मित्रहो, "आपण आता चित्रकलेची सुरुवात केली पाहिजे" असे नेहमी वाटत राहणाऱ्या, पण नेमके काय करावे, कसली चित्रे काढावीत, ती कशी निघतील, लोकांना ती आवडतील का, कोणते रंग-ब्रश-कागद वापरावेत, कोल्ड प्रेस कागद बरा की हॉट प्रेस, ऍसिड फ्री बरा की साधाच बरा, ऍक्रेलिक की ऑइल की पोस्टर कलर की जलरंग की पेस्टल वापरावेत, चित्रांचा आकार किती असावा, झालेले चित्र बेडरूमात लावावे की जिन्यात की कुठे, फ्रेमिंग कुठून करवावे, फेसबुकावर लाईक्स मिळतील ना ? मिपावर दंगा तर होणार नाही ? ..... छे..... काहीच कळत नाही बुवा/बाई..... आणि अगदी आत्ताच सुरुवात केली पाहिजे असे कोणी सांगितले ? चला, नंतर बघू कधीतरी.... आत्ता अमुक तमुक करु .....
...... असे वाटणाऱ्या सर्वांनो , हा धागा तुमच्यासाठीच आहे. तर आता काय करायचे ते बघूया.
१. सुरुवातीचा निश्चय
बहुतेक सर्वांच्याच चित्रकलेची सुरुवात फोटो वा चित्रे बघून काढण्यापासून होत असते. सुरुवात म्हणून हे ठीक असले, तरी नंतर मात्र या सवयीत अडकलेल्यांची प्रगती खुंटते.
तर समजा तुम्ही ती मधुबाला, सचिन, शिवाजीमहाराज वगैरेंची सुंदरशी हुबेहूब चित्रे काढून वाहवा मिळवणारांपैकी आहात, किंवा तसले काही न करणारांपैकी आहात ... आता पहिले काम करायचे ते असे, की "यापुढे कोणतेही चित्र वा फोटो बघून आपण चित्र काढायचे नाही" असा निश्चय सगळ्यात आधी करायचा.
२. बरं, मग पुढे ?
... सुरुवातीला सहज उपलब्ध असलेले साहित्य उदाहरणार्थ कोणताही कोरा/पाठकोरा कागद आणि पेन्सिल/ पेन घेऊन आता या पुढील अर्धा तास आपल्याला फक्त चित्र काढण्यात घालवायचा आहे, असे ठरवून सज्ज व्हा.
... अन्य व्यत्यय उदा. मोबाईल, टीव्ही, वगैरे बंद करा.
....आपण आता करणार असलेले चित्र कुणाला दाखवण्यासाठी, फेसबुक वा मिपावर वगैरे टाकण्यासाठी नसून निव्वळ शिकण्यासाठी, चित्रकलेचा आनंद लुटण्यासाठी आहे, ते चांगले झाले नाही तर फाडून टाकले तरी चालेल .. असे ठरवून आजूबाजूला बघा.
३. भोवताली काय दिसते आहे?
... ते बघा, आणि त्यापैकी एकादी वा दोनचार गोष्टी निवडा आणि त्याचे जसे जमेल तसे चित्रण करणे सुरु करा. भोवताल अगदीच नीरस वाटत असेल तर गॅलरीत, गच्चीवर वा बाहेर पडा आणि समोर दिसणारे दृश्य रेखाटने सुरु करा.
बस. हीच तुमच्या चित्रकलेची खरी सुरुवात आहे.
अन्य संकल्पना, रंगांचे प्रकार, कागद / कॅनव्हासचे प्रकार, ब्रशचे प्रकार आणि त्यांचे उपयोग वगैरे सर्व गोष्टी यथावकाश या लेखमालेच्या पुढील भागांमध्ये येतीलच.
हुर्रर्रर्रर्रर्रर्र सुटा, रेखाटनाला लागा, आणि चार- पाच रेखाटने इथे टाका. तुम्हाला आणि घरच्यांना ती कितीही खराब किंवा चांगली वाटली तरी.
(क्रमशः)
.
.
.
.
प्रतिक्रिया
1 May 2017 - 3:00 pm | अभ्या..
हायला, संदीपा भारी जमतं रे.
मला पण आवडते असे काचेवर कागद ठेवून चित्र काढायला. पण काय करणार. काचेपलिकल्ल्या पोरी थांबतच नाहीत रे एकाजागी. ;)
येनीवे जोक्स अपार्ट. तुझी कला जब्बरदस्त आहे. कीपीटप
1 May 2017 - 3:02 pm | चांदणे संदीप
पण मी हे काचेवर ठेऊन ट्रेस केलेलं नाहीये! :)
2 May 2017 - 3:01 pm | सपे-पुणे-३०
कसलं सुरेख आहे हे !
1 May 2017 - 1:48 pm | चित्रगुप्त
संदीप, काचेवर कागद ठेऊन त्यावर पलिकडील दृष्य "ट्रेस" करण्याची पद्धत मजेदार आहे, तुम्हाला यात गंमत वाटत असेल तर अवश्य करत रहा, त्यात नवनवे प्रयोग करा आणि ते इथे देत चला.
![.](http://www.joostrekveld.net/wp/wp-content/uploads/2007/03/dubreuil.jpg)
![.](http://2.bp.blogspot.com/-yICOR3X2d1w/USqg0-ukKLI/AAAAAAAAHls/6-Sob9-G__4/s1600/albrecht-durer-perspective-machine.jpg)
रेनासां काळात अश्याच पद्धतीने यथातथ्य चित्रे काढण्याची सुरुवात झाली होती असे दिसते.
1 May 2017 - 3:00 pm | चांदणे संदीप
या नवीन माहितीकरता धन्यवाद सर... म्हणजे ट्रेसिंग तसे माहीत आहे पण त्यातून एखादे दृश्य वगैरे ट्रेस करता येऊ शकते हा विचारच केला नव्हता!! :प
नक्कीच करून बघणार ही पाकृ... सॉरी चुकून पाकृ आलं... नक्कीच काढून बघणार अशा पद्धतीने एखादे चित्र! ;)
Sandy
1 May 2017 - 2:10 pm | विशाल कुलकर्णी
भारी उपक्रम , आवडलाच ! खुप फायदा होइल याचा ...
धन्यवाद देवानू .
1 May 2017 - 3:23 pm | चित्रगुप्त
जमिनीपासून आपण कितीही उंचीवर असलो, तरी आपला डोळा आणि क्षितिज समपातळीत असते.
1 May 2017 - 4:16 pm | यशोधरा
हे छान आहे.
1 May 2017 - 4:38 pm | सतिश गावडे
अभियांत्रिकी चित्रकलेत पर्स्पेक्टीव्ह चित्रकला सखोल अभ्यासाला असते.
1 May 2017 - 5:34 pm | अभ्या..
अॅप्लाईड आर्टस मध्येही फाउंडेशनचे एक वर्ष धरले तर पाच वर्षे परस्पेक्टिव्ह शिकवले जाते.
नुसते ठोकळा बिल्डिंग आणी मशिनींचे नव्हे तर माणसांचे अन प्राण्याचे, निसर्गाचे पण.
८ ते १२ वी टेक्निकल असल्याने इंजिनिअरिंग ड्रॉईंगची भरपूर प्रक्टिस होती. त्याचा फायदा अॅप्लाईड आर्ट्सला झाला.
15 May 2017 - 6:39 pm | चौकटराजा
कोणताही आकार हा क्युब किंवा रेक्टॅन्गुलर प्रीझम या आकारात कल्पून परस्पेक्टीव्ह तयार करता येते. हीच पद्धत थ्री डी मॅक्स मधे वापरतात . त्यात अन्तिम आकृतीचा पहिला अविष्कार प्रीझम पासून सुरू होतो. त्यात अनेक विभाजने करता येऊन एक त्रिमितीय जाळी तयार होते. तिचे बिंदू कोणत्याही दिशेत खेचता येऊन
हळू हळू कोनीय आक्रुती व नंतर स्मूथ हा मॉडिफायर वापरून मुलायमता आणता येते.' आईस एज' पाहिला असेल तर त्यातील सर्व कॅरॅक्टर्स या रितीने तयार करण्यात आली आहेत. हे आपले जाता जाता. पण समजा आपल्याला दंडगोलाचा परअस्पेक्टीव्ह हाताने काढायचा असेल तर तो रेक्टॅण्गुलर प्रीझम ( ईष्टीकाचिती) मधून काढता येतो.
1 May 2017 - 3:55 pm | विशाल कुलकर्णी
सद्ध्या घरात थोडे इंटेरीयरचे काम सुरु आहे. हॉल, किचन आणि पॅसेजमधल्या टाइल्स बदलून घेतोय. त्याबरोबरच हॉलमधली छोटी दोन-अडीच फुटाची बाल्कनीही आत घेतलीय. त्यामुळे सद्ध्या घरात , विशेषतः हॉलमध्ये छान पसारा, राडा झालेला आहे. आज कामगार दिनानिमीत्त कामगारांची सुट्टी होती त्यामुळे संधी साधली. घरात नेमकी एकमेव ग्लास मार्कींगची पेन्सील सापडली त्यामुळे तिच्यावरच भागवावे लागले. आता अजुन पेन्सिल्स आणुन ठेवायला हव्यात..
1 May 2017 - 4:40 pm | सतिश गावडे
कसं जमतं राव काहींना असलं भारी रेखाटन. :)
2 May 2017 - 1:00 pm | दुर्गविहारी
चला पुन्हा एकदा करुया सुरवात चित्रकला शिकायला. या मलिकेबध्द्ल धन्यवाद
2 May 2017 - 1:25 pm | वरुण मोहिते
मस्त उपक्रम . सगळ्या कलाकारांकडून माहिती वाचायला आवडेल . ऑफिस मध्ये बसल्या बसल्या रेखाटन जमतंय का पाहतो आज....
2 May 2017 - 1:34 pm | जगप्रवासी
एखादे चित्र बघून हुबेहूब काढता येत पण न बघता फक्त कल्पना करून काढता येत नाही. आता थोडा प्रयत्न करायला हवा, जिथे अडेल तिथे तुम्ही मार्गदर्शन करालच.
2 May 2017 - 2:23 pm | बबन ताम्बे
धन्यवाद चित्रगुप्तजी. आपल्या मार्गदर्शनामुळे बरीच भर पडली ज्ञानात. सध्या फोटो बघुन चित्र काढणे थांबवलय :-)
अपवाद विनोदखन्ना . आवडत्या हिरोला श्रद्धांजली म्हणुन विनोद खन्नाचे पेन्सिल शेडिंग चित्र काढायला घेतले आहे.
3 May 2017 - 3:15 pm | अत्रन्गि पाउस
पॅरिस चे लुव्र बघतांना तुम्ही ओळख करून दिलेल्या अनेक चित्रांची आजही आठवण येते ...
त्या दिवसापासून चित्र बघतांना जाणीव पूर्वक बघायचा प्रयत्न करतो ....
3 May 2017 - 5:13 pm | सूड
इथे म्हटल्याप्रमाणे स्केच करायला बसलो आणि सवय मोडली असल्याचं लक्षात आलंय. थोडा वेळ लागेल.
5 May 2017 - 12:48 am | palambar
मिपा एक विद्द्या पीठ असे म्हणायला हरकत नाहि.
7 May 2017 - 10:36 am | दीपक११७७
भारी उपक्रम , आवडलाच ! खुप फायदा होइल याचा ...
धन्यवाद
8 May 2017 - 11:18 am | शाली
ॲडाॅब स्केच वापरू केलेले रेखाटन.
9 May 2017 - 12:21 pm | शाली
15 May 2017 - 9:29 am | चित्रगुप्त
@शाली: चित्र दिसत नाहीये
8 May 2017 - 3:39 pm | भटकंती अनलिमिटेड
टॅबलेटवर काढलेली रेखाटनं आणि चित्रं चालतील का? आम्हीही असा प्रयत्न सुरु करु.
9 May 2017 - 9:41 am | चित्रगुप्त
अगदी अवश्य करा आणि इथे टाका.
8 May 2017 - 7:36 pm | सानझरी
अतिशय चांगला धागा. बरंच काही शिकायला मिळतंय. सगळ्यांनी काढलेले स्केचिंग्स पण फार आवडले.
मला चित्रकलेसाठी लागणारं बरंच साहित्य घ्यायचंय. पुण्यात स्वस्तात कुठे मिळेल याबद्दल कोणाला माहिती आहे का?
Easel, acrylic paints.. 120ml च्या tubes, painting knives, canvases इ.
8 May 2017 - 7:42 pm | अभ्या..
स्वस्ताचं काय म्हाईत नाही पण आप्पा बळवंत चौकात व्हीनसमध्ये जवळपास सगळं मिळतं. कर्वे रोड की कुठे अजून एक ब्रँच आहे म्हणे त्यांची.
8 May 2017 - 7:59 pm | सानझरी
हो.. व्हीनसमध्ये सगळं मिळतं. मी आतापर्यंत सगळी खरेदी तिथूनच केलीये. पुण्यातल्या काही जुन्या दुकानांमधे थोडं स्वस्तात मिळतं असं ऐकलंय म्हणून विचारत होते. व्हिनस महाग आहे पण बेस्ट आहे.. दुसरी ब्रँच fc rdला आहे त्यांची..
9 May 2017 - 1:41 pm | खेडूत
भारती विद्यापीठामागे (मागच्या प्रवेश् द्वाराशी) एसपी स्टेशनर्स आहे तिथे त्यांच्या कला महाविद्यालयातली मुले घेतात. बेस्ट आहे.
9 May 2017 - 3:30 pm | आदिमाया
आर्टिस्ट कट्टा
पटर्वधन . शनिवार वाड्यामागे.
छान आहे.
17 May 2017 - 11:13 pm | सानझरी
आज जाऊन आले आर्टिस्ट कट्याला. Venus आणि sp पेक्षा किंमती ब-याच कमी आहेत.. या दुकानाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..
9 May 2017 - 8:25 am | दीपा माने
आमची आई आर्टीस्ट होती. तिच्या शाळा कॅालेजात तिची चित्रे ठेवली होती.
आम्हाला शाळेसाठी लागणारी देवी आमच्या पाटीवर रंगीत खडूंनी चितारून द्यायची त्याची आठवण आली.
9 May 2017 - 1:48 pm | आदिमाया
खूप छान उपक्रम. सहभाग घ्यायला आवडेल.
14 May 2017 - 4:46 pm | बोलघेवडा
चित्रगुप्त गुरुजी, हा धागा सुरु केल्याबद्दल धन्यवाद!!! आपल्या सारख्या श्रेष्ठ चित्रकाराचे मार्गदर्शन मिळाल्यास आम्हालाही चार गोष्टी शिकता येतील. आपल्या सूचनेनुसार खिडकीतून दिसणाऱ्या दृश्याचे रेखाटन केले आहे. आपल्या बहुमोल मार्गदर्शनाची अपेक्षा आहे.
14 May 2017 - 9:16 pm | चित्रगुप्त
@बोलघेवडा...
छान आहे रेखाटन. समोर दिसणारे बरेच मोठे दृष्य लहान कागदावर रेखाटायचे म्हणजे ते खूप सुटसुटीतपणे, थोडक्यात, तपशीलांना फाटा देत करावे लागते ते चांगले साधले आहे, तरीही त्यातल्या त्यात झाडे, पोहणारे, तरणतालाचे कठडे, अँटेना आणि डिश, इमारतींच्या गच्च्या आणि नळीदार पत्र्याचे छप्पर वगैरे तपशील छान. अचूक पर्स्पेक्टिव्हची गरज प्रत्येकाला आणि प्रत्येक चित्राला असतेच असे नाही. तुम्ही ज्या पद्धतीने रेखाटन करत आहात, त्यासाठी इतपत पर्स्पेक्टिव्ह पुरेसे आहे, त्याबद्दल चिंता करू नका. सर्वात मुख्य म्हणजे चित्र काढतानाचा आनंद. बाकी सर्व दुय्यम.
असेच काम चालू ठेवा -- झपाटून जाऊन काम करा आणि या धाग्यात देत रहा. शुभेच्छा.
15 May 2017 - 8:37 pm | बोलघेवडा
धन्यवाद गुरुजी.
सराव चालू आहे. आपल्या मालिकेच्या पुढील भागाची वाट बघत आहे.
19 May 2017 - 6:07 pm | चौकटराजा
यात खूप जागी परस्पेक्टीव्हने मार खाल्ल्ला आहे. त्यामुळे इमारती फाटलेल्या दिसतात. एक लक्षात असू द्या कोणताही ऑड आकार उदा. स्वीमिंग पुलाचा अथवा रंग करायच्या पॅलेटचा आकार हा चौरस वा आयत या आकारत बसतो. तो चौरसामधे आहे असे कल्पून प्रथम घेरणार्या चौरसाचा फिकट असा परस्पेक्टीव्ह काढायचा .त्यात मग आपला विचित्र आकार प्रस्पेक्टीव्ह इफेक्ट देऊन बसविता येतो. उदा . चिनार या वृक्षाच्या झाडाच्या पानाचा परस्पेक्टीव्ह अशा प्रकारे काढता येईल.
19 May 2017 - 10:37 am | विशाल कुलकर्णी
गुर्जी, ह्ये कसं वाटतय ते बघा जरा...
19 May 2017 - 9:43 pm | चित्रगुप्त
@विशाल कुलकर्णी... चित्र दिसत नाहिये भौ. त्याला जरा दिसतं करा.
19 May 2017 - 6:18 pm | उपयोजक
मी सुध्दा पूर्वी खुप चित्रे काढायचो.अतिरेक वाटावा इतकी! पूर्वी स्नो व्हाईट नावाने ड्रॉईंग पेपर मिळायचा तो एकाशेजारी एक जोडून असा मोठा ५ बाय चार फुटाचा माझा 'कॅनव्हास'तयार व्हायचा.घरातल्या एका भिंतीवर लावून त्यावर चित्र रेखाटून रंगवायचो.बघणारा कौतुक करायचा,पण हे जन्मजात होतं,कुठेही शिकलो नव्हतो.व्यसनच लागलं होतं म्हणाना, शेवटी अति तिथे माती झाली.अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं म्हणून मातोश्रींनी सगळी चित्रं फाडून टाकली!
बारा वर्षे झाली याला.त्यानंतर आजतागायत तशी चित्रे काढली नाहीत.कधी मन रमवण्यासाठी पेनाने स्केचेस करतो झालं!
20 May 2017 - 4:40 pm | चौकटराजा
परस्पेक्टीव्हचा थोडक्यात तक्ता.
काही आवश्यक टीपा-
परस्पेक्टीव्ह एक मिलन बिंदूचा , दोन मिलन बिंदूचा , तीन मिलनबिंदूचा असा असतो. तसेच तो नजर रेषेवर , नजर रेषे समोर व नजर रेषे खाली पाहिलेली वस्तू अशा तीन गुणिले तीन बरोबर ९ शक्यता धरून दिसतो. आपल्याला सभोवतालचे जग दिसते ते या पलिकडील शक्यतेतील कधीच नसते. आपण आपले जग नीट पाहिले तर समोरून पाहिलेले घर हे कधी त्याच्या दोन बाजू दाखविणारे असते तर कधी एक , कधी ते एका चढावर आपण उभे आहोत व घर वर आहे आपण चढ चढत आहोत त्यावेळी त्याचा तळ आपल्याला दिसत नाही असे दिसते . कधी खालून गगनचुम्बी इमारत आपण पहातो तर कधी ती आयफेल टोवर व मलबार हील वरून पहातो. या सार्या शक्यता वरील तक्त्यात दिलेल्या आकृति मधे आपल्याला दिसतील.
20 May 2017 - 4:46 pm | चौकटराजा
एक मिलनविन्दू व दोन मिलनबिंदू या सारख्या परस्पेक्टीव्ह मधे उभ्या रेषा नेहमी कागदाच्या बाजूना समांतर आल्या पाहिजेत तर तीन मिलनबिम्दू असलेल्या परस्पेक्टीव्ह तील उभ्या रेषा या बहुशः कागदाच्या कडेला तिरक्या असलेल्या आल्या पाहिजेत.
20 May 2017 - 5:43 pm | चित्रगुप्त
चौरा, हे जे पर्स्पेक्टिव्ह रेखाटन असते, त्यात मूलभूत गृहित तत्व समोरील दृष्य एका ठरावीक बिंदूतून (म्हणजे एका डोळ्याने) आणि एका विशिष्ट क्षणी "दिसणारे" (म्हणजे कॅमेर्यातून टिपल्यासारखे) असते. यात समोरच्या वस्तूची फक्त अर्धी बाजू आपल्याला दिसत असते. आपण प्रत्यक्षात मात्र दोन डोळ्यांनी बघत असल्याने अर्ध्यापेक्षा थोडे जास्त आपल्याला दिसत असते, आणि त्यामुळेच ते दृष्य 'त्रिमित' भासते.
मात्र एकादे काव्य रचताना व्याकरणाचे नियम काटेकोरपणे पाळले, तर काव्य म्हणून ते नीरस आणि बेगडी वाटावे, तसेच पर्स्पेक्टिव्हचे नियम काटेकोरपणे पाळून केलेल्या रेखाटनाचे होते. ते नियम आपल्या सोयीप्रमाणे वाकवून केलेले चित्र जास्त प्रत्ययकारी वाटते. उदाहरणार्थः
27 Jun 2017 - 3:54 pm | धर्मराजमुटके
मस्त लिहिलय ! अजुन लिहा !
19 Oct 2018 - 3:00 pm | चित्रगुप्त
सहज चाळताना हा धागा दिसला. दरम्यानच्या काळात वाचकांपैकी वा अन्य मिपाकरांनी काढलेली चित्रे इथे द्यावीत यासाठी पुन्हा वर काढतो आहे.
20 Oct 2018 - 11:05 am | Naval
धन्यवाद हा धागा वर काढल्याबद्दल!!
20 Oct 2018 - 7:12 pm | टर्मीनेटर
उत्तम धागा. असे कितीतरी छान छान धागे वाचायचे राहिले आहेत. प्रेरणा तर मिळाली आहे रेखाटनाची, प्रत्यक्षात कागदावर काही चितारलं जातंय का ते बघू :)