गोष्ट एका लग्नाची .....
गोष्ट एका लग्नाची ... भाग - २
बस्ता न खस्ता...
लगीन घर म्हनजी आठवडेबाजार पेक्षा कमी नसतंय ,कोण काय बोलतय काय सांगतय कैच ताळमेळ नसतोय
काम करणारे ४-५ न उंटावरून शेळ्या हाकणारे बाकी समदे :)
सकाळी सकाळी २ जीभडे दारासमूर येऊन उभे राहिले आज बस्ता मह्यावाला :)
रातीपासून बाया- बापड्यांची कलकल ऐकून माझं डोकं ठणाणा वाजत होत."निस्ता पसारा करून ठेवलाय घरभर , बबन्या ,अरे गोधड्यांच्या वळकुट्या कर की पाहत काय बसलाय , न तुमी दोघी जरा कौशीला मदत करा का निस्त्या हिंडताल इथून तिथं न तिथून हिथं! काय बाय पोरी , तरनताठ रक्त तुमचं कस असावा कामाला चपळ " ! डोक्यावरला पदर सावरत माझी आज्जी सगळयांना कामाला लावत होती.
पटदिशी आवरायचं सोडून सगळा घुळुघुळु कारभार बायांचा. मग माझा आजाच खेकसला ,पटशांन आवाराच न बसायचं सगळ्यांनी गाडीत नायतर तुम्हाला इथंच सोडून जातुय तशा सगळ्या बाया कोंबडीवाणी कुचकुचू करत नट्टून थट्टून घुसल्या का कोंबल्या एकदाच्या जिभड्यात !
तासभर अंतर हाय पेठेत जायचं म्हंजी ,मला घाई सुमीला कधी पाहीन ते , पण रस्ता कधी लवकर कटत नसतो . पोचलो येकदाचे पेठेत तर हि मरणाची गर्दी न त्यात आमचा गोतावळा म्हंजी रानात बागडणारी मेंढर. लय कठीण सांभाळणं एक माणूस स्पेशल ठेवला होता वळायला हैक हैक हुर्रे…….....
लय भारी न मोठ्ठ कापडाचं दुकान ! पोराचं लगीन सांगा ढोंगात करायचं म्हणून आज्यांनी न माझया बा नी भरपूर माल ठेवला होता जवळ. तिकडले कधी येत्यात असं झालं होत मला , दुकान मस पाहण्याजोग होत पण माझं काय लक्ष नव्हतं दुकानात , सगळी नजर भायेर. ताटकळत बसण्यापेक्षा मी दर २ मिनिटाला बाहेर जाऊन पघत होतो म्हणून पोर चिडवीत होती मला.
न आली एकदाची मंडळी , जीवात जीव आला.परत नमस्कार, राम- राम, खुशाली बिशाली झाली. माझा आजा म्हणाला "नवरा नवरी न आदुगर वर जाऊन कापड पसंत करा बर, म्या बाकीच्यांचं बघतु. मला त्येच पाहिजे होत ;) माझी सफारी तिकड न शालूच आमच्याकडं , असं ठरलं हुत बैठकीत.
सुमीबरोबर २-३ पोरी होत्या त्यामुळं माझ्या "मित्रमंडळच लक्ष पांगल होत न ते माझ्यासाठी चांगलं होत ;)
जिन्यात सुमीला विचारलं कशिय ? माझि आठवण येती का ग ? मला खूप येती तर अशी लाजली काय सांगू .
म्हणल चला आता निवांत वेळ गावलाय सुमी बरोबर तवर २ -४ बाया बापड्या पुढ्यात हजर ! एक सुमीची आय एक माझी .२ चुलत्या न एक आमची बहीण! नंदी.
नंदीला मी बारकी म्हैसच म्हणाचो काय म्हणायचं उशीर नुसती अंगावर यायची एक लंबर आगाव.
नंदी आल्या बरुबर " वैनी असं न वैनी तस " ह्ये बघ न त्ये बघ , ह्ये भारी न त्ये लय भारी करत वैनीचा हात धरू धरू तिला फिरवायला लागली , टकुर सटकतच होत मह्यावालं पण वरडून उपयोग नसतो अशा येळेस समद दम्माणी घ्यावं लागत आपुन पडलो नवरदेव !
सुमी जात्याच लाजाळू न नाजूक शालूच वझं नको जास्त व्हाया, धुंडाळू धुंडाळू एक मस्त शालू पसंत पडला किंमत ५००० ! माझी चुलती म्हणती थोडा कमीचा दाखीव ना भाऊ ५००० कुढं असत्यात का? न तसाबी लगनाचा शालू लगीन झाल्यावर कोण वापरात नाय तसाच पडून राहतोय पेटीत व्हाय की नई कौशे ( माझी आय )
माझ्या आईने लगेच तिचा हात दाबून गप केली तिला " आवडला तिला तर घिऊ दि ना " .. ह्म्म्म म्हणत चुलतीन तोंड वाकड केलच.
हिथं एक गोष्ट ध्यानात घेण्याजोगी की पैशे आपले लग्न बी आपलं. पण खरचाची चिंता इथून तीथन सगळ्या गावाला ह्ये कशाला न त्ये कशाला जाऊ द्या चालायचंच.
तवर माझा आजा , बां, न माझा भावी सासरा जाईंट झाले आम्हाला , खरीदारीत जास्त टाइम नव्हता दवडायचा मला म्हणून म्या पटदिशी एक सफारी पसंत केली किंमत इचारली ३५०० हजार .
ऐकुन आजा म्हण " ह्यात , नाय नाय ही नाय बरुबर दुसरी पघ , मी म्हणाल काय वाईट हाय? छानच दिसती की .बां न लगेच डोळे वटारले , हम्म म्हंजी आता गेम लक्षात आली ५००० ची किंवा त्यापरीस जास्त पसंत पडायला हव.. लग्नात अशे गेमच गेम चालत असत्यात झाली एकादाची पसंत. सफारी.
खाली आलो..
"आक्के ते लुगडं घे बाई मला त्येच जरा बर दिसतंय आमची एक भावकीतली चुलती कवाधरण आयच्या माग लागलेली , आय म्हणली घी ना मग ३- ३दा काय इचारायच ? तशी आमची आजी हळूच म्हणती " वाणात ना गुणात खेटर बांधलाय कानात " काम कराया कदी- कद्दी येत नई म्होरं लुगडं घ्या म्हण "
आई म्हण सगळ्यांचं मन धरावं लागत बाबा , मन मोडून चालत न्हाई नायतर ४ पावण्यात नालस्ती हुती जनंमभर , मान पानाचं बघावं लागत ना !
आमची आय त गरीब गायचं ! नाय म्हणताच येत नाय तिला कवा .. जाऊ द्या ...दुकान गाजवून टाकलाय पार , साड्यांच्या ढिगार्यात बाया हरवल्या होत्या दाखविणारे धपाधपा लुगडे पुढं टाकीत होते
" आज्जी ह्ये बघा काठ किती छान पदर बी ,अक्का त्यो कलर, मावशे ह्ये डिझाईन बघ की किती नाजुक शोभतय तुला " हे बघा , त्ये बघा करत सेल्शमन नी च्या ढीग समोर टाकले तरी बायाचं " पदर नाय बराबर , नक्षी लय मोठी , पोत नइ बराबर , सुत नई बराबर "ह्ये लुगडं असं न ते तस बायांचा कलकलाट नुसता !!
मेंन म्हंजी दुसरीने घेतलेल्या लुगड्यापेक्षा आपलं लुगडं भारी दिसायला पइजे , किमतीचा कोण इचार करतय ? काई काई पुरुष मंडळी तर मऊ गाद्या बघून घोरत बी पडलेत.लहान पोर-टोर तर माकडाला लाजवतीन अशे खेळ चालल्लेत दुकानात , कोलांट्या उड्या , लपाछपी , जिण्यावरून घसरण, कुस्ती बिस्ती , एक दोन छोट्टाले तर कुठं मुतायच ह्ये कळना तर शोच्या झाडाच्या कुंडीत जाऊन मुतलेत !!!
हिकडं वानर सेनेनी न तिकडं बायांनी दुकान गाजवून टाकलं पार आज दुकानदार जिता राहतो का नाही काळजी पडली मला !
खर तर मला सुमीला घेऊन समोरच्या हाटिलात जायचं होत कायतरी थंड गार प्यायला
पण कोण हलू देईल तर शपथ " कुढं चालला? न कशाला चाल्लला ?लय गर्दी हाय बाबा नको जाऊ उन्हातान्हात " माझी आजी " तिला वाटतातय मी अजून लेकरूच हाय किती माया :)
तरीबी कायतरी थंड प्यावा ह्ये निमित्त करून आम्ही ४-५ टाळके समोरच्या हाटिलात घुसलो तर नन्दि नावाचं शेपूट बागडत बागडत मध्येच येऊन बसलं. कसाबसा बाबापूता करून बाळ्यांनी दुसर्या टेबलवर नेली तिला तरी सगळं ध्यान आमच्याकडंच , मान मोडूस्तवर पाहणं चालूच .
इतक्या वाढूळ माझीच पोपटपंची चालली होती किती बोलावा न काय बोलावं अशी गत तर सुमी नुसती हा , नई , हम्म , मंग करत होती म्हणलं बोर झाली का तू? तर म्हणली " नइ बोला ना , आवडत मला ऐकाया " मनात आल घ्यावा हातात हात तिचा पट्टदिशी, पण माझ लाजाळूच झाड ते लाजून लाजून गेलं पार :) सुमी जवळ बसलीय ह्यातच लै सुख होत :)असं कोण तरी येत आपसूकच , आल्हाद, मग त्याचाच नाद लागतो जीवाला दिस रात त्येच ध्यान येत डोळ्यासमोर.
५- १० मिनिट अशी सुखाची गेली असतीं का आमचा अर्धा गोतावळा ह्याच हाटिलात घुसला , झालं कल्याण
आता ह्या हाटिलाचे पण. आता ह्या हाटिलची बी सतराशे साठ शकल केल्या बिगर काय चैन पडणार नव्हती माझ्या गोतावळ्याला :)
प्रतिक्रिया
15 Nov 2016 - 1:34 pm | पाटीलभाऊ
एकदम मस्त लिहिताय...!
भाषा आणि लिहिण्याची शैली...मस्त !
अजून येऊ द्या.
15 Nov 2016 - 1:44 pm | संजय पाटिल
भारी चाललय..
चालूध्या पुढं..
15 Nov 2016 - 1:47 pm | चिनार
मस्त !!!....अजून येउद्या लौकर...
या वाक्यासाठी टाळ्या -शिट्ट्या वाजवल्या तरी कमी आहेत..तरी वाजवतोच आहे !!
15 Nov 2016 - 1:59 pm | टवाळ कार्टा
आरारा...लै झ्याक लिवलयं :)
15 Nov 2016 - 2:24 pm | पद्मावति
काय मस्तं लिहिलंय. मजा येतेय वाचायला.
15 Nov 2016 - 2:49 pm | सस्नेह
बस्ता जमलाय =))
15 Nov 2016 - 2:50 pm | एस
लै जुन्या आठवणी जाग्या केल्या न तुमी. ;-)
आजून येवंद्या.
15 Nov 2016 - 3:22 pm | नाखु
सुमीने केला की खुळखुळा !!!
15 Nov 2016 - 5:44 pm | बापू नारू
हा भाग पण छान जमलाय , येउद्या पुढचा भाग लवकर
15 Nov 2016 - 6:48 pm | अत्रुप्त आत्मा
काही काही वाक्य वाचताना हहपूवा होत आहे.
जिल्बुचा...,
क्रमश: ह्रायलं का?
15 Nov 2016 - 11:04 pm | इशा१२३
काय मस्त वर्णन! आख्ख दुकान डोळ्यासमोर उभ राहिले.हहपुवा.
क्रमश:राहिले का ग?
15 Nov 2016 - 11:04 pm | इशा१२३
काय मस्त वर्णन! आख्ख दुकान डोळ्यासमोर उभ राहिले.हहपुवा.
क्रमश:राहिले का ग?
16 Nov 2016 - 3:01 am | रेवती
भारीय.
सगळं डोळ्यापुढं आल्याने हसू येतय.
16 Nov 2016 - 3:46 am | स्रुजा
क्या बात हे ! पिश्वी ची प्रतिभा (त्रि वाचते आहेस का?) उडायला लागलीये. काय गो? काय विशेष ? ;)
16 Nov 2016 - 8:46 am | प्रचेतस
भारी लिहितेयंस पिवशे.
16 Nov 2016 - 8:57 am | अजया
धमाल लिहितेय पिशवी.ब्येश्टच.कसं काय नवीन सुचायलं इतक्या दिवसांनी?
16 Nov 2016 - 9:42 am | झुमकुला
लग्नात अशे गेमच गेम चालत असत्यात हा हा , अगदी अचुक निरीक्षण ......
16 Nov 2016 - 9:53 am | पलाश
ही रनिंंग काॅॅमेंंट्री एकदम मस्त चालली आहे पियुशा!! :)
16 Nov 2016 - 10:24 am | नूतन सावंत
मस्त गदारोळ!दिसूनच राहिला न डोळ्यांपुढे.पुढचा भाग पाठवा लवकर.
16 Nov 2016 - 10:31 am | अद्द्या
भारीच
लवकर टाका पुढचे भाग
16 Nov 2016 - 11:31 am | बदामची राणी
सुरेख!!
17 Nov 2016 - 4:54 pm | सामि
पुढचे भाग लवकर टाका.