सखी तिचे गुपित माझ्यासमोर उघड करते
तिने मुलांवर टाकलेल्या जाळांचे हिशोब देते
प्रसंगावर या मला खळखळून हसायचे होते
पण बाजुला माझ्या लोक उभे होते.
नजरेने त्याच्या माझे काळीज चिरत होते
वासनांचे कैवारी माझ्या पुढ्यातच बसले होते
शिव्यांच्या लाखोलीसाठी अोठ अधिर झाले होते
पण बाजुला माझ्या लोक उभे होते
"त्यास" आज मी अखेरचे न्याहळत होते
डोळ्यात त्याच्या माझा भुतकाळ पहात होते
मिठित त्याच्या आजतरी पोटभर रडायचे होते
पण बाजुला माझ्या लोक उभे होते.
परतीच्या वाटेवरचे वाहन माझे डोळे दिपवते
दुस-याच क्षणी धक्याने मी खाली कोसळते
अपेक्षेने मी आजुबाजुच्या लोकांकडे मदतीसाठी पाहते
पण बाजुला माझ्या लोक उभे होते !
माझे रक्तही मला सोडून जात होते
बाजुची सगळी गर्दी केवळ कुजबुजत राहते
माझेच गीत मी पुन्हापुन्हा गुणगूणत राहते
"पण बाजुला माझ्या लोक उभे होते ??"