मूल दत्तक घेणे, प्रक्रियेची सुरुवात...

केडी's picture
केडी in जनातलं, मनातलं
27 Oct 2016 - 2:43 pm

त्याला फोन करून त्याचे आधी अभिनंदन करून, त्याची आणि त्याच्या बायकोची वेळ मागून घेतली. एका विकांताला त्याला आम्ही (चिरंजीव सुद्धा) जाऊन भेटलो, भरपूर बोललो, खूप छान माहिती मिळाली, आणि आत्मविश्वास वाढला. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून एक जाणवल, ते म्हणजे दत्तक घेणेची प्रक्रिया खरं तर खूप सोप्पी आहे, पण अर्थात वेळ काढू आहे.

आधीच धागा इथे आहे.

मित्राकडून सगळी माहिती घेऊन, आम्ही पुढच्याच विकांताला सोफोश [SOFOSH] च्या ऑफिस मध्ये फोन करून, त्यांची अपॉइंटमेंट घेऊन भेटायला गेलो.

सोफोश , सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ ससून हॉस्पिटल, हि संस्था बऱ्याच लोकांना श्रीवत्स ह्या त्यांचा अनाथ आश्रमामुळे मुळे माहिती आहे. बऱ्याच वेळेला पेपरात, श्रीवत्स मध्ये बालिका/बालक दाखल अश्या छोट्या मजकुरात बातम्या वाचल्याचा मला देखील आठवत होत्या, पण आपण इथे कधीतरी येऊ हे तेव्हा वाटले न्हवते.

पहिल्यांदा आम्ही भेटलो, ते तिथल्या सोशल वर्कर (सामाजिक कार्यकर्त्या) बाईंना. त्यांच्याशी बोलून, त्यांनी आम्हाला दत्तक घेण्याच्या प्रक्रियेबद्दल माहिती दिली पण बोलताना त्यांच्यात थोडा रुक्षपणा जाणवला. (ह्याचे कारण नंतर कळले, बऱ्याच वेळेला, काही समाजकंटक लोकं, पत्रकार इत्यादी, उगाच येऊन चौकश्या करतात, काही बाइट मिळतोय का, वैगेरे, असे अनुभव त्यांना असंख्य वेळेला आल्याने ते बऱ्याच वेळेला साशंक असतात. ह्याच काळात कारा [CARA, Central Adoption Resource Authority] ने देखील बारीक लक्ष घालायला सुरुवात केलेली, त्यामुळे त्यांना विशेष काळजी घावी लागायची. हे का, हे पुढे येईलच).

त्यांनी दिलेल्या माहिती नुसार दत्तक घेण्याच्या प्रक्रिया अशी होती
१. रेजिस्ट्रेशन. आमची माहिती ते एका फॉर्म द्वारे भरून घेतील, आणि आमचा त्यांच्या संस्थेत रेजिस्ट्रेशन करतील. हि रेजिस्ट्रेशन प्रक्रिया अत्यंत डिटेल्ड असते. ह्यात खालील गोष्टींची पुष्टी द्यावी लागते:

नाव, गाव, पत्ता, वय , कौटुंबिक माहिती, नौकरी/धंदा, आर्थिक परिस्थिती, पोलीस क्लीयरन्स इत्यादी. ह्या व्यतिरिक्त, तुम्ही दत्तक का घेताय ह्या बद्दल आणि तुमच्या बद्दल एक निबंध लिहून द्यावा लागतो. ह्यात तुम्ही कसे वाढलात, तुमच्या फॅमिली व्हॅलूस काय आहेत, तुमचा स्वभाव (गुण/दोष) हे सगळं लिहून द्याव लागत. दत्तक घेण्या संबधी तुमचे काही प्रश्न आहेत का, ते देखील त्यात नमूद करायचे असतात. दत्तक घेताना, काय हवाय (मुलगा कि मुलगी, वय वर्ष किती, वर्ण काय हवा, तुम्ही एखाद्या डिफरंटली एब्लड मुलाची जवाबदारी घेऊ शकाल का, असे देखील प्रश्न त्यात असतात. हे फॉर्म आणि निबंध दोघांनीही (नवरा आणि बायको) स्वतंत्रपणे भरून द्यावे लागतात. ह्या व्यतिरिक्त, दुर्दैवाने, तुम्हा दोघांचा अकस्मात मुर्त्यू झाल्यास, त्या दत्तक मुलाची जवाबदारी स्वीकारणाऱ्या एका कुटुंबाची लेखी परवानगी (अधिकारपत्र) जोडावे लागते. (ह्या साठी माझी बहीण उत्सुक होती, पण ती भारताबाहेर स्थाईक असल्यामुळे ती चालणार न्हवती, तसेच माझा मेहुणा हा अविवाहित असल्यामुळे तो देखील चालणार न्हवता, त्यामुळे एका मित्राने आणि त्याच्या बायकोने हे काम आनंदाने स्वीकारले).

ह्या सगळ्यासाठी, तुम्हाला तुमच्या बँकेतून गेल्या सहा महिन्यांचे स्टेटमेंट्स, नोकरदार असाल तर सद्य कंपनी मधून एम्प्लॉयमेंट लेटर, आयटी रिटर्न्स, जवळच्या पोलीस स्टेशन मधून पोलीस क्लीयरन्स, आणि एक फॅमिली फोटो हा देखील द्यावा लागतो. (हा फोटो वापरून, ते दत्तक मुलगा किंवा मुलगी चे प्रोफायलिंग करतात, थोड्यात कि तुमच्या फॅमिली च्या रंग आणि चेहेरेपट्टीशी जुळणारे मूल द्यायचा एक प्रामाणिक प्रयत्न करतात).

हे सगळे फॉर्म, आणि इतर कागदपत्र गोळा करण्यात आमचा बराच वेळ गेला (२ ते ३ महिने). [ह्यातल्या काही गोष्टी नोटराइज सुद्धा करून घ्यायच्या असतात]. सुदैवाने, पोलीस क्लीयरन्सला आम्हाला आमच्या नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये कुठल्याही प्रकारची अडवणूक झाली नाही. आमचे रिपोर्ट त्यांनी कमिशनर ऑफिसला पाठवले, आणि तिथून ते सोफोशच्या ऑफिसला यथावकाश पोचले. एकदा का तुम्ही तुमचे सगळे फॉर्म सोफेश मध्ये दिले, कि मग तुमचा केस पेपर तयार होतो, आणि तुमच्या केसला एक सोशियल वर्कर असाइन केला जातो. ह्या पुढे तुमचे सगळे संवाद, केस बद्दल उपडेट हे तुम्हाला ह्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून मिळत जातात.

२. सायकॉलॉजिकल कॉऊन्सेलिंग :- तुम्ही तुमचा फॉर्म आणि इतर पुरावे सादर केल्यानंतर, सोफेश मध्ये दोघांची एक मुलाखत वजा कॉन्सलिंग त्यांच्या इथल्या एका तज्ञ् सायकॉलॉजिस्ट कडून झाली. ह्यात आधी आम्हा दोघांना एकत्र बसून प्रश्न विचारण्यात आले, नंतर दोघांना स्वतंत्र बसवून दोघांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या. आमच्या लिहिलेल्या निबंधावर त्यांनी प्रश्न विचारले, आमच्या शंकांचे निरसन केले. [ह्याचा हेतू हा, कि मूल ज्या घरात वाढणार आहे, ज्या आई वडिलांबरोबर राहणार आहे, त्यांचं मानसिक स्थिती, विचार करण्याची पद्धत, फॅमिली व्हॅल्यू काय आहेत हे समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे]

३. होम व्हिझिट:- तुमच्या राहत्या घरी येऊन तुमच्या इतर कुटुंबियां सोबत चर्चा केली जाते, तुमचं राहते घर कसं आहे, ते सगळं बघून, सोशल वर्कर त्याचा एक लेखी रिपोर्ट बनवून तुमच्या केस पेपर सोबत जोडते.

हे सगळे सोपस्कार पार पडल्यावर, येतो तो काळ म्हणजे बस इंतजार! बरेच महिने असेच निघून जातात. अधून मधून सोशल वर्करशी फोन वर बोलून काही उपडेट आहेत का ते चेक करत राहिलो. (त्यांना हे सगळे केस पेपर्स घेऊन कोर्टात एक जॉईंट पेटिशन फाइल करावे लागते. ह्या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागतो. तसेच ह्या दरम्यान, तुम्ही दिलेल्या दत्तक मुलाबद्दलच्या अपेक्षेप्रमाणे ते प्रोफायलिंग करून शोध सुरु ठेवतात. पण ह्या सगळ्याची आम्हाला त्यांनी पूर्वकल्पना दिली होती, कि केस पेपर बनवून नंतर साधारण एक वर्ष भराचा काळ सहज जाऊ शकतो, त्यामुळे आम्ही उत्सुक (excited) होतो, पण अधीर (impatient) नक्कीच न्हवतो.

सन २०१२, संपला तो काही कडू आठवणी घेऊन, माझे वडील ऑक्टोबर मध्ये गेले. त्यांची माझ्या मुलीला भेटण्याची इच्छा अपूर्णच राहिली. हॉस्पिटल मध्ये असताना, त्यांनी बायकोला गंमतीत सांगितले, "तिला लवकर घरी आणा, आता मला बोर्डिंग पास मिळालेला आहे!" त्यांच्या इच्छेनुसार आम्ही त्यांचे देहदान केले, स्किन डोनेट केली [ह्या बद्दल नंतर कधीतरी]

सन २०१३ च्या जून महिन्यात, आम्हाला हवा असणारा तो फोन एकदाचा आला! तुमची केस अँप्रूव्ह झाली आहे, आणि तुमच्या साठी एक मुलगी आहे, तुम्ही येऊन बघून जाऊ शकता! मी आणि बायको तडक "तिला" भेटायला सोफोश च्या ऑफिस मध्ये पोचलो!

क्रमशः

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
मला जमेल तसे लिहितोय, शुद्धलेखनाच्या चुकांबद्दल आताच दिलगीर व्यक्त करतो! आधीच्या धाग्यावर आलेल्या प्रतिक्रिया बघून, अजून बरीच माहिती टाकेन, जेणेंकडून लोकांना असलेल्या प्रश्न आणि शंकांचे माझ्या परीने निरसन होईल.

रेखाटनप्रकटन

प्रतिक्रिया

एस's picture

27 Oct 2016 - 2:47 pm | एस

वाचतोय.

नाखु's picture

27 Oct 2016 - 2:48 pm | नाखु

आणि अनुभवातून आलेले असल्याने अस्सल आहे.

यशोधरा's picture

27 Oct 2016 - 2:48 pm | यशोधरा

छान लिहिताय. वाचते आहे.

त्रिवेणी's picture

27 Oct 2016 - 3:28 pm | त्रिवेणी

खरच उपयुक्त लेख आहेत.
जर पुरुषांनी मनाची उदारता दाखवली तर एका जिवाला आणि एका स्त्रीला नविन आयुष्य मिळू शकते.

अमृत's picture

27 Oct 2016 - 3:47 pm | अमृत

सहमत.

अमृत's picture

27 Oct 2016 - 3:46 pm | अमृत

उत्सुकता लागून राहिलीय... पुभाप्र.

मोदक's picture

27 Oct 2016 - 3:47 pm | मोदक

वाचतोय..!

अनन्न्या's picture

27 Oct 2016 - 4:45 pm | अनन्न्या

बाबा नाही भेटू शकले याचे वाईट वाटले.

मागे मिपावरच 'आपला अभिजित' यांची दत्तकविधान हि अप्रतिम लेखमाला वाचली होती. त्यावेळी धाग्यावर या विषयावर जास्त माहिती मिळाली नव्हती. आता ती माहिती मिळवायला नक्की आवडेल.

पिलीयन रायडर's picture

27 Oct 2016 - 6:50 pm | पिलीयन रायडर

खुप माहितीपुर्ण लिहीताय. अनेकांना फायदा होईल. पण ह्या सोबतच तुम्ही तुमच्या मानसिक तयारीबद्दलही लिहाल का? जसे की दत्तक घ्यायचा निर्णय तुम्ही काय काय विचार करुन घेतलात? अनेकदा अशाही केसेस पाहिल्या आहेत ज्यात अनाथालयातल्या बाळांची हिस्टरी जरा वेगळी असते. ज्याअर्थी ते इथे आलेय, त्याअर्थी त्याने इतक्या लहान वयातच खुप विपरीत परिस्थिती पाहिली असेल, किंवा गर्भात असताना पासुनच मातेला ते मुल नको अशीच भावना मनात असेल. तर असे मुल दत्तक घेताना मनाची तयारी तशीच हवी. आमच्या एका ओळखीच्यांनी जी मुलगी घेतली ती एकेठिकाणी पोलीसांनी वेश्या व्यवसाय करताना धाड घातली तेव्हा मिळाली होती. ती फार गोड मुलगी होती. पण पुढे जाऊन मनात बसलेल्या भीतीने की काय, ती थोडी भेदरुन वागायची. अर्थात त्या दांपत्याने तिला प्र चं ड माया लावुन त्यातुन बाहेर आणले. त्यांचे विचार फारच सुस्पष्ट आणि ठाम होते. तुम्ही तुमची विचारप्रक्रिया लिहु शकलात तर अनेकांना हा निर्णय घेताना मदत होऊ शकते.

अवांतर -

त्यांच्या इच्छेनुसार आम्ही त्यांचे देहदान केले, स्किन डोनेट केली [ह्या बद्दल नंतर कधीतरी]

हे नक्की लिहा. नुकताच इथे एक धागा आला होता देहदानाचा. त्यात अजुन भर पडेल. मला स्वतःलाही देहदान करायचे आहे. तेव्हा ह्या ही लेखाच्या प्रतिक्षेत.

हे नक्की लिहा. नुकताच इथे एक धागा आला होता देहदानाचा. त्यात अजुन भर पडेल. मला स्वतःलाही देहदान करायचे आहे. तेव्हा ह्या ही लेखाच्या प्रतिक्षेत.

+१

बाकी मस्त लिहिताय

Nitin Palkar's picture

29 Oct 2016 - 7:55 pm | Nitin Palkar

देहदान आणि अवयवदान या विषयी मुंबईतील राजहंस प्रतिष्ठान ही संस्था खूप सजगपणे ठोस कार्य करत आहे. आपटे काका ९८२०० ७८२७३ अथवा गणेश हिरवे ९९२०६ ४१३८८ यांच्याशी संपर्क साधल्यास सर्व माहिती मिळू शकेल.

सुबोध खरे's picture

27 Oct 2016 - 7:59 pm | सुबोध खरे

तुमच्या पाककृती सरस आहेत कि तुमचे या विषयावरील लेखन या विचारात पडलो आहे.
हि प्रक्रिया अजून सविस्तर लिहिली असती तर बरे झाले असते असा एक विचार चमकून गेला. आपण लिहाल ते मान्य आहेच.
बाकी स्वतःचे एक मूल असताना दुसरी मुलगी दत्तक घ्यायला मनाचा फार मोठेपणा लागतो. लग्न होण्याच्या अगोदर पासून वंध्यत्व या विभागात काम करीत होतो आणि त्या रुग्णांची होरपळ ही पाहत होतो. त्यामुळे आपल्याला मूळ झाले नाही तर काय हा विचार सतत मनात असे . तरीही मूल दत्तक घेणे मला मानसिक दृष्ट्या तेंव्हाही जमले नसते आणि आताही जमेल असे वाटत नाही हे स्वच्छ पणे कबुल करतो. स्वतःला एक मूल असताना इतके सोपस्कार करून दत्तक घेणे हे तर अशक्यच.
म्हणूनच आपल्यासारख्या निर्णय घेणाऱ्या युगुलांचे मनापासून अभिनंदन.
--/\-- --/\-- --/\-- --/\--

ट्रेड मार्क's picture

27 Oct 2016 - 11:30 pm | ट्रेड मार्क

सहमत!

माहितीपुर्ण धागा.

रेवती's picture

27 Oct 2016 - 9:07 pm | रेवती

मग पुढं काय झालं? धडधड वाढलिये.
फक्त एक गोष्ट म्हणून वाचत नाहीये, त्यात गुंतून गेलिये.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Oct 2016 - 9:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्या शद्बांत तुमचे अनुभव सांगता आहात हेच उत्तम आहेत. शुद्धलेखनाच्या चुकांबिकांची काळजी करू नका. ही फार महत्वाची व उपयोगी माहिती इथे सांगत असल्याबद्दल धन्यवाद !

नि३सोलपुरकर's picture

28 Oct 2016 - 12:32 am | नि३सोलपुरकर

वाचतोय..!

पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.

छान, वाचतेय. खूप खूप शुभेच्छा !!
आमची पण फार इच्छा होती, खूप वर्षांपूर्वी असा एक प्रयत्न आम्ही केला कारा तर्फे केला होता त्यावेळी procedure अतिशय किचकट होती आता सुधारली वाटते. देहदानाच्या बाबतीत नक्की लिहा. माझ्या बाबानी देहदान केले होते. मी आणि माझ्या नवऱ्याने पण त्याची procedure इथे (युरोप मध्ये) करून ठेवली आहे पण मला वाटते भारतात सुद्धा करून ठेवावी लागेल. त्याबद्दल माहिती मिळाली तर आवडेल.

महत्वपूर्ण लेख.तसेच एक मूल असताना एवढी धडपड करुन दुसरे दत्तक घेणार्या तुम्हा दोघांना दंडवत.

पाटीलभाऊ's picture

29 Oct 2016 - 7:41 pm | पाटीलभाऊ

वाचतोय...

खूप महत्वपूर्ण माहीती देताय.
पु.भा.प्र.