रिमाताई लागू यांचा आज प्रथम स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या एका चित्रपटाच्या आठवणीने त्यांना श्रद्धांजली वाहात आहे.
आपली माणसं हा मल्टीस्टारर चित्रपट १९८२ साली आला होता.
मेलोड्रॅमॅटिक परंतु या जगात घडू शकेल किंवा घडलेली असेल अशी मधुकर तोरडमल यांची कथा. सुधीर भट यांचे समर्थ दिग्दर्शन ,उत्तम गीते आणि पार्श्वसंगीत आणि रिमा लागू व अशोक सराफ यांचा अष्टपैलू अभिनय यामुळे हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरला.
कथा तशी साधीच ..... नायक (अशोक सराफ) व नायिका (रिमा) आपल्या संयुक्त कुटुंबात एक मध्यमवर्गीय जीवन जगात असतात. नायक कारखान्यात काम करीत असतो. मुले मात्र मध्यमवर्गीय जीवनात सतत तक्रारी करून आई वडिलांना त्रास देत असतात. या जगात पैशानेच सर्व गोष्टी शक्य आहेत हे वारंवार आपल्या आई वडिलांना सांगून आमचे जीवन खडतर करण्यात तुम्हीच कारण आहात असे दर्शवत असतात. नायक एकदा कंपनीच्या कामासाठी परगावी चालला असताना रेल्वे अपघातात त्याचे निधन होते. निधनानंतर पत्नी अक्षरश: कोसळून जाते पण तिला खंबीर होऊन संसार पुढे चालवायचा असतो. त्यांच्या मुलाला कंपनीत नोकरी मिळते आणि विम्याचे पैसे मिळतात आणि संसाराचा गाडा चालू होतो.
कथेला कलाटणी मिळते जेव्हा नायक परत येतो कारण तो अपघातात बचावलेला असतो. पत्नीला हा सुखद धक्का असतो. तसेच नायकाचे वडील (दिलीप प्रभावळकर ) ही खुश होतात. परंतु त्याचे परत येणे मुलांना आवडत नाही कारण जिवंतपणी जे होऊ शकले नाही ते बाबांच्या मृत्यूने तरी घडले म्हणून मुले आनंदी असतात. मग हा मुलगा वडिलांना एका खोलीत डांबून ठेवून त्यांचे जिवंत असणे लपवतो.
वडिलांच्या श्राद्धाचे दिवशी तो वडीलांना खोलीत डांबून ठेवून श्राद्ध विधी करतो. शेवटी नायक व नायिका अशा मुलांना सोडून जाऊन आपले स्वतंत्र जीवन जगण्यास निघतात. हा कथासारांश
या चित्रपटात सर्वच पात्रांनी कथेला साजेशी उत्तम भूमिका वठवली आहे . केव्हातरी नोकरी सोडल्याची सल मनात बाळगून असणारे मुलांचे आजोबा दिलीप प्रभावळकर यांनी मस्त रंगवले आहेत. सून (रेणुका शहाणे) आणि जावई (प्रशांत दामले) यांची भूमिकाही छोटेखानी पण मस्त. उलट्या काळजाच्या मुलाची
भूमिका सचिन खेदेकर याने उत्तम केली आहे.
रिमा लागू यांनी साकारलेली आई कथेला न्याय मिळवून जाते तसेच अभिनय सम्राट अशोक सराफ यांचा अभिनयही अतिशय उतम. विनोदी अभिनेता म्हणून पडलेला शिक्का पुसण्यात अशोक सराफ यांना खूप यश आले असावे या चित्रपटानंतर.
जीवन हा ऊन पावसाप्रमाणे सुख दु:खाचा खेळ आहे हे वास्तव सांगणारे गीत "न कळता असे ऊन मागून येते सुखाची पुन्हा दु:ख चाहूल घेते " हे आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातील गीत अतिशय श्रवणीय झाले आहे. त्याच्या व्हिडीओ ची लिंक देऊन पुन्हा एकदा रीमाताईना श्रद्धांजली वाहातो .
प्रतिक्रिया
18 May 2018 - 10:22 am | जेम्स वांड
फारच भारी सिनेमा होता!
ख्रिस्ती सुनेचा रोल करणारी रेणुका शहाणे खास लक्षात राहिली होती. सासरे परत आल्याचे आनंदाने पास्टरला सांगायला उतावीळ झालेल्या बायकोला थंड डोक्याचा सचिन पिळगावकर जेव्हा पास्टर समोर
"बाबा मेरीच्या (का जेनीच्या) स्वप्नात आल्याने" ती आनंदी असल्याचे दामटून सांगतो तेव्हा क्षणात हसरा चेहरा पाडलेल्या रेणुकाची अदाकारी खासच होती.
बाकी रीमा लागुंबद्दल काय बोलावे, मस्तच होत्या त्या
18 May 2018 - 10:31 am | बिटाकाका
रीमाताईंच्या स्मृतींना आदरांजली!
-------------------------
खरंच खूप सुंदर आणि कितीही वेळा बघावा वाटावा असा चित्रपट. आणि कितीही वेळा ऐकले तरी परत ऐकावे वाटणारे "नकळता असे दु:ख...." हे गाणे. भारीच! बाप जिवंत असताना जगाला कळू नये म्हणून घातलेल्या श्राद्धाचा सिन तर सुन्न करणारा तसाच दिलीप प्रभावळकर दारू पिऊन सुधीर जोशींना (प्रशांत दामलेंच्या वडिलांच्या भूमिकेत) आपले दुःख कथन करतात तो सिन!
-------------------------
छान लिहिलं आहे तुम्ही!
18 May 2018 - 10:38 am | शान्तिप्रिय
आपल्या प्रतिसादा बद्दल सर्वाना धन्यवाद
18 May 2018 - 11:34 am | कुमार१
माझाही हा आवडता चित्रपट .
धन्यवाद
18 May 2018 - 1:28 pm | शाली
रीमाताईंना जाऊन वर्ष झाले?
रीमाताईंच्या स्मृतींना आदरांजली!!!
18 May 2018 - 2:17 pm | अभिदेश
हा चित्रपट १९८२ साली नव्हे तर १९९० साला नंतर कधीतरी आला होता. दुसरा होता ह्याच नावाने तो १९८२ साली आला होता , त्यात श्रीराम लागू होते. बाकी लेख ठीक.
18 May 2018 - 2:24 pm | शान्तिप्रिय
अभिदेश
चूक सुधारल्याबद्दल धन्यवाद
18 May 2018 - 3:55 pm | manguu@mail.com
नवी मुंबईतील एका हौसिंग प्रोजेक्टची brand ambaseder
कधीतरी धिकतानावाली आज्जी भेटेल म्हणून घरचे खूष होते, अचानक गेल्या वर्षी दुःखद घटना झाली
18 May 2018 - 11:09 pm | पद्मावति
रीमाताईंना जाऊन वर्ष झाले?
हाच विचार आला मनात. मला खुप आवडायच्या त्या. लेख आवडला.19 May 2018 - 12:07 pm | उपेक्षित
समयोचित उत्तम लेख, रीमातैन्बद्दल अजून काही असते तर वाचायला आवडले असते.
आपली माणसे हा माझाही आवडता सिनेमा आहे, मला असे नेहमी वाटते कि विक्रम गोखले/ अशोक सराफ/ नाना पाटेकर / आपला लक्ष्या/ दिलीप प्रभावळकर इत्यादी नटांना मराठी चित्रपट सृष्टीने अक्षरशः वाया घालवले आहे.
21 May 2018 - 12:42 pm | गामा पैलवान
उपेक्षित,
खरंतर चित्रपटसृष्टीने अनेकांची आख्खी आयुष्यंच वाया घालवली आहेत. एकंदरीत चित्रपट ही नाटकाची पुढील पायरी नसावी.
आ.न.,
-गा.पै.
विशेष सूचना : मला नाटक चित्रपटातलं फारसं कळंत नाही.