अकादमीला सादर केलेला अहवाल....

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
31 Jul 2016 - 7:50 pm

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक, फ्रँझ काफ्काच्या तीन कथा लिहून त्याला आदरांजली वाहण्याची इच्छा या तिसर्‍या कथेने पूर्ण करत आहे. या आदरांजलीतील हे शेवटचे पुष्प...

आदरांजली १
आदरांजली २

अकादमीला सादर केलेला अहवाल....

अकादमीच्या विद्वान सदगृहस्थांनो :

माझ्या पुर्वायुष्याचा अहवाल सादर करण्यासाठी तुम्ही मला आज येथे आमंत्रित केले, हा मी माझा बहुमान समजतो. अर्थात मी माझे पुर्वायुष्य एक मर्कट म्हणून व्यतीत केले, हे आपणा सगळ्यांना माहीत असेल हे मी गृहीत धरले आहे. ज्यांना माहीत नाही त्यांना कळावे म्हणून मी हा उल्लेख केला.

या आमंत्रणाचा शब्दश: अर्थ घेतला तर दुर्दैवाने मी खऱ्या अर्थाने आपल्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही. माझ्या पुर्वायुष्यातून मी या जीवनात प्रवेश केला त्याला आता पाच वर्षे उलटून गेली. दिनदर्शिकेत डोकाविल्यास हा काळ लहान वाटेल पण या काळातून उड्या मारताना मला तो कधीच संपणार नाही असा वाटत होता, अनंत वाटत होता. या प्रवासात मला चांगले लोक भेटले, सल्लागार भेटले, टाळ्या वाजवून कौतुक करणारे, संगीतकार भेटले. नाही असे नाही. पण तसा मी एकटाच होतो. रेल्वेच्या डब्यातील इतर कधीच रुळाच्या जवळ नसतात. हे आपले त्या (प्रवासाच्या) रुपकात राहून सांगणे क्रमप्राप्त आहे म्हणून सांगितले. मी जर स्वेच्छेने माझ्या भूतकाळाला किंवा माझ्या तरुणपणीच्या आठवणींना कवटाळून बसलो असतो तर हे परिवर्तन झालेच नसते याची मला जाणीव आहे. खरे तर कुठलीही इच्छा मनात धरायची नाही हा सर्वोच्च नियम मी स्वत:पुरता घालून घेतला होता. मी, एका स्वतंत्र कपिने स्वत:हून ते जोखड खांद्यावर घेतले. त्यामुळे माझ्या आठवणी हळुहळु दगा देऊ लागल्या आहेत. जर मानवाने मला आधीच त्या आठवणी विचारल्या असत्या तर बरे झाले असते. तेव्हा पृथ्वीला झाकणाऱ्या विशाल आकाशाच्या घुमटासारख्या त्या माझ्या भोवती दाटलेल्या असायच्या आता मात्र माझ्यातील सुधारणांमुळे तो आठवणींचा घुमट बुटका आणि अरुंद झाला आहे. इतका की, मी त्यात धड उभाही राहू शकत नाही.

माणसाच्या जगात मला सुरक्षित वाटले. माझ्या पुर्वायुष्यात उठणारी वादळे आता हळुहळु शांत झाली होती. आता वाऱ्याची गार झुळूक माझ्या पावलांना स्पर्ष करते. दुरवर असणाऱ्या ज्या भोकातून ती झुळुक येते त्याचा आकार आता इतका कमी झाला आहे की मी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर माझी कातडी सोलवटून निघेल. तरीसुद्धा मला त्यातून जाता येईल की नाही याची शंकाच आहे. अगदी खरे सांगायचे तर माझ्या दोन अवस्थांमधील फरक आणि तुमच्या दोन अवस्थांमधील फरक यात विशेष काही फरक आहे असे मला वाटत नाही. अर्थात तुम्ही मर्कट अवस्थेतून येथपर्यंत आला आहात हे तुम्हाला मान्य असेल तर. पण पृथ्वीवरील प्रत्येक भटक्याच्या टाचेत एक भिंगरी फिरत असते. अगदी चिंपांझी पासून ते अखिलिसपर्यंत. मी कदाचित तुमच्या अपेक्षा पूर्ण करु शकेन, त्यात मला अनंदच वाटेल.

मी प्रथम काय शिकलो असेल तर हस्तांदोलन करायला; हस्तांदोलनामुळे दोन व्यक्तिंमधे मोकळेपणा येतो असे म्हणतात. मग त्या माझ्या पहिल्या हस्तांदोलनाला मी माझ्या मनमोकळ्या मतांची जोड का देऊ नये ? माझा हा अहवाल अकादमीला काही शिकवेल असा माझा बिलकुल दावा नाही. किंबहुना त्यात नवीन काही आहे असे मला वाटत नाही. कदाचित तो आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यास असमर्थ ठरेल. पण कदाचित हा अहवाल एका कपिने मनुष्य योनीत कसा प्रवेश केला व तेथे तो कसा प्रस्थापित झाला याचा पथदर्शक ठरेल आणि शिवाय मला स्वत:ला खात्री असल्याशिवाय व ती पात्रता मिळाल्याशिवाय मी या सुसंस्कृत जगाच्या प्रहसनात्मक वाटचालीबद्दल बोललोही नसतो.

मी आलो अफ्रिकेतील एका किनाऱ्यावरुन. मी कसा पकडलो गेलो याबद्दल मी नाही सांगू शकणार. पण मी त्याबद्दल जे वाचले आहे ते सांगू शकतो. हॅगेनबर्ग कंपनीचा म्होरक्या झुडपांच्या मागे दबा धरुन बसलेला असताना माकडांच्या एका कळपाने त्याच्यासमोरुन पाणवठ्याकडे जाणारी वाट पकडली. त्यांनी बंदुका चालविल्या. सगळे वानर निसटले पण मला गोळ्या लागल्या. मी दोन ठिकाणी जखमी झालो..

एक गोळी माझ्या गालाला घासून गेली पण त्याचा मोठा लाल रंगाचा व्रण मात्र राहून गेला. ज्याने माझे नाव पडले रेड पीटर. त्यावेळेस येथे अजून एक वानर होता ‘पीटर‘ नावाचा. ही कुठल्यातरी वानराचीच कल्पना असावी. जणू काही त्या पीटरमधे आणि माझ्यामधे फक्त या व्रणाचाच फरक होता. हा पीटर थोडाफार प्रसिद्ध होता. नुकतेच त्याने एका बादलीला लाथ मारुन त्यातील दुध लवंडले असे सांगतात. असो....

दुसरी गोळी मला लागली ती ढुंगणाखाली. ही जखम मात्र मोठी होती आणि माझ्या लंगडत चालण्यामागचे कारण तेच आहे. मी अजुनही लंगडतोच आहे. कालपरवाच मी वर्तमानपत्रात माझ्याबद्दल एक बातमी वाचली. वर्तमानपत्रात लिहिणाऱ्या वाचाळ पत्रकारांपैकीच कोणी एकाने लिहिली असणार ती बातमी. त्याचे म्हणणे होते की मी अजूनही थोडासा माकडच आहे. त्याचा पुरावा काय तर म्हणे मी ही जखम दाखविताना अजुनही माझी चड्डी खाली ओढतो. त्याची सगळी बोटे छाटली पाहिजेत. त्या मुर्खाला कळायला पाहिजे. मला कोणासमोरही माझी चड्डी खाली करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांना फक्त माझे केसच दिसतील व तो व्रण. सगळे उघड आहे. त्यात काहीही लपविण्यासारखे नाही. सत्याचा प्रश्न येतो तेव्हा हे सगळे शिष्ठाचार विसरायलाच पाहिजेत. या उलट जर त्या लेखकाने जर लोकांसमोर त्याची विजार खाली ओढली तर भलताच प्रसंग उभा राहील. तो तसे करीत नाही त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो. पण त्याचा अर्थ असा होत नाही की त्याने या फालतू कारणासाठी माझी बदनामी करावी.

त्या बंदुकीच्या आवाजाने मी जागा झालो आणि येथेच माझ्या आठवणी सुरु झाल्या असे म्हणण्यास हरकत नाही. मी डोळे उघडले तेव्हा हॅगेनबेकच्या जहाजावर एका पिंजऱ्यात होतो. तीन बाजूला जाळी व एका बाजुला फळ्या असा हा खास पिंजरा होता. त्यात फक्त एक मोठी अडचण होती म्हणजे तो पुरेसा उंच नव्हता. त्यात मला धड उभेही राहता येत नव्हते. अरुंद तर इतका होता की मला खालीही नीट बसता येत नव्हते. शेवटी मी कसाबसा गुडघे वाकवून उभा राहिलो. माझे गुडघे अखंड थरथरत होते. कोणी मला पाहू नये म्हणून मी फळ्यांकडे तोंड केले पण त्यामुळे ती जाळी माझ्या कातडीत खुपत होती. प्राण्यांना या पद्धतीने पिंजऱ्यात डांबणे ही त्यांच्या वाहतुकीसाठी आदर्श पद्धत आहे हे आता मी माझ्या अनुभवाने सांगू शकतो. तुमच्या बाजूने विचार केल्यास तेच बरोबर आहे.

पण मला त्यावेळी माझ्या मनात असले काही विचार नव्हते. माझ्या आयुष्यात मला बाहेर पडता येत नव्हते. सरळ तर नाहीच नाही. माझ्यासमोर फळ्या होत्या. एकामेकांना घट्ट जोडलेल्या. दोन फळ्यांच्या मधे थोडीशी फट होती. ती पाहिल्यावर माझ्या तोंडातून आनंदाने चित्कार बाहेर पडला पण त्यातून माझी शेपटीही जाऊ शकत नव्हती. माझी सर्व शक्ती वापरुनही मी ती फट थोडीसुद्धा मोठी करु शकलो नाही.

नंतर त्यांनी मला सांगितले की मी तसा शांत होतो. इतरांसारखा गडबड करीत नव्हतो. त्यावरुन त्यांनी म्हणे असे अनुमान काढले होते की मी जर त्या जिवघेण्या प्रवासातून जगलोवाचलो तर एक चांगला माणसाळलेला, शिकवलेला वानर बनू शकेन. मी मात्र त्या जिवघेण्या काळातून प्रवास केला. हुंदके दाबत, कष्टपूर्वक उवा काढत, कष्टाने नारळ चाटत, त्या पिंजऱ्यावर माझे डोके आपटत मी प्रवास केला. कोणी जवळ आले तर मी माझी जिभ बाहेर काढत असे. माझ्या नवीन जीवनाची सुरुवात ही अशी झाली. पण माझ्या मनात एकच भावना दाटून येत होती आणि ती म्हणजे आता यातून सुटका नाही. आज मी माझ्या आठवणीतून हे सगळे चित्र रेखाटतो आहे त्यामुळे त्यात काही चुका असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी अगदी प्राचिन कपिसत्याच्या जवळ पोहोचलो नसेन कदाचित पण माझे वर्णन फार काही चुकीचे असेल असे मला वाटत नाही. याची मला खात्री आहे.

आत्तापर्यंत माझ्याकडे प्रत्येक गोष्टीला उत्तर होते. मार्ग होते, ते एकदम बंद झाले. मी दबलो. मला खिळ्यांनी खिळविले असते तरी माझ्या स्वातंत्र्याचे हक्क काही कमी झाले नसते. का बरे ? तुमच्या पंज्यामधील कातडी रक्तबंबाळ होईपर्यंत खाजविली तरी तुम्हाला याचे उत्तर मिळणार नाही. माझ्या सुटकेचा मार्ग माझ्याकडे नव्हता पण मला तो तयार करायचा होता नाहीतर माझा मृत्यु अटळ होता. त्या फळ्यांकडे पहातच माझा मृत्यु झाला असता. हॅगेनबेकने सर्व प्रकारच्या माकडांची हीच जागा ठरविली असेल तर मला वानर म्हणून जगणे थांबविले पाहिजे. मी मनात म्हणालो. वानरे, माकडे त्यांच्या पोटातून विचार करतात त्यामुळे माझ्या पोटात त्याबाबतीतील विचार हळुहळु आकार घेऊ लागले.

मी ‘‘उत्तर आणि मार्ग’’ हे शब्द वापरले आणि स्वातंत्र्य हा शब्द वापरला नाही हे तुमच्या लक्षात आले असेलच. कारण स्पष्ट आहे. माणसांना स्वातंत्र्य म्हणजे जे अभिप्रेत असते ते मला नकोच होते. ज्यासाठी तुम्ही रक्तरंजीत लढे उभारले ते स्वातंत्र्य मला तेव्हाही नको होते आणि आत्ताही नको आहे. जाता जाता एक गोष्ट तुमची हरकत नसेल तर नमुद कराविशी वाटते. – ‘‘स्वातंत्र्य हा शब्द मनुष्यप्राण्याला नेहमीच फसवतो. त्याचा विश्र्वासघातच करतो म्हणा ना ! स्वातंत्र्य ही भावना सर्वश्रेष्ठ मानली जाते. तसे असेल तर त्या शब्दाने केलेला भ्रमनिरासही सर्वश्रेष्ठ समजला पाहिजे. करमणूकीच्या खेळामधे माझ्या पाळीची वाट पाहताना मी छतावर टांगून घेतलेल्या कसरतपटूंच्या कसरती पहात असे. ते त्या हिंदोळ्यांवर झोके घेतात, पुढे मागे होतात, मधेच हवेत उसळी घेतात,एकमेकांच्या बाहूत शिरतात. कधी कोणी कोणाच्या केसाला लटकतो तर कोणी कोणाच्या दातात धरलेल्या दोरीला.... आणि त्यालाही माणसांचे स्वनियंत्रीत स्वातंत्र्य म्हटले पाहिजे. निसर्गाची कसली चेष्टा चालविली आहे. त्या कसरती जर प्रेक्षकांऐवजी कपिंनी भरलेल्या तंबूत त्यांनी केल्या तर त्या तंबूच्या कनाती उठलेल्या हास्यकल्लोळांनी टराटरा फाटतील.

नाही ! स्वातंत्र्य नकोच होते मला. मला फक्त मार्ग पाहिजे होता. उजवीकडे, डावीकडे, सरळ कोठेही.. मी दुसरी कुठलीच मागणी केली नव्हती. जरी असा मार्ग सापडणे हा भ्रम होता हे मान्य केले तरी, ती मागणी इतकी छोटी होती की त्यातून होणारा भ्रमनिरास निराश करण्याइतका नक्कीच मोठा नव्हता. बाहेर पडणे...बस्स बाहेर पडणे... असे थरथरत उभे नव्हते राहायचे मला...

आज मला ते सगळे अगदी स्पष्ट दिसतय, जाणवतेय.. मी जर अंतर्बाह्य शांत राहिलो नसतो तर मला ते बाहेर पडणे जमले असते की नाही याची शंकाच आहे. त्याचे सगळे श्रेय मी त्या जहाजाच्या कर्मचाऱ्यांना देतो.

चांगली माणसे होती ती. त्यांच्या पावलांचा आवाज अजुनही मला चांगलाच आठवतोय. त्या दमदार पावलांचा आवाज माझ्या गुंगीत असलेल्या डोक्यात गुंजत असे. मला अजुन आठवतंय, त्यांना प्रत्येक गोष्ट हळुहळु करण्याची सवय होती. त्यातील कोणाला डोळे चोळायचे असले तर तो तो त्याचे हात मणामणाचे असल्यासारखे उचलायचा. ते हसायचे खर्जात आणि भयानक पण त्यात काही अर्थ भरलेला नसायचा. त्यांच्या तोंडात ते सतत काहीतरी चघळत असत आणि ते सतत कोठेही थुंकत असत. माझ्या केसातून त्यांच्या कपड्यावर पिसवा येतात अशी ते तक्रार करायचे पण त्याबद्दल त्यांना चीड येत नसे. माझ्या केसाळ कातडीत पिसवा असणारच आणि त्या उड्या मारणारच हे त्यांनी गृहीत धरले होते. मधल्या सुट्टीत किंवा कामे झाल्यावर ते माझ्या भोवती अर्धवर्तुळात बसायचे. ते क्वचितच बोलायचे पण मधून मधून त्यांचे हुंकार मला ऐकू यायचे. ते पाईप ओढत व मी थोडी जरी हालचाल केली तरी लगेच मांड्यांवर थाप मारायचे. त्यातील एकजण मला काठीने कुरवळायचा. मला आवडायचे ते. आज जर मला कोणी जहाजावर सफरीचे आमंत्रण दिले तर मी ते अर्थातच नाकारेन पण त्या जहाजावरील सगळ्याच आठवणी तिरस्करणीय होत्या असा त्याचा अर्थ होत नाही.

माझ्या मनातील खळबळ थांबली ती या लोकांमुळेच. ती थांबल्यामुळेच मी पळून जाण्याच्या प्रयत्नांपासून दूर राहिलो. आज मागे वळून पाहताना मला वाटते त्या वेळेस पळून जावे किंवा मरण पत्करावे असा विचार माझ्या मनात आला असणार. पण यातून सुटकेचा खरा मार्ग तेथून पळून जाणे हा नव्हता. सुटका शक्य होती का नव्हती हे मी आत्ता सांगू शकत नाही पण बहुदा असावी कारण वानरांना किंवा आमच्या जातकुळीला ते सहज शक्य असते. मी कदाचित त्या जाळीचे चावून तुकडे करु शकलो असतो पण तसे करुन काय फायदा झाला असता? मला पाहिल्या पाहिल्या त्यांनी मला पकडून परत त्या पिंजऱ्यात डांबले असते आणि कदाचित माझ्या पिंजऱ्याची जागा बदलली असती. किंवा मी कदाचित तेथून इतर प्राण्यांच्या गर्दीतून पसार झालो असतो. कदाचित माझ्या समोर असलेल्या अजगराच्या अजगरमिठीत पहुडलो असतो व शेवटचा श्वास घेतला असता. किंवा मी डेकवर पोहोचलो असतो तर काय केले असते ? पाण्यात उडी मारली असती? पण पाण्यावर काही क्षण हेलकावे खात मी समुद्रात बुडालो असतो. सुटकेचे अगतीक मार्ग ! मी त्यावेळेस ठरवून मनुष्यप्राण्यासारखा विचार केला नाही हे सत्य आहे पण त्या परिस्थितीत माझ्या हातून तसे आपसूक घडले खरे.

मी सुटकेवर फार विचार केला नाही पण मी लक्षपुर्वक निरिक्षण करीत होतो. मी येणारी जाणारी माणसे पहात होतो. त्यांचे चेहरे सारखे होते . एवढेच नव्हे तर त्यांच्या हालचालीही सारख्या होत्या. मला वाटायचे की तो एकच माणूस आहे की काय !. ही माणसे किंवा हा माणूस मुक्तपणे तेथे वावरत असे. मला मी त्यांच्यासारखा झालो तर त्या पिंजऱ्यातून काढण्यात येईल असे आश्वासन कोणी दिले नाही. आकस्मात घडणाऱ्या अशक्य घटनात अशी आश्वासने कोणी देत नसतो याची मला कल्पना आहे. पण जर अशक्य ते शक्य करुन दाखविले तर ज्या ठिकाणी तुम्ही ती आश्वासने शोधलीत त्याच ठिकाणी ती तुम्हाला कधीतरी सापडू शकतात. थोड्याच काळात त्या माणसांना माझे कुतुहल वाटेनासे झाले. मला जर खरोखरच वर उल्लेखलेल्या स्वातंत्र्याचा ध्यास लागला असता तर मी सुटकेऐवजी समुद्रात जीव दिला असता. त्या निरिक्षणांच्या दबावाखालीच मला वाटते मी योग्य मार्ग निवडला असावा.

या लोकांची नक्कल करणे तसे फारच सोपे होते. पहिल्या काही दिवसात मी त्यांच्यासारखे थुंकण्यास शिकलो. मग आम्ही एकमेकांच्या चेहऱ्यावर थुंकायला लागलो. पण आमच्यात एक फरक होता. मी थुंकल्यानंतर माझे तोंड चाटून पुसून स्वच्छ करायचो तर ते काहीच करायचे नाहीत. थोड्याच दिवसात मी त्यांच्यासारखा पाईप ओढायला लागलो. जेव्हा मी पाईपच्या तोंडावर माझा अंगठा दाबत असे तेव्हा ते आश्चर्याने चित्कार करीत. पण तो पाईप भरलेला आहे की रिकामा हे समजण्यास मला पुढे पुष्कळ दिवस लागले.

मला सगळ्यात जास्त त्रास झाला तो रमची बाटली उघडताना. त्याच्या वासाचा मला तिरस्कार वाटायचा. पण जेवढा मला तिरस्कार वाटे तेवढ्याच जोमाने मी तिचे बुच उघडण्याचा प्रयत्न करे. विचित्र म्हणजे माझा हा संघर्ष ते सगळ्यात जास्त गंभीरपणे घेत. ते का ते मला कधी कळले नाही. काही आठवड्यानंतर मला त्या बाटली विषयी वाटणारी घृणा थोडी कमी झाली. मला माणसे ओळखू येते नव्हती पण एक माणूस रोज सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री माझ्याकडे येई. तो माझ्यासमोर बाटली घेऊन उभा राही व मला ती उघडण्यास शिकवत असे. त्याला मी समजत नव्हतो. बहुतेक त्याला माझ्या अस्तित्वाचे कारण समजून घ्यायचे असेल. तो हळूच त्या बाटलीचे बुच उघडे व मी त्याच्याप्रमाणे करतो आहे का नाही हे पहात असे. मी त्याच्याकडे अगदी एकाग्रतेने पहात असे. असा विद्यार्थी या जगात कुठल्याही शिक्षकाला शोधुनही सापडणार नाही. बुच उघडल्यावर तो ती बाटली तोंडापाशी नेई. मी पहातोय हे पाहून तो ती ओठांना लावे. मी मोठ्या कष्टाने त्याची नक्कल करायला जाई. ते पाहून तो खुष होई व माझ्याकडे पाहून मान डोलावत असे. बऱ्याच कष्टांनंतर त्या प्रकाराने मी दमून हतबल होऊन त्या जाळीला लटकत त्याच्याकडे पाही. त्याच वेळी तो मागे झुकुन ती बाटली तोंडात रिकामी करायचा. पोटावरुन हात फिरवून तो माझ्याकडे बघत हसायचा.

या शिकवणी नंतर मग प्रत्यक्ष प्रयोगास सुरुवात होई. एवढे दमल्यानंतर ? हो ! माझ्या नशीबातच होते ते. माझ्या पुढे केलेली बाटली मी सर्वशक्तिनिशी उचलून त्याचे बुच काढून थरथरत ती तोंडाला लावली व खाली फेकून दिली. हो तिरस्काराने खाली फेकून दिली. खरे तर त्या बाटलीत काहीच नसायचे. त्या रिकाम्या बाटलीत असायचा फक्त दारुचा वास. ते पाहून माझ्या शिक्षकास अतीव दु:ख होत असणार. मलाही होत असे. पण हे सगळे झाल्यावर मी पोटावरुन हात फिरविण्यास व जबडा फाकवून हसण्यास मात्र विसरत नसे.

आमची शिकवणी बहुतेक वेळा अशीच संपत असे. पण माझ्या शिक्षकाला माझा राग येत नसे त्याबद्दल त्याचे कौतुकच केले पाहिजे. अर्थात कधी कधी तो मला त्याच्या पाईपने चटके देई पण मोठ्या प्रेमाने त्याच्या प्रेमळ, भल्या मोठ्या हाताने माझ्या केसांना लागलेली आग विझवत असे. माझ्यावर तो कधीच रागवला नाही; बहुतेक त्याला आम्ही दोघेही माकडांच्या मुळ स्वभावाविरुद्ध काम करीत आहोत व माझे काम जास्त अवघड आहे याची त्याला जाण असावी.

पण आम्ही एक दिवस विजयश्री खेचून आणलीच. एका संध्याकाळी बहुदा कसलातरी समारंभ असावा. ग्रामोफोनवर छान गाणे लागले होते. माझ्यासमोर कर्मचाऱ्यामधे अधिकारी फिरत असताना, मला ती बाटली दिसली. माझ्या पिंजऱ्याबाहेर कोणीतरी अनावधानाने विसरुन गेले असणार. मी सराईतासारखी ती उचलली. तिचे बुच काढले व सर्वांसमक्ष एखाद्या सराईत दारुड्यासारखी घशात रिचवली व फेकून दिली. पण यावेळेस तिरस्काराने नाही तर एखाद्या कलाकारासारखी रुबाबात ! गंमत म्हणजे यावेळेस मी माझ्या पोटावरुन हात फिरविण्यास व जबडा फाकविण्यास विसरलो कारण काय चालले आहे मला कळेनासे झाले होते. माझ्या तोंडून आपोआप शब्द बाहेर पडले, ‘‘हॅलो’’ आणि मी माणसात आलो. माझ्या हॅलोचे असंख्य प्रतिसाद मला ऐकू आले. कोणी तरी कुरवाळावे तसे त्यांचे शब्द माझे घामाने डबडबलेले शरीर कुरवाळत होते,

‘‘ बघा तो बोलतोय ! बघा तो बोलतोय !’’

मी परत एकदा सांगतो, मला मनुष्याची नक्कल करण्याचा अजिबात मोह नव्हता. मी ते केले कारण मला माझी सुटका करुन घ्यायची होती. बस्स्.... एवढेच ! त्या प्रकरणाचा मला विशेष फायदा झाला नाही. थोड्याच वेळात माझा मानवी आवाज गेला व मला दारुची जास्तच घृणा वाटू लागली. पण आता कुठला मार्ग पकडायचा हे मात्र मला स्पष्ट झाले.

एका प्राणीसंग्रहालयातील प्रशिक्षकाकडे मला सुपुर्त करण्यात आले. काहीच दिवसात मला कळले की माझ्यापुढे आता दोन पर्याय उपलब्ध आहेत. एक म्हणजे त्या प्राणीसंग्रहालयात एक प्राणी म्हणून रहायचे किंवा सर्कसमधे किंवा करमणूकीच्या कंपनीत सामील व्हायचे. मी मनाशी म्हटले, प्राणी संग्रहालयात राहू नकोस. तेथे फक्त तुझा पिंजरा बदलेल. एकदा का तू तेथे गेलास की संपले सगळे.

मग माझे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी मी, सभ्य गृहस्थहो, शिकण्यास प्रारंभ केला. एखाद्याला सुटका करुन घ्यायची असेल तर शिकायलाच लागते. मग तो स्वत:च चाबुक घेऊन स्वत:ला शहाणा करु लागतो. थोडासा जरी विरोध झाला तर स्वत:ची कातडी सोलवटून काढण्यास तो मागेपुढे पहात नाही. काहीच दिवसात माझ्यातील वानर मेला. पार मेंदू पासून ते पायाच्या नखापर्यत वानराने माझ्यातून पळ काढला. याचा परिणाम एक झाला की माझा हा शिक्षक जवळ जवळ वानर झाला. त्याने लवकरच शिकविणे बंद केले व त्याला वेड्यांच्या इस्पितळात भरती केले गेले. नशिबाने त्याची परत सुटका झाली.
नंतर मी अनेक शिक्षकांचा वापर केला. कधी कधी तर एकाच वेळी अनेक शिक्षक मला शिकवत असत. जसा माझा आत्मविश्वास वाढला, लोक माझ्या प्रगतीत रस घेऊ लागले, तसे माझे भवितव्य उज्वल दिसू लागले. नंतर नंतर तर मी स्वत: शिक्षकांना नोकरीवर ठेवू लागलो. त्यांना मी पाच वेगवेगळ्या खोल्यातून ठेवले व त्यांच्याकडून एकदमच शिकू लागलो. अर्थात ते मला सहज साध्य झाले कारण मी एखा खोलीतून दुसऱ्या खोलीत सहज उड्या मारीत असे.

काय प्रचंड प्रगती केली मी ! माझे मलाच खरे वाटेना. जागृत अवस्थेत येणाऱ्या माझ्या मेंदूत ज्ञानाचे किरण चहुबाजूने घुसू लागले. मी माझ्यावरच भयंकर खुष झालो हे मी नाकारत नाही. पण मी त्याला फार महत्व दिले नाही आणि आत्ताही देत नाही याची कबूली मला दिली पाहिजे. मोठ्या कष्टाने, जे आजवर कोणीच केले नसतील, मी अतिसामान्य माणसाच्या पातळीवर पोहोचलो. त्याबद्दल बोलण्यासारखे कदाचित विशेष काही नसेल पण मी माझ्या पिजऱ्यातून बाहेर पडलो व खऱ्या अर्थाने माझी सुटका झाली. मला माझा मार्ग सापडला. एक चांगला वाक्यप्रयोग आहे: गोंधळातून धडपडत मार्ग काढणे. मी तेच केले. मला दुसरे काहीच करता येण्यासारखे नव्हते कारण स्वातंत्र्य हे माझे कधीच ध्येय नव्हते.

मी जेव्हा मागे वळून बघतो आणि मी काय काय साध्य केले आहे याचा आढावा घेतो तेव्हा मला तक्रारीला जागा रहात नाही पण मी तेवढ्यावर स्ंतुष्ट नाही हेही खरे आहे. मी आता विजारीच्या खिशात हात खुपसून, टेबलावरील मद्याच्या बाटलीकडे आरामात पहात बसतो. जेव्हा माझ्याकडे एखादा पाहुणा येतो तेव्हा मी त्याचे चालीरितीप्रमाणे आगतस्वागत करतो. माझा व्यवस्थापक त्यावेळेस माझ्या बैठकीच्या खोलीत असतो. मी घंटा वाजविल्यावर तो धावतपळत येतो व मी काय सांगतोय ते नीट ऐकतो. सध्या तर मी रोज संध्याकाळी करमणूकीचे प्रयोग लावतो. आता अजून काही यश मिळवायचे राहिले आहे असे मला वाटत नाही. मी जेव्हा मेजवान्या झोडून किंवा शास्त्रीय परिषदांना हजेरी लावून रात्रीबेरात्री घरी येतो तेव्हा मी माझी वाट पाहणाऱ्या एका मादीचा तुमच्याप्रमाणेच उपभोग घेतो. दिवसा मला तिच्याकडे ढुंकुनही पाहवत नाही कारण मला तिच्या डोळ्यात वानराचा भाव अजूनही दिसतो. बाकिच्यांना तो समजत नाही पण मला तो बरोबर कळतो. तिचे शिक्षण अजून पूर्ण झाले नाही ना ! आणि होईल असेही मला वाटत नाही. तिचा तो अवतार मला अगदी सहन होत नाही.

एकंदरीत मला जे मिळवायचे आहे ते मी मिळवले आहे पण कृपया मला आता हे सांगू नका की मी जे काही मिळवले आहे ते सगळे अस्थायी आहे.... मी काही माणसांनी माझा न्याय करावा म्हणून येथे आलेलो नाही. मी फक्त माझे ज्ञान तुमच्याबरोबर वाटतो आहे. मी फक्त एक अहवाल सादर करीत आहे. या अकादमीच्या विद्वान सदगृहस्तहो मी फक्त अहवाल सादर केलाय....

मूळ लेखक : फ्रँझ काफ्का
भाषांतर : जयंत कुलकर्णी.
या भाषांतराचे सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन आहेत. याचे वाचन, नाट्याविष्कार करायचे असल्यास लेखकाची परवानगी आवश्यक आहे. असा प्रयोग इतर भाषेत होत असतो म्हणून हे लिहिले आहे...

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

1 Aug 2016 - 5:13 pm | अभ्या..

मस्त. हे आवडले प्रचंड.
प्रशिक्षकाचे वाचताना मला काय कोण जाणे सदमामधला कमल हासन आठवत होता. स्पेशली शेवटच्या सीनमधला. :(

जयंत कुलकर्णी's picture

6 Aug 2016 - 6:47 am | जयंत कुलकर्णी

धन्यवाद ! अभ्या...! :-) व अर्थात इतर वाचकांचेही.

'स्वातंत्र्य हाच एक मोठा भ्रमनिरास असतो!'
- प्राचीन कपिसत्य.

जबरदस्त!

आणि "मऊ मऊ भात करून" देता त्या मुळे तरी समजते नाहीतर , मला नाही वाटत बहुतांश मिपाकर फ्रँझ काफ्का हे नाव माहीत असलेले आहेत.

पुभाप्र

पिशी अबोली's picture

6 Aug 2016 - 12:08 pm | पिशी अबोली

आवडलं.

यशोधरा's picture

6 Aug 2016 - 12:12 pm | यशोधरा

आवडलंच!

पाश्चात्य साहित्याचा अभ्यास असणारे कुणी मला हे सांगेल काय?
मर्कट हे माणसाच्या आदिम अव्यक्त भावनांचे प्रतीक म्हणून वापरायचा पाश्चात्य साहित्यात रिवाज आहे का?

पैसा's picture

7 Sep 2016 - 1:20 pm | पैसा

!!!

बोका-ए-आझम's picture

7 Sep 2016 - 2:06 pm | बोका-ए-आझम

प्राणी संग्रहालयात राहू नकोस. तेथे फक्त तुझा पिंजरा बदलेल.

फारच सुंदर अनुवाद!

अलका सुहास जोशी's picture

7 Sep 2016 - 2:46 pm | अलका सुहास जोशी

काफ्का वाचताना स्वत:ला फटके मारून घेणारी कडकलक्षुमी आठवते.
-------------------------------------------------------------------------
एखाद्याला सुटका करुन घ्यायची असेल तर शिकायलाच लागते. मग तो स्वत:च चाबुक घेऊन स्वत:ला शहाणा करु लागतो. थोडासा जरी विरोध झाला तर स्वत:ची कातडी सोलवटून काढण्यास तो मागेपुढे पहात नाही. काहीच दिवसात माझ्यातील वानर मेला. पार मेंदू पासून ते पायाच्या नखापर्यत वानराने माझ्यातून पळ काढला. याचा परिणाम एक झाला की माझा हा शिक्षक जवळ जवळ वानर झाला. त्याने लवकरच शिकविणे बंद केले व त्याला वेड्यांच्या इस्पितळात भरती केले गेले. नशिबाने त्याची परत सुटका झाली.
---------------------------------------------------------------------------
THIS IS DEADLY