ट्रेकींग क्षेत्रात 'घाटवाटा' हे प्रकरण थोडे अवघड समजले जाते आणि ते काहीसे खरेही आहे. कारण घाटवाटांच्या डोंगरयात्रांचे मार्गदर्शन होईल अशी कोणतीही साधने उपलब्ध नाहीत. जी काही थोडीफार माहिती मिळते ती असे ट्रेक्स करणार्या ब्लॉगर्सनी लिहिलेल्या ब्लॉगमधेच. त्यामुळे असे ट्रेक्स करण्यासाठी बहूतेक वेळा स्थानिक लोकांवरच अवलंबुन रहावे लागते. घाटवाटांची इत्यंभुत माहिती मिळाली तरीसुद्धा या प्रकारच्या डोंगरयात्रा अनुभवी आणि चांगली निर्णयक्षमता असलेले सोबती बरोबर असल्याशिवाय कधीही करु नयेत.
अशा या घाटवाटांबद्दल समग्र माहिती असलेली पुस्तके माझ्या माहितीत तरी कुठेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे घाटवाटांविषयी मला जी थोडीफार माहिती आहे तिचं एकत्रित संकलन कुठेतरी व्हावं अशी बर्याच दिवसांची इच्छा होती. मिपावरही त्याबाबत विचारणा झाली होती म्हणुन मीही खरडायचं थोडं धाडस केलं. अर्थात हे लिखाण परिपुर्ण नक्कीच नाही त्यामुळे अनुभवी मंडळींनी यात नक्की भर घालावी.
हा लेख एकूण तीन भागात विभागला आहे. पहिल्या भागात थोडा इतिहास आणि विषयप्रवेश आहे, दुसर्या भागात घाटवाटा म्हणजे नेमकं काय? त्याचे प्रकार, नावं वगैरेची माहिती असणार आहे तर शेवटच्या भागात घाटवाटांची प्रशासन व्यवस्था कशी होती हे आपण पाहणार आहोत.
'इतिहास आणि विषयप्रवेश'
सतराव्या शतकात एक युगपुरुष जन्माला आला आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
शिवाजीराजांचा कालखंड हा सह्याद्रीतील दुर्गांचा सुवर्णकाळ होता. भोवतालच्या भूप्रदेशाचे सखोल ज्ञान आणि त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचे निश्चित आकलन साधणारा शिवाजीराजांसारखा महापुरुष एकूण जगाच्या संदर्भातही विरळाच. सह्यपर्वताच्या आकारविस्ताराचा, त्याच्या खडतर परिघरेषांचा आणि त्याच्यावरील दुर्गांचा लाभ उठवून राजकीय उद्दिष्टे गाठण्याचे श्रेय केवळ महाराजांचेच. त्यांच्या बालपणी सह्याद्रीतील बहुसंख्य किल्ले ओसाड पडल्याने नादुरुस्त, जीर्णावस्थेत होते आणि जे मोजके सुस्थितीत होते ते मोगल वा अदिलशाही किल्लेदारांच्या ताब्यात होते. मजबुत किल्ले जसे आपले सामर्थ्य तसेच ते आपल्या शत्रूंचे दौर्बल्य आहे हे जाणुन त्यांनी आपले डावपेच आखले. मनुष्यबळ आणि साधनसामग्री अशा दुहेरी कसोटीवर इतकेच नव्हे तर संख्यात्मक आणि गुणात्मक दृष्ट्याही महाराजांचे शत्रू त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने बलाढ्य होते. पण केवळ सह्याद्रीच्या साह्याने जशी त्यांनी मोठी उद्दिष्टे मनाशी बाळगली तशीच ती गाठण्यातही ते यशस्वी ठरले. विशेष म्हणजे त्यांनी आपले मनुष्यबळ आणि साधनसामग्री यांचा किमान वापर वा विनाश होऊ देऊन हे यश साधले. महाराजांचा इतिहास वाचल्यावर हे जाणवते की त्यांच्यावर गुदरलेल्या प्रत्येक संकटास अनुरुप असे वेगवेगळे डावपेच त्यांनी आखले आणि त्यानुसारच त्यांनी संघर्षस्थळाची निवड केली.
....'सांगाती सह्याद्रीचा' या पुस्तकातून
घाटवाटेत शिरण्यापुर्वी--
'खरं म्हणजे भूगोलाची इत्यंभूत माहिती असल्याखेरीज इतिहास घडविताच येत नाही'. पुण्याला आल्यानंतर सुरवातीची पाच वर्षे महाराज सोबत्यांसह बारा मावळं अक्षरशः पिंजून काढत होते त्यामुळे महाराजांच्या बाबतीत तर ही गोष्ट तंतोतंत लागू पडते. जसं लेकरु आईला सोडून जात नाही त्याचप्रमाणं निदान दक्षिण दिग्विजयापर्यंत तरी महाराज सह्याद्री सोडून गेलेले दिसत नाहीत. म्हणूनच सह्याद्री म्हणजेच शिवाजी आणि शिवाजी म्हणजेच सह्याद्री असं म्हणणं वावगं ठरू नये. खरंच असं या सह्याद्रीत काय आहे ज्यामुळं महाराजांनी शुन्यातुन एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं? आणि त्याचा पायाही इतका भक्कम घातला की मराठ्यांचं संपूर्ण राज्य खालसा होण्यासाठी १८४८ साल उजाडावं लागलं. आपल्या कुणालाच इतिहास घडवायचा नाही, खरं सांगायचं म्हणजे आपण तसा तो घडवूही शकत नाही. पण या सह्याद्रीत घडलेला आपला ज्वलंत इतिहास जर का समजुन घ्यायचा असेल तर मात्र सह्याद्रीतील भटकंती अत्यावश्यकच ठरते.
महाराजांच्या आयुष्याचा कालपट पाहताना एक गोष्ट बाकी सारखी जाणवत रहाते, ती म्हणजे स्वतःची क्षमता ओळखून शत्रू कल्पनाही करु शकणार नाही असे अजोड डावपेच आखणं आणि ते जसेच्यातसे प्रत्यक्षात उतरवणं. या सर्व गोष्टी त्यांच्या अंगी असलेल्या दूरदृष्टी, प्रगल्भता आणि कल्पनातीत डावपेच आखण्याची क्षमता या गुणांची पुष्टीच देतात. युद्धशास्त्रानुसार आपले उद्दिष्ट साधण्यास अनुकूल असलेले रणक्षेत्र निवडून काढणे व तेथे शत्रूशी लढाई देणे हे सेनापतीचे मुख्य काम व युध्दशास्त्रातील धोरणांच्या अनेक अंगापैकी एक मुख्य अंग आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या मुत्सद्दीपणाने ते साधून घेतलं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. राजकारणाचा युध्दकौशल्याशी किती व कसा निकटचा संबंध असतो याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
१६६१ सालच्या एका लढाईत महाराजांनी असंच एक स्वतःला अनुकूल असलेलं रणक्षेत्र निवडून काढलं आणि तेथे शत्रूला येण्यास अक्षरशः भाग पाडलं. बलाढ्य मोगल सरदार कारतलबखानाविरुद्धच्या या युद्धात महाराजांनी एका अनगड, अवघड घाटवाटेचा अतिशय समर्थपणे उपयोग करुन घेऊन खानाला त्याच्या मोठ्या सैन्यासह पूर्णपणे पराभूत केलं.
शाहिस्तेखानाने चाकणच्या विजयानंतर कारतलबखानास कोकणची मोहिम सोपविली. कछप व चव्हाण, अमरसिंह, मित्रसेन आणि त्याचा भाऊ, सर्जेराव गाढे, रायबागीण, जसवंत कोकाटे आणि जाधव असे सरदार मिळून त्याच्याकडे भली मोठी फौज होती. सोबत हत्ती, सामान-सुमान, तोफा आणि उंटही होते. शाहिस्तेखानाच्या मुख्य तळापासून ही फौज तुंगारण्यातुन उंबरखिंडीत आली आणि लढाईला तोंड फुटले. कोकणातल्या बाजूला मराठ्यांचा सेनापती (नेतोजी?) तर घाटमाथ्यावर स्वतः महाराज वाट अडवून उभे होते. आता कारतलबखानाचं सैन्य कात्रीत सापडलं. खरंतर तुंगारण्यातले लोहगड वगैरे किल्ले मराठ्यांच्या ताब्यात होते. कारतलबखानाच्या सैन्याला तुंगारण्यातुन जाताना का प्रतिकार झाला नाही? बरं पाणीसुद्धा उपलब्ध नसलेली, अत्यंत अडचणीची, दाट जंगलाची, अरुंद, निर्जन अशी उंबरखिंडीची अवघड घाटवाट त्याला कोकणात उतरायला कुणी सुचविली? एवढ्या मोठ्या सैन्याला ती योग्य होती का? हे त्याला कळलं कसं नाही? आपल्या विरुद्ध मराठ्यांचे मोठे सैन्य उंबरखिंडीत आधीच दबा धरुन बसलेय हे कारतलबखानाला कसं कळू नये? सैन्यासोबत असणारे त्याचे हेर काय करत होते? तर या सर्व प्रश्नांचं उत्तर एकच आणि ते म्हणजे 'महाराजांचे अजोड डावपेच आणि त्यांचे युध्दकौशल्य'. कविंद्र परमानंदांनी शिवभारताच्या अठ्ठावीसाव्या अध्यायात याचे अतिशय सुरेख वर्णन केले आहे. ते म्हणतात...
अथ पन्थानमाश्रित्य लोहाद्रेर्द्क्षिणोत्तरम् l
वीतभी: स वतारेभे सह्यशैलावरोहणम् ll ६५ ll
अर्थ - नंतर लोहगडाच्या दक्षिणोत्तर मार्गाने तो (कारतलबखान) निर्भयपणे सह्याद्री उतरु लागला.
एकपद्या तया यान्ती नलिकायंत्रतुल्यया l
अभूदतीव स्थगिता वाहिनी सा पदे पदे ll ६६ ll
अर्थ - नलिकायंत्रासारख्या(बंदुक) त्या पाऊल वाटेने जात असतां ती सेना पदोपदी अतिशय कुंठीत झाली.
अस्मादवाङ्मुखीभूता पताम इति निश्चिता: l
नरास्ताम्राननचमूचरा: सह्यमवातरन् ll ६७ ll
अर्थ - "ह्या वाटेवरुन अधोमुख होऊन आपण पडूं" अशी खात्री झालेले मोंगल सैन्यांतील लोक सह्याद्रीवरुन खाली उतरले.
या युद्धात शेवटी जे व्हायचं तेच झालं. रायबागीणच्या सांगण्यावरुन कारतलबखानाने महाराजांकडे पाठवलेला दुत काय म्हणतो हे एकोणतीसाव्या अध्यायात परमानंदांनी सांगितलेले आहे.
हंत द्वित्राण्यहान्यतत्र मया लब्धंन जीवनम् l
तस्मादभयदानेन देहि मे मम जीवनम् ll ३१ ll
अर्थ - काय सांगावे! दोन तीन दिवस मला येथे पाणीसुद्धा प्यावयास मिळालें नाही; म्हणून अभयदान देऊन मला जीवदान दे.
तलातलमिवासाद्य सह्याचलतलस्थलम् l
विररामश्चिरं चित्ते विस्म्रामश्च पौरुषम् ll ३२ ll
अर्थ - सह्याद्रीच्या जणूं काय पाताळासारख्या खोल तळास येऊन आम्ही मनांत दीर्घ काळ स्तिमित झालों आहोंत व पराक्रमसुद्धा विसरलो आहों!
तद् वितीर्थ स्वसर्वस्वमात्मनमनवस्करम् l
चिकीर्पामि महाबाहो जीवन् जिगमिषामि च ll ३६ ll
अर्थ - म्हणून, हे महाबाहो, मी आपलें सर्वस्व आपणास अर्पण करुन आपल्या अपराधाचें क्षालन करुं इच्छितों आणि जिवंतपणे जाऊं इच्छितों.
अशा या उंबरखिंडीच्या युद्धात शाहिस्तेखानाच्या सैन्याने सपाटून मार खाल्ला. हा तडाखाच इतका जबरदस्त होता की पुढची दोन वर्षे म्हणजे अगदी महाराजांनी लालमहालावर छापा घालेपर्यंत त्याने अजिबात डोके वर काढले नाही.
वर उल्लेखलेली 'उंबरखिंड' ऊर्फ 'आंबेनळी घाट' किंवा शिवाजी महाराजांनी ज्या घाटवाटेने उतरुन जावळी जिंकून घेतली तो 'निसणी'चा घाट वगैरे ठिकाणं खरं म्हणजे प्रत्यक्ष तिथे जाऊन पाहण्यासारखीच आहेत. या सर्व घाटवाटा भटक्यांनी आणि इतिहास संशोधकांनी धुंडाळाव्या अशाच आहेत. तेथे असणार्या विपरीत परीस्थितीत लढून देखील ती युद्धे महाराजांनी कशी जिंकून घेतली असतील? याचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर अशा घाटवाटांवरुन चौकस भटकंती करणे क्रमप्राप्तच आहे. कारण भूगोलाच्या जवळ गेल्याने इतिहास जरा जास्त चांगला समजतो, असा निदान माझा तरी अनुभव आहे. मुकर्रबखानाने संभाजीराजांना संगमेश्वर येथे अटक केली. त्याची ती मोहीम फक्त त्यांना पकडण्यासाठीच होती. मुकर्रबखान नेमक्या कोणत्या घाटवाटेने कोल्हापुर भागातून कोकणात उतरला आणि कोणत्या घाटवाटेने चढून घाटावर आला या विषयी इतिहासकारांत मतभेद आहेत. आपल्यासारख्या इतिहासाची आवड असलेल्या डोंगर भटक्यांना ही शोधमोहीम खास संभाजीराजांसाठी एकदा तरी राबवायला हवी. नाही का?
क्रमशः
प्रतिक्रिया
23 May 2018 - 12:11 pm | कंजूस
शिवधरित्र का घाटवाटा नक्की विषय काय?
भटकंती म्हणून असलेल्या घाटवाटा आनंद पाळंदे यांच्या जुन्या डोंगरयात्रा पुस्तकात दिल्या आहेत. खरोखरच वापर केल्या गेलेल्या वाटा फारच कमी असतील. म्हणजे व्यापारी वाट.
वाटा लोकांनी चालत जाण्यासाठी पडतात त्या सोप्याच आहेत.
शिवकाळात अशा वाटांनी सैन्य उतरवणे कठीणच होते.
25 May 2018 - 8:17 pm | दिलीप वाटवे
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आनंद पाळंदेंच्या डोंगरयात्रात २२० घाटवाटांची यादी आहे. त्यातल्या बर्याचशा घाटवाटा/ पायवाटा आजही स्थानिक वापरतात. व्यापारी वाटाबद्दल म्हणाल तर अशा वाटा बर्याच आहेत पण सद्यपरिस्थितीत त्याचा उपयोग व्यापारी कारणासाठी राहिला नसल्याने त्यातल्या बर्याचशा पायवाटा बनल्यात.( व्यापारी वाटा बर्यापैकी रुंद असतात) आणि चालत जाण्यासाठीच्या सगळ्याच वाटा सोप्या नाहीत. पाथरा, माकडनाळ वगैरे वाटा अत्यंत अवघड आहेत.
23 May 2018 - 12:12 pm | कंजूस
*शिवचरित्र*
23 May 2018 - 12:33 pm | प्रचेतस
पहिला भाग काहीसा त्रोटक वाटला. त्रोटक म्हणजे पहिल्या भागाचा विषय हा इतिहास आणि विषयप्रवेश असा असूनही घाटवाटेच्या इतिहासास शिवरायांपासून केलेली दिसली.
मूळात घाटवाटा निर्माण झाल्या ह्या व्यापारासाठी. व्यापार्यांचे/श्रमणांचे तांडे पश्चिमेकडून येत आणि पूर्वेकडे जात. सागरी व्यापाराच्या सुलभीकरणासाठी घाटवाटा निर्माण केल्या गेल्या. ह्या घाटवाटांच्या संरक्षणासाठी माथ्यावर आणि पायथ्याला दुर्गांची साखळी उभारण्यात आली. ह्या व्यापार्याच्या तांड्यांसोबत श्रमणही धर्मप्रसार करण्यासाठी निघत. त्यांच्या वर्षावासाठी लेणी/ विहार खोदण्यात येऊ लागले. आजही प्राचीन घाटवाटांवर पाण्याची खोदीव टाकी, पायर्या, मेटांचे अवशेष इत्यादी प्राचीन खुणा आढळतात.
हे सर्व वर्णन ह्या भागात यायला हवं होतं किंवा पुढील भागात तरी असावं अशी अपेक्षा आहे.
25 May 2018 - 8:06 pm | दिलीप वाटवे
माझी घाटवाटांची भटकंती शिवकालीन इतिहास व गडकिल्ल्यांच्या भटकंतीसोबत झाली. म्हणून लेखाची सुरूवात शिवरायांपासून केली आहे. घाटवाटांची सुरूवात कशी झाली किंवा त्यांचा विकास कसा झाला याची माझ्याकडे माहिती असली तरी तेथून सुरूवात करणे लेखाच्या आकारबंधात बसले नसते.
तुम्ही लिहिलेल्या मुद्द्यांपैकी अनेक मुद्दे पुढील लेखात येतीलच मात्र हा लेख फक्त घाटवाटा व त्यांची भटकंती इतक्याच मुद्द्यांवर केंद्रीत असल्याने सर्वच मुद्दे एकाच वेळी लिहिणे शक्य होणार नाही.
उदाहरणार्थ
१) घाटवाटा झूमआऊट केल्या, की असलेली साखळी म्हणजे बंदरे-लेणी-दुर्ग जुन्या व्यापारी शहरांकडे जाणाऱ्या वहीवाटा/मार्ग.
२) माथ्यापासून पायथ्यापर्यंत बदलत जाणारे निसर्ग वैविध्य - झाडे, प्राणी, पक्षी, फुलपाखरे वगैरे.
३) घाटवाटा आणि त्यामधील निसर्ग संवर्धन - चिंता, आव्हाने, आवाहन.
४) घाटवाटांच्या परिसरात सध्या असलेले स्थानिक, धरणे, जलाशय.
५) दोनदोन-तीनतीन दिवसांचे डोंगरयात्रा पध्दतीचे घाटवाटा ट्रेक्स.
६) घाटांची नावे, एकाच घाटाची २-३ नावे. उदा दार्या- भोरांड्याचे दार
७) आम्ही घाटवाटा ट्रेक्स का करतो आणि ते करत असताना सदस्यसंख्या किती असावी?
८) वाटा शोध - स्थानिक, GPS
९) स्थानिकांच्या बोली भाषेतील वाटा/खाणाखुणा सांगताना वापरलेले शब्द, स्थानिकांचे त्यांचे संपर्क क्रमांक.
१०) सध्या चालू असलेल्या घाटवाटा आणि बंद पडलेल्या घाटवाटांची यादी.
११) माथ्यावरील आणि पायथ्याशी असलेल्या गावात पोहचण्याचे रस्ते, वाहतूक व्यवस्था.
१२) घाटवाटांच्या डोंगरयात्रांसाठी आवश्यक साधनसामग्री. (equipment)
१३) घाटवाटेत असलेले सुळके(दाऱ्याची लिंगी, कुईरानाचा कापरा वगैरे)
१४) पावसाळ्यात घाटवाटा कराव्यात की नाही? केल्यास कोणत्या किंवा कोणत्या करू नयेत. ते करताना असणारे संभाव्य धोके.
१५) घाटवाटांच्या लूप ट्रेक्सची सुरूवात माथ्यावरून करावी की कोकणातून?
तुम्ही सुचवलेल्या किंवा वरील मुद्द्यांवर किंवा या व्यतिरिक्त अजूनही बऱ्याच विषयांवर लिहिता येईल इतका घाटवाटांचा आवाका आहे. या लेखाकडे बघताना घाटवाटांचे ट्रेक करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे याच भूमीकेतून पाहिले तर जास्ती सोपे होईल असे वाटते.
आपण सर्व मिळून "घाटवाटा" या विषयावर 'समग्र' असे कांही लिखाण करावयाचे असल्यास जरूर चर्चा करूया.
26 May 2018 - 6:31 am | कंजूस
**या लेखाकडे बघताना घाटवाटांचे ट्रेक करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे याच भूमीकेतून पाहिले तर जास्ती सोपे होईल असे वाटते.**
हो. लिहाच. मुद्दे पटले अन आवडले.
23 May 2018 - 4:16 pm | कंजूस
दोनतीनच असाव्यात महाराष्ट्रात.
23 May 2018 - 4:24 pm | प्रचेतस
प्राचीन वाटा?
बर्याच आहेत.
23 May 2018 - 4:29 pm | शाली
आवडले. मात्र प्रचेतस यांच्याशी सहमत...
"हे सर्व वर्णन ह्या भागात यायला हवं होतं किंवा पुढील भागात तरी असावं अशी अपेक्षा आहे"
23 May 2018 - 5:48 pm | कपिलमुनी
स्थानिक कोकणातून जाण्या येण्यासाठी घाटवाटा वापरतात पण व्यापारासाठी किंवा बैलांचे तांडे , घोडे येतील अशा घाटवाटा किती आहेत ?
नाणेघाट बघून तिथून बैलगाड्या वगैरे वर येत असतील का हा प्रश्न पडला होता .
23 May 2018 - 7:16 pm | प्रचेतस
बैलगाड्याच आल्या पाहिजेत असं नसून बैलांच्या पाठीवर ओझे वाहून माल वाहून आणता आला पाहिजे, अशा रुंद घाटवाटा भरपूर आहेत.
23 May 2018 - 7:17 pm | प्रचेतस
बैलगाड्याच आल्या पाहिजेत असं नसून बैलांच्या पाठीवर ओझे वाहून माल वाहून आणता आला पाहिजे, अशा रुंद घाटवाटा भरपूर आहेत.
नाणेघाट हे सर्वोत्कृष्ट उदाहरण.
24 May 2018 - 12:38 pm | कंजूस
असहमत. पण आता या धाग्यावर वाद घालणार नाही. कधीतरी बोलू.
24 May 2018 - 6:55 pm | चौकटराजा
चढणीच्या मार्गावर अंगावर ओझे घेऊन जाऊ शकणारा प्राणी बैल नसावा असे वाटते गाढव किंवा घोडा यांची ही विशिष्ट क्षमता बैलात असावी असे वाटत नाही !
25 May 2018 - 5:40 am | कंजूस
१) अगदी हेच सांगायचं आहे.
२) अगदी मोठ्या प्रमाणावर माल वाहतूक होत नव्हती. जे काही ओझं नेलं जायचं ते माणसेच नेत असत.
३) पोर्तुगिज आल्यावर ते गुजरातपर्यंत सरकले अन्यथा अरब लोक केरळातून मसाले नेत होते.
४) महाराष्ट्राच्या पठारावरून बंदरांपर्यत नेण्यासारखा माल कोणताच नव्हता.
५) कोकणातल्या सुक्या मासळीला देशावर नेत नसावेत. देशावरचे कांदे,डाळी खाली आणण्यास मोठ्या घाटवाटांची गरज नसेल.
६) बैलगाड्या जाऊ शकणारी घाटवाट कोणती?
25 May 2018 - 8:59 am | प्रचेतस
व्यापार म्हणाजे केवळ बैलगाड्याच नव्हेत तर घोडे, गाढवे, माणसेही ओझी वाहात असतंच. घाटवाट म्हणजे केवळ रूंद गाडीमार्गच असला पाहिजे असेही नव्हे.
तुम्ही १५/१६ व्या शतकानंतरचा विचार करत आहात असे वाटते. इस. पू. ८० चा साधारण काळ असलेल्या पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी नामक ग्रंथात पश्चिमेकडील देशांची जहाजे सिंध, भडोच आदी बंदरांत माल घेऊन येत व तेथून तो स्थलमार्गाने अन्यत्र पाठवला जाई. सातवाहन्काळात कल्याण, चौल, सोपारा, महाड अशी बंदरे प्रसिद्ध होती व ती स्थलमार्गाने नाशिक, कर्हाड, तेर, वैजयंती, पैठण आदी मोठमोठ्या व्यापारी शहरांशी जोडलेली होती. आयातीच्या वस्तूंमध्ये रोमन मद्य, तांबे, कथिल, शिसे, काच आणि औषधी वस्तू ह्यांचा समावेश असे, तर पठारावरुन निर्यात केल्या जात असलेल्या वस्तूंत तिळाचे तेल, चामड्यापासून बनवलेल्या वस्तू, वेलदोडेम, दालचिनी, लवंगा, हिरे, माणके, मोती, वस्त्रे ह्यांचा समावेश असे. निर्यातीचे प्रमाण इतके वाढले होते की की रोमन नाण्यांचा ओघ भारतात मोठ्या प्रमाणावर वाहू लागला त्यामुळे हा व्यापार भारताला एकतर्फी फायदेशीर ठरु लागला. प्लिनीने ह्याविषयी खंत व्यक्त केल्याचे उल्लेख आहेत.
ह्या सर्व व्यापारामध्ये तसेच त्याच्या जोडीला होणार्या बुद्ध धर्म प्रसारामुळे कोकण आणि देशाला जोडणार्या घाटवाटांचा वापर होणे अपरिहार्य होतेच. त्यामुळे पुष्कळ नैसर्गिक घाटवाटा काही प्रमाणात रुंद केल्या गेल्या. नाणेघाटासारखा राजमार्ग तर अख्खा कातळ फोडून फरसबंद करण्यात आला.
25 May 2018 - 9:53 am | कंजूस
**पठारावरुन निर्यात केल्या जात असलेल्या वस्तूंत तिळाचे तेल, चामड्यापासून बनवलेल्या वस्तू, वेलदोडेम, दालचिनी, लवंगा, हिरे, माणके, मोती, वस्त्रे ह्यांचा समावेश असे**
महाराष्ट्रातून कोणते? पैठणचे रेशिम असेल.
25 May 2018 - 10:02 am | प्रचेतस
उत्पादन होत असलेल्या शहरांची नावे नाहीत तर आयात्/निर्यात होत असणार्या शहरांची नावे आहेत. पैठण राजधानीचे शहर होते त्यामुळे आयात निर्यात सतत चालू असे. मात्र वस्तूच तिथेच उत्पादित केल्या जात का नाही ते सांगणे कठीण आहे.
24 May 2018 - 11:56 am | चाणक्य
वाचतोय. पुभाप्र.
24 May 2018 - 1:52 pm | दुर्गविहारी
अतिशय महत्वाच्या विषयाला हात घातल्याबध्दल धन्यवाद. वर वल्लीदांनी सांगितल्याप्रमाणे या विषयाचा आवाका मोठा आहे. तेव्हा सुरवात थोडी काळजीपुर्वक करायला हवी होती. सातवाहनांच्या काळापासून गजबजलेल्या नाणेघाट, बोर घाटातील वाट, हरिश्चंद्रगड, विशाळगड या गडकोटापासून या प्राचीन वाटांवर राबता आहे. तेव्हा या मालिकेची सुरवात यांचा परामर्श घेउन झाली असती तर अधिक योग्य झाले असते. असो. पुढे हि माहिती येईल या अपेक्षेत. सह्याद्रीत निदान दिडशे तरी वाटा असाव्यात. बहुतेक वाटा डहाणू, नालासोपारा, चौल, दाभोळ अशा प्राचीन बंदरातून देशाकडे येण्यासाठी मार्ग म्हणून निर्माण करण्यात आल्या.
शिवकाल हा महाराष्ट्राचा नक्कीच सुवर्णकाल मानता येईल. पण त्या आधीही या वाटांचा लष्करी कारणासाठी वापर झालाच आहे. एक उदाहरण शिर्केंना वाटवण्यासाठी मलिक उत्तेजार या सरदाराने जो हल्ला केला, त्यात याच सह्याद्रीतील दाट जंगलातील वाटांनी त्याला व सैन्याला विशाळगडाकडे नेले व तेथे शिर्के व शंकरराव मोरे यांनी त्याला मारले याचे वर्णन फेरिस्ता या ईतिहासकाराने केले आहे, ते वाचण्यासारखे आहे.
बाकी मुळ धाग्यात दोन किरकोळ चुका आहेत. एक शिवकाल सतराव्या शतकातील आहे, सोळाव्या नाही. दुसरी म्हणजे उंबरखिंडीच्या लढाईत नेतोजी घाटमाथ्यावर तर शिवाजी महाराज खाली कोकणात चावणी गावाजवळ होते.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
25 May 2018 - 8:52 pm | दिलीप वाटवे
((उंबरखिंडीच्या लढाईत नेतोजी घाटमाथ्यावर तर शिवाजी महाराज खाली कोकणात चावणी गावाजवळ होते.))
राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या एकोणीसाव्या आवृत्तीच्या पुर्वार्धात पान क्रमांक ४१३ वर
"पुढेही जाता येईना, मागेही फिरता येईना. तेवढ्यात खबर आली की, खुद्द शिवाजी आपल्या पिछाडीस खिंडीच्या वाटेवर येऊन उभा राहिला आहे!"
असे लिहिले आहे. खान घाटमाथ्यावरुन कोकणात निघाला होता. त्याच्या पिछाडीवर म्हणजे घाटमाथ्यावरच ना? काही चुकत असेल तर मार्गदर्शन करावे.
25 May 2018 - 1:37 am | अरविंद कोल्हटकर
सह्याद्रि आणि महाराष्ट्राच्या उत्तरसीमेकडील सातपुडा, तसे महाराष्ट्राच्या अन्तर्गत असलेले पण सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून बाहेर असलेले अन्य पर्वती प्रदेश (उदा. अजिंठ्याचे डोंगर) ह्यांच्यामधील शेकडो घाट आणि पायवाटा ह्यांची पूर्ण मोजदाद कोठे उपलब्ध असेल काय ह्याबाबत साशंकता आहे. वेगवेगळ्या आधारांमधून त्यांच्या याद्या मिळवून माहितीचा साठा वाढविता येईल. अशा स्वरूपाच्या मला माहीत असलेल्या तीन स्रोतांची नोंद खालीलप्रमाणे:
१)स.आ.जोगळेकरांच्या ’सह्याद्रि’ मध्ये महाराष्ट्रातील किल्ले आणि घाट/व्यापारी मार्गांच्या बंदोबस्तासाठी त्यांचा उपयोग हे दर्शविण्यासाठी एक तक्ता जोडला आहे (पाने ६८-७०). त्यामध्ये एकूण ६० घाटांची नोंद आहे.
२) जॉन क्लून्सलिखित Itinerary and Directory of Western India ह्या १८२६ सालच्या पुस्तकामध्ये दोन गावांना जोडणार्या मार्गांची तत्कालीन वर्णने आहेत आणि त्या वर्णनांमधून अनेक घाटरस्त्यांचे उल्लेख आहेत. पुस्तकातील मार्गांच्या अनुक्रमणिकेवर नजर टाकली तर माळसेज, रौळा, कुसूर, निंब-डेरा, देवी, कात्रज, भोर, अणुस्कुरा, फोंडा, शेवती, कुंभा, देव, सायू, कासारी, दरूर, अजंठा, सेंदवा, गौताळा, थळ, सिमरोळे, जौम (दोन्ही महूच्या रस्त्यावर), कुंभार्ली, अंबोली, राम, बावरा, तिवरा, अंबा, रांगणा, शिव, नीमपाणी (हुशंगाबादच्या रस्त्यावर) इतकी घाटांची नावे वरवर पाहून दिसतात.
३) भारत इतिहास संशोधन मंदिराने काही दशकांमागे सह्याद्रीतील घाटरस्ते आणि चौक्या ह्या विषयावर एक छोटेखानी - सुमारे ५०-६० पानांचे - पुस्तक प्रकाशित केले होते. त्याची प्रत एकेकाळी मजजवळ होती. पुस्तक आता बहुतेक कोठेच मिळायचे नाही, असल्यास भाइसंमंच्या ग्रन्थालयात असू शकेल. थोडा प्रयत्न करून हे पुस्तक मिळविल्यास बरीच माहिती पदरात पडेल.
४) ह्यामध्येहि सर्वपरिचित असे पसरणी (वाई-महाबळेश्वर), रडतोंडी (महाड-महाबळेश्वर, वरंधा (भोर-महाड) हे घाट आलेलेच नाहीत.
25 May 2018 - 5:57 am | निशाचर
वाचत आहे.
25 May 2018 - 12:56 pm | कंजूस
लेखक महाशय तुमचा पुढील भाग टाका. नाहीतर आम्ही घाटवाटा चर्चेतच अडकून राहू.
( एक वेगळा काथ्याकुट धागाच प्रचेतस/दुर्गविहारी यांनी काढावा.)
25 May 2018 - 9:08 pm | दिलीप वाटवे
येतोय लवकरच. पण चर्चा तर व्हायलाच हवी असं मला वाटतं. घाटवाटांचा इतिहास आणि भूगोल या विषयावर एकत्रितपणे विस्तृत लेखन बहुतेक नाहीये. इथे अशी चर्चा झाली तर या विषयावरचे बरेच मुद्दे बाहेर येतील, त्यावर लिखाण होईल आणि मग त्याचे एकत्रितपणे डॉक्युमेंटेशन करता येईल आणि असे होणे आवश्यकच आहे.
26 May 2018 - 8:46 am | प्रचेतस
खरंय तुमचं.
ह्या विषयावर जितकं लिहावे तितकं कमीच. चर्चा होणे आवश्यकच आहे. ह्यातूनच घाटवाटांविषयी अनेक वेगवेगळे अॅंगल समजून घेण्यासही मदत होईल.
26 May 2018 - 6:43 am | कंजूस
चर्चा करण्याइतकं वाचन माझं नाही परंतू आताची परिस्थिती सांगणारी तीन उदाहरणं देईन. आताचा वापर कसा आणि किती हे लोकांच्या बोलण्यातून कळले ती माहिती. १)नाणेघाट २)गणपतीघाट भिमाशंकर - खांडस ३)कोंदिवडे - राजमाची ४) वदप (कर्जत) - वरचं गाव ५) खांडपे (कर्जत) - कोंडेश्वर जांभवली.
26 May 2018 - 6:50 am | कंजूस
४) वदप (कर्जत) - ढाक ताव
26 May 2018 - 9:32 am | पैसा
उत्तम लेख आणि चर्चा