नटनागर कृष्ण
भगवान कृष्ण ही एक महान विभुती असली पाहिजे. असं बघा, जन्मता जन्मता तुरुंगातून पळणे ते सोन्याची द्वारका समुद्रात बुडवून नंतर एका रानात शांतपणे मरणाची वाट पहाणे या दोन नाट्यमय क्षणांमधील आयुष्यात त्याने काय काय केले किंवा खरे म्हणजे काय काय केले नाही ? सर्व स्तरातील माणसांना मग ते स्त्री-पुरुष, आबालवृद्ध, गरीब-श्रीमंत, ज्ञानी-अज्ञानी कोणी असोत, आपल्याला भावेल, तेथे आपण पाहिजे होतो, असे वाटावे अशी एक तरी घटना कृष्णाच्या आयुष्यात घडलेली असते. तुमचा देवावर विश्वास नसेल तर विश्वदर्शन तुम्हाला भाकडकथा वाटेल व त्याला महान विभुती म्हणावयास तुम्ही तयार होणार नाही. पण जगातील यच्चयावद नवर्यांना एक गोष्ट मान्य करावीच लागेल कीं आपली सालस, सरळस्वभावी, प्रेमळ बायको ( आमच्या सौभागवती एखादेवेळी मिपा वाचतात, तेव्हा ही अशी चार लोकांत सांगावयाची विशेषणे मला पाठ असतात, ती इथे घालून टाकणे बरे !) नांदवतांना आपल्या नाकीं नउ येते तर हे गृहस्थ एका वेळी आठ (सोळा हजार एकशे सोडून द्या, मला म्हणावयाचे आहे विचारात घेऊ नका) बायकांना गुण्या-गोविंदाने नांदवतात (हा वाक्प्रचार कृष्णावरून पडला बर का) म्हणजे यांना महान म्हणावयासच पाहिजे. बरे या बायका काय साध्यासुध्या होत्या ? एक अस्वलाची (जांबुवानाची) मुलगी, अर्थात बोचकारण्यात तरबेज असावी. दुसरीने नवर्याची किंमत काय मिळणार म्हणा असा विचार करून त्याचे दानच करून टाकले ! तर हे महोदय मनधरणी करतांना गाण्याचाच आधार घेतात. पहिल्यांदी ज्येष्ट नृपकन्या रुक्मिणी. बरेच दिवसात चक्कर मारली नाही तेव्हा रागावलेली असणारच हे ग्रुहित धरून महालात गात गातच प्रवेश केला.
नच सुंदरी करूं कोपा ! मजवरी करी अनुकंपा !
रागाने तव तनु ही पावत कशी कंपा ! !!धृ!!
नारी मज बहु असती ! परि प्रीती तुजवरती !
जाणसि हें तूं चित्तीं ! मग कां ही अशि रीती !
करिं मी कोठे वसती ! परि तव मूर्ती दिसती !
(चाल) प्रेमा तो मजवरिच्या नेउ नको लोपा ! !!१!!
करपाशी या तनुला ! बांधुनि करी शिक्षेला !
धरुनियां केशाला ! दंतव्रण करी गाला !
कुचभल्ली वक्षाला ! टोचुनि दुखवी मजला !
(चाल) हाच दंड योग्य असे सखये मत्पापा ! !!२!!
पहिल्याच कडव्यात कशा शिताफीने, "रागावणे ही तुझीच चुकीची रीत आहे" असे सांगून Offence is the best diffence याचे सुंदर दर्शन घडवले आहे. दुसर्या कडव्यात तर कहरच आहे. आरोपीनेच न्यायाधीशाला काय शिक्षा द्यावी हेच सांगून टाकले आहे. कितीही रागवली असली तरी रुक्मिणीला हसण्याशिवाय काही वावच ठेवला नाही. (सगळे पद द्यावयाचे कारण छोटा गंधर्व पहिले कडवे चांगले ५-६ मिनिटे ताना मारत आळवतात व दुसरे कडवे ३० सेकंदात उरकतात ! शब्द नीट कळणे अत्यावष्यक आहे कीं नाही ?)
(पुस्तकात ..."---करी अनुकंपा" असे छापले असले तरी गातांना छोटा गंधर्व " --- धरी अनुकंपा" असेच म्हणतात.. च्या.... या कृष्णाला गोकुळापासून "दिसली सुंदरी कीं " धरी तिला करी " अशी सवय असल्याने तर असे घडले नसेल ना ? )
आता जावयाचे आहे प्रियतम भार्येकडे, सत्यभामेकडे. फार समजूत घालण्याची गरज दिसत नाही कारण फार दिवसांची दांडी नसावी. व महत्वाचे म्हणजे तीला काय हवे ते देण्याचे कबूल करतांना चार गोड शब्दानी गोंजारून थोडे credit गाठीला मारून ठेवावयाचे आहे.
रतिहून सुंदर मदन-मंजिरी ! मदनाचे वरदान तुला !!
ललित कोमला तव सुंदरता लाजविते मंदार-फुला
बघुनि तुला गगनांत खंगते कलेकलेने चंद्रकला
कळे न मजला, वृथा फुलाचा, नाद कशाला हवा तुला !!
येथे दुसर्या कडव्याची गरज भासली नसावी ! नसो नसो. तेच पुरुष भाग्याचे.
तर असा हा नटनागर कृष्णाचा चालूपणा .
शरद
मराठी नाट्यसंगीत या नावाचे पुस्तक श्री बाळ सामंत यानी प्रकाशित केले आहे. त्यात शाकुंतलपासून गोरा कुंभार पर्यंतच्या नाटकांतील ७५० पदे आहेत. नाट्यव्यवसायाबद्दल माहिती देणारी ३० पानी प्रस्तावना आहे. प्रकाशक : उत्कर्ष प्रकाशन, पुणे.
शरद
प्रतिक्रिया
5 Jun 2017 - 9:57 pm | प्रचेतस
छान लिहिलंय.
6 Jun 2017 - 10:48 am | प्रीत-मोहर
छान आहे, पण मला वाटले होते कृष्णावर लेखन असेल.
10 Jun 2017 - 2:13 pm | सिरुसेरि
छान लिहिलं आहे . कृष्ण आणी मराठी नाट्यसंगीत म्हणले की "सौभद्र " , "स्वयंवर" , "देव दिनाघरी धावला " , "सुवर्णतुला " अशी अनेक गाजलेली संगीत नाटके आठवतात . श्रीकृष्णाच्या खेळकर , चतुर व तितक्याच बलशाली व्यक्तीमत्वाच्या अनेक छटा या संगीत नाटकांमधुन पहायला मिळतात .
नाटकाचा पहिला अंक संपला आहे . तीर्थयात्रा करत असलेल्या अर्जुनाला नारदमुनींकडुन बलरामाने सुभद्रेचे लग्न दुर्योधनाशी ठरवल्याची वार्ता कळते . अत्यंत निराश झालेला अर्जुन एक शेवटचा प्रयत्न म्हणुन यतीवेश धारण करुन मथुरेला निघाला आहे . त्याचे सुभद्रेशी लग्न होईल का याची प्रेक्षकांनाही काळजी वाटु लागली आहे . अशा चिंतामय वातावरणात नाटकाचा दुसरा अंक सुरु होतो . आणी रंगमंचावर श्रीकृष्णाचे आगमन होते . प्रेक्षकांना हसतमुखाने विश्वासात घेउन कृष्ण त्यांना आपण चतुराईने रचलेल्या नाट्याची कल्पना देतो - "तस्करा हाती द्विज गोधन हरिले ..तयां पार्थाशी शरण आणिले ..नारदा ते मी त्यास भेटविले ..इकडचे वृत्त जाणविले ..".
सर्व काळजी दुर झालेला प्रेक्षक मोकळ्या मनाने श्रीकृष्णाचे नाट्य अनुभवु लागतो . श्रीकृष्णाच्या "कोण तुजसम सांग गुरुराया " , "लाल शालजोडी ", " बहुत दिन नच भेटलो सुंदरीला " , " नच सुंदरी करु कोपा " , "नभ मेघांनी आक्रमिले " , "प्रिये पहा ..रात्रीचा समय सरुनी" अशा स्वरांच्या , सुरांच्या जादुमधे हरवुन जातो . अखेर या नाट्यामधे बलरामही सापडतो आणी अर्जुन सुभद्रेच्या लग्नास "नांदा सौख्यभरे" अशी मान्यता देतो . पडदा पडतो आणी प्रेक्षक "सौभद्र"चे , मास्तर कृष्णरावांचे आणी श्रीकृष्णाचे कौतुक करत आनंदाने बाहेर पडतो .
12 Jun 2017 - 8:29 am | दशानन
हा प्रतिसाद खूपच आवडला. अश्या प्रकारचे नाटक "अनुभवायचे" राहून गेले आहे, माहिती नाही कधी योग्य येईल.
12 Jun 2017 - 4:53 am | यशोधरा
मस्त लिहिलं आहे, आवडलं.