेमधे वाहतूकस्थितीच्या घोषणा करत होता. वाहतुकीत खोळंबलेल्या लोकांना आपापल्या स्थितीबद्दल संक्षिप्तसंदेश पाठवण्यासाठी त्याने एक विनाशुल्क क्रमांक उद्घोषित केला होता. संपर्क तुटलेल्या आपल्या कुटुंबियांशी संपर्क करवून देण्याचं कार्यही तो करत होता.

अचानक अलकनंदेला आपल्या नवऱ्याचं म्हणजे प्रयागचं नाव ऐकू आलं . त्याने आकाशवाणी केंद्राद्वारे अलकनंदेला पाठवला होता. "आशा आहे तू आहेत उत्तम, मी आहे पोचलो घरी" अशा आशयाचा तो आंग्ल संदेश होता. अलकनंदेने दचकून आपल्या चतुर भ्रमणध्वनीकडे नजर टाकली. त्याची विद्युत घटमाला संपून तो मृत झाल्याचं तिच्या लक्षात आलं.

तिच्याकडे अजुन एक प्राथमिक तंत्रज्ञानावर आधारीत भ्रमणध्वनी होता मात्र "झोडाफोन" या सेवादात्याने त्यावरील सेवा खंडीत केली होती. मात्र यात तिची काहीच चुक नव्हती. तिचे देयक बर्याच दिवसापासून थकले होते मात्र झोडाफोनवर सतत "आपल्या बिलाची चुकवणी करा" असा संदेश येत होता. अलकनंदेचे भाषिक दौर्बल्य आड न आल्यामुळे तीने ते देयक चुकवले होते मात्र तेव्हापासून तिचा तो भ्रमणध्वनी मृत झाला होता.

तर... अण्णांनी हा आंग्ल संदेश ऐकला असेल तर घरात काय युद्ध सुरु झालं असेल याची तिला चिंता लागली. त्यावर आणखी चिंता म्हणजे आता प्रयागला उलट संदेश कसा पाठवायचा.

'फ* यु' ....

अखेर तो मंत्र तिने उच्चारलाचं. पण मग लागलीच आपली जीभ चावली. आपण आताच वाहकास भाऊ म्हटलो आणि दुसर्याच क्षणास हा मंत्र उच्च्चारला. मिसळपाववरील "तुम्हीहोतीगार" या धागाकर्त्यास जर कधी आपाल्या संभाषणाचा माग लागला तर तो "मानलेले बहिण भाऊ.... विवाह आणि वैद्यकीय, जनुकीय, आर्थिक, सामरिक आणि सामाजिक आणी काय काय नी काय नाय प्रश्न" नावाचा भलाथोरला धागा काढून आपल्यास गार करतील अशी साधार भिती वाटली आणि तिच्या मनास टोचणी लागली. शिवाय आपण त्यास दोन चार ओळीचा प्रतिसाद देण्याचा यत्न केला की समोरुन आभाळ फाटल्याप्रमाणे प्रतिसाद येतो आणि मग त्यात आपण हरवुन जातो.

मात्र तीचं नशीब चांगलं की आकाशवाणीसंचाच्या आवाजात वाहकभावास काहीच ऐकू गेले नव्हते.

तिने संकोच बाजूला ठेवून बंधूला विचारले "भावा, तुमचा भ्रमणध्वनीसंच चालू असल्यास मला पळभरासाठी देता का? आपले उपकार होतील."

भावाने भ्रमणध्वनीसंच हा शब्द ऐकून अंगावर शहारे आल्याचा अभिनय केला. "आपण तसलं काही जवळ बाळगत नसल्याचे" सांगितले. शिवाय "आपण विभागातील गुप्त तपासणी अधिकारी वगैरे आहात का बाई ?" अशीही हळूच नम्र विचारणा केली. शेवटी नाईलाजाने अलकनंदेने आंग्ल भाषेत भ्रमणध्वनी मागून घेतला. परंतु त्यात पैसे उरले नसल्याचे भावाने सांगितले. अंतर्गामी साद येऊ शकत होते पण बहिर्गामी साद जाऊ शकत नव्हते. हताशपणे अलकनंदेने डोळे मिटले.

बाहेर पावसाचा जोर वाढतच होता. आता कसले रात्रीभोजनात मटार पनीर ? त्यापेक्षा "भुयारी मार्ग" नावाच्या अन्नसाखळी दुकानातुन तीन उष्णश्वान विकत घ्यावेत आणि अण्णांसाठी कोपर्यावरच्या गाणफत कडून वडापाव विकत घ्यावा आणि आजची रात्र त्यावरच गुजराण करावी या निर्णयाप्रत ती आली. अंधारही मिट्ट झाला होता. त्यात जवळच कुठेतरी रोहित्र उडाल्याचा फाड असा आवाज झाला आणि "भरवसा संस्थेची" वीज जाऊन मिणमिणते चार पथदिवेही विझले. मात्र "भरवसा संस्थेचा वीजव्यापार" "अडाणी संस्था" लवकरत ताब्यात घेणार ही बातमी आजच वाचली असल्यामुळे आता तरी आपल्या घरी अखंडीत वीज राहिल असा विश्वास मनातल्या मनात जागवून ती भाड्याच्या चारचाकीत डोळे मिटून मार्गक्रमण करत राहिली.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

29 Jun 2018 - 6:06 pm | आनन्दा

काय आहे हे नेमके? पहिले विडंबन वाटले, पण आता तर वाङ्मय चौर्य वाटतेय

धर्मराजमुटके's picture

29 Jun 2018 - 6:52 pm | धर्मराजमुटके

अरेरे, गैरसमजाबद्द्ल क्षमस्व ! ही कथा म्हणज गविंनी येथेच लिहिलेल्या "वाळवीची पावसाळी रात्र" या कथेत निर्माण केलेल्या मराठी शब्दांना पर्यायी शब्द योजुन लिहिण्याचा प्रयत्न आहे. तशी टीप लिहायची राहिलीच ही माझी चुकच ! मला वाटले की विषय ताजा आहे त्यामुळे वाचकांना कळेलच. असो. इतक्या दिवसा ढवळ्या चोरी नाही करता येत हो ! जास्तीत जास्त दरोडा टाकू शकतो :)

यशोधरा's picture

29 Jun 2018 - 7:44 pm | यशोधरा

मला वाटले की उत्तराखंडात अलकनंदा नदीच्या इथून पावसाळ्यात प्रवास केलात, त्याचे वर्णन केले आहे, म्हणून उत्साहाने लेख वाचायला घेतला!

छान आहे कथा.

प्रचेतस's picture

30 Jun 2018 - 5:50 am | प्रचेतस

कुणाला कशाचं तर तुम्हाला हिमाचलाचं.

यशोधरा's picture

30 Jun 2018 - 12:02 pm | यशोधरा

तुम्हांला कसं लेणी आणि लेणीसुंद्र्यांच असतं, अगदी तस्संच हो!!

बाकी मराठी शब्द छानच आहेत.

गवि's picture

30 Jun 2018 - 7:35 am | गवि

छे छे छे. अस्सल मराठी मातीतल्या कथेची तुम्ही संस्कृतप्रचुर अतएव मूठभर पंडितांनाच समजेल अशी मांडणी केली. सामान्य जनतेला ज्ञानापासून दूर ठेवण्याची ही तुमची खटपट लक्षात आली तर तुम्हीहोतीगारसाहेब तुमच्यावरून किती लांबीच्या शीर्षकाचा संस्कृत, प्राकृत, अर्धमागधी, पैशाची, पौराणिक, प्रागैतिहासिक, ग्रांथिक, व्यष्टी, समष्टी, कसा धागा काढतील याचा विचार केलात का?

विशुमित's picture

30 Jun 2018 - 11:52 am | विशुमित

मुग्ध होऊन वाचत होतो.
शनिवारची सुरवात छान झाली.

मराठी_माणूस's picture

30 Jun 2018 - 12:24 pm | मराठी_माणूस

मस्त

सतिश गावडे's picture

30 Jun 2018 - 1:46 pm | सतिश गावडे

भन्नाट प्रयोग.

श्वेता२४'s picture

6 Jul 2018 - 5:04 pm | श्वेता२४

जाम हसायला आलं. अंतर्गामी साद येऊ शकत होते पण बहिर्गामी साद जाऊ शकत नव्हते त्यापेक्षा "भुयारी मार्ग" नावाच्या अन्नसाखळी दुकानातुन तीन उष्णश्वान विकत घ्यावेत

पण भुयारीमार्ग दुकानात उष्णश्वान मिळत नाहीत. तिथे शीत वाळूचेटकिणी मिळतात. त्यातून आजारोजीचे भुयार या अन्नपर्यायानुक्रमाणिकेत पाहून घेतल्यास आजची वाळूचेटकीण स्वस्तात मिळते. शिवाय तीन स्वादांत गोड स्वैपाकिणीही मिळतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jul 2018 - 12:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

शीत वाळूचेटकिणी, गोड स्वैपाकिणीही...

गाडीचा वेग कमी होण्याचे नाव घेत नाही... बंदूकगोळीलोहपट्टीकामार्गवाहनातून प्रवास करण्याचा अनुभव येतोय ! =))

बंदूकगोळीलोहपट्टीकामार्गवाहनातून प्रवास करण्याचा अनुभव येतोय

बंदूकगोळीलोहपट्टीकामार्गवाहन विसरा आता.

थांबा जरा. लवकरच पुनवाडीत कमालपळवाट हे अतिशय वेगवान वाहन येऊ घातलंय. पुनवाडी ते महिकावती अंतर काही पळांतच पार होईल. ही मुळात अंतराळक्ष या संस्थेचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ईकर्ज कस्तुरी यांची संकल्पना.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jul 2018 - 6:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

हो तर... 'कमालफासएक' आणि 'अंतराळक्ष' यांनाही विसरून चालणार नाही !

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jul 2018 - 10:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे बी चालतंय की ! =)) =)) =))

धर्मराजमुटके's picture

7 Jul 2018 - 12:36 pm | धर्मराजमुटके

सगळ्यांना धन्यवाद ! लेख आवडला तरी त्याच मुळ श्रेय गवि आणि उपयोजक यांचेच आहे. त्यांनी पाया घातला नसता तर कळस रचता आला नसता.

अनन्त्_यात्री's picture

7 Jul 2018 - 8:11 pm | अनन्त्_यात्री

चर्चा करण्यास हरकत नसावी. :)