शेवटची प्रेमकथा

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in जनातलं, मनातलं
7 Jan 2017 - 1:08 pm

शेवटची प्रेमकथा

आलम दुनिया दिशाहीन पळत होती; पण पळूनही फायदा काय? कुठंही गेलं तरी ऑक्सिजन नव्हताच. एका रात्रीतला हा बदल. झाडांनी बंड पुकारलं होतं.सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर बंद केलं होतं त्यांनी प्राणवायु बनवणं. प्रकाशसंश्लेशणाची अशी पद्धत शोधली होती त्यांनी, ज्यात ऑक्सिजन बाहेर पडत नाही.

दोन-तिन तास पुरला कसाबसा प्राणवायु. नंतर सगळेजण गुदमरु लागले; मिळेल त्या वाहनात बसून धावू लागले अज्ञाताकडे. पण प्राण नव्हता कुठंच. माणसं तडफडून मरु लागली. हॉस्पिटल मध्ये होते काही ऑक्सिजन सिलेंडर्स. तेसुद्धा डॉक्टरांनीच पळवले, ज्यांच्यात दम होता त्यांनी डॉक्टरांचा खून करून ते मिळवले.

ती मात्र घाबरली नाही.कारण तो बोलला होता असंच होणार अन ती विश्वास ठेवायची त्याच्या प्रत्येक वाक्यावर. सारा गाव रस्त्याच्या दिशेने पळू लागलेला. तिला मात्र जायचं होतं दुSर- सुर्य उगवतो त्या टेकडीच्या पाठीमागे. तिथेच तर ते भेटायचे. तिथली झाडं साक्ष होती त्यांच्या प्रेमाची. ती जवळ नसली की तो झाडांशी गप्पा मारायचा.

“तू झाडांशी का बोलतो?” तिने एकदा विचारलं होतं.

“कारण ते माझे मित्र आहेत. मला कळते त्यांची भाषा. मीपण त्यांच्यातलाच एक बनणार एक दिवस.” तो स्वप्नाळू डोळ्यांनी सांगायचा.
तिला हे पटायचं, पण लोकांना नाही.वेडा म्हणायचे सगळे त्याला, हसायचे खूप. पण त्याला कुठं होती पर्वा!

विचार करता करता पोहोचली ती टेकडीच्या मागे. सूर्य तापुन लाल झाला होता एव्हाना. इथपर्यंत ती कशी पोहोचली हाच मोठा प्रश्न. कदाचित प्रेमामुळे असेल. याच प्रेमापोटी तिने त्याला जायची परवानगी दिली होती. तो बोलला होता,मी येईल तुझ्याजवळ कायमचा. विश्वास ठेव.
याच शब्दांपोटी तिने पिऊन टाकले होते सगळे अश्रू.
“एक दिवस संपेल हे जग पापी माणसांचं. राज्य येईल तेव्हा झाडांचं. तेव्हा तू ये इथेच, या टेकडीमागे. लाल रंगांची फुलं घेऊन उभा असेन मी तुझं स्वागत करायला.”
त्याचं सगळं बोलणं स्पष्ट आठवत होतं तिला; पण श्वासाची लय आता तुटक होऊ लागली होती, उरले होते फक्त काही क्षण. तिने शरीराच्या सगळ्या अणुरेणुंसकट आवाज दिला त्याला. पिसाटल्यागत धावली ती त्याला शोधायला; पण तो नव्हता कुठंच. तो वचन विसरला का? नाही असं कसं होईल? तिला ग्लानी आली, भान हरपू लागलं झपाट्यानं. अखेर ती कोसळलीच. पण अजूनही तिच्या शरीरातला कण अन कण प्राणवायुविना नाही तर त्याच्याविना तडफडत होता.

हळूहळू नजरेसमोरचं सगळं पुसट होत गेलं. जगण्याचं बळ संपलं…पण मरणसुद्धा एवढं सोपं नसतं हुलकावणी देतंच तेसुद्धा एखाद्याला. तिच्या मदतीला वायूंचा राजा आला धावून.नाकातोँडातून घुसून प्रवेश केला शरीरात चैतन्यानं.प्राणवायु दौडू लागला तिच्या नसानसांतून.

तिचे मिटलेले डोळे उघडले.समोर खरोखरच तो उभा होता, लाल रंगांची फुलं घेऊन. तिच मूर्ख होती,त्याला ओळखायला चुकली होती. तो लालज़र्द रंगांची फुलं अंगाखांद्यावर लेऊन जमिनीत आपली भक्कम मु़ळं रोवून उभा होता; आपले फांद्यांचे हात पसरवून तिला बोलावंत होता.
ती विरहिनी वाहत गेली लाटेसारखी. घट्ट बिलगली त्याच्या खोडाला.
आसवांचा पूर वाहू लागला, लाल फुलांच्या वर्षावात तिचा देह न्हाऊ लागला.
---------------------------------------------

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

7 Jan 2017 - 1:34 pm | जव्हेरगंज

खूपच वेगळी कथा!

मस्त आहे!

अतिशय वेगळी आणि खिळवून ठेवणारी कथा.

नीलमोहर's picture

7 Jan 2017 - 2:15 pm | नीलमोहर

सुंदर लिखाण, आवडलं.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

7 Jan 2017 - 7:30 pm | अॅस्ट्रोनाट विनय

सर्व मित्रांचे आभार

अॅस्ट्रोनाट विनय's picture

7 Jan 2017 - 7:31 pm | अॅस्ट्रोनाट विनय

सर्व मित्रांचे आभार

चांदणे संदीप's picture

7 Jan 2017 - 9:25 pm | चांदणे संदीप

ती ओळखायला चुकली तर आपल्या प्रेमाचं वचन खर करण्यासाठी म्हणून ऑक्सिजन न बनवायचा संकेत धुडकावून त्याने तिच्यासाठी दोन घटकेचा प्राणवायू तयार केला, आणि अर्थात हेही त्याला सोपे गेले नसणार! हे खूपच सुंदर आहे!

धन्यवाद, नवीन प्रेमकथा वाचायला दिल्याबद्दल! आवडलीच!

Sandy

वेगळीच सुंदर कथा. लिहित रहा भाऊ.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

7 Jan 2017 - 11:31 pm | अॅस्ट्रोनाट विनय

नक्कीच

तुषार काळभोर's picture

8 Jan 2017 - 6:41 am | तुषार काळभोर

पुलेप्र

संजय पाटिल's picture

8 Jan 2017 - 5:00 pm | संजय पाटिल

छानच आहे! आवडलि कथा..

मराठी कथालेखक's picture

9 Jan 2017 - 1:09 pm | मराठी कथालेखक

दोन-तिन तास पुरला कसाबसा प्राणवायु. नंतर सगळेजण गुदमरु लागले; मिळेल त्या वाहनात बसून धावू लागले अज्ञाताकडे.

सगळी वाहनं इलेक्ट्रीकच होती का ? :)

अॅस्ट्रोनाट विनय's picture

9 Jan 2017 - 6:54 pm | अॅस्ट्रोनाट विनय

तसं कशाला असेल? प्राणवायु संपला, इंधन नाही :)

मराठी कथालेखक's picture

9 Jan 2017 - 7:27 pm | मराठी कथालेखक

ओह्ह.. करेक्ट.. इंधनानेही ऑक्सिजन शिवाय जळण्याचं तंत्र अवगत केलं असणार.. माझ्या लक्षातच नाही आलं :)

अॅस्ट्रोनाट विनय's picture

10 Jan 2017 - 10:18 am | अॅस्ट्रोनाट विनय

सही पकड़े है -^-

शब्दबम्बाळ's picture

13 Jan 2017 - 8:15 am | शब्दबम्बाळ

आवो लव ष्टोरी हाय कि!
करा कि जरा अड्जस्ट... त्यात टीप टीप पानी पडून बी आग लागती, हे ऑक्सिजेन हॅड्रोजेन सगळी अंधश्रद्धा!

रातराणी's picture

10 Jan 2017 - 10:25 am | रातराणी

कथा आवडली!

मन१'s picture

13 Jan 2017 - 6:47 am | मन१

वेगळ्याच धाटणीचं लिखाण . माझीच एक जुनी कथा आठवली --- http://www.misalpav.com/node/1620

अॅस्ट्रोनाट विनय's picture

15 Jan 2017 - 12:33 pm | अॅस्ट्रोनाट विनय

प्रतिमा सृष्टी वाचली. खूप छान. धागा शेअर केल्याबद्दल धन्यवाद