एवढंसं आभाळ

जयवी's picture
जयवी in जनातलं, मनातलं
29 Sep 2008 - 7:15 pm

कालच झी टिव्ही वर "एवढंसं आभाळ" हा सिनेमा बघितला. दिग्दर्शकानं फार सुरेख हाताळलाय हा नाजूक विषय. प्रतिक्षा लोणकर, आनंद शिंदे आणि ऋत्विक नाडकर्णी ह्यांच्या नैसर्गिक अभिनयाने अधिकच वास्तविक सुद्धा वाटतो.

आई वडिलांचा घटस्फोट झालाय म्हणजे नक्की काय झालंय हे सुद्धा न कळण्याइतका भाबडा मुलगा....जेव्हा ते सगळं आपल्या कुवतीप्रमाणे समजून घ्यायचा प्रयत्न करतो... तेव्हा त्याची होणारी चिडचिड, सोबत आई-वडिलांची अगतिकता....... आणि मग अचानक त्याला मिळालेला मार्ग... असं काहिसं कथानक.

प्रत्येक छोट्‍या मुलाचं आभाळ त्याच्या आई-वडिलांच्या आभाळातच असतं.....आणि तो तेच आभाळ आपलं समजत असतो. पण जेव्हा ते आई-वडिल एकमेकांपासून दूर होतात..... ते आभाळ फाटतं. त्याला कळतंच नाही की आता नक्की कुठलं आभाळ आपलं. आईच्या आभाळात आता दुसराच कोणी "पप्पा" असतो आणि त्याच्यासोबत त्याची कुठलंच नातं नसलेली भावंडं सुद्धा. त्याला गुदमरायला होतं. तसा दुसरा पप्पा काही वाईट नसतो. पण आईवरचा त्याचा एकाधिकार मात्र अगदीच संपतो. संपूर्ण त्याची असलेली आई आता त्याला अजून तिघांसोबत वाटून घ्यायची असते. इथेच तर सगळा घोळ होतो. आपल्या हातातून काहितरी निसटून जातंय असं त्याला वाटतं... तो धडपड करतो...पण काही गोष्टी अशा घडतात की त्याचा स्वत:वरचा ताबा सुटतो. आईची होणारी घालमेल त्याला कळत असते पण तरी मन काही आपला हक्क सोडायला तयार नसतं.

ह्यातून आपल्या परीने तोच मार्ग सुचवतो.... पप्पांकडे जायची परवानगी मिळवतो. त्याला वाटतं की आपलं हरवलेलं आभाळ आपल्याला आपल्या पप्पांकडे नक्कीच मिळणार. तो खूप उत्साहात असतो. पण घरी पोचल्यावर त्याचं स्वागत बंगाली भाषेत बोलणारी आंटी करते. सोबत एक छोटं बाळ पण. म्हणजे इथेही आपल्याला पुन्हा वाटूनच घ्यावं लागणार आभाळ !

त्याला काही कळेनासंच होतं. इवल्याशा मनात प्रचंड उलाघाल होत असते.......कोणासोबत बोलावं मनातलं....आईसोबत...... पण तिला तर फारच दुखावून आपण आलो आहोत. पप्पा.....आज पप्पांसोबत बोलुयाच असं ठरवतो तर पप्पाच त्याला त्यांचा निर्णय सांगतात.... बोर्डींग स्कूलमधे जायचा. तो खूप प्रतिकार करतो. पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्या क्षणी समोरुन आलेली वॉर्डन त्याला आईच वाटते. तो तिच्या कुशीत शिरुन हमसाहमशी रडतो....तिची माफी मागतो. पण नंतर त्याला जाणवतं की आई नाहीच. मग तो आपलं मन पक्कं करतो........बाबांकडे पाठ फिरवून होस्टेलच्या खोलीत येतो. तिथे त्याच्यासारखीच कितीतरी मुलं असतात.......पण सगळी हसरी मुलं...... कोणीच त्याच्यासारखी रडत नसतात. तो ही हसायचा कसानुसा प्रयत्न करतो.

तिथे त्याला छान मित्र मिळतो.... हळुहळु तो खुलत जातो.... फुलत जातो. आई-पप्पांची आठवण येत असते पण इथेही मजा असते. नवी जागा, नवे मित्रं, नवं ध्येय....... आणि अचानक एक नवं आभाळ सुद्धा !! ह्या अचानक सापडलेल्या आपल्या हक्काच्या आभाळाखाली तो खूप खूप सुखावतो. आईला त्याने लिहिलेल्या पत्रातच सिनेमा संपतो. अतिशय सुंदर शेवट !! कुणालाही न दुखावता, कुणालाही न दुरावता.... त्याला त्याच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव होते. त्याचं एवढसं आभाळ आता खूप मोठ्ठं होतं आणि त्या आभाळाखाली तो स्वत:चं "मी पण" घडवणार असतो.

हा सिनेमा मी माझ्या १२ वर्षाच्या मुलासोबत बघितला........प्रचंड रडले बघताना. पिल्लाने पण अगदी मन लावून बघितला.....खूप प्रश्न विचारले..... आणि त्याला उत्तरं देताना मात्र मी फार विचार करत होते.... आई-वडीलांना पण स्वत:चं आभाळ वेगळं करताना मुलाच्या डोक्यावर काही आभाळ उरतंय का ह्याचा विचार करायलाच हवा. नाहीतर आपलं इवलंसं आभाळ कुठे आहे हे शोधण्यात कदाचित ते मूल भलत्याच वाटेला जाऊ शकतं आणि मग फक्त पश्चातापच हातात उरतो.

फारसे संवाद नसूनही सुरेख अभिनयामुळे सिनेमा मनात अगदी घर करुन राहतो. एक आवर्जून बघण्यासारखा सिनेमा !!

चित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

29 Sep 2008 - 7:24 pm | छोटा डॉन

जयवीताई, तुम्ही "आपलं आभाळ" चे एकदम सुरेख परिक्षण केले आहेत.
छान जमला आहे लेख, एकदम बॅलेंन्स्ड !!!
धन्यवाद !

आता नक्कीच पहावा लागेल हा सिनेमा ...
" आपली मराठी" ह्या वेबसाईट वर आहे काय ????

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मनिष's picture

29 Sep 2008 - 7:32 pm | मनिष

कुठे डी व्ही डी मिळाली तर बघावी लागेल!

हा सिनेमा मी माझ्या १२ वर्षाच्या मुलासोबत बघितला........प्रचंड रडले बघताना. पिल्लाने पण अगदी मन लावून बघितला.....खूप प्रश्न विचारले..... आणि त्याला उत्तरं देताना मात्र मी फार विचार करत होते.... आई-वडीलांना पण स्वत:चं आभाळ वेगळं करताना मुलाच्या डोक्यावर काही आभाळ उरतंय का ह्याचा विचार करायलाच हवा. नाहीतर आपलं इवलंसं आभाळ कुठे आहे हे शोधण्यात कदाचित ते मूल भलत्याच वाटेला जाऊ शकतं आणि मग फक्त पश्चातापच हातात उरतो.

थोडा असा विचार केला तर - मुलासाठी समजा न पटणार्‍या नात्यात राहिलो, आणि १०-१२ वर्षाने तोच मुलगा भरार्‍या मारायला आपल्या मार्गाने निघून गेला. तेव्हा होणारी स्वतःची घुसमट, एकटेपणा, पश्चाताप ह्याचे काय? नाते निभवावे लागते हे खरे, पण एका मर्यादेनंतर दुसर्‍या कोणाच्या नावाने आपले त्यागाचे तिकिट फाडण्यापेक्षा स्वतःच्या भल्यासाठी आपल्या समजुतीनुसार निर्णय घ्यावा -- आणि मुख्य म्हणजे त्याचे बरे-वाईट जे परीणामांना समोरे जावे, आपल्याच निर्णयाचा एक भाग म्हणून! अशा वेळेस निर्णय कुठलाच बरोबर किंवा चूक नसतो, त्याला तसा (बरोबर/चूक) सिध्द करण्याची जवाबदारी आपलीच असते!

स्वाती दिनेश's picture

29 Sep 2008 - 7:38 pm | स्वाती दिनेश

जयश्री,सुंदर परीक्षण केले आहेस.
उत्तरायणाबरोबरच आता पहायलाच हवे यादीत ह्या सिनेमाची नोंद केली.. आता सिनेमा मिळवायच्या मागे लागावे लागेल,:)
स्वाती

जयवी's picture

29 Sep 2008 - 7:39 pm | जयवी

छोटा डॉन, स्वाती धन्यवाद :)

मनिष, तू म्हणतो आहेस ते बरोबर आहे. आपण अगदी भरपूर त्याग वगैरे करुन पिल्लासाठी एकटं रहायचं आणि त्याला पंख फुटले की तो उडून गेल्यावर एकांतवासाची शिक्षा भोगायची. पण जेव्हा आपण आपल्या सुखासाठी एखादा निर्णय घेतो.... त्या निर्णायामुळे पिल्लाची फरपट होत असेल तर्....ते सुख कसं काय उपभोगता येईल? पिल्लालाच विश्वासात घेऊन निर्णय घेतलेला बरा नाही का....? कदाचित त्याला ती समज येईस्तोवर कळ काढणं जास्त शहाणपणाचं ठरु शकेल.

शाल्मली's picture

29 Sep 2008 - 8:23 pm | शाल्मली

चित्रपटाचे परिक्षण छान केले आहे.

काल मी सुद्धा हा चित्रपट बघितला.
आईला त्याने लिहिलेल्या पत्रातच सिनेमा संपतो. अतिशय सुंदर शेवट !!
हे एकदम पटलं. उगाच ओढून- ताणून, सगळ्यांना एकत्र आणून सुखान्त करण्याचा प्रयत्न न करता अतिशय योग्य ठिकाणी चित्रपट संपवला आहे.

--शाल्मली.

प्राजु's picture

29 Sep 2008 - 8:29 pm | प्राजु

मी अर्धवट पाहिला होता हा चित्रपट. त्यातलं गाणं फारच सुंदर आहे.."तू एवढंसं आभाळ माझ्या पापणीत दडलेलं...". सुंदर परिक्षण लिहिलं आहेस. अतिशय सुरेख..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

30 Sep 2008 - 7:13 am | विसोबा खेचर

फारसे संवाद नसूनही सुरेख अभिनयामुळे सिनेमा मनात अगदी घर करुन राहतो. एक आवर्जून बघण्यासारखा सिनेमा !!

नक्की पाहणार! सुंदर परिक्षण...

जयू, जियो बेटा...! :)

तात्या.

जयवी's picture

1 Oct 2008 - 1:18 am | जयवी

शाल्मली, प्राजु, तात्यासाहब...... तहे दिल से शुक्रिया :)