खिडकीतला पाऊस!

सचिन काळे's picture
सचिन काळे in जनातलं, मनातलं
1 Jun 2017 - 8:21 pm

दोन दिवसांपूर्वीच मुंबईत हळूहळू पावसाला सुरुवात झालीय. घामाची चिकचिक आणि उन्हाने त्रस्त झालेल्यांचा, आता पावसाचे आगमन होणार याची नांदी मिळाल्याने जीव सुखावला आहे. पावसाच्या सरी पडलेल्या पाहून मला तर आनंदाने नाचावासे वाटू लागले, आणि मी फेसबुकवर पोस्टसुद्धा टाकली. "पाऊस आया!!!.....एssss पावसामें नाचोssss!!!!...... ढिंगचॅक्! ढिंगचॅक्!! ढिंगचॅक्!!!......." मोराला आपला पिसारा फुलवून पावसात नाचताना जेवढा आनंद होत असेल तेवढाच मलाही पहिल्या पावसात भिजताना आनंद होतो.

पहिल्या पावसाची मजा घेऊन झाल्यानंतरसुद्धा मला कधी पावसाचा कंटाळा येत नाही. जून, जुलै महिन्यात दणक्यात कोसळणारा पाऊस घरातल्या खिडकीजवळ असणाऱ्या दिवाणवर बसून तासंतास बघत बसणे, हा तर माझा लहानपणीचा अत्यंत आवडता छंद होता.

खिडकीतून दिसणाऱ्या पावसाचीसुद्धा वेगवेगळी रूपे मला पहायला मिळत. धडाड्धूम करून ढग एकमेकांवर आपटल्याच्या आवाज हृदयात धडकी भरवे. तर कधी काड्कन वीज चमके, तेव्हा सर्व परिसर विजेच्या प्रकाशात न्हाऊन जाई. आणि मग दणकून पावसाला सुरुवात होई. कधी फक्त हलकेच बारीक भुरभुरणारा, कधी सरळ उभा पडणाऱ्या पांढराशुभ्र जाडसर थेंबाचा, कधी आडवा तिडवा धो धो कोसळणारा, तर कधी सरकत पुढे पुढे जाणाऱ्या तिरक्या धारांचा पाऊस पडे.

खिडकीच्या गजांवर लटकणाऱ्या पाण्याच्या टपोऱ्या थेंबाना मी सर्रकन बोट फिरवून टपाटप खाली पाडत असे. खिडकीसमोर एखादी तिरकी जाणारी वायर लटकलेली असे. त्यावरून हे पावसाचे थेंब एकमेकांशी स्पर्धा करीत धावत जात. खिडकीवरील गजांना माकडासारखे लटकून कोसळणारा पाऊस बघण्यातसुद्धा मला एक वेगळीच गंमत येई. त्याचवेळी पावसाने ओलसर झालेल्या गजांना तोंडात पकडताना थोडीशी गंजलेल्या लोखंडाची चव लागे. बाहेर कोसळणाऱ्या पावसाने खिडकीच्या काचा आतल्या बाजूने बाष्पामुळे धुरकट होत. त्याच्यावर बोटांनी रेघोट्या ओढायला फार मजा येई. नाहीतर त्या धुरकट काचांना बोटांनी एक गोल करून, त्याला डोळा लावून मी काचेबाहेरचे दृश्य बघत बसे. ओलसर काचेवर पलीकडच्या बाजूने हाताचा पंजा दाबून धरल्यावर अलीकडच्या बाजूने पंज्याचा दबलेला आकार विचित्र दिसे. पावसाची जोराची झड खिडकीच्या आत आल्यावर उडणारे थंडगार तुषार मी दोन्ही हात पसरून चेहऱ्यावर घेई. उडणारे तुषार कधी कधी दिवाणवरची गादीसुद्धा भिजवत. पावसात भिजलेले कावळे आणि चिमण्या आपले ओले पंख फडफडवत खिडकीवर येऊन चिडीचूप बसत.

खिडकीतून डावीकडे दिसणाऱ्या रस्त्यावर पावसाच्या पाण्यापासून स्वतःला वाचवायला उडालेली लोकांची तारांबळ दिसे. फटाफट लोकांच्या छत्र्या उघडल्या जात. काही रंगीत, काही काळ्या कुळकुळीत तर काही काडी मोडक्या छत्र्या दिसत. पावसात रेनकोट आणि टोप्या घातलेली आणि आतमध्ये पाठीवर दप्तर घेऊन तुरुतुरु चालणारी शाळेची लहान मुलं दिसत. रस्त्यावरच्या कार आणि बसेसचे वायपर डावीकडे आणि उजवीकडे नाचू लागत. कधी कधी वाहनं पावसात अंदाज न आल्याने एकमेकांना धडकत. मग पावसात भिजत वाहनमालकांची आपापसात वादावादी चाले. कधी कधी पहिल्या पावसात पहाटेच्या अंधारात सायकलीवरचे दूधवाले घसरून पडत. अशावेळी डांबरी रस्त्यावर त्यांच्या किटलीतून सांडलेले दुध पावसाच्या पाण्यात मिसळताना दिसे. आणि काळा डांबरी रस्ता पांढरा फटक पडे. जोरात पाऊस पडत असताना फुटपाथच्या कडेकडेने वाहणारा पाण्याचा जाड ओघळही दिसे, ज्यात लहान मुले 'छपाक छै!' खेळताना दिसत.

खिडकीच्या उजवीकडच्या कोपऱ्यातून एक मस्तं हिरवंगार गवत असलेली बाग दिसायची. जोरदार झालेल्या पावसाने बागेत सगळा निसरडा चिखल झालेला असे. खास त्या चिखलात आवडीने फुटबॉल खेळणारी मुले दिसत. आणि वरून जरका पाऊस कोसळत असेल, तर पावसात फुटबॉल खेळताना त्यांच्या उत्साहाला पारावार रहात नसे. अशा वेळी प्रतिस्पर्ध्याला मुद्दाम पाय आडवे घालून चिखलात पाडले जाई. बागेतून शॉर्टकट् मारणारे कित्येक मोठे बाप्ये त्या निसरड्या चिखलावरून घसरून चारीमुंड्या चित होत. बागेतल्या एका कोपऱ्यात असलेल्या घसरगुंडीवर काही मुले घसरगुंडीवरून खाली वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याबरोबर घसरत घसरत खाली येत. शेजारी असणाऱ्या झोक्यांवर काही मुलांची भर पावसात उंच झोका घेण्याची शर्यत लागे. तर एकीकडे पावसात आबादुबी खेळणारी मुले कोणा एका मुलालाच चेंडूचे जोरदार फटके देत खिदळत असत. पाऊस थांबे आणि लख्ख उजेड पडे तेव्हा कधीकधी आकाशात इंद्रधनुष्याचे मनमोहक दर्शनसुद्धा होई.

बालपणी मी त्या खिडकीतून अनुभवलेल्या पावसाच्या वेगवेगळ्या रूपाच्या आणि प्रसंगाच्या दर्शनानेच माझे पावसाशी असलेले नाते घट्ट झाले आहे. या लेखाच्या निमित्ताने मी माझ्या बालपणी पाहिलेला 'खिडकीतला पाऊस' आज मला पुन्हा मनोमन अनुभवता आला.

माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in

जीवनमानलेख

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jun 2017 - 8:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर मनोगत !

पैसा's picture

1 Jun 2017 - 9:27 pm | पैसा

लिखाण आवडले.

एस's picture

1 Jun 2017 - 9:43 pm | एस

छान लिहिलंय.

सचिन काळे's picture

1 Jun 2017 - 10:21 pm | सचिन काळे

@ डॉ. सुहास म्हात्रे, पैसा, एस, लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jun 2017 - 8:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवडला.

सचिन काळे's picture

4 Jun 2017 - 9:16 pm | सचिन काळे

@ प्रा. डॉ. दिलीप बिरुटे, लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार!!!

तुषार काळभोर's picture

5 Jun 2017 - 7:52 am | तुषार काळभोर

तुमच्या आठवणींनी एकदम नॉस्टॅल्जिक केलं.

सचिन काळे's picture

5 Jun 2017 - 4:59 pm | सचिन काळे

@ पैलवान, लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार!!!

प्रीत-मोहर's picture

5 Jun 2017 - 5:16 pm | प्रीत-मोहर

सुरेख!!

सचिन काळे's picture

6 Jun 2017 - 7:03 am | सचिन काळे

@ प्रीत-मोहर, लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार!!!