कासव बघितला. बघताना बोरकरांची 'जेथे जातो तेथे' आठवत राहिली.
जेथे जातो तेथे मी माझा सांगाती
पुढे आणि पाठी मीच माझ्या
मीच माझी वाट मीच माझा दिवा
हि-याचा ताजवा मीच माझ्या
मीच माझी रुपे पाहतो पाण्यात
आणितो गाण्यात मीच त्यांना
मीच मला कधी हासडितो शिव्या
कधी गातो ओव्या मीच मला
अशी माझी चाले नित्य मम पूजा
लोकी माझ्या ध्वजा मिरवितो
नाही कधी केली तुझी आठवण
म्हणालास पण मीच तू रे
कधीतरी मन आजारतं. कधी नुसत्या सर्दी-पडश्यावर भागतं, कधी दीर्घ मुदतीचा ताप येतो. फतकल मारून बसतो, हटत नाही. अश्यावेळी हायबरनेट व्हावंसं वाटतं. तेव्हा आपापली एखादी जानकी, अशी एखादी कविता, डॉक्टर, जरूर तेव्हा औषधं, आवडतं काम, घ्यावं मदतीला. हळूहळू ताप उतरत जातो. मनाचीही निगा राखावी. कशी, ते कासव बघून नीटसं लक्षात येईल. हेही दिवस जातील, मला वाटतंय ते खरं आहे का, तेवढंच खरं आहे का, हे स्वतःला विचारण्याचं भान कुणाकडून तरी घ्यायचं. ते आपलं आपल्याला नसतं. कान-डोळे असतात, बघायला ऐकायला शिकायचं. स्वतःसाठी. स्वतःसाठी जगायचं, स्वतःवर प्रेम करायचं.
कडकडीत उन्हाळ्यात आपल्याला जागोजाग फुललेले बहावे दिसतात. नुसतं बघूनही आपलं मन धमक होऊन जातं. किती पडझड होते, जीवनाचा एक अंशदेखिल शिल्लक उरत नाही. तरी निसर्ग फुलायचा थांबत नाही. पावसाची केवळ एक शिंपड जमिनीला हलकं फुलकं होऊन दरवळायला पुरेशी होते. भूकंप, वणवे, काहीही होवो, कोरडंठक्क पडलेलं झाड पालवणं थांबवत नाही की बी फळायचं विसरत नाही. निसर्ग मोठा अद्भूत समुपदेशक, डॉक्टर आहे. एरवी आपल्या हाताच्या स्पर्शाचा दाह सहन करू न शकणारी बहाव्याची झुंबरं रणरण उन्हाच्या धगीत दिवसेंदिवस मजेत तग धरून झुलत असतात. आधीच्या पडझडीची, सोसलेल्या तगमगीची कोळिष्टकं त्या रसरशीत पिवळेपणाला काळवंडायची हिंमत करू शकत नाहीत. त्या नाजूक जीवांना जे जमतं, ते आपल्याला का जमू नये? जमतं, जमवायला हवं.
कासवही हेच सांगतो, कासवांच्या गोष्टीतून. फार छानपैकी. शब्दांचं वायफळ पाल्हाळ न लावता. कासवं, मानव, जानकी, परशू, यदू, दत्ताभाऊ, समुद्र, अनेक वाटा असलेलं मोकळं ढाकळं घर, सुकथनकरांचे शब्द, कॅमेरा असे सगळे मिळून सांगतात. खरंतर आपलीच असलेली ती गोष्ट मग जास्त चांगल्या प्रकारे समजते. खूप उत्तरं मिळतात. न मिळालेल्यांची उत्तरं शोधण्याचा हुरूप मिळतो. यदू सांगतो तसं झडझडून कष्ट करावेत, भरभरून जगावं, जीवाला जीव लावावा हे पटतं. भजी खावी वाटली तर भजी खावी, चहा प्यावा वाटला तर चहा प्यावा, दोन्ही एकदम कोंबलं तर ठसका लागतो हे तत्वज्ञान परशूकडून ऐकल्यामुळे जास्त अपील होतं. मानवच्या हातात गाडीची किल्ली सोपवून जानकी त्याच्याबरोबर निघते तेव्हा गोल वळण घेणारा रस्ता दिसतो. मानवचा योग्य दिशेनं सुरू झालेला प्रवास दाखवणारा. असं खूप आहे. प्रत्येकानं बघायला हवा कासव, आपापल्या नजरेनं.
खुपसे लोकं मला शाळेत शिकवायला का नव्हते असं वाटतं. त्यात सुमित्रा भावे-सुनिल सुकथनकर पण आहेत. सतत सोडवावे लागणारे कठीण विषय सोपे करून समजावतात ते. कासवही तसाच आहे. मी त्या दोघांचे त्यासाठी मनापासून आभार मानले. असे चित्रपट वरचेवर येत रहाणं आणि ते आपण सगळ्यांनी आवर्जून पहाणं खूप आवश्यक आहे. तुम्हीसुद्धा सगळ्यांनी कासव नक्की पहा.
प्रतिक्रिया
13 Oct 2017 - 12:21 pm | सूड
धन्यवाद लिहील्याबद्दल. राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या चित्रपटाला मिळणार्या शोजची वानवा बघून वाईट वाटतं.
वेळेत बसणारी तिकीटं मिळाली तर नक्कीच बघायचा विचार आहे.
13 Oct 2017 - 2:51 pm | अभिजीत अवलिया
ह्याला कारण म्हणजे एकाच शुक्रवारी ६ का ७ चित्रपट रिलीज केले गेले. त्यामुळे कुणालाच भरपूर स्क्रीन/शोज मिळाले नाहीत.
13 Oct 2017 - 6:25 pm | सूड
तरी मागच्या आठवड्यात कासवचे फार शोज नव्हते. या आठवड्यात अवस्था जरा बरी आहे.
13 Oct 2017 - 12:43 pm | एस
अतिशय सुंदर लिहिलंय.
13 Oct 2017 - 1:22 pm | सई कोडोलीकर
तर सुवर्णकमळ विजेता :-)
13 Oct 2017 - 1:29 pm | प्रकाश घाटपांडे
सुंदर लिहिलय!
13 Oct 2017 - 2:42 pm | पाटीलभाऊ
+१११
अत्यंत सुंदर चित्रपट आहे.
13 Oct 2017 - 2:47 pm | अभिजीत अवलिया
छान लिहिलय. परवाच हा चित्रपट पाहिला. आवडला.
13 Oct 2017 - 5:03 pm | यशोधरा
चपखल लिहिलंस सई. आवडलं.
13 Oct 2017 - 6:29 pm | Naval
आधीच्या पडझडीची, सोसलेल्या तगमगीची कोळिष्टकं त्या रसरशीत पिवळेपणाला काळवंडायची हिंमत करू शकत नाहीत. त्या नाजूक जीवांना जे जमतं, ते आपल्याला का जमू नये? जमतं, जमवायला हवं.
खूपच सुंदर लिहिलंत !! नैराश्य ही गोष्ट सगळ्यांनाच कधी ना कधी भेडसावणारी हा विषय सिनेमा बनवण्यासाठी घेणं खरंच कौतुकास्पद. नक्की बघायचाय कासव...
13 Oct 2017 - 6:52 pm | मराठी कथालेखक
पिंपरी-चिंचवडमध्ये एक पण खेळ नाहीये अजून
15 Oct 2017 - 6:12 pm | चौथा कोनाडा
पिंचिं मध्ये पहिल्या आठवड्यात होता, सिटी-प्राईड रॉयलला, रहाटणीला ! मी पहिल्यांदाच गेलो होतो तिथं !
या आठवड्यात पिंचिंला नाही दिसतय पण जवळच सिनेपोलिस, वेस्ट एंड मॉल औंधला दुपारी ३:१० चा शो आहे.
अडजस्ट केलं तर जमू शकेल !
जरूर बघा, सुंदर सिनेमा आहे !
13 Oct 2017 - 7:13 pm | कंजूस
कासव हळूहळू सरकेल. ( माबोवर सात धागे!)
13 Oct 2017 - 7:25 pm | अत्रुप्त आत्मा
बघणार हाय.
13 Oct 2017 - 7:33 pm | सई कोडोलीकर
प्रतिसाद दिलायत कल्पना नाही, पण मायबोलीवर सात धाग्यांचं कारण, त्या सगळ्यांनीच कासव एकत्र पाहिला, आवडला, प्रत्येकालाच लिहावंसं वाटलं.
चांगला चित्रपट प्रमोट केला गेला पाहिजे. कासवचे शोज वाढण्यामागे हादेखिल हातभार असू शकेल.
राजकारण, धर्म, चलतीतले व्यावसायिक चित्रपट, इतर वादग्रस्त विषयांवरही अनेकानेक धागे एकावेळी येत असतातच, कासववर येण्यास हरकत नसावी.
मिपावर कासवबद्दल कुणाचाच काही अभिप्राय दिसला नाही, म्हणून आवर्जून इकडेही पोस्ट केला लेख.
ब-याचदा चुकवू नयेत असे चित्रपट कामच्या धबडग्यात बघायचे राहून जातात, ह्या धाग्यांनी निदान थोडे तरी आणखी पोचावेत.
13 Oct 2017 - 11:39 pm | एस
हाहाहा! सईताई, ती कंकाकांची खास शैली आहे. निगेटिव्ह टोन वगैरे काही नाही. :-)
14 Oct 2017 - 9:18 am | कंजूस
कासवात करमणुकीशिवाय इतर संदेशवगैरे असणार असं दिसतय. बय्राच समिक्षा आल्या म्हणून गम्मत वाटली एवढेच.
बाकी कासव म्हणजे पाण्यातला उंदीर. सर्व खातो/खाते. आपल्याकडे जमिनीवरची जाड पायांची कासवं नाहीत. ती बरीच वर्षे जगतात आणि शर्यतीतलं कासव ते हेच. पाण्यातलं नव्हे. कुर्मावतार हा पाण्यातल्या कासवाचा , वल्हेछाप चपटे पायवाल्या कासवाचा आहे. ते नारायणाच्या देवळात असते. चारही पायच असतात. समुद्रीकासवाचे पुढचे पाय वल्हे असतात.
15 Oct 2017 - 8:05 am | १००मित्र
सई, आपल्याला भासतात, त्यापेक्षा माणसे खूपच खोल असतात नाही ? म्हणजे उथळ तर नक्कीच नसतात. (कंजूस) ह्यांच्या स्पष्टीकरण स्वरूप प्रतिक्रियेतून हे सिद्ध होतं. मग फक्त प्रथितयश मंडळींच्या खेरीज असणारी विनम्र प्रतिभासुद्धा “unlock” व्हायला हे मिपा सारखे platforms खूपच मदत करतात.
बाकी तुझा लेख, समीक्षा अप्रतिमच. फेबु वर वाचलंच होतं, आता हा सिनेमा तर पाहायचाच असं ठरवतोय.
15 Oct 2017 - 7:43 pm | यशोधरा
लिहायचे राहून गेले.. :)
13 Oct 2017 - 7:34 pm | मराठी कथालेखक
मिपावर इरावती हर्षेचे चाहते आहेत का कुणी ? जरा हात वर करा पाहू...
....
अर्थातच पहिला मी
13 Oct 2017 - 8:14 pm | सूड
इरावती, मृणाल कुलकर्णी, पल्लवी जोशी. ;)
13 Oct 2017 - 11:20 pm | एस
... + देविका दफ्तरदार, अमृता सुभाष, स्मिता तांबे, उषा जाधव इत्यादी अनेक.
16 Oct 2017 - 11:56 am | सूड
स्मिता तांबे?
21 Oct 2017 - 1:35 am | एस
का नाही? '७२ मैल - एक प्रवास' पाहिलात का?
1 Nov 2017 - 12:56 am | सूड
नाही बघितला अजून.
13 Oct 2017 - 11:04 pm | पिलीयन रायडर
खूप सुंदर लिहिलं आहे! हा चित्रपट बघायचा आहेच 100%.
आज ही चांगली बातमी वाचली. शोज वाढवले आहेत आता.
http://www.esakal.com/manoranjan/kaasav-marathi-movie-esakal-news-77212
13 Oct 2017 - 11:13 pm | पैसा
बघायचा आहे.
14 Oct 2017 - 12:32 am | पिशी अबोली
अतिशय आवडलाच अर्थात... हे लिहिलेलं सुंदर आहे.
14 Oct 2017 - 1:00 am | रेवती
मस्त लिहिलय. कासव बघणार.
इरावती हर्षेंची मी फ्यान आहे हो मकले पण एसभाऊंनी सुचवलेल्या नावांचीही दणदणीत फ्यान आहे.
15 Oct 2017 - 6:55 pm | मराठी कथालेखक
पुर्वी दुरदर्शनवर शांती या हिंदी मालिकेत मी इरावतीला पहिल्यांदा पाहिलं नंतर सुरभी या माहितीपर कार्यक्रमात रेणुका शहाणेनंतर ती आली... सुरभीमध्ये तर खूपच गोड दिसायची.
15 Oct 2017 - 6:56 pm | मराठी कथालेखक
पुर्वी दुरदर्शनवर शांती या हिंदी मालिकेत मी इरावतीला पहिल्यांदा पाहिलं नंतर सुरभी या माहितीपर कार्यक्रमात रेणुका शहाणेनंतर ती आली... सुरभीमध्ये तर खूपच गोड दिसायची.
14 Oct 2017 - 7:57 am | निशाचर
खूप सुंदर लिहिलंय!
14 Oct 2017 - 11:06 am | सई कोडोलीकर
सर्वांचे मनापासून आभार. वर लिहिली गेलेली इरावती हर्षेसकट सगळी नावं बेस्टच आहेत.
कासवचं AACTA (Australian Academy of Cinema, Television, Arts) च्या बेस्ट एशियन फिल्म कॅटेगरीसाठी नामांकन झाल्याची ताजी चांगली बातमी आली आहे.
14 Oct 2017 - 5:33 pm | स्वाती दिनेश
खूप छान लिहिलं आहे.
'नक्की बघणार 'च्या यादीत कासव आहेच.
स्वाती
14 Oct 2017 - 7:40 pm | भ ट क्या खे ड वा ला
निसर्ग मोठा अद्भूत समुपदेशक, डॉक्टर आहे. एरवी आपल्या हाताच्या स्पर्शाचा दाह सहन करू न शकणारी बहाव्याची झुंबरं रणरण उन्हाच्या धगीत दिवसेंदिवस मजेत तग धरून झुलत असतात.
हे फारच आवडलं.
बघायचा आहे जर जवळपास लागला तर.
15 Oct 2017 - 8:08 am | १००मित्र
अफलातून वाक्य आहे , स्वत:चा तसा विश्वास असेल; तर जरा जास्तच पटतं, भावतं !
15 Oct 2017 - 1:03 pm | डॉ श्रीहास
एक डॉक्टर म्हणून पदोपदी अनुभवतो आहे... पेपरवरच्या रिपोर्ट्स चा ईलाज करता करता त्या अाजारानी ग्रस्त रुग्ण कधी बाजूला सारला जातो हे कळतच नाही ....
आज जातो आहे बघायला आणि ते देखिल एका Psychiatrist दोस्तासोबत ...
सईताई लेख खूपच छान आहे ..._/\_
15 Oct 2017 - 6:23 pm | सतिश गावडे
खुपच सुंदर चित्रपट आहे, आवर्जून पहावा असा.
डॉ आगाशेंचा मानसिक आजारांबद्दल चित्रपटांच्या माध्यमातून जनजागृतीचा हा उपक्रम स्तुत्य आहे.
15 Oct 2017 - 6:30 pm | अजया
फारच सुरेख चित्रपट आहे. सुदैवाने सिटीप्राइड कोथरुडला सोयीचे शो लावले आहेत. आम्ही गेलो तेव्हा निम्मे थिएटर रिकामे होते :(
समूहातलं एकटेपण गांगरून टाकणारे असते. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात असे अनेक लोक या नैराश्यातून जात असतील. कासवासारखे सुरेख रूपक एकटेपणा दाखवण्यासाठी अतिशय चपखल वापरले आहे.
चित्रपटात कॅमेरा पण बोलतो. लहर समंदरसारखे सुंदर गाणे त्यातल्या आशयासकट श्रवणीय आहे. कलाकारांची कामेदेखील अप्रतिम आणि सहज.
हे सर्वच हा चित्रपट पाहणे एक आनंदानुभव देते. जरुर थिएटरला जाऊन बघायला हवा.
17 Oct 2017 - 7:04 pm | चौथा कोनाडा
हो, लहर समंदर खूपच सुंदर आहे !
ज्या सिच्युएशनला ते पडद्यावर येतं तेव्हा जबरदस्त परिणाम करून जातं !
( हे हिंदी गाणं आहे बरं का )
16 Oct 2017 - 11:50 am | सई कोडोलीकर
सर्वांना धन्यवाद.
आपल्याला भावलेली एखादी गोष्ट इतरांनाही आवडेलच असं नाही. पण सुदैवाने कासवबाबतीत तसं झालं नाही. बघून आलेल्यांनाही आवडतो आहे.
डॉ आगाशेंचा मानसिक आजारांबद्दल चित्रपटांच्या माध्यमातून जनजागृतीचा हा उपक्रम स्तुत्य आहे>> हो, अगदी.
16 Oct 2017 - 11:57 am | सूड
शनवारी बघून आलो. अत्यंत सुंदर चित्रपट आहे.
17 Oct 2017 - 5:20 pm | Abheeshek
चित्रपट फारच सुंदर बनवलाय आणि त्याला सुवर्णपदक मिळाल्याबद्दल चित्रपट दिग्दर्शक कां चे हार्दिक अभिनंदन...
31 Oct 2017 - 5:00 pm | मराठी कथालेखक
अखेर कासव पाहिला. पण निराशा झाली.
कथानकात काहीच दम नाही, टीचभर कथानक आहे. ते ही न पटणारे. एखादी बाई एखाद्या अगदी अनोळखी मुलाला अनेक दिवस घरात ठेवून घेईल हे पटतच नाही (अगदी आईची / मोठ्या बहिणीची माया मनात दाटून आली असं मानलं तरी) त्यामुळे सगळा चित्रपटच अतर्क्य वाटतो. बरं तो बेशुद्ध असताना उपचार करायचे म्हणून ठेवेलही कदाचित. पण इथे तो शुद्धीवर आल्यावर स्वतःच नाव सांगत नाहीये, नीट वागत नाहीये तरी ती त्याला ठेवून घेते हे अगदीच न पटणारं आहे.
संवाद कृत्रिम वाटतात. उगाच संथपणे पावणेदोन तास चित्रपट चालत रहातो पण काही चांगलं बघितल्याचा आनंद अजिबात मिळत नाही.
1 Nov 2017 - 12:55 am | सूड
ती स्वत:ला डिप्रेशन मध्ये असताना काय झालं होतं तेच त्याला होताना बघून ठेवते घरी, आणि स्वत: डॉक्टरला सतत त्याला काय होतंय ते सांगून औषधं देते. नुस्तं अनोळखी माणसाला ठेवून घेणं इतका मर्यादित नाहीये चित्रपट.
1 Nov 2017 - 10:51 am | जागु
खुप छान लिहील आहेस सई.
6 Nov 2017 - 8:52 pm | मीता
कासव पाहिला.. अत्यंत सुंदर चित्रपट.. गाणीही खूप छान आणि प्रसंगाला पूरक आहेत .
7 Nov 2017 - 10:50 am | सई कोडोलीकर
अगदीच शक्य आहे.