मी बाई होते म्हणुनी . . भाग - १४ - http://www.misalpav.com/node/39099
..
‘लक्ष्मणाचा विवाह उर्मिलेशी, शत्रुघ्नाचा श्रुतकिर्तीशी आणि भरताचा मांडवीबरोबर होणं योग्य आहे असे मला वाटते.’ राजा दशरथांचा आवाज त्या ठिकाणी भरून राहिला आहे असा भास झाला. ‘ या मागची कारणमीमांसा मला देता येईल असं नाही, आणि ते अशक्य हि नाही, परंतु स्वयंवराच्या दिवसापासून ते आज इथं झालेल्या बोलण्यापर्यंत जे माझे आणि माझा ज्येष्ठ पुत्र रामाचे निरिक्षण आहे त्यावरून मी हे मत मांडले,’
या काही घटका फार चटकन निघून गेल्या असं वाटले, आजूबाजूचा आसमंत त्या क्षणात घुसमटलेला आहे असं वाटत होते, माझ्या नकळत माझे शब्द कोणीतरी बोलत होते, मी काकांकडे पाहिले, त्यांना हा प्रस्ताव पटलेला दिसत होता. मग श्रुताकीर्ती आणि मांडवी कडे पाहिले, त्यांच्या डोळ्यात देखील आश्चर्याची मुद्रा होती पण नकार किंवा नापसंती नाक्किच नव्हती. या भावना कल्लोळातून बाहेर आल्यावर तिथे असलेले सारेच एखाद्या छोटाश्या चक्रवातातून बाहेर यावेत असे दिसले.
हो, नाही, कोण का आणि असेच का, असे सगळे प्रश्न त्या एका क्षणात संपून गेले, राजा दशरथांनी जरी नुसते त्यांचे मत मांडलं होते तरी त्या मताचा काही भाग हा आज्ञा देखील होता. म्हणजे आम्हां तिघींना नसला तरी त्यांच्या तिन्ही मुलांकरिता तसे असावे असे कुठेतरी ध्वनित होत होते.
पण तिथला तणाव मात्र पूर्ण निवळला, ‘ तुम्हां तिघीच्या होकाराची घोषणा तुम्ही वेगवेगळया करणार कि मी एकत्रच हि मान्यता दशरथ महाराजांना कळवू.‘ काकांचे बोलणे ऐकून मला या सगळ्या दिवसात पहिल्यांदाच लज्जा हि देखील एक भावना आहे आणि तिच्यावर तुमचे पूर्ण नियंत्रण असतेच असे नाही, हे लक्षात आले. मानवांच्या अगदी नैसर्गिक भावनांपैकी ती एक आहे याची जाणीव झाली. एवढा वेळ खड्गाच्या मुठीवर ठेवलेला हात अलगद दुसर्या हातातल्या कड्यांना फिरवू लागला.
‘ राजा दशरथ, मी राजा जनक माझ्या कुलकन्या उर्मिला, श्रुत्कीर्ती आणि मांडवी च्या वतीने आपण मांडलेल्या या विवाह प्रस्तावाला मान्यता देतो. आज सायंकाळी राजवाड्यात आपले व आमचे कुलगुरू एकत्र विचार करून या चारही विवाह संपन्न होण्यासाठी योग्य तो दिवस आणि वेळ ठरवतील. तशी सुचना आपण आपल्या कुलगरूना द्यावी. आणि आता इथे जी भोजन सिद्धता केलेली आहे त्याचा आपण सर्वांनी उपभोग घ्यावा. ‘
त्या कुतीटून बाहेर येताच राजा दशरथांनी त्यांच्या सचीवापैकी एकाला बोलावून, हि वार्ता अयोध्येला कळवण्यासाठी दूताची योजना केली, आमच्या महिशिद्लाच्या दोन सैनिकांना काकांनी नगराकडे पाठवले. आम्ही भोजनकक्षाकडे जात असताना, ‘ या वनात आणि व्रुक्षांवर जे सैनिक सकाळपासून अवघडून उभे केलेले आहेत, त्यांना मोकळीक दिली तर योग्य होईल ना आता.’ भरताने विचारले.
‘ ते सैनिक उर्मिलेच्या अधिकारात आहेत, आजच्या विहाराची संरक्षण व भोजन व्यवस्था हि उर्मिलेने केलेली आहे.’ सीतेनं रामाकडे पाहात सांगितले. प्रथमच मी लक्ष्मणाकडे आणि त्याने माझ्याकडे एकदम पाहिले. तो कौतुकाने पाहात होता तर मी गर्वाने. भोजन कक्षात पुरूषांसाठी आणि स्त्रियांसाठी वेगळे कक्ष केलेले होते. ह्या मागे कारण हे होते कि, दोघांना दिले जाणारे पदार्थ हे वेगवेगळे होते. पुरुषांसाठी मोठ्या व माद्यांचे मांस शिजवलेले होते तर आमच्या साठी छोट्या आणि नर प्राण्यांचे मांस होते.
सर्व सोपस्कार पूर्ण होई पर्यंत आई, बाबा व काकू आल्या, आम्हांला सर्वांना आलिंगन देताना तिघांचे डोळे अश्रुंनी भरून आले होते. ‘ उर्मिले, स्वयंवराच्या दिवशीच मला लक्ष्मण हा तुझ्या साठी योग्य वर आहे असे वाटले होते, पण पुढे ह्या घटना अशा प्रकारे उलगडतील अशी अपेक्षा देखील मी ठेवली नव्हती.’ भावनांच्या भारातून बाहेर येत काकूने सुरुवात केली, ‘ त्या दिवशी तुझे सगळे लक्ष सीतेकडे होते, मात्र तो तुझ्याकडे पाहात होता, माझे लक्ष होते., यथावकाश जेवणं झाली आणि आम्ही सर्वजण परत निघालो, यावेळी मात्र आम्ही सगळ्या स्त्रिया एका बंद रथातून परत आलो, बाबा आणि काका एकत्र होते. दशरथ महाराज आणि सगळे कधी कुठे गेले ते आम्हाला कळाले नाही.
वाड्यावर आल्यावर मी लगेच आईच्या खोलीत आले आणि तिथल्या एका मोठ्या आसनावर पाय पसरून बसले, मला हि जागा खूप आवडायची, इथून आमच्या वाड्यातला एक मोठा जलकुंभ दिसायचा. त्यावर दिवसभर खूप पक्षि येत असत, खूप वेळ मी तिथे बसून होते, आई आणि मांडवी आता आल्यावर माझी तंद्री भंग झाली. मी परत आईच्या मिठीत गेले, दुपारी भेटले ती एक राणी होती आता होती ती आई. तिनं मला बाजूला केलं आणि विचारले ‘ उर्मिले, तुझ्या मनात देखील लक्ष्मण भरला होत ना ?, मी काहीच उत्तर दिले नाही. समोरच्या गवाक्षात जाऊन उभी राहिले. त्या जलकुंभावर एकच नीळा पक्षि आलेला होत, एकटाच आणि मला वाटले कि तो माझ्याकडेच पाहतो आहे.
‘ सीतेचा निर्णय त्या धनुष्याला बांधलेला होता, तुमचा नाही, सूर्यास्ताला फार वेळ उरला नसेल आता, दोन्ही कडचे कुलगुरू येऊन चर्चा सुरु करण्यापूर्वी तुम्हाला काही सांगायचे आहे का, ? आईचा आवाज फार विश्वासपूर्ण नव्हता . ‘ नाही, मला तरी काही बोलायचे नाही, जे झाले आणि जे होईल ते योग्यच होईल. जर या मध्ये काही अयोग्य असते तर बाबा आणि काकांनी आधीच हा प्रस्ताव नाकारला असता ‘ मांडवी म्हणाली. ‘ हो मला देखील असेच वाटते आहे आई.’ मी त्याला अनुमोदन दिले. मग थोडा वेळ मी आणि मांडवी आईच्या बाजूला बसून होतो, बोलत कुणीच नव्हते.
हि शांतता मोडली, ‘ महाराजांनी सभेत बोलावले आहे सर्वांना ‘ या दासीच्या निरोपाने. आम्ही सभेत गेलो, तिथं काका, काकू, बाबा सीता आणि काही ज्येष्ठ मंत्री होते. काही क्षणात श्रुत्कीर्ती देखील आली. ‘आपणां सगळ्यांना गेल्या काही दिवसातल्या घडामोडी माहित आह्तेच. त्यानुसार आज मिथीला आणि अयोध्या या दोन मोठ्या जनपदांचा संबंध राज्याकाराणापेक्षा पुढे जाऊन पारिवारिक व्यवस्थेने देखील जोडला जाणार आहे. आपल्या कुटुंबाने आणि मंत्रीपरिषद या दोन्ही महत्वाच्या बाजूंनी या संबंधांना मान्यता दिली आहे हे मी पुन्हा एकदा अतिशय आनंदाने सांगतो.’ काका त्यांच्या आसनावर बसून बोलत होते. ‘ आज सूर्यास्त समयाला अयोध्येचे कुलगुरू आणि आपले कुलपती यांची या विवाहाच्या धार्मिक बाबींबद्दल चर्चा होणार आहे....
क्रमशः..
प्रतिक्रिया
29 Mar 2017 - 6:50 pm | यशोधरा
सुरेख. वाचते आहे.
एक शंका - मांसाची अशी विभागणी का? त्याचे काही कारण आहे का?
29 Mar 2017 - 7:25 pm | सूड
वाचतोय.