पितृ पंधरवडा!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
3 Oct 2008 - 5:43 pm

"दहा जनपथ'च्या बाहेर पितृपक्ष बराच वेळ खेपा मारत होता. त्याला आत प्रवेश मिळत नव्हता. "भल्याची दुनिया राहिली नाही,' असंच त्याला वाटत होतं. पक्षनेतृत्वाविरुद्ध बंड करणाऱ्यांना इथे झटपट आणि बराच वेळ भेट मिळते आणि दस्तुरखुद्द राज्याच्या कारभाऱ्यांना भेटीसाठी दोन-तीन दिवस ताटकळावं लागतं, हे त्यानं ऐकलं होतं. मात्र, हल्ली ते दिवसही सरल्याचंही कुठूनतरी कानावर आलं होतं. त्यामुळं मोठ्या आशेनं तो मॅडमच्या भेटीसाठी आला होता.
वर्षानुवर्षं नाहक बदनामी झाल्यानं बिचारा आधीच जाम वैतागला होता. एकतर त्याच्या कारकिर्दीत काही शुभ घडत नसे आणि आणि यदाकदाचित काही अशुभ झालं, की त्याच्याच डोक्‍यावर खापर फुटत होतं. भाद्रपदात गणरायाचं चैतन्यमय वातावरण सरल्यानंतर आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठीचा हा पंधरवडा. पण त्यातल्या चांगल्या गोष्टींपेक्षा त्याच्या अशुभ असण्याचीच चर्चा जास्त.
बदलत्या काळाबरोबर वातावरण बदललं, काही परंपराही बदलल्या. पितृ पक्षाच्या वाट्याला पूर्वी येणारी अस्पृश्‍यताही थोडीशी निवळली. पूर्वी पितृपक्षात सोन्याला गिऱ्हाईक नसायचं. अलीकडच्या काही वर्षांत हे चित्रही पार उलटं झालं. पितृ पक्षात कमी भाव म्हणून सोन्याची खरेदी वाढली आणि परिणामी भावही गगनाला भिडले. यंदा तर एकाच दिवसात सोन्याचा दर बाराशे रुपयांनी उसळण्याचा विक्रमही झाला.
एवढं असतानाही, महाराष्ट्रासारख्या स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला तुच्छ, अशुभ लेखावं, हे पितृपक्षाला पटण्यासारखं नव्हतं. "मंत्रिमंडळाचा विस्तार पितृपक्षानंतर होईल,' असं जाहीर करून मुख्यमंत्र्यांनी त्याचा जाहीर अवमान केला होता. विशेष म्हणजे गेल्या वर्षीही त्यांनी अशीच घोषणा केली होती आणि तरीही, पितृपक्षानंतरच्या उरलेल्या दोन डझनभर पंधरवड्यांत त्यांना मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त सापडला नव्हता. आपल्या "मराठीपणा'चा हिसका आता दाखवूच, या निर्धारानं पितृपक्षानं थेट "हाय कमांड'कडे धाव घेतली होती.
अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर पितृपक्षाला मॅडमची भेटीची वेळ मिळाली. मॅडमनी त्याची सर्व व्यथा समजून घेतली. आपल्या पक्षाची शंभर वर्षांची परंपरा आणि धर्मनिरपेक्षता व सर्वांना समान न्यायाचे तत्त्वही समजावून सांगितले. पितृपक्ष भारावल्यासारखा वाटला. पक्षाच्या पुरोगामी धोरणांना बट्टा लावणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर कारवाईचं आश्‍वासनही मॅडमनी दिलं. तेवढ्यात कुणीतरी मॅडमना कसली तरी आठवण करून दिली. मॅडम पुन्हा जरा सावरून बसल्या. पितृपक्षाकडे थेट न बघता त्या म्हणाल्या, ""आपण कारवाई नक्की करू, पण सध्याचा काळ अशुभ असल्याचं माझ्या सल्लागाराचं म्हणणं आहे. तुम्ही थोडे दिवस थांबा. पितृपक्ष संपल्यानंतर नक्की कारवाई होईल!''
पितृपक्षानं कपाळावर हात मारून घेतला आणि आल्या पावली परत फिरला...
-----
ता. क. ः "दहा जनपथ'च्या आवारातून बाहेर पडताना पितृपक्षाला आत प्रवेश करणारे नारायण राणे भेटले. राज्यातील पीक स्थिती, गरीबांचे प्रश्‍न आणि हवापाणी यावर चर्चा करायला आल्याचं त्यांनी सांगितलं. नंतर हळूच पितृपक्षाला मॅडमचा मूड कसा आहे, तेही विचारून घेतलं. सिंधुदुर्गातील उमेदवारीची चौकशी करायला आला असलात, तर "थांबा आणि वाट पाहा,' असा सल्ला पितृपक्षानं त्यांना दिला!
----------

मुक्तकविरंगुळा