तुझ्या त्या निरागस आनंदामागेही थोडेसे बालिश शौर्य असेल बहुतेक
बागेत सापडलेल्या नारळाला धागे बांधून बनवलेले टेलिफोन
मी झोपी गेलो तू तरीही बोलतच राहिलास
तू बोललास मरणाला काय घाबरायचे?
मुलींचे कपडे घालून काढलेल्या फोटोंची मात्र तुला भीती वाटत असावी.
नाहीतर कुलूप लावून पेटीत का लपवले होतेस?
खरेतर ज्या दिवशी तू निघून गेलास,
तेव्हा मला वाईट वाटले नाही.
जेव्हा तू गाडीचा दरवाजा धाडकन बंद केलास
मी सुखावलो होतो जरासा.
पण मीही तरुण होतो, युद्धांवर विश्वास ठेवण्याइतका..
नंतर पुढे बरीच वर्षे तुझ्या विषयी काहीबाही ऐकायला मिळायचे..
मला आनंद आहे कि तुझी सुटका झाली
पण मी अजूनही इथेच अडकलेलो आहे.
आजतर सदरा भिजला माझा तुझ्या आईच्या अश्रूंनी
आयुष्य असे असेल असे कधीच वाटले नव्हते..
अजूनही रात्री मी त्या बागेत जाऊन बसतो.
तिथेही हल्ली सगळे भकास असते
पण तुझ्या आठवणीने सगळा एकटेपणा नाहीसा होतो.