येस `बॉस'!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
16 Oct 2008 - 10:49 pm

मोकळ्या पटांगणाऐवजी एका बंद घरातल्या शाळेत त्या मुलांचा खेळ रंगला होता. खेळाचं नाव होतं - "महाराज म्हणतात...' खेळाचं स्वरूप साधारणपणे असं असतं ः एकानं राज्य घ्यायचं. तो होणार महाराज. मग त्यानं एकेकाला ऑर्डर सोडायच्या - महाराज म्हणतात, पाणी प्या. महाराज म्हणतात, खाली बसा. महाराज म्हणतात अमकं करा अन्‌ तमकं करा...! सगळ्यांनी त्या पाळायच्या जो पाळणार नाही, त्यानं बाहेर जायचं. इथे "महाराज'च्या ऐवजी त्याला "बॉस' म्हणत होते, एवढाच फरक...
ही मुलं जरा मोठी होती. कुठल्या कुठल्या भागातून आलेली. काही वांड होती, काही आगाऊ, काही अतिउत्साही, काही खोडकर (नॉटी.). या शाळेत एक आधुनिक बाईसुद्धा होत्या. त्या पण लंडन-बिंडन कुठल्या कुठल्या स्पर्धेत बक्षीस मिळवलेल्या. मुलं आणि हे "बॉस', यांच्यात समन्वयाचं काम त्या करत होत्या.
या मुलांचं काम काय, तर एकतर त्या महाराजांनी दिलेल्या ऑर्डर पाळायच्या आणि उरलेला वेळ चकाट्या पिटत, एकमेकांची उणीदुणी काढत बसायचं. काही मुलं पार बिघडलेली होती. कुणी विड्या फुंकायचं, कुणी मन मानेल ते करायचं, कुणी शिवराळ भाषा वापरायचं, कुणी अंगावर धावून जायचं...
या सगळ्या गोतावळ्यात एका प्रसिद्ध दिवंगत राजकीय नेत्याचा मुलगाही होता. घरात, परिसरात, कॉलनीत, गल्लीत उच्छाद मांडणाऱ्या आणि नकोशा झालेल्या मुलांना शिक्षा म्हणून होस्टेलला पाठवतात ना, तसंच त्यालाही "तीन महिने कटकट नको' म्हणून या शाळेत पाठवलं होतं. पण झालं भलतंच. त्याच्या खोड्या कमी व्हायच्या ऐवजी इथे येऊन आणखी वाढल्या होत्या. आपल्याबरोबर त्यानं बाकीच्या मुला-मुलींनाही बिघडवायला सुरवात केली होती...त्यांचा हा खेळ बघणारे लोकही त्याच्या या थेरांमुळे हवालदिल झाले होते.
या अनोख्या शाळेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे होतं, की तिथे "बॉस'च्या, अर्थात "महाराजां'च्या ऑर्डर पाळण्याशिवाय दुसरी कोणतीही शिस्त नव्हती. त्यामुळं कुणीही कुणाच्याही बाथरूममध्ये घुसणं, एखाद्याची टवाळी करणं, अंगचटीला जाणं, अंधारात कुणाचा गैरफायदा घेऊ पाहणं, याही कृत्यांना मोकळं रान होतं. किंबहुना, जास्तीत जास्त लोकांनी हा खेळ बघावा, म्हणून त्यासाठी प्रोत्साहनच होतं...
तो खोडकर मुलगा या सगळ्यात आघाडीवर होता. शाळेच्या सगळ्या मोकळ्या वातावरणाचा त्यानं पुरेपूर फायदा घेतला होता. रक्तरंजित पार्श्‍वभूमी असलेल्या घरातून आलेली मुलगी असो, वा चित्रपटांत बरीवाईट कामं करणारी मुलगी, त्याच्यासाठी दोघीही सारख्याच होत्या. शाळेनंही त्याला प्रोत्साहन दिलं होतं...त्याच्या या खोड्या, कुरापतीच खेळाचं आकर्षण ठरल्या होत्या.
अचानक काय झालं माहित नाही, पण मुलांच्या खोड्या कमी झाल्या. मुलं थोडी सुधारल्यासारखी वाटू लागली. तो खोडकर मुलगा तर जरा अधिकच. शोध घेतल्यावर कळलं, की कुणीतरी वरून दट्ट्या आणला होता. हा खेळ आयोजित करणाऱ्यांनाच झापलं होतं. त्यांच्यावर कारवाईची ताकीद दिली होती. त्यामुळं मुलंही सुतासारखी सरळ आली...

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

16 Oct 2008 - 10:56 pm | सखाराम_गटणे™

ठो,
मस्तच

कैरेक्टे ओळखायला थोडे कष्ट घ्यावे लागले.

धमाल मुलगा's picture

17 Oct 2008 - 1:57 pm | धमाल मुलगा

लेख एकदम कुरकुरीत रे :)

सह्ही हजेरी घेतलीये!
पण त्या मुलीचं काय लिहिलं नाय राव तू... जिथं तिथं 'मला चांगला माणूस पाहुन लग्न करायचंय' म्हणणारीचं कायतरी लिहायला हवं होतं :)

-बिग धमाल

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Oct 2008 - 2:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कुरकुरीत ... एकदम असंच वाटलं वाचल्यावर.

झकासराव's picture

17 Oct 2008 - 2:00 pm | झकासराव

मस्त टिप्पण्णी :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

विसोबा खेचर's picture

17 Oct 2008 - 3:41 pm | विसोबा खेचर

सह्ही रे! :)

तात्या.

आपला अभिजित's picture

18 Oct 2008 - 8:36 am | आपला अभिजित

दोस्तहो...

असंच प्रोत्साहन द्या....
आणखी कुणाकुणाची फाडावी म्हणतो....!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Oct 2008 - 11:39 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

असंच प्रोत्साहन द्या....
तुम्ही झकासच लिहिता हो, "वाह वा" तर मिळणारच!
आणखी कुणाकुणाची फाडावी म्हणतो....!
म्हणजे वाचकांच्या मागणीनुसार पुरवठा होणार का?