औषधशास्त्र, औषधे, वैद्यक ४

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in जनातलं, मनातलं
4 Jun 2018 - 7:56 am

औषधशास्त्र, औषधे, वैद्यक ४: अबू बकर मुहम्मद इब्न झकारिय्या अल राझी

औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: १ https://www.misalpav.com/node/42703
औषधशास्त्र, औषधे, वैद्यक २ https://www.misalpav.com/node/42705
औषधशास्त्र, औषधे, वैद्यक ३ https://www.misalpav.com/node/42744

जसे क्लॉडीअस गॅलेनला टाळता येत नाही तसेच अल राझीला देखील टाळता येत नाही एवढे त्याचे कार्य महान आहे. अल राझी हे एक पर्शियन विचारवंत, गणिती, वैद्य, रसायनशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि वैद्यकीय इतिहासातले महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. विविध क्षेत्रात त्याने चिरस्थायी असे विचार देऊन महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. त्याची दोनशेच्या वर हस्तलिखिते आज उपलब्द्थ आहेत. त्यातून हा मोलाचा ठेवा सापडलेला आहे. अपल्या निरीक्षणातून आणि शोधांतून त्याने अनेक औषधांचा विकास नोंदला आहे. प्रायोगिक औषधनिर्मितीचा तो आद्य उद्गाता होता. बगदाद आणि रे येथील इस्पितळात प्रमुख वैद्य म्हणुन त्याने काम केलेले आहे. कोणत्याही क्षेत्रात रस असलेल्या तरुण विद्यार्थ्यांना त्याच्या व्यक्तिमत्त्वाची भुरळ पडे. अतिशय दयाळू तसेच रुग्ण गरीब असो वा श्रीमंत, आपल्या रुग्णांविषयी आस्था असलेला आणि आपल्या रुग्णांच्या सेवेला वाहून घेतलेला असा वैद्यराज असे त्याच्याबद्दल बोलले जात असे.

चतुःस्राव उपपत्तीचा वापर करणारा आणि संसर्गजन्य विकारांमधील भेद ओळखणारा तो पहिला वैद्यराज होता. गोवर आणि देवी यावरील एक मार्गदर्शक ग्रंथ त्याने लिहिलेला आहे. त्यात त्याने या रोगांची वौशिष्ट्ये दिलेली आहेत. त्याने अनेक संयुगे आणि रसायने शोधून काढली. त्यात मद्यार्क आणि रॉकेलचा समावेश आहे असे जालावर म्हटलेले आहे. मद्यनिर्मिती आणि प्राशन ज्ञात इतिहासपूर्वकालापासून चालत आले असावे. त्यामुळे याने बहुधा मद्यनिर्मितीची नवी पद्धत शोधली असावी.

अनुवादातून त्याचे वैद्यकीय क्षेत्रातले संशोधन आणि संकल्पना मध्ययुगीन युरोपातील वैद्यकीय व्यावसायिकांना ज्ञात झाल्या आणि त्याच्या संकल्पनांचा पाश्चात्य वैद्यकीय शिक्षणावर फार मोठा प्रभाव पडला. शल्यक्रियेवरील त्याच्या ‘अल मन्सूरी’ या ग्रंथाच्या ‘ऑन सर्जरी’ आणि ‘अ जनरल बुक ऑन थेरपी’ या खंडांचा पाश्चात्य विद्यापीठामधील वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश झाला. एडवर्ड ग्रॅनव्हिल ब्राउनेच्या मते तो मुस्लिम वैद्यकीय व्यावसायिकातला सर्वश्रेष्ठ आणि अस्सल होता. त्याने विपुल लेखन केलेले आहे. बालरोगांवर पहिला वैद्यकीय ग्रंथ राझीने लिहिला म्हणून त्याला बालरोगशास्त्राचा पिता - फादर ऑफ पेडिऍट्रीक्स असे गौरवाने म्हणतात. तसेच (कवींचे कवी बोरकर या न्यायाने) डॉक्टरांचा डॉक्टर आणि नेत्ररोगशास्त्राचा आदर्श असा त्याचा आदराने गौरव केला गेलेला आहे.

राझीचा जन्म इराणमधील रेशीम मार्गावरील रे Rey इथला इ.स. ८५४ सालचा. तेहेरानजवळील अल्बुर्झ पर्वताच्या दक्षिणेकडील उतारावर रे हे प्राचीन शहर वसलेले आहे. प्राचीन पर्शियन त्याचा उच्चार राघा असा करीत तर बॅक्ट्रीयन रागा असा करीत. मालवणचे जसे मालवणकर तसे Rey शहरातले ते राझी. रेशीम मार्ग हे रेशमाच्या व्यापारावरून पडलेले नाव जरी असले आणि मुख्यतः व्यापारासाठीच हा मार्ग जरी ख्यातकीर्त असला तरी हा मार्ग सांस्कृतिक आणि वैचारिक देवाणघेवाणीचे फारच मोठे साधन झाला होता. पश्चिमेकडील जसे व्यापारी आले तसे अनेक थोर विचारवंत, प्रवासी वगैरे या मार्गानेच पूर्वेला आले आणि त्यांनी पश्चिमेच्या संस्कृतीची पूर्वेकडील भारत, चीन इ. समृद्ध आणि प्रगत देशांना ओळख करून दिली. त्याचप्रमाणे पूर्वेकडीलही अनेक प्रवासी आणि विचारवंत पश्चिमेकडे गेले आणि त्यांनी पूर्वेकडच्या संस्कृतीची पाश्चिमात्यांना ओळख करून दिली. तलवारीसारख्या हत्त्यारांना लागणारे दमास्कस पोलाद आणि बरेच तंत्रज्ञान याच मार्गाने पूर्वेला आले. पौर्वात्य देशातून मुख्यतः तत्त्वज्ञान, मसाले, रेशीम आणि रत्ने-हिरेमाणके याच मार्गाने पश्चिमेला जात असत. मुख्य म्हणजे शून्य य संख्येची संकल्पना देखील भारतातून अरब देशात आणि तिथून पश्चिमेकडे गेली. असो.

तरुण वयात राझी बगदादला गेला. तिथल्या स्थानिक बिमारीस्तानमध्ये (किती समर्पक शब्द आहे! अर्थ सांगायची जरूरच नाही.) त्याने शिक्षण घेतले आणि औषधोपचार देखील दिले. नंतर मात्र रे चा शेख मन्सूर इब्न इशाक याने त्याला परत बोलावले आणि रे मधल्या बिमारीस्तानचे प्रमुखपद दिले. वैद्यकीय विषयावरील आपले दोन ग्रंथ त्याने मन्सूर इब्न इशाकला अर्पण केलेले आहेत. मिळत असलेल्या ताज्या प्रसिद्धीमुळे राझीला इ.स. ९०२ मध्ये बगदादहून आमंत्रण आले. तिथे त्याला अल-मुतदीद या नव्या रुग्णालयाची धुरा सांभाळावी लागली. अल मुतदीद या संस्थापकाचे नावच या रुग्णालयाला दिलेले आहे.

आयुष्याच्या अखेरच्या दिवसात त्याला काचबिंदूने - ग्लॉकोमाने पछाडले. मोतीबिंदूने सुरुवात झालेला नेत्रविकार बळावून शेवटी त्याला पूर्ण अंधत्व आले. अंधत्वाचे कारण मात्र अज्ञातच राहिले. इब्न जुलजुल याने एके ठिकाणी म्हटले आहे की रसायनशास्त्रातील काही सिद्धान्तांचे पुरावे देता न आल्यामुळे ‘रे’चा शेख मन्सूर इब्न इशाक याने त्याच्या डोक्यावर प्रहार केला त्यामुळे त्याला अंधत्व आले. तर अबुलफराज आणि कैसिरी यांच्या मते वाल (बीन्स) जास्त खाणे हेच अंधत्वाला कारण झाले. सावधान मित्रमैत्रिणिंनो! वाल जपून खा!!

राझीला अंधत्व आल्यावर एक हकीम त्याला भेटला आणि डोळ्यात घालायला मलम दिले. त्या हकीमाला राझीने विचारले की डोळ्यात किती थर किंवा पापुद्रे असतात. याचे उत्तर तो हकीम देऊ शकला नाही. ज्याला शरीररचनेचे ज्ञान नाही त्याचे औषध मी वापरणार नाही असे म्हणून त्याने ते मलम वापरायला नकार दिला अशीही एक दंतकथा आहे. हे टंकतांना एक माणूस माझ्याकडे आला. काय लिवतांस विचारल्यावर हा किस्सा सांगितला त्यावर तो म्हणाला की मेलो तर अन्न खाऊनच मरतो, तुझे अडाण्याचे औषध लावून कशाला मरू? असे त्याने म्हटले असेल.

राझीच्या व्याख्यानांकडे अनेक विद्यार्थी आकर्षित झाले. अपल्या फिहरिस्त या ग्रंथात इब्न अल नदीम म्हणतो की राझीला शेख ही पदवी देऊन त्याचा गौरव केला गेला. ज्याच्याभोवती विद्यार्थ्यांच्या अनेक मंडळांचा गराडा असतो अशा व्याख्यात्याच्या अधिकारपदावरील व्यक्तीलाच ही पदवी दिली जाते. एखादा कूटप्रश्न जेव्हा विचारला जात असे तेव्हा तो सोडवण्यासाठी वा उकल करण्यासाठी तो अगोदर विद्यार्थ्यांच्या प्रथम मंडळांकडे सोपविला जात असे. उकल न झाल्यास तो द्वितीय मंडळाकडे जाई असे चक्र असे. जर कोणीही उकल करू शकले नाही तर राझी स्वतः उकल करीत असे.

इब्न अल नदीम याने एक घटना नोंदवली आहे. एक चिनी विद्यार्थी राझीच्या व्याख्यानांना हजेरी लावीत असे. ५ महिन्यांनी तो अरबी भाषेत पारंगत झाला. गॅलेनचे संशोधनपर लेख त्याला राझी मोठ्याने वाचून दाखवीत असे. त्या चिनी विद्यार्थ्याने राझीने वाचून दाखवलेले सारे चिनी भाषेत लिहून घेतले होते. (कॉलेजात असतांना माझ्या प्रयोगशाळा टिपणाच्या रफ बुकात मी चिनी वा ग्रीकमध्ये लिहून घेतो असे एकदा मला एक डेमॉन्स्ट्रेटर म्हणाली होती.)

मॅनेन्जायटीसवर राझी रक्तमोचनाचा उपाय करीत असे. हे बरोबर होते की चुकीचे हे डॉक्टर लोकच ठरवतील.

औषधनिर्मितीवर अल राझीने बरेच लिखाण केलेले आहे. पार्‍याच्या संयुगांची मलमे त्याने बनवली. ती बनवण्यासाठी अल राझीने मॉर्टर्स, खलबत्ते, चंबू, चमचे - स्पेट्यूलाए आणि बाटलिका - व्हायल्स असे साहित्य बनवले जे प्रयोगशाळातून आजही वापरले जाते.

व्यावसायिक पातळीवर अल राझीने व्यावहारिक, द्रष्ट्या, औषधी आणि मनोवैज्ञानिक कल्पना राबवल्या. शहरांतून आणि देशभर गावोगाव फिरून नकली औषधे विकणार्‍या आणि इतर उपाय करणार्‍या कुडबुड्या आणि नकली डॉक्टर्सवर त्याने कठोर टीका केली. त्याचबरोबर कितीही उच्चशिक्षित असला तरी डॉक्टरकडे प्रत्येक वैद्यकीय तक्रारीवर उत्तर नसते आणि डॉक्टरकडे सर्व व्याधींवर औषध नसते वा प्रत्येक आजारावर इलाजही नसतो आणि ते मानवाला अशक्यच आहे असे तो म्हणे. आपली सेवा जास्त उपयुक्त होण्यासाठी तसेच आपल्या व्यवसायाशी इमान राखण्यासाठी प्रत्येक डॉक्टरने आपले ज्ञान अद्ययावत ठेवले पाहिजे आणि त्यासाठी सतत वैद्यकीय पुस्तकांचे वाचन करीत राहिले पाहिजे बाहेरच्या जगात नवे काय चालले आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे त्याचे मत होते. त्याने बरे होणारे आणि बरे न होणारे आजार यातील फरक स्पष्ट केला होता. विकोपाला गेलेल्या कर्करोग वा कुष्ठरोग बरा करू न शकल्याबद्दल डॉक्टरला कधीही दोष देऊं नये असे त्याचे मत होते. राजपुत्र, उमराव आणि स्त्रिया यांच्यावर इलाज करणार्‍या डॉक्टर्सची मला दया येते कारण ही मंडळी डॉक्टरांच्या सूचना, पथ्यापथ्य पाळत नाहीत आणि त्यामुळे यांना बरे करणे कठीण असते असे तो विनोदाने म्हणे.

एखाद्याचे भले करणे हाच डॉक्टरचा हेतू असतो, मग तो शत्रू का असेना. मित्रांबद्दल तर यापेक्षा बरेच जास्त काही वाटते. माझा व्यवसाय कुणालाही इजा पोहोचविण्याच्या विरुद्ध आहे कारण हा व्यवसाय मानवजातीच्या कल्याणासाठी बनला आहे अणि कोणावरही कोणताही प्राणघातक उपाय करू नये अशी डॉक्टरांना ईश्वराची शपथ आहे असे त्याने लिहून ठेवलेले आहे.

अल राझीकृत नऊ खंडातला अल हावी हा वैद्यकीय ज्ञानकोश पाश्चात्य जगात ‘द लार्ज कॉम्प्रेहेन्सीव्ह’ किंवा ‘कॉन्टीनेन्स लिबर’ या नावांनी ज्ञात आहे. यात ऍरिस्टॉटल आणि प्लेटो यांच्या संशोधनावरील चर्चा आणि टीका आहे. याखेरीज इतर अनेक विषयांवर नवनूतन संकल्पना आहेत. या ग्रंथामुळेच पाश्चात्य जगतात काही विद्वानांनी अल राझीला मध्ययुगातला सर्वश्रेष्ठ वैद्यराज असे संबोधले आहे. परंतु हा काही सर्वसाधरण ज्ञानकोष नसून अल राझीच्या मृत्यूनंतर केलेले त्याच्या टिपणांचे संकलन आहे. या टिपणात इतर ग्रंथातून घेतलेल्या माहितीबरोबरच व्याधी आणि उपाययोजना याबद्दलची राझीची स्वतःची अनुभवसिद्ध निरीक्षणे आहेत. यात देवी रोगावर स्वतंत्र प्रकरण आहे ते खूप गाजले. देवीवरचे अशा प्रकारचे हे पहिल्यांदाच लिहिले गेले आहे. सन १२७९ मध्ये या ग्रंथाचा फराझ बेन सलीम याने लॅटीनमध्ये अनुवाद केला. या अनुवादाचा युरोपात मोठा प्रभाव पडला.

अल हावीमध्ये गॅलेनवर बरीच टीका आहे कारण गॅलेनची काही व्याधींबद्दलचीची ज्वर आणि इतर लक्षणे जुळत नव्हती. उदाहरणार्थ अल राझी म्हणतो की गॅलेनची मूत्रविकारांची वर्णने चुकीची आहेत. गॅलेनने मूत्रविकाराचे फक्त तीन रोगी पाहिले होते तर अल राझीने बगदाद आणि रे इथल्या इस्पितळात मूत्रविकाराच्या शेकडो रुग्णांवर इलाज केले होते.

अल राझी हा बहुधा पहिला पर्शियन डॉक्टर होता की ज्याने सर्वसामान्य माणसांसाठी घरगुती वैद्यकीय पुस्तिका लिहिली होती. मन ला यहदुरुहु अल तबीब ही ती पुस्तिका. गरीब लोक, प्रवासी आणि सर्वसामान्य माणसे यांना त्याने ही पुस्तिका अर्पण केली आहे. जेव्हा डॉक्टर उपलब्ध नसेल तेव्हा सर्वसामान्य वैद्यकीय तक्रारींच्या निवारणासाठी मदत व्हावी म्हणून लिहिलेली पुस्तिका. औषधनिर्मिती शास्त्रासाठी ही पुस्तिका फारच मह्त्त्वाची ठरली कारण अशी पुस्तके अजूनही लोकप्रिय आहेत. या पुस्तिकेत ३६ प्रकरणातून औषधी उपाय, विविध आहारांश आणि औषधांश कुठे उपलब्ध होतील ती ठिकाणे उदा. दवाखाने, बाजार, सुसज्ज भटारखाने, लष्करी छावण्या यांचे वर्णन आहे. अशा रीतीने कोणीही चतुर व्यक्ती पुस्तिकेतील सूचना वाचून गुणकारी औषध सिद्ध करू शकत असे. उदा. गुलाबाच्या फुलांपासून बनवलेली एक पाककृती ज्वरावर दिलेली आहे तर व्हायोलेट फुले आणि नासपती यांची एक पाककृती सारक म्हणून दिलेली आहे.

आपल्या ग्रंथातून राझी गॅलेनच्या दाव्यांबाबात शंका व्यक्त करतो. ग्रीक भाषेला तथाकथित वरचा दर्जा देणे राझीला मान्य नाही तसेच विज्ञानातले आणि वैद्यकीय क्षेत्रातले गॅलेनचे अनेक दृष्टीकोन त्याला अमान्य आहेत. तो वैद्यकीय ज्ञानाला तत्वज्ञानाची जोड देतो आणि सांगतो की ठोस वैद्यकीय व्यवसायासाठी स्वतंत्र विचारांची गरज आहे. तो सांगतो की त्याच्या तापाच्या आलेखाबद्दलच्या निरीक्षणाशी गॅलेनची वर्णने जुळत नाहीत. आणि काही प्रकरणात त्याचे वैद्यकीय अनुभव गॅलेनच्या पुढे नेतात.

चतुस्त्राव सिद्धान्तात राझीने काही त्रुटी दाखवलेल्या आहेत. राझीने प्रचलित वैद्यकाला दिलेले हे आव्हान वादग्रस्त होते. तरीही आपल्या ग्रंथात राझीने

हा ग्रंथ लिहितांना मला मार्गदर्शन करावे आणि सत्याकडे न्यावे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना केली. ज्याच्या ज्ञानाच्या महासागरातून मी बरेच काही उचलले आहे त्या गॅलेनला विरोध करतांना वा त्याच्यावर टीका करतांना मला यातना होत आहेत. जरी गॅलेनचे शहाणपण आणि त्याच्याबद्दलचा आदर माझ्या मनात असला तरी त्याच्या सिद्धान्तातील चुकांबाबत शंका घेण्यापासून मी परावृत्त होतां कामा नये. मला मनापासून वाटते की आपले अपूर्ण कार्य पुढे नेण्यासाठी गॅलेननेच मला निवडलेले आहे आणि जर आज तो जीवित असता तर मी जे करतो आहे त्याबद्दल त्याने माझे अभिनंदनच केले असते. हे मी लिहितो आहे कारण गॅलेनचा हेतू सत्य शोधण्याचा आणि अंधारातून प्रकाश शोधण्याचा होता. मी प्रकाशित केलेले वाचायला तो हवा होता असे मला खरोखरच वाटते.

अशा अर्थाचा मजकूर लिहिलेला आहे. यावरून राझीचे विचार किती परिपक्व होते आणि व्यक्तिमत्व किती नम्र आणि सुस्वभावी होते हे ध्यानात येते.

तरीही अनेकांनी राझीची अडाणी आणि उर्मट अशी संभावना केलेली आहेत. राझीने इतरत्र केलेल्या गॅलेनच्या वाखाणणीबद्दल आणि गॅलेनच्या योगदानाबद्दल आणि घेतलेलेल्या श्रमाभद्दल राझीने गॅलेनचे ऋण मान्य केलेले आहे याकडे मात्र या टीकाकारांनी काणाडोळा केलेला आहे.

प्राचीन ज्ञानात साचलेपण आलेले होते तसेच आजच्या वैज्ञानिकांना प्राचीन वैज्ञानिकांपेक्षा माहितीचा जास्त साठा, जास्त संकल्पना आणि जास्त सोयीसुविधा उपलब्ध होत्या त्यामुळे आजचे ज्ञान हे प्राचीन ज्ञानाच्या पुढे गेलेले असणार यावर अल राझीचा विश्वास होता.

बालरोगांचा परामर्श घेणारे डिसीझेस ऑफ चिल्ड्रेन हे बालरोगावरचे पहिलेच पुस्तक आहे. त्यामुळेच अल राझीला बालरोगविज्ञानाचा पिता असे म्हटले जाते.

दुष्ट शक्ती मानवी शरीरात प्रवेश करून देहाचा ताबा घेतात आणि मनोविकार निर्माण करतात असे अल राझीचे मत होते.

स्वभावतः राझी हा उदार होता आणि आपल्या रुग्णांविषयी त्याला सहानुभूती होती. गरीबांसाठी तो दानशूर होता, कोणत्याही स्वरूपात शुल्क न स्वीकारता तो गरीबांवर उपचार करीत असे. पैसे घेऊन ‘फिजीशियन सॅम्पलस’ रुग्णांना विकणारे, गरीबांकडून देखील फी सोबत विविध भेटवस्तू स्वीकारणारे, औषधांच्या किंमतीत आणि स्पेशिआलिस्टसच्या कन्सल्टींग फीमध्ये ‘कट’ ठेवणारे आजचे सुखवस्तु डॉक्टर्स पाहिले की राझीचे अपार कौतुक वाटते. त्याचबरोबर आज काही सुखवस्तू रुग्ण देखील आर्थिकदृष्ट्या मागास लोकांसाठी रक्षित असलेल्या सोयीसुविधा खोटी प्रमाणपत्रे देऊन स्वस्तात वा विनामूल्य उपटणारे असतात. गरीब श्रीमंत हा भेद तसा धूसर आहेच. (उत्पन्न, अवलंबून असणार्‍या व्यक्ती, कालस्थलपरत्त्वे राहणीमानाप्रमाणे खर्च, गरजा हे समीकरण तसे क्लीष्टच. तो विषय वेगळा आहे.) कालाय तस्मै नम:. यहदुरुहू अल तबीब नावाची ‘ज्याला रोगमुक्ती द्यायला कुणीही हकीम नाही’ अशा अर्थाचे शीर्षक असलेली आचारसंहिता त्याने औषधी उपाययोजनेचा अंतर्भाव करून लिहिली. अल बिरूनी लिहितो (मराठीमध्ये अल्बेरुणी) की राझीच्या अखेरच्या दिवसात तबरीस्तानचा एक माजी विद्यार्थी त्याची शुश्रुषा करायला गेला परंतु त्याच्या हेतूचा आदर करून आता माझे दिवस भरत आले आहेत असे सांगून सन्मानपूर्वक त्याला परत पाठवले. आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देखील आयुष्याच्या अखेरच्या दिवसांत अन्नपाण्याचा त्याग करून जीवन संपुष्टात आणले होते. अल बिरूनी हा विचारवंत राझीला आपला गुरू मानत असे. सर्वात अगोदर त्याचे चरित्र अल बिरूनीनेच लिहिले आहे तसेच त्याच्या विविध संशोधनपर लेख, प्रबंध इ. लिखाणाची अकारविल्हे सूची पण बिरूनीने बनवली. अल बिरूनीच्या मते इ.स. ९२५ मध्ये राझीचा मृत्यू झाला.

मृत्यूनंतर राझीची कीर्ती मध्यपूर्वेपलीकडे युरोपात पोहोचली. पीटरबरो ऍबे येथील ग्रंथालयातल्या सुमारे चौदाव्या शतकातल्या सूचीमध्ये दहा वैद्यकीय विषयावरील ग्रंथांचा सहलेखक म्हणून राझीचा समावेश केलेला आहे. राझीचे मानवजातीवरचे ऋण आपण विसरू शकत नाहीच. तेव्हा त्याचे वंदनस्मरण करूनच हा लेखांक संपन्न करूयात.

क्रमशः

विज्ञानमाहिती

प्रतिक्रिया

परिश्रमपूर्वक सिद्ध केलेला फार उपयुक्त आणि माहितीपूर्ण लेख. आणखी असेच लेख येऊ द्यात.

यशोधरा's picture

4 Jun 2018 - 10:55 am | यशोधरा

सुरेख लेखमालिका.
हा लेखही खूप आवडला.

सुधीर कांदळकर's picture

4 Jun 2018 - 7:44 pm | सुधीर कांदळकर

अनेक धन्यवाद.