====================================
भाग-१
भाग-२
भाग-३
====================================
भूनंदनवन काश्मीर – भाग ४ (पहलगाम)
आज पहलगामला जायचे होते. श्रीनगरपासून साधारण ३-४ तास लागतील असे सोहैलने सांगीतले होते म्हणुन सकाळी लवकरच निघालो. पहिले दोन दिवस श्रीनगरच्या एकाच दिशेला आमचा प्रवास झाला होता पण आज जरा वेगळ्या दिशेला जात असल्याने श्रीनगरचा दुसरा भाग पहायला मिळाला. वाटेत प्रथम आम्ही पाम्पोर भागातून गेलो. हा भाग केशरच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे. पण केशर साधारण ऑगस्टमधे येत असल्याने सद्ध्या शेतात काही पहाण्यासारखे नव्हते. पाम्पोरमधे सुक्यामेव्याची बाजारपेठदेखिल आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला बरीच दुकाने दिसत होती. सोहैलने त्याच्या ओळखीच्या दुकानापाशी गाडी थांबवली. त्याच्या म्हणण्यानुसार त्या दुकानात सर्वात चांगल्या दर्जाचा सुकामेवा मिळतो. बाकी ठिकाणी फसवणू्क होण्याची शक्यता असते. गरजेपुरतीच खरेदी करावी असे ठरवून दुकानात गेलो. पण दुकान चांगले होते. प्रत्येक गोष्टीची चव घेऊन मगच खरेदी करा असे त्यांनी आम्हाला सांगीतले. आम्ही मात्र जेवढे पाहिजे तेवढेच आणि आवश्यक तेवढेच घेतले. केशर-अक्रोड-बदाम-काह्वा-काश्मीरी सौंफ-वाळवलेले ब्लॅकबेरी असा माफक(!) माल घेऊन आम्ही तिथुन काढता पाय घेतला. पुढे आम्ही ‘अवंतीपुरा'ला भेट दिली. इथे जुन्या काळातील मंदिराचे अवशेष जतन केले आहेत. पहलगामच्या वाटेवर भेट द्यायला नक्कीच चांगली जागा आहे. इथुन जेहलम नदी मस्त वळण घेत पुढे श्रीनगरला जाते. पुढे वाटेत बरेच क्रिकेट बॅट बनवणारे कारखाने दिसले.
अवंतीपुरा अवशेष
अवंतीपुरा अवशेष
मस्त वळण घेत जाणारी जेहलम नदी
मस्त वळण घेत जाणारी जेहलम नदी
पहलगामचा रस्तादेखिल छानच आहे. मधे एक Apple Orchid म्हणुन पट्टा लागला जिथे रस्त्याच्या दुतर्फा सफरचंदाची झाडे होती. थोड्याच वेळात आम्ही पहलगामच्या खोर्यात पोचलो. इथे आपले स्वागत ‘लीदर' नदी करते. पहलगाममध्येच उगम पावणारी ही पहलगामची मुख्य नदी पहलगाम-अनंतनागमार्गे पुढे जेहलमला मिळते. नदीचे मोठे पात्र, खळाळत वाहणारी लीदर नदी आणि आजुबाजूला असलेले हिरवेगार डोंगर असे इथले एकुणच द्रुश्य खूप छान आहे. नदीपात्रात उतरता येते. पाणी एकदम पाय गोठवून टाकणारे. मग लीदर नदीच्या कडेकडेनेच पहलगाम गावात पोहोचलो.
पहलगाममध्ये आपले स्वागत
पहलगाममधे आम्ही एक रात्रच राहणार होतो. आणि इथे बघण्यासाठी खूप काही आहे. मग सोहैललाच विचारून प्लॅन बनवला. पहलगाम खूप उंचावर व डोंगराळ भागात असल्याने इथले हवामान खूपच लहरी आहे. कधी पाऊस पडेल सांगता येत नाही. अर्थात, स्थानिक लोकांना ह्याचा व्यवस्थित अंदाज असतो. त्यानुसारच आम्ही पहिल्या दिवशी अडू, बेताब व चंदनवाडी करायचे ठरवले. ह्या तीनही ठिकाणी बाहेरच्या गाड्या जाउन देत नाही. स्थानिक नियमांनुसार स्थलदर्शनासाठी तिथलीच गाडी भाड्याने घ्यावी लागते. आम्ही एक गाडी बूक केली. थोड्याच वेळात एक थोडेसे वयस्कर काका त्यांची गाडी घेउन हॉटेलवर आले. ते येईपर्यंत वातावरण खूपच ढगाळ झाले होते. एवढे की कधीपण पाऊस सुरू होईल. त्या काकांना आम्ही आमची शंका बोलून दाखवली. पण त्या अनुभवी काकांनी ढगांकडे बघुन सांगीतले की “ये तो काले बादल नहीं हैं| तो कोई बारीश नही होगी| और होगी तो भी हल्कीसी बूंदाबांदी होगी| आप बेफ़िक्र होकर चलीये|” त्यांचे म्हणणे खरे ठरले हे वेगळे सांगायची गरज नाही.
काका एकदम गप्पीष्ट होते. गाडीत ८०-९०च्या दशकातली नदीम-श्रवण, आनंद-मिलींद, कुमार सानू टाईप गाणी लावलेली होती. (आठवा ती दीवाना-साजन-मीरा का मोहन वगैरे चित्रपटगीते). त्यांचा बोलायचा लहेजा व काही शब्द थोडे राजस्थानी वाटले. त्यांना त्याबद्दल विचारले तर त्यांनी सांगीतले की ते ‘गुज्जर' आहेत. फार पूर्वी त्यांचे पूर्वज इकडे रहायला आले. त्या भागात बरेच गुज्जर आहेत अशी माहितीदेखिल त्यांनी पुरवली.
प्रथम आम्ही ‘चंदनवाडी’ला गेलो. चंदनवाडी पहलगामपासून १६किमी अंतरावर आहे. इथे अमरनाथ यात्रेचा बेस कॅंप आहे. पहलगाममार्गे जाणारे यात्रेकरू इथुन खर्या अर्थाने आपली अमरनाथ यात्रा सुरू करतात. चंदनवाडीचा रस्ता पूर्णपणे घाटरस्ताच आहे तसाच बराच धोकादायकदेखिल आहे. वेडीवाकडी वळणे, तीव्र चढ, बाजूला खोल दरी असा एकुणच भारी रस्ता आहे. पहलगामपासुन चंदनवाडीपर्यंत ‘शीषनाग' नदी आपल्याला साथ देते. ह्या नदीचा उगम चंदनवाडीच्या एका हिमनदीतून होतो. चंदनवाडीला वाहतुकीचा रस्ता संपतो. इथुन पुढे बर्फाच्छादित डोंगर आणि त्यामधुन अमरनाथकडे जाणारी पायवाट. उन्हाळा सुरू झाला असला तरी चंदनवाडीला चांगलेच बर्फ होते. पब्लिक मस्त बर्फात खेळत होतं. डोंगरावरून बर्फातून ‘स्लेज' सूसाट खाली येत होत्या. आम्हीदेखिल तिथे थोडे बर्फात खेळलो. नंतर शीषनाग नदीच्या प्रवाहापाशी गेलो. हा प्रवाह बर्फाच्या डोंगराखालून येऊन इथे प्रकट झाला होता. पाणी भयानक गार होते. नदी एकदम खळाळत चालली होती. उथळ पात्र आणि उतार ह्यामुळे प्रवाहाला चांगलाच वेग होता. ही नदी पुढे पहलगामला ‘लीदर' नदीला मिळते. बाकी चंदनवाडीमधे विशेष पहाण्यासारखे काही नाही.
चंदनवाडी
चंदनवाडी
बर्फ वितळून तयार होत असलेला नदीचा प्रवाह
चंदनवाडी
चंदनवाडी रस्ता
इथुन पुढे आम्ही ‘हज़ान व्हॅली’ला गेलो जी ‘बेताब' चित्रपटाच्या इथे झालेल्या शूटींगमुळे ‘बेताब व्हॅली’ म्हणुन देखिल ओळखली जाते.
हज़ान व्हॅली
बेताब व्हॅली ही डोंगरांच्या मधोमध असलेली एक मोठी बाग आहे. शीषनाग नदीच्या प्रवाहात एक मोठे नैसर्गिक बेट आहे ज्यावर ही बाग तयार केली आहे. खूप चांगल्या पद्धतीने इथे लॅण्डस्केपिंग केलेले आहे. गवताचे लांबलचक पट्टे, भरपूर झाडे, व्यवस्थित आखलेल्या पायवाटा, नदीवर ठिकठिकाणी उभारलेले छोटे-छोटे पुल, लहान मुलांना खेळायला भरपूर झोपाळे-घसरगुंड्या वगैरे. आणि हे सगळे निसर्गाच्या सान्निध्यात. खूप छान वेळ जातो इथे. त्यामुळे पहलगामला आल्यास न चुकता ह्या ठिकाणाला भेट द्यावी.
बेताब व्हॅली
बेताब व्हॅली
बेताब व्हॅली
बेताब व्हॅली
इथुन पुढे आम्ही अडू व्हॅलीकडे निघालो. चंदनवाडी व बेताब व्हॅली पहलगामच्या एका बाजूला तर अडू व्हॅली एकदम विरुद्ध बाजूला आहे. त्यामुळे बेताबवरुन पहलगामला येऊन अडूकडे निघालो. खरेतर संध्याकाळ झालेली होती आणि लवकरच अंधार पडणार होता. त्यामुळे तिकडे वेळेत पोहोचणार का ही शंका होती. पण ड्रायव्हर काका निवांत होते. अडूचा रस्ता चंदनवाडीपेक्षा जास्त अवघड होता. त्यात तो अरुंददेखिल होता. म्हणजे समोरुन गाडी आली तर दोन्ही गाड्यांना अगदी अटीतटीने गाडी काढावी लागत होती. अडू पहलगामपासून १२किमी अंतरावर आहे. अडूचा रस्ता नितांत सुंदर आहे. हिरवेगार तसेच बर्फाच्छादीत उंचच उंच डोंगर, दरीतून खळाळत वाहणारी नदी, अधुन-मधुन दिसणारी छोटी-छोटी घरे.
अडू व्हॅली
अडू गाव एक छोटेखानी गाव डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. कुठल्याही दिशेला पाहीले तरी मस्त हिरवेगार अथवा बर्फाच्छादित डोंगर दिसतात. इथुन बरेच ट्रेक सुरु होतात. मुख्य ‘कोल्होई ग्लेशियर'चा ट्रेक. लांब पल्ल्याचा ‘सोनमर्ग'चा ट्रेकदेखिल इथुन सुरु होतो. त्यामुळे इथे बर्याच ट्रेकर्सचे बेस कॅम्प दिसतात. एकुणच खूप छान जागा आहे त्यामुळे पहलगामला आल्यास न चुकता इकडे येणे.
अडू गाव
अडू गाव
अडू गाव
परत येताना ड्रायव्हर काका गप्पा मारत होते. गेली बरीच वर्षे ते इथे गाडी चालवत आहेत. त्यांचे अनंतनागला घर आहे. त्यांचा मोठा मुलगा MBBS झाला होता तसेच एक मुलगी देखिल उच्चशिक्षण घेत होती. त्यांच्या घरी एक-दोन लहान मुले असल्याने आमचा छोकरा पाहुन ते आमच्या मागेच लागले की त्यांच्या घरी चला. म्हणाले की “कहां ये होटेल का खाना खाते हो| हमारे घर आईये, बच्चे खेलेंगे और आपको बढिया खाना मिलेगा|” आम्ही नम्र नकार दिला आणि परत हॉटेलवर आलो.
पहलगामच्या दुसर्या दिवशी सकाळच्या वेळात आम्ही पहलगामच्या जवळपासची ठिकाणे पाहिली. ज्यात कनिमार्ग, धबधबा, डब्यान, काश्मीर व्हॅली, बैसरन इत्यादी ठिकाणी भेट दिली. ह्या सर्व ठिकाणी घोड्यावरूनच जाता येते. घोडेवाल्यांचे दर ठरलेले असतात पण जर तुम्हाला घासाघीस करता येत असेल तर खुशाल न लाजता जितकी जमेल तितकी घासाघीस करावी. अर्थात, हे तत्त्व काश्मीरमधे सरकारी दुकाने सोडता इतर सर्व ठिकाणी लागू होते. आम्हीदेखिल मजबूत घासाघीस करुन तिघांसाठी तीन घोडे ठरवले. वर सांगीतलेली ठिकाणे पहायला साधारण तीन तास लागतात. त्यातले दोन तास हे घोड्यावर बसुन फिरण्यातच जातात. तसेच, ह्या सर्व ठिकाणांचा रस्ता हा डोंगरावरुन जाणारी ‘घोड्यांची पायवाट' आहे. तीव्र चढ, तीव्र उतार, खाचखळगे, चिखल ह्या सगळ्यातून घोडा त्याच्या कुवतीनुसार मार्गक्रमण करतो. तो त्याच्या पाठीवर कोण बसले आहे ह्याचा जरादेखिल विचार करत नाही. पैसे त्याच्या मालकाला मिळणार असतात. त्यामुळे, पाठीवर बसलेला माणुस पडला तरी घोड्याच्या ‘बा’ चे काही जाणार नसते. सांगण्याचा उद्देश हाच की ह्या सगळ्याचा विचार करुन ही ठिकाणे बघायला जाणे. एकदा डोंगरावर गेले की घोडा किंवा स्वतः चाली-चाली करणे हे दोनच पर्याय आहेत. इतर कुठलेही वाहतुकीचे साधन ह्या ठिकाणी उपलब्ध नाही. तर, आमची रपेट सुरु झाली. माझा घोडा त्याचे रंग दाखवू लागला. त्याला दुसरा कुठला घोडा त्याच्या पुढे गेलेला बिलकुल आवडत नसे. कोणी घोडा जरा जरी ओव्हरटेक करून पुढे गेला की हा पठ्ठा येनकेन प्रकारे, प्रसंगी धक्काबुक्की करून त्या घोड्याच्या पुढे जात असे. त्यामुळे मला पूर्णवेळ अत्यंत सावधपणे बसावे लागत होते. कौतुक माझ्या मुलाचे होते. पूर्णवेळ तो घोड्यावर एकटा बसला आणि चढ असो वा उतार, त्याने व्यवस्थित बॅलन्स केले, पडला नाही कुठे. तर, ही सर्व ठिकाणे बघण्यासारखी आहेत. ‘बैसरन'ला स्थानिक लोक ‘मिनी स्वित्झर्लॅंड' म्हणतात आणि प्रत्यक्षात देखिल ती जागा नितांत सुंदर आहे. अर्थात, टूर कंपनीबरोबर गेल्यास ते ही ठिकाणे दाखवत नाहीत हे लक्षात घ्यावे. त्यांच्या कार्यक्रम पत्रीकेत अडू-चंदनवाडी-बेताब एवढेच असते. अजुन इकडे ‘तुलीयॉं तलाव' ही एक खूप छान जागा आहे असे कळले होते. पण तो तलाव बराच लांब असल्याने वेळेअभावी आम्ही तिकडे गेलो नाहे.
कनिमार्ग
वॉटरफॉल पॉईंट
डब्यान
डब्यान
डब्यान
काश्मीर व्हॅली
काश्मीर व्हॅली
बैसरन
बैसरन
बैसरन
बैसरन
पहलगामचे स्थलदर्शन संपवून आम्ही परत श्रीनगरकडे वळालो. संध्याकाळी श्रीनगरला पोहोचलो. पुढच्या दिवशी काश्मीरची ‘स्नो-कॅपिटल’ गुलमर्गला जायचे होते.
====================================
भाग-१
भाग-२
भाग-३
====================================
प्रतिक्रिया
14 Dec 2016 - 2:36 pm | के.के.
फोटो मोठ्या आकारात बघण्यासाठी फोटोवर Right Click करून स्वतंत्र windowमधे open करा.
14 Dec 2016 - 7:12 pm | सूड
मस्त!!
14 Dec 2016 - 7:20 pm | रातराणी
आधी फोटो पाहून डोळे शांत केले, आता वाचते!
14 Dec 2016 - 8:56 pm | संपत
लेख खूप छान. पण एकही फोटो दिसत नाही आहे.
तुम्ही बुकिंग कशी केलीत ह्याबद्दल थोडी माहिती दिलीत तर चांगले होईल.
24 Dec 2016 - 10:19 pm | पद्मावति
खूप सुरेख. स्वर्गातले नंदनवन याच्यापेक्षा काय वेगळे असणार.
24 Dec 2016 - 10:28 pm | संजय क्षीरसागर
सुरेख फोटोज आणि वर्णन.