तस्मै श्रीगुरवे नमः

सतिश गावडे's picture
सतिश गावडे in जनातलं, मनातलं
19 Jul 2016 - 2:28 am

"माझे नाव सतिश वसंत गावडे. रायगड जिल्हा परिषद शाळा वडगांवकोंड" आपल्या बोलण्यात "अशुद्ध" शब्द येणार नाही याची काळजी घेत मी वर्गाला माझी ओळख करुन दिली.

शाळेचा पहिला दिवस. गोरेगांवच्या ना. म. जोशी विद्याभवनचा इयत्ता पाचवी ब चा वर्ग. गोरेगांव तसं शहरवजा खेडेगांव. आजूबाजूच्या पंधरा-वीस खेडेगावांचे बाजार हाट करण्याचे ठिकाण. शाळा पुर्ण जिल्ह्यात नावाजलेली. अगदी माणगांव, महाड, म्हसळा आणि श्रीवर्धन या चार चार तालुक्यांच्या ठिकाणांहून मुलं ना. म. जोशीला शिकायला यायची. आजही येतात. असा शाळेचा नावलौकिक.

आमचं गाव वडगांवकोंड गोरेगांवपासून तीन किमी अंतरावर. गावातील जिल्हा परिषदेची शाळा चौथीपर्यंतच. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी ना. म. जोशीलाच प्रवेश घ्यावा लागे. तेव्हा गोरेगांव ते वडगांवकोंड रस्ता कच्चा होता. बस सेवेचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे गोरेगांवला जाण्यासाठी पायी चालत जाणे, सायकलने जाणे, बैलगाडीने जाणे किंवा स्वतःच्या वाहनाने जाणे हेच पर्याय होते. शेवटचा पर्याय उपलब्ध असणारे भाग्यवान पुर्ण गावात हाताच्या बोटावर मोजण्याईतके कमी होते. रस्त्यात वाटेत एक ओढा लागतो. पावसाळ्यात गावाशेजारून वाहणार्‍या काळ नदीला पूर आला की रस्ता पाण्याखाली जातो. आम्हा शाळकरी मुलांसाठी शाळेत पायी चालत जाणे हा एकमेव पर्याय होता तेव्हा.

ना. म. जोशीत तेव्हा नविन प्रवेश देताना तुकडी कशी ठरवत असत याची मला काही कल्पना नाही. मात्र पाचवीच्या तेव्हा अ पासून अगदी ग पर्यंत तुकड्या होत्या. सर्वात हुशार मुलं अ वर्गात तर सर्वात ढ, नापास झालेली मुलं ग वर्गात असा काहीसा मामला होता. मी खेडयातला असलो तरी त्यातल्या त्यात हुषार असल्याने मला ब वर्ग मिळाला असावा.

पहिल्या तासाला वर्गशिक्षिकेने दिलेल्या वेळापत्रकानूसार तो हिंदीचा तास असावा. एक उंच शिडशीडीत काळे सावळे सर वर्गावर आले होते. वय पन्नाशीचं किंवा थोडंफार कमी असावं. नाकावर जाड भिंगाचा चष्मा. करारी आणि खर्जातला आवाज. पाहताक्षणी दरारा वाटावा असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांचं नाव शेख सर हे नंतर वरच्या वर्गात शिकणार्‍या मुलांकडून कळलं. शेख सर हिंदी आणि पी. टी. चे तास घ्यायचे. खो खो हा बहूधा त्यांचा आवडता खेळ असावा. मुलांचा खोखोचा खेळ चालू असला की सर त्या मुलांना मार्गदर्शन करताना त्यांच्यातील एक होऊन जायचे.

सर हिंदीही खुप छान शिकवायचे. वर्गात शिकवतानाही ते खेळाच्या मैदानाईतकेच रंगून जायचे. मग ती "मेरा छाता" सारखी कविता असो किंवा "मामा की ऐनक" सारखा धडा असो, सर आवाजात चढ उतार आणून नाट्यमयता निर्माण करायचे. मुलं अगदी रंगून जायची. त्यातूनच एखाद्या मुलाचं लक्ष नसलं ते आवाज वाढवायचे. हातातील डस्टर त्या विद्यार्थ्यावर फेकल्याचा अभिनय करायचे. मात्र तो डस्टर ते हाताच्या मागे हळूच पाडायचे. मुलं खळाळून हसत. सर हिंदीचे व्याकरण शिकवायचे तेव्हा तर धमाल असायची. ते "यह गमला हैं, वह गमले हैं" मुलं त्यांच्या मागोमाग एका सुरात म्हणायची.

मला तिमाही परीक्षेत सार्‍याच विषयांत चांगले मार्क्स मिळालेले सरांना कळलं. त्यानंतर सर माझी विचारपूस करु लागले. माझ्यावर विशेष लक्ष देऊ लागले. त्यांनी एकदा मला माझ्या घरच्यांबद्दल विचारले असता आम्हा दोघांमधला वेगळाच ऋणानुबंध समोर आला. माझे बाबाही सरांचे विद्यार्थी होते. ते कळल्यानंतर सर माझ्या बाबांकडेही माझ्या अभ्यासाची चौकशी करु लागले.

पाचवीची परीक्षा झाली. निकाल लागला. मी पाचवी ब वर्गात पहिला आलो होतो. पुढचा वर्ग सहावी ब. यावेळी सर आमच्या वर्गाला कोणताच विषय शिकवायला नव्हते. शाळा सुरु होऊन दोन तीन दिवस गेले. एके दिवशी ते आमच्या वर्गाच्या बाहेर आले. सरांबद्दल इतर शिक्षकांमध्ये खुप आदर होता. वर्गावर शिकवणारे शिक्षक बाहेर गेले. त्यांचे सरांशी काही बोलणे झाले.

"गावडे, तुला शेख सरांनी बाहेर बोलावलं आहे." त्या शिक्षकांनी आत येताच मला सांगितले. मला कळेना. मी सरांचा तसा लाडका विद्यार्थी जरी झालो होतो तरी मला सरांची तितकीच भीतीही वाटायची.
"ऐक, उद्यापासून तू अ वर्गात बस. मी प्राचार्यांशी तुझी तुकडी बदलण्याबद्दल बोललोय. त्यांनी परवानगी दिली आहे."

माझीही खुप ईच्छा होती अ वर्गात बसण्याची. कारण अ वर्ग तेव्हा हुषार मुलांचा वर्ग मानला जायचा आणि मला त्या वर्गात बसायचे होते. माझी ही ईच्छा अगदी अनपेक्षितपणे पुर्ण झाली होती. शेख सरांनी माझ्याही नकळत माझ्यासाठी प्राचार्यांकडे शब्द टाकला होता. मात्र त्याक्षणी मला अचानक रडू कोसळले. ब वर्गातून अ वर्गात जाताना आपले गावातील सर्व मित्र ब वर्गातच राहणार आहेत हे मला अचानक आठवले. सारे मित्र मागे टाकून अ वर्गातील शहरी मुलांमध्ये जाण्याच्या कल्पनेचा मी आधी विचारच केला नव्हता. आणि याक्षणी मला ते सुचले. सरांनी मला शांत केले. माझ्या रडण्याचे कारण विचारले. मी ही निरागसपणे कारण सांगितले. त्यांनी मला ब वर्गातील माझ्या सर्वात जवळच्या दोन मित्रांची नावे विचारली. मी ती सांगितली. सरांनी त्या दोघांनाही बाहेर बोलावले.

"उद्यापासून तुम्ही दोघे सतिशसोबत अ वर्गात बसा".

सर सहावी अ ला हिंदी शिकवायला होते. मी पुन्हा एकदा सरांच्या नजरेसमोर आलो.

आमच्या घरी तेव्हा गाई म्हशी होत्या. मी सकाळी शाळेत जायच्या आधी तीन चार तास गुरं चरायला नेत असे. गुरांच्या पाठी अनवाणी माळरानांवर, काट्याकुट्यांमधून वारं प्यायल्यागत हुंदडत असे. एके दिवशी कसा कोण जाणे, गुरांकडे गेलो असताना बाभळीचा काटा पायात अगदी खोलवर रुतला. पायावर भांबूर्डीचा पाला चोळून रक्त थांबवले. लंगडत लंगडत घरी आलो. घरी आल्यावर आईने काटा काढला खरा पण खोलवर गेलेले काट्याचे टोक आतच राहीले. एक एक दिवस जाऊ लागला आणि माझा पाय अधिक अधिक सुजायला लागला. पायात पू झाला. चालता येईनासे झाले. दोन तीन दिवस शाळा बुडाली. शेवटी डॉक्टरकडे जाऊन इलाज करुन घेतला.

शाळेत पुन्हा जाऊ लागताच सरांनी माझी शाळेत का येत नव्हतो म्हणून विचारपूस केली. मी जे घडले होते ते सांगितले. सरांनी बाबांना शाळेत बोलावून घेतले. माझ्या पायात चप्पल का नसते म्हणून बाबांची खरडपट्टी काढली. त्याच दिवशी संध्याकाळी बाबांनी माझ्यासाठी स्लिपर्स घेतले.

केव्हातरी बोलताना सरांनी मला अशफाकबद्दल, त्यांच्या मुलाबद्दल सांगितले. तो केमिकल इंजिनीयर झाला होता आणि आय आय टी मद्रास मधून तेव्हा एम टेक करत होता. "इंजिनीयर" या शब्दाशी सरांनी माझी ओळख करुन दिली. सर अशफाकबद्दल भरभरुन बोलायचे माझ्याशी. त्या प्रेमळ बापाला आपल्या हुषार लेकराचे किती कौतुक करु आणि किती नको असे होऊन जायचे. मात्र तेव्हा सर माझ्याही नकळत मला माझ्या आयुष्याचा मार्ग दाखवत होते हे मला खुप उशिरा कळले.

सर पाचवी ते सातवी या वर्गांना शिकवायचे. मी आठवीला गेल्यावर त्यांच्याशी माझे प्रत्यक्ष बोलणे कमी झाले. आठवीचा रिझल्ट लागला. सर रिझल्टच्या दिवशी माझ्या वर्गाच्या बाहेर उभे होते. पुन्हा एकदा सहावी ब ला असताना जसे घडले होते तसेच घडले. मुलांचे रिझल्ट देता देता वर्गशिक्षिका सरांना भेटायला बाहेर गेल्या.

"गावडे, तुला शेख सर बाहेर बोलावत आहेत", मॅडमनी आत येताच मला सांगितले.

"ऐक, तुला बाटू माहिती आहे का?", मी बाहेर जाताच सरांनी मला विचारले.
"बाटू बद्दल मी फक्त ऐकलंय. जास्त काही माहिती नाही मला"
"बाटू म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी. आपल्या लोणेरेला आहे. तिथे इंजिनीयरींगचे शिक्षण मिळते." सरांनी मला समजेल अशा शब्दांत सांगितले.
"बाटूला दहा दिवसांचे निवासी शिबीर आहे आठवी ते दहावीच्या मुलांसाठी. दहा दिवस तिथेच राहायचे. जेवण वगैरे तिथेच मिळेल. तिथे कॉम्पुटर शिकवणार आहेत. कारखान्यांना भेट द्यायला नेणार आहेत. मी तुझे नाव दिले आहे आपल्या शाळेकडून जाणार्‍या मुलांमध्ये. खुप शिकायला मिलेल तुला. तुझ्या बाबाला सांगतो मी तुला या शिबिराला पाठवायला."

सरांनी जर माझे नाव दिले नसते तर माझ्यासारख्या खेड्यातील मुलाचा कुणी कधी विचारही केला नसता तसल्या शिबिरासाठी.

पुढे चार वर्षांनी बारावीनंतर मी याच बाटूला इंजिनीयरींगला प्रवेश घेतला. नव्हे, सरांनी अप्रत्यक्षपणे माझे बोट धरुन मला तिथवर नेले होते.

मी इंजिनीयरींगला तिसर्‍या वर्षाला असताना एक गंमतीदार प्रसंग घडला. एके दिवशी संध्याकाळी बाबांनी मला "तुला शेख सरांनी भेटायला बोलावले आहे" म्हणून सांगितले. सर माझ्यासाठी निरोप द्यायला बाबांच्या ऑफिसला गेले होते. मी सरांना भेटलो.

"अरे माझी मुलगी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीएससी कॉम्पुटर करत आहे. तिला एक कॉम्पुटर प्रोग्रामिंगची असाईनमेंट मिळाली आहे. तिला काही ते जमत नाही. मी माझ्या ओळखीतल्या खुप जणांना विचारले. सगळेच आम्हाला नाही जमणार म्हणत आहेत. आपल्या गोरेगांवचा एक मुलगा बाटूला तुला एक विषय शिकवायला आहे. त्याने कदाचित तू हे करु शकशील असे मला सांगितले", सरांनी मला बोलावण्याचे कारण सांगितले.

सरांनी असाईनमेंटचा पेपर दाखवला. कॉम्पुटर ग्राफिक्स संदर्भातील ती प्रश्नावली होती. संगणकाला सांख्यिकी विदा पुरवायचा आणि त्या विदापासून विविध प्रकारचे आलेख स्क्रीनवर दाखवायचे अशा आशयाचे प्रश्न होते सारे. मी होतो ईलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन इंजिनीयरींगचा विद्यार्थी. इंजिनीयरींच्या पहिल्या किंवा दुसर्‍या सत्रात कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचा एक विषय असतो. मात्र त्यातून मिळणारे कॉम्पुटर प्रोग्रामिंगचे ज्ञान खुपच जुजबी असते. दुसर्‍या वर्षापासून आयटी आणि कॉम्प्युटर वगळता बाकीच्या शाखांचे विद्यार्थी कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचा नाद सोडून देतात. मी मात्र या विषयाचा मनापासून अभ्यास केला. पुढच्या दोन वर्षात कॉम्प्युटर प्रोग्रामिंग बर्‍यापैकी येणारा मुलगा अशी माझी कॉलेजमध्ये ख्याती झाली होती. आणि यातूनच शेख सरांपर्यंत माझे नाव गेले होते.

आता यातील ग्यानबाची मेख अशी होती की मला आकडेमोड किंवा तार्किक बाबींचे प्रोग्रामींग जमायचे सी प्रोग्रामींग ही भाषा वापरुन. सरांच्या मुलीची असाईनमेंट ग्राफिक्स प्रोग्रामींगमधील होती. मला त्यातले ओ की ठो कळत नव्हते. मात्र मी सरांना तसे सांगितले नाही. ज्या गुरुंनी आजवर माझे बोट पकडून मला मार्ग दाखवला त्या गुरुंनी आज पहिल्यांदा माझ्याकडे काही मागितले होते. माझी गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली होती.

मी सरांकडून आठवड्याचा अवधी मागून घेतला. पुढच्या तीन चार दिवसांत कॉलेजच्या वाचनालयातील "ग्राफिक्स प्रोग्रामिंग" संबंधीच्या पुस्तकांचा फडशा पाडला. प्रकरण मी समजलो होतो तितके अवघड नव्हते. मला जमण्यातला प्रकार होता. आणि जमलेही. मी तयार केलेल्या प्रोग्राम्सच्या प्रिंटस काढून घेऊन ते प्रोग्राम्स सरांच्या मुलीला समजावून सांगितले. तिला स्वतः समजून घेऊन लिहून काढण्यास, स्वतः पुन्हा बनवण्यास सांगितले.

त्या असाईनमेंटला तिला खुप चांगला शेरा मिळाला. सरांनी मला त्यांच्या घरी बोलावले. कोकणातील खेडयात वाढलेल्या मुलांमध्ये मुस्लीम घरांबद्दल ज्या काही चित्र विचित्र कल्पना असतात तशा माझ्याही होत्या. मुख्य वस्तीपासून काहीसे वेगळे असलेले मुस्लीम मोहल्ले त्यात अधिक भर टाकतात. सरांचे घर तसे मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर होते. तरीही मी जरा बिचकत बिचकत सरांच्या घरी गेलो.

सरांनी माझे त्या असाईनमेंटबद्दल कौतुक केले. माझ्या पाठीवरुन हात फिरवला. त्यांच्या नजरेत कृतकृत्य झाल्याचे भाव होते. त्यांनी रुजवलेलं ज्ञानाचं रोपटं आज त्यांच्या पुढ्यात तरारुन उभं होतं. मी मनातील सारे किंतू झटकून देऊन सरांच्या घरुन चहा नाश्ता करुन सरांच्या पायाला हात लावून बाहेर पडलो.

मी आज जो कोणी आहे तो माझ्या इंजिनीयरींगच्या पदवीमुळे आहे. मात्र ही पदवी माझी एकट्याची कमाई नव्हे. माझ्या आई वडीलांच्या जोडीने अनेक ज्ञात अज्ञात हातांनी मला मदत केली. शेख सरांनी माझ्या मनात इंजिनीयरींगच्या शिक्षणाचं बीज रुजवलं, त्यांच्या मुलाबद्दल वेळोवेळी सांगून माझ्या मनात रुजवलेल्या त्या बीजाला पाणी घातलं. आठवी संपतानाच एका शिबिराच्या निमित्ताने मला माझ्या भविष्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दारात नेऊन सोडलं.

माझ्यासारखा अनवाणी पायांनी गुरं राखणारा, भातशेतीमध्ये कंबरडं मोडेपर्यंत लावणी, कापणी करणारा मुलगा जेव्हा शिक्षण संपल्यानंतर फक्त अडीच वर्ष भारतात काम केल्यानंतर पुढचे दिड वर्ष जेव्हा अमेरिकेत संगणक अभियंता म्हणून काम करतो तेव्हा त्यामागे शेख सरांसारख्या आपल्या शिष्याच्या हिताचा कायम विचार करणार्‍या प्रेमळ गुरुंची पुण्याई उभी असते.

माझ्या या गुरुने मी जवळपास अजाण वयाचा असताना मला माझं ध्येय काय आहे हे सांगितलं नसतं, वेळोवेळी मला तिथपर्यंत पोहचण्याचा मार्ग दाखवला नसता तर न जाणो मी आज काय असतो, कुठे असतो.

जगदगुरु महर्षी व्यासांचे शब्द उसने घेऊन मला माझ्या या गुरुला वंदन करताना म्हणावेसे वाटते,

अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया |
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ||
त्वं पिता त्वं च मे माता त्वं बन्धुस्त्वं च देवता |
संसारप्रतिबोधार्थं तस्मै श्रीगुरवे नमः ||

शिक्षणप्रकटन

प्रतिक्रिया

निराकार गाढव's picture

19 Jul 2016 - 2:36 am | निराकार गाढव

अप्रतिम...

लोथार मथायस's picture

19 Jul 2016 - 3:13 am | लोथार मथायस

तुम्ही शेख सर अगदी आमच्या डोळ्यापुढे उभे केलेत.
मला माझ्या शाळेतील यशवंत सरांची आठवण झाली.

रुपी's picture

19 Jul 2016 - 3:19 am | रुपी

फारच सुंदर लिहिले आहे.

खटपट्या's picture

19 Jul 2016 - 4:31 am | खटपट्या

खूप छान

पद्मावति's picture

19 Jul 2016 - 4:34 am | पद्मावति

सुरेख लेख!

अनन्त अवधुत's picture

19 Jul 2016 - 5:11 am | अनन्त अवधुत

शेख सर अगदी आमच्या डोळ्यापुढे उभे केलेत.

मुक्त विहारि's picture

19 Jul 2016 - 5:18 am | मुक्त विहारि

एकदम समयोचित.

आज नेमकी गुरुपौर्णिमा.

मोदक's picture

19 Jul 2016 - 7:00 am | मोदक

+११

चांदणे संदीप's picture

19 Jul 2016 - 8:13 am | चांदणे संदीप

+२२२

सुंदर लिहिलत सगासर. ___/\___

Sandy

मनापासून लिहिलेला लेख. अतिशय आवडला!

तुषार काळभोर's picture

19 Jul 2016 - 6:31 am | तुषार काळभोर

मला घडवणारे शाळेतील सर्व शिक्षक आठवले.

लालगरूड's picture

19 Jul 2016 - 7:52 am | लालगरूड

खूप छान

डोळ्यांत पाणी आले वाचताना.आणखी लिहू शकत नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jul 2016 - 10:23 am | अत्रुप्त आत्मा

+++१११ टू कंजूसकाका.
स्क्रिन धुसर झाले
हात नमस्कारासी आले.
__/\__

राजाभाउ's picture

19 Jul 2016 - 11:49 am | राजाभाउ

+११११
डोळे पुसुनच मग हे लिहु शकलो.

राघवेंद्र's picture

20 Jul 2016 - 2:25 am | राघवेंद्र

+१११११

संत घोडेकर's picture

19 Jul 2016 - 8:40 am | संत घोडेकर

खरे आहे सतिशजी,

आपल्या जडणघडणीत गुरुजनांचा मोठा वाटा असतो.
सर्व ज्ञात अज्ञात गुरुजनांना दंडवत.

चौकटराजा's picture

19 Jul 2016 - 8:48 am | चौकटराजा

ओ साहेब तुम्हाला गावडे सर अशी पदवी आहे ती बदलून मी सर सतीश गावडे अशी पदवी करू का ? आपल्या शाळेत मी चक्कर मारली आहे. गोरेगावातील शाळा, तेथील लायब्ररी लक्षात राहिली आहे. आपण कुणी करियरच्या प्रांगणात घडले असू वा नसू पण माणूस म्हणून घडण्यात शिक्षकांच्या सहवासाचा १०० टक्के वाटा असतोच.

सनईचौघडा's picture

19 Jul 2016 - 8:50 am | सनईचौघडा

वाह सुंदर लिहलंयस सगा. मला आमच्या ठाण्याच्या महाराष्ट्र विद्यालयातील मुख्याध्यापक श्री. मेहंदळे सर आठवले. त्यावेळी सगळ्यांनाच बाहेर शिकवणीला जाता येत नसे म्हणुन दहावीला त्यांनी शाळेतच गणित , इंग्रजीच्या जादा शिकवण्या घेवुन मार्गदर्शन केले होते.

गामा पैलवान's picture

20 Jul 2016 - 12:27 pm | गामा पैलवान

सनईचौघडा,

तुम्ही महाराष्ट्र विद्यालयाचे होय! आमचं घर तिथून जवळंच आहे. घराजवळ असूनही महाराष्ट्र विद्यालयाशी कधीच संबंध आला नाही. साहजिकंच त्यांच्याशीही आला नाही. आम्हां पोरांना विद्यालयाच्या मैदानात क्रिकेट खेळू देत नसंत. म्हणून आम्ही त्यांना बन्या म्हणायचो. पण त्यांचं व्यक्तिमत्व भारी होतं याबद्दल आम्हा कार्ट्यांचं एकमत होतं. टोपणनावाने आदरपूर्वक उल्लेख होत असलेले माझ्या आठवणीतले ते एकमेव शिक्षक होत.

आ.न.,
-गा.पै.

खटपट्या's picture

21 Jul 2016 - 4:08 am | खटपट्या

तीथुनच हाकेच्या अंतरावर गावदेवी मैदान होते की. बाकी पम्याच्या शाळेचा एम.एच. हायस्कूलचा फुलफोर्म आम्ही मेंटल हॉस्पीटल असा करायचो. :)

गामा पैलवान's picture

21 Jul 2016 - 11:03 am | गामा पैलवान

खटपट्या,

गावदेवी, संघशाखा वगैरे लांब होते आमच्यापासून. शिवसमर्थचं मैदान कुलुपबंद असायचं. दहाबारा वर्षांच्या कार्ट्यांना एव्हढं दूर जाऊ देत नसायचे घरचे लोकं त्याकाळी.

बाकी मीही एमेचचाच बरं का. आम्हाला कोणी मेंटल हॉस्पिटलचे विद्यार्थी म्हणून चिडवलं तर आम्ही प्रश्न करायचो की, दुरुस्त करू का तुम्हाला?

आ.न.,
-गा.पै.

अप्रतिम लिहिलं आहेस रे.अगदी गहिवरून आलं वाचताना.

यशोधरा's picture

19 Jul 2016 - 9:07 am | यशोधरा

मनापासून आलेलं. सुरेख.

नेहेमीप्रमाणेच छान लेखन सगा सर.
थोड्याफार फरकाने आम्हीतुमच्यासारखेच...

नकळत डोळ्यात पाणी आले.

सिरुसेरि's picture

19 Jul 2016 - 9:18 am | सिरुसेरि

छान आठवणी . "कोण तुजसम सांग गुरुराया , कैवारी सदया "

नाखु's picture

19 Jul 2016 - 9:19 am | नाखु

जबरदस्त लिहिलेय, शाळा सुटल्यावरच गुरुच महत्व कळतं रे !!! साला माझ्या जीवनात या मास्तर लोकांनी लै उपकार करून ठेवलेत आणि मी जो आहे त्याचे श्रेय फक्त आणि फक्त या मास्तर लोकांचे आहे.

उघड्या आभाळाखाली चांगले मास्तर भेटलेला नाखु

शालेय शिक्षकांचा आपल्या कळत नकळत आपल्या जडणघडणीत फार मोठा वाटा असतो. महाविद्यालयीन शिक्षक फारसे आठवत नाहित नंतर पण बालपणीचे शिक्षक हे मनावर कोरले गेलेले असतात.

ह्याच विषयावर श्री. ना. पेंडसे ह्यांची 'हद्दपार' नामक उत्कृष्ट कादंबरी आहे. प्रत्येकाने ती आवर्जून वाचलीच पाहिजे अशी.

लेखन नेहमीप्रमाणेच उत्तम झालंय. शेख सरांबाबत तुझ्याकडून ह्याआधीही ऐकलं होतंच. आता तपशीलवार वाचायला मिळालं.

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Jul 2016 - 9:30 am | कैलासवासी सोन्याबापु

तुमचा एकंदरीत समतोल, विषय समजून बोलायचा अट्टाहास ह्याचे मूळ सापडले, खूप छान अन डोळे ओले करणारे लेखन आहे, मी आवर्जून तुम्हाला सरच म्हणणार आहे सतीशजी, पुढल्यावेळी सरांना भेटायला जाल तेव्हा आमच्यातर्फे सुद्धा त्यांच्या पाया पडा :)

श्रीरंग_जोशी's picture

19 Jul 2016 - 9:33 am | श्रीरंग_जोशी

मनापासून लिहिलेलं हे लेखन खूप भावलं.
लहानपणीपासूनचे अनेक गुरुजन डोळ्यांपुढे आलेत.

स्मिता_१३'s picture

19 Jul 2016 - 2:18 pm | स्मिता_१३

+१११

आईवडिलांनी चांगले संस्कार केलेच, त्यांच्यामुळे शिक्षण घेता आले, तसेच ज्यांनी शिकविले घडविले ते सर्वच मला गुरुस्थानी आहेत. त्या सर्वाना आदरपूर्वक प्रणाम.

वामन देशमुख's picture

19 Jul 2016 - 9:53 am | वामन देशमुख

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्‍वरः।
गुरु साक्षात्‌ परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ॥

शेख सरांची तळमळ वाचून डोळ्यात पाणी आले. मुलांचं भलं चिंतणारे शिक्षक्/शिक्षिका त्या मुलामुलीलाच नव्हे तर त्यांच्या पुढच्या पिढ्यांसाठी सुद्धा एक शिदोरी देऊन जातात!

आमच्या रसाळबाई आठवल्या. चौथीच्या स्कॉलरशिपला त्या एकहाती गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी तीनही विषय शिकवायच्या. शाळेच्या आधी रोज एक तास एवढीच शिकवणी शाळेत. त्याचे वेगळे पैसे वगैरे नाहीत. फक्त आपली मुलं स्कॉलरशिपला चमकावीत हा एकच ध्यास! शिकवण्याची हातोटी अतिशय उत्तम. त्या वर्षीच्या बॅचला आम्ही चौदा जणं स्कॉलरशिप मधे चमकलो. जिल्ह्यातल्या पहिल्या दहात सात जण आमच्या शाळेचे होते! शाळेत सत्कार झाला तेव्हा बाई अक्षरशः घळाघळा रडल्या!
अजूनही मी नगरला गेलो की आवर्जून बाईंना भेटतो. मला बघताक्षणी "अरे ये रे ये बाळा, कसा आहेस?" असं म्हणत बोटं कानशिलावर मोडून पाठीवरुन प्रेमाने हात फिरवतात तेव्हा भरुन येतं!
गोपाळे सरही असेच. त्यांच्याबद्दल मी लिहिले होतेच.

(नतमस्तक्)रंगा

रुस्तम's picture

19 Jul 2016 - 10:37 am | रुस्तम

सुंदर आठवण

+१ रसाळ बाईंबद्द्ल च विचार करत होते हा लेख वाचताना.

खुप छान आहे हा लेख. नॉस्टेल्जिक केलंत आणि खरंच शेवटी डोळ्यात अगदी पाणी आलं.

श्रीगणेशा's picture

25 Jan 2022 - 7:56 pm | श्रीगणेशा

चौथीला असताना, आमच्या दादा चौधरी शाळेतील कांबळे मॅडम स्कॉलरशिपची विनामूल्य शिकवणी घ्यायच्या. काही वर्षातच नगर सोडल्यानंतर परत त्यांची भेट झाली नाही.

गणामास्तर's picture

19 Jul 2016 - 10:11 am | गणामास्तर

ओघवते आणि सहज सुंदर लेखन.
आमच्या वाट्याला असे शिक्षक कधी आलेचं नाहीत याची कधी कधी खंत वाटते.

रुस्तम's picture

19 Jul 2016 - 10:35 am | रुस्तम

तुमच्या लेखामुळे मला माझी बारावी आठवली. खूप खूप धन्यवाद...

क्या बात! एक नंबर लिहिलं आहे. वा!

आजानुकर्ण's picture

20 Jul 2016 - 12:52 am | आजानुकर्ण

सुंदर लेख. खूप आवडला.

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Jul 2016 - 10:45 am | ज्ञानोबाचे पैजार

औचित्यपूर्ण....लेख अतिशय आवडला.

शेख सरंबद्दल वाचता वाचता माझे सरदेशपांडे सर आणि खाडीलकर बाई आठवल्या.

या निमित्ताने मी माझ्या सर्व गुरुजनांना आदरपूर्वक वंदन करतो.

पैजारबुवा,

लॉरी टांगटूंगकर's picture

19 Jul 2016 - 10:51 am | लॉरी टांगटूंगकर

सुंदर लिहीता राव! सरांना आमचापण नमस्कार.

देशपांडे विनायक's picture

19 Jul 2016 - 10:58 am | देशपांडे विनायक

अप्रतिम लेख
काही वेळा कुणीतरी तुम्हाला चांगल्या अर्थाने शहाणे म्हणतात तेंव्हा त्याचे सगळे श्रेय अशा
शेख सरांचे असते

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jul 2016 - 11:03 am | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम हृद्य मनोगत !

अश्या अनेक गुरुजनांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभाराने आपण घडत जातो.

नीलमोहर's picture

19 Jul 2016 - 11:22 am | नीलमोहर

असे योग्य मार्ग दाखवणारे गुरुजन मिळायलाही भाग्य लागतं.

बोका-ए-आझम's picture

19 Jul 2016 - 11:22 am | बोका-ए-आझम

माझ्या चुलतबहिणी शेख सरांच्याच विद्यार्थिनी होत्या. त्यांच्याकडून सरांबद्दल ऐकलेलं आहेच. खरोखरच हाडाचे शिक्षक हे नामाभिधान सार्थ होईल असे शिक्षक आहेत ते. अशा माणसांमुळेच गुरु या शब्दाचं पावित्र्य टिकून आहे. _/\_

विभावरी's picture

19 Jul 2016 - 11:26 am | विभावरी

अप्रतिम लिहीले आहे !

शि बि आय's picture

19 Jul 2016 - 11:30 am | शि बि आय

खूप सुंदर... अतिशय निर्व्याजपणे त्यांनी तुमच आयुष्य घडवलं.. असे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला मिळोत..

असा मी असामी's picture

19 Jul 2016 - 11:36 am | असा मी असामी

एकदम सही. सरांना हे वाचायला खुप आवडेल. खप वर शेअर करतो.

राजाभाउ's picture

19 Jul 2016 - 11:55 am | राजाभाउ

खुप छान. उत्तम शिक्षक मिळाल्या मुळ सगा सर भाग्यवान आहेतच, पण शेख सरांना तुमच्या सारखा प्रयत्नांचे चिज करणारा विद्यार्थी मिळाला म्हणुन ते पण भाग्यवानच.

सस्नेह's picture

19 Jul 2016 - 11:55 am | सस्नेह

छान आठवणी. प्रत्येकाच्या आयष्यात असा एखादा गुरु जरूर यावा.

स्वच्छंदी_मनोज's picture

19 Jul 2016 - 12:03 pm | स्वच्छंदी_मनोज

सतीश साहेब...मनापासून आणी सच्चेपणाने केलेले लिखाण खूप भावले... दंडवत घ्या तुम्हाला आणी शेख सरांनाही. __/\__

(रच्याकने: ही गोरेगावची ना म जोशी शाळा चांगलीच माहीत आहे कारण मीही तुमच्याच कॉलेज मध्ये चार वर्षे काढली आहेत आणी शाळे समोरच रुम घेऊन राहात होतो :) )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jul 2016 - 12:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यासेठ, सुंदर लिहिलंय.. सालं भेट होते तेव्हा बोलत नाय तुम्ही.

-दिलीप बिरुटे

संजय पाटिल's picture

19 Jul 2016 - 12:42 pm | संजय पाटिल

सुंदर लेखण.. मनस्वी. भावले एकदम!!!

उडन खटोला's picture

19 Jul 2016 - 12:44 pm | उडन खटोला

खुप मनापासुन लिहिल आहे जाणवत आहे. सर्व गुरुंना वन्दन.

बरखा's picture

19 Jul 2016 - 12:47 pm | बरखा

खुप छान लिहलय तुम्ही.
माझ्या मते प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी शिक्षक असे असतात की जे आठवणीत राहणारे असतात.
"मेरा छाता" सारखी कविता असो किंवा "मामा की ऐनक" सारखा धडा हे वाचुन तर मन जुन्या आठवणीत गेल.

मृत्युन्जय's picture

19 Jul 2016 - 1:11 pm | मृत्युन्जय

धन्या लेका तुझ्या गुरुच्या अपेक्षेप्रमाणे कष्ट करुन यश मिळवलेस त्यातुनच गुरुंना भरभरुन गुरुदक्षिणा मिळाल्यासारखे वाटत असेल. तुझ्या गुरुंना आमच्याकडुनही साष्टांग नमस्कार.

मोहनराव's picture

19 Jul 2016 - 1:19 pm | मोहनराव

वा! अप्रतिम.. मलाही माझ्या शाळेतले शिक्षक आठवले..
मला वाटते आजकाल असे निरपेक्षपणे शि़क्षण देणारे शिक्षक कमी झाले आहेत.

सौंदाळा's picture

19 Jul 2016 - 1:25 pm | सौंदाळा

__/\__

रसिया बालम's picture

19 Jul 2016 - 1:27 pm | रसिया बालम

अप्रतिम मित्रा !

मी धन्याच्या घरच्यांना ओळखतो. अगदी साधी माणसे आहेत. शहरी जीवनाचा वाराही न लागलेली वाटतात. धन्या स्वतः कित्येकदा बालपणातील म्हशी राखणे वगैरे गोष्टी सांगतो. आजचा धन्या म्हणा किंवा त्याचा भाऊ, अगदी सराईतपणे शहरात मिसळून गेले आहेत. शहरात घरे, गाड्या म्हणा, व्यवहार म्हणा कि परदेशात राहणे म्हणा. त्यांचा न्यूनगंड घालवण्यचे मोठे काम शिक्षणाने केले आहे. योग्य गुरूकडून शिक्षणाने अन ज्ञानाने जो आत्मविश्वास येतो तो असा दिसून येतो. असे संपूर्ण परिवर्तन घडवणारी ताकद असणाऱ्या सार्या गुरुवर्याना वंदन.
(हा माझा दुसरा प्रणाम खास करून धन्याच्या शेखसरांसाठी)

उडन खटोला's picture

19 Jul 2016 - 2:50 pm | उडन खटोला

>>>>न्यूनगंड घालवण्यचे मोठे काम शिक्षणाने केले आहे. योग्य गुरूकडून शिक्षणाने अन ज्ञानाने जो आत्मविश्वास येतो तो असा दिसून येतो. असे संपूर्ण परिवर्तन घडवणारी ताकद असणाऱ्या सार्या गुरुवर्याना वंदन.

+११११

शिक्षणाचा खरा हेतू समजून शिकवणाऱ्या गुरुंच्या ऋणातच राहायला हवं. ते ऋण फिटायचं नाही.

प्रशांत's picture

19 Jul 2016 - 1:58 pm | प्रशांत

अप्रतिम...

सूड's picture

19 Jul 2016 - 2:41 pm | सूड

अप्रतिम लिहीलं आहेस.

अप्पा जोगळेकर's picture

19 Jul 2016 - 5:00 pm | अप्पा जोगळेकर

मस्तच. आमच्या वाट्याला असे शिक्षक आले नाहीत याची खंत वाटते.

जव्हेरगंज's picture

19 Jul 2016 - 6:38 pm | जव्हेरगंज

फार सुंदर लेख!!!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

19 Jul 2016 - 8:13 pm | भाग्यश्री कुलकर्णी

धन्याशेठ लई भारी लिवलासा..

सुबोध खरे's picture

19 Jul 2016 - 8:15 pm | सुबोध खरे

प्रत्येकाला आपले गुरुजन आठवतील असाच लिहिलेला सुंदर लेख.
गोरेगाव फक्त बाहेरून पाहिलेले आहे तुमच्या शब्दसंपत्तीमुळे शाळा आणि शेख सर यांचे यथार्थ चित्र उभे राहते डोळ्यापुढे.
अशा अनेक "शेख सराना" आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी साष्टांग दंडवत.

मितभाषी's picture

20 Jul 2016 - 12:47 am | मितभाषी

धनाजीराव उत्तम लेख. माझेही जिवन सेम असेच होते. मला असे सर नाही भेटले. परंतू माझा मोठा भाउच माझा गुरु आहे. तो आमच्या कुटुम्बातला पहिला पदवीधर अभियंता. कोणतेही मार्गदर्शन नसताना असेच शेतातील कामे करत, ओपन कॅटॅगरीत सीइओपीला इंजी. केले ८३-८४ साली. नंतर आम्हा सर्व भावंडांचे सर्व शिक्शन केले. तोच माझा गुरु.
शेख सरांना दंडवत.

धनाजीराव, तुमच्या शेख सरांना, आणि आम्हां सर्वांना आज आहोत तिथे पोहोचवणार्‍या अशा अनेक सरांना आणि मॅडमना सविनय नमस्कार!

मिपापलिकडच्या जगातही शेख सरांना मानवंदना मिळावी म्हणून तुमच्या लेखाचा दुवा फॉरवर्ड करतो आहे, आज पुन्हा एकदा मिपावर आल्याचं चीज झालं!

अमित खोजे's picture

20 Jul 2016 - 1:39 am | अमित खोजे

मनापासून लिहिलेला अन तसाच मनाला भावलेला लेख! शेख सर आवडले हे सांगायलाच नको पण तुम्ही कष्ट करून दिलेली गुरुदक्षिणाही आवडली. सुरेख लेखन.

आनंदयात्री's picture

20 Jul 2016 - 2:11 am | आनंदयात्री

वाह, काय उत्तम संधी मिळाली तुम्हाला गुरुदक्षिणा देण्याची! तुम्ही तिचे चीज केलेत. हा लेख त्यांना दाखवण्याची व्यवस्था मात्र जरूर करा.

सतिश गावडे's picture

20 Jul 2016 - 10:30 am | सतिश गावडे

सर्व प्रतिसादकांचे मनःपुर्वक आभार.

माझ्या या गुरुवंदनेच्या लेखाच्या निमित्ताने तुम्हाला तुमच्याही गुरुंच्या आठवणींना उजाळा देता आला, गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करता आली हे छान झाले.

गामा पैलवान's picture

20 Jul 2016 - 12:18 pm | गामा पैलवान

सतिश गावडे,

तुमच्या शेख मास्तरांना मन:पूर्वक प्रणाम. असे मास्तर मिळणं भाग्याचं लक्षण आहे. माझ्या शालेय आठवणीतले जे मास्तर आहेत त्यांनी कसे वागू नये असा धडा आम्हाला घालून दिलाय. :-(

आ.न.,
-गा.पै.

प्रीत-मोहर's picture

20 Jul 2016 - 12:35 pm | प्रीत-मोहर

__/\__

पैसा's picture

20 Jul 2016 - 4:42 pm | पैसा

सहज सुंदर लिखाण. _/\_

धन्या, लई भारी लिहिलं आहेस,

शेख सरांचा तुझ्या आयुष्याच्या जडणघडणीत जेवढा मोठा हात आहे, तेवढीच तुझी जिद्द आणि तयारी सुद्धा महत्वाची आहे. तुझ्या बरोबर ज्या दोन मित्रांना ब मधुन अ मध्ये सरांनी आणलं होतं, ती पुढे कुठे आहेत याबद्दल बोललास तर..

मनापासुन आलेलं आणि खुप छान लिहिलं आहेस, धन्यवाद.

मिहिर's picture

20 Jul 2016 - 8:07 pm | मिहिर

छान लिहिलंय.

समिर२०'s picture

21 Jul 2016 - 12:20 am | समिर२०

अप्रतिम लिहीलं आहेस.

संदीप डांगे's picture

21 Jul 2016 - 1:01 am | संदीप डांगे

खूप छान लिहिलंय हो गावडे सर! माझाही प्रवास काहीसा तुमच्या लेखातल्या सारखाच झालाय.

आमच्या शाळेत असे शिक्षक मिळाले नाहीत हे आमचं दुर्दैव. कायम टॉप टेन हुशार मुलांना ओंजळीत घेऊन फोडासारखं जपणारे शिक्षक पाहिलेत.

तुमच्या शेखसरांमुळे मला माझ्या शाळेतल्या एकमेव गुरुंची श्री नागपुरे सरांची आठवण झाली. ते चित्रकला शिक्षक होते व पाचवी ते सातवी माझे वर्गशिक्षकही होते. पाचवी ते सातवी मी वर्गात पहिल्या क्रमांकाला होतो. चित्रकलाही चांगलीच होती, माझे सरांशी विशेष प्रेमाचे संबंध होते. सातवीला सेन्डॉफ देतांना सरांनी सर्व मुलांना खास स्वतः बनवलेली शुभेच्छा कार्डे दिली, त्यावर स्वत:च्या सुंदर मोत्यासारख्या हस्ताक्षरात प्रत्येक मुलाच्या नावानीशी खास भावी आयुष्यासाठी आशिर्वाद लिहून दिलेले. त्यासाठी त्यांनी खास जापानवरुन त्याकाळी (१९९४) सहाशे रुपयाचा पेन मागवला होता. त्या वयात आम्हा मुलांना त्या सहाशेच्या पेनाचे कौतुक पण नंतर मोठं झाल्यावर आजपर्यंत सरांचे नितळ, स्निग्ध, निरपेक्ष प्रेम त्या कृतीतून जाणवत आठवत राहते नेहमी.

माझ्या आयुष्यात मी आज जो काही आहे ते त्यांनी केलेल्या (त्यांचे मते) क्षुल्लकशा मार्गदर्शनाने. त्यांची प्रतिमा माझ्या मनात इतर शिक्षकांपेक्षा कैक पटीने उजळ होती, त्यास कारण त्यांचे बोलणे-वागणे-स्वभाव व कर्तृत्व. जेव्हा मला बीए करतांना पुढे अंधार दिसत होता, चित्रकला हाच एकमेव आधार वाटत होती, त्यावेळेला मी त्यांना भेटायला गेलो, त्यांनी दोनच शब्दात सांगितले, 'जेजेला जा'. निव्वळ तेवढ्यावर न थांबता मला माझे ध्येय गाठेपर्यंत सर्वप्रकारे मदत केली. तीही निरपेक्ष. त्याच मुळे हे जेजे काळे का गोरे, निळे का हिरवे माहिती नसतांना, खरंच काही फायदा होणार का नाही त्याचा पत्ता नसतांना, फक्त नागपुरे सर म्हणतायत म्हणून मी आंधळेपणाने फॉलो केले. आणि माझे अवघे आयुष्य बदलले, आता कधी जेव्हाही मी गावात जातो आणि इतर सवंगड्यांना बघतो, त्यांच्यात माझ्यातला फरक बघतो, त्या फरकाला कारण असणार्‍या माझ्या गुरुला मनोमन वंदन करतोच करतो.

गावडेसर! डोळ्यात पाणी आणलेच शेवटी...

"कायम टॉप टेन हुशार मुलांना ओंजळीत घेऊन फोडासारखं जपणारे शिक्षक पाहिलेत."

+ ११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

जेनी...'s picture

21 Jul 2016 - 1:11 am | जेनी...

अप्रतिम _/\_

जेनी...'s picture

21 Jul 2016 - 1:12 am | जेनी...

अप्रतिम _/\_

खटपट्या's picture

21 Jul 2016 - 4:12 am | खटपट्या

मी ज्यांचा लाडका होतो त्या पित्रेबाइ आणि वर्तकबाइंची आठवण करुन दीलीत.
आज त्या कुठे आहेत माहीत नाहीत. :(

वरुण मोहिते's picture

21 Jul 2016 - 2:24 pm | वरुण मोहिते

छान लिहलंय आम्ही पण मराठी शाळेतले पण काही शिक्षकांनी आमचं इंग्लिश समृद्ध केला त्याची आठवण झाली .. बाय द वे आमच्या आईपण मुख्याध्यापिका..parvach किती मुलांनी येऊन फुलं दिली ते पाहून आणि तुमचा लेख वाचून खूप बर वाटलं

स्वराजित's picture

30 Jul 2016 - 3:42 pm | स्वराजित

शेख सराना _/\_

शेखसर यांचे अल्पशा आजारपणामुळे दि. १६.०१.२०१७ रोजी दुःखद निधन झाले.... त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ..!!तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ..!!!

यशोधरा's picture

25 Jan 2017 - 11:02 am | यशोधरा

वाईट बातमी. शेख सरांच्या आत्म्यास शांती मिळो.
खरं तर ते गेले नाहीतच, जोवर त्यांची आठवण ठेवणारे विद्यार्थी आहेत, तोवर शेख सर आहेतच.

सतिश गावडे's picture

25 Jan 2017 - 9:25 pm | सतिश गावडे

दोन दिवसांपूर्वी ही दुःख:द बातमी कळली.

हा लेख मी त्यांच्या मुलामार्फत त्यांच्यापर्यंत पोचवला होता आणि त्यानंतर त्यांना फोन केला. जवळपास बारा वर्षांनी त्यांच्याशी बोललो. अगदी होता भरभरुन बोलत होते सर. या लेखाची प्रिंट काढून ती आपल्या मित्राना दाखवल्याने त्यांनी आवर्जून सांगितले.

त्यांनी भेटायलाही बोलावले होते पण ते मात्र राहून गेलं ही खंत आता राहील.

माझ्या आयुष्याला आकार देणाऱ्या माझ्या या गुरुला माझी विनम्र श्रद्धांजली !!!