शेक्सपिअरचे “यक्ष”गान

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जनातलं, मनातलं
27 Apr 2017 - 5:46 pm

"द टेम्पेस्ट –(झंझावात)".

भाषाप्रभू शेक्सपिअरच्या साहित्यिक कारकिर्दीतले त्याचं (बहुधा) हे शेवटचं नाटक.

त्याच्या इतर प्रत्येक कलाकृती सारखंच - मानवी जीवनाची व्यामिश्रता अन सद्-असद भाव-भावनांचे कंगोरे अलगद उलगडून दाखवणारं.

त्याची प्रत्येक कलाकृती त्रिपुरीच्या दीपमाळेसारखी उजळलेली,भुरळ घालणारी.

त्या दीपमाळेतला मला भुरळ घालणारा एक छोटासा दीप म्हणजे हे “यक्ष”गान.

या नाटकात “एरियल” नावाचा एक यक्ष आहे. समुद्री झंजावातात नष्ट झालेल्या जहाजात आपला पिता मृत्यू पावलाय अशी समजूत झालेल्या नेपल्सच्या राजपुत्राचे सांत्वन करताना हा यक्ष ही कविता म्हणतो.

ही कविता म्हणजे केवळ सांत्वन नाही. मृत्यू म्हणजे भरून न येणारे नुकसान नव्हे तर पार्थिवाच्या उन्नयनाचे ते एक विलोभनीय रूप आहे हा एक वेगळाच पैलू मनावर बिंबविणारी त्या कविश्रेष्ठाची ही एक छोटीशी कविता

……….अन तिच्या स्वैर अनुवादाचा माझा प्रयत्न ......

मूळ कविता
=========
Full fathom five thy father lies;
Of his bones are coral made;
Those are pearls that were his eyes:
Nothing of him that doth fade,
But doth suffer a sea-change
Into something rich and strange.

Sea-nymphs hourly ring his knell:
Ding-dong.
Hark! now I hear them—Ding-dong, bell.

स्वैर अनुवाद
=====
पाच पुरुष पाण्यात पहुडला पिता तुझा,बाळ
अस्थी-पंजरा मधुनी तयाच्या फुलले प्रवाळ
तेजस्वी नयनांतुनी त्याच्या मोती बघ घडले
नश्वर देहातील तयाच्या काहीच नच विटले
अलौकिकाचे रूप घेऊनि पुनश्च बघ नटले

पार्थिव त्याचे कैवल्याशी एक-रूप होता
सागरतळीचे नाद अनाहत ऐकू बघ आले !

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

27 Apr 2017 - 6:18 pm | पद्मावति

काय बोलु? केवळ आणि केवळ __/\__

कंजूस's picture

27 Apr 2017 - 9:25 pm | कंजूस

सुंदर!

मारवा's picture

27 Apr 2017 - 9:41 pm | मारवा

कैवल्य व त्याच्याशी एकरूपता ? अनाहत नाद ??? शेक्सपिअर ला
वाचुनच. मुक्ती मिळेल मायेपासुन.
मला खात्री आहे तुम्ही अटरीया पे लोटन. कबुतर चा ही उदात्त टीप्पीकल भारदस्त आध्यात्मिक अनुवाद करून दाखवाल
अध्यात्म सर्वत्र आंहे काढुन ' दाखवणारा ' पाहीजे बास

....ते कळत नाही, तरी पण खालील गोष्टी॑बद्दल मात्र नक्कीच देतो
(१) शब्द्शः भाषा॑तर व स्वैर अनुवाद या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ही माझी बाळबोध समजूत दूर केल्याबद्दल
(२) कैवल्य व अनाहत नाद हे शब्द फक्त आणि फक्त आध्यात्मिक सन्दर्भातच वापरले जाऊ शकतात हे दाखवून दिल्याबद्दल
(३) शेक्सपिअरला मुक्ती देण्याची क्षमता माझ्या स्वैराचारी स्वैर अनुवादात आहे याची पारख केल्याबद्दल
जाता जाता एक श॑का : जर स्वैर अनुवाद -----> स्वैराचार तर भावानुवाद ------->भ्रष्टाचार ?

एस's picture

27 Apr 2017 - 11:50 pm | एस

फार छान. आवडलं.

पुंबा's picture

28 Apr 2017 - 9:17 am | पुंबा

अप्रतिम, सुरूवातीचे मनोगतदेखिल फार आवडले...

वामन देशमुख's picture

28 Apr 2017 - 10:27 am | वामन देशमुख

छान लिहीलंय! वाचून कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली. तेंव्हा आम्ही शेक्सपीअर अभ्यासायचो.

On a literary critical note:
ओरिजिनॅलिटी च्या बाबतीत शेक्सपीअर हा नाट्यलेखक डेव्हिड धवन या सिनेदिग्दर्शकासारखाच होता असं माझं तेंव्हापासूनचं मत अजूनही बदललेलं नाहीय.

यावरुन विंदांची शेक्सपियर ची तुकारामा शी भेट वाली कविता आठवली. त्यातलेच मला वाटत तुकारामाचे मजेदार संबोधन काय रे विल्या इ. जमल्यास क्रिटीकल नोट विस्ताराने लिहावी ही विनंती
यशोधरा's picture

29 Apr 2017 - 8:14 am | यशोधरा

वा! वा!!

पैसा's picture

29 Apr 2017 - 9:25 am | पैसा

लिखाण आवडलं. मूळ कविता ही फक्त पार्थिवाबद्दल बोलते आहे. तुमचं रूपांतर त्याच्या एक पाऊल पुढे गेलं आहे. मोक्ष मुक्ती वगैरे संकल्पना पाश्चात्य विचारांत आपल्यासारख्या नसतात असे वाटते.

शेक्सपिअरच्या कथाकल्पना जुन्या वाङमयातून घेतलेल्या असतील पण त्याच्या भाषेचे सौंदर्य खास त्याचे स्वतःचेच आहे. असे पाहिले तर आपल्या कालीदासानेही जुन्या वाङमयातल्या गोष्टींवरच आपले साहित्य निर्मिले नव्हे काय!