भाषासु मुख्या मधुरा

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
22 Apr 2017 - 12:42 pm

भाषासु मुख्या मधुरा

भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती !
तस्याद्धि काव्यं मधुरं तस्यादपि सुभाषितम् !!

शाळेत असतांनाच संस्कृतची गोडी लागली. तसे गुण मिळवण्यापुरते व्याकरण शिकलो, नाही असे नाही; पण ते तेवढेच. खरी गोडी निर्माण झाली ती सुभाषितांमुळे. शाळेत असतांना ३००-४०० सुभाषिते सहज पाठ होती. सुट्टीत कोकणात गेल्यावर भेंड्यांच्या खेळात तेथील मंडळींनी एक मखलाशी केली. संस्कृत श्लोक फक्त रामरक्षेतील, (सगळ्यांना पाठ असलेली, आमचे जादा पाठांतर बाद!) ते हि नो दिवसा गता:!
तर काय सांगत होतो, "मेघनादरिपु" धाग्यात म्हटले तसे आज एक निराळ्या प्रकारचे कोडे बघू. मराठीत एक clue देतो व आपण संस्कृत सुभाषित आठवते का बघावयाचे. उदा.
" दारिद्र्य व सिद्धी यांचा संबंध काय ?" सुभाषित आहे
हे दारिद्र्य.! नमस्तुभ्यं सिद्धोsहं त्वत्प्रसादत:.!
पश्याम्यहं जगत्सर्वम् न मां पश्यति कश्चन: !!
एखादा दरिद्री याचक दिसला तर आपण त्याच्याकडे बघून न दिसल्यासारखे करत पुढे जातो. याच्यावर भाष्य करत कवी म्हणतो. " हे दारिद्र्या, तुला नमस्कार असो. मी तर तुझ्यामुळे "अदृष्य" होंण्याची सिद्धी मिळवली आहे.( तिरस्करिणी विद्या) मी सर्व जग बघतो पण मी मात्र कोणाला दिसत नाही "

आज जरा सोपी सुरवात करू.
(१) या एका श्लोकात एका नामाच्या सर्व "विभक्ती" आल्या आहेत.
(२) कॉलेजातील (त्या काळची एक सुंदर मुलगी) बरेच वर्षांनी दिसल्यावर पुल म्हणाले "अगा उज्जैनी " भर्तृहरीचा कोणता श्लोक त्यांना आठवला बरे ?
(३) भर्तृहरीच्या मनात कोणती सात शल्ये टोचत असतात ?
भर्तृहरीचे श्लोक देण्याचे कारण शाळेत तो जरा जास्तच लोकप्रिय होता. व वामन पंडिताची मराठी शतकत्रयी सर्वांना माहीत होती. शिवाय वरील दोनही श्लोक तसे कालातित म्हणावयास हरकत नाही.
उत्तरे लगेच देण्यास हरकत नाही. माझी (नेहमीसारखीच) एक विनंती.आपणही तुम्हाला आठवणारी सुभाषिते अशीच विचारा ना ! बघू तरी किती लोकांना सुभाषितांची आवड आहे.
(आणि हो, मी जर खरच " कालबाह्य " झालो असेन ( तसे बरेच शक्य आहे !) तर आपण संस्कृत सोडून देऊ व जुन्या मराठी कवितांकडे वळू.)
शरद

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

पैसा's picture

22 Apr 2017 - 5:14 pm | पैसा

यातील कूट जरा जरा आठवत आहेत. सोडवायचा नक्की प्रयत्न करते.

शशी दिवसधूसरो गलितयौवना कामिनी
सरो विगतवारिजं मुखमनक्षरंस्वाकृते:
प्रभुर्धनपरायण: सततदुर्गत: सज्जन:
नृपाड्गणगत: खलो, मनसि सप्तशल्यानि मे ।

हा आहे का?

शरद's picture

23 Apr 2017 - 6:37 am | शरद

आता श्लोकाचा अर्थही द्या ना. आणि दुसरा श्लोक मिळाला की दोघांमश्ये काय समान आहे तेही सांगा. महत्वाचे तुम्ही स्वत: एखाद्या श्लोकाचे कोडेही पाठवा.
शरद

एस's picture

25 Apr 2017 - 3:41 pm | एस

अर्थ तसा सोपा आहे :
१. चंद्र दिवसा प्रकाशमान नसणे.
२. एखाद्या सुंदर स्त्रीला वार्धक्य येणे.
३. नितळ सरोवरातली कमलफुले कोमेजलेली असणे.
४. एखादा चांगला मनुष्य मूर्ख, बडबड्या असणे.
५. धनवान, प्रभावशाली व्यक्ती ही धनलोलुप असणे.
६. सज्जन माणूस कायम दारिद्र्यात पिचणे.
७. राजदरबारात कपटी मनुष्य असणे.

ही भर्तृहरिच्या मनातली सात शल्ये आहेत. 'शृंगारशतक, नीतिशतक आणि वैराग्यशतक' असे तीन ग्रंथ आहेत, त्यातील नीतिशतकातला हा श्लोक आहे.

यशोधरा's picture

22 Apr 2017 - 7:26 pm | यशोधरा

वा, मस्त धागा! वाचते आहे.

राही's picture

23 Apr 2017 - 9:25 pm | राही

१)यस्य षष्ठीचतुर्थी च विहस्य च विहाय च
अहं कथं द्वितीया स्याद् द्वितीया स्याम् अहं कथम्.
२)द्वन्द्वो द्विगुरपि चाहम् मद्गेहे नित्यमव्ययीभावः
तत्पुरुष कर्मधारय येनाहं स्याद् बहुव्रीहि:

राही's picture

23 Apr 2017 - 10:04 pm | राही

वरच्या दुसर्‍या श्लोकात 'येनाहं स्याद् बहुव्रीहि:' असे टंकले गेलेय. त्या ऐवजी 'येनाहं स्याम् बहुव्रीहि:' असे पाहिजे.

शरद's picture

25 Apr 2017 - 12:20 pm | शरद

(१) पहिला श्लोक सर्वांना माहित असलेल्या "रामरक्षे"तील आहे. रामो राजमणी या श्लोकात प्रथमे पासून संबोधनापर्यंत सर्व विभक्त्या येतात.
(२) दुसरा श्लोक आहे

सा रम्या नगरी महान्स नृपति:सामंतचक्रं च तत्
पार्श्चे सा च विदग्धराजपरिषत् ताश्चंद्रबिम्बानना: !
उद्वृत्त: स च राजपुत्रनिवहस्ते बन्दिनस्ता: कथा:
सर्वं यस्य वशादगात्स्मृतिपथं कालाय तस्मै नम: !!
भर्तृहरी, वैराग्यशतक

ती रम्या नगरी, महानृपही तो, सामंत ते भोवतीं
विद्वद्राजसभा समीप तिथ ती-चंद्रानना त्या किती !
तो उच्छृंखल राजपुत्रगण, ते बंदी, कथा त्या, अहा
केले हें स्म्रुतिशेष सर्वचि जयें-काला नमस्कार हा !!
कै. ल.गो.विंझे
भर्तृहरी जरी उज्जैनीला उद्देशून लिहत असला तरी कालाय तस्मै नम: हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मग कोणी "गेले ते दिन गेले" म्हणतो तर कोणी ’कागदकी कश्ती, वो बारिशका पानी "

श्री. एस व श्री. राही यांना त्यांनी दिलेल्या श्लोकांचा अर्थ द्यावयाची विनंती केली आहे.
गड्यांनो, ही कोडी वगैरे काही खरे नाही. एखाद्या वेळी आपल्याला आवडलेली सुभाषिते द्यावीत हेच बरे !
शरद

राही's picture

25 Apr 2017 - 7:31 pm | राही

पहिल्या श्लोकाची पार्श्वभूमी अशी की एक विदुषी मुलगी तिच्या संभाव्य वराची परीक्षा घेते. या मुलाचे संस्कृत व्याकरण 'राम' शब्दापलीकडे गेलेले नसते. म्हणजे अगदी प्राथमिक असते. ही मुलगी त्याला 'विहस्य' आणि 'विहाय' तसेच 'अहम्' आणि 'कथम्' या शब्दांचे व्याकरण विचारते. मुलाला फक्त 'राम' शब्दाचे विभक्तिप्रत्यय माहीत असतात. त्यावरून तो 'विहस्य'ची षष्ठी आणि 'विहाय'ची चतुर्थी विभक्ती सांगतो. वास्तविक हे दोन्ही शब्द 'त्वान्त ल्यबन्त' अव्यये आहेत. त्यांना कोणतेच प्रत्यय लागत नाहीत. तसेच अहम् हे 'अस्मद' या सर्वनामाचे प्रथमेचे रूप आहे आणि 'कथम्' हे अव्यय आहे. ती हसू लागते आणि म्हणते की विहस्य आणि विहाय ही जिथे षष्ठी-चतुर्थी आणि अहम् कथम्' द्वितीया असेल तर याची द्वितीया (म्हणजे पत्नी) मी कशी काय होईन?

दुसऱ्या श्लोकात द्वंद्व, द्विगु, अव्ययीभाव, तत्पुरुष, कर्मधारय ही समासांची नावे गुंफली आहेत. एक याचक राजाला सांगतो, "(हे राजा,) आम्ही दोघेच आहोत, मजजवळ दोन गायीही आहेत पण माझ्या घरात खर्चच होत नाही, म्हणजे पैसा नसल्याने मी व्ययच करू शकत नाही. म्हणून हे पुरुषा, असे काहीतरी कर्म कर ज्यामुळे मी बहुधान्य(तांदूळ)संपन्न होईन.

वास्तविक हे दोन्ही शब्द 'त्वान्त ल्यबन्त' अव्यये आहेत.

विहस्य आणि विहाय ल्यबन्त होतील. गत्वा, कृत्वा ही त्वान्त असं संस्कृतमध्ये शिकलेलं पुसट आठवतंय.

राही's picture

27 Apr 2017 - 11:47 pm | राही

त्वान्त ल्यबन्त या दोहोंचा मिळून व्याकरणात एकच गट असतो. धातु जर सुटा म्हणजे उपसर्गाविना असेल तर त्याला 'त्वा' हा प्रत्यय लागून अव्यय बनते आणि धातुला उपसर्ग असेल तर 'य' प्रत्यय लागून. व्याकरणदृष्ट्या दोन्ही जेरंडच. ' हस्'चे हसित्वा होईल पण वि + हस् चे विहस्य होईल. .गम् गत्वा पण प्र+ नम् चे प्रणम्य. सृष्ट्वा-उत्सृज्य वगैरे.
म्हणून त्वान्त-ल्यबन्त असा एकत्रच उल्लेख होतो.

अधिक माहीतीसाठी धन्यवाद. जमलं तर एक लेख लिहा ना यावर!!

पिशी अबोली's picture

27 Apr 2017 - 4:31 pm | पिशी अबोली

धागा आवडला.

इथे सुभाषितांच्या भेंड्या खेळू शकतो. किंवा, शब्दांच्या भेंड्या. म्हणजे एखाद्या सुभाषितात आलेला एखादा शब्द घ्यायचा, आणि तो शब्द असणारं दुसरं सुभाषित द्यायचं. बघा पटतंय तर, उजळणी होईल त्यानिमित्त सुभाषितांची.

सूड's picture

25 Apr 2017 - 5:36 pm | सूड

मस्त, वाचतोय.

सपे-पुणे-३०'s picture

27 Apr 2017 - 10:48 am | सपे-पुणे-३०

चतुरधिकं शतमष्टगुणं द्वाषष्टिस्तथा सहस्त्राणां |
अयुतद्वयविष्कम्भस्यासन्नो वृत्तपरिणाहः ||

१०० मध्ये ४ मिळवा, ८ ने गुणा आणि आलेला आकडा ६२००० मध्ये मिळवा. अशा प्रकारे आलेलं उत्तर हे साधारण पणे २०० व्यास असलेल्या वर्तुळाचा परीघ असेल.
(१०० + ४) * ८= ८३२ + ६२००० = ६२८३२.
π = परिघ ÷ व्यास = ६२८३२ ÷ २०००० = ३.१४१६

हा आर्यभट्टाने पाय (pi) ची किंमत काढण्यासाठी सांगितलेला श्लोक.

रुपी's picture

29 Apr 2017 - 2:10 am | रुपी

अरे वा.. छान.

अशा प्रकारे आलेलं उत्तर हे साधारण पणे २०० व्यास असलेल्या वर्तुळाचा परीघ असेल. >> इथे २०००० असायला हवं का?

सपे-पुणे-३०'s picture

29 Apr 2017 - 12:35 pm | सपे-पुणे-३०

हो बरोबर. २०००० च हवं. टाईपताना चूक झाली.
बरं झालं गं सांगितलंस ते.

यशोधरा's picture

28 Apr 2017 - 7:22 am | यशोधरा

यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मिश्रितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

या किंवा त्या कुठल्यातरी झाडाच मूळ (घेऊन) त्यात हे नाहीतर ते मिसळलं (आणि औषध म्हणून) कुणाला पण दिलं, (तर काय होणार? आजारी) असा (बरा) किंवा तसा (अजून खराब) होईल. (योग्य निदान; योग्य औषध; त्याची प्रकृती पाहून उपाय योजना केली तर फायद्याची होते. कुठल्याही परिस्थितीत विचारपूर्वक उपाययोजना हवी.)

इथे अजून सुभाषिते आहेत.

रमेश आठवले's picture

10 May 2017 - 10:53 pm | रमेश आठवले

हाताच्या पाच बोटाना संस्कृत मधे अंगुष्ठ , तर्जनी , मथ्यमा , अनामिका व करांगुली म्हणतात. यापैकी आपण अंगठी घालतो त्या बोटाला अनामिका असे का सम्बोधितात याचे एक हृद्य कारण या ओळींमधून सांगितले आहे--
पुरा कविनाम गणना प्रसंगे
कनिष्टीका धिष्टीत कालिदास:
अद्यापि तत्तुल्य कवे: अभवत
अनामिका सार्थवती बभूव
पूर्वी कवींची गणना सुरु करताना करंगळीवर कालिदासाचे नाव घेतल्यावर, नन्तर येणाऱ्या अंगठीच्या बोटावर नाव घेण्या साठी कालिदासाच्या तोडीचा दुसरा कवीच आठवला नाही . ह्यामूळे त्या बोटाचे नाव अनामिका झाले.

रमेश आठवले's picture

11 May 2017 - 2:55 am | रमेश आठवले

वैद्यराज नमस्तुभ्यं यमराज सहोदरः।
यमस्तु हरति प्राणान् वैद्यः प्राणान् धनानि च ।।
हे वैद्यराजा ! यमराजाचा बंधू अशा तुला नमस्कार. यम फक्त प्राणहरण करतो,
तू तर आधी धन आणि नन्तर प्राण घेतो.

काही सुभाषिते मिळाली. तुमची परवानगी ग्राह्य धरुन इथे लिहून ठेवते -

अल्पाक्षरमसन्दिग्धं सारवद्विश्वतोमुखम्।
अस्तोभमनवद्यं च सूत्रं सूत्रविदो विदुः॥

कमीत कमी अक्षरात लिहिलेले, अर्थ अगदी स्पष्ट असणारे, [कुठला तरी] मुद्दा मांडणारे, सर्व उदाहरणात वापरता येते असे निर्दोष [वाक्य] म्हणजे सूत्र असे ज्ञानी लोक म्हणतात.

यथा बीजांकुरः सूक्ष्मः प्रयत्नेनाभिरक्षितः।
फलप्रदो भवेत् काले तद्वल्लोकः सुरक्षितः।

जसे सूक्ष्म अशा बीजांकुराचे प्रयत्नपूर्वक रक्षण केले असता कालांतराने ते वृक्षरूप होऊन फळे देऊ लागते. तसेच प्रजेला सुरक्षित ठेवले असता (राजाला) तिच्यापासून वैभवप्राप्त होते.

परदुःखं समाकर्ण्य स्वभावसरलो जनः।
उपकारासमर्थत्वात् प्राप्नोति हृदये व्यथाम्॥

दुसऱ्यावरचे दुःखद प्रसंग ऐकल्यावर उपकार करण्यास असमर्थ असल्यामुळे थोर माणसाला मनात तळमळ लागून राहते.

काव्य शास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम्।
व्यसनेनच मूर्खाणाम् निद्रया कलहेन वा।।

हुशार माणसे त्यांचा वेळ काव्य, शास्त्र, विनोद याच्या परिशीलनात/अभ्यासात घालवतात आणि मूर्ख माणसे व्यसनात, झोपा काढून व भांडणं यात घालवतात.

अद्भि गात्राणि शुद्ध्यंति मनः सत्येन शुध्दयति।
विद्यातपोभ्यां भूतात्मा बुद्धिर्ज्ञानेन शुध्दयति॥

शरिराची शुद्धी पाण्याने होते. मनाची शुद्धी सत्याने होते. आत्म्याची शुद्धी तप आणि विद्येमुळे होते तर बुद्धी ज्ञानामुळे शुद्ध होते.

सिरुसेरि's picture

3 Aug 2017 - 2:29 pm | सिरुसेरि

ते संबोधन "अगा उज्जैनी " आहे का "हाय गे उज्जैनी " आहे ? -- < संदर्भ - डॉ. सतीश - तुझे आहे तुजपाशी >

ते संबोधन "अगा उज्जैनी " आहे का "हाय गे उज्जैनी " आहे ? -- संदर्भ - डॉ. सतीश --- तुझे आहे तुजपाशी .

गामा पैलवान's picture

3 Aug 2017 - 8:49 pm | गामा पैलवान

यशोधरा,

वरच्या श्लोकांत मूर्खाणाम् च्या जागी मूर्खानाम् हवं ना?

आ.न.,
-गा.पै.

एक आवडते सुभाषित :
अतिपरिचयात अवज्ञा
संततगमनात अनादरो भवति
मलये भिल्ल पुरंध्री
चंदनतरुकाष्ठं इंधनं कुरुते.

( ज्याप्रमाणे मलय पर्वतावरील भिल्ल चंदनाचा सरपण म्हणून वापर करते, तसेच आपल्याला कोणाशी अतिपरिचय झाल्यावर वा सतत त्याच्याकडे जात राहिल्यास अवमान सहन करावा लागतो).

...... 'अतिपरिचयात अवज्ञा ' चा अनुभव सर्वत्रच येतो. जसे की - आपला शेजारी, नोकरीतील सहकारी, नातेवाईक आणि संस्थलांवर दीर्घकाळ वावरणारे आपण सगळे सुद्धा !

नावातकायआहे's picture

6 Aug 2017 - 6:42 am | नावातकायआहे

+१

शरद's picture

6 Aug 2017 - 6:18 am | शरद

याचा दुसरा पर्याय आहे
कूपे प्रयागवासी नित्यं स्नानं समाचरति !!
सर्व भारतातून लोक संगमात स्नान करावयाला प्रयाग क्षेत्रात येतात. पण प्रयागमध्येच रहाणार्‍या माणसाला त्याचे काय कौतुक ? तो आपली नेहमीची अंघोळ घराशेजारच्या विहीरीतच करतो.

कुमार१'s picture

6 Aug 2017 - 2:46 pm | कुमार१

स्वदेशेषु धनम विद्या । विदेशेषु धनम मति ।
परलोके धनं धर्मा । शीलम सर्वत्र वै धनं ।।

कुमार१'s picture

6 Aug 2017 - 7:06 pm | कुमार१

भावार्थ:
आपल्या शिक्षणा चे मोल हे स्वदेशात. परदेशात शिक्षणा पेक्षा बुद्धीचा वापर अधीक करावा लागतो. परलोकात आचरण महत्त्वाचे. तर, चारित्र्य हा सर्वत्रच गुण धरला जातो