मिसळपाव आणि साबूदाण्याची लापशी

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
15 Oct 2008 - 2:15 am

मुंबईहून न्यूयॉर्कला केलेल्या विमानप्रवासाबद्दल मी चार ओळी लिहिल्या होत्या तेंव्हा या लिखाणावर फारशी चर्चा होईल असे मला वाटले नव्हते. माझा तसा उद्देशही नव्हता. अमेरिकेला गेल्यानंतर तिथला एक मांडीवरला माझ्या तावडीत सापडला तेंव्हा तो कसा चालतो ते पाहण्यासाठी त्याच्याशी चाळा करता करता मिपाचे संकेतस्थळ हाती लागले. समर्थांच्या एका सुप्रसिद्ध ओवीच्या पहिल्या दोन चरणांवरून प्रेरणा घेऊन "जे जे आपणांसी कळावे, ते ते इतरांसी सांगून मोकळे व्हावे" असा विचार मनात आला आणि गारठलेली बोटे कीबोर्डावर बडवून घेतली. सगळी मिपाकर मंडळी आधीपासून विद्वान असल्यामुळे समर्थांच्या ओवीच्या पुढल्या भागाचा विचार करायचे धाडस मी कांही केले नसते. पण मी तसा प्रयत्न करतो आहे असा कांही लोकांचा ग्रह कदाचित झाला असावा असे त्यावर आलेल्या प्रतिसादांवरून वाटले.

दुस-या दिवशी पुन्हा मिपावर जाऊन पाहिले तो या लेखावर दोन बुरखाधारी योध्द्यांची जुंपलेली पाहिली. त्याशिवाय कांही लोकांनी प्रवासाला लागणारे कमीत कमी अंतर आणि त्यामुळे होणारी इंधनाची व वेळेची बचत यासारखे मुद्दे मांडून झाल्यावर त्यावर श्री( व सौ.?) युक्लीड यांच्या प्रमेयांच्या आधाराने त्यांचे विश्लेषण करून चर्चेचा स्तर बराच उंचावला होता. माझ्या लिखाणाच्या पांचपट भरतील एवढे प्रतिसाद आले असावेत. त्यातल्या ओळी, वाक्ये, शब्द, अक्षरे, विरामचिन्हे, कीस्ट्रोक्स वगैरेची मोजदाद करण्याएवढी चिकाटी कुणाकडे असल्यास त्याने ती करून माझी चूक माझ्या पदरात घालावी. ते प्रतिसाद वाचून झाल्यावर मी जे काय लिहिले होते ते पुन्हा वाचले तेंव्हा मिसळपाव खाल्ल्यानंतर साबूदाण्याची लापशी खाल्ल्याचा भास झाला. तसेच दुसरी एक जाणीव झाली. आपल्या मनात आलेले विचार शब्दात व्यक्त करण्यात एका प्रकारचे समाधान मिळते तर दुस-याने लिहिलेल्या मजकूरावर (ता)शेरे मारण्यातसुध्दा वेगळ्या प्रकारची मजा असते. ती मजा थोडी चाखून पहाण्यासाठी या लेखाचा प्रपंच केला आहे.

माझ्या लेखनावर वादाची पहिली तोफ डागतांना बु.धा.क्र.१ यांनी "नाय हो, ही वाट किमान २०-२५ वर्षे तरी जुनी आहे!!!!" असे लिहिले आहे, त्यांना "जी जी जी " करणारे मिपाकारसुध्दा भेटले. या लोकांनी ही माहिती कोठून पैदा केली ते देव जाणे. १९९६ साली मी मुंबईहून टोरोंटोला गेलो होतो तेंव्हा आमच्या सरकारी ऑफिसातल्या फॉरेन ट्रॅव्हल सेलने माझे तिकीट लंडनमार्गे काढले होते आणि बिलातले प्रत्येक अक्षर व आकडा डोळ्यात तेल घालून तपासणा-या आमच्या अकाउंट्स खात्याने माझा ट्रॅव्हल क्लेम बिनबोभाटपणे मंजूर केला होता. माझे सामान्यज्ञान जरी कच्चे असले तरी त्या काळात कॅनडाला जाण्याचा दुसरा जवळचा किंवा स्वस्तातला मार्ग असता तर तो या विशेषज्ञांना नक्की ठाऊक असता. "सन २००१ साली डेल्टा, कॉन्टिनेंटल आणि युनायटेड या प्रमुख अमेरिकन कंपन्यांनी उत्तर ध्रुवावरून चीनपर्यंत व्यावसायिक उड्डाणे करण्याची नुकतीच सुरुवात केली होती ( त्यानंतर त्यांनी ती सेवा भारतापर्यंत वाढवली असावी.) आणि एअर इंडियाने तर या मार्गावरून पहिले विमान २००७ साली उडवले." अशी माहिती मला शोधयंत्राद्वारे मिळाली. प्रवास करतांना मला हे माहीत नव्हते पण त्याने माझ्या अनुभवात विशेष फरक पडला नसता. त्यामुळे माझ्या लेखाला ' .... नवी वाट' असा सुटसुटीत मथळा देण्याऐवजी 'आधीपासून अस्तित्वात असलेली चांगली रुळलेली पण मी यापूर्वीच्या आयुष्यात कधीही न पाहिलेली वाट ' असे लांबलचक नांव दिले असते तरी त्याखालचा मजकूर जवळजवळ तसाच राहिला असता.
बु.धा.क्र.१ यांनी "इथे काही लोकं अशी आहेत ज्यांची मुलं आता लग्नाची झाली आहेत...." असे पुढे लिहिले आहे.
या गोष्टीचा उत्तर ध्रुवावरून जाणा-या विमानमार्गाशी काय संबंध आहे ? ज्या विमानाने मी प्रवास केला त्यात सामान्य अंगलटीची माणसे फक्त बसून राहू शकतील एवढ्या लहान आकाराच्या खुर्च्या दाटीवाटीने बसवल्या होत्या. झोप घेण्यासाठी त्या खुर्चीची पाठ मागे ढकलल्यावर ती जेमतेम चार बोटे मागे सरकली. बुधामहाशयांच्या (कल्पनाविश्वातल्या ?) पंचवीस वर्षांपूर्वीच्या विमानात शयनगृहांची सोय असल्यास त्याची मला कल्पना नाही. आता लग्नाला आलेल्या या मुलांची नांवे ध्रुव आणि मुलींची नांवे उत्तरा अशी ठेवली होती कां?
अखेरीस "तुमच्या अनुभवाबद्दल अनादर दाखवण्याचा हेतू नाही...." असे मानभावीपणाने लिहून "पण हे जरा उशीरा आलं असं नाही वाट्त आपल्याला?....." असे त्यांनी विचारले आहे.
मला तरी असे अजीबात वाटत नाही. 'वीस वर्षानंतर ' या नांवाचे एक पुस्तक मी शाळेत असतांना वाचले होते त्यात दोनशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळातले कथानक होते. चाळीस वर्षांपूर्वी रिलीज झालेला 'बीस साल बाद ' हा चित्रपट अजून लोक आवडीने पहातात. रामायणात किंवा महाभारतात घडून गेलेल्या प्रसंगासारखा एकादा प्रसंग कोणाच्या आयुष्यात आता घडला आणि त्याने तो कथन केला तर कोणी त्याला विरोध करीत नाही. तेंव्हा सगळ्या गोष्टी वीस पंचवीस वर्षात कालबाह्य होऊन बाद होतात असे मी समजत नाही. उत्तर ध्रुवावरून होणा-या विमानांच्या उड्डाणांना इतकी वर्षे अजून झालेलीसुध्दा नाहीत.

बु.धा.क्र.२ यांनी माझ्या वतीने आवेशपूर्ण प्रतिहल्ला चढवला असल्यामुळे मी त्यांच्या प्रतिसादावर शेरे मारले तर "ज्याचे करायला जावे बरे तो म्हणतो माझेच खरे. " अशातली गत होईल. पण "आम्ही २०-२५ वर्ष उशीता जलमलो आणि आजुन अमेरिकेला गेलो नाय ही काय आमची चुक आहे का ? " वगैरे अनावश्यक वाक्ये त्यांनी लिहिल्यामुळे त्यांना लीलया टोलवून लावायला बुधा क्र.१ला कांही प्रयास पडले नाहीत.
"तुमच्या अनुभवाबद्दल अनादर दाखवण्याचा हेतू नाही....पण हे जरा उशीरा आलं असं नाही वाट्त आपल्याला?..... आहो काका .. हे म्हणजे थोबाडात मारून लागलं का रे बाळा ? अस विचारण्यासारखं झालं " या बु.धा.क्र.२च्या विधानाशी मात्र मी सहमत नाही. माझी ट्यूब जरा उशीराने पेटली आणि ते कोणी माझ्या निदर्शनाला आणले तर मला त्यात कमीपणा वाटत नाही. सगळ्याच गोष्टी जन्मतः कुणाला माहीत असतात ?

बुधा क्र.१ यांनी प्रतिटोला हाणतांना " "आहो तुम्हाला जुणी असली म्हणून काय झालं ? याचा अर्थ कुणी लिहूच नये की काय ?" आम्ही कुठे 'असं' म्हटलं? .... उद्या मी "पुण्यात मिसळ कुठे मिळते" या विषयावर नवीन धागा सुरु केला तर लोक सांगतीलच ना, "की बाबा, हे जुनं झालंय!" ?" असे लिहिले आहे. त्यावरून मला तरी त्यांचा रोख 'तसा'च दिसतो.
मला असे वाटत मात्र नाही. एक तर मी कांही 'विमानप्रवासाचा इतिहास' या विषयावरील चर्चेचा धागा सुरू केलेला नव्हता. तसे असते तर कोणत्या कंपनीने तयार केलेले आणि कोणत्या कंपनीने उडवलेले विमान पहिल्यांदा भारतातून निघून उत्तर ध्रुवावरून अमेरिकेला गेले याच्या इतिहासाची पाळेमुळे मीच खणून काढली असती. पण माझ्या लेखाचा तो उद्देश नव्हता. दुसरे म्हणजे आपण एकाद्या नवख्या गांवात जातो तेंव्हा रेल्वे स्टेशनातून बाहेर कसे पडायचे ते सुध्दा आपल्याला ठाऊक नसते. बाहेर पडल्यानंतर रस्त्यावरच्या पाट्या वाचत वाचत आणि चौकशा करत आपण योग्य स्थळी पोचतो. या सगळ्या गोष्टी जुन्याच असल्या तरी आपण प्रथमच पहात असतो. त्यामुळे त्याचे वर्णन रंगवून इतरांना सांगतो. बहुतेक सारी प्रवासवर्णने अशाच प्रकारे लिहिली गेली आहेत. मुंबईच्या विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर न्यूयॉर्कला पोचेतोपर्यंत मी जे पाहिले, अनुभवले ते विस्मरण होण्याच्या आत थोडक्यात लिहून काढले. माझा अनुभव मुळात जुना झाला नव्हताच. त्या पानभर लेखातला 'नवा' एवढा एकच वावगा शब्द बुधा क्र.१ च्या नजरेला पडला असे दिसते. पुण्याच्या मिसळीबद्दल सांगायचे झाल्यास पुण्यातल्या कोंढवा भागात फिरतांना मॅकडोनाल्डचा जॉइंट वाटेल अशा एका पॉश ठिकाणी मला बर्गरपेक्षा जास्त रुचकर अशी भेळ एकदा खायला मिळाली होती. त्या जागेचे नांव मिसळपावच्या अधिकृत यादीत समाविष्ट आहे की नाही ? भेळ आणि मिसळ यात कोणता तात्विक फरक आहे ? असले विचार मनात न आणता मी त्याचा मनसोक्त आस्वाद घेतला. तसेच त्या जागेची शिफारस इतरांना केली. पुण्याच्या मिसळीचे नवे नवे चाहते आणि त्यांच्या जिभेचे चोचले पुरवणारे नवे कलाकार येतच राहतील. हा विषयही कधी जुना होईल असे मला तरी वाटत नाही. असो.

मुंबई आणि न्यूयॉर्क या शहरांमध्ये कमीत कमी अंतर कसे काढायचे या विषयावर बरीच चर्चा झाली. या दोन बिंदूंना जोडणारी सरळ रेषा काढली तर ती पृथ्वीच्या पोटातून जाते. त्यामुळे आकाशमार्गाने त्यांना जोडणा-या सर्व रेषा वक्रच असणार. युक्लिडच्या सिध्दांतानुसार ग्रेट सर्कलने सर्वात कमी अंतर मिळेल हे लिहिले गेले, " पृथ्वीवर वातावरण नाही आणि पृथ्वी अचूक गोलाकार आहे" अशी (कालांतराने चुकीची ठरलेली) गृहीतके सांगितली गेली, कॉरिऑलिस इफेक्टने होणारे पृथ्वीचे परिवलन वगैरेचा उल्लेख झाला, पण कुठल्याही पठ्ठ्याने त्यातून कसलाही निष्कर्ष मात्र काढला नाही. परवा वॉशिंग्टन डीसी मध्ये फिरतांना एका वस्तुसंग्रहालयाच्या समोर अनेक मोठमोठे ग्लोब मांडून ठेवलेले पाहिले. थोडे लक्ष देऊन निरीक्षण केल्यावर युक्लिडचा नियम लक्षात आला तसेच मुंबई आणि न्यूयॉर्क या शहरांमधले कमीत कमी अंतर कुठल्या वक्र रेषेनुसार येते तेही कळले. आपली ठेंगणी ठुसकी आणि ढेरपोटी पृथ्वी उत्तर व दक्षिण ध्रुवांपाशी जराशी चपटी आहे आणि विषुववृत्ताजवळ थोडी फुगीर आहे. विषुववृत्ताचा परीघ उत्तर व दक्षिण ध्रुवांमधून जाणा-या पृथ्वीच्या परीघापेक्षा जास्त आहे. त्यामुळे आमच्या विमानाने घेतलेला उत्तर दिशेचा मार्ग अर्थातच जवळचा होता. त्याशिवाय ध्रुवप्रदेशातले वातावरण स्तब्ध असल्यामुळे हवेचा विरोधसुध्दा थोडा कमी असतो म्हणे.

कोणत्याही वाहनातून जमीनीवरून वाहतूक करण्यासाठी रस्ते किंवा रेल्वेमार्ग बांधावे लागतात. ते अमूक इतक्या वर्षांपूर्वी बांधले गेले असे सांगता येते. हवेतून उडणा-या विमानाला फक्त वातावरण लागते आणि ते पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्यापूर्वीपासून अस्तित्वात आहे. मुंबई व न्यूयॉर्क ही शहरे वसण्यापूर्वीच युक्लिडने आपले सिध्दांत सांगितले होते. भूगोलाच्या रचनेचा अभ्यासही पूर्वीपासून होत आला आहे. शंभर वर्षांपूर्वी जेंव्हा राईट बंधूंनी पहिले सुनियंत्रित विमान उडवले होते तेंव्हाच मुंबईपासून न्यूयॉर्कचे कमीत कमी अंतर कोठल्या मार्गाने ठरेल याची माहिती शास्त्रज्ञांना बहुधा उपलब्ध असावी. प्रत्यक्षात कोणत्या मार्गाने विमान न्यायचे हे तांत्रिक प्रगती व राजकीय परिस्थिती या कारणांनी ठरते. भारतातून उत्तर ध्रुवावरून अमेरिकेकडे विमान नेण्यासाठी वाटेत न थांबता तितके लांबचे अंतर उडत जाण्याची क्षमता असलेले विमान हवे किंवा वाटेत थांबून इंधन भरण्याची सोय असायला हवी. तसेच पूर्वीच्या सोव्हिएट युनियनकडून किंवा नंतरच्या काळात त्यामधून फुटून निघालेल्या राष्ट्रांची परवानगी हवी. त्या भागावरून जातांना तिथे जमीनीवरून विमानांना मार्गदर्शन करणारी सक्षम व सुसज्ज अशी यंत्रणा पाहिजे. आणीबाणीचा प्रसंग उद्भवला तर उत्तर ध्रुवापाशी कोठेही ते विमान खाली उतरवणे अशक्य आहे याची जाणीव ठेवून त्याची तरतूद करायला पाहिजे. अशा अनेक कारणांमुळे वीसाव्या शतकात अशी व्यावसायिक उड्डाणे सुरू झाली नाहीत. हेरगिरी करणारी खास विमाने कधीपासून जगभर सगळीकडे फिरत आली आहेत.

ही तांत्रिक माहिती मला मूळ लेखावर प्रतिसाद देऊन घालता आली असती, पण मिपाकडे रोज इतके नवे लिखाण येत असते की शिळ्या लेखावर नव्या माहितीची फोडणी देण्यात कांही अर्थ नसतो कारण ते फारसे वाचले जात नाही. या कारणाने ती या नव्या लेखात अंतर्भूत केली आहे.

आपल्या लिखाणावर टीका झाली म्हणून निरुत्साह होऊन लिहिणे सोडून देऊ नये अशा अर्थाचे एक दोन प्रतिसाद आले होते. कोणीही असा विचार करायचे कारणच नाही. "राजहंसाचे चालणे भूवरी जालिया शहाणे म्हणून काय आणिक कोणे चालावेचि ना ? " असे विचारून आपल्या ज्ञानेश्वर माउलींनी सर्व किडेमकोडे, खेकडे वगैरेंना बिनधास्तपणे आपापल्या वेड्यावाकड्या चालीने चालत रहायचा मुक्त परवाना दिला आहे. आपल्या तात्यारावांनीही मिसळपावाच्या गाडीवर साबूदाण्याची लापशी ठेवायला मुभा ठेवली आहेच.

मौजमजालेखप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

धनंजय's picture

15 Oct 2008 - 2:52 am | धनंजय

ग्रेट सर्कल, वार्‍यामुळे होणारा गतिविरोध वगैरे मुद्दे त्या आदल्या लेखाच्या प्रतिसादांत, आणि या वरील लेखात माहितीपूर्ण वाटले.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Oct 2008 - 10:32 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

धनंजयशी सहमत. फक्त नावामुळे पाकृ असेल असं वाटलं त्यामुळे लेख उघडावा का नाही असा विचार केला.

>> हवेतून उडणा-या विमानाला फक्त वातावरण लागते
हे फक्त थोडं सर्वसमावेशक विधान वाटतं; प्रवासी विमानांना उड्डाणासाठी वातावरण लागतं आणि ऑक्सिजनसाठीही. किमान काही प्रकारच्या लढाऊ विमानांना वातावरणाची आवश्यकता नसते असं वाचल्याचं आठवतंय. जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.

आनंद घारे's picture

15 Oct 2008 - 8:08 pm | आनंद घारे

आतापर्यंत मुख्यतः तीन प्रकारच्या इंजिनांचा उपयोग विमान उडवण्यासाठी केला गेला आहे.
१. प्रोपेलर - या इंजिनाला जोडलेली पाती पंख्यासारखी फिरून हवेला मागे ढकलून निमानाला गती देतात. इंजिनामध्ये इंधनाचे ज्वलन होण्यासाठी आजूबाजूच्या वातावरणातून प्राणवायू घेतला जातो.
२. जेट - यातसुध्दा इंजिनात होण्यार्‍या इंधनाच्या ज्वलनासाठी आजूबाजूच्या हवेतून प्राणवायू घेतला जातो. इंजिनाला जोडलेल्या कॉम्प्रेसरने हवेचा दाब प्रचंड प्रमाणात वाढवल्यावर तिला बारीक छिद्रांमधून मागच्या दिशेने बाहेर सोडले जाते. तिचा अतीशय वेगवान असा झोत (जेट) निर्माण होतो. त्याच्या प्रतिक्रियेने विमान पुढे जाते.
३. रॉकेट इंजिन - यात खास प्रकारचे इंधन वापरतात. त्याच्या ज्वलनासाठी लागणारा प्राणवायू किंवा तो पुरवणारी रासायनिक द्रव्ये यांचा साठा विमानबरोबर नेला जातो. ज्वलनात उत्पन्न झालेल्या ऊष्ण वायूंच्या झोताने विमान पुढे जाते. अतीवेगवान अशा लढाऊ विमानात अशा प्रकारच्या इंजिनाचा उपयोग करतात.

वरील तीन्ही प्रकारात विमानाच्या उध्दरणासाठी वातावरणाची आवश्यकता असते. अग्निबाण मात्र निर्वात पोकळीत उडू शकतात. त्यासाठी अधिक शक्तीशाली रॉकेट्स असतात.

कोलबेर's picture

15 Oct 2008 - 2:57 am | कोलबेर

तुमच्या बुधा १ बुधा २ चा संदर्भ मी मूळ लेख वाचल्या नसल्याने लागला नाही. पण नुकताच मुंबई ते न्यूआर्क हा प्रवास थेट मार्गाने केला. तुमच्या मनात आलेले सर्व प्रश्न मलाही पडले होते. मुंबई ते न्युयॉर्क/न्युजर्सी थेट विमाने सुरू झाल्याचे गेल्या १-२ वर्षातच समजते. (एअर इंडियाने तर थेट उड्डाणे ह्याच वर्षी सुरू केली, असे कुठल्यारी बातमीत वाचल्या सारखे वाटते) पहिल्या प्रवासात विमान कोणत्या मार्गाने जाणार ह्याचे मला देखिल कुतुहल होते. मला ते अफ्रिका खंडावरुन जाईल असे वाटल्याने ह्यावेळेला थोडा वेगळा भूभाग बघायला मिळेल असे वाटले होते पण विमान कॅनडाच्या दिशेने चढाई करायला लागल्यावर पुन्हा नेहमीचाच भूभाग बघायला मिळणार हे कळले. मला वाटत होते की जमिनीला जास्तित जास्त धरुन जाता यावे म्हणून ही वाट निवडली पण त्यामागचे नेमके कारण तुमच्या लेखातुन समजले धन्यवाद!

(शिकागो-चायना ह्या थेट विमानात मात्र उत्तर ध्रुव ओलांडून जायला मिळाल्याने खिडकीतुन खाली खूपच वेगळा नजारा बघायला मिळाला होता.)

विकेड बनी's picture

15 Oct 2008 - 5:23 am | विकेड बनी

लापशीत घातलेला दिसतो. :)

कारकुन's picture

15 Oct 2008 - 7:51 am | कारकुन

घारे साहेब,

उत्तम लेख. पिवळा डांबीस ह्यांना अमेरिकेत स्थायिक असल्याचा अहंकार आहे हे वेळोवेळी त्यांच्या प्रतिसादातुन प्रतित झालेले आम्ही पाहिलेले आहे.

अमेरिकेत कित्येक वर्षं वास्तव्यास असणे ह्यात फुशारक्या मारण्यासारखे आम्हाला तरी काहीही वाटत नाही, तस्मात त्यांच्या टिकेकडे दुर्लक्ष करावे हे उत्तम.

-कारकुन

पिवळा डांबिस's picture

15 Oct 2008 - 10:15 pm | पिवळा डांबिस

शिष्टच आहे तो मेला पिवळा डांबिस!!!!

काय ताई, आज मिपावर दुसरं कुणी भेटलं नाही वाटतं काड्या लावायला!!!:)

अरुण मनोहर's picture

15 Oct 2008 - 9:54 am | अरुण मनोहर

घारे साहेब तुमची कळकळ आणि जळजळ समजली. मिपावर वावरायचे म्हणजे गेंड्याची कातडी लागते. तेव्हा प्रतिसाद किंवा त्यांचा अभाव, काहीही असले तरी दिल पे मत लो यार!

आपल्या तात्यारावांनीही मिसळपावाच्या गाडीवर साबूदाण्याची लापशी ठेवायला मुभा ठेवली आहेच.
लापशीच नव्हे, तर कारल्याची भाजी, बोंबीलांचे कालवण, इनोचे पेय, सगळे सगळे चालते. फ़क्त खा़उन जनतेला जास्त पोटदुखी होणार नाही ह्याचे भान ठेवायचे.

आनंद घारे's picture

16 Oct 2008 - 5:09 am | आनंद घारे

लापशीच नव्हे, तर कारल्याची भाजी, बोंबीलांचे कालवण, इनोचे पेय, सगळे सगळे चालते.
एक चूक माफ असावी.

आनंद घारे's picture

18 Oct 2008 - 6:27 pm | आनंद घारे

मिपावर वावरायचे म्हणजे गेंड्याची कातडी लागते
ती लागतेच, एकदा शिंग खुपसावेसेही वाटले.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Oct 2008 - 8:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मिपावर वावरायचे म्हणजे गेंड्याची कातडी लागते
ती लागतेच, एकदा शिंग खुपसावेसेही वाटले.

आमचे आंतर्जालीय मित्र अँडी स्काऊंड्रल उर्फ आनंदयात्री यांना याचा फार अनुभव आहे!

विसोबा खेचर's picture

15 Oct 2008 - 4:53 pm | विसोबा खेचर

"राजहंसाचे चालणे भूवरी जालिया शहाणे म्हणून काय आणिक कोणे चालावेचि ना ? " असे विचारून आपल्या ज्ञानेश्वर माउलींनी सर्व किडेमकोडे, खेकडे वगैरेंना बिनधास्तपणे आपापल्या वेड्यावाकड्या चालीने चालत रहायचा मुक्त परवाना दिला आहे.

हे मात्र खरं! :)

आपल्या तात्यारावांनीही मिसळपावाच्या गाडीवर साबूदाण्याची लापशी ठेवायला मुभा ठेवली आहेच.

नक्कीच आहे. जो जे वांछिल तो ते लिहो.. :)

तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

15 Oct 2008 - 5:24 pm | प्रकाश घाटपांडे

आम्हाला घारे साहेबांची भाषा आणि परिभाषा माहित आहे. तसेच त्यांचे विज्ञान अज्ञान व अंतर्ज्ञान ही माहित आहे.
प्रकाश घाटपांडे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Oct 2008 - 8:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्हाला घारे साहेबांची भाषा आणि परिभाषा माहित आहे. तसेच त्यांचे विज्ञान अज्ञान व अंतर्ज्ञान ही माहित आहे.

सहमत आहे.

नावामुळे पाकृ असेल असं वाटलं त्यामुळे लेख उघडावा का नाही असा विचार केला.

मलाही तसेच वाटले, इथे दुसरेच प्रकरण दिसत आहे. :(