पेर्णा : बृहन्माहाराष्ट्राची संत्रा आणि नुकताच वाचलेला अनुभव
नोंद : लेखा चा उद्देश अंधश्रद्धा आणि नशेबाजीला खतपाणी घालणे नाहि.
तेव्हा मी ट्रान्सपोर्ट मध्ये काम करत होतो तेव्हाची हि माझी गोष्ट आहे. नाईटड्युटीचे लवकर काम आटपून घरी जाण्यासाठी मी माझे मोबाईलातले गजराचे घड्याळ एक तासाने पुढं करून ठेवत असे, जेणे करून ५ वाजता गजर वाजला तर मी ४ वाजताच गजाभावला सांगून पाण्याची बाटली घेऊन फ्रेश होऊन मग ५ वाजत घराकडं जाईल असा होता.
सकाळी लवकर ४ पर्यंत ट्रीप आटपणे खूप जिकरीचे आणि अवघड वाटे म्हणून हि खटाटोप केली होती.
असो, त्या दिवशी पण मी नेहमी प्रमाणे ५ वाजताचा गजर वाजताच अॅलर्ट झालो, पण आदल्या रात्री गजाभावने राह्यलेली संत्रा मला दिल्याने चकणा खात खात खूप खमंग भुतांच्या गप्पा मारल्या होत्या. तसेच त्या दिवशी अमावस्या आहे हे पण गप्पातून कळले होते. या विचारात असतानाच मी हे विसरून गेलो कि माझे मोबाईलातले घड्याळ मी एक तासाने पुढे करून ठेवले आहे आणि ५ वाजले म्हणून तसाच माझी बाटली घेऊन रिकामा व्हायला झाडीकडे निघालो. 4 वाजताचा अंधार रोजच्या पेक्षा जास्त वाटत होता, कारण माझा समज मी ५ वाजता बाहेर आलो होतो असा होता. मनात आज अमावस्या आहे आणि रात्रीच्या भुतांची गप्पाची आठवण होती आणि त्या मुळे मनात आधीच भीती होती.
आणि ढाब्या मागचा रस्ता संपून शेत येताच माझे पाय एका नारळावर पडले, नीट बघितले तर कोणी तरी झाडीत कुंकवाचे गोल करून त्यात नारळ लिंबू ठेवले होते. तिथेच मनात एकदम भीती वाटली . पण टेम्पोच्या किन्नरने कशाला भ्यायचे असा विचार केला आणि तसाच पुढे निघालो , आज रस्त्यावर ट्राफिक पण खूपच कमी दिसत होती.
एक मन म्हणत होते ढाब्यावर वापस जाऊन मस्त ताणून झोपावे , पण तसेच चालत राहिलो आणि सगळं आटपून रस्त्याच्या कडेला आलो .
ढाब्यावर गजाभाव टेम्पोचं थोबाड उचकाटून कायतरी काड्या करत होता. रात्री बॅटरी उतरली की आमचा टेम्पो स्टार्टींगला उचलत नाही. मग रिकामी बाटली केबिनात टाकली अन दोघं मिळून मागून ढकलायला सुरुवात केली. उतारी लागली की गजाभाव पळत केबिनात ढांग टाकतंय अन स्टार्टर उचलतंय हे सवयीचं होतं.
तेव्हड्यात रस्त्यावर समोर एक विरुध्द दिशेने एक नुसतीच सायकल येताना दिसली, आणि जसे जसे पुढे जाईल तसे सायकल विरुद्ध दिशेने हळू हळू पुढे येत आहे असे वाटले. सायकलच्या पायट्याचा सुध्दा आवाज तर येत नव्हता, म्हणून वाटले मला भास होत असेल . पण नीट निरखून बघितले तर लक्षात आले, कि सायकल खरंच हळू हळू पुढे येत होती. मला वाटले सायकलवाला पण आप्ल्यासारखंच रात्री संत्रा मारुन सायकल मागून ढकलत असेल. पण जवळ जाऊन समोरून सायकलला टेम्पोमागूनच बघितले तर सायकलवर कुणीच दिसले नाही आणि सायकल तर पुढे येत होती
मग मात्र माझे टेम्पोला धक्का मारणारे हात एकदम थंड पडले, आणि मनात एकदम भीती वाटून आली, कि आज अमावास्याचे भुताटकी होईल आपल्याला .
रात्री भुतांच्या गप्पा मधले हर एक किस्सा आठवून मन अजूनच घाबरले, सगळीकडे अंधार होता. सायकलवरले भूत आता आपल्याला दिसून आपले काही खरे नाही असे वाटू लागले. नुसती सायकल विना चालक कसा काय पुढे जात आहे हे कळेना, मन एकदम सुन्न झाले, आमवासची पहाट त्यात रस्त्या वर कुणी चिट पाखरू नाही, धड-धड एकदम वाढली . सायकल विना चालक पुढे येत होती, तरी पण मी टेम्पोला धक्का मारतच राह्यलो , आणि जशी सायकल क्रॉस केली तेव्हा सायकलवरचा एक काळाभोर इसम विना कपड्याचा थरथरत सायकल दामटत असलेला दिसला, तेव्हा लक्षात आले कि सायकल विना चालक कसा पुढे चालली होती आणि एकदम सुटकेचा श्वास टाकला आणि पुढे गेलो. आलेला अनुभव आठवूं स्वतःचेच हसू आले.
.
.
- नाठाळ पाटील
प्रतिक्रिया
9 Jun 2017 - 5:22 pm | खट्याळ पाटिल
आमच्या लिहलेल्या लेखावर (एक भुताचा अनुभव) लगेच प्रति लेख आवडला . हा लेख म्हणजे माझ्या http://misalpav.com/node/39974 या लेखाची हि दुसरी बाजू आहे , खूप छान
9 Jun 2017 - 5:31 pm | मुक्त विहारि
हे पण मस्त
9 Jun 2017 - 5:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
टेंपो मालकाच्या नजरेतून दिसलेले भूत आवडले.
चालू ठेवा कथा....
-दिलीप बिरुटे
9 Jun 2017 - 10:17 pm | सतिश गावडे
मालक नै हो, किन्नर.
नक्की वाचले ना? की अभ्याचे विडंबन म्हणून थोडासा अंदाज घेऊन दिला प्रतिसाद? ;)
9 Jun 2017 - 5:51 pm | खेडूत
झ्याक!
भुताला पार टेंपोत बशिवलं राव पाटील तुमी!
9 Jun 2017 - 9:12 pm | सचिन काळे
झक्कास!!!
9 Jun 2017 - 10:02 pm | जव्हेरगंज
भेश्ट!!!
9 Jun 2017 - 10:17 pm | सतिश गावडे
=))
9 Jun 2017 - 10:21 pm | रातराणी
एका भुताचा जन्म =))
10 Jun 2017 - 12:10 am | सौन्दर्य
मूळ कथेच्या बाजाला धक्का न लावता त्याची दुसरी बाजू छान मांडलीत.
10 Jun 2017 - 5:39 am | अत्रुप्त आत्मा
:D
14 Jun 2017 - 4:08 pm | ज्योति अळवणी
मस्त
14 Jun 2017 - 5:31 pm | पद्मावति
तस्वीर का दूसरा रुख़!
कथेची ही बाजू पण छानच :)
14 Jun 2017 - 5:51 pm | हतोळकरांचा प्रसाद
अगागागा, हासून हासून फुटलो! :) :) लैच भारी अनुभव! इकडल्या बाजूचा जास्त आवडला! काळाभोर इसम म्हणे...ह्याह्याह्या!
14 Jun 2017 - 5:51 pm | हतोळकरांचा प्रसाद
अगागागा, हासून हासून फुटलो! :) :) लैच भारी अनुभव! इकडल्या बाजूचा जास्त आवडला! काळाभोर इसम म्हणे...ह्याह्याह्या!
14 Jun 2017 - 6:27 pm | सिरुसेरि
गाठ पडली भुता भुता
14 Jun 2017 - 6:30 pm | सूड
काही विशिष्ट वास येत होता का त्या पहाटे?