फकीर
जॅक्सन म्हणजे एक वाट चुकलेला फकीर होता. वाहवत जाणे हा त्याचा स्थायीभाव होता असं म्हटलं तरी चालेल. एकदा का एखाद्या गोष्टीच्या मागे लागला की परत मागे फिरणे त्याच्या स्वभावातच नव्हते. ‘‘जॅक्सन’’ याच नावाने त्याला सर्व ओळखत. आगा ना पिछा. बाजारात सुद्धा ‘जॅक्सन’ याच नावाने ओळखला जाई. ना त्याला कोणी जॅक्सन साहेब म्हणून हाक मारीत ना त्याचे पूर्ण नाव कोणाला माहीत होते. पण सगळ्यांना त्याच्याबाबतीत एक गोष्ट माहीत होती ती म्हणजे तो एक इंग्रज होता...वाट चुकलेला साहेब !
त्याच्या तुलनेने चांगल्या दिवसात त्याने दोन उन्हाळे कलकत्त्यात एका नाच गाणे करणार्या तद्दन भिकार संगीत बारी बरोबर काढले होते. तो एक उत्कृष्ट नकलाकार होता व असे म्हणतात की त्याच्या नकला पाहून देशी लोकही गडाबडा लोळत. गंभीर चेहर्याने म्हटलेली त्याची विनोदी गाणी त्या काळात कलकत्त्यात बर्यापैकी लोकप्रिय होती. दारूने झिंगलेला असतानाही, म्हणजे बहुतेक वेळा तो झिंगलेलाच असायचा, तो आपला चेहरा गंभीर ठेवू शकत असे. पण एक दिवस कलकत्याच्या चायना टाऊनमधील एका हॉटेलच्या स्टेजवर दारू पिऊन त्याने भयंकर गोंधळ घातला. त्याला आवरायला व तेथून हाकलून देण्यास तेव्हा सात आठ माणसे लागली होती. कसे कोणास ठाऊक त्याच्या डोक्यात तो एक नाचणारा फकीर आहे असे घुसले होते व त्याच समजुतीत तो त्या हॉटेलच्या व्यवस्थापकाच्या भोवती फेर धरून नाचत नाचत, शेवटी दमून रस्त्यावर एका दिव्याच्या खांबाखाली पडलेला आढळला. त्या तेथेच त्याची कलेची सेवा संपुष्टात आली असे म्हणायला हरकत नाही.
जॅक्सन वाहवतच होता. कलकत्त्याचा रेसकोर्सवर तो वेगवेगळ्या संदर्भात बऱ्याचजणांच्या परिचयाचा होता पण प्रत्येकजण त्याच्याकडे संशयानेच पाही हेही तितकेच खरे आहे. म्हणजे त्याच्या सर्व ओळखीच्या लोकांना त्याची टोपी घालून झाली होती. तुम्ही सर्व काळ सर्वांना फसवू शकत नाही. काही काळ त्याने सायकली चोरून त्या शहराच्या दुसऱ्या भागात भाड्याने देण्याचा धंदाही केला पण त्यामुळे तुरुंगात तीन महिने काढल्यावर त्याचा तो धंदाही बंद पडला. मग तो बॉम्बेला गेला. तेथे मोटर गॅरेजमधे काम करत असतानाच तो भडवेगिरीही करत होता असे म्हणतात. पण त्याला बॉम्बेही सोडावे लागले. दारू पिऊन एका सभ्य पारशी स्त्रीची छेडछाड करणाऱ्या गोर्या कळकट्ट कपडे परिधान केलेल्या एका माणसाला पोलीस शोधत असतानाच त्यांना त्याचे शेवटचे नाव जॅक्सन आहे हे कळल्यावर त्यांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. त्यावेळीही तो बाजारात हात भट्टीची पिऊन झिंगून फिरत होता. बहुधा नेटीव्ह वाटावे म्हणून त्याने वेषांतर केले असावे. पण तो निसटला तो निसटलाच. त्याच्यावर सरकारने जाहीर केलेले बक्षिस नंतर कोणी मिळवू शकले नाही व त्याच्याबद्दल नंतर कोणी काही साधे ऐकलेही नाही. गायबच झाला तो !
२
जॅक्सनच्या आयुष्यात त्याने घेतलेला सगळ्यात महत्त्वाचं निर्णय त्याने त्यावेळी घेतला . तो फकीर झाला.
बहुधा कलकत्त्यात त्या हॉटेलमधे त्याला दारूच्या धुंदीत जो भ्रम झाला होता ते त्याच्या मनात कुठेतरी खोलवर त्याच्या मेंदूने जपून ठेवले असावे. त्याला स्थानिक भाषा तर येतच असत, शिवाय लोकांना गुंगवणारं त्याचे बोलणे त्याच्या साथीला होतेच. त्याला हेही पक्के माहीत होते की हिंदुस्थानात एकदा भगवे कपडे चढवले की तीन वेळच्या जेवणाचे मरण नसते. त्यामुळे दिवसा तीन वेळा जेवण व रात्री हातभट्टीच्या गुत्त्यावर दारू याची त्याला कधीच कमी पडली नाही. तुम्हाला वाटेल दारूच्या धुंदीत त्याने त्याचे खरे स्वरूप कोणा पुढे उघड कसे केले नाही पण त्या मागचे खरे रहस्य हे आहे की तो जेवढी जास्त दारू पीत असे तेवढाच त्याचा तो फकीर असल्याचा भ्रम दृढ होत असे. तो सर्वत्र नाचत, गाणी म्हणत संचार करत असे. फकीर आणि तत्सम मंडळी थोडीशी चक्रम असतातच त्यामुळे याच्या नाचण्याकडे लोक कौतुकाने पहात. किंबहुना तो त्या नाचण्यामुळेच प्रसिद्ध झाला असं म्हणायला लागेल. त्याने केसांच्या जटा वाढवल्या व त्याला हिना चोपडलं. अंगावर एक भगवे कापड व गळ्यात रुद्राक्षांची माळ असा त्याचा अवतार असे. काहीच दिवसात त्याची दाढी ही भरपूर वाढली जी तांबूस रंगाची होती. हे कमी होते की काय म्हणून तो सन्याशांसारखे अंगावर भस्माचे पट्टे ओढत असे. जॅक्सनला आता कोणी ओळखणे शक्यच नव्हते. त्याला आता खऱ्याखुऱ्या फकीराप्रमाणे नावही राहिले नव्हते. बहुधा त्यालाही त्याचे नाव आठवत होते की नाही कोणास ठाऊक. त्याच्या या आयुष्यात त्याने बरीच भ्रमंती केली व बरेच काही पाहिले असणार. अर्थात त्याबद्दल कोणालाच काही माहीत नाहीये हेही ओघाने आलेच. हळूहळू त्याच्या मनात इतर गोर्यांविषयी कसलेही प्रेम राहिले नाही. उलट त्याला जे काही अनुभव आले होते त्याबद्दल त्याच्या मनात या स्वार्थी जमातीविषयी थोडासा रागच होता असे म्हणायला हरकत नाही. म्हणजे तसे तो त्याच्या देशी मित्रांना बोलूनही दाखवायचा. अर्थात ओळख न देता.
पण आडवाटेवर, देवळात, मठांमधे त्याला सगळे ओळखत. तो आता अट्टल गांजेकस झाला. सराईतासारखा तो हुक्का ओढे व इतर फकिरांसारखा तोंडातल्या तोंडात पुटपुटत जमिनीवर थुंके. त्याने मांसाहार सोडला. गावोगावी भटकताना गावकरी जे अन्न धान्य देतील त्यावर तो गुजराण करत असे. हळूहळू त्याची दारू कमी झाली. काहीजण म्हणतात त्याची दारू पूर्णपणे सुटलीच. त्याच्या बदललेल्या खाण्यापिण्याच्या सवयींनी त्याची अंगकाठी सडसडीत झाली व चेहर्यावर तेज आले. त्याच्या एवढा लंबूटांग फकीर आता अख्ख्या हिंदुस्थानात होता की नाही याची शंकाच आहे. या नाचणार्या फकीराचे चालणे बोलणे आता लोकांवर प्रभाव पाडू लागले. हजारो गावात ज्या ठिकाणी तो फेरफटका मारत असे तेथे जनता त्याला फकीर म्हणून मानू लागले.
इंग्रजांच्या इतिहासात त्याच्या प्रवासाची कसलीही नोंद नाही नाहीतर खरं म्हणजे सर्व गोर्या माणसांच्या हालचालींच्या नोंदी ठेवल्या जातात. पण ही दंगलीची घटना घडली तेव्हा तो बहुधा विजापूरला असावा. हे विजापूर म्हणजे बिहार मधले. कर्नाटक मधले नाही.रामलीलेचे दिवस होते. सगळीकडे उत्साहाचे वातावरण भरून राहिले होते. नाच गाणे, नाटके यांना नुसता ऊत आला होता. रंगीबेरंगी कपडे करून सगळी जनता रस्त्यावर आली होती. नदीच्या पलीकडे असलेल्या देवळाच्या पायर्यांवर माणसांची नुसती गिचमीड झाली होती. भगवे कपडे घातलेले नदीत स्नान करण्यास उतरले होते तर स्त्रिया निळे कपडे करून पाण्यात उतरल्या होत्या. चट्टेपट्टे असलेले रंगीबेरंगी झेंडे घराघरांवर वार्यावर फडफडत होते. शहराच्या अरुंद रस्त्यावर दिवसभर व रात्री नुसती गर्दीच गर्दी. बाजार फुलला होता. हे सगळे आपल्या फकीराने पाहिले असणार. त्यावेळेस तो एका गल्लीच्या कोपर्यावर निवांत बसून दोन साधूंच्या गप्पा ऐकत बसला होता. त्या दोन साधूंनी डोक्याचा गोटा केला होता व अंगावर केशरी रंगाच्या कफन्या चढवल्या होत्या. त्यांच्या बोलण्यावरून त्याला एक गोष्ट मात्र लक्षात आली. ती म्हणजे त्यांच्यात व शहरात इंग्रजांविरुद्ध बराच असंतोष खदखदतोय. कमिशनरने रामलीलाची मिरवणूक मुसलमान वस्तीतून नेण्यास बंदी घातली होती त्यामुळे हा भडका उडाला होता. त्या दोन साधूंनी त्या मशीदीला शिव्या दिल्या, सरकारला शिव्या दिल्या व वाढत्या बंदोबस्ताबाबत चिंता प्रदर्शित केली. मेळाव्यात बर्याच महत्त्वाच्या नेत्यांची भाषणे होणार होती. त्यातीलच एक होते बाबू गोपी नाथ. सरकारला बाबू गोपी नाथांची भीती वाटायची. मागच्या वर्षी खासपूरची दंगल त्यांच्या भाषणानंतर भडकली होती ज्यात अनेक माणसांचे मुडदे पडले होते. या हिंदू मुसलमान दंगलीत गोर्या पोलिसांचा नाहक बळी जायचा पण हे सगळे जॅक्सनला माहीत होते. दोन्हीही जमातीची जनता इंग्रजांचा तेवढाच द्वेष करायची याची जॅक्सनला कल्पना होती. अशा अफवांकडे किंवा गप्पांकडे तो नेहमीच दुर्लक्ष करायचा. रोज मरे त्याला कोण रडे ? पण यावेळी बाजारात त्याला काहीतरी नवीनच ऐकू आले. वातावरण तंग होते आणि हिंदू मुसलमान एकत्र येणार...असे काहीतरी नवीनच त्याला ऐकू येते होते. खासपूरमधून २०० मुसलमान गाझी येणार अशी अफवा ही त्याने ऐकली.
३
त्या वर्षी विजापूरच्या यात्रेला उच्चांकी गर्दी झाली होती. जत्रेचे सगळे खेळ लागले होते व मुले त्याचा आनंद लुटत होती. जादूगार, नाच करणार्या मुली नाचून शौकिनांचे मनोरंजन करत होत्या तर एका व्यासपीठावर वाराणशीच्या कुठल्यातरी कंपनीचे नाटक चालले होते. एका कोपर्यात चेहर्यावरील एकही रेष न बदलणारा फकीर बसला होता. हे सगळे असले तरी संध्याकाळी होणारी हिंदू मुसलमान नेत्यांची भाषणे हेच खरे आकर्षण होते.
संध्याकाळी गोपीनाथ बाबूंनी भाषणास सुरुवात केली आणि तेथे एकदम शांतता पसरली. त्या शांततेचा फायदा घेऊन त्यांनी आपली जहाल मते मांडण्यास सुरुवात केली. त्यात इंग्रज मुसलमान व हिंदूंना कसे आपापसात लढवतात इ.इ. असे अनेक मुद्दे त्यांनी आक्रमकपणे मांडले. त्यानंतर मात्र जत्रेतील गर्दीने आवरते घेतले. आता फक्त भाषणे ऐकायला थांबलेले लोकच मैदानात उरले. हळूहळू जमलेल्या गर्दीत कुजबूज वाढू लागली. थोड्याच वेळात भाषणे देणाऱ्यांचा उद्देश सफल झाला. त्यांचा त्या गर्दी वरील ताबा सुटला. थोड्याच वेळात रस्ते ओस पडले. लोकांनी घराची दारे लावून घेतली. विजापूरला त्या काळी ब्रिटिश सैन्य नसायचे. तेथे फक्त काही इंग्रजी अधिकारी, त्यांचे क्लब हाउस, टेनिस क्लब एवढ्याच महत्त्वाच्या जागा होत्या. त्यावेळी इंग्रज स्त्रिया त्या क्लबात टेनिस खेळत होत्या तर बाजूलाच पुरूष मंडळी निवांतपणे मद्याचे घोट घेत बसले होते.
पुढे काय होणार आहे हे फकिराच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही. त्याच्या मनात सरकार बद्दल काडीचाही आदर नव्हता व त्याने स्वत:ला त्याच्या बांधवांपासून पूर्णपणे तोडले होते. पण रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला असणार्या टेनिस क्लबचा व तेथील स्त्रियांचा विचार त्याच्या मनात प्रथम आला. बेफाम झालेली गर्दी त्याच रस्त्याने सरळ चालली होती. त्यांच्या डोक्यात आता फक्त एकच लक्ष होते आणि ते म्हणजे टेनिस क्लब. त्याच क्षणी फकिराच्या मनात एक विचार चमकला आणि तो उठला. जे काही करायचे ते आत्ताच करायला हवे होते.
बेफाम झालेली माणसांनी तेथे आलेल्या पोलिसांना केव्हाच खाली लोळवले होते व ते त्यांना त्यांच्याच लाठ्यांनी मारहाण करत होते. जवळच असलेले दारूचे दुकान फोडले गेले व तेथे एकच गर्दी उसळली. थोड्याच क्षणात तेथे ज्वाळा दिसू लागल्या. आग लागली आणि भडकली, पसरली. फकीराने तेथेच पडलेल्या दोन बाटल्या रिचवल्या व पळण्यास सुरुवात केली. दारूने जळजळत त्याच्या घशात आग ओतली व डोक्यात धुंदी. आता त्याचा आत्मविश्वास अतोनात वाढला. पुढच्या चौकात त्याला त्या गर्दी समोर जाऊन उभे रहायचे होते. बस्स... एकदा का तो तेथे पोहोचला की मग पुढचे सगळे त्याच्या हातात होते. त्याच्या बोलण्याने त्या गर्दीवर तो नियंत्रण आणू शकला असता, म्हणजे असे त्याला वाटत होते.
पुढच्याच क्षणी त्याने उडी मारून किंचाळत शेजारच्या माणसाच्या हातातील तलवार हिसकावून घेतली. तलवार उंचावत, किंचाळत तो नाचू लागला. जवळच पडलेल्या एका पोलिसाच्या प्रेताला लाथ मारून त्याने सुडाची मागणी केली. तलवार उंचावत, गरागरा फिरवत त्याने सगळ्यांना त्याच्या मागे येण्याचे आवाहन केले. जमावाने त्या हैदोस घालणाऱ्या फकीराला पाहिले मात्र दहा पंधरा जण त्याच्या मागे जाऊ लागले. त्यांच्या मागे अजून शंभर व त्याच्या मागे अजून... तलवार उंचावत तो किंचाळत, नाचत, भरभर पळू लागला. त्याच्यामागे बेफाम झालेला जमाव हातात मिळेल ती वस्तू घेऊन साहेबाच्या खुनाची मागणी करू लागला. फकिराच्या मनात फक्त एकाच गोष्टीची काळजी होती ...ते उजवीकडे वळतील का ? आता ते चौकात आले. चौकात त्याने त्यांच्याकडे तोंड केले व तो जोरजोरात ओरडू लागला. ते ऐकून जमाच आरडाओरडा करत त्याच्या मागे मागे जाऊ लागला. जमाव माणसाच्या शरीरासारखा वागतो हे त्या फकीराला चांगले माहीत होते. जेथे मेंदू नेईल तेथेच शरीर जाते.
त्याच्या अंगावर धुळीची पुटे चढली होती व अंग रक्ताने माखले होते. त्याच्या डोळ्यात रक्त उतरले होते. जमावाच्या सूड घेण्याच्या आरोळ्यांनी त्यालाच उन्माद चढला. त्याने त्या जमावाला सरळ ट्रेझरीच्या दिशेने नेले. पोलिसांची आलेली कुमक आता त्यांच्या मागे होती व समोर हातात बंदुका घेतलेले ट्रेझरीचे रक्षक. ट्रेझरीचे रक्षण करणार्या पोलिसांनी जमाव जवळ येईपर्यंत त्यांच्या बंदुका रोखून धरल्या. जमाव जवळ आल्यावर त्यांची बोटे चापाभोवती आवळली गेली. गोळ्यांची एक फैर उडाली.
नाचणार्या फकीराने हवेत एकच गिरकी घेतली व तो खाली धुळीत निपचित पडला...
जॉन आयटन.
स्वैर अनुवाद : जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
8 Sep 2017 - 1:09 pm | पैसा
जबरदस्त!!
8 Sep 2017 - 2:05 pm | राजाभाउ
भारीच !!!
8 Sep 2017 - 2:36 pm | प्रीत-मोहर
सहीच अनुवाद. मुळ कथाही भारी आहे.
8 Sep 2017 - 2:46 pm | कौशिकी०२५
वा.. अगदी चित्रदर्शी.
8 Sep 2017 - 3:02 pm | चांदणे संदीप
ज ब र द स्त !
Sandy
8 Sep 2017 - 3:09 pm | सिरुसेरि
छान कथा .
8 Sep 2017 - 3:35 pm | नया है वह
+१
8 Sep 2017 - 4:14 pm | जव्हेरगंज
म्हणजे फकीराने आपण इंग्रज असल्याचे दाखवून दिले. हेच ना!!
जबरी!!
8 Sep 2017 - 4:36 pm | चांदणे संदीप
ईल्ले... त्याने आपल्यातला माणूस जिवंत असल्याचे दाखवून दिले.
Sandy
9 Sep 2017 - 11:44 am | नाखु
अखिल मिपा अस्सल
वाचाल तर वाचाल वाचकरी महासंघ सदस्य
8 Sep 2017 - 6:32 pm | संजय पाटिल
जबरदस्त...
8 Sep 2017 - 7:46 pm | पिलीयन रायडर
मस्तच!! फार आवडली!
8 Sep 2017 - 8:22 pm | गामा पैलवान
जयंतराव,
बापरे! शहर आला अंगावर वाचतांना. तुमच्या अनुवादाची कमाल आहे.
आ.न.,
-गा.पै.
8 Sep 2017 - 8:49 pm | एस
छान अनुवाद.
8 Sep 2017 - 10:18 pm | इडली डोसा
कथा फारच ओघवती झाली आहे. _/\_
8 Sep 2017 - 10:21 pm | मोदक
कमाल अनुवाद..!!!
8 Sep 2017 - 10:49 pm | रामपुरी
सुंदर...
8 Sep 2017 - 11:32 pm | सही रे सई
मस्तच
10 Sep 2017 - 9:39 pm | जयंत कुलकर्णी
सर्वांना धन्यवाद !
13 Sep 2017 - 3:39 am | रुपी
मस्तच!
13 Sep 2017 - 9:02 pm | टर्मीनेटर
छान