कवितेचे पान - ऑनलाईन कवितेची मैफिल

पारुबाई's picture
पारुबाई in जे न देखे रवी...
16 Jun 2018 - 4:53 am

कविता हा काही खास रसिकांचा प्रांत. कवितेवर प्रेम करणारे लोक नेहमीच एका सुरेख कल्पनाविश्वात वावरत असतात. वेगवेगळ्या कवींच्या कविता वाचणे, ऐकणे, संग्रह करणे, काव्यवाचनाचे कार्यक्रम पाहणे आणि इतर रसिकांना आपल्याला स्वतःला आवडलेल्या कविता ऐकवणे, अश्या नादात ते मश्गुल असतात. या रसिकांची बातच निराळी.आणि एखाद्या प्रसंगी एखादी चपखल कविता किंवा अगदी अचूक अश्या कवितेच्या दोनच ओळी ऐकवणे अश्या गोष्टींमध्ये यांचे आनंद डुलत असतात. ऐकणारा आणि ऐकवणारा जर या धामधुमीत एकाच जातकुळीचा निघाला तर मग होणारा आनंद केवळ अवर्णनीय.

मी देखील अशीच एक काव्य रसिक. लग्नापूर्वी २०-25 वर्षांपूर्वी पुण्यात असताना बी. जे. मेडिकलच्या ग्राउंडवर वसंत बापट,विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर त्रयींना ऐकले होते, ती संध्याकाळ अजून मला मंतरलेली संध्याकाळ वाटते आहे.. त्या नन्तर पु.ल. सुनीताबाई यांचे बोरकर, मर्ढेकर, आरती प्रभू यांच्यावरचे काव्य वाचनाचे कार्यक्रम अगणित वेळा पहिले, त्या आठवणी मनात रुंजी घालत असतात. परंतु आताशा अमेरिकेत राहत असल्याने काव्यवाचन ऐकण्याच्या संधी वाट्याला येत नाहीत. आयुष्यावर बोलू काही सारखा कार्यक्रम जेव्हा महाराष्ट्रात गाजत असतो तेव्हा इथे माझ्यासारख्या कवितेवर प्रेम करणारीला चुटपूट लागून राहते. असो. (याला अपवाद म्हणून मागच्या वर्षी संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा एक काव्यवाचनाचा कार्यक्रम इथे अमेरिकेत पाहायला मिळाला)

या सर्व पार्श्वभूमीवर एक दिवस अचानक इंटरनेटवर ‘कवितेचे पान’ या वेब-सिरीजची झलक पहिली. ही संकल्पना मधुराणी प्रभुलकर यांची. आणि त्या स्वतःच या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक आहेत. प्रत्येक वेब एपिसोड मध्ये एका कवीची मुलाखत आणि त्या कवीच्या कविता असे या कार्यक्रमाचे सर्व साधारण स्वरूप ठरले होते. या कार्यक्रमात कवी स्वताच्या कविता सादर करतात. शिवाय मधुराणी प्रभुलकर देखील त्या कवीच्या एक दोन कविता वाचतात. तर कधी कधी एखादी थीम घेवून वेगवेगळ्या कविता सादर केल्या जातात. एका एपिसोडमध्ये संगीतकार कौशल इनामदार यांनी नलेश पाटील यांच्या पावसावरच्या कविता गाऊन दाखवल्या होत्या, तर दुसऱ्या एका एपिसोडमध्ये चंद्रकांत काळे यांनी विं.दा. करंदीकर यांच्या कविता सादर केल्या होत्या. एकदा तर शर्वरी जमेनीस यांनी नृत्यातून कविता सादर केली होती.

एखाद्या कवीची कविता त्या कवीच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकणे हा तर दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा. आणि तेसुद्धा अगदी घरबसल्या हवे तेव्हा. प्रचंड खूष होत ‘हा खरा टेक्नोलॉजीचा योग्य वापर’ असे म्हणत या संकल्पनेलाच मनातल्या मनात सलाम केला. आता कविता ऐकायला महाराष्ट्रातच जायला हवे असे नाही.

मला हा कार्यक्रम विशेष आवडण्याचे कारण म्हणजे मधुराणी यांनी केलेले कवितांचे केलेले हे विविध प्रकारचे सादरीकरण, गप्पांच्या उत्साही वातावरणात विचारलेले नेमके प्रश्न, आणि कार्यक्रम रंगवत नेण्याची त्यांची हातोटी. चुकवू नये असे काही या धर्तीचा हा २०-25 मिनिटांचा हा छोटासा आटोपशीर वेब एपिसोड सर्व काव्यप्रेमीना तर आवडेलच. शिवाय अनेक प्रेक्षकांना कवितेच्या प्रेमात पडायला लावेल यात शंका नाही.

आत्तापर्यंत संदीप खरे, वैभव जोशी, चंद्रकांत काळे, संजीवनी बोकील, अरुण म्हात्रे, गुरु ठाकूर अश्या अनेक मातब्बर कवींचे कवितावाचन आणि मुलाखती सदर झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच विख्यात ज्योतिषकार संदीप अवचट यांची वेगळीच बाजू सादर करणारा त्यांच्या कवितांचा एपिसोड अपलोड झाला आहे.

अलिबाबाचा हा खजिना नुकताच उघडला आहे. जुने दिग्गज कवी तर आहेतच. पण जोडीला नव्या काळातील नवे नवोदित कवी देखील या कार्यक्रमाद्वारे आपल्या भेटीस येतील. वेगवेगळ्या थीम वरचे कार्यक्रम सादर होतील. एका पाठोपाठ एक असे अगणित काव्यवाचनाचे कार्यक्रम सादर होत राहतील. अजूनही बरेच कवी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत या कल्पनेनेच मला खूप छान वाटत आहे.

कवितेच्या राज्यात रमून जायला ही एक नामी संधी आहे. काव्यप्रेमीना अजून काय पाहिजे? मधुराणी, तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.

कलाकवितातंत्र

प्रतिक्रिया

चाणक्य's picture

16 Jun 2018 - 6:26 am | चाणक्य

हो चांगली आहे ही वेबसिरीज.

यशोधरा's picture

16 Jun 2018 - 7:16 am | यशोधरा

लेख आवडला. वेबसिरिज शोधून नक्की बघेन.

‘कवितेचे पान’ अतिशय सुंदर वेबसिरीज आहे. मधुराणी यांची काव्याची समज, भाषेवरील पकड आणि गोड आवाज यामुळे प्रत्येक एपिसोड सुंदर झाला आहे. फार उत्कटपणे कवितांचा आस्वाद घेणार्‍या पाहुण्यांची भेट या वेब सिरीजमुळे घडली आहे. शर्वरी जमेनीस, सम्दिप खरे, पुण्याच्या कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी, सौमित्र यांचे एपिसोड्स विशेष आवडले.