औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: ३

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in जनातलं, मनातलं
4 Jun 2018 - 7:17 am

औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: १
औषधशास्त्र, औषधे, वैद्यक ३
गेल्या लेखांकात क्लॉड गॅलेन हे नाव अनेक वेळा येऊन गेले. गॅलेनच्या कार्याचा परिचय करून घेतल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. क्लॉड गॅलेन वा लॅटीनीकृत क्लॉडिअस गॅलेनस. मी लॅटीनमध्ये लिहीत असतो तर सुधीरस कांदळकरस असे नाव लिहिले असते वा संस्कृतमधून लिहीत असतो तर सुधीरम कांदळकरम असे (सु)संस्कृत नाव धारण केले असते. चंद्रगुप्त याचे तर ग्रीकांनी त्यांच्या भाषेत सेन्ड्रोकॉटस असे बारसे केलेले आहे. युआन च्वांग वा ह्युएन त्सॅंगचा खरा उच्चार काय होता कोण जाणे. असो, नामाय नमो नमः. गॅलेनच्या महान कार्याचा आता वेध घेऊयात. जालिनूस या नावाने देखील क्लॉडीअस गॅलेनचा अनेक ठिकाणी उल्लेख केला गेलेला आहे. जालिनूस हे बहुधा गॅलेन या नावाचेच अरबी रूप असावे. इ.स. १२९ साल हे क्लॉडीअस गॅलेनचे जन्मवर्ष. त्या काळी परगॅमोन म्हणून ज्ञात असलेल्या शहरात जन्म. तेव्हा सांस्कृतिकदृष्ट्या भरभराटीला आलेल्या या शहरात विचारवंतांचा भरणा होता. इथल्या मौल्यवान ग्रंथसंपदा असलेल्या Eumenes II या ग्रंथालयाबद्द्ल हे शहर ख्यातकीर्त झालेले आहे. परगॅमोनचा माजी राजा युमेनस् २ याचे नाव् या ग्रंथालयाला दिलेले आहे. इथे विविध विचारधारांचे तत्त्ववेत्ते होते. आज परगॅमॉन हे शहर तुर्कस्तानमध्ये असून बरगमा या नावाने ओळखले जाते. गॅलेनचे वडील एलीअस निकॉन हे एक श्रीमंत वास्तुशास्त्रज्ञ आणि बिल्डर होते. तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, खगोलशास्त्र आणि वाङ्मय अशा विविध विषयांत गती असलेल्या आपल्या विद्वान पित्याबद्दल गॅलेनने ‘अतिशय लोभस, न्यायी, सुस्वभावी आणि उदारमतवादी व्यक्तिमत्व’ असे म्हटलेले आहे. त्यांनी क्लॉडीअससाठी राजनीती, तत्त्वज्ञान इ. क्षेत्रातील पारंपारिक शिक्षणाची व्यवस्था केली. कुमारवयातील गॅलेनला राजनीती, तत्त्वज्ञान इ. विविध क्षेत्रातील विद्वानांचा सहवास लाभला.

गॅलेन पंधरा वर्षांचा असतांना सन १४५ मध्ये त्याच्या वडिलांना स्वप्नात एक दृष्टांत झाला. या स्वप्नात वैद्यकशास्त्राचा देव खुद्द असक्लेपीअस प्रकट झाला आणि आपल्या पुत्राला वैद्यक शिकायला पाठव अशी त्याने गॅलेनच्या पित्याला आज्ञा केली असे गॅलेनने म्हटलेले आहे. (हे बरे आहे. न पटणारा विचार इतरांच्या गळी उतरवायचा असेल तर स्वप्नात देवाने दृष्टान्त दिला असे म्हणावे. कोणाची टाप लागली आहे विरोध करायला!) त्यानंतर मात्र अजिबात न कचरता त्यांनी असक्लेपिअसला अर्पिलेल्या ‘असक्लेपिया’ स्थानिक वैद्यकीय शिक्षणसंस्थेत थेराप्यूट वा चिकित्सक हा चार वर्षांचा शिक्षणक्रम शिकण्यासाठी पाठवून दिले. तिथे क्लॉडिअस गॅलेन हा इस्क्रीऑन (Aeschrion), स्ट्रॅटोनिकस (Stratonicus) आणि सातिरस (Satyrus) यांच्या प्रभावात आला. ‘असक्लेपिया’ तेव्हा आरोग्यकेंद्रासारखे कार्य करणारी संस्था म्हणून कार्यरत होती. रुग्ण तिथे धर्मगुरूंकडून सेवाशुश्रुषा करून घेण्यासाठी येत. परगॅमोनमधील मंदिरात आजारपण आणि व्याधींपासून मुक्ती मिळवण्यासाठी औषधोपचार घेण्यासाठी रोमन लोक वारंवार येत. सुप्रसिद्ध इतिहासकार क्लॉडिअस कॅरॅक्स, इलीअस ऍरिस्टाईडेससारखा वक्ता, पोलेमोसारखे वितंडवादी, कस्फिअस रूफिनससारखे मुत्सद्दी अशी शेलकी मंडळी परगॅमोनमध्ये नेहमी येत.

सन १४९ साली क्लॉडीअसच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांनी त्याच्यासाठी बरीच संपत्ती मागे ठेवली. त्याने मग हिपोक्रेटसची शिकवण अनुसरली. त्यासाठी त्याने स्मर्ना (आताचे इझ्मीर्) कोरिन्थ, क्रीट, सिसिलिया (आताचे क्युकोर्व्हा) सायप्रस इ प्रदेशात भटकंती केली. शेवटी तो अलेक्झान्ड्रियाच्या मातब्बर् वैद्यकीय संस्थेत येऊन थडकला. इथे त्याचा वैद्यकीय क्षेत्रातील विविध विचारधारांची परिचय झाला. वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी सन १५७ मध्ये तो परगॅमोनला परत आला. आशियाच्या अतिशय धनसंपन्न आणि प्रभावशाली अशा उच्च धर्मगुरूंच्या पदरी असलेल्या योद्ध्यांचा वैद्यकीय चिकित्सक म्हणून त्याने काम केले. एका गोरिलाचे शरीर मी छेद घेऊन उघडले आणि शस्त्रक्रिया करून दोष दूर करून ते पुन्हा पहिल्यासारखे करून दाखवा असे आव्हान त्याने इतर चिकित्सकांना दिले. परंतु कोणीही हे आव्हान स्वीकारीत नाही असे पाहून त्याने ते स्वतः शिवून पहिल्यासारखे करून दाखवले. तेव्हा त्याच्या स्पर्धकांना बाजूला सारून मुख्य धर्मगुरूने त्याची निवड केली अशी मनोरंजक कथा गॅलेनने सांगितलेली आहे.

अलेक्झन्ड्रियात त्याला आहार, निरोगी - सुसज्ज शरीर, आरोग्य आणि रोगप्रतिबंधक उपाय या गोष्टींचे महत्त्व त्याने तिथे व्यतीत केलेल्या चार वर्षांत कळले. तसेच जिवंत शरीराची शरीररचना, अस्थिभंग इलाज, आणि गंभीर आघातजखमांवरील उपचार यांचेही ज्ञान त्याने मिळवले. गंभीर जखमांना तो शरीराच्या आत उघडणार्‍या खिडक्या असे म्हणे. या चार वर्षात केवळ पाच योद्ध्यांचा मृत्यू झाला. त्याच्या अगोदरच्या चिकित्सकाच्या कार्यकालात साठ योद्धे मरण पावले होते; किती कालावधीत वा एकूण किती जखमींपैकी याचा उल्लेख् जरी नसला (विकीवरचे उल्लेख बर्‍याच वेळा असे भोंगळ आढळतात.) तरी पाया जर समान असेल तर तुलनेत त्याचे कार्य ठळकपणे नजरेत भरते. हे काम करतांना त्याने औषधचिकित्सा आणि तत्वज्ञान या विषयावरील् आपला सैद्धान्तिक अभ्यास चालू ठेवला.

सन १६१ साली रोम सतत युद्धात गुंतलेले होते. उत्तरेतील मार्कोमानी इथे मार्कस ऑरेलिअस आणि त्याचा सहकारी ल्यूशिअस व्हेरस लढत होते.

मार्कस ऑरेलियसच्या नेत्रूत्त्वाखाली इ.स. १६९ च्या उन्हाळ्यानंतर सैन्य ऍक्वेलियाला परत येत असतांना प्लेगची साथ उसळली. वैद्यकीय मदतीसाठी मग सम्राटाने गॅलेनला पाचारण केले. मार्कस आणि व्हेरस यांच्यासमवेत त्याला राजवैद्याचे पद घेण्यासाठी जर्मनीला जायचा आदेश मिळाला. पुढील वसंत ऋतूत गॅलेनला सेवामुक्त करावे यासाठी मार्कसचे मन वळवले गेले कारण असक्लेपिया या प्रकल्पाच्या विरुद्ध होते असा अहवाल प्राप्त झाला. युवराज कॉमोडसचा वैद्यराज म्हणून त्याने कार्यभार स्वीकारला. या स्थैर्याचा लाभ उठवत त्याने वैद्यकीय विषयांवर विपुल लेखन केले. ल्यूशिअस व्हेरसचा सन १६९ साली तर मार्कस ऑरेलिअसचा १८० साली मृत्यू झाला. दोघेही प्लेगचे बळी होते. ही प्लेगची साथ फारच भयंकर असावी. डिओ कॅशिअस लिहितो की कॉमोडस सम्राट असतांना इ.स. १८९ मध्ये प्राणिजन्य विकाराची (पेस्टीलन्स हा शब्द वापरलेला आहे)) भयंकर साथ उसळली होती, ही साथ एवढी विध्वंसक होती की साथीच्या ऐन भरात एका दिवसात २००० माणसे मरण्याचा उच्चांक नोंदला गेला. मार्कस ऑरेलिअस सम्राट असतांना प्लेगची जी साथ उसळली होती त्यासारखीच ही साथ होती. कॉमोडसच्या आयुष्यात बराच काळ गॅलेनने त्याच्या सर्वसामान्य व्याधींवर इलाज केले.

गॅलेन आणि प्लेग यांचे नाते अनन्यसाधारण दिसते. इ.स. १६६ मध्ये रोमला उसळलेल्य साथीचे वैद्यकीय इतिहासात अन्तोनिअन प्लेग असे नामकरण केलेले आहे कारण रोमचा सम्राट असलेल्या मार्कस ऑरेलिअसचे आडनाव होते अन्तोनिअस. या प्लेगला गॅलेनचा प्लेग असेही म्हटले गेलेले आहे, ते रास्तच असायला हरकत नसावी कारण या साथीच्या वेळी गॅलेन तिथे प्रत्यक्ष हजर होता आणि त्याने स्वतः आपली वैद्यकीय निरीक्षणे नोंदलेली आहेत. तसेच तो इ.स. १६८-६९ मध्ये ऍक्विलिया इथे सैन्यात उसळलेल्या साथीत देखील तो प्रत्यक्ष हजर होता. दीर्घकाळ टिकणारी साथ अशी टिप्पणी करून त्याने लक्षणे आणि उपचार नोंदवून ठेवलेले आहेत. दुर्दैवाने या नोंदी विविध ठिकाणी विखुरलेल्या आणि फारच त्रोटक आहेत. त्याचा भर उपचारांवर आणि उपचाराच्या शारिरिक परिणामांवर होता आणि भविष्यात वैद्यकीय उपचारासाठी या नोंदींचा उपयोग होईल अशा हेतूने केलेल्या नव्हत्या. नीबहरच्या (Niebuhr) मते साथीची भयंकर तीव्रता हे त्यामागचे कारण असावे. उपचार कारावेत की निरीक्षण नोंदवावे या द्विधेत नक्कीच कुणीही उपचार निवडणार. साथीतील रोगग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण सुमारे ७ ते १० टक्के होते आणि इ.स. १६५-६६ मध्ये सुमारे ३५ ते ५० लाख माणसे दगावली. म्हणजे दोन कोटींच्या वर माणसे रोगग्रस्त झाली असावीत. ओट्टो सीकच्या (Otto Seeck) मते रोमन साम्राज्यातील निम्मी जनसंख्या या साथीत दगावली. जे एफ गिलीयमच्या मते तिसर्‍या शतकापर्यंत इतर कोणत्याही रोगाच्या साथीत दगावली नाहीत एवढी माणसे प्लेगच्या साथीत दगावली. परंतु अन्तोनिअन प्लेग हा प्लेग नसून देवी (स्मॉल पॉक्स) हा रोग होता असेही मानले जाते. विकीवर यासांबंधी आणखी बरीच माहिती दिलेली आहे परंतु ती समजायला माझ्याकडे आहे त्यापेक्षा जास्त वैद्यकीय ज्ञानाची गरज आहे म्हणून मी खोलात शिरलो नाही वा गूगल स्कॉलरवरही गेलो नाही.

गॅलेनच्या नोंदी अपुर्‍या असल्या तरी अशा निष्कर्षाप्रत येण्यासाठी पुरेशा आहेत असे विकीवर म्हटले गेले आहे. विकिपेडियातल्या नोंदी माझ्यासारखा कोणीही ऐरागैरा लिहू शकतो म्हणून बहुतेक संशोधनात ग्राह्य धरल्या जात नाहीत हे मी इथे नमूद करतो. शिवाय माझ्या मनात प्रश्न उभा राहिला की हा जर प्लेग नसून देवी असेल तर या साथीचे वर्णन विकीमध्ये पेस्टीलन्स असे का बरे केले आहे? असो.

देवीवरून आठवले म्हणून थोडे विषयांतर करतो. आधुनिक पाश्चात्य वैद्यकाच्या नावाने खडे फोडणारे विद्वान लोक हे विसरतात की लसीकरणाची पद्धत पश्चात्य वैद्यकानेच विकसित केलेली आहे. देवीसारख्या रोगाचे संपूर्ण उच्चाटन हा लसीकरणाच्या यशाचा ठोस पुरावा आहे. धन्य ते लुई पाश्चर, एडवर्ड जेन्नर, रॉबर्ट कॉख प्रभृती. रोग होण्यापूर्वीच रोगाला विविध ठोस उपायांनी प्रतिबंध करण्यासाठी संशोधन करावे हा विचार इतर औषधप्रणालीत रुजला आहे की नाही ठाऊक नाही. असो.

इ.स. १६२ मध्ये गॅलेन रोमला वैद्यकीय व्यवसाय करायला गेला खरा. पण त्याचा शीघ्रकोपी स्वभाव त्याला नडला असावा वा तिथल्या प्रतिगामी ढुढ्ढाचार्य सहव्यावसायिकांना त्याचे प्रगत विचार आवडले नसावेत. गॅलेन नंतर रोमचा सम्राट सेप्टीमिअस सेव्हेरस याचा राजवैद्य बनला. आपल्या मित्रांसाठी आणि खासकरून तीन विशिष्ट रुग्णांसाठी.

आपल्या मित्रांच्या व निकटवर्तियांच्या उपचारांसाठी औषधांचा चांगला पुरवठा केल्याबद्दल गॅलेनने सेव्हेरस Severus आणि कॅरकाला Caracalla यांना श्रेय दिलेले आहे. या निकटवर्तियांपैकी पैकी एक होते त्याचे गुरू प्रसिद्ध तत्त्ववेत्ते युडेमस. ते आजारी असतांना गॅलेन त्यांना भेटायला गेला होता. थंडीचा मोसम ऐन भरात असल्यामुळे युडेमस यांना त्यांच्या वैद्यराजांनी देवाच्या भरंवशावर सोडले होते. व्याधीभवितव्याचा अंदाज तर्कसंगत बांधणारा गॅलेन रोगनिदान करण्यासाठी सूक्ष्म आणि अचूक निरीक्षण आणि कारणमीमांसा यांची गरज असते असे म्हणत असे. त्या काळी तिथे प्रचलित असलेल्या दैवी शक्ती आणि भविष्यकथन अशा गोष्टींवर आधारित शुश्रुषेवर भर दिला जात असे. फाजील आत्मविश्वास, गर्व असणार्‍या, ‘फालतू प्रश्न विचारायचे नाहीत; तुला काय समजते त्यातले?’ अशा पठडीतील त्याच्या समव्यावसायिकांना ते आवडले नसेलच. दहा वर्षापूर्वी एक तरूण शहरात आला होता आणि त्याने वैद्यकीय प्रात्यक्षिके दाखवली होती. विषप्रयोगाने तो त्याच्या दोन नोकरांसहित मारला गेला होता असे गॅलेनने आपल्याला सांगितल्याचे युडेमस यांनी नोंदले आहे. वेगळा मार्ग चोखाळल्यामुळे इतर बहुतेक वैद्यकीय व्यावसायिकांसी वितुष्ट आल्यामुळे आता बहिष्कार किंवा विषप्रयोग होईल अशा भीतीने बहुधा, त्याने शेवटी रोम सोडले.

व्याधीविकास (हा प्रतिशब्द चुकीचा असू शकतो) वा प्रोग्नॉसिस हे गॅलेनच्या पद्धतीचे ठळक वैशोष्ट्य होते. व्याधीविकासाचे निदान हे रोगनिदानातच सामावलेले होते. आधुनिक पाश्चात्य वैद्यकात रोगनिदान विधान - डायग्नॉस्टीक स्टेटमेन्ट आणि व्याधीविकास विधान प्रोग्नॉस्टीक स्टेटमेन्ट यातील फरक स्पष्ट करून दाखवलेला आहे. हिपोक्रेटसची चतु:स्राव उपपत्ती गॅलेनने जरी झुगारून दिली नसली तरी त्याचा प्रमुख रोख होता तो शरीररचेकडे. कर्मठ धार्मिक पगड्यामुळे त्याला शवविच्छेदन जरी करता आले नव्हते तरी त्याने जिवंत आणि मृत प्राण्यांच्या शरीरांचे विच्छेदन करून जमेल तेवढे ज्ञान मिळवले. त्यासाठी त्याने डुकरे आणि माकडे यांना प्रमुख पसंती दिली. १६व्या शतकाच्या मध्यात ऍन्ड्रीअस वेसालिअसने शरीररचेबद्दल नवे तपशील शोधेपर्यंत गॅलेनच्या या क्षेत्रातील विधानांना धक्का लागला नाही.

गॅलेनच्या कार्याचे आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे रक्ताभिसरणाची संकल्पना. त्याने लाल रक्त आणि काळसर रक्त यातील भेद जाणला होता. काळसर रक्त यकृतात निर्माण होऊन सर्व अवयवांना पुरवले जाते आणि लाल रक्त हृदयात निर्माण होऊन सर्व अवयवांना पुरवले जाते; नंतर यकृतात वा हृदयात काळसर रक्त शुद्ध होऊन लाल होते अशी उपपत्ती त्याने मांडली होती. इब्न अल नफीस याने नंतर हे चुकीचे असल्याचे दाखवून दिले. मज्जासंस्था आणि श्वसनसंस्था यांची ढोबळ संकल्पना गॅलेनने मांडली होती.

दे मोतु मस्क्युलोरम या त्याच्या प्रबंधात गॅलेनने स्नायूंचा अंगभूत ताण (मस्क्यूलर टोन) ही संकल्पना माडली आणि संवेदक स्नायू आणि प्रेरक स्नायू यातील फरक स्पष्ट केला आहे. ऍगोनिस्ट आणि ऍन्टॅगॉनिस्ट्स यातील भेदही त्याने स्पष्ट केला आहे.

गॅलेन हा कुशल शस्त्रक्रियाकार होता. परंतु त्याने केलेल्या शस्त्रक्रिया त्याच्यानंतर अनेक शतके केल्या होऊ शकल्या नाहीत. तो सुईसदृश उपकरणाने करीत असलेली मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आणि आज केली जात असलेली शस्त्रक्रिया यात बरेच साम्य आहे.

गॅलेनच्या मृत्यूदिनाविषयी मात्र विविध संदर्भात एकवाक्यता नाही. इ.स. १९९, २०४, २१६, २१७ असे विविध सालांचे उल्लेख सापडतात.

क्रमशः

विज्ञानमाहिती

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

4 Jun 2018 - 10:51 am | यशोधरा

मनोरंजक माहिती.

सुधीर कांदळकर's picture

4 Jun 2018 - 7:47 pm | सुधीर कांदळकर

धन्यवाद यशोताई.