.inwrap
{
background-color: #DFEDF8
}
लिटिल मास्टरशेफ .... एक जळजळता प्रयोग.
हा किस्सा आमचे युवराज ९ वर्षाचे असताना आहे तर अस्मादिकांना दोन छान ,गोंडस आणि काही प्रमाणात आगाऊ ( वडिलांवर गेले आहेत बाकी काही नाही) अश्या आमच्या निर्मित्या आहेत. कन्यारत्न ठीक म्हणावे पण युवराज .... हं हं हं ... जो आई बोलेगी मय उसका उलटाच करेगा अश्या धाटणीतले आहेत काही अंशी. तर काही दिवसांपूर्वीच स्टार प्लस वाहिनीवर लिटिल मास्टर शेफ हा शो सुरु झाला होता आणि लहान मुलांमध्ये बऱ्यापैकी प्रसिद्ध झाला होता. असाच एक निवांत रविवार आला. कधी नव्हे ते नवरोबा गुण्या बाळासारखा वागत होता, मुले शांत होती. ना घरकामाचे टेन्शन होते ना सफाईचे. राहता राहिले जेवण तर तो भार पण नवऱ्याने उचलला. वन मिल डिश म्हणुन पावटेभाताचा प्रस्ताव कुटूंब सभेत मंजूर झाला. मी अक्षरश: स्वप्नात आहे कि काय या संभ्रमात होते. तर दुपारी नवरेश्वराने कधी नव्हे तो छान पावटे भात केला होता. खूप हादडला. मग पोरं बसली होती हॉल मध्ये खेळत, मग त्यांना त्यांची स्पेस देऊन आम्ही दोघेही आमच्या स्पेसशिप मध्ये गेलो आणि मस्त पैकी ताणून दिली. छान काही वेळ गाढ निद्रेत असताना कुठून तरी ओरडण्याचा आवाज आला. मी पण काय यार.... झोपून पण देत नाही हि कॉम्प्लेक्स मधली कार्टी, उगाच आरडा ओरड करतात दुपारच्या वेळी असे मनातल्या मनात म्हणून कूस बदलली. पण तो आरडा ओरड नसून रडणे आहे आणि ते माझ्या घरातुन येत आहे याचा उलगडा पांच सेकंदात झाला. कसला गोंधळ आहे हा असा विचार करत गोंधळतच उठले. बाहेर येऊन पाहते तर युवराज आमचे त्यांचे दोन्ही हात आवरणाशिवाय असलेल्या पार्श्वभागावर ठेवुन तांडव करत होता. मी बुचकळ्यात.... लुंगी डान्स माहित आहे.... हा नवीन डान्स कधी आला? पण आता तेवढा विचार करायला हि वेळ नव्हता कारण साहेबाची खूप रडारड सुरु होती.
मोठीला या बाबतीत विचारणा केल्यावर तिने भीत भीत सगळा वृतांत कथन केला. मास्टरशेफ सारखी आपली हि थोडी शाईनीग मारण्यासाठी आमच्या पुत्र रत्नाला हि काहीतरी करावेसे वाटले अर्थात आम्हास आमच्या दिवट्याचे दिवे माहित असल्याने मी कधी त्याला असे करू देणार नाही हे त्यास ठाऊक होते. तरी आई बाबांना काही सरप्राईज दयावे या उद्देशाने मोठ्या दीदीला भरीस पाडून युवराजने कट करून आमच्या किचनचा ताबा मिळवला आणि दोघांच्या सहमतीने व्हेज्जी मॅग्गी करायचे ठरले. लागणारे सगळे जिन्नस घेण्यात आले. आमची सुकन्या बऱ्यापैकी स्वयपांक करते पण मिरची कापण्यापासून ऍलर्जी आहे, तेव्हा मी तुला मदत करेन पण मिरची तू कापायची या बोलीवर भावाला मदत करायचे ठरले. शेवटी युवराजानी हि धुरा सांभाळत मिरचीचा बळी दिला आणि तिथेच घात झाला. मिरची कापून झाल्याक्षणी पोटात उठलेल्या असह्य कळेला थांबवण्यात अपयशी ठरलेल्या माझ्या युवराजाला निसर्गाच्या हाकेला " ओ" देण्यास जावे लागले. (सगळं पावटे भाताचा परिणाम).... असो. तर सध्या तरी पार्श्वभागेच्या साफसफाईत नवीनच दाखला घेतला असल्यामुळे साहेब अजून तरी सरळ हाताचाच उपयोग करत. पण दोन्ही ठाव नवीन असलेल्या माझ्या सोन्याला नुकताच मिरची कापलेल्या हाताने नको तिथे हात लावु नये याचा पुरेसा अनुभव नसल्याने त्या हाताचा वापर झाला. मग नुकताच मिरची कापलेल्या हाताने आपली जादु काही सेकंदात केली आणि आमचे युवराज ठो… ठो करून बाहेर आले. आता त्याचा मानस छान होता पण करामत भारी. कळेचना .... काय रिऍक्ट करू? पण शेवटी काही झाले तरी आईच ना. मग माझ्यातल्या जहाल आईला बाजूला ठेवुन मवाळ आईला बाहेर काढले. मग पिल्लूला जवळ घेऊन त्याच्या पार्श्वभागावर गोडेतेल चोळत असताना त्याला चार उपदेशाच्या गोष्टी फेकून मारल्या नाहीत तर तू आई कसली? असा न्यूनगंड मनास पोखरू लागला. म्हणून पोराला म्हंटले काही होवो सोन्या अनुभव शिकवतात हो माणसाला, आता कळले का रे बाळा मिरची कशी लागते ते.
पण या मिरची पायी पोराने एवढा धाक घेतला स्वयंपाकघराचा कि स्वतः पाणी पिण्यासाठी हि पोरगे आत जाईना झाले आहे. अश्या तऱ्हेने या भारताने भविष्यात येणाऱ्या एका हुशार, करामती, प्रयोगी आणि अतरंगी मास्टरशेफला मुकले.
प्रतिक्रिया
6 Dec 2016 - 3:38 pm | संजय पाटिल
लोळलो..
बाकी युवराज साठी सो सॉरी..
6 Dec 2016 - 4:05 pm | एस
हात तेरी की! ;-)
6 Dec 2016 - 4:49 pm | बरखा
या वर काय प्रतिक्रिया द्यावी ते कळेना. काय झाली असेल त्याची अवस्था.
6 Dec 2016 - 5:12 pm | कंजूस
काश्मिरी मिरचा वापरा. फक्त लाल रंग असतो, आग होत नाही.
------
आता बसतय लाटणं , पळतो.
6 Dec 2016 - 7:13 pm | बबन ताम्बे
पण अशी फजीती व्हायला नको होती.
6 Dec 2016 - 11:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
=)) =))
7 Dec 2016 - 12:31 am | बॅटमॅन
=)) =)) =))
मुखामध्ये घास घातला | तो अपानी घालावा ||
ही समर्थोक्ती उगीचच आठवली. मूळ उक्तीचा संदर्भ एकदम वेगळा आहे.
7 Dec 2016 - 1:27 am | पद्मावति
सही किस्सा =))
7 Dec 2016 - 11:50 am | रातराणी
अय्यो! =))
7 Dec 2016 - 12:47 pm | अजया
=)))
7 Dec 2016 - 12:54 pm | पैसा
अगायाया! बिचारं पोरगं!
7 Dec 2016 - 1:02 pm | बाजीप्रभू
खी, खी, खी... पोरगं मोठ होऊन 'बाजीप्रभू' होणार लिहून घ्या...
9 Dec 2016 - 12:33 am | चतुरंग
पोरानं 'खिंड' लढवलीन म्हणा की!! =))
7 Dec 2016 - 6:22 pm | पाटीलभाऊ
अत्यंत जळजळीत लेखन :D
7 Dec 2016 - 7:40 pm | सानझरी
Lol =)) =))
8 Dec 2016 - 10:04 am | मिसळलेला काव्यप्रेमी
=)) =))
8 Dec 2016 - 5:30 pm | प्रान्जल केलकर
अक्षरशः हसून हसून पोट दुखायला लागलाय. तुमच्या लिटिल मास्टरशेफ सारखं अस्मादिकांनी पण लहान पणी मिरच्या हाताने चुरल्या आणि तोच हात नेत्रकमले चोळण्यासाठी वापरला. डोळे गेले काय असाच वाटलं होतं. मातोश्रीनी दवाखान्यात घेऊन गेल्या. उपचार झाल्यावर . घरी आल्यावर एक साग्रसंगीत उत्तरपूजा बांधण्यात होती.
8 Dec 2016 - 7:29 pm | टवाळ कार्टा
हे मी पण केलेले...पण उत्तरपूजा नाही झाली माझी =))
9 Dec 2016 - 12:26 am | निओ१
हा हा!
9 Dec 2016 - 2:20 pm | भावना कल्लोळ
हा किस्सा जगजाहीर केल्याबद्दल स्वारी रागावली आहे आमच्यावर, आता रुसवा घालवण्यासाठी पिझ्झा नाहीतर मॅक डी याची लालूच द्यावी लागणार आहे ... तरी तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया ऐकवून दाखवल्यावर छानसे हसू आले होते गालावर पण आपली ट्रीट जाईल या भीतीने रुसव्याचा छान अभिनय चालू आहे ...
9 Dec 2016 - 2:30 pm | ग्रेंजर
ट्रीट जाईल या भीतीने रुसव्याचा छान अभिनय चालू आहे कित्ती गोड:)
9 Dec 2016 - 2:31 pm | ग्रेंजर
ट्रीट जाईल या भीतीने रुसव्याचा छान अभिनय चालू आहे >>>>>कित्ती गोड:)
10 Dec 2016 - 3:30 am | एस
:-)
9 Dec 2016 - 3:42 pm | भाग्यश्री कुलकर्णी
भारी च की. युवराज. :)
9 Dec 2016 - 3:47 pm | स्वीट टॉकर
He deserves that pizza!
10 Dec 2016 - 1:13 am | रुपी
मजेदार किसा.. बिचारा :)
लेखनशैली आवडली..
=)
10 Dec 2016 - 2:09 am | खटपट्या
एखाद्याच्या फजीतीची अशी टर उड्वू नये
- श्यामची आइ
10 Dec 2016 - 3:41 pm | इरसाल कार्टं
मी जूनही हसतोय अन ऑफिसमधले सगळे मी वेद झालोय या आशयाचे दृष्टिक्षेप टाकतायेत.
13 Dec 2016 - 9:19 am | ज्ञानव
हात चालवायला शिकता आहेत. भय"कल्लोळाने" स्वैपाकघरावर (किंवा कुठेही ) स्वारी करण्याचे स्वप्न सोडू नये हि त्यांना विनंती.
14 Dec 2016 - 12:37 pm | समी
:)
14 Dec 2016 - 3:46 pm | सविता००१
हेमा, तुझा युवराज डोळयांसमोरून हलता हलेना ;)