मागच्या भागात (आकाश के उस पार भी आकाश है) आपण मँडेलब्रॉटने उपस्थित केलेला प्रश्न पहिला. त्या अनुषंगाने कोखचा वक्र आणि अपूर्णांक भूमिती याबद्दलही काही वाचले. या स्व-साधर्म्यामुळे अतिशय कमी क्षेत्रफळाच्या आत प्रचंड मोठ्या लांबीची रेष, रेष म्हणण्यापेक्षा वक्र, कसा काय सामावू शकतो ते पाहिले. सृष्टीमध्ये विलसत असलेले स्व-साधर्म्य मँडेलब्रॉटच्या ध्यानात आले आणि यातूनच प्रेरणा घेऊन त्याने आकृत्यांशी बरेच खेळ केले. अशा स्व-समान गुणधर्म असलेल्या कित्येक आकृत्यांना त्याने जन्म दिला आणि गणिताच्या सहाय्याने कलेशी देखिल दुवा जोडला.
त्याने स्व-साधर्म्य असलेल्या अनेक आकृत्यांना जन्म दिला. त्यांना मँडेलब्रॉटचा संच (Mandelbrot's set) असेही नाव आहे. त्या आकृत्यांना असलेले गणिती मूल्य उलेखनीय आहेच, पण एक नक्षीकाम या दृष्टीने कलाक्षेत्रातही त्यांना खूप महत्व आहे. आपण त्यापैकी काही खाली दिलेल्या आकृत्या पाहून तूर्तास त्यातल्या कलेचा आस्वाद घेऊ.
(स्व-साधर्म्य हा गुणधर्म असलेल्या वरील आकृत्यांमध्ये झूम इन करत गेल्यास आतमध्येही पुन्हा तीच आकृती दृष्टीस पडेल.)
मागच्या भागात आपण पाहिले की या गुणधर्मामुळे कोखच्या वक्राची लांबी अनंत असली तरी ती संपूर्णपणे एका छोट्याश्या वर्तुळाच्या आत वेटोळे घालून बसली आहे. आता हेच स्व-साधर्म्य ३ मितींमध्ये (3 dimensions) कसे पाहता येईल ते बघू. एक घन ठोकळा (cube) घ्या. त्याच्या सगळ्या बाजूंच्या मधून एक एक छोटा ठोकळा काढून टाका (खालची आकृती पाहिल्यास कल्पना येईल). आता मूळच्या ठोकळ्यापेक्षा नवीन अर्धवट पोकळ ठोकळ्याचे घनफळ (volume) कमी झाले आहे. पण त्याच वेळेला ठोकळ्याचा आतला थोडा भाग उघडा पडल्यामुळे त्याचे बाह्य क्षेत्रफळ (outer surface area) वाढले आहे. अर्थात ठोकळ्याबाहेर हवा आहे असे मानल्यास हवेच्या संपर्कात आता ठोकळ्याचा जास्त भाग आला आहे. त्याचप्रमाणे आता ठोकळ्याच्या उरलेल्या भागातूनही आणखी छोटे छोटे ठोकळे काढून टाका. आता त्याचे घनफळ आणखी कमी होऊन हवेच्या संपर्कातले क्षेत्रफळ आणखी वाढलेले असेल. त्याप्रमाणे उरलेल्या भागातून आणखी छोटे छोटे ठोकळे काढत न्या आणि ही कृती अनंत काळ केल्यास तो ठोकळा संपूर्णपणे पोखरला जाऊन त्याचे घनफळ जवळपास शून्य होईल परंतु त्याचे क्षेत्रफळ हे प्रचंड जास्त, अनंत होऊ शकेल. तो ठोकळा पोकळ पोकळ छिद्रे असलेल्या स्पंजप्रमाणे दिसू लागेल.
( मेंगरचा स्पंज)
आता मँडेलब्रॉट म्हणतो की ह्या आकृतीच्या मिती किती? दुरून पाहिल्यास हा घन दिसतो, त्या अर्थी तो त्रिमितीय (three dimensional) आहे. पण त्याचे घनफळ तर शून्य आहे, म्हणजे तो धड त्रीमितीय नाही. शून्य घनफळ आणि खूप मोठे क्षेत्रफळ म्हणजे त्याला द्विमितीय (2 dimensional) म्हणावे का? कारण द्विमिती मधल्या आकृत्यांना कितीही मोठे क्षेत्रफळ असले तरी त्यांचे घनफळ शून्य असते. पण ह्या आकृतीला पाहता द्विमितीय म्हणणेही चुकीचे ठरेल. म्हणजे याची मिती २ किंवा ३ नसून त्या मधील कुठली तरी आहे. ते किती हे कसे शोधावे याची पद्धत मँडेलब्रॉटने दिली आहे. सध्याच्या लेखमालेचा उद्देश प्रमेयांच्या फार खोलात जाणे हा नसल्यामुळे त्यात मी शिरत नाही. वरील आकृतीची मिती साधारणपणे २.७२६८ इतकी आहे एवढेच सध्या सांगून थांबतो. सांगायची गोष्ट, की १, २ किंवा ३ मितीने समजावता न येणाऱ्या ह्या आकृत्यांची मिती अपूर्णांक (fractional dimensions) आहे. त्यामुळे जन्मलेल्या ह्या नव्या प्रकारच्या भूमितीला अपूर्णांक भूमिती किंवा fractal geometry असे नाव आहे.
कुठे कुठे दिसते ही अपूर्णांक भूमिती? इकडे तिकडे कशाला पाहता! आपले शरीर हीच एक अपूर्णांक भूमिती आहे. आपल्या डोक्याच्या कवटीच्या आत सामावलेला आपला मेंदू. त्यात इतक्या घड्या घड्या आहेत कि ते उलगडायचा प्रयत्न केल्यास कितीतरी मोठा आकार होईल. आपले फुफ्फुस (lungs) हे असेच एक उत्तम उदाहरण. आपल्याला किती जास्त प्रमाणात प्राणवायू (oxygen) हवेतून शोषून घेता येईल हे आपल्या फुफ्फुसांच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते. जितके क्षेत्रफळ अधिक तितका प्राणवायूचा पुरवठा अधिक. आपली फुफ्फुसे याकरिता अनेक नळ्या, फांद्या, दुभंगणाऱ्या छोट्या फांद्या अश्या आकारांनी बनलेली आहेत. यामुळे फुफ्फुसांचे क्षेत्रफळ इतके मोठे असते कि ते मोजल्यास एका टेनिस ग्राउंडच्या क्षेत्रफळाइतके भरेल! पण इतके मोठे क्षेत्रफळ असलेले आपले फुफ्फुस आपल्या छातीच्या पिंजर्याच्या आत एका ठराविक आकारात बसलेले आहे हे नवलच नव्हे काय?
याच प्रकारे आपल्या रक्तवाहिन्या हेही एक उत्तम उदाहरण आहे. आपल्या संपूर्ण शरीरभर हे रक्तवाहिन्यांचे जाळे अश्या प्रकारे पसरले आहे कि शरीराच्या सर्व भागात रक्ताचा पुरवठा होऊ शकेल. आपल्या शरीरातले एकूण रक्त गोळा केल्यास ते संपूर्ण शरीराच्या घनफळाच्या १०% सुद्धा भरणार नाही. परंतु त्यांचे जंजाळ इतके आहे, की शरीराच्या कुठल्याही उतीपासून (tissue पासून) फक्त ४ पेशी एवढ्या अंतरावर जा, तुम्हाला एक तरी रक्तपेशी सापडेलच. या रक्तवाहिन्या म्हणजे कोखच्या वक्राप्रमाणे एका ठराविक आकारात सामावलेल्या प्रचंड लांबीच्या रेषा आहेत. त्यामुळे मँडेलब्रॉटने जे म्हटले आहे, की "तुम्ही रक्ताचा थेंबही न सांडू देता शरीराचे १ मिलीग्राम एवढेही मांस काढू शकत नाही" त्यात अतिशयोक्ती काहीच नसावी. (अश्याच अर्थाची एक बिरबलाची गोष्टही बहुश्रुत आहे.)
अश्याप्रकारे आपल्या शरीरात, बाहेर, आपल्या अवती-भोवती सगळीकडे घड्या, वळणे, फांद्या यांच्या रुपात आपल्याला हि अपूर्णांक भूमिती वसलेली दिसेल. या नव्या दृष्टीने सभोवार पाहू जाता संपूर्ण जीवनच या अपूर्णांक भूमितीने, घड्या-घड्यांनी व्यापलेले दिसेल, आणि मग 'जीवनात ही घडी अशीच राहू दे' हे गाणे ऐकताना त्याला एक नवीनच अर्थ प्राप्त होईल! खरच या शास्त्रज्ञांची दृष्टी मुळातच अशी असते का, कि सृष्टी स्वत:हून आपली गुपिते त्यांच्या समोर उघडी करते? कुणास ठाऊक! पण निदान त्यातला काही अंश आपल्याला बघायला मिळाला आणि सृष्टीकडे पाहण्याची वेगळी दृष्टी प्रयत्नांनी मिळाली तरी खूप आहे!
- शंतनु
मूळ लेख माझ्या स्वतःच्या ब्लॉगवरून पुनःप्रकाशित. हा लेख इतरत्रही प्रकाशित.
Material licensed under a Creative Commons Attribution-NoDerivatives 4.0 International.
(सर्व चित्रे विकिपिडीयावरून साभार)
स्व-साधर्म्या बद्दल लेख - समाप्त. याप्रमाणेच वेगळे विषय - पुढील भागांमध्ये (त्या अर्थाने ही लेखमाला क्रमशः प्रकाशित).
प्रतिक्रिया
3 Jun 2018 - 6:07 pm | manguu@mail.com
छान
4 Jun 2018 - 3:11 pm | पुष्कर
आभार
3 Jun 2018 - 6:55 pm | तुषार काळभोर
वा वा वा!!!
अतिशय सुलभ व तरीही रोचक लेखन!!
4 Jun 2018 - 3:11 pm | पुष्कर
आवडल्याचे कलवल्याबद्दल आभार!
3 Jun 2018 - 7:20 pm | उगा काहितरीच
शिर्षक सोडून सगळा लेख आवडला .
4 Jun 2018 - 3:12 pm | पुष्कर
हरकत नाही. लेख आवडल्याचे सांगितल्याबद्दल धन्यवाद.
4 Jun 2018 - 1:03 am | एस
मेंगरचा स्पंज जो आहे त्याचे घनफळ शून्य कधीच होणार नाही. आणि त्याचे पृष्ठफळ (तुम्ही क्षेत्रफळ म्हटले आहे) हेसुद्धा कधीच अनंत होणार नाही. अनुक्रमे घनफळ हे शून्याच्या जवळपास आणि पृष्ठफळ हे अनंताच्या जवळपास जात राहील, जात राहील. पण कधीही शून्य आणि अनंत होणार नाही. तुम्ही असे म्हटले आहे की 'वरील आकृतीची मिती साधारणपणे २.७२६८ इतकी आहे'. ही Hausdorff मिती (dimension) आहे. असे पूर्ण सांगायला हवे होते.
ह्या प्रकारच्या मितीवर माझा आक्षेप असा आहे की प्रचलित त्रिमितीय भूमितीतदेखील ह्या प्रकारची मिती समजावता येते. साधे उदाहरण घेतले तर कुठलाही एक बिंदू हा dimension-less असतो. परंतु त्यापेक्षा वेगळ्या कुठल्याही बिंदूशी तो जोडल्यास निर्माण होणारी रेषा ही एकमितीय असते. अशा दोन विभिन्न परंतु एकप्रतलीय रेषांनी निर्माण झालेला चौरस हा द्विमितीय असतो. आणि विभिन्न एकप्रतलीय नसलेल्या चौरसांनी मिळून बनलेला घन हा त्रिमितीय असतो. या तीन मितींव्यतिरिक्त चौथी मिती अशी सांगता येईल ती फक्त 'काल' ही आहे. पहिल्या तीन मिती ह्या पूर्णांकांंमध्ये व्यक्त करता येतात. कालदेखील तसा त्याच निरीक्षणचौकटीत एकरेषीय असला तरी तोही मोजयच्या एककानुसार पूर्णांकात व्यक्त करता येतो. येथे 'पूर्णांक' किंवा integers ही संज्ञाच मुळात कृत्रिम आणि मानवनिर्मित आहे, हे एक लक्षात घ्यायला हवे. आपल्या मोजण्याच्या साधनाच्या किमान ठराविक क्षमतेला आपण पूर्णांक म्हणतो व आपल्या सोयीसाठी तसेच व्यवहारात वापरतो. या विश्लेषणावरून सध्या मान्य व प्रचलित तीन अधिक एक मिती मॉडेल हे देखील जरी व्यवहारात पूर्णांकांनी दर्शवता येत असले तरी मुळात ते सलग आणि मोजता न येणाऱ्या, तरीही एकमेकांपासून वेगळ्या (distinct) अशा 'संख्यांनी' बनलेल्या संख्यारेषेने बनलेले असतात हे लक्षात येईल. आता पुन्हा मेंगर स्पंज विचारात घेतला तर तो का आणि कुठल्या प्रकारे या Integer त्रिमितीय मॉडेलमध्ये व्यक्त करता येत नाही हे मला समजत नाही. कुठूनही सुरुवात करू. त्याच्या कुठल्याही पृष्ठभागावरील एक बिंदू घ्या. हा बिंदू एकमितीय आहे. आता त्यापेक्षा वेगळा असा त्या घनावरील किंवा घनामधील इतर कोणताही बिंदू घ्या. ह्या दोन वेगवेगळ्या बिंदूंंची स्थाननिश्चिती करण्यास एक रेष काढावी लागेल, म्हणजे दोन मिती किंवा क्ष-अक्ष आणि य-अक्ष पुरेसा आहे. आता त्या दोन बिंदूंपेक्षा वेगळा आणि त्या बिंदूंना जोडणाऱ्या रेषेवरून बाजूला असा तिसरा बिंदू, जो त्या घनाचाच भाग असेल, असा घेतला तर या तीन बिंदूंची स्थाननिश्चिती करण्यास आपणांस अजून एक अक्ष लागेल, झ-अक्ष. म्हणजेच प्रचलित क्ष-, य-, झ- अक्ष त्रिमितीने त्या स्पंजावरील कोणत्याही बिंदूचे निश्चित स्थान हे त्याच स्पंजावरील इतर बिंदूंच्या रेफरन्सने निश्चितपणे सांगता येते. म्हणजे त्रिमितीय भूमिती इथेही पुरेशी (sufficient) आहे. मग हाउसडॉर्फ मितीची काय आवश्यकता आहे?
(डिस्क्लेमर : मला गणिताचे शून्य ज्ञान आहे. तेव्हा माझ्या समजुतीत काही चूक असल्यास जरूर दाखवून द्यावी.)
4 Jun 2018 - 3:27 pm | पुष्कर
"मला गणिताचे शून्य ज्ञान आहे" - असं म्हणू नका हो! वरती माझी कान-उघाडणी केली आहे, त्यावर हे आणखी कशाला! :)
- पृष्ठफळ - हा अधिक बरोबर शब्द आहे. धन्यवाद! पुढच्या वेळी काळजी घेईन. संपादनाची सुविधा उपलब्ध झाल्यास बदलेन.
- Hausdorff मिती - हे पण बरोबर आहे. किंबहुना अचूक संज्ञा आहे.
- आता तुमच्या आक्षेपाबद्दल - तुम्ही म्हणता ते त्या अर्थाने बरोबर आहे. या स्पंजावरचा कुठ्लाही बिंदू त्रिमितीय अवकाशात दाखवता येऊ शकतो. लेखात मांडलेला मुद्दा त्याच्या गुणधर्मांचा आहे. त्रिमितीय (किंवा द्विमितीय) आकृतीचे काही महत्त्वाचे गुणधर्म याला लागू होत नाहीत, हा पेच आहे. म्हणजे एखाद्या र इतक्या लांबी एवढी बाजू असलेल्या आकृतीचे पृष्ठफळ फ(र^२) या फलनाने दाखवता येते, व ते र वर स्केलेबल असते हे बेसिक निरीक्षण अश्या आकृत्यांच्या बाबतीत फोल ठरते (त्यांच्या शून्य किंवा अनंत होत जाणार्या गुणांमुळे). हा मुद्दा जरा ढोबळ शब्दांमध्ये लेखात लिहिला आहे. आता ह्यात गणितज्ञांमधले टेकनिकल वाद - याबद्दल मला फार माहिती नाही, त्यामुळे क्षमा असावी. माझे ज्ञान तोकडे आहे. आपली भूमिका विरुद्ध/ साशंक असल्यास त्याबद्दल ऐकायला नक्की आवडेल!
4 Jun 2018 - 11:55 am | अनिंद्य
विण्ट्रेस्टिंग !
4 Jun 2018 - 3:29 pm | पुष्कर
थ्यांकू! :)
4 Jun 2018 - 3:07 pm | शलभ
मस्त. रोचक. समजल्यासारखं वाटतंय.
4 Jun 2018 - 3:30 pm | पुष्कर
'समजल्यासारखं वाटतंय' - हे वाचून मलाच फार भारी वाटलं! धन्यवाद.
4 Jun 2018 - 3:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहितीपूर्ण लेखन. वाचतोय.
-दिलीप बिरुटे
4 Jun 2018 - 3:32 pm | पुष्कर
वाचून झाल्यावर तुमची प्रतिक्रिया वाचायला आवडेल. तुम्ही आणि अन्य सर्वच वाचकांना विनंती आहे की लेखात माहिती या दृष्टिने आणि शैली या दृष्टिने देखिल काही बदल सुचवावेसे वाटल्यास स्वागत आहे.
4 Jun 2018 - 4:37 pm | मराठी कथालेखक
या तत्वांचा वापर करुन मानवाने कोणते तंत्रज्ञान विकसित केले आहे का ते जाणून घ्यायला आवडेल
4 Jun 2018 - 5:10 pm | पुष्कर
आपण सिनेमामध्ये जे अॅनिमेशन्स पाहतो, त्यात हे खूप वापरले जाते. स्व-साधर्म्य वापरल्यामुळे चित्र अधिक खरी वाटतात.