भारतीय लष्कराने नुकतीच दहशतवाद्यांविरोधात यशस्वी सर्जिकल स्ट्राईक केली. त्यासाठी संपूर्ण देशवासीयांनी लष्कराचे मनापासून अभिनंदन केले. सैनिक हो !! आम्हाला तुमचा अभिमान आहे !!
आता गंमत बघा. इकडे सरकार समर्थकांची छाती छप्पन इंचाने भरून आली असताना त्यावर लगेच जुन्या-जाणत्या नेत्याचे उत्तर आले.
"अरे असल्या छप्पन स्ट्राईक्स केलत्या आम्ही सत्तेत असताना, पण आम्ही कधी हिशोब नाही ठेवला."
बरोबरच आहे म्हणा, नाहीतरी कुठल्या गोष्टींचा हिशोब ठेवलाय यांनी आजपर्यंत?? खोटं का बोलावं..कश्शाकश्शाचा म्हणून हिशोब नाही. आता तुम्हाला वाटेल, कमीतकमी स्वतःच्या वयाचा आणि अनुभवाचा तरी हिशोब ठेवावा. नाही !!!
ह्यांचं कसं झालंय माहितेय का ?
आम्ही कोण म्हणुनी काय पुसता? आम्ही असू नासके !
पण,
देवाचे दिधले अशी जीभ आम्हा,वाट्टेल ते बोलावया..
अन
आम्हांला वगळा- रिकामे होतील हे सात-बारे !
आम्हांला वगळा-विकेल कवडीमोलावरी हे पुणे!! (अधिक उर्वरित महाराष्ट्र!)
परवाच कुठेतरी हे खाजगीमध्ये बोललेत म्हणे (खाजगी असो की जाहीर, ह्यांच्या बोलण्याची व्हॅलिडिटी तोंडातून शब्द बाहेर पडेपर्यंतच असते. कितीतरी शब्द तर जीभ आणि ओठांच्यामध्येच कॉलबॅकच्या आदेशाची वाट बघत रेंगाळत राहतात!)
"अरे काय चाललंय काय ह्या पुरोगामी महाराष्ट्रात? एवढी मोठी सर्जिकल स्ट्राईक झाली आणि कोणी साधं आमचं मत विचारायलासुद्धा येत नाही! आमच्या सुसंस्कृत असण्याचा हा पुरस्कार? वा रे वा! तिकडे मोर्चे निघतात त्यावेळी बरं आमचंच नाव दिसतं सगळ्यांना, आणि आता ? हा जातीयवाद नव्हे तर काय? लष्करी कारवाया किती गोपनीय असतात हे काय आम्हाला ठाऊक नाही का ? पत्रकार परिषदा काय घेता कारवाया जाहीर करायला? काय तर म्हणे त्या गोऱ्यांना इम्प्रेस करायला !! अरे दै. सकाळचा अंक टाईम्स स्केवरला सुद्धा मिळतो. त्यात वाचून कळलं असतंच की त्यांना. हे बघा, माझं स्पष्ट म्हणणं आहे, वीज,दुष्काळ, रस्ते,महागाई,शेतकरी आत्महत्या एवढे मुद्दे निवडून जिंकायला पुरेसे असतात. गरज पडलीच तर 'जात'आहेच की ! सर्वपक्षीय अलिखित ठरावच आहे तसा ! हे असले दहशतवाद वगैरे मुद्दे ऐनवेळी उपस्थित करणे ही चिटींग आहे ! जरा दिलदारपणे निवडणूक लढवा की. असल्या छप्पन स्ट्राईक्स केल्या आम्ही. पण कधी त्या जाहीर केल्या नाहीत. शेवटी देशहित महत्त्वाचं ! आणि असल्या कारवायांचे पुरावे मागणं हा मूर्खपणा आहे. तुम्ही आम्हाला मागू नका, आम्ही तुम्हाला मागत नाही ! तुमच्या मंत्र्यांनी जरा राजकीय प्रगल्भता दाखवायला हवी !”
-- एक प्रगल्भ राजकीय नेता.
आता तुम्हाला वाटेल की ह्यांच्या बोलण्यात जरा," अम्म्म..आम्ही नाही जा!!" असा सूर दिसतोय. पण तसं नसतंय ते. राजकारणातल्या बुद्धीबळाचे ग्रँडमास्टर आहेत ते. समोरच्या राजाला शह देण्याचे पारंपारिक डावपेच नसतात त्यांचे. ते शत्रुपक्षाच्या वजिराला बाहेरून पाठिंबा देतात आणि कार्यभाग साधतात.
शेवटी,
"छप्पन डाव जिंकलेत हो असे !!"
प्रतिक्रिया
10 Oct 2016 - 3:30 pm | नाखु
छप्पन टिकली करो हीच सदिच्छा !!!
लेखाला बरीच कात्री लावून १५ मिनिटाची शॉर्ट फिल्म बनवली आहे.
11 Oct 2016 - 8:44 pm | chitraa
अफजल कसाबच्या फाशीचेही पुरावे भाजपावाले मागत होते ना ?
12 Oct 2016 - 7:23 am | टवाळ कार्टा
अगदी,त्याला तर सगळ्यांसमोर जाहीररीत्या हात पाय तोडून मारायला हवे होते
12 Oct 2016 - 7:57 pm | अशोक पतिल
काय त्याचा दरारा !!! टीका असली म्हणुन काय झाले ? त्याचा जप केल्याशिवाय आमचा दिस सुरु होत नाही. हा हा हा.
आताच परीर्कर बोलते जाहले की UPA कारकीर्दीत कधीही स्ट्राइक्स जाहल्या नाहीत, तर कोन्गी चा एक वाचाळ वीर त्यांना चुल्लुभर पाण्यात बुडायला सागंतो आहे.काहीही ..
12 Oct 2016 - 8:44 pm | संदीप डांगे
=))