तुम्हाला कोण व्हायचे आहे आयफोन-कर, एनड्रोइड-कर कि विंडोज-कर
... आता तुम्हाला आयफोन-कर व्हायचं का? जरूर व्हा. आमचे काही म्हणणे नाही. पण मुख्य सल्ला असा, की पुन्हा विचार करा अगदी आग्रहच असेल, तर मात्र कंबर कसून तयारी केली पाहिजे, आणि एकदा तयारी झाली, की त्या सारखी मजा नाही ,तुम्हाला सांगतो.
पहिली गोष्ट म्हणजे- कसलाही न्यूनगंड बाळगू नका. आणि प्रत्येक फोन च्या फिचर वरून मतभेद करायला शिका. म्हणजे आपल्या फोन मध्ये आहे का, आपल्या फोनमधील फिचरचा दर्जा काय, एकूण उपयोग काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं. म्हणजे आता "स्मार्ट-फोन खरा कसा असला पाहिजे?" या विषयावरती, आपण फ़क़्त फोन करणे, लघु संदेश करणे इतकाच फोन वापरता, हे विसरून मत ठणकावता आले पाहिजे. स्मार्ट-फोन खरा कसा असला पाहिजे? - ठोका.
दिवसातून एकदा तरी "स्टीव जॉब्स होता तेव्हा ..." हे म्हणायलाच पाहिजे. हे वाक्य म्हणायला वयाची अट नाही. इथे म्हणजे दहा वर्षाचा मुलगा सुद्धा चाळीशीच्या अनुभवाचे गाठोडं असल्यासारखं ते चारचौघांपुढे उघडत असतो. त्यामुळे "च्यायला, स्टीव जॉब्सच्या वेळी हे असलं नव्हतं" हे वाक्य कॉलेज, ऑफिस, दुर्गा, के एफ सी, सी सी डी, आणि युरो किड्स, कुठेही ऐकायला मिळेल, "स्टीव जॉब्सच्या वेळी ते तस नव्हतं!"
आयफोन-कर व्हायला कसल्यातरी गोष्टीचा जाज्ज्वल्य अभिमान हवा- नुसता नाही, जाज्ज्वल्य अभिमान. मग तो अगदी स्टीव्ह जॉब्स चा, किंवा एपल चाच असला पाहिजे असे काही नाही. म्हणजे आपण आयफोन किती महाग घेतला, किती वेळ रांगेत उभे होतो, सीम कार्ड कसे कट केले ह्या पर्यंत कुठल्याही गोष्टीचा असला तरी चालेल. पण जाज्ज्वल्य अभिमान हवा. मतभेद व्यक्त करायला या जाज्ज्वल्य अभिमानाची फार मदत होते. म्हणजे ब्लू-टूथ किवा डाऊनलोडच्या ऐवजी, आय-ट्युन्स मधून उगाच गाणी विकत घेणे, वायरलेस सिन्क सतत करणे, एस डी कार्ड च्या ऐवजी आय-क्लाऊड वर गोष्टी ठेवणे - अशी त्या त्या अभिमानाची नीट वाटणी करता येते आपल्याला. आपला मतभेद केवळ खासगी मध्ये व्यक्त करून आयफोन-कर थांबत नाहीत. अधून मधून फेसबुक वर, आपल्या ब्लोग वर आयफोन बद्दल स्तुती लिहावी लागते इतर ओ एस चा अपमान करावा लागतो. इमेल ला मुद्दाम "सेंट फ्रॉम आयफोन !" अशी स्वाक्षरी द्यावी लागते. त्यासाठी लेखनाची स्वातंत्र्य शैली कमवायची, हे अत्त्यंत आवश्यक आहे.
थोडक्यात म्हणजे आयफोन-कर व्हायचं असेल, तर म्हातारपणा पर्यंत सगळे सोफ्टवेअर आणि अभिमान विकत घेऊन वापरणाच्या दिशेने वाटचाल करायच धोरण सांभाळावे लागते.
प्रतिक्रिया
14 Aug 2016 - 1:08 am | नेत्रेश
चांगले जमले आहे.
- पुर्वाश्रमीचा आयफोन-कर, सद्ध्याचा एनड्रोइड-कर
14 Aug 2016 - 1:38 am | मिसळपाव
जम्या, जम्या!
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.
14 Aug 2016 - 8:20 am | एस
हाहाहा! पण थोडक्यात आटोपलेत. जरा एकदोन किस्सेबिस्से टाकायचे ना आयफोनकरांचे.
14 Aug 2016 - 8:43 am | कंजूस
एका नवीन बाँड सिनेमात आहे म्हणतात किस्सा आइफोनवरून प्रिंटरला फाइल सेंड करून प्रिंट करण्याचा.
14 Aug 2016 - 10:07 am | सतिश गावडे
आय फोन का मजा तुम क्या जानोगे एंड्रोइड और विंडोज बाबू.
आय फोनमध्ये आयच्या प्रेमाचा जिव्हाळा आहे, जो एंड्रोइड और विंडोज फोनमध्ये नाही.
14 Aug 2016 - 10:17 am | कंजूस
आइचा अहम आहे तो.दादा कोंडकेची आय नव्हं.
मान'सापरीस एनढ्रं बरी.
14 Aug 2016 - 10:43 am | मुक्त विहारि
सध्या तरी आमच्याकडे नोकियाचे जुने मॉडेल आहे आणि ते अद्याप तरी बोलणे-ऐकणे व्यवस्थित करत आहे.
शिवाय सुडोकू पण आहे आणि बोनस म्हणून घड्याळ आणि ते पण अलार्म सकट.
शिवाय ते पोकेमॉन सारखी भानगड नाही आणि लगेच चार्ज होतो.
शिवाय चार्जिंग टिकते पण २-३ दिवस.
(अज्ञानी) मुवि
16 Aug 2016 - 2:22 am | टवाळ कार्टा
टॉर्च नै का त्यात?
16 Aug 2016 - 3:56 pm | मुक्त विहारि
पण जास्त वापरायची वेळ येत नाही.
14 Aug 2016 - 12:25 pm | गामा पैलवान
समोरचा फोन विंडोज किंवा सिम्बियनचा असला तरी 'तुमच्या अँड्रॉईडछाप फोनचं ...' अशा तुकड्याने संभाषणाची सुरुवात करावी. मात्र फार डिटेलमध्ये जाऊ नये. नाहीतर कोणी अँड्रॉईडवाला तुम्हाला रूट अॅक्सेस मिळवायचे सत्राशेसाठ प्रकार ऐकवेल. वर तुमचा फोन कारामुक्त (=जेलब्रोकन) आहे का असंही विचारेल. ही मात्र खरोखरंच आणीबाणीची परिस्थिती आहे. अशा वेळेस 'कारामोचन करून काय माझ्या आयफोनास जनरल अँड्रॉईडछाप बनवू का', असं बोलून एक तु.क. टाकावा.
-गा.पै.
14 Aug 2016 - 1:03 pm | योगी९००
मस्त लेख जमलाय.. हा प्रतिसाद ही खूपच छान..!!!
14 Aug 2016 - 1:39 pm | कंजूस
ब्लॅकब्री ची सर कुणालाच नाही हे आइफोनवालेही जाणून असतात.त्या दुख:वर मीठ म्हणून एक मि डॅालरस मोजून हॅकरकडून आरोपीचा आइफोन ब्रेक करवून घेतला न्यु पोलिसांनी.
15 Aug 2016 - 7:15 am | बेकार तरुण
लेख आवडला
15 Aug 2016 - 10:46 am | सरनौबत
आय-ला! मस्त जमलाय लेख
15 Aug 2016 - 10:54 am | मराठी_माणूस
मस्त.
बाकी हे दुर्गा काय आहे ?
15 Aug 2016 - 11:17 am | असंका
बहुतेक हॉटेल आहे या नावाचं टिळक रोड वर...(पुणे..)
15 Aug 2016 - 5:37 pm | चौथा कोनाडा
झक्कास लिहिलंय, विश्वेशभाऊ, म्हन्जे मस्तच जमलंय !
बघुयात तुमच्या लेखणीतून कोण कोण बाहेर येतयं !
पुलेप्र !
15 Aug 2016 - 11:38 pm | निर्धार
छान लेख..
पुलेप्र
15 Aug 2016 - 11:51 pm | श्रीरंग_जोशी
=))
बाकी आम्हा बीबी१० वाल्यांची याबाबत भूमिका म्हणजे, "आग लगे बस्ती में, हम अपनी मस्ती में".
- रंगा करवंदीकर
16 Aug 2016 - 12:54 am | चतुरंग
"काळीबेरी" ;)
(एकदशकापूर्वीकाळीबेरीलाचिप्सपुरवणारा)रंगा
16 Aug 2016 - 1:19 am | श्रीरंग_जोशी
तेच ते =)) .
16 Aug 2016 - 1:39 pm | पैसा
मस्त लिहिलंय! पण थोडक्यात आवरतं घेतलंत!
16 Aug 2016 - 1:55 pm | चिनार
मस्त जमलाय..
अजून वाचायला आवडेल..
आमची स्मार्ट फोनची व्यथा खालील दोन लेखात मंडळी आहे..
http://www.misalpav.com/node/27462
http://www.misalpav.com/node/36533
16 Aug 2016 - 1:55 pm | चिनार
आमची स्मार्ट फोनची व्यथा खालील दोन लेखात मांडली* आहे
16 Aug 2016 - 2:41 pm | गिरिजा देशपांडे
छान जमलंय.
16 Aug 2016 - 4:50 pm | अनुप ढेरे
च्यायला, पायरसी न करता गाणी विकत घेणे याबद्दल थट्टा?
17 Aug 2016 - 12:55 pm | मी-सौरभ
कल्पना विस्तार मस्त केलाय. अजुन थोडा मोठा लेख असता तर जास्त मज्जा आली असती.
17 Aug 2016 - 5:30 pm | अविनाशकुलकर्णी
मी आयफोन-कर..............मी आयप्याड -कर
17 Aug 2016 - 5:49 pm | बब्बा
मुंबईकर, पुणेकर कि नागपूरकर ह्या पु ल च्या मूळ कथाकथानातील...... "पुणेकर" ह्या स्वभावविशेषाचा छान वापर केलाय.