भाग १
------------------------------------------------------
चार्ल्स बुकोवस्कीबद्दल वाचताना आणि लिहिताना त्याची अजून ओळख करून घेण्यासाठी त्याच्या कविता वाचायला सुरुवात केली. शाब्दिक पाल्हाळाविना, यमक गमकाशिवाय लिहिलेल्या त्याच्या बहुतेक कविता स्वतःशी वाचणंसुद्धा सोपं नाही. अकारण नजरेत रोखून बघणारी व्यक्ती जशी समोरच्याला अस्वस्थ करते, तसं वाटायला लागतं.
त्यातल्या त्यात सौम्य अशा आणि जालावर उपलब्ध असलेल्या काहींचा भावानुवाद इथे द्यायला सुरुवात करत आहे. (प्रताधिकाराबाबत कल्पना नाही, जालावर सहज उपलब्ध असलेल्या कवितांची निवड केली आहे.)
आवडल्यास धन्यवाद चार्ल्सचे. नावडल्यास मर्यादा माझी..
या आधीच्या लेखात त्याच्या लहानपणाबद्दल उल्लेख केला होता, पहिली कविताही त्याच संदर्भात निवडली आहे. हेमिंग्वे ची Iceberg Theory चार्ल्स ला माहीत होती का ते ठाऊक नाही. पण ही ‘A smile to remember’ वाचल्यावर तेच आठवतं.
------------------
लक्षात राहिलंय ते हसू.
तेव्हा आमच्याकडे शोभेचे मासे होते
टेबलावरच्या काचेच्या भांड्यातच नेहमी गोल गोल पोहणारे ते मासे.
शेजारी हेलकावे खात खिडकीला झाकून टाकणारे जाड पडदे.
आणि तिथेच उभी असलेली माझी आई. नेहमी चेहऱ्यावर हसू असणारी.
‘आनंदी असावं रे हेन्री-’ ती मलाही सांगायची.
आणि बरोबरच होतं तिचं: ज्याला शक्य असेल त्याने आनंदी असायलाच हवं.
पण माझा धिप्पाड बाप मारायचा तिला, मलाही.
त्या बलदंड शरीरावर जे काही नकळत हल्ले करायचं - त्याच्याच आतून..
त्या ‘आतल्याचा’ प्रतिकार करताना गोंधळलेला, आतल्याआत धुमसणारा बाप झोडपत सुटायचा. नेहमीच.
माझी आई... बिचाऱ्या मासोळीसारखी आनंदी असण्याची इच्छा करणारी. मार खात मला सांगायची, ‘हेन्री हास पाहू! तुझ्या चेहऱ्यावर कधी हसू नसतं बघ! हे बघ, असा हास...’
- माझ्या आयुष्यातलं सगळ्यात करुण हसू मी त्या चेहऱ्यावर पाहिलं असेन.
एक दिवस ते गोल गोल फिरणारे पाचही मासे पोटं वर करून उघड्या डोळ्यांनी पाण्यात तरंगू लागले. शांतपणे.
घरी आल्यावर बापाने ते सगळे मांजरीच्या पुढ्यात टाकले.
- त्याही दिवशी आईच्या चेहऱ्यावर हसू होतंच.
प्रतिक्रिया
19 Sep 2016 - 12:36 am | कवितानागेश
डोळ्यासमोर उभे राहिले सगळं आणि श्वास कोंडला!
19 Sep 2016 - 1:59 am | जव्हेरगंज
_/\_
निशब्द
19 Sep 2016 - 11:41 am | प्रभास
हेच म्हणतो... :(
19 Sep 2016 - 10:06 am | रातराणी
:(
19 Sep 2016 - 11:10 am | मारवा
मोजक्याच शब्दांत
किती प्रभावीपणे वेदना मांडलीय.
19 Sep 2016 - 2:48 pm | प्रचेतस
बुकोवस्कीचं साहित्य कधीच वाचलं नाही इनफॅक्ट त्याचं नावही कधीच ऐकलं नव्हतं.
अनुवाद आवडला.
19 Sep 2016 - 9:52 pm | इनिगोय
आभार. बुकोवस्कीचा परिचय त्याच्या लिहिण्यातून करून द्यावा हाच हेतू आहे.
23 Sep 2016 - 11:00 am | चाणक्य
असेच म्हणतो.
19 Sep 2016 - 4:44 pm | अजया
:(
अस्वस्थ होतं वाचताना.भावानुवाद अगदी जमून आलाय.
अजून वाचायला आवडेल.
लिहायची बंद करु नकोसच आता इनि!
- इनिलेखन फॅन- अजया
19 Sep 2016 - 5:15 pm | पैसा
:(
19 Sep 2016 - 6:56 pm | शिव कन्या
गुदमरायला झाले.
सुंदर अनुवाद.
19 Sep 2016 - 9:39 pm | किसन शिंदे
भावानूवाद आवडला. मूळ कविता शोधून वाचतो.
20 Sep 2016 - 11:30 am | नंदन
भावानुवाद नेमका जमून आलाय. मूळ कवितेतल्या परिणामकारक पॉजेससह.
अवांतरः यूट्यूबवर सापडलेलं हे वाचन/रेखाटन (त्यातील एक चित्र Henri Matisseचे - 'Woman Before an Aquarium')
-
20 Sep 2016 - 11:41 am | इनिगोय
मनापासून आभार नंदन, हे ऐकताना मीच केलेला अनुवाद वाचणं विलक्षण वाटलं. _/\_
20 Sep 2016 - 9:27 pm | शिवोऽहम्
मनाच्या तळाशी लकाकणार्या, फुटक्या शंखशिंपल्या
सुखांचे कवडसे, मोरपिसाचा एखादा स्पर्श
शब्दांचे चटके, उठलेले वळ, थिजलेलं हसू
आणि ऊर भरून घेऊ म्हणेतो बोटातुन निसटलेले अनुभव
असं बरंच काही साठलेलं..
21 Sep 2016 - 4:24 pm | पिशी अबोली
अयाई गं..
किती नेमकेपणा आहे तुझ्या भावानुवादात..
21 Sep 2016 - 5:22 pm | सस्नेह
किती नेमके शब्द !
21 Sep 2016 - 11:37 pm | मनिष
ह्या कवितेतली वेदना, तिची हसण्याची सांगड घातल्यामुळे निर्माण होणारा करूण उपहास हा मनाला भिडणारा/ओलावणारा आहे. तुम्ही हे सर्व नेमकेपणे तुमच्या ह्या अनुवादात उतरवले आहे.
पण कवितेची खरी खुमारी त्या मूळ भाषेतच असते असे मला वाटते - त्यामुळे कवितेचा अनुवाद नेमका पोहोचवणे फार अवघड काम आहे. मध्यंतरी गुलजा़रच्या कवितांच्या अनुवादाचा दर्जा फारच सुमार असल्याने मेहताने पुस्तक परत घेतले.
अगदीच राहवत नाही म्हणून एक सांगतो - बुकोवस्कीची थेट, शिवराळ भाषा, त्यात येणारे वेश्यांचे किंवा लैगिक संबधांचे उल्लेख हे मूळ कवितेत ते निम्नवर्गीय अमेरिकन वातावरण नेमकेपणे निर्माण करतात, पण अनुवादात ते खूप हिडीस वाटू शकते. त्यामुळे हे अनुवाद ही अगदीच निसरडी वाट आहे. मी माझ्या आवडत्या पाब्लो नेरुदाच्या एका कवितेचा अनुवाद मागे इथे दिला होता - पण तो अगदीच सुमार झाला होता आणि ती कविता अगदी सामान्य वाटत होती. ती अर्थातच माझी मर्यादा असेल, पण त्याहीपलीकडे कवितेतली उस्फुर्तता, लय, गेयता, भाषेची लाडीक, अनवट वळणे दुसर्या भाषेत उतरवणे एका मर्यादेनंतर शक्य नसते. खलिल जिब्रानची कविता आपल्याला आवडते ती त्यातल्या कल्पनांच्या अनोखेपणामुळे आणि त्याच्या आयुष्याविषयीच्या अंर्तमुख करणार्या भाष्यामुळे - माझ्या मते त्याचे 'कवितापण' अनुवादात हरवले आहे. असेच मला रविंद्रनाथ टागोरांबद्द्लही वाटते.पण बंगाली येत नसल्यामुळे रसगुल्ल्याची तहान केकवर भागवावी लागते! :P हरीवंशराय बच्चन ह्यांच्या मला अतिशय आवडणार्या 'जो बीत गयी सो बात गयी' कवितेतील काही ओळी अशा आहेत -
ह्यातल्या सोप्या हिंदी शब्दातून निर्माण होणारी लय, गेयता किंवा अनुप्रास, यमक भाषांतरात आणता येईल का? एका भाषेचे अलंकार दुसर्या भाषेला शोभतीलच असे नाही. ह्याला काही अपवाद आहेत, पण भाषा समजत असेल तर खरी मजा 'ओरिजनल' मध्येच आहे असे मला वाटते.
तुम्हाला आवडलेल्या बुकोवस्कीच्या कविता नक्कीच पोहोचवा आमच्यापर्यंत - पण कधीकधी रसग्रहणात आणि अर्थ उलगडण्यात जास्त मजा येते अनुवादापेक्षा - यावर अवश्य विचार करा! अनाहूत सल्ल्याबद्द्ल दिलगीर आहेच; पण ह्यात तुमचा अनमान करण्याचा हेतू नाही - हा अनुवाद छानच झालाय. केवळ कवितांविषयी वाटणार्या आत्मियतेमुळे हे सगळे लिहायचे धाडस केले. गैरसमज नसावा! :)
22 Sep 2016 - 2:23 am | शिवोऽहम्
+१.
जे कवितेच्या बाबतीत तुम्ही म्हटलंय ते गद्यलेखनाच्या संदर्भातही जाणवतं. इरावतीबाई कर्व्यांच्या 'युगांत'चे भाषांतर करून बघु म्हणून प्रयत्न केला होता. तेंव्हा शब्दाशब्दावर अडखळत होतो आणि संदर्भ, शब्दकोष यांच्या तळटीपा देतादेता मूळ भाषेतला सहजपणा गायब झाला. अर्थात ही माझीच मर्यादा असणार.
22 Sep 2016 - 12:09 pm | इनिगोय
तुमचा हाही प्रतिसाद आवडला. अनमान वाटण्याचा काहीच प्रश्न नाही.
अनुवाद का केला जातो? तर अमुक भाषा न समजल्यामुळे त्यातल्या उत्तम लेखनाशी माझ्या भाषेतला वाचक अनोळखी राहू नये एवढ्यासाठी. केवळ इंग्रजी वाचायला जमत नाही, म्हणून हे वाचायचं राहून गेलं होतं, ते अनुवादामुळे शक्य झालं अशी प्रतिक्रिया नेहमीच मिळते, या आधीच्या धाग्यावरही ती आली आहे.
मग मी अनुवाद का करावा? मला दोन्ही भाषांमधून "भावना व्यक्त करत येत असतील" तर जरूर करावा. विशेषतः ललित, आणि पद्य लेखनाच्या बाबतीत ही कसोटी लावणं मला तरी आवश्यक वाटतं. कारण यात वाचणार्याच्या बुद्धीपेक्षा भावनेशी जास्त संबंध येतो. शब्दसंग्रह, भाषेची जाण हे तर झालंच. पण अनुवाद आणि भाषांतरातला फ़रक हा शब्दांच्या अचूक निवडीवर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, मूळ कवितेत हेन्रीच्या बापाची उंची नोंदवली आहे, त्याला इथे धिप्पाड शब्द वापरावा असं मला वाटलं. या शब्दाच्या उच्चाराने वाचकाला त्याच्या मनानुसार हेन्रीच्या बापाचं रूप डोळ्यासमोर आणायची मुभा मिळते, तो त्याचा स्वत:चा अनुभव अप्लाय करू शकतो, ती त्याची कविता होत जाते. तेच जर ६ फ़ूट् २ फ़्रेम् असं तंतोतंत सांगू गेलं तर मग ते पोकळ शब्द वाटू लागतात. कारण तसं मराठीत आपण सहसा म्हणत नाही. तुम्ही अनुवादाचा निसरडेपणा म्हणता आहात तो हा असावा. हॅरी पॉटर चे अनुवाद हे याचं चांगलं उदाहरण आहे.
बुकोव्स्कीची शिवराळ भाषा आणि तत्सम उल्लेख मराठीत आणणं अशक्य नाही, कारण भाषेचा तो स्वभाव मराठीतही आहेच. मात्र अनुवाद करणार्याला त्या प्रकारच्या मराठीतून सहजपणे व्यक्त होता येत असेल तरच ते अस्सल वाटेल आणि तरीही हिडिस वाटणार नाही. यमकाबाबत मात्र अत्यंत सहमत, अशा कविता प्रभावीपणे अनुवादित करणं फार अवघड आहे. आणि त्याऐवजी मुळातून वाचन जास्त परिणामकारक ठरतं.
अनुवादासाठी लेखन निवडताना मी नेहमी मूळ भाषेतूनच कविता, कथा निवडल्या आहेत. कारण ज्याने मूळातून इंग्रजीत भाषांतर केलं त्याच्या मर्यादा + शिवाय माझ्या स्वत:च्या मर्यादा अनुवादाला लागू होतात आणि अर्थ डायल्युट होत जातो. ओंजळभर पाणी एकाने दुसर्याला देत जावं तसं प्रत्येकाचे हात ओले होतात, पण शेवटच्यापर्यंत जेमतेम निम्मं पोचतं.
दुसरं महत्त्वाचं कारण हे की मूळ लेखन वाचलं असेल तर लेखकाचा स्वभाव समजत जातो. आणि तो अनुवादात आणता येतो. इथे मी केवळ बुकोव्स्कीच्या कवितेचीच नाही तर त्या कवीचीही ओळख करून दिली आहे. तेच पाब्लो नेरुदा, जिब्रान, टागोर, विल्यम ब्लेक, एमिली डिकिन्सन किंवा सगळ्यांनाच लागू. रुमि अतिशय आवडता असला तरी त्याच्या कविता अनुवादित करण्याचं धाडस मला अजूनही होत नाही, कारण मी रुमि मुळातून वाचलेला नाही.
हे ध्यानात ठेवून अनुवाद केला तर मूळ भाषेतली खुमारी (किती अचूक शब्द :) ) वाचकापर्यंत अलबत पोचवता येते हा वाचक आणि अनुवादक म्हणून नक्कीच सांगेन.
अनुवाद, रसग्रहण, स्वतंत्र लेखन हे सर्व प्रकार हाताळत असल्याने कवितेचं रसग्रहण हा प्रकार म्हणजे एखाद्या खाद्यपदार्थाचं वर्णन करण्यासारखं आहे. कितीही समजावून सांगितलं तरी चव समजत नाही, पोट भरत नाही. पदार्थ स्वत: तयार करून खिलवण्यातली मजा त्यात नाही. हे अर्थात माझं मत..
(गुलजारच्या कविता मराठीत करणं मला आवडतं, त्या अनुवादित पुस्तकातल्या कविता वाचून खरंच फार दु:ख वाटलं होतं. दुर्दैवाने भाषांतर आणि अनुवाद यात गल्लत होऊ लागल्याने या अतिशय चांगल्या लेखन प्रकाराची अप्रतिष्ठा होत चालली आहे..)
अनुवाद या जिव्हाळ्याच्या विषयावर तुमच्या प्रतिसादामुळे हे सारं लिहिलं. अजूनही लिहिता येईल. पण असो.
23 Sep 2016 - 3:11 am | मनिष
सगळ्यात आधी माझ्या प्रतिसादातील कळकळ समजून घेतल्याबद्द्ल धन्यवाद. तुमचा प्रतिसाद आवडला आणि बहुतांशी पटला. त्यावर माझे थोडेसे...
बरोब्बर!!!! त्याअर्थाने असा अनुवाद हा भावाअनुवाद असतो. तुमची धिप्पाड शब्दाची निवड मलाही आवडली होती.
मान्य! अगदी गोलपीठापासून ते सध्याच्या वेदिका कुमारस्वामीपर्यंत कित्येक उदाहरणे आहेत. पण ते कसे केले आहे ह्यावर अवलंबून आहे. ह्याच संदर्भात 'ऑथेल्लो' आठवतो - त्यातील वजनदार, भाषा जशीच्या तशी आणण्याऐवजी विशाल भारदद्वाजने "ओंकारा" मध्ये गुंडा आणि त्यांची ती उत्तर प्रदेशातील ग्रामीण वळणाची शिवराळ भाषा निवडली. ते रुपांतर अतिशय अनोखे होते. किंबहुना त्याची ही शेक्सपीअरची ट्रायलॉजी (मॅकबेथ/मकबूल - त्यातील चेटकीणींना पर्याय म्हणून नसीर-ओम, ऑथेल्लो/ओंकारा आणि हॅम्लेट/हैदर) हे रुपांतर किती अस्सल आणि ह्या मातीतले वाटू शकते ह्याचा वस्तूपाठ आहे. चित्रपटांच्या दर्जाविषयी मतांतरे असू शकतील, पण त्याने हे जे बनवलेय - ते फारच अफाट आहे. असो!
केवळ यमकच नाही. अनुप्रास, यमक, स्लेष, कवितेत वापरलेला एखादा फॉर्म (वृत्त, शब्दांची संख्या, जशी देवदार मध्ये आहे - त्यातून निर्माण होणारी लय) अशा बर्याच गोष्टी असतात. विनोदही कधी-कधी अनुवादात हरवतो....
माझं मत थोडं वेगळं आहे....रसग्रहणात जर मूळ कविता, त्यातील ओळी दिल्या तर ते खाद्यपदार्थांचं वर्णन करण्यासारखं कसं होईल? उलट मूळ खाद्यपदार्थाची चव दिल्यासारखं होईल. याउलट फसलेला अनुवाद म्हणजे पिझ्झा म्हणून डोश्यावर कांदा-सिमला मिरचीचे टॉपिंग लावून चीज टाकल्यासारखे होईल. त्यापेक्षा मूळ पिझ्झ्याचाच एखादा तुकडा दिलेला चांगला नाही का?
हे विशेषतः इंग्लिश कवितांच्या बाबतीत मला जास्त संयुक्तिक वाटते. इंटरनेत वापरणारे आणि मिपासारख्या साईटवर वावरणार्या पण इंग्लिश न समजणार्या वाचकांची संख्या माझ्या मते नगण्य असेल. अर्थात इंग्लिश समजत असले तरीही विविध पुस्तके मिळवून (शिक्षण किंवा कामासंबधी पुस्तके सोडून) ती वाचणारे फारसे नसतील हे पतते. पण माझ्या मते त्यांच्यासाठीही अनुवादापेक्षा रसग्रहण, परिचय, परिशीलन, समीक्षा ह्या गोष्टी प्रभावी ठरू शकतात. अर्थात हे माझे मत झाले....
शिवाय गद्याच्या बाबतीत कवितेसारखा छोटा पण एका अर्थाने स्वयंपुर्ण तुकडा/घास वाचकांना नाही देता येत. कवितेत मूळ कविता घेऊन त्याच्या संदर्भाच्या किंवा अर्थाच्या कित्येक छटा उलगडता येतात. उर्दू कवितेच्या बाबतीत ते अनेकवेळा केले जाते आणि हेही खूप आनंददायी असते. फराज़च्या 'रंजीशही सही...' वर सध्या खूप छान चर्चा चालू आहे. त्यामुळे हे 'खाद्यपदार्थाचं वर्णन करण्यासारखं आहे' असं मला वाटत नाही... उलट ते खवैया होऊन थोडा 'गाईडेड' रूचीपालट करण्यासारखे वाटते.
माझेच एक उदाहरण देतो...मी मराठी किंवा इंग्लिश दोन्हीतही सहजतेने लिहू, बोलू, वाचू शकतो. लिहिणे आणि वाचणे ह्यांत मराठीपेक्षाही कदाचित इंग्लिशमध्ये जास्त कंफर्टेबल आहे. पण तरीही मी कधी इंग्लिश कवितांचे पुस्तक विकत घेतले नव्हते (मराठीत कित्येक कवितांच पुस्तके संग्रही आहेत.) २-३ वर्षांपुर्वी अवचितच बुकोवस्कीची मूळ 'Don't write' कविता वाचली. त्यावेळेसच्या माझ्या मनस्थितीमुळे ती फारच भावली. मग 'blue bird' गवसली - स्वतःच आधी लिहिलेली निळ्या पक्षाची कविता आठवून शहारलो (त्याविषयी आणि बुकोवस्कीविषयी मी इथे मिपावर लिहिले होते) मग नेटवर त्याच्या अजून कविता वाचल्या आणि मग बुकोवस्की अगदी माझाच कवी झाला - त्याचे ४०० पानांचे कवितांचे पुस्तकही घेतले ते मूळ कविता वाचून. अनुवाद वाचून कदाचित नसते घेतले...
अजून सांगू का? मी काही नेमाने, खूप कविता लिहिणारा कवी नाही, पण खूप लहानपणापासून कविता ह्या माझ्या व्यक्त होण्याचे, किबहुना अस्तित्वाचे एक अपरिहार्य माध्यम आहे. मला जेंव्हा कवितेच्या ओळी स्फुरतात, तेंव्हा त्या-त्या भाषेतच स्फुरतात. मध्ये मिपासाठीच मी माझ्याच इंग्लिश कविता अनुवाद करता येतील का ह्याचा विचार केला होता, पण मनासारख्या होत नव्हत्या म्हणून नाही लिहिल्या. असो.
मी सरसकट अनुवादाच्या विरोधात अजिबात नाही. गद्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर राम पटवर्धनांचे 'पाडस' किंवा शांता शेळक्यांचे 'चौघीजणी' हे अनुवाद लगेच आठवतात. कित्येक चरित्रांचे किंवा तंत्रज्ञानाविषयी पुस्तकांचे दर्जेदार अनुवाद व्हावेत असे मला मनापासून वाटते.
पण स्वतः गुलजा़रांनी केलेला कुसुमाग्रजांच्या कवितांचा अनुवाद मला फारसा आवडलेला नाही ('फक्त लढ म्हणा' चा अनुवाद वाचून बघा). अर्थात गुलजारच्या नावामुळे काही इतर लोकांना कुसुमाग्रज माहित होतील, पण......
एखाद-दुसर्या जमलेल्या अनुवादाची गोष्ट वेगळी, पण कवितांच्या पुस्तकांचा, किंवा मोठ्या प्रमाणावर कवितांचा अनुवाद हे वेगळेच शिवधनुष्य आहे, ते पेलेलच असे नाही. आता 'शिवधनुष्य' हाच शब्द घ्या - गद्यात इंग्लिश अनुवाद करतांना एक मोठा परिच्छेद लिहून किंवा तळटीप लिहून आपण ती संकल्पना समजावू शकतो, पण कवितेत हे करत बसलो तर तिचे कवितापण हरवून जाते. किंवा 'अश्वत्थाम्याची वेदना' ही कवितेतली ओळ घ्या - किती काही आहे ह्या दोन शब्दांमध्ये! भळभळणारी जखम/दु:ख तर आहेच, पण तिचे चिरंतन असणे हे अव्यक्त राहूनही नेमकेपणे पोहोचवले आहेत - हे त्या संस्कृतीचे संचित आहे. ते परकीय भाषेत, कवितेतली एक ओळ म्हणून अनुवादीत करणे, तेही कवितेचे 'कवितापण' न हरवू देता, हे कसे करणार?
असो! एक वाचक म्हणून जर मला ती भाषा येत तर मी ते पुस्तक मूळ भाषेतच वाचीन, अनुवादीत नाही. आणि कवितांच्या बाबतीत तर हे प्रकर्षाने जाणवते. अर्थात माझे वाचक म्हणून हे मत असले तरी इतरांना त्यांच्या मातृभाषेत किंवा सवयीच्या भाषेत कविता वाचायला आवडू शकतात ह्या मताचाही आदर आहेच!
असो! लेखापेक्षा प्रतिसादच मोठा झाला. पण कविता, त्यात बुकोवस्की आल्यावर मलाही राहवले नाही. इतक्या छान चर्चेबद्द्ल तुमचे आभार!
24 Sep 2016 - 3:59 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
अनुवाद आणि मुळ रचना दोन्ही अप्रतिम...
__/\__!!
25 Sep 2016 - 3:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अनुवाद आवडला.
-दिलीप बिरुटे