आज १४ मे - इंग्रजी तारखेनुसार छत्रपती संभाजी महाराजांची जयंती (जन्म १४ मे १६५७). यानिमित्त संभाजी महाराजांशी संबंधित माझे संशोधन आज महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रकाशित झाले आहे. बातमीत सगळे बारकावे देणे शक्य नसते, म्हणून हा एक विशेष लेख - बातमीच्या तुलनेत इथे प्रतिक्रियांतून भरपूर शिकायला मिळते, तेंव्हा आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा.
===
छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द हि १६८० ते १६८९ अशी फक्त नऊ वर्षांची होती, पण या थोडक्या कालावधीतच त्यांनी फार मोठा पराक्रम गाजवलेला आहे. दुर्दैवाने मराठ्यांच्या ह्या पराक्रमी छत्रपतीची अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच चित्रे आजवर उजेडात आली आहेत. मराठ्यांच्या दफ्तरखान्याचा रायगड पडल्यानंतर झालेला विध्वंस, औरंगझेबाच्या स्वारीचे सलग सन १७०७ पर्यंत असलेले संकट ही चित्र दुर्मिळ असल्याची काही कारणे.
आज माझ्या संशोधनातून छत्रपती संभाजी महाराजांचे एक नवीन चित्र उजेडात आले आहे. हे चित्र आज एका खाजगी संग्रहात असून त्याचा २१ एप्रिल २०१६ रोजी मुंबई इथे लिलाव करण्यात आला. हे चित्र ४,५०,००० रुपयांना एका खाजगी संग्राहकाने विकत घेतले आहे.
मूळ चित्र
===
===
(चित्र इतरत्र वापरण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक)
===
हे चित्र अगदी विशिष्ट असण्याचे कारण म्हणजे नेहेमी ऐतिहासिक चित्रात राजा-महाराजांचा अर्धाच चेहेरा दाखवला जातो, पण या चित्रात आपल्याला प्रथमच छत्रपती संभाजी महाराजांचा संपूर्ण चेहेरा पाहता येतो. आणि विशेष म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे वडील छत्रपती शिवाजी राजे यांचेदेखील अगदी याच शैलीतले चित्र फ्रांसच्या राष्ट्रीय संग्रहालयात आहे. त्यामुळे अश्या पद्धतीचे चित्र काढण्याचा प्रघात होता हे सांगता येते.
====
तुलनेसाठी शिवाजी महाराजांचे चित्र
====
चित्राच्या वरती फारसी भाषेत "संभाजी राज" असे नाव लिहिलेले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या डोक्यावर जिरेटोप आहे, त्यात मोत्यांचा तुरा खोचलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या उजव्या हातात दांडपट्टा असून डाव्या हातात एक सरळ तलवार (धोप) धरलेली आहे. चेहरेपट्टी महाराजांचे वडील छत्रपती शिवाजी राजे यांच्याशी मिळती-जुळती आहे. कपडे साधे असून गळ्यात एक जुजबी अलंकार घातलेला आहे. महाराजांच्या कानात काही अलंकार घातलेले नाहीत आणि डोक्यावर गंध नाही, हि गोष्ट इतर चित्रांशी विसंगत असली तरी इतर वर उल्लेखिलेल्या बाबी आणि फारसी नाव यावरून निश्चित सांगता येते कि हे छत्रपती संभाजी महाराजांचे चित्र आहे. या संग्रहातील एक चित्र मोगलांशी संबंधित आहे, त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचे चित्र हे कोणत्यातरी आज नष्ट झालेल्या मोगल मूळ चित्रावरून काढलेले असावे असा अंदाज बांधता येतो.
छत्रपती संभाजी महाराजांचे चित्र हे एकुण चार चित्रांच्या संग्रहापैकी एक आहे. त्या संग्रहात भरतपूरचे महाराजा केशरीसिंह (पानिपतच्या १७६१ युद्धाशी संबंधित प्रसिद्ध जाट राजा सुरजमल जाट यांचा वंशज) यांचे एक चित्र, एक रागमाला चित्र आणि एक योगिनीचे चित्र आहे. योगिनीचे चित्र मोगल शैलीतील असून त्यात फारसी मजकूर लिहिलेला आहे. महाराजा केशरीसिंह यांची राजवट १७६६ ते १७७८ सालापर्यंत होती. त्यामुळे या संग्रहाचा काळ साधारण १७७८ नंतर असा सांगता येतो.
या चित्राचा काळ थोडा उशिराचा असल्याने काही लोक म्हणतील की हे चित्र कोल्हापूरचे महाराज दुसरे संभाजी (जन्म १६९८, मृत्यू १७६०) यांचे कशावरून नाही? आपल्याला ते चित्राच्या पद्धतीवरून सांगता येते. शिवकाळात आणि संभाजीकाळात इमारती, चित्रे आणि इतर कलाकृती यामध्ये दक्खनी शैली जी विजापूर, गोवळकोंडा आणि अहमदनगर या राज्यांमध्ये प्रचलित होती (आणि त्याही आधी बहामनी काळात होती) त्या शैलीतले हे चित्र आहे. शिवाजीराजांची चित्रे आणि विजापूरमधील इतर सरदार जसे सर्जाखानाचे चित्र आणि अहमदनगरचा मलिक अंबरची चित्रे पाहिली कि त्यातले उभे राहण्याची शैली आणि हातातल्या तलवारी हे अगदी सारखं आहे.
===
तुलनेसाठी मलिक अंबरचे चित्र
===
पण नंतरच्या काळात, म्हणजे शाहू छत्रपती आणि दुसरे संभाजी कोल्हापूरकर यांच्या काळात ही शैली मागे पडून जुन्या मराठा-हिंदू शैलीचे पुनर्जीवन झाले. हा निबंध फार चांगल्या रीतीने हा मुद्दा मांडतो - जिज्ञासूंनी मुळातच वाचावा
त्यामुळे शाहू छत्रपती आणि पेशवे किंवा अठराव्या शतकातील चित्रे अगदी वेगळी आहेत. डोक्यवरची पगडी, जिरेटोप, उभे राहण्याची पद्धत, हातातल्या तलवारी यावरून ते लगेच जाणवते. त्यामुळे या चित्राच्या शैलीवरून सांगता येते की हि जुनी सतराव्या शतकातील शैली (आणि व्यक्ती) आहे, चित्र अठराव्या शतकातील कोल्हापूरचे महाराज दुसरे संभाजी यांचे असू शकत नाही.
प्रतिक्रिया
14 May 2018 - 7:58 am | manguu@mail.com
छान
14 May 2018 - 9:04 am | प्रचेतस
आजच मटाला ही बातमी वाचली, तुमच्या लेखामुळे मात्र ह्या चित्राबद्दल तपशीलवार समजले.
14 May 2018 - 9:24 am | यशोधरा
आज मटामध्ये वाचली बातमी.
14 May 2018 - 9:27 am | माहितगार
आपला अभ्यास आहेच , तरीही दोन शंका
१) छ. शिवाजी महाराजांच्या थोरल्या बंधूंचे नावही संभाजी राजे भोसले (ज.इस १६२३ ते मृ इस १६५५ संदर्भ म.विकि) होते. आपल्या म्हणण्या प्रमाणे चित्र शैली १७व्या शतकातील असे गृहीत धरले तरी ते त्यांच्या थोरल्या बंधूंचे नसेल हे कसे निश्चित करणार ?
शहाजी राजे भोसले , छ. शिवाजी महाराज , संभाजी महाराजांची जी दुसरी अस्सल छायाचित्रे उपलब्ध असल्यास / सहज शक्य असल्यास तीही तुलनेसाठी द्यावी असे वाटते .
२) आपण नमुद केलेल्या म.टा. बातमीत "संभाजी महाराजांच्या निधनानंतर ७० वर्षांनी काढलेले चित्र." असा उल्लेख आहे, याची निश्चिती कशी केली ते लक्षात नाही अले.
* मला वाटते अधिक अचूकतेसाठी चित्रांचे कार्बन डेटींग केले जाण्यास प्रोत्साहन दिले जावयास हवे.
14 May 2018 - 9:35 am | माहितगार
चित्राचा वापर परवानगी घेऊन केल्यास अधिक श्रेयस्कर , म्हणजे माहितीची अचूकता अधिकतम जपता येते असे वाटते. तरीही कॉपीराईट कितपत चालूराहील या बाबत साशंकता वाटते.
उत्तरदायीत्वास नकार
14 May 2018 - 9:52 am | माहितगार
पहिल्या दोन चित्रातील पोषाख पद्धतीतील एक साम्य , स्ट्रोल सारखा जो कही प्रकार (काय म्हणतात ?) डावा खांदा वरुन उजव्या खांद्या खालून नंतर कंबरेवर बांधण्याची -कॅरी करण्याची पद्धत रंग वेगळे असले तरी एक सारखे पणा जाणवतो.
पहिल्या आपण संभाजी महाराजांचे असल्याचा उल्लेख केलेल्या चित्रात राजांच्या उजव्या खांद्याखालून अजून एक पोशाखाच्याच रंगाच्या वस्त्राचा भाग दिसतो आहे असे वाटते, ते काय किंवा प्रयोजन काय असावे ?
14 May 2018 - 11:32 am | अनुप ढेरे
मस्तं लेख!
14 May 2018 - 12:30 pm | एस
संभाजीराजेंचं मूळ चित्र पाहून आनंद झाला. आपल्या संशोधनकार्याला सलाम!
15 May 2018 - 8:18 am | पैसा
उत्तम लेख! या चित्रात संभाजी राजांच्या चेहऱ्याचे बारीक निरीक्षण करता शिवाजी महाराजांच्या चेहऱ्याशी साम्य दिसते. मात्र कोणतेही अलंकार दिसत नाहीत. तसेच पार्श्वभूमी प्लेन आहे. हे चित्र कदाचित अपुरे राहिलेले असावे असे वाटले.
15 May 2018 - 9:39 am | महासंग्राम
1.लेखकाच्या पोस्टनुसार संभाजी राजांच्या मृत्यूनंतर सुमारे ६०-७० वर्षाने हे चित्र काढले गेले आहे, तसेच हे चित्र कोणत्यातरी नष्ट झालेल्या मूळ मोगल चित्रावरून काढले गेले असावे असा अंदाज बांधला आहे. त्याला पुरावा नाही त्यामुळे हे चित्र कितपत खरे मानावे याची शंका वाटते.
2. आपण ज्या शैली नमूद केल्या त्या शैलीमधून त्या काळात अनेक चित्र साकारले गेले असतील तेव्हा हे चित्र दुसऱ्या कोणत्या सरदाराचे सुद्धा असू शकते. एका विशिष्ट शैलीत ते चित्र काढले गेले म्हणजे ते अस्सल असणार ही गोष्ट थोडी खटकते.
3. या चित्राचा चित्रकार कोण होता हे नमूद केले नाही ?
4. चित्र कोणीही काढली असो मुघल शैली असो किंवा मराठा शैली त्यात दागिने असतातच यात फक्त गळ्यातील एक दागिना दाखवला आहे. शिवाय शिवगंध आणि कानात काही नाही. अशी चूक कोणताही चित्रकार राजघराण्यातील व्यक्तीच्या बाबतीत करणार नाही.
५. या चित्राचे कार्बन डेटिंग केले आहे का ? त्यामुळे त्याची काल निश्चिती करता येते.
15 May 2018 - 10:13 am | प्रचेतस
चित्र अस्सल असावे असे मला वाटते कारण इतर बाबी जुळत आहेत, मात्र चित्र जरी अस्सल असले तरी चित्रातील प्रतिमा संभाजीराजांच्या तत्कालीन चित्राची मिळतीजुळती आहे का नाही हे राजांचे एखादे उपलब्ध असलेले मूळ चित्र पाहून शोधावे लागेल.
कार्बन डेटींगने काल अचूक सांगता येत नाही म्हणजे निश्चित असे वर्ष सांगता येत नाही. त्या पद्धतीने केलेल्या कालमापनात अधिक उणे असा ४० वर्षांचा म्हणजेच एकूणात ८० वर्षांचा फरक पडू शकतो त्यामुळे ह्या चित्राच्या अचूक कालमापनात कार्बन डेटिंगचा फारसा उपयोग होणार नाही.
15 May 2018 - 11:08 am | मनो
धन्यवाद वल्ली, हेच लिहिणार होतो कार्बन डेटिंग बद्दल.
महत्वाचा पुरावा म्हणजे संभाजीराज हे फारसीमध्ये वर लिहिलंय.
चित्राचा काळ हा चित्र संभाजी महाराजांचे आहे की नाही याचा पुरावा असू शकत नाही. त्यामुळे चित्र कधीही काढले असले तरी ते खरे/खोटे इतर गोष्टीवरून ठरवावे लागेल?
मुद्दा २ मला समजला नाही, संभाजी राजांच्या नावाचे चित्र इतर सरदारांचे कसे असू शकेल? संभाजी राजे या नावाचा हातात दांड-पट्टा असणारा कोणता सरदार पेशवाईत किंवा ब्रिटिश काळात होता?
चित्रकाराची माहिती माझ्याकडे नाही, करण चित्रकाराने स्वतःचे नाव टाकलेले नाही.
(४) मी ही गोष्ट लेखात विचारात घेतली आहे, ही एक गोष्ट विसंगत आहे हे मान्य. तुम्ही या काळातली चित्रे पहा आणि चेहेऱ्यास उठाव देण्यासाठी साध्या परंतु सुंदर पोशाखात दाखवलेले, किमान अलंकार घातलेले सत्ताधीश पहा - मग ही गोष्ट शैलीचा भाग वाटते.
माधवराव पेशवे
तुमचे मुद्दे आणि शंका रास्त आहेत, पण दुर्दैवाने इतिहास असाच अपुरा आणि संदिग्ध असतो. म्हणूनच तुकडे जोडत-जोडत, साम्य शोधत जपूनच विधाने करावी लागतात. इंग्रजी पद्धतीप्रमाणे जर चित्रकार, व्यक्ती, तारखा टाकून चित्र सापडले असते तर मला निर्विवाद विषय मांडता आला असता, पण वस्तुस्थिती तशी नाहीये, त्याला काय करणार.
15 May 2018 - 12:35 pm | महासंग्राम
धन्यवाद, हे चित्र जर अस्सल निघाले तर आनंदच होईल काही शंकांचे निरसन झाले. काही अजूनही बाकी आहेत. यथावकाश सबळ पुरावे मिळाले तर त्या हि दूर होतील.
15 May 2018 - 12:41 pm | अभ्या..
शिवराय आणि संभाजी महाराजांच्या चित्रांची तुलना पाहता साम्य तर अजिबात नाहीये. पण मीर महंमदाने काढलेल्या त्या सुप्रसिद्ध बंगळुरूच्या चित्राशी बरीच साम्यस्थळे आहेत. संभाजी महाराजांच्या नाकनक्ष रेखाटण्यात बरेच फरक आहेत. चेहरा बराचसा मंगोलिन टाईपचा आणि नाकाचा उंचवटा देखील वेगळा आहे. मिशा कल्ले आणि दाढी रेखाटण्यातली पद्धत पूर्णपणे निराळी आहे. शिवरायांच्या चेहर्यातल्या डिटेल्स मात्र प्रमाणबर हुकूम आहेत. मलिक अंबर चे चित्र पाहता त्वचेचा रंग आणि शरीर विशेष कडे दिलेले लक्ष संभाजी महाराजांच्या चित्रात जाणवत नाही. कदाचित हे फारच नवशिक्या अथवा पूर्ण कल्पना नसलेल्या चित्रकारा कडून काढून घेतलेले चित्र वाटते. हातातील शस्त्रांची चुकलेली अलाईनमेंट, बॉर्डर काढताना केलेला ढोबळपणा आणि डिटेल्स कडे केलेले दुर्लक्ष ह्याचीच पुष्टी करतात.
15 May 2018 - 12:01 pm | दुर्गविहारी
माझ्या मनातही याच शंका आल्या. पण ठिक आहे. चित्र संभाजी राजांचे असेल तर आनंदच आहे.
15 May 2018 - 11:12 am | मनो
कपाळावर लाल रंगाचे काहीतरी आहे असं मला वाटतंय, पण 100℅ खात्री नसल्याने ते नाही म्हणून गृहीत धरतो आहे.