मालकीण

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
22 Feb 2017 - 1:12 am

aaa

तोंडावरचा पदर हलला तसे सोनीचे डोळे उघडले. अंगावर आवघा जयवंत्या ओणवलेला. दोन केसाळ मजबूत हातं सोनीच्या खांद्यावर रोवलेले. जेसीबीने आर्म रोवून स्वतःला उचलावे तसा झुकलेला जयवंत जरा वर उठला.
"फुकने, दोन दिवसात पैशाची सोय बघाया सांग हांडग्याला. डीलर मागं लागलाय. डिलीव्हरी देतो म्हंतय लगीच"
"आरं करनार तरी कसं, तुझी भूक मोठी, येवढं न्हाय झेपाया त्यांस्नी."
"त्याला झेपाया न्हाई म्हनून तर खाली हैस न्हवं माझ्या. आता तूच बघ ते"
"आरं हजारपाचशाची बातंय व्हय, घरातबी नसतेत येवढं"
"सोने, आखरीचं सांगतो, चोरी कर, डाका घाल पन मला पाच लाख दे"
"उठंय उंडग्या, काय ते नंतर बघू. आता जे घ्यायला आला हाईस ते घेऊन जा"
.............................
सोळा सतराची सोनी म्हनलं तर आंगांग फुलल्याली झेंडूच जणू. पिवळ्याजर्द साडीत आगदी कात टाकलेल्या नागिनीगत चमकायची. सोताच्याच मस्तीत वळायची. खुडक बापाच्या खोकल्यानं बेजार झोपडी सोनी आसली की नागपंचमीच्या वारुळागत नटायची. जानारायेनारा वळूवळू बघायचा पन सोनी सोताच्याच नादात. चारचौघीगत कधी दिसली न्हाई की वागली न्हाई. सकाळी ट्यांकराच्या गर्दीत कधी उभारली न्हाई. रणरणत्या उन्हात हापशाला चार घागरी भरुन आणाया सोनी हमेशा तैय्यार. तंबाखू मळत बसलेल्या चार उंडग्याच्या नजरा सोनीच्या कमरेसंगं हेलकावं खायाच्या. कळशीतल्या पान्यासंगं डुचमळायच्या.
.
हापसा पार झोपडपट्टीच्या कोपर्‍याला. नाईकाच्या बंगल्याबाजूला. सोनी हापसायली की निबार कॉन्ट्रॅक्टर शिरपत नाईक ग्यालरीत मोबाईल घेऊन उभा राह्यला लागला. सोनीच्याबी दोन च्या जागी चार फेर्‍या हुवू लागल्या. तलखी वाढली न हापसा जड चालला. घामानं भरल्याली कपाळपट्टी दोनदा पुसताच नाईकानं इशारा केला. पदर ओढून सोनी आत घुसली आन बंगल्यातली मोटर चालू झाली. पाण्याचा रतीब वाढला तसा सोनीचा बाप पेटला. कोडग्या सोनीला हानून उपेग नव्हता. नाईकाकडं गेला आन हजाराच्या नोटांनी तोंड लिंपून आला. दारात एक जेसीबी, चार ट्राक्टर न कार्पिओ उभं करणार्‍या नाईकाला एक सोनी जड नव्हती. नाईकाची बाईल लग्नाच्या टाइमाला घरात गेलेली. आता तिरडीवरच दिसणार हे सार्‍या गावाला माहीती. बिनालेकराची लक्ष्मी कशी दिसती घरच्या नोकर ड्रायव्हरांना माहीत न्हाई ते सोनीला बी कधी दिसलं न्हाई.
.
झोपडीतल्या सोनीची रवानगी नीट्ट गावाभईर प्लॉटवर झाली. कधीतर चार खोल्या बांधलेल्या होत्या नाईकानं त्या सोनीच्या संसाराला साक्ष राह्यल्या. सालं गुजरली तसा हप्त्याचे चार दिवस येणारा नाईक एक दिवसावर येऊ लागला. बंगल्याची कूस रिकामी तशी प्लॉटची पण रिकामीच राह्यली. नाईकाचं येणं कमी झालं पण बंगल्याची गाडी रोज प्लॉटवर थांबायली. नाईकाचा ड्रायव्हर जयवंता चार वर्षं प्लॉटच्या खोलीबाहेर तंबाखू मळत राह्यायचा. नाईकानं दिलेला पैसा इमानदारीनं सोनीचं जोडवं बघत तिच्या हातावर टाकायचा. नाईकाच्या फेर्‍या कमी झाल्या अन जयवंताची नजर हळूहळू वर चढू लागली. दारात उभं राहून पैसे देता देता एक दिवस खोलीतल्या दिवानावर टेकला. आडदांड जयवंताला चार वर्षं खोलीत यायला लागली. त्यानंतर दोनच दिवसात तो आत आला की खोलीचं दार बंद व्ह्यायला लागलं.
................................................
मालकाची कॉर्पिओ चलवतानाचा जयवंत्या जेसीबी चलवताना मात्र बदलायचा. त्या अवजड राक्शसाला लीलया हालवायचा. दोन हायड्रालिक सपोर्ट जिमीनीवर रोवलं की शीट आलाद फिरायचं. दोन दंडक्यावर तो आर्म सोताच्या हातागत फिरायचा. रश्यात बुडवलेला भाकरचा घास उचलावा इतक्या आल्लाद बकेटीनं जिमीनीला उचलायचा. चारच बकेटात ट्रायली भरताना जयवंताला जणू भीम झाल्यागत वाटायचं. धंदा करायचा तर जेसीबीचाच हे डोस्क्यात बसलेलं. नाईक काय शेपरेट जेसीबीला उचल देनार न्हाई. हातची नोकरी गेलीतर सोन्याची खान सोनी दारात बी उभं करणार न्हाई. डिलर ५ लाखाच्या डीपीला तयार होता. एकडाव जेसीबी दारात उभारला की पैशाला तोटा न्हवता. डोळ्यास्मोर सारखं दुपारच्याला जेसीबीच्या बकेटीच्या सावलीत बसलोय आन पिवळ्या साडीतली सोनी भाकर घेऊन येतीय असंच दिसायलं.
................................................
जयवंतानं सोनीसंगं घर चाचपलं. तीसचाळीस तोळं अन तेवढेच हजार. घर तर न्हाई नावावर. नाईकाच्या केसातला अन ढगातला काळेपणा सरला. बिनालेकरानं खचलेला नाईक आता पुन्हा बरसात करनार न्हवता. त्याच्या पावसानं न उजवलेली जमीन उकरायची म्हणजे सोपं काम न्हवतं. अशात हातरुणावर खिळलेल्या नाईकाला बघायला सोनी धडकली बंगल्यावर. काय पट्टी फिरली की दोन दिवसात नाईक हसाया खेळाया लागला. प्लॉटवर कॉर्पिओची हप्त्याची नियमीत डबल फेरी सुरु झाली अन सोनीच्या गालावरली खळ भरायली. दाराभाईर कॉर्पिओत बसून मिनट मिनट मोजणारा जयवंत्या नजरंसमोर जेसीबी नाचवायचा. कल्पनेतच नाईकाला पार सपाट करुन टाकायचा लेव्हलिंगगत. जेसीबीच्या केबिनात सोनीसंगं खिदळायचा.
.................................................
स्वप्नागत दिवस सरलं आन सोनीची कूस उजवली. नाईकाच्या पैशानं तालुक्याला थाटात डिलीव्हरी झाली. कॉर्पिओतून परत येताना जयवंत्याला मधल्या शीटावर बसलेल्या सोनीच्या पदरामागचा बारका जीव देवदूतागत भासत व्हता. ह्याचं नाव जीसीबीवर रेडीयमनं करायचंच पण कवा करायचं तेवढं सुचत नव्हतं. हेंदकाळत्या गाडीसंगं जयवंत्या गुंगला की मागनं आवाज आला.
"जयवंत्या गाडी नीट बंगल्याकडं घे"
"आगं सोने, प्लॉटवर जायाचं नं, यील की म्हतारं आह्यार घेऊन. आपल्या दोघांच्या......न्हवं न्हवं तिघांच्या जेसीबीसाठी."
"गपंय उंडग्या, हाय त्यो जेशीबी बी उद्याच इकायला न्हाई लावला तर बघ. मालकाला मालक म्हनायचं आन मालकीनीला मालकीन. समाजलं का? धाकटं नाईक झोपलेत. हळू चलीव जरा"
...............................................

कथा

प्रतिक्रिया

सचु कुळकर्णी's picture

22 Feb 2017 - 1:24 am | सचु कुळकर्णी

धाकटं नाईक झोपलेत. हळू चलीव जरा

खास अभ्या टच. मस्त जम्या.

पद्मावति's picture

22 Feb 2017 - 1:44 am | पद्मावति

क्लास!!!

रेवती's picture

22 Feb 2017 - 3:31 am | रेवती

कथा आवडली.

आवडली , छान च आहे. आणि ओघवती !

प्रचेतस's picture

22 Feb 2017 - 6:52 am | प्रचेतस

जबरी कथा.
भाषेचा लहेजा उत्तम जमलाय.

मनुष्यस्वभावाचं अचूक निरीक्षण ही नेहमीच तुझ्या कथांमधली ताकद राहिलीय.

खेडूत's picture

22 Feb 2017 - 11:42 am | खेडूत

भारीच..
नेहेमीप्रमाणेच आवडली!

सस्नेह's picture

22 Feb 2017 - 12:23 pm | सस्नेह

खास अभ्या टच !

पैसा's picture

22 Feb 2017 - 8:40 am | पैसा

कथा आवडली

अभिजीत अवलिया's picture

22 Feb 2017 - 9:11 am | अभिजीत अवलिया

जमलीय

इरसाल कार्टं's picture

22 Feb 2017 - 10:09 am | इरसाल कार्टं

थोडक्यात यावरूनही किती छान लिहिलात.
खूपच छान!

शब्दबम्बाळ's picture

22 Feb 2017 - 10:23 am | शब्दबम्बाळ

जबरी! :)

एकनाथ जाधव's picture

22 Feb 2017 - 11:35 am | एकनाथ जाधव

छान कथा मालक.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Feb 2017 - 11:43 am | अत्रुप्त आत्मा

अब्याडब्या इज व्ह्येरीव्ह्येरी जबददस्त कथा रायटर!

किसन शिंदे's picture

22 Feb 2017 - 12:02 pm | किसन शिंदे

खास अभ्या टच. कथा आवडलीच.

संजय पाटिल's picture

22 Feb 2017 - 12:15 pm | संजय पाटिल

छान... कथा आवडली...

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Feb 2017 - 12:30 pm | कैलासवासी सोन्याबापु

अभ्या लेका लैच अरभाट लिहितोस रे, हा टच तुझा कॉपीराईट आहे. जियो भाई जियो

शलभ's picture

22 Feb 2017 - 2:37 pm | शलभ

छान लिहिलीय..आवडली..

आदिजोशी's picture

22 Feb 2017 - 3:24 pm | आदिजोशी

मस्त लिहिलंय मालक. क्रमशः टाका आणि हाणा कथा पुढे :)

मेघना भुस्कुटे's picture

22 Feb 2017 - 4:04 pm | मेघना भुस्कुटे

कशाकशाचं कौतुक करावं! अल्पाक्षरत्व, भाषेचा लहेजा, व्यक्तिचित्रण, जोरकस फटकार्‍यांसारखी लहान वाक्यांमध्ये नेमकी चित्रं रेखाटायचं कौशल्य आणि क्रूर-अलिप्त लेखकी बेअरिंग. सगळंच सुरेख.

संदीप डांगे's picture

22 Feb 2017 - 4:09 pm | संदीप डांगे

सारे शहर का कालवा एकतरफ.. हमारे अभ्या का जलवा एकतरफ..

तू मिपावरचा नागराज मंजुळे हाइस लगा...! _/\_

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Feb 2017 - 7:02 pm | कैलासवासी सोन्याबापु


तू मिपावरचा नागराज मंजुळे हाइस लगा...! _/\_

एक नंबर हो गाववाले, इस्को बोलते उपमा! नाही नाही ह्याले म्हणतेत मधूची मिसळ! तर्री मार के

+१०००००

संदीप डांगे's picture

22 Feb 2017 - 7:15 pm | संदीप डांगे

ये उपमा उसको ऐसिच नै दी बावा... कथा मांडतांना अलिप्त राहायचे, कुठेही लेखकाला काय सांगायचे आहे, कोठे बोट दाखवायचे आहे, कोणती गोष्ट ठसठषीत करायची, सौम्य करायची असले कारनामे न करणे, भावनांचा शब्दबंबाळ खेळ नाही मांडायचा.. एक पांढरा कॅनव्हास असणे, जीवनाचे रंग त्यावर आपोआप उमटत जातात, कॅनव्हासची भूमिका ते रंग जसेच्या तसे दाखवायची.. त्यात स्वत:चा कोणताही रंग न ढवळता... इत्ता आसां नही मियां ये सब करना... नागराज उधर फिल्लम में करता, ये बंदा इधर कलम में करता.. बयां करने के मुआमले में दोनों की सीरत एक जैसी लगी हमें...

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Feb 2017 - 7:20 pm | कैलासवासी सोन्याबापु

येस्स्स!!! अभ्या जिंदगी पाहून आहे तरी जे जसे पाहिले ते तसेच ठेवतो , अभ्या कुंचल्याचा आहे तसा कलमेचासुद्धा तुफान कलाकार आहे. :)

जव्हेरगंज's picture

22 Feb 2017 - 4:21 pm | जव्हेरगंज

गुड वन!

मस्त सूर लागला होता!!

चांदणे संदीप's picture

22 Feb 2017 - 6:13 pm | चांदणे संदीप

मालकीण आवडिलये... आपलं ते कथा.. कथा आवडलीये! ;)

Sandy

उगा काहितरीच's picture

22 Feb 2017 - 6:58 pm | उगा काहितरीच

जबरी कथा !

बबन ताम्बे's picture

22 Feb 2017 - 7:06 pm | बबन ताम्बे

छान लिहीलीय.

चष्मेबद्दूर's picture

22 Feb 2017 - 7:09 pm | चष्मेबद्दूर

लैच ब्येस हाय. म्हंजी लिवलंय भारी आक्षी डोल्या समोर हुबं ऱ्यायल.

Rahul D's picture

22 Feb 2017 - 8:12 pm | Rahul D

चाबुक... काय लिवलय. वाह...

अभ्या..'s picture

23 Feb 2017 - 1:17 am | अभ्या..

सर्व वाचक, प्रतिसादक अन मित्रांचे आभार मानतो.
@संदीपा अन बाप्यावः लै लहान माणूस हाय मी. तुमच्या दोस्तीनं लै मोठ्ठा झाल्यागत झालंय. तुमच्या संगटच राहू द्या.
पुनः धन्यवाद.
.
ता.क.: ह्याचा पुढील भाग असेल की नाही हे मला माहीत नाही. तूर्तास सॉरी. ;)

रात्री निवांत वाचण्यासाठी अभ्याची ही कथा ठेवली होती.

भरुन पावलो.

अंतु बर्वा's picture

23 Feb 2017 - 3:25 am | अंतु बर्वा

लईच भारी!! वाह, दुपार सत्कारणी लागली !!

ज्योति अळवणी's picture

25 Feb 2017 - 3:51 am | ज्योति अळवणी

मस्त जमली आहे कथा.

रातराणी's picture

25 Feb 2017 - 11:07 am | रातराणी

खतरनाक बे. रिस्पेक्ट _/\_
- (लेखणी म्यान करून ठेवलेली रारा)

उत्तम लिहिलेय. असेच लिहित जा आपल्या मिपावर.

पिशी अबोली's picture

27 Feb 2017 - 2:20 pm | पिशी अबोली

खट्याक!

एमी's picture

28 Feb 2017 - 3:07 pm | एमी

मस्त!

'हरीभाऊंचं कोडं'चा प्रिक्वेल आहे का हा ;-)
सुरज का सातवाँ घोडा आणि तो कोणता तो मराठी चित्रपट शापित आय गेस तो आठवला. झालंचतर साहेब बीवी और गँगस्टर.

सूड's picture

28 Feb 2017 - 6:35 pm | सूड

नेहमीप्रमाणेच झकास!!

पिलीयन रायडर's picture

4 Mar 2017 - 8:29 am | पिलीयन रायडर

अर्थातच आवडली!

अभ्या..'s picture

12 Apr 2017 - 12:24 pm | अभ्या..

मिपाकर दोस्तहो, सांगायला अत्यंत आनंद वाटतो की एका चांगल्या दिग्दर्शकाने ही कथा शॉर्ट फिल्म साठी घेतलिय. आता फिल्मलाइन म्हणाले की काय खरे काय खोटे कळत नाही. कधी करणारेत हेही माहित नाही. सध्या मि फक्त आपल्या कथेत काही तरि भारी वाटले लोकांना ह्याच आनंदात आहे.
कायम प्रोत्साहनासाठी धन्यवाद दोस्तानो.

प्रचेतस's picture

12 Apr 2017 - 12:54 pm | प्रचेतस

लै म्हण्जे लैच भारी.
अभिनंदन बे.

सोलापुरला आल्यावर जंगी पार्टी घेणेत येईओल ह्याची नोंद घेणेत यावी.

अभ्या भाऊ..मी पण तुयाच लायनीत हाय भौ..
आपल्या बी येक-दोन स्टोऱ्या वर पिच्चर बनोतो म्हने पिच्चरवाले..मले बी लय भारी वाटून राहिलं..
पण याईचा काही भरोसा न्हाय..

अभ्या..'s picture

12 Apr 2017 - 2:08 pm | अभ्या..

हावो ना राजेहो,
कायकरतेतकीकायकी.
मले तर भो ते सोनीच्या रोलसाठी कुनाला घेतेत तेचीच चिंता लागून राह्यली ना. ;)
.
तवर एकमेकास्नी कॉन्ग्राचुलेट करु म्हनं. कसं ?

कॉन्ग्राचुलेट तर तुले हायेच ना बे...

यशोधरा's picture

12 Apr 2017 - 5:00 pm | यशोधरा

तुमचेही अभिनंदन.

दोघांचेही अभिनंदन!

सूड's picture

12 Apr 2017 - 4:37 pm | सूड

भारीच की राव!!

हेमंत८२'s picture

12 Apr 2017 - 12:46 pm | हेमंत८२

एकदम छान..

सचु कुळकर्णी's picture

12 Apr 2017 - 1:38 pm | सचु कुळकर्णी

सोलापुरला आल्यावर जंगी पार्टी घेणेत येईओल ह्याची नोंद घेणेत यावी.

अभ्या च्या नावावर पहिले बी लय पार्टया जमा हाईत अन बाप्प्या कैलासा वरून परत पुण्याला आल्यावर सोलापुरास येवोन पार्टि वसुलण्यात येईल. ह्याची सुध्दा नोंद घेणेत यावी. ;))

या बे कवाबी. नुसते बोलबच्चन सारे.
आमच्याकडे अशा लै घेतलेल्या नोंदी पडल्यात. कोन येत नैकीकैनै. :(

प्रचेतस's picture

12 Apr 2017 - 2:21 pm | प्रचेतस

नक्की येणार बे ह्याखेपी.

प्रचेतस's picture

12 Apr 2017 - 2:22 pm | प्रचेतस

संगं आपली ग्यांग पण असंनच.

नि३सोलपुरकर's picture

12 Apr 2017 - 3:44 pm | नि३सोलपुरकर

अभ्या अभिनंदन रे मित्रा,
हे एकदम झाक झालं बघ .

तुषार काळभोर's picture

12 Apr 2017 - 3:59 pm | तुषार काळभोर

अभ्या हे एक असं व्यक्तिमत्व आहे इथलं की ज्याच्यासाठी मनापासून आनंद होतो.
कचकून हाबीनंदन बे!!

मितान's picture

12 Apr 2017 - 4:21 pm | मितान

वा !!!
अभिनंदन अभ्याभाऊ !
कथा खरंच सिनेमा म्हणून पहायला आवडेल !!

किसन शिंदे's picture

12 Apr 2017 - 4:41 pm | किसन शिंदे

अभिनंदन बे अभ्या.

यशोधरा's picture

12 Apr 2017 - 5:00 pm | यशोधरा

अभिनंदन!

या कथेवर प्रतिसाद द्यायचा र्‍हाऊन गेलेला! :(

('जेसीबी' शॉर्टफिल्म बघण्याच्या प्रतीक्षेत) रंगा

स्रुजा's picture

12 Apr 2017 - 9:23 pm | स्रुजा

वा वा, लगे रहो ! अभिनंदन...

शाली's picture

18 May 2018 - 2:46 pm | शाली

वा! वा! भन्नाट!
अजुन खुलवली असती कथा तरी चालले असते. मस्तच!

जेम्स वांड's picture

18 May 2018 - 3:49 pm | जेम्स वांड

ह्यो जाळ कसा निसटला म्हणतो मी नदरेतून!

देवा ह्ये बी गुण हाईत व्हय. एकदम मोकाट माळावर डूरकणारा जेसीबी डोळ्याम्होरं उभारला! खल्लास कथा. ठसकेबाज सोलापुरी लहेजा. लक्का आपलं लैच जमणार बघ अभ्या!

हा तर मास्टर पीस आहे मिपावरचा.
'ग्रामपंचायत लागली' लिहायला मला येथून प्रेरणा मिळाली होती.

कंजूस's picture

18 May 2018 - 4:50 pm | कंजूस

भारी

श्वेता२४'s picture

19 May 2018 - 1:51 pm | श्वेता२४

अजुन काय वर्णन करावं. फारच सराईतपणे व नैसर्गिकपणे तुम्ही कथेचा बाज सांभाळला आहे. मस्त कथा वाटली व शेवट अप्रतीम