मित्रहो, "आपण आता चित्रकलेची सुरुवात केली पाहिजे" असे नेहमी वाटत राहणाऱ्या, पण नेमके काय करावे, कसली चित्रे काढावीत, ती कशी निघतील, लोकांना ती आवडतील का, कोणते रंग-ब्रश-कागद वापरावेत, कोल्ड प्रेस कागद बरा की हॉट प्रेस, ऍसिड फ्री बरा की साधाच बरा, ऍक्रेलिक की ऑइल की पोस्टर कलर की जलरंग की पेस्टल वापरावेत, चित्रांचा आकार किती असावा, झालेले चित्र बेडरूमात लावावे की जिन्यात की कुठे, फ्रेमिंग कुठून करवावे, फेसबुकावर लाईक्स मिळतील ना ? मिपावर दंगा तर होणार नाही ? ..... छे..... काहीच कळत नाही बुवा/बाई..... आणि अगदी आत्ताच सुरुवात केली पाहिजे असे कोणी सांगितले ? चला, नंतर बघू कधीतरी.... आत्ता अमुक तमुक करु .....
...... असे वाटणाऱ्या सर्वांनो , हा धागा तुमच्यासाठीच आहे. तर आता काय करायचे ते बघूया.
१. सुरुवातीचा निश्चय
बहुतेक सर्वांच्याच चित्रकलेची सुरुवात फोटो वा चित्रे बघून काढण्यापासून होत असते. सुरुवात म्हणून हे ठीक असले, तरी नंतर मात्र या सवयीत अडकलेल्यांची प्रगती खुंटते.
तर समजा तुम्ही ती मधुबाला, सचिन, शिवाजीमहाराज वगैरेंची सुंदरशी हुबेहूब चित्रे काढून वाहवा मिळवणारांपैकी आहात, किंवा तसले काही न करणारांपैकी आहात ... आता पहिले काम करायचे ते असे, की "यापुढे कोणतेही चित्र वा फोटो बघून आपण चित्र काढायचे नाही" असा निश्चय सगळ्यात आधी करायचा.
२. बरं, मग पुढे ?
... सुरुवातीला सहज उपलब्ध असलेले साहित्य उदाहरणार्थ कोणताही कोरा/पाठकोरा कागद आणि पेन्सिल/ पेन घेऊन आता या पुढील अर्धा तास आपल्याला फक्त चित्र काढण्यात घालवायचा आहे, असे ठरवून सज्ज व्हा.
... अन्य व्यत्यय उदा. मोबाईल, टीव्ही, वगैरे बंद करा.
....आपण आता करणार असलेले चित्र कुणाला दाखवण्यासाठी, फेसबुक वा मिपावर वगैरे टाकण्यासाठी नसून निव्वळ शिकण्यासाठी, चित्रकलेचा आनंद लुटण्यासाठी आहे, ते चांगले झाले नाही तर फाडून टाकले तरी चालेल .. असे ठरवून आजूबाजूला बघा.
३. भोवताली काय दिसते आहे?
... ते बघा, आणि त्यापैकी एकादी वा दोनचार गोष्टी निवडा आणि त्याचे जसे जमेल तसे चित्रण करणे सुरु करा. भोवताल अगदीच नीरस वाटत असेल तर गॅलरीत, गच्चीवर वा बाहेर पडा आणि समोर दिसणारे दृश्य रेखाटने सुरु करा.
बस. हीच तुमच्या चित्रकलेची खरी सुरुवात आहे.
अन्य संकल्पना, रंगांचे प्रकार, कागद / कॅनव्हासचे प्रकार, ब्रशचे प्रकार आणि त्यांचे उपयोग वगैरे सर्व गोष्टी यथावकाश या लेखमालेच्या पुढील भागांमध्ये येतीलच.
हुर्रर्रर्रर्रर्रर्र सुटा, रेखाटनाला लागा, आणि चार- पाच रेखाटने इथे टाका. तुम्हाला आणि घरच्यांना ती कितीही खराब किंवा चांगली वाटली तरी.
(क्रमशः)
.
.
.
.
प्रतिक्रिया
28 Apr 2017 - 6:14 pm | कंजूस
चांगली कल्पना.
28 Apr 2017 - 6:21 pm | संजय क्षीरसागर
.
28 Apr 2017 - 6:23 pm | सूड
घरी जाऊन रेखाटन करतो आणि ताबडतोब अपलोडवतो, तुमच्याकडून शिकायला मिळणार असेल तर जमवायलाच हवं.
28 Apr 2017 - 6:38 pm | गवि
अत्यंत धन्यवाद काका..
ही मालिका फॉलो करत राहणार. चित्रकला / पेंटिंग या स्वरुपात व्यक्त होणं फार हवंसं वाटतं. पण हात हवा तसा चालत नाही हे दुर्दैव.
या मालिकेतून सुलभ माहिती होईल. पुढचा भाग प्लीज लिहावा.
29 Apr 2017 - 10:10 am | चित्रगुप्त
@ गवि, खरेतर तुमच्या प्रतिसादामुळेच ही लेखमाला सुरु करायची प्रेरणा मिळाली आहे, त्याबद्दल आभार.
ज्यांनी ज्यांनी ही मालिका फॉलो करत राहू असे लिहिले आहे, त्या सर्वांना विनंती अशी की 'फॉलो' म्हणजे फक्त वाचणे वा प्रतिसाद देणे एवढेच न करता आपापल्या सोयी-सवडीप्रमाणे प्रत्यक्ष स्वतः थोडीतरी चित्रे काढत राहून ती इथे वरचढवत - अपलोडत रहावीत म्हणजे धाग्याचे खरे सार्थक होईल.
जगातील प्रत्येक व्यक्ती एकमेवाद्वितीय असल्याने जसे प्रत्येकाचे हस्ताक्षर वेगवेगळे, तसे चित्रांकनही वेगवेगळे असते, त्यामुळे उगाचच महान चित्रकारांशी वा अन्य कुणाशी तुलना न करता आपल्याला जसे भावते, जमते तसे खुशाल चित्र काढावे, त्याचे मूल्यमापन करण्याची काहीही गरज नाही, हा खुषीचा मामला आहे. अर्थात सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे फोटो वा चित्र बघून काढायचे नाही एवढा दंडक पाळला की झाले. चित्र वा फोटो हे मुळातच द्विमित असल्याने त्याबरहुकूम काढण्यात फारसे आव्हान नसते, मात्र प्रत्यक्ष त्रिमित वस्तु बघून त्यावरून द्विमित चित्र काढण्यात अनेक गोष्टी अंतर्भूत असतात, त्या सर्वातून हळू हळू चांगला चित्रकार घडत जातो.
हे 'व्यक्त' होणं, खोल अन्तर्मनातील भावनांना/वेदनेला अभिव्यकी देणं, चित्रांद्वारे सामाजिक समस्यांवर भाष्य करून समाजाचं ऋण फेडणं ..... वगैरे गोष्टी फार दूरच्या (निदान या धाग्यापुरत्या तरी) आहेत. सध्या फक्त चित्रकला शिकताना 'आनंदाचे डोही आनंद तरंग' ही स्थिती अनुभवणे आणि आपण स्वतः काय करू शकतो, वापरत असलेल्या माध्यमाच्या काय काय शक्यता आहेत, हळू हळू आपण चित्रकलेत अधिकाधिक प्राविण्य कसे मिळवू शकतो, चित्रकलेबद्दलचे आपले आकलन आणि संवेदनशीलता कशी वाढवू शकतो... या आणि अश्या गोष्टींचा 'शोध' वा वेध प्रत्यक्ष प्रयोगातून घेत राहणे महत्वाचे आहे.
असे मानण्याचे अजिबात कारण नाही. हात चालतो ना? मग चालवायला लागावे. 'हवा तसा' म्हणजे कसा, हे इतरांची चित्रे बघून ठरवण्याची आवश्यकता नाही. आपण एकमेवाद्वितीय आहोत, त्यामुळे सर्वांपेक्षा काही वेगळेपण आपल्यात असणारच आहे, त्याचाच तर शोध घ्यायचा आहे. तेंव्हा नि:शंक होऊन चित्रे काढावीत.
पुढील भाग लिहीण्यापूर्वी प्रतिसादांमधून किमान पन्नासेक रेखाटने यावीत अशी अपेक्षा आहे. भारंभार माहिती गोळा करत रहाण्यापेक्षा जमेल तशी प्रत्यक्ष सुरूवात करणे जास्त उपयोगी ठरावे. आता वाचकांनी जे 'पुढचे पाऊल' उचलायचे आहे, ते काही रेखाटने करण्याचे आहे.
......... ज्यांना काही दृष्य, वस्तु इ. बघून काढण्यापेक्षा निव्वळ कल्पनेने चित्र काढणे जास्त आवडत असेल, त्यांनी अवश्य तसे करून ती चित्रे इथे द्यावीत......
28 Apr 2017 - 6:46 pm | यशोधरा
अरे वा! मस्त मालिका. टाकते इथे मी केलेली काही रेखाटने.
29 Apr 2017 - 11:59 am | पद्मावति
29 Apr 2017 - 3:48 pm | चित्रगुप्त
वाहवा. खूपच छान आहेत यशोताईंची ही चित्रे. आणखी येऊ द्यात.
29 Apr 2017 - 8:43 pm | यशोधरा
तुमच्याकडून शिकायचे आहे काका. अशी संधी कोण सोडणार?
29 Apr 2017 - 9:31 pm | अभ्या..
एकच लंबर स्केचेस मैय्या, खुप आवडले.
मगपाय काढतानाचे स्ट्रोक्स आणि फोर्स लाईन्स आवडल्या.
.
.
तुझी ही कला म्हैतच नव्हती. किपिटप.
30 Apr 2017 - 9:34 pm | रुपी
सुंदर.
30 Apr 2017 - 9:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर !
16 May 2017 - 7:05 pm | चौकटराजा
वा वा !!
28 Apr 2017 - 7:43 pm | खेडूत
धन्यवाद सरजी!
उदाहरणादखल दिलेली चित्रे पूर्ण मालिकेत मुलांना दाखवण्याजोगी ठेवणार असाल तर चिरंजिवांना नियमित वाचायला सांगतो! :))
29 Apr 2017 - 3:50 pm | चित्रगुप्त
अवश्य, आणि फक्त वाचायलाच नाही तर चित्रे वरचढवायला पण सांगा.
28 Apr 2017 - 8:58 pm | चतुरंग
झालंय हल्ली.
मध्यंतरी एकदा आमचा आवडता भूभू घरी आलेला तेव्हा त्यालाच समोर बसवून चटकन हाताला लागेल तो कागद घेऊन चितारला होता..
29 Apr 2017 - 10:54 am | मोहन
सुंदर
28 Apr 2017 - 10:46 pm | अजया
वाचते आहे. तुमच्याकडून शिकणे पर्वणी आहे. फाॅलो करत राहीन मालिका.
28 Apr 2017 - 10:49 pm | पैसा
छान सुरुवात!
29 Apr 2017 - 7:32 am | रामपुरी
हे बरेच वेळा सुरू करून बंद पडलं आहे आता परत एकदा सुरू करावंच लागेल. धक्का दिल्याबद्दल आभार.
29 Apr 2017 - 9:36 am | प्रचेतस
चित्रकलेची(म्हणजे चित्र काढण्याची) आवड अजिबात नसली तरी धागा आवडतोय.
पुभाप्र.
29 Apr 2017 - 10:36 am | डॉ सुहास म्हात्रे
उपयोगी मालिका ! चित्रगुप्तजींच्या अभ्यासू आणि वैशिष्ट्यपूर्ण शैलीने ही मालिका रोचक होईल यात शंका नाही !! पुभाप्र.
29 Apr 2017 - 11:27 am | सदानंद
नक्की फॉलो करणार .. आणि प्रयत्न करणार..
धन्यवाद ...
29 Apr 2017 - 1:04 pm | चौथा कोनाडा
भन्न्नाट इनिशियेटिव !
चित्रगुप्त साहेबांचे मिपा-कलादालनासाठी भरीव कलालेणं !
फॉलो करत राहणार !
29 Apr 2017 - 1:12 pm | सिरुसेरि
छान माहिती . कलेसाठी कला .
29 Apr 2017 - 3:10 pm | उल्का
मस्त मालिका आहे.
29 Apr 2017 - 3:46 pm | केरभाऊ विश्वासराव
छान सुर,धन्यवाद
29 Apr 2017 - 3:49 pm | केरभाऊ विश्वासराव
छान सुरवात
29 Apr 2017 - 5:05 pm | सपे-पुणे-३०
29 Apr 2017 - 6:25 pm | अभ्या..
सराईत हात आहे हो, शेडलाईटस सेन्स पण जब्बरदस्त आहे.
सिम्प्लीफाईड सायकल आवडली ;)
29 Apr 2017 - 7:25 pm | खेडूत
+१११
29 Apr 2017 - 8:24 pm | मितान
+११११
सुंदर !!!
2 May 2017 - 2:57 pm | सपे-पुणे-३०
सराईत वगैरे काही नाही, शिकवूच आहे. चित्रकलेची आवड आहे. ऑनलाईन पाहून/ वाचून शिकले. त्यामुळे 'पर्स्पेक्टिव्ह' शिवाय चित्रकलेतील कोणत्याही तांत्रिक गोष्टी मला समजत नाहीत. चित्राबद्दल काही सूचना असल्यास अवश्य सांगा.
30 Apr 2017 - 10:42 am | चौथा कोनाडा
भारी स्केचेस ! अजून येवु द्यात !
30 Apr 2017 - 11:40 am | चित्रगुप्त
@ सपे-पुणे-३० ... सर्व चित्रे आवडली. नेहमी रेखाटने करत असता का ? नसल्यास अवश्य करत रहा, छान आहेत.
30 Apr 2017 - 9:35 pm | रुपी
मस्तच!
30 Apr 2017 - 9:37 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तंच की !
14 May 2017 - 2:17 pm | चौकटराजा
अलिकडे फोटोलाही पोत देण्याची काही तंत्रे आली आहेत. पण चित्र ते चित्र. वरील चित्रातून आपल्याला त्या पोताचे दर्शन होते. माझी एक सूचना अशी आहे की ...
कागद घेऊन सरळ समांतर रेषा , तसेच वर्तुळ काढण्याचा प्रयत्न ही अगदी पहिली पायरी आहे. ती करून पाहिली तर असे आढळून येते की ते बरेच कठीण आहे. रेषा तिरक्या येतात तर वर्तुळ लंबगोलाकार येते.
29 Apr 2017 - 6:08 pm | हर्शरन्ग
छान आहे मालिका ..... अभिनंदन
29 Apr 2017 - 8:28 pm | मितान
किती कलाकार आहेत मिपावर !!!
चित्रं काढायला आवडतं पण शाळा नामक प्रकरणाने या विषयात भयंकर न्यूनगंड दिला आहे ! जायला वेळ लागेल !!
तरी पण सुरुवात तर करते.
30 Apr 2017 - 4:46 am | जयंत कुलकर्णी
चित्रे न बघता चित्रे काढणे हे सर्वोत्तम प्रयत्न आहे...हे मात्र पटले म्हणजे प्रत्यक्ष पाहून काढणे हे अवघड असले तरी त्यातच खरी मजा आहे....... आता तसंच करेन... आणि हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद !
30 Apr 2017 - 4:57 am | चित्रगुप्त
एवढे चित्रकार या धाग्यातून आपल्याला काही शिकायला मिळेल, अशी आशा करताहेत, हे वाचून आमच्या एका मित्राने खालील ओव्या ऐकवल्या:
पिशाच्यापासी पिशाच्य गेलें । तेथें कोण सार्थक झालें । उन्मत्तास उन्मत्त भेटलें । त्यास उमजवी कवणू ॥
भिकार्यापासी मागतां भिक्षा । दीक्षाहीनापासी मागतां दीक्षा । उजेड पाहतां कृष्णपक्षा । पाविजे कैंचा ॥
अबद्धापासी गेला अबद्ध । तो कैसेनि होईल सुबद्ध । बद्धास भेटतां बद्ध । सिद्ध नव्हे ॥ ...................॥ राम कृष्ण हरि ॥
30 Apr 2017 - 5:48 pm | प्रदीप
अशी लेखमाला सर्वांनाच उपयुक्त ठरावी.
मात्र हा भाग वाचल्यानंतर त्याचे शीर्षक बुचकळ्यात टाकणारे आहे असे वाटले. मलातरी ह्यात कुठेही रेखाटने कशी करावीत ह्याविषयी काहीच तपशिलवार माहिती मिळाली नाही. कदाचित ह्या भागास 'प्रास्तविक' म्हणणे अधिक समर्पक ठरले असते?
30 Apr 2017 - 5:53 pm | अभ्या..
हे "द कन्क्लुजन" आहे बहुधा,
आता "द बिगिनिंग" येईल ;)
1 May 2017 - 1:30 pm | चित्रगुप्त
असे वाटणे साहजीकच आहे, तरी या संबंधात काही गोष्टी सर्व वाचकांनी जाणून घेणे आवश्यक आहे, त्य मांडण्याचा प्रयत्न करतो:
१. चित्रकला (किंबहुना कोणतीही कला) शिकणे हे फार म्हणजे फारच दीर्घ काळ चालणारे कार्य आहे. उदाहरणार्थ मी वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत चांदोबातली चित्रे आणि देव आनंद, साधना वगैरे नट-नट्यांचे फोटो बघून ते छाया-प्रकाश, रंग वगैरेंसकट हुबेहुब चित्रित करण्यात प्राविण्य मिळवता झालो होतो. ती चित्रे इंदूरच्या आर्टस्कूलचे तात्कालिन प्रिन्सिपल किरकिरे सर यांना दाखवली, त्यावर ते म्हणाले की तुमचा हात चांगला आहे, तस्मात उद्यापासून शिकायला या, मात्र आता इतःपर अशी बघून चित्रे काढायची नाहीत, इथे तुम्हाला चित्रकार बनण्यासाठी योग्य ते शिक्षण आम्ही देऊ. बस, त्या दिवसापासून पुढे मी कॉपी करणे सोडले, ते कायमचे.
२. आर्टस्कुलात दाखल झाल्यावर पहिल्या वर्षी स्थिरवस्तुचित्रण हाच मुख्य विषय त्याकाळी असायचा. विविध आकारांची, रंगांची (पारदर्शक काचेची आणि चिनीमातीची) भांडी, ज्यामितिक आकारांचे लाकडी ठोकळे, मुद्दाम सळ/घड्या पाडलेले कापड, कृत्रिम फळे वगैरे, शिवाय जुन्या महान शिल्पकृती (उदा. व्हीनस, अपोलो, जूलियस सीझर वगैरेंच्या पूर्णाकृति) हे सर्व बघून चित्रे काढण्यातून आमची फोटोबरहुकूम चित्र काढण्याची सवय मोडली. एक चित्र पूर्ण करायला पूर्ण एक आठवडा असे, पुढल्या आठवड्यात पुन्हा दुसरी काही रचना समोर मांडलेली असे. तासन तास एकाग्रतेने सूक्ष्म निरीक्षण करत आम्ही चित्र काढत असू. गंमत म्हणजे शिक्षक एकदा सकाळी आणि एकदा सुटीच्या आधी असे दोन चक्कर मारून सर्वांची चित्रे बघून एक शब्दही न बोलता निघून जात. पहिले एक-दोन महिने असेच चालले, आम्हाला तेंव्हा समजले नाही पण आता कळते की ते प्रत्येक विद्यार्थ्याची समज, कुवत, कौशल्य, चिकाटी, आस्था वगैरे जाणून घेत होते. त्या नंतर अधून मधून ते एकाद्या विद्यार्थ्याच्या चित्रावर थोडेसे काम करून दाखवत त्यावेळी आम्ही सर्वजण भोवती गोळा होऊन विस्मयाने ते बघायचो. अगदी अल्प वेळात ते अशी करामत करत की आम्ही थक्क व्हायचो. उदाहरणार्थ आम्ही चिनीमातीची भांडी, कापड, वगैरे जसेच्या तसे रंगवण्याचा कसोशीने प्रयत्न करायचो, परंतु सरांनी जेंव्हा भांड्यांच्या खालच्या बाजूच्या फटीतून दिसणारा मागचा प्रकाश ब्रशच्या एकदोन फटकार्यातून दाखवला, तेंव्हा ते चित्र एकदम जिवंत झाले.
तात्पर्य म्हणजे चित्रकलेचा सराव हा सर्वात महत्वाचा, वेळखाऊ भाग असतो, त्यामानाने 'मार्गदर्शन' हे फारच अल्प असते.
३. तर वयाच्या सोळाव्या वर्षी माझ्या चित्रकला शिक्षणाची योग्य रीतीने सुरूवात झाली. सुमारे दहा वर्षेपर्यंत उत्तम गुरूंचे सानिध्यात चित्रकला शिकण्यात स्वतःला झोकून दिले होते. (पोर्टेट, निसर्गचित्रण, पर्स्पेक्टिव्ह, शरीरशास्त्र, काम्पोझीशन, मूर्तीकला, ग्राफिक प्रिंट, असे विषय तेंव्हा कलाशिक्षणात होते). त्यानंतर सातत्याने चित्रे काढत राहिलो, तरीसुद्धा मला स्वतःला समाधानकारक वाटतील अशी चित्रे जमायला चाळीस वर्षे लागली.
४. या संदर्भात इथे या लेखमालेद्वारे चित्रकलेचे शिक्षण देणे फारच अवघड आहे. मुख्य प्रयत्न हा ज्याला त्याला स्वतः चित्रे काढण्याचाच करायचा आहे. थोड्याश्या महत्वाच्या सूचना वैयक्तिक रीत्या (ज्याच्याच्या त्याच्या कामानुसार) केल्या जाऊ शकतात. इथे एकाद्या पाठ्यपुस्तकाप्रमाणे काही लिहीणे अप्रस्तुत आणि अनावश्यक ठरेल, त्यात मला रूचिही नाही. असे साहित्य हल्ली जालावर विपुल उपलब्ध आहे.
५. ही लेखनसरिता नदीच्या तीरावर बसून पोहणार्यांची गंमत बघणार्यांसाठी किंवा नदीत गळ टाकून काही माहितीचे घबाड हाती लागेल अशी आशा बाळगणार्यांसाठी फारशी उपयोगाची नाही. कितीही वाईट वा चांगले जमत असले, तरी प्रत्यक्ष काहीतरी चित्रकर्म करून ते इथे देणार्यांच्या प्रयत्नातूनच ही लेखमाला पुढे सरकू शकते.
६. कलाशिक्षणाचे सुरुवातीचे दोन महिने जसे आमच्या शिक्षकांनी आम्हाला समजून घेण्यात घालवले, तसा निदान हा पहिला लेख तरी इथले चित्रकार काय काय, कसे करतात ते जाणून घेण्यासाठी आहे. कदाचित कुणाला कोणत्याही मार्गदर्शनाची गरज नसेल, फक्त सराव पुरेसा असेल, किंवा कुणाला अमूक तर कुणाला तमूक प्रकारच्या मार्गदर्शनाची गरज असेल, ते बघूनच समजेल.
७. म्हणून सर्व वाचकांना विनंती, की त्यांनी अगदी क्षुल्लक का होईना काहीतरी रेखाटून इथे द्यावे. प्रत्यक्ष दृष्य, वस्तु इ. ऐवजी नुस्त्या कल्पनेने रेखाटायलाही काहीच हरकत नाही. कोणतीही तुलना, मूल्यमापन, समीक्षा इथे करण्याची आवश्यकता नाही. पुढे कसे जायचे, त्यासाठी एकदा इशारच पुरेसा असतो. मुख्य मुद्दा आनंदाने काही करण्यण्याचा आहे.
2 May 2017 - 3:01 pm | केरभाऊ विश्वासराव
छान लेखमाला,नव कलाकारांसाठी उपयुक्त,निव्रुत्तीनंतर मीही या मोहात पडलो आहे,मला याचा उपयोग होईल असे वाटते़
2 May 2017 - 3:18 pm | चित्रगुप्त
धन्यवाद केरभाऊ. "निव्रुत्तीनंतर मीही या मोहात पडलो आहे" हे वाचून मिपावरील सर्वाधिक प्रसिद्ध 'मोदादि' धागा आठवला. (३७६९२ वाचने) याचा अवश्य आनंद घ्यावा:
http://www.misalpav.com/node/6332
(मोकलाया दाहि दिश्या)
30 Apr 2017 - 8:48 pm | सप्तरंगी
चांगला उपक्रम, तुमच्यासोबत परत सुरुवात करायला आवडेल...
30 Apr 2017 - 10:12 pm | सविता००१
छानच. आता सुरुवात करावीच .
1 May 2017 - 10:42 am | चांदणे संदीप
....हा माझा चित्रकारितेचा बाणा असल्याने हे जे काही आहे ते पाहून माझ्या पेनास दोन-चार रेषा शिकवाव्यात ही नम्र विनंती! __/\__
Sandy